Friday, January 29, 2021

प्रवास (भाग 5)

 


प्रवास

भाग 5

आनंद (?) खोलीबाहेर पडला तो थेट मागच्या दाराने घराबाहेर गेला. त्याची पावलं भराभर पडत होती. तो भिकुच्या झोपडीजवळ आला. झोपडीमध्ये शिरण्याअगोदर त्याने एकदा मागे वळून वाड्याकडे बघितलं आणि मग तो त्या झोपडीत शिरला.

***

मनाली खोलीत शिरली आणि तिने अगोदर मोबाईल हातात घेत किती वाजले आहेत ते बघितलं. दुपारचे बारा वाजून गेले होते. ते पाहून मनालीला धक्काच बसला.

मनाली : बारा वाजून गेले? अरे बापरे! इथे एकूणच या झाडांच्या गर्दीमध्ये बाहेरच्या जगाशी संबंध तुटतो आणि त्यात या थंडगार वातावरणामुळे तर वेळेचा अंदाजच येत नाही.

अस म्हणत तिने अनघाला हाक मारली. मनालीच्या पहिल्या हाकेतच अनघा उठली. तिने डोळे चोळत मनालीकडे बघितलं.

मानली :अनघा, किती वाजले आहेत तुला माहीत आहे का?

अनघाने मनालीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

मनाली : अग, बारा वाजून गेले आहेत.

मनालीच्या त्या वाक्याने अनघा एकदम उठून बसली आणि तिने तिचा फोन हातात घेतला.

अनघा : हा मेला!

अनघाकडे नीटसं लक्ष नसलेली मनाली अनघाच्या त्या शब्दांनी एकदम दचकली आणि पटकन अनघा जवळ जात तिने अनघाचा हात धरला.

अनघा :अग सारखी काय घाबरतेस? माझा फोन बंद पडला आहे असं म्हणायचं होतं मला. तुझ्याकडे चार्जर आहे न? दे न मला. माझा बहुतेक विसरले आहे मी. काल गरज नाही पडली न.

मनाली : अग माझा फोन पण बंद पडला होता. आत्ताच चार्जिंगला लावला आहे मी. बघ न. जेमतेम 12% चार्ज झाला आहे.

असं म्हणत मनालीने फोन हातात घेतला.

मनाली : अरेच्या! चार्जिंग नाही होते. काय झालं आता?

अनघा : अग वीज गेली असेल. दिवा किंवा पंखा लावून बघ बघू.

अनघाच्या बोलण्याने मनालीचं मन थोडं खट्टू झालं. तिने उठत पंख्याचं बटण लावलं. पंखा चालू झाला नाही. ते पाहून अनघा हसली आणि मनाली अजूनच वैतागली.

मनाली : अग मोबाईल नाही म्हणजे एकदम आयुष्य संपल्यासारखं वाटतं ग.

अनघा : मनाली नको ते काहीतरी नको ह बोलुस सकाळी सकाळी.

मनाली : सकाळी?

मनालीच्या त्या एका शब्दाने अनघा आणि मनाली खळखळून हसल्या. पलंगावरून खाली उतरत अनघा म्हणाली;"ए मी फ्रेश होऊन येते. तोपर्यंत त्या भिकुला हाक मारून तू त्याला चहा आणि त्यासोबत काहीतरी खायला करायला सांगशील का?"

अनघाकडे बघत मनाली म्हणाली;"तू ये ग फ्रेश होऊन मग एकत्रच बाहेर जाऊ. तू भिकुला काय ते सांग आणि मी नवीन आणि मंदारला उठवते. ठीक?"

मनालीकडे बघत अनघा हसली आणि 'ओके' अशी मान हलवत बाथरूममध्ये गेली. अनघा आत गेल्यावर मनाली काहीतरी गुणगुणत सहज म्हणून खिडकीकडे वळली आणि तिला जाणवलं की खिडकीबाहेर कोणीतरी उभं आहे. पण खिकडीबाहेरच्या झाडांमुळे कोण आहे ते तिला कळत नव्हतं. त्यामुळे कोण उभं आहे ते बघण्यासाठी ती खिडकीच्या अजूनच जवळ गेली पण ती खिकडीजवळ आल्याचे लक्षात आल्यामुळे असेल किंवा दुसऱ्या कारणामुळे असेल पण तिथे जे कोणी उभं होतं ते एकदम तिथून निघून गेलं. मनालीला त्या एका घडनेमुळे अस्वस्थ वाटायला लागलं. तिला रात्री घडलेले सगळेच प्रसंग एकामागोमाग एक आठवायला लागले आणि ती एकदम घाबरून गेली. ती परत मागे वळली आणि त्याचवेळी अनघा बाथरूममधून बाहेर आली. मनाली अनघाकडे वळत म्हणाली;"कोणीतरी बाहेर उभं होतं." अनघाला त्यात काहीच वावगं वाटलं नाही. त्यामुळे खांदे उडवत ती म्हणाली;"मग?"

मनाली : अनघा, कोणीतरी आपल्या खिडकीबाहेर उभं राहून निरीक्षण करत होतं आत. यात तुला काही वेगळं नाही वाटत?

अनघा : अग मनाली; एकतर इथे आजूबाजूला फार कोणी राहात नाही. जे राहातात ते अगदीच गावंढळ आणि साधी माणसं आहेत. त्यामुळे त्यांना वाड्यावर कोण येतं त्याबद्दल एक कुतूहल असतं. त्यामुळे वाड्यावर जाग दिसली की येतात उगाच बघायला. तू फार मनावर घेऊ नकोस ते. चल आपण बाहेर जाऊ.

असं म्हणून अनघा मनालीला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली;"तू नवीन, मंदार आणि आनंदला उठव. मी भिकुला हाक मारून चहा आणि खाण्याचं बघते. बघ एक वाजून गेला आहे. आता ब्रेकफास्ट नावाचा फार्स न करता व्यवस्थित काहीतरी खाऊन घेऊया आणि लगेच निघुया असं मला वाटतं. काय?"

मनाली अनघाकडे मोठे डोळे करून बघत म्हणाली;"तुला कसं कळलं एक वाजून गेला आहे? तुझा मोबाईल तर बंद आहे न?"

त्यावर तिच्या टपलीत मारत अनघा म्हणाली;"अहो भितरट भागूबाई या घरात घड्याळ आहे म्हंटलं. समोर बघ." आणि खो-खो हसायला लागली. समोरच्या घड्याळाकडे बघून मनाली देखील खदखदून हसायला लागली. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून नवीन आणि मंदारला जाग आली. ते दोघेही उठून बसले. पण दोघांनाही काहीसं चक्कर आल्यासारखं वाटलं आणि तसेच परत आडवे पडले. एकमेकांकडे बघत त्यांनी कपाळाला आठ्या घातल्या. क्षणभराने डोकं गच्च धरत मंदारने अनघा आणि मनालीला हाक मारली;"ए माहामायांनो! ही काय हसायची वेळ आहे का? अजून आमची उठायची वेळ देखील झालेली नाही. तुमची झोप पूर्ण झाली म्हणजे सगळं जग जागं झालं की काय? किती मोठ्याने हसताय आणि ओरडताय!" मंदारचा आवाज ऐकून अनघा आणि मनाली त्यांच्या खोलीमध्ये गेल्या.

मंदार आणि नवीन अजूनही पलंगावर पडून होते. त्यांच्याकडे बघत मनाली म्हणाली;"ए कुंभकरणाच्या अवलादांनो! घड्याळ बघा. दुपारचा एक वाजून गेला आहे. नवीन वर्षाची सुरवात अशी करायची आहे का तुम्हाला? उठा आता."

नवीन मोबाईल शोधत म्हणाला;"काय सांगतेस मनाली? दुपारचा एक वाजून गेलासुद्धा? आयला! म्हणजे असे किती तास आम्ही झोपलो आहोत? आईशप्पथ! मला तर आठवत देखील नाही कधी झोपलो.... कसे झोपलो!!!"

अनघाकडे बघत मनाली म्हणाली;"नवीन, तू आमच्या खोलीतून आलास आणि थेट तुमच्या खोलीत शिरलास. बहुतेक लगेच झोपलाच असशील न?"

नविनला काही केल्या रात्री तो कधी आणि कसा झोपला ते आठवत नव्हतं. त्याने मंदारकडे बघितलं आणि विचारलं; "यार तू कधी झोपलास? मला तर काहीही आठवत नाही. अनघाशी बोलायला गेलो होतो त्यानंतर नक्की काय घडलं कोणजाणे? त्यानंतर आत्ता जाग येते आहे; आणि इतकंच आठवतंय."

मंदार अजूनही डोकं धरून होता. पाळीपाळीने अनघा, मनाली आणि नविनकडे बघत तो म्हणाला;"मी? मी कधी झोपलो? काय माहीत कधी झोपलो. अग मनाली आपण दोघे तर गप्पा मारत बसलो होतो न? मग तू कधी उठून गेलीस? की आपण दोघे एकत्रच उठलो? काहीही आठवत नाही आता."

मंदारचं बोलणं ऐकून मनाली एकदम कावरी-बावरी झाली. कारण आनंदने अनघाला प्रपोज केलेली गोष्ट ती नकळत मंदारला बोलून गेली होती; हे तिला आठवलं. अर्थात ही घटना अनघाला सगळ्यांना सांगण्याची इच्छा आहे किंवा नाही याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे आता जर मंदारने त्यांच्या गप्पांचा उल्लेख केला तर परत अनघा आणि तिच्यात वाद होईल याची तिला कल्पना आली. त्यामुळे ती घाईघाईने म्हणाली;"मला काय माहीत तू काय करत होतास? अनघा आनंदवर वैतागून खोलीत गेली... तिच्या मागे तिला समजावायला नवीन गेला... तू आणि मी दिवाणावर बसलो होतो तर आनंद समोर आला. मला त्याच्या वागण्याचा राग आला होता; म्हणून मी त्याच्याशी बोलणं टाळायला माझ्या खोलीकडे गेले. बस्! मला तर इतकंच माहीत आहे. तू कधी गेलास झोपायला मला काय माहीत. तू आणि आनंद तर गप्पा मारत बसला नव्हतात न? आणि नवीन मी खोलीत शिरताना तू बाहेर पडलास आमच्या खोलीतून. मग तू काय केलंस? तुम्ही मुलगे किती वेळ जागत होतात आणि काय करत होतात? infact त्यावेळी बाहेरून नको नको ते आवाज येत होते. आम्ही दोघी किती घाबरलो होतो. पलंगावरून खाली उतरून तुम्हाला हाका मारायला येण्याची देखील हिम्मत नव्हती आमच्यात. मग तशाच झोपलो आम्ही घाबरत-घाबरत."

तिचं बोलणं ऐकून मंदार आणि नवीन अजून गोंधळले.

मंदार : नको-नको ते आवाज? म्हणजे काय म्हणायचं आहे तुला मनाली?

त्याच्या प्रश्नाने वैतागत मनाली म्हणाली;"come on मँडी! एका सेकंदात झोपलात का तुम्ही? अरे कोल्हे ओरडत होते बाहेरून. अगदी वाड्याच्या जवळून. जस काही फेऱ्या मारत होते वाड्याला. तुम्हाला कळलं नाही? कमाल आहे?!"

तिचं बोलणं ऐकून मंदार आणि नवीन अजूनच बुचकळ्यात पडायला लागले होते.

नवीन : कोल्हे ओरडत होते? कधी? काल रात्री? आयला!!! आणि मला कळलं नाही? यार!!! काय मुली आहात. हाका मारल्या असत्या तुम्ही तर किमान फोटो तरी काढले असते ना कोल्ह्यांचे.

त्याच्या या बोलण्याने मात्र अनघा वैतागली.

अनघा : फोटो काढणार होतास कोल्ह्यांचे? मग आपण दिवाणखान्यात बसलो होतो आणि अचानक त्यांचे आवाज यायला लागले त्यावेळी का नाही गेलास बाहेर? तेव्हा का फाटली होती तुझी?

अनघाचं टोचून बोलणं नविनला लागलं. त्याचा चेहेरा एकदम उतरला. मंदारला ते लक्षात आलं. तो अनघाकडे बघत म्हणाला;"अनघा, काहीही काय बोलते आहेस? आपण बसलो होतो तेव्हा कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज कधी आला होता ग? If am not mistaken; आपण बाहेर बसलो होतो तेव्हा एकदा एकदम आवाज आला आणि आपण सगळे घरात येऊन बसलो. मग थोड्या गप्पा झाल्या आणि मग....... मग! मग??? मग काय झालं? मला काहीही आठवत नाही. पण बहुतेक आपण झोपलो."

नवीन आणि मंदारला काहीही आठवत नाही हे मनालीला थोडं विचित्र वाटलं. पण तिला त्याविषयी फार चर्चा नको होती. कारण एकतर जर मंदारने चुकून आनंद आणि अनघाच्या प्रपोजवाल्या घटनेचा उल्लेख केला असता तर कदाचित अनघाला आवडलं नसतं... कदाचित आनंदला देखील! त्यामुळे मनाली टार्गेट झाली असती; आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे काल रात्रीच्या आठवणी फार काही चांगल्या नव्हत्या... त्यामुळे तिची भिती वाढली असती. त्यामुळे ती सगळ्यांकडे आळीपाळीने बघत म्हणाली;"यार काल की बात पुरानी.. पिछ्ले साली की थी ना! भूल जाओ. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस उगवला आहे. नवीन सुरवात होणार आहे. त्यामुळे.... नवीन नावाच्या माझ्या मित्रा उठ आणि फ्रेश होऊन बाहेर ये." तिचा कोटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून सगळेच हसले. नवीन आणि मंदारला थोडं गरगरल्या सारखं होत होतं. पण दोघेही पलंगावरून खाली उतरले आणि म्हणाले;"तुम्ही काहीतरी खाण्याचं बघता का ग. आम्ही आलोच... आणि तो अन्या उठला आहे का ते पण बघा."

ते दोघे उठलेले बघून अनघा आणि मनाली हसत हसत खोलीच्या बाहेर आल्या. अनघाची नजर आनंदच्या खोलीकडे वळली. खोलीचं दार उघडं होतं. तिला खोलीत डोकावून बघण्याचा खूप मोह झाला. पण अजूनही ती रात्रीचा अपमान विसरली नव्हती. त्यामुळे त्याच्या खोलीकडे दुर्लक्ष करून ती स्वयंपाकघराकडे वळली. अनघाने आनंदच्या खोलीकडे जाण्याचं टाळलेलं मनालीच्या लक्षात आलं. पण ती काहीच बोलली नाही. खरंतर काल रात्रीच्या सगळ्या घटनांनंतर तिच्या मनात आनंद बद्दल एक विचित्र भीती निर्माण झाली होती. अर्थात ती हे कोणाकडे बोलू शकत नव्हती. त्यामुळे काही एक न बोलता ती देखील अनघा सोबत स्वयंपाकघरात गेली.

मंदार आणि नवीन उठले खरे पण दोघांचंही डोकं खूप दुखत होतं. नवीन मंदारकडे बघत म्हणाला;"यार मँडी, डोकं खूप दुखतं आहे रे. काय कारण असेल काय माहीत. साधी बिअर तर प्यायलो होतो आपण. ती पण लिमिटमध्ये. आपण झोपायला गेलो... पण मग सगळेच परत बाहेर आलो. मग अनघाचं आणि अन्याचं काहीतरी कारणावरून वाजलं आणि ती फणफणत तिच्या खोलीत गेली आणि तिला समजावायला मी गेलो इतकंच आठवतंय मला. यार झोपायला कधी आलो... परत पीत बसलो होतो का... काहीही आठवत नाही मला."

मंदार देखील स्वतःचं डोकं दाबत म्हणाला;"यार मला पण काहीही आठवत नाही आणि माझं डोकं पण जाम दुखतंय. नवीन... यार तुला असं नाही का वाटत की इथे काहीतरी abnormal घडतंय. किंवा काहीतरी वेगळं आहे नेहेमीपेक्षा?"

मंदार असं म्हणाला आणि तितक्यात आनंद खोलीत आला. आनंदला येताना बघून काहीतरी बोलायला तोंड उघडलेला नवीन गप्प बसला आणि बाथरूमकडे गेला. आनंदला बघून मंदारला देखील काही फार बरं नाही वाटलं. पण तो काही बोलला नाही. आनंद मंदारच्या शेजारी बसत म्हणाला;"मँडी कसं वाटतंय आता तुला? रात्री तुला काहीतरी त्रास व्हायला लागला होता न? मीच नाही का आणून सोडलं तुला तुझ्या पलंगावर. बरा आहेस न आता?"

आनंदचं बोलणं ऐकून मंदारला आश्चर्य वाटलं.

मंदार : मला कसला त्रास झाला?

आनंद : माझा!!!

मंदार : काय?

आनंद काहीतरी बोलणार होता तेवढ्यात नवीन बाथरूममधून बाहेर आला. नविनला बघताच आनंदने विषय बदलला आणि हसत म्हणाला;"यार गंमत करत होतो. चल उठ फ्रेश होऊन बाहेर ये. चल नवीन आपण जाऊया बाहेर." अस म्हणून आनंद नवीन सोबत दिवाणखान्यात आला. नविनच्या मनात अजूनही आनंदबद्दल राग होता. अर्थात त्याला या रागाचं कारण आठवत नव्हतं. त्यामुळे तो आनंदशी काहीही न बोलता स्वयंपाकघराकडे गेला. त्याने आत डोकावलं तर अनघा चहा बनवत होती आणि मनाली बाजूला उभी होती. मनालीकडे बघत नवीन म्हणाला;"मनली तुझा चार्जर घेऊ का जरा. माझा फोन बंद झालाय." त्याच्याकडे बघत हसत मनाली म्हणाली;"हो घे की. पण चार्जिंग होणार नाही ह." नवीन गोधळून तिच्याकडे बघायला लागला. त्यावर ती म्हणाली;"अरे वीज गेली आहे इथे. कोणाचाही मोबाईल चार्ज होणार नाही. माझा पण जेमतेम 12 टक्के चार्ज झाला होता आणि आता 9 टक्क्यांवर आलाय." तिचं बोलणं ऐकून नवीन थोडा वैतागला आणि काही एक न बोलता बाहेर गेला. अनघाने चहा होताच सगळ्यांसाठी कप भरले. मनालीने एका प्लेटमध्ये थोडी बिस्किटं काढली आणि दोघी बाहेर आल्या. बाहेर आनंद, नवीन आणि मंदार बसले होते पण कोणीही कोणाशीही बोलत नव्हतं. सगळ्यांनी चहा घेतला. अजूनही सगळेच शांत होते. शेवटी अनघा उभी राहात म्हणाली;"तो भिकू काय करतो आहे बघून येते. आता एकदम जेऊन घेऊ आणि निघुयाच." बाकीच्यांनी तिच्या म्हणण्यावर मान डोलावली. पण आनंद तिची नजर चुकवत मंदारकडे बघत म्हणाला;"तो भिकू पिऊन टाईट होऊन पडला असेल आता. काल आपल्या पैशांची फुकट मिळाली आहे न. सोडा त्याला. मीच बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येतो. खाऊन घेऊ आणि निघू." असं म्हणून इतरांचं मत समजून घेण्याच्या भानगडीत न पडता तो उठून उभा राहिला.

मनालीला हा प्लॅन फार काही पटला नाही. ती पटकन उभी राहात म्हणाली;"अरे आपण सगळेच तयार होऊन बाहेर पडुया न. जेऊ आणि तसेच निघू. काय?"

अनघाला देखील तिथे फार थांबायची इच्छा नव्हती. त्यामुळे ती देखील उभी राहिली. पण मंदार म्हणाला;"यार खाऊन मग तयारी करूया प्लीज. मला खूप त्रास होतो आहे. माहीत नाही नक्की कसला. पण डोकं दुखतं आहे. खरं तर भूक पण लागली आहे. आपण तयार होऊन बाहेर पडणार; मग खानावळ शोधणार मग खाणार. यात खूप वेळ जाईल यार. आनंद आणतो आहे तर आणू दे ना. तोपर्यंत आपण सगळे तयार होऊन बसूया." मंदारच्या बोलण्यावर नविनने देखील मान डोलावली. कारण त्याचं डोकं देखील अजूनही जड होतं.

मंदारचं बोलणं ऐकून आनंदने एकदा मनालीकडे बघितलं आणि तो घराबाहेर निघून गेला. तो गेलेल्या दिशेने बघत मनाली म्हणाली;"friends, let me tell you... there's something fishi about this person. He is not our Anand!!!"

तिचं बोलणं ऐकून अनघाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि ती पटकन बेडरूमकडे पळाली. मंदार आणि नविनला देखील मनालीचं म्हणणं पटलं होतं. पण ते दोघेही काहीच बोलले नाहीत. एकदा त्यादोघांकडे बघून मनाली देखील बेडरूमच्या दिशेने जात म्हणाली;"यार, तुम्ही मान्य करा किंवा नाही.... पण हा आनंद बदलला आहे आणि मला आता इथे थांबायची खरंच खूप भिती वाटते आहे. त्यामुळे तो आला की लगेच खाऊन निघणार आहोत हा आपण. प्लीज त्यावेळी काही नाटकं करू नका. I beg of you both."

मनाली गेली आणि मंदार आणि आनंद एकमेकांकडे बघत तसेच बसून राहिले. त्यांना तिथून उठून तयारी करायला जायची इच्छाच होत नव्हती. असा किती वेळ गेला कोण जाणे. मुली अजूनही त्यांच्या खोलीतच होत्या आणि मंदार आणि नवीन दिवाणखान्यातच बसून होते. सहज मंदारचं लक्ष स्वयंपाकघराकडे गेलं तर तिथे हाताची घडी घालून यादोघांकडे खुनशीपणे बघत उभा असलेला भिकू त्याला दिसला. भिकुला असं बघून मंदार एकदम दचकला आणि ताठ बसत त्याने नविनला खूण केली. नविनने देखील स्वयंपाकघराकडे बघितलं आणि तिथे भिकुला बघून तो पण दचकला. चेहेऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता मंदार उभा राहिला आणि भिकुकडे बघत म्हणाला;"अरे आनंद... म्हणजे तुझे मालक... बाहेर गेले आहेत. तू नंतर ये." भिकूने मात्र मंदारकडे दुर्लक्ष केलं आणि तो तसाच तिथे उभा राहिला. उलट आता त्याच्या डोळ्यातला खुनशीपणा वाढला होता.

तो तिथेच उभा आहे हे बघून मंदार आणि नवीन उठून त्यांच्या खोलीच्या दिशेने जायला लागले. त्याबरोबर भिकू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. आता खोली आणि मंदार-नवीन यांच्या मध्ये भिकू होता. भिकूने हात पाठीकडे ठेवले होते आणि तो अर्धवट मान खाली घालून तिरप्या नजरेने मंदार-नविनकडे बघत होता. त्याच्या तशा बघण्याने मंदार आणि नवीन अस्वस्थ झाले आणि एक पाऊल मागे सरकले. ते मागे जात आहेत हे लक्षात येऊन भिकू पुढे यायला लागला. मंदार आणि नवीन पूर्णपणे गोंधळून गेले होते. नक्की काय करावं ते त्यांना सुचेना. तेवढ्यात अनघा दिवाणखान्यात आली. समोर भिकुला बघून ती तिच्या भुवया ताणल्या गेल्या आणि एकदम ती ओरडली;"भिकू!!! भिकू?? काय करतो आहेस? मागे हो बघू."

तिचा आवाज ऐकताच भिकू पुढे येता-येता थांबला. पण त्याची नजर अजूनही मंदार आणि नाविनवर खिळलेली होती. अनघाला बघताच मंदार तिच्याजवळ सरकला आणि म्हणाला;"ए आवर ग हे धूड. आनंद म्हणाला ते खोटं नाही. बहुतेक खूप प्यायला आहे तो. डोकं ठिकाणावर नाही वाटत त्याचं. जायला सांग बघू त्याला आणि तो गेल्यावर आपण दारं लावून घेऊ आतून."

मंदारचं बोलणं ऐकून भिकू एकदम बिथरला. झटकन पुढे येत त्याने मंदारची मान पकडली आणि म्हणाला; "मालकांच्या वाड्यावर कोणीही हक्क सांगू शकणार नाही. हा वाडा मालकांचा आहे. समजलं?" बोलताना भिकू मंदारची मान जोरात दाबत होता. त्यामुळे मंदारचा श्वास अडकल्यासारखं व्हायला लागलं. तो खुसमटल्यामुळे ओरडायचा प्रयत्न करायला लागला. बाहेर चाललेला आवाज ऐकून मनाली खोलीच्या दारात आली. भिकू अचानक असं काहीतरी करेल असं अनघाला वाटलं नव्हतं. त्यामुळे ती एकदम अवाक होऊन समोर घडणारं नाटक बघत होती. नक्की काय करावं तिला सुचेना..... आणि अचानक भिकुच्या मागून त्याच्या मानेवर कसलातरी प्रहार झाला. भिकूने मंदारचा गळा सोडला आणि आपली मान धरत तो मागे वळला. भिकुची मागे नवीन उभा होता. त्याच्या हातात पितळ्याचा मोठा फ्लॉवरपॉट होता. भिकू धडपडत नविनच्या दिशेने वळला. आता तो नविनला धरणार एवढ्यात मनालीने हाताला लागलेल्या मोठ्या लॅम्पशेडने भिकुवर मागून प्रहार केला.

खरंतर मनालीच्या अंगात असा कितीसा जोर असणार? पण दारू प्यायलेला असल्याने भिकुचा स्वतःवर ताबाच नव्हता. तो धडपडत मागे गेला आणि खाली पडला. होणारा प्रकार बघून अनघा एकदम गडबडली आणि ओरडली; "अरे.... अरे.... थांबा! त्याला का मारताय तुम्ही? तो तसा harmless आहे." तिचं बोलणं ऐकून मंदार चिडला आणि म्हणाला;"हा माणूस harmless आहे अनघा? तुला वेड लागलं आहे का? अग काही कारण नसताना त्याने माझ्यावर हल्ला केलाय... आणि harmless असला तरी आत्ता त्याचं डोकं फिरलंय त्याचं काय? तो काहीही करू शकतो आणि आपल्यावर भारी पडू शकतो हे तुला कळतंय का?"

मंदार इतकं बोलेपर्यंत भिकू परत उभा राहिला होता. काळाकभिन्न धिप्पाड भिकू त्याचे लाल डोळे गरागरा फिरवत नाविनवर चालून गेला. ते बघून अनघा परत एकदा बेंबीच्या देठापासून ओरडली;"भिकू थांब आधीच्या आधी. मालकांची शपथ आहे तुला."

ती असं म्हणताच भिकू होता तिथेच थांबला. पण आता तो एखाद्या पिसाळलेल्या जंगली कुत्र्यप्रमाणे गुरगुरत होता. तो ऐकूण प्रकार बघून मंदार आणि नवीन एकदम अनघाशेजारी येऊन उभे राहिले. भिकू देखील वळून त्यांच्या दिशेने बघायला लागला. वातावरण इतकं ताणलं गेलं होतं की कोणाच्याही लक्षात येत नव्हतं नक्की काय केलं पाहिजे. भिकुचा तो अवतार बघून अनघा देखील मनातून पुरती घाबरली होती. पण तिच्या लक्षात आलं होतं की भिकूने ऐकलं तर फक्त तिचं तो ऐकणार होता... आणि त्याने ठरवलं तर या चौघांचं काही खरं नव्हतं. त्यामुळे हलकेच एक पाऊल पुढे येत ती भिकुला म्हणाली;"अरे शांत हो बघू भिकू. कोणीही तुझ्या मालकांचा वाडा घेणार नाही आहे. हे सगळे एका दिवसाचे पाहुणे आहेत. आता जातील ते. तू जा बघू आता. आम्ही पण तयारी करतोय निघण्याची."

अनघाचं बोलणं ऐकून भिकू कसा कोणजाणे पण शांत झाला आणि मागे वळून मागच्या दाराकडे जायला लागला. तो जाताना बघताच मंदारने सुटकेचा श्वास सोडला आणि अनघाला म्हणाला;"नशीब तुझं ऐकून हे जनावर जातंय. मला कळत नाही तो फालतू अन्या असल्या लोकांना का पाळतो इथे."

मंदार त्याच्या नादात बोलत होता आणि अचानक भिकू मागे वळला आणि मंदारच्या दिशेने धावला. भिकू परत मागे वळला आहे हे नविनने बघितलं आणि त्याने तोच पितळ्याचा फ्लॉवरपॉट हातात घेतला. भिकुचं नविनकडे लक्ष नव्हतं. त्याने धावत येऊन मंदारचा गळा पकडला. त्याचवेळी नविनने परत एकदा फ्लॉवरपॉटने भिकुला मारलं... मनालीने देखील अंगातली सगळी शक्ती एकटवत परत एकदा लॅम्पशेडचा एक प्रहार भिकुवर केला. आतापर्यंत अनघाला देखील भिकुला आवरण शक्य नाही हे लक्षात आलं होतं. त्यामुळे तिने देखील बाजूलाच असलेली एक लाकडी मूर्ती उचलली आणि भिकुला मारायला लागली. नवीन-मनाली-अनघा भिकुवर प्रहरांवर प्रहार करत होते आणि भिकू मंदारला धरून होता.

काही क्षणच ही झटापट झाली आणि नवीन-मनाली-अनघाच्या मारण्याचा परिणाम होऊन भिकू एकदम खाली कोसळला. त्याच्या हातातून मंदारचा गळा सुटताच मंदार देखील खाली पडला. नवीन, मनाली आणि अनघा धापा टाकत उभे राहिले. भिकु बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहात होतं. मंदार खोकत-खोकत उभा राहिला. आता आपण नक्की काय करावं हे चौघांनाही कळेना. ते एकमेकांकडे बघत उभे होते. सर्वात पहिल्यांदा अनघा सावरली आणि म्हणाली;"अरे आज पहिल्यांदाच याला मी असं वागताना बघितलं यार. हा असा नाही आहे. फक्त शरीराने माजला आहे; असाच माझा समज होता. पण ते जाऊदे. आता पुढे काय? आपण एक करू शकतो. आपण याला त्याच्या झोपडीमध्ये नेऊन टाकू आनंद यायच्या आत. येऊन आपल्या बॅग्स भरून तयार राहू. तो आला तरी तो भिकूच्या भानगडीत पडणार नाही हे नक्की. कारण त्याला माहीत आहे की भिकू प्यायला की काही कामाचा नसतो. त्यामुळे आनंदला तयार व्हायला लाऊ आणि लगेच निघू."

तिचं बोलणं ऐकून मनालीने मान हलवली. ती आता रडायच्याच बेतात होती. पण मंदार म्हणाला;"अनघा अग त्याला बरंच लागलंय असं दिसतं. आपण त्याला असाच सोडला आणि अति रक्तस्त्रावामुळे तो मेला वगैरे तर?"

मंदारचं बोलणं ऐकून मनाली एकदम रडायलाच लागली. ते बघून नवीन वैतागला आणि म्हणाला;"मंदार काहीही बोलू नकोस. इतका स्ट्रॉंग आहे हा माणूस आपल्या मारण्याने तो नक्की मरत नाही... आणि तरीही तुला असं वाटतंय तर आपण त्याची मलमपट्टी करू. पण अगोदर त्याला उचलून त्याच्या झोपडीत नेऊया. अनघा तू चल आमच्या बरोबर. आम्हाला याची झोपडी कुठे आहे ते माहीत नाही. मनाली तोपर्यंत तू सगळ्यांच्या बॅग्स भरून ठेव."

मनाली नाही नाही अशी मान हलवत म्हणाली;"NO WAYS! मी एकटी इथे थांबणार नाही. मी पण येणार." नवीन थोडा वैतागला. पण त्याला तिची मनस्थिती लक्षात आली. त्यामुळे तो काही न बोलता वाकला आणि त्याने भिकुचे पाय धरले. मंदारने त्याचे हात धरले. अनघा आणि मनालीने देखील त्यांना मदत केली आणि चौघांनी मिळून भिकुला त्याच्या झोपडीच्या दिशेने नेले.

झोपडी जवळ येताच अनघाने पुढे होऊन झोपडीचं दार उघडलं. भर दुपार असूनही आत पूर्ण काळोख होता. अनघा दार उघडून उभी राहिली. मनाली देखील तिच्या जवळ दारापाशीच थांबली. मंदार आणि नवीन भिकुला घेऊन आत शिरले.... आणि दुसऱ्या क्षणी आतून नविनचा आवाज आला;"अनघा.... मनाली आत्ताच्या आत्ता आत या................."

क्रमशः

No comments:

Post a Comment