Friday, December 27, 2019

एक निर्णय (भाग 2)


एक निर्णय


भाग २

सर्व उत्तम मार्क्सनी पास झाले. मिनाक्षीने यावर्षी पहिला क्रमांक पटकावला होता. पण प्रशांतने ते मात्र सहज स्वीकारलं. पण मग मात्र तो मुद्दाम सर्व शिक्षकांना जाऊन भेटला. तो कुठे कमी पडतो आहे का, अस त्याने प्रत्येक शिक्षकाला विचारल. मग मराठीच्या काणे बाईनी त्याला समजावलं;"प्रशांत, तू हुशार आहेस आणि कुठेही कमी पडलेला नाहीस. पण एक लक्षात घे. तू फक्त अभ्यास एके अभ्यास अशा स्वभावाचा नाही आहेस. तू शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत आणि कार्यक्रमात भाग घेतोस. त्याचा थोडा परिणाम कदाचित पुढे अभ्यासावर होईल. तुला पुढे काय करायच आहे त्याचा विचार कर बघू. आणि महत्वाच म्हणजे १०वी मध्ये फक्त अभ्यासावर लक्ष ठेव. त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकांना भेटून बोलून घे." प्रशांतला बाईंच म्हणण पटल. पण फक्त अभ्यास एके अभ्यास त्याला कितपत जमेल याविषयी त्यालाच खात्री नव्हती.

 10वी चे वर्ष आहे म्हंटल्यावर; सुट्टीत कसा आणि कोणता अभ्यास करावा याविषयी शिक्षकानी मार्गदर्शन कराव अशी विध्यार्थ्यांनी प्रत्येकाला गळ घातली. गणित, इंग्रजी आणि सायन्स विषय थोडे जड जातील हे लक्षात येऊन प्रशांतने सुट्टीत ही अडलेले प्रश्न विचारण्यासाठी घरी येण्याची परवानगी शिक्षकांकडून घेऊन ठेवली.

सुट्टी सुरु झाली आणि बघता बघता संपली. शाळा सुरु झाली. पहिल्या महिन्याच प्रशांतने सुट्टीत केलेल्या अभ्यासाचा उत्तम परिणाम त्याच्या एकूण वर्गातल्या प्रश्नोत्तराच्या तासाला वर दिसू लागला. शिक्षकांनी कौतुक केल. मीनाक्षीदेखिल जोरदार अभ्यासाला लागलेली दिसत होती. कारण वर्गात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये दोघांनाही उत्तम गुण मिळत होते.

दहावीचे वर्ष असल्याने घरच्यानी आणि शिक्षकांनी एक्स्ट्रा क्लास्सेस आणि जास्तीचा अभ्यास सुरु करायला लावला. दोघे हुशार होते. त्यामुळे शाळेच्या दोघांकडून खूप अपेक्षा होत्या. दोघेही शाळेचे नाव बोर्डात झळकवतील  याची शिक्षकांना खात्री होती. त्यामुळे शिक्षक मुद्धाम दोघानाही घरी बोलावायला लागले अभ्यासासाठी; आणि प्रशांत आणि मिनाक्षीचे एकमेकांबरोबर रहाणे वाढले. इतर एक दोन विद्यार्थी देखील होते; पण हुशार आणि शिक्षकांचे सर्वात लाडके हे दोघे होते. अभ्यासाची चर्चा, पेपर्स एकत्र सोडवण सुरु झाल. जसजस त्याचं बरोबर राहाण वाढल तस त्या दोघाना जास्त चिडवण वाढल. काही ना काही कांडया पिकवल्या जायच्या. या चिडवण्याचा परिणाम असा झाला की प्रशांत आणि मीनाक्षी एकमेकांसोबत असताना थोड़े अस्वास्थ राहायला लागले. प्रशांतला ते चिड़वण आवाडायच. पण मिनाक्षीच्या मनात काय आहे आणि ती नक्की का अस्वथ होते आहे ते मात्र त्याच्या लक्षात येत नव्हत. कधीतरी शेवटी हा विषय मुख्यधापकांपर्यंत गेला. मग मात्र त्यांनी या दोघानाही बोलावून घेतले आणि हे असे विचार या वयात कसे चुकीचे आहेत आणि अभ्यास करियर याचा विचार करणे कसे योग्य आहे; हे समजावले.

मात्र याचा परिणाम असा झाला की आजवर इतर मुले चिड़वायची आणि प्रशांत-मीनाक्षी एकमेकांना आणि स्वतःला देखील सांभाळून घ्यायचे. पण याविषयी ते एकमेकांशी काही बोलले नव्हते; त्याला वाचा फुटली. पण शाळेत याविषयावर बोलणे शक्य नव्हते. म्हणून मग प्रशांतनेच मिनाक्षीला विचारले;"आपण शाळेनंतर भेटायचे का?" आश्चर्य  म्हणजे ती ही तयार झाली.

हे अस कोणालाही न सांगता बाहेर भेटण्याची कल्पना दोघांसाठी खूपच वेगळी होती. सायन्सचे सर मिनाक्षीच्या घराजवळच राहायचे. त्यांच्या तिथल्या एका लस्सीवाल्याजवळ पाच वाजता भेटायचे ठरले. प्रशांतने आईला मस्का मारून लस्सीसाठीचे पैसे मिळवले. आज मित्र भेटणार आहेत. कदाचित् जाऊ. अस सांगून पैसे मिळवले होते. पण त्याला त्या खोट बोलण्यातही थ्रिल वाटल होत.

संध्याकाळची वाट दोघेही बघत होते. त्यांना दोघानाही हे असे भेटणे म्हणजे खूप काही वेगळे वाटत होते.  थोड्स ऑक्वर्ड वाटण.. थोड़ी भिती... आणि खूपशी excitment अस एकूण मनात घेऊन बरोबर पाच वाजता दोघेही लस्सीवाल्याजवळ भेटले.

"हाय" प्रशांत हसून म्हणाला.

"हाय" कोणी ओळखीच दिसत नाही ना याचा अंदाज घेत तिच उत्तर.

"लस्सी पिणार?" प्रशांत.

"छे छे... नको. आई रागावेल. मी पैसे पण नाही आणलेत." मीनाक्षी.

"अग... माझ्याकडे आहेत. हाफ हाफ घेऊ. तेवढे पैसे आहेत नक्की." प्रशांत म्हणाला आणि ती हसली. दोघांनी लस्सी घेतली.

विषयाला सुरुवात करण आवश्यक होत; पण बोलणार कोण? आणि काय? साधारण 1985/86 चा काळ. आज-कालच्या मुलांसारखा बोल्डनेस् त्यावेळी ना मुलांमधे होता ना मुलींमधे. पण काळ कोणताही असला तरी भावना सारख्याच असतात ना!

शेवटी मिनाक्षीनेच सुरुवात केली."प्रशांत... तुला काय वाटत.... आपल्याला प्रिंसिपल मॅडम जे म्हणाल्या त्याबद्दल?"

"काय वाटायच?" प्रशांत एकदम क्लीन बोल्ड झाला होता. 'काय वाटत' म्हणजे मीनाक्षीबद्दल? की प्रेम या विषयाबद्दल? की मित्र चिडवतात त्याबद्दल? हिला नक्की काय म्हणायच आहे?

"अरे हेच की या चिडवण्याचा आणि आपण एकत्र असण्याचा करियरवर परिणाम होतो का खरच?" मीनाक्षी स्वतःच्या तंद्रित होती.

प्रशांतची परत पंचाईत... आता हिच्या या प्रश्नाचा काय अर्थ काढायचा? तो वैतागला. 'नक्की काय आहे हिच्या मनात? कायम का ही मला गोंधळवून टाकून पुढे निघायच्या तयारीत असल्यासारखी असते.'

प्रशांतने तिची तंद्री तोडली. "मीनाक्षी तुला नक्की काय म्हणायच आहे ते सांगशील का मला?" त्याने तिला विचारले.

"प्रिंसिपल जे म्हणाल्या त्याचा विचार करते आहे रे सारखा. अस इतरानी चिडवण्याचा आणि आपण अभ्यासाच्या निमित्ताने का होईना पण एकत्र असण्याचा परिणाम आपल्या करियरवर होत असेल का?" मीनाक्षी परत तेच म्हणाली.

प्रशांतने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. 'म्हणजे काय चिडवल जात आहे यापेक्षा चिडवतात त्याचा परिणाम करियरवर होतो का... याची हिला चिंता आहे तर.... म्हणजे तिला विषयात इंटरेस्ट नाही त्याच्या परिणामात आहे! धत्...' प्रशांत वैतागला.

"अग अजुन आपल करियर ठरायला खूप वेळ आहे अस नाही का वाटत तुला? सध्या हे सगळे काय चिडवतात त्याचा विचार नाही करत का तू?" त्याने तिला विचारले.

"अस कस म्हणतोस? माझ मी नक्की ठरवल आहे की मला डॉक्टर व्हायच आहे. आणि अजुन आपण एकमेकाना नीट ओळखत पण नाही. मग या चिडवण्याचा विचार काय करायचा? अजुन शाळेतच आहोत आपण. बर, पुढे कोणत करियर तू निवाडशील...  ते काहीच माहीत नाही.. एकच कॉमन धागा म्हणजे आपण दोघे अभ्यासात सारखे आहोत. उगाच चिडवतात नाही का?" मीनाक्षी म्हणाली.

'ओह्... म्हणजे तिला एकूण या विषयात इंटरेस्ट नाही आहे तर..' प्रशांतच्या मनात आल. हे लक्षात आल्यावर तो थोड़ा हिरमुसला. आपल्याला नक्की वाईट कशाच वाटत आहे ते मात्र त्याच्या लक्षात नव्हत आल. तो थोडावेळ काहीच बोलला नाही. ती पण शांत बसली होती. त्याने अचानक विचारल, "मीनाक्षी तुला मी आवडतो का? म्हणजे तुला माझ्याबद्दल नक्की काय वाटत?"

मीनाक्षी पुरती गड़बड़ली.. अचानक अनपेक्षित प्रश्न प्रशांतने तिला विचारला होता. तिने त्याच्याकडे क्षणभर बघितले. म्हणाली,"तू न मला थोड़ा गोंधळलेला वाटतोस. सारखा अस्वस्थ असतोस... पण तरीही आवडत मला तुझ्याबरोबर; कारण तू माझ ऐकतोस." तिने हसत तिचे प्राजळ मत दिले होते. तिच शेवटच वाक्य प्रशांतला सुखावून गेल. किंबहुना तेवढच त्याला एकु आल. तो ख़ुशीत आला. "खर म्हणजे मलासुद्धा तुझ्याबरोबर खूप आवडत ग. पण तस कोणाला दाखवता येत नाही. उगाच सगळे तुला त्रास देतील न म्हणून." तो म्हणाला.

"अरे तुला का वाटत त्याचा मला त्रास होईल?" मिनाक्षीने भुवया उंचावून विचारले.

प्रशांतकडे तिच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.खर तर त्याला खूप काही दुसरेच बोलायचे होते.पण सुरुवात कशी करावी कळत नव्हते.

शेवटी त्याने हिम्मत केली आणि म्हणाला,"मीनाक्षी तू ना मला खूप आवाड़तेस. म्हणजे.... ना.. सगळे जे चिडवतात ना तशी आवड़तेस."

आता मात्र मिनाक्षीच्या डोक्यात प्रकाश पडला. ती एकदम गडबडली... थोड़ी लाजली... अवघडली... तिच्या 'आवाड़तोस मला' चा तिच्या मते असा अर्थ होता की एकत्र असताना तिला अभ्यास करायला आवडत. पण प्रशांतने मनातल बोलून दाखवल आणि तिची गड़बड़ उडाली. प्रशांतला तिची उडालेली गड़बड़ बघुन थोड़ी गम्मत वाटली.

"अरे हे अस? एकदम?" ती थोड़ लाजुन.. थोड़ हसत... म्हणाली.

"एकदम नाही ग. मनात होत बरेच दिवस. पण कधी सांगू शकलो नाही. आणि आता सांगायच कारण म्हणजे माझ्या मनात काय आहे ते तुझ्यापर्यन्त पोहोचवाव आणि हे देखिल सांगाव की तू विचार कर... घाई नाही. आपण 10वि च्या पारिक्षेनंतर परत बोलू. ठिक आहे न?" प्रशांत म्हणाला. तिने हलकेच हसत मान खाली घातली आणि हळूच "हो" म्हणाली. दोघे उठले आणि एकमेकांना बाय म्हणून निघाले.

एक एक महीना सरकत होता आणि दोघेही अभ्यासाच्या मागे लागले होते. एक वेगळाच समजूतदार धागा त्यांच्यात तयार झाला होता. एकत्र अभ्यास चांगला होत होता. प्रिलिम झाली... मुख्य परीक्षा झाली आणि 3 महिन्यांची मोठी सुट्टी सुरु झाली. त्या काळात सुट्टीमधे भेटणे तसे जमत नसे. त्यामुळे दोघे एकदाच भेटले.

"तू पुढे काय ठरवल आहेस?" मिनाक्षीचा प्रश्न.

"काही नक्की नाही ग. तू?" प्रशांत.

"मी सायन्स. रुहियातुन 12वि. आणि मग डॉक्टर" मीनाक्षी.

"हो. तू म्हणाली होतीस. मी अजुन विचार करतो आहे. तस C.A. चांगला ऑप्शन आहे. म्हणजे इतर स्पर्धांमधून भाग घेता येतो. इंजिनीअरिंग देखील बर आहे. पण अभ्यासाच्या बरच मागे लागावं लागत त्यात. तस डॉक्टर होण्यातही काही प्रॉब्लम नाही. अभ्यास करायचा म्हंटल की इंजिनियर काय आणि डॉक्टर काय? कॉलेज मात्र अस हव की जिथे इतर गोष्टी पण असतील. मला ना कॉलेजमधून नाटकात भाग घ्यायची इच्छा आहे. आणि असच काही करायच आहे." आणि मग क्षणभर थांबत हसत प्रशांत म्हणाला;"खर तर माझ नक्की काहीच ठरलेलं नाही".

"अरे तू तर सगळच् करायच म्हणतो आहेस." मीनाक्षी हसत म्हणाली. त्यावर प्रशांत खळखळून हसला.

"सुट्टीचा काय प्लॅन? मी गावाला जाणार दोन महीने. जून मधे येईन. रिजल्ट च्या अगोदर." प्रशांत म्हणाला.

"मी पण नाशिकला आजीकड़े जाणार. मग अकरावीच्या सुट्टीत नाही न जाता येणार. बारावीची तयारी असेल न. चल अच्छा. आपण जूनमधे भेटु रिझल्टच्या वेळी. जमल तर फॉर्म्स एकत्र आणुया कॉलेजचा. माझा फोन नंबर आहे न तुझ्याकडे? फोन कर ह आलास की." मीनाक्षी म्हणाली आणि बाय म्हणून दोघे निघाले.

जून उगवला. रिजल्ट लागला. दोघेही उत्तम मार्क्सनी पास झाले होते. दोघेही बोर्डात आले होते. मीनाक्षी सहावी आणि प्रशांत आठवा. प्रशांतला गणितात फुल मार्क्स होते आणि मीनाक्षी सायन्स आणि संस्कृत मधे टॉपवर होती.

मिनाक्षीच कॉलेज नक्की होत. प्रशांतने पण फारसा विचार न करता त्याच कॉलेजला एडमिशन घेतली. आत्ता तर सायन्स घेऊ; मग बघू पुढच पुढे... त्याने मनात ठरवल. त्याला खरच मीनाक्षी खूप आवडायची. त्यामुळे मिनाक्षीच्या सोबत राहायच एवढच् त्याने ठरवले होते. त्यात रुहीयामधून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण त्याला शक्य होत. त्याने ती माहिती देखील काढली होती. हळूहळू दोघांची मैत्री कॉलेजमधे चांगलीच माहितीची झाली होती. दहावी मधे जे चिडवण होत आणि त्यावरून ते दोघे भेटले होते त्याला आता बरेच महिने होऊन गेले होते. तरीही 'आपण एकत्र आहोत,' हे दोघांनी सहज स्विकारल होत. प्रशांत शाळेप्रमाणे कॉलेजमधे देखिल सांस्कृतिक विभागात खूपच रमायचा. शाळेत असताना ज्याप्रमाणे नाटकं.. वक्तृत्व... वाद-विवाद यात भाग घ्यायचा तसाच तो कॉलेजमधे देखिल सगळ्या कार्याकारामात भाग घ्यायला लागला होता. कॉलेजसाठी ट्रोफिज जिंकत होता. त्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा व्हायला लागला होता. प्रशांत मुळात दिसायला छान होता. आता कॉलेजच पाणी लागल्यावर अजूनच स्मार्ट वाटायला लागला होता. त्यामुळे फ़क्त मित्र असे नाही तर अनेक मूली त्याच्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्याच्या व्यक्तिमत्वात् एक आकर्षण होते... प्रशांत हसरा, मोकळ्या स्वभावाचा आणि मुख्य म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयात जास्त रमणारा होता. त्यामुळे एकदा जर कोणी त्याचे दोस्त झाले तर ते कायमचेच. त्याचा मित्र-मैत्रिणींचा परिवार संपूर्ण कॉलेजभर पसरलेला होता.  मात्र मिनाक्षीने कॉलेजमधे आल्यावर ठरवून फ़क्त अभ्यासाकडे लक्ष दिल. पण आता प्रशांतच्या नविन मैत्रिणींकडे तिच लक्ष असायच आणि तो कोणा कोणाशी बोलतो, किती बोलतो यावर देखिल.

ती प्रशांतची काळजी देखिल घ्यायची. त्याच खाण पीण... त्याची लायब्ररीची पुस्तक बदलण... आणि मुख्य म्हणजे त्याच्या मागे लागण अभ्यासासाठी. कारण तो जरी खूप हुशार असला तरी त्याचा सांस्कृतिक विभागाकडे वाढता कल तिच्या लक्षात आला होता. तिच्या मते 'हे अवांतर तर ठिक आहे, पण अभ्यास आणि उत्तम शिक्षणावर आधारित करियर जास्त महत्वाच् होत.'

मीनाक्षी तशी थोड़ी शिष्ठ होती. त्यात तिचा मूळ इंटरेस्ट अभ्यासात होता. पूर्ण फोकस डॉक्टर बनण्यावर होता. त्यामुळे तिने तर त्यादोघांच्या अभ्यासाची जणू जवाबदारीच् घेतली होती. प्रशांतही तिच ऐकायचा. ती म्हणेल तसा अभ्यास करायचा. एकपाठी असल्याने त्याला अभ्यास करणे जड़ जात नसे. त्याच फळ दोघानाही मिळाल. बारावीमधे दोघानाही उत्तम मार्क्स मिळाले. प्रशांतने तस स्वतः काहीच ठरवले नव्हते. मग मिनाक्षीनेच दोघांसाठी निर्णय घेतला.

दोघांनी ही M. B. B. S. व्हायच ठरवल. तसे दोघांच्याही घरचे सुशिक्षित आणि आर्थिक दृष्टीने उत्तम होते. त्यामुळे डॉक्टरी करीयर दोघानी निवडल तरी कोणालाही घरून विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता.

मात्र प्रशांतला पीसीएम मधेदेखील उत्तम मार्क्स होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला एकदा फ़क्त विचारले,"बेटा तुला नक्की डॉक्टर व्हायचे आहे न? इंजिनिअरिग नाही न करणार? तुझ्या मनात C.A. करण्याच् देखिल होत. बघ... तुझी निवड आम्हाला मान्य आहे. आपला काही कुठला बिज़नस नाही. माझी नोकरी आहे. त्यामुळे तुझ तू काहीही ठरवलस तरी चालेल. आमचा काहीच आग्रह नाही."

"बाबा, मी आणि मीनाक्षी दोघेही एकाच कॉलेजला एडमिशन घेतो आहोत. दोघांनाही डॉक्टर व्हायचे आहे. मिनाक्षीच देखिल तेच मत आहे." प्रशांत म्हणाला. त्यावार मात्र मग प्रशांतच्या आई-वडिलांनी काहीच म्हंटले नाही.

एडमिशन झाली आणि कॉलेज सुरु झाले. शाळेपासूनचा टॉप करण्याचा ट्रेंड प्रशांत आणि मिनाक्षीने इथे देखिल कायम ठेवला; आणि इथे देखिल प्रशांतने आपली सांस्कृतिक आवड चालु ठेवली होतीच्. अकरावी बारावी प्रमाणे इथे देखिल त्याने नाटकं  आणि इतर कल्चरल गोष्टीना महत्व दिले होते. मिनाक्षीने दोघांच्या अभ्यासाची बाजू सांभाळली होती.  एकत्र  शिक्षण... कॉमन मित्र मैत्रिणी... त्यामुळे मजा- मस्ती चालु असायची. परिक्षेच्या मोसमात मात्र कधी रुसवे-फुगवे... कधी अबोला.. कधी समजूत घालणे... हे व्हायचेच. कारण मिनाक्षीचा आग्रह असायचा फ़क्त अभ्यास करुया आणि प्रशांत तिला चुकवून इतर गोष्टी करायचाच. त्याची देखिल दोघाना आता सवय झाली होती. त्यातच कॉलेज लाइफ कधी संपले दोघानाही समजलेच नाही. दोघेही M. B. B. S. झाले आणि पुढे M. D. प्रशांत ओर्थोपेडिक सर्जन आणि मीनाक्षी गायनेकोलॉजिस्ट.

आतापर्यंत त्याचं एकत्र असण त्यांच्या अंगवळणीच पडल होत. आणि एकूणच सर्वानी मान्य देखील केल होत.... स्विकारल होत. त्यामुळे जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय सांगितला तेव्हा काही फ़ार चर्चा न होता तो स्विकारला गेला आणि मीनाक्षी-प्रशांत दोघेही लग्न बंधनात स्वखुशीने अडकले. मीनाक्षी नेरुरकर ही मीनाक्षी नेरुरकर प्रधान झाली. आणि तिने आग्रहाने असच नाव लावलं. त्यावेळी अस नाव लावण्याची प्रथा फारशी रूढ नव्हती. तरीही त्यालाही प्रशांतने कधी नाही म्हंटल नाही. त्याला त्यात काही वावग देखील वाटल नाही. मीनाक्षीने मंगळसूत्र घालायला देखील नकार दिला आणि तो देखील त्याने सहज स्वीकारला होत. मुळात मीनाक्षी जो निर्णय घ्यायची तो निर्णय प्रशांत बिनविरोध मान्य करायचा. ती सवयच लागली होती त्याला... आणि कधाचित मीनाक्षीला देखील.


क्रमशः
==================================================

2 comments: