Saturday, January 23, 2021

प्रवास भाग 4

 


प्रवास

भाग 4

आनंद दिवाणखान्यात बसून गुणगुणत होता. सगळेच आपापल्या खोलीत गेले होते. त्यांच्या खोल्यांकडे आळीपाळीने बघत तो तिथेच बसून होता. अचानक परत एकदा कोल्हेकुई सुरू झाली आणि मंदार, नवीन, अनघा आणि मनाली धावत त्यांच्या खोल्यांमधून बाहेर आले. सगळेच काहीसे घाबरले होते. आनंद मात्र दिवाणावर स्वस्थ बसला होता. मघाशी कोल्हेकुई सुरू झाली त्यावेळी बाहेरून धावत आलेला आनंद आणि आत्ता दिवाणावर बसलेला आनंद वेगळे की काय असं वाटण्या इतका तो शांत होता; हातातल्या बिअरचा एक एक सिप घेत तो त्या सगळ्यांकडे बघत होता.

अनघा पुढे झाली आणि आनंदच्या हातातली बिअर काढून घेत वैतागलेल्या आवाजात म्हणाली;"आनंद, असा का वागतो आहेस? आम्ही सगळेच घाबरलो आहोत. परत एकदा कोल्हे ओरडायला लागले आहेत. तुला काहीच ऐकू येत नाहीये का? अरे आजवर मी इतक्या वेळा तुझ्याबरोबर इथे आले पण ही असली कोल्हेकुई कधी ऐकली नव्हती.

अनघाने 'मी इतक्या वेळा तुझ्याबरोबर इथे आले...' असं म्हणताच नविनचे डोळे मोठे झाले आणि मंदार-मनालीने एकमेकांकडे बघितलं.

अनघा तावातावाने बोलत होती. पण आनंदाचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो आळीपाळीने नवीन, मंदार आणि मनालीकडे बघत होता. आनंदच्या दुर्लक्ष करण्याने अनघा खूपच दुखावली आणि काही एक न बोलता मागे वळून तिच्या खोलीत निघून गेली. नविनने एकदा आनंदकडे रागाने बघितलं आणि तो अनघाच्या मागे गेला. मंदार आणि मनालीला काय करावं कळत नव्हतं. आनंद स्वतः उतरलेल्या खोलीच्या दिशेने एकटक बघत होता. अनघा आत गेली तरी त्याने काहीच हालचाल केली नव्हती. अनघा नक्की रडत असणार होती; नवीन तिची समजूत घालत असणार... म्हणजे त्या खोलीत जाणं शक्य नव्हतं. मंदारला एकट्याने त्याच्या खोलीत जायचं नव्हतं.... आणि मनालीची तिथे उभं राहण्याची तयारी नसल्याने ती चुळबूळ करत होती. असेच काही क्षण गेले आणि अचानक आनंद उभा राहिला आणि मंदार-मनालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याच्या खोलीकडे निघून गेला. तो जाताच मनाली दिवाणावर बसली; मंदार देखील तिच्या शेजारी बसला.

मनालीने मंदारकडे बघितलं आणि म्हणाली;"मँडी, इथे काहीतरी विचित्र घडतं आहे असं सारखं मला वाटतंय. अरे हा आनंद मध्येच नीट वागतो... मध्येच असा विचित्र वागतो... त्याचा काही अंदाजच येत नाही.

मंदार : अग, तो थोडा डिस्टर्ब आहे असं मला वाटतंय. या करोनाच्या अगोदर तो मला सारखा भेटत होता. त्याला अनघाला प्रपोज करायचं होतं. काय करावं-कसं करावं हे बोलण्यासाठी तो मला सतत भेटायचा. पण मग 21 मार्च पासून सगळी परिस्थितीच बदलून गेली. त्यानंतर आमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. भेटलो ते आज... म्हणजे काल सकाळी इथे यायला निघालो तेव्हा. आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो तेव्हा त्याला मी विचारलं अनघाला प्रपोज करण्याबद्दल. पण त्याने काही उत्तरच दिलं नाही ग.

मंदारच बोलणं ऐकून मनालीचे डोळे मोठे झाले. त्याच्याकडे बघत ती म्हणाली;"अरे काय संगोतोस? अनघा तर मला म्हणाली त्याने तिला दिवाळीत प्रपोज केलं होतं. इथेच... याच वाड्यात... मागच्या झोपाळ्याजवळ."

तिचं बोलणं ऐकून मंदारला एकदम शॉक बसला. "अन्याने अनघाला प्रपोज केलं? साला.... बोलला नाही मला काही. आयला हा काय मला खुळखुळा समजतो? इतक्या वेळा मला भेटला... इतके प्लॅन्स बनवले आम्ही कसं प्रपोज करता येईल त्याचे.... आणि याने प्रपोज केलं तर सांगितलं देखील नाही???" मंदारचा आवाज चढला होता. अचानक आनंद त्याच्या खोलीच्या दाराशी येऊन उभा राहिला. त्याला बघताच मंदार उभा राहिला आणि म्हणाला;"अन्या साल्या तू अनघाला प्रपोज केलसदेखील? बोलला नाहीस मला!!!"

मंदार बोलत होता आणि आनंद मनालीकडे रोखून बघत होता. मनाली त्याच्या नजरेने अस्वस्थ झाली आणि काही एक न बोलता पटकन तिच्या बेडरूमच्या दिशेने पाळली.

ती निघून जाताच मंदार आनंदच्या जवळ गेला आणि त्याची बखोट धरून म्हणाला;"काय फालतूपणा चालवला आहेस अन्या तू?"

थंड नजरेने मंदारकडे बघत आनंद म्हणाला;"बरोबर! फालतूपणा चालवला आहे आनंदने!! मग त्याला जाऊन सांग ते. मला नको."

आनंदच्या बोलण्याने मंदार बुचकळ्यात पडला. तो काहीतरी बोलणार इतक्यात आनंदने मंदारच्या हातातलं आपलं बहोत सोडवून घेतलं आणि मंदारच्या खांद्यावर हात ठेवत कोणतीतरी नस दाबली. एका क्षणात मंदार खाली कोसळला. त्याला तसाच ओढत आनंदने शेजारच्या खोलीत नेला आणि पलंगावर उचलून टाकला. आनंद मंदारच्या खोलीच्या बाहेर आला तर समोरच मनाली तिच्या बेडरूमच्या आत न जाता पडद्याआडून खोलीत बघत असलेली त्याला दिसली. तिच्याकडे दुर्लक्ष करत तो परत त्याच्या खोलीत निघून गेला.

मनालीचं बाहेर काय घडत होतं त्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. कारण खोलीमध्ये नवीन अनघाशी जे बोलत होता ते समजून घेण्यात तिला जास्त इंटरेस्ट होता. तिने त्यांचं बोलणं ऐकण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला फारसं काही ऐकायला नाही आलं. मात्र नविनने अनघाला प्रपोज केल्याचं तिच्या लक्षात आलं आणि अनघाने नाही म्हंटल्याचं देखील तिने ऐकलं. नवीन खोलीच्या बाहेर येत आहे हे तिच्या लक्षात आलं आणि ती बाजूला जाणार एवढ्यात नवीन बाहेर आला आणि त्याने मनालीकडे बघितलं. तिने सगळं ऐकलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं. पण काही एक न बोलता तो त्याच्या खोलीच्या दिशेने गेला.

नवीन खोलीच्या दारापासून दूर होताच मनाली पटकन खोलीत शिरली आणि तिने खोलीचं दार लावून घेतलं. मनालीने खोलीचं दार लावून घेतलं आहे हे नविनच्या लक्षात आलं आणि स्वतःच्या खोलीत जाण्याऐवजी तो आनंदच्या खोलीच्या दाराशी जाऊन उभा राहिला. त्याने हलकेच आनंदच्या खोलीचं दार वाजवलं.

आनंद खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. त्याला बघताच नवीन म्हणाला;"अन्या, का वागतो आहेस असा अनघाशी? तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे याची तुला कल्पना तरी आहे का?"

आनंदने थंड नजरेने नविनकडे बघितलं आणि म्हणाला;"अनघाचं प्रेम आहे!! कोणावर?"

नविनला त्याच्या बोलण्याचा राग आला. त्याचे दोन्ही खांदे धरत तो म्हणाला;"अन्या फालतूपणा बंद कर. कोणावर काय विचारतो आहेस. तुझ्यावर आहे तिचं प्रेम साल्या. तुझ्यावर! आनंदवर!!!"

आनंद अजूनही थंड नजरेने नविनकडे बघत होता. आपले दोन्ही खांदे सोडवून घेत तो म्हणाला;"आनंदवर प्रेम आहे न तिचं? मग जा आनंदला जाऊन सांग!" आनंद काय म्हणतो आहे ते नविनच्या लक्षात येण्याच्या अगोदरच आनंदने मंदारप्रमाणे त्याला देखील बेशुद्ध पाडत खोलीत नेऊन टाकलं.

आनंद नविनला आत टाकून आला आणि त्याच्या समोर भिकू उभा राहिला. त्याला बघताच आनंद काहीसं विचित्र क्रूरसं हसला.... आनंद हसताच भिकू देखील हसला.... आनंदने अचानक भिकुला मिठी मारली. दोघे तसेच उभे होते काही क्षण. आणि मग आनंद भिकुपासून लांब होऊन त्याच्या खोलीत निघून गेला. तो जाताच भिकू देखील मागे वळला आणि मागच्या दाराने बाहेर पडून त्याच्या घराच्या दिशेने निघाला. जाताना तो शीळ घालत होता आणि....

................ आणि घरात मात्र अनघा आणि मनालीला परत एकदा कोल्हेकुई ऐकू येत होती. एकमेकांचा हात धरून त्या दोघीही पलंगावर अवघडून बसल्या होत्या. वेळ जात होता आणि हळूहळू त्या दोघींनाही पेंग यायला लागली. दोघीही नकळत त्याच अवघडल्या अवस्थेत झोपून गेल्या.

***

मनालीला सकाळी जाग आली. अनघा अजूनही झोपलेलीच होती. मनालीने किती वाजले आहेत ते बघायला मोबाईल हातात घेतला पण तो पूर्ण डिस्चार्ज झाला होता. त्यामुळे तिने उठून तो पहिल्यांदा चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये गेली. ती बाहेर आली तरी अनघा अजून झोपलेलीच होती. मनालीने खिडकीबाहेर बघितलं. वेळेचा काहीच अंदाज येत नव्हता. एकतर खूपच गार होतं आणि बाहेरचं वातावरण देखील कुंद होतं. मनालीला गरम गरम चहा हवासा वाटायला लागला. त्यामुळे अनघा उठायची वाट न बघताच ती खोलीबाहेर आली. तिची नजर मंदार-नविनच्या बेडरूमच्या दिशेने वळली. त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा बघून ती तिथे गेली आणि तिने दारातूनच दोघांना हाक मारली. पण आतून उत्तर आलं नाही. म्हणून मग तिने खोलीत डोकावून बघितलं तर दोघेही पलंगावर अस्ताव्यस्त पसरले होते. ते बघून तिला हसू आलं आणि मागे वळून ती स्वयंपाकघराच्या दिशेने निघाली. आनंदच्या खोलीवरून जाताना तिने अंदाज घेतला. पण आनंदच्या खोलीचा दरवाजा अजूनही बंद होता. मानेला झटका देत मनाली स्वयंपाकघरात आली. तिने चहाचं सामान शोधून काढलं आणि स्वतःसाठी मस्त चहा करून घेऊन ती दिवाणखान्यात येऊन बसली.

अजूनही अनघा, मंदार आणि नवीन झोपेलेलेच होते. तिचं लक्ष आनंदच्या खोलीच्या दिशेने गेलं आणि त्याच्या खोलीचं दार उघडं होतं. तिच्या मानत आलं आनंद उठला आहे का बघावं. पण मग तो विचार बदलून तिने चहा संपवला आणि ती परत तिच्या खोलीकडे गेली.

तिच्या हालचाली पडद्याआडून बघणारा आनंद दिवाणखान्यात आला आणि इथे तिथे न बघता सरळ मागच्या दाराने घराबाहेर पडला......

क्रमशः



No comments:

Post a Comment