Friday, December 6, 2019

तो (गूढ कथा) (भाग 2 शेवटचा)


तो (भाग २)

काकु पडल्या पडल्या विचार करत होत्या,'अशोकचlचं बिचाऱ्याचं कसं होत असेल? नोकरी सांभाळून आजारी बायकोला देखील जपतो आहे. त्यात त्याच्यासाठी हे नवीन आणि थोडं आड बाजुचं गाव. या दोघांना तर शहराची सवय. मी म्हंटल देखील त्याला एकदा की इथे अशा आड गावी बदली का घेतलीस? तुम्ही शहरात राहाणारी मुलं इथे कसं व्हायचं तुमचं? तर म्हणाला संध्याला समुद्र आवडतो. मुंबईला देखील त्याचं घर जुन्या वाडीत पण समुद्राच्या जवळ होतं. तो तिला आणि त्यांच्या लेकीला रोज न्यायचा म्हणे समुद्रावर. पण मग ते तसं झालं आणि संध्या पार गप होऊन गेली. तिने म्हणे घरातून बाहेर पडणंच बंद करून टाकलं. अशोकच्या आईशी देखील तिच चांगलं पटायचं. त्यामुळे ही अशी गप्प झालेली त्यांनाच बघवल नाही आणि त्याच म्हणल्या तू बदली मागून घे. जागा बदलली की संध्या जुन्या आठवणी विसरेल. अशोकने जेव्हा बदलीचा विषय काढला तेव्हा संध्याने ते मान्य केलं; मात्र एकाच अटीवर की तिला समुद्रापासून लांब जायचं नव्हतं. तिची अट त्याने मान्य केली आणि म्हणूनच या शांत गावात अशोकने बदली करून घेतली होती. पण दैव तरी कस असतं आपल्या घरातला झोपाळा त्या बिचाऱ्या संध्याच्या परत जुन्या दुखऱ्या आठवणी जागवतो.' विचार करता करता काकूंना झोप लागली.

सगळ काम आवरून काशी 'निघते' म्हणून सांगायला काकूंच्या खोलीत गेली. पण त्यांना झोप लागलेली बघून तशीच हलक्या पावलांनी बाहेर आली. तिने खोलीचं दार ओढून घेतलं आणि ती तिच्या घरी जायला निघाली. बाहेर ओट्यावर झोपाळ्याजवळून पुढे जाताना तिच लक्ष सहजच अशोकच्या घराच्या दिशेने गेलं. खिडकीचा पडदा वाऱ्याने फडफडत होता. 'पडद्याच्या मागे कोणीतरी उभं आहे की काय?' काशीच्या मनात विचार आला. पण तिला थांबायला वेळ नव्हता. त्यामुळे मनातला विचार झटकून देऊन ती भराभर पावलं उचलून तिच्या घराकडे निघाली.

अलीकडे अशोक जोशी काका आणि काकूंना टाळायला लागला होता. कधीही भेटलं की ती दोघं संध्याची चौकशी करायची. अशोकच्या होणाऱ्या ओढाताणीबद्दल हळहळ व्यक्त करायची. त्यांच्या हळहळीच्या मागची त्यांची प्रामाणिक काळजी त्याला कळायची. पण तो तरी काय करणार होता? काका-काकूंनी कितीही आग्रह केला तरी अजूनही तो संध्याला त्यांच्या घरी घेऊन गेला नव्हता. खरं तर ते त्याच्या हातात नव्हतं. अर्थात त्याने तस काका काकूंना सांगितलं होतं आणि त्या दोघांना पटलं देखील होतं. पण तरीही त्यांच्या डोळ्यातले ते 'बिच्चारा अशोक' भाव बघायला त्याला आवडत नव्हतं.

मात्र एक दिवस अशोकला ऑफिसमधून यायला बराच वेळ झाला. त्यादिवशी अंधार झाला तरी त्याच्या घरातला एकही दिवा लागलेला नव्हता. काकूंनी ही गोष्ट काकांच्या लक्षात आणून दिली. दोघांनाही काळजी वाटायला लागली संध्याची. काकूंच्या डोळ्यात तर पाणी आलं. त्या काकांना म्हणल्या,"आपली मनु त्या संध्या एवढीच असेल ना हो? जर मनु अडचणीत असती किंवा तिच्या बाबतीत असं काही झालं असत तर आपण असंच 'आपला काय संबंध;' असा विचार करून स्वस्थ बसलो असतो का?" काकूंच्या बोलण्याने काका देखील अस्वस्थ झाले आणि म्हणाले, "उगाच संध्याकाळच्या वेळी अस अशुभ बोलू नका तुम्ही. आपली मनु छान मजेत आहे तिच्या सासरी." तशी काकांजवळ जात आवाज चढवून काकू म्हणल्या,"उगाच विषयला बगल देऊ नका. एकतर त्या अशोकला फोन करा नाहीतर ही मी चालले त्याच्या घरी. त्या संध्याने दार उघडलं नाही तर कोणाला तरी बोलावून तोडून घेईन... समजलं? हे तुमच्यासारखं स्वस्थ बसून काय घडतं आहे ते पाहाणं आता मला असह्य होतं आहे." काकूंचा तो अवतार बघून काका जागेवरून उठले आणि म्हणाले,"बरं, तुम्ही उगाच रागावू नका. मी बघतो जाऊन काय झालं आहे ते."

अस म्हणून काका अशोकच्या घराच्या दिशेने निघाले. काकू देखील त्यांच्या मागून हातात टोर्च घेऊन निघाल्या. काकांनी घराजवळ येऊन गेट जोरात उघडलं. त्याचा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने काकू दचकल्या. काकांना तसंही कमी ऐकायला यायचं. त्यामुळे ते शांत होते. दोघेही क्षण-दोन क्षण गेट जवळ थांबले. घरात काही हालचाल होते आहे का याचा अंदाज घेत. पण घरात काहीच हालचाल जाणवली नाही. म्हणून मग दोघेही आवारात शिरले आणि घराच्या दिशेने गेले. व्हरंड्यातला दिवा चालू होता. पण आत घरात कोणतीही जाग जाणवत नव्हती. काकांनी एकदा काकूंकडे बघितलं आणि दाराची बेल वाजवली. बेल वाजली नाही. पण ते काकांच्या लक्षात आल नाही. काकूंच्या मात्र आलं. त्यामुळे त्यांनी काकांना म्हंटल,"अहो! बेल वाजत नाही वाटतं. वीज गेली असेल का?" त्यावर काका मोठ्याने हसले आणि म्हणाले,"अग वीज नसती तर हा व्हरंड्यातला दिवा कसा लागला असता? तू म्हणजे ना काहीही बोलतेस. त्या संध्याने दाराची बेल बंद करून ठेवली असेल. कोणी वाजावालीच तर तिला त्रास नको म्हणून." काकूंना ते पटलं. "मग आता काय करायचं?" त्यांनी नकळून काकांना विचारलं. काका म्हणाले."हाक मारून बघू आपण तिला. आजवर तिने आपल्याला टाळलं आहे. आपणही कधी तिने भेटावं असा आग्रह नाही धरलेला. पण आज अजून अशोक आलेला नाही आणि तिने दिवा देखील लावलेला नाही. त्यामुळे आपण आता जर तिला हाक मारली तर ती ते समजू शकेल." काकूंना देखील ते पटलं आणि त्या संध्याला हाका मारायला लागल्या. मात्र घरातून काही उत्तर येत नव्हतं. आता काकूंना काळजी वाटायला लागली. त्या काकांना म्हणल्या,"तुम्ही इथेच उभे राहा. तिने दार उघडलं आणि कोणी दिसलं नाही तर ती गोंधळेल. मी घराला चक्कर मारून येते." अस म्हणून काकांना काही बोलायचा अवधी न देता हातातली टोर्च लावून त्या व्हरांड्यातून खाली उतरल्या.

काकूंनी घरला फेरी मारायला सुरवात केली आणि त्याच बरोबर संध्याला हाका मारायचा सपाटा लावला. त्या मागच्या दाराकडे आल्या आणि अचानक समोरून अशोकला धावत येताना बघून त्या दचकल्या. अशोक त्यांच्या जवळ आला आणि ओठांवर बोट ठेवत म्हणाला,"काकू ओरडू नका... ओरडू नका..." आणि काकूंना काही कळायच्या आत त्यांना जवळ जवळ ओढतच पुढच्या दाराशी घेऊन आला. काका पुढच्या दाराशी पायरीवर बसले होते. काकांना असं बसलेलं बघून काकू पुरत्या गोंधळल्या. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने अशोककडे बघितलं. अशोक अगदी हलक्या आवाजात काकूंना म्हणाला,"काकू त्या घटनेला आजच वर्ष झालं हो. म्हणून तर मी आज जाणारच नव्हतो. पण ऑफिसमधून फोन आला की एक खूप महत्वाच काम आहे. म्हणून मी गेलो. लवकर येणार होतो माझ्या संध्या राणीजवळ. पण कामाच्या रगाड्यात किती वाजले त्याचं भानच राहिलं नाही." त्याच बोलण ऐकून काकू चुकचुकल्या आणि म्हणल्या,"वाटलचं मला घरात एकही दिवा लागलेला नाही म्हंटल्यावर. संध्या अस्वस्थ असेल. बरं दार उघड बघू. मी येते तुझ्याबरोबर आत. ती बिचारी एकटी बसली आहे अंधारात. तिला आधाराची गरज आहे." असं म्हणून त्या व्हरांड्याच्या पायऱ्या चढायला लागल्या. त्याबरोबर त्यांना अडवत अशोक म्हणाला,"काकू तुम्ही नका येऊ आत. आता मी आलोय. मी सांभाळीन तिला." काकूंना त्याने हे असं अडवलेलं नाही आवडलं. त्याचा हात सारत त्या म्हणल्या,"अशोक, माझी लेक अनु देखील साधारण तुझ्या संध्याच्याच वयाची आहे. जर अनुला काही त्रास झाला तर मी तिला अस एकटं सोडीन का?" त्यावर निकराने काकूंना अडवत अशोक म्हणाला,"काकू, मी तुमची काळजी समजू शकतो. पण तरीही तुम्ही नका येऊ आत्ता. कृपा करून जा तुम्ही दोघे इथून. आत्ता मला आणि माझ्या बायकोला एकट रहायचं आहे."

त्याने स्पष्ट शब्दात जायला सांगितलेलं एकून काकूंना अपमानापेक्षा देखील खूप वाईट वाटलं. त्यांच्या मते संध्या देखील एक स्त्री होती. आणि काकूंना तिच्या मनाची घालमेल कळत होती. त्यांना हे कळत नव्हतं की अशोकला कोणत्या शब्दात समजवाव की आत्ता त्या मुलीला एका स्त्रीच्या आधाराची गरज जास्त असेल. त्यांनी परत काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण तेवढ्यात काका उभे राहिले आणि त्यांनी काकूंचा हात धरला. काकूंनी काकांकडे आश्चर्याने बघितलं. तशी डोळ्यानेच समजूत घालून काका काकूंना घेऊन सावकाश चालत अशोकच्या घराच्या आवारातून बाहेर पडले.

काकांनी आपल्या घरी येऊन झोपाळ्यावर बसले आणि मग काकूंचा हात सोडला. काकू अजूनही अस्वस्थ होत्या. त्यांनी वळून अशोकच्या घराकडे बघितलं. संपूर्ण घरातले दिवे लागलेले होते. हळुवार आवाजात कोणतं तरी गाणं देखील लागलं होतं. त्यांनी नजर बारीक करून बघितलं तर त्यांच्या घराच्या बाजूच्या खिडकीत कोणीतरी उभं होतं असा त्यांना भास झाला. मात्र काही एक न बोलता त्या त्यांच्या घरात गेल्या.

काकू काहीही बोलत नव्हत्या. त्यांनी देवासमोर दिवा लावला आणि मनोमन त्याच्याकडे हात जोडून संध्याची खुशाली मागितली. मग त्या स्वयंपाकाला लागलेल्या काकांनी बघितलं आणि ते शांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले. त्यांनी एकदाही अशोकच्या घराकडे वळून बघितलं नव्हतं.

काकू शांत वाटत असल्या तरी त्या मनातून मात्र अस्वस्थ होत्या. अशोक ज्या प्रकारे त्यांना घरात जाण्यासाठी अडवत होता त्यावरून आता त्यांच्या मनात एका शंकेने जागा घेतली होती. 'कदाचित् संध्याला हा अशोकच अडवत असेल आपल्याला भेटण्यापासून. तिला मारत असेल का तो? पण मग तिच्याबद्दल बोलताना किती हळवा होतो तो. नक्की काय प्रकार आहे हा?' काकूंच्या मनातले प्रश्नांच आवर्तन संपतच नव्हतं.

काकूंनी स्वयंपाक उरकला आणि जेवायची पानं घेऊन त्या काकांना बोलवायला बाहेर आल्या. काका अजूनही झोपाळ्यावर बसून हलके हलके झोके घेत होते. मात्र त्यांचे डोळे मिटलेले होते. ते ताठ बसले होते आणि त्यांनी हाताची घडी घातली होती. काका काहीतरी खोल विचार करत आहेत हे काकूंच्या लक्षात आलं. खरं तर काकांना त्यांच्या तंद्रीतून जागं करायचं काकूंच्या जीवावर आलं होतं. पण जेवायची वेळ झाली होती. त्यामुळे काकूंनी मऊ आवाजात काकांना साद घातली. "अहो!" काकांनी डोळे उघडून काकूंकडे बघितलं. "जेवायची वेळ झाली आहे. येताय ना?" काकूंनी काकांना विचारलं. काकांचा चेहेरा गंभीर दिसत होता. त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि झोके घेण्याचे थांबवून ते उभे राहिले. काकांना उभं राहिलेलं बघून काकू आत जाण्यासाठी वळल्या. तशी काकांनी काकूंना हाक मारली. "होय ग! ऐक." काकूंनी वळून काकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. "मी जरा जाऊन येतो. अगदी पंधरा मिनिटात आलोच. माझं ताट पालथ घालून ठेव." असं अचानक काका बाहेर जायला निघाल्याचं बघून काकू गोंधळल्या. त्या पुढे आल्या आणि म्हणल्या,"अहो आता कुठे जाता इतक्या अंधाराचं? माझ्या मनात देखील काही शंका उभ्या राहिल्या आहेत. बहुतेक हा अशोकच त्या संध्याला बाहेर पडू देत नाही किंवा कोणालाही भेटू देत नाही; असं मला वाटतं. पण आत्ता तुम्ही आणि मी काय करणार? आपण दोघेही म्हातारे आहोत. तुम्ही आता त्याच्याकडे जाल आणि तो जर अंगावर धावून आला तर काय कराल? बरं, या वेळेला कोणाची मदत मागायला जायचं तर त्यांना सगळं प्रकरण समजावून सांगाव लागेल. त्यात बराच वेळ जाईल आणि अजून रात्र चढेल. तेव्हा जे करायचं ते उद्या सकाळी करू. आजची एक रात्र जाऊ दे."
काकुंचं बोलणं ऐकून काका काकूंच्या जवळ आले आणि म्हणाले,"मी त्या अशोककडे जात नाही किंवा अजून कोणाकडे मदतीसाठी जात नाही. मला काहीतरी दुसरं सुचलं आहे. जमलं तर ते काम करून येतो. हा गेलो आणि हा आलो. तू माझी काळजी करू नकोस. आणि काहीही झालं तरी त्या घराकडे फिरकू नकोस. अशोक किंवा त्याची बायको कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे. मी तिथून आल्यापासून इथेच झोपाळ्यावर बसलो आहे. त्यामुळे मला त्यांची नजर जाणवते आहे." असं म्हणून काका घरात जायला वळले. त्यांना घरात जाताना बघून मात्र काकू पुरत्या गोंधळून गेल्या. त्यांच्या नकळत त्यांची नजर एकवार अशोकच्या घराकडे गेलीच. त्यांना देखील जाणवलं की खिडकीच्या पडद्याआडून कोणीतरी त्यांच्याकडेच बघत होतं. काकू काहीश्या अस्वस्थ झाल्या आणि काकांच्या मागून घरात जात त्यांनी दार लावून घेतलं.

घरात येताच मात्र त्यांनी काकांना विचारलं,"अहो, तुम्ही तर म्हणालात की बाहेर जाऊन येता आहात. मग घरात का आलात? विचार बदललात की काय; ते लोकं आपल्यावर नजर ठेवून आहे हे बघून?" काकू आता थोड्या घाबरल्या होत्या. काकांनी बाहेर घालायच्या सपाता हातात घेतल्या आणि ते परस दाराकडे निघाले. काकू काही न कळून त्यांच्या मागे जायला लागल्या. काका मागे वळून म्हणाले,"हे बघ. मी मागच्या दारातून बाहेर पडतो आहे. त्या अशोकला कळायला नको म्हणून. तू माझी काळजी अजिबात करू नकोस. येताना कोणालातरी सोबत आणेन मी. एकटा येणार नाही. तू मात्र दार लावून घे आतून. अजून एक काम कर. थोड्या वेळाने स्वयंपाकघर सोडून बाकी सगळीकडचे दिवे मालवून टाक. आपण रोज झोपायला जाताना जसे मालावतो तसे. मघा जे झालं त्यामुळे आपण अस्वस्थ आहोत किंवा काहीतरी करणार आहोत याची त्यांना शंका देखील आली नाही पाहिजे. बरं येऊ?" काका हे असं सगळं गूढ का बोलत होते ते काकूंना कळेनासं झालं होतं. पण त्यांचा काकांवर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी 'हो' म्हणून मान हलवली आणि काका मागच्या दाराने बाहेर पडताच त्यांनी दार घट्ट लावून घेतलं.

जेमतेम पाच मिनिटं झाली नसतील पण काकूंना आता खूपच अस्वस्थ वाटायला लागलं होतं. त्यांनी देवासमोर उदबत्ती लावली आणि मोठ्याने रामरक्षा म्हणायला सुरवात केली. आपलाच आवाज एकून त्यांना थोडा धीर आला. अजून थोडा वेळ गेला आणि त्यांना आठवलं की काकांनी सांगितलं होतं की घरातले सगळे दिवे मालवून टाक. म्हणून मग त्या उठल्या आणि बाहेरच्या खोलीकडे आल्या. दिवा मालवायच्या अगोदर नकळत त्या दरवाज्याच्या शेजारच्या खिडकीकडे आल्या आणि त्यांनी अशोकच्या घराकडे नजर टाकली. त्यांना वावग असं काही वाटलं नाही. घरात दिवे चालू होते. बाहेरच्या खोलीतला पंखा देखील चालू असलेला त्यांना दिसला. एक सुस्कारा सोडून त्या आत वळणार तेवढ्यात त्यांची नजर त्यांच्या घराच्या फाटकाकडे गेली आणि काकू कमालीच्या दचकल्या. फाटकाला धरून अशोक उभा होता. तो टक लावून काकूंकडेच बघत होता. काकूंची आणि अशोकची नजरा-नजर झाली मात्र विजेचा धक्का बसल्यासारखा अशोक दचकला. त्याची नजर क्षणभरासाठी काकूंवरुन ढळली. त्याबरोबर स्वतःला सावरत काकूंनी खिडकी लावून घेतली आणि रामरक्षा मोठ्याने म्हणत दिवा मालवून त्या देवासमोर जाऊन बसल्या. देवासमोर बसून देखील त्या सारख्या बाहेरच्या दाराचा कानोसा घेत होत्या. अशोक येऊन दार वाजवेल की काय ही भिती त्यांच्या मनात सारखी डोकावत होती. बराच वेळ झाला. पण अशोकने दार वाजवलं नाही. हळूहळू काकू देखील शांत झाल्या. आता त्या चातकासारखी काकांची वाट बघत होत्या. त्यांच्या मनात भीती दाटून आली होती आणि त्याचवेळी त्यांना काकांची काळजी वाटत होती.

असाच काही वेळ गेला आणि मागच्या दाराकडे कोणाचीतरी पावलं वाजल्याचं काकूंच्या लक्षात आलं. पण देवासामोरून उठून मागच्या दाराकडे जाण्याच धैर्य त्यांना होत नव्हतं. काही क्षणातच त्यांना काकांनी हलक्या आवाजात मारलेली हाक ऐकू आली. "होय ग! झोपलीस का? मी आलोय. दार उघड बघू मागंचं." काकांचा आवाज ऐकताच काकूंच्या अंगात शंभर हत्तींचं बळ आलं. त्या त्यांच्या वयाला शोभणार नाही अशा चपळतेने उठल्या आणि त्यांनी मागचं दार उघडलं. दारात काका आणि भानू शेट उभे होते. काकूंनी दार उघडताच काका भानू शेटना म्हणाले,"या शेटजी. जेवूनच जा आता. आम्ही जेवायला बसणार आहोत." काकांचा आवाज अगदीच सौम्य आणि साधा होता. त्यात अजिबात ताण नव्हता. मात्र ते फारच हळू बोलत होते. काकांचा मोकळा आवाज एकून काकूंना एकदम मोकळ मोकळं वाटलं. काकूंनी शेटजींकडे हसून बघितलं आणि आत येण्याची खूण केली. त्यावर हसत हसत शेटजी तशाच हळू आवाजात म्हणाले,"काका, उद्या येतोच आहे मी. तुम्ही जेवून आराम करा आता. काकू येतो मी. काळजी करू नका. सगळ ठीक होईल." असं म्हणून शेटजी आले तसेच मागच्या दारातूनच निघून गेले.

काका घरात आले आणि हात पाय धुवून जेवायला बसले. काकूंनी त्याचं पान वाढलं. मात्र त्यांनी स्वतःच पान घेतलं नव्हतं; ते पाहून काकांनी विचरलं,"का ग? तुझ पान घे की वाढून." काकू म्हणल्या,"नको. इच्छा नाही मला." त्यावर काकांनी हलकेच त्यांच्या खांद्यावर थोपटलं. त्याबरोबर काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काकांनी त्यांना थोडावेळ रडू दिलं. भर ओसरल्यावर काकूंनी आपणहून अशोकला फाटकाजवळ बघितलेलं काकांना सांगितलं. त्यावर गंभीर होत काका म्हणाले,"बरं. मला वाटलंच होतं तो आपला अंदाज घ्यायला येईल. तू त्याला काही बोलली नाहीस ना?" काकूंनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणल्या,"त्याची नजर ढळताच मला कुठून तरी बळ आलं आणि मी मागे फिरले आणि खोलीचा दिवा मालवून देवासमोर येऊन बसले. काकांनी समाधानाने मान हलवली. मग त्यांनी आग्रहपूर्वक काकूंना देखील जेवायला लावलं. काका कुठे गेले होते ते काकूंना समजून घ्यायचं होतं. पण आता त्यांच्या मनाला अजून ताण सहन झाला नसता; याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे उद्या सकाळी काय ते विचारू असा विचार करून काकूंनी स्वयंपाकघरातली आवरा-आवर केली आणि त्या आतल्या खोलीत जाऊन काकांच्या शेजारी आडव्या झाल्या.

काकूंना पाहाटेच नेहेमीप्रमाणे जाग आली. सवयीने त्या बाहेरच्या खोलीत आल्या आणि मुख्य दरवाजा उघडायला गेल्या. पण बंद असलेली खिडकी बघून त्यांना आदल्या रात्रीच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि दार न उघडताच त्या तशाच उभ्या राहिल्या. काका देखील उठून काकूंच्या मागोमाग बाहेरच्या खोलीत आले होते. त्यांनी काकूंना दाराजवळच उभं राहिलेलं बघितलं आणि त्यांच्या जवळ जात त्यांनी दार उघडलं. काकूंना कळेना की कालच्या त्या प्रकारानंतर काका इतके निवांत कसे राहू शकतात? काका बाहेर जाऊन झोपाळ्यावर बसले होते. काकू देखील त्यांच्या मागोमाग बाहेर आल्या. आता मात्र इच्छा असूनही त्यांनी अशोकच्या घराकडे बघायचे टाळले. मात्र काकांच्या डोळ्यात थेट बघत त्यांनी काकांना विचारलं,"का हो? काल जे काही झालं त्यानंतर देखील तुम्ही इतके निवांत कसे? तुम्हाला वाटत नाही का आपण पोलिसांकडे गेलं पाहिजे?" त्यावर काकांनी शांत नजरेने काकूंकडे बघितलं आणि ते म्हणाले,"धीर धर. सगळ निट होईल. मात्र आता तू इथे उभं राहू नकोस. नेहेमीप्रमाणे कामाला लाग बघू." काकूंना काही केल्या काकांचं वागणं कळत नव्हतं. मात्र त्यांचा त्यांच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे अजून काही न बोलता त्या त्यांच्या रोजच्या कामाला लागल्या.

साधारण नऊ-साडे नऊचा सुमार असेल; काका अंघोळ उरकून नेहेमीप्रमाणे देवासमोर बसून पूजा करत होते. काकू त्यांना चंदन उगाळून देत होत्या. अचानक एक गाडी त्यांच्या दारासमोर थांबल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून कधी नव्हे ते काका पूजा अर्धवट टाकून बाहेर धावले. काकांच्या मागून काकूदेखील बाहेर आल्या. बाहेर दारात एक जीप उभी होती. त्यातून भानू शेट उतरले. त्यांच्या मागोमाग काकूंच्या वयाचीच एक बाई बाहेर आली. तिच्या सोबत अजूनही एक गृहस्थ होते. त्यांना बघून काका फाटकाकडे गेले. काकूंना हे काय चालू आहे ते कळेना. मात्र थोडसं बोलणं झालं आणि ते सगळेजण अशोकच्या घराच्या दिशेने चालायला लागले. मग मात्र न राहून काकू देखील त्यांच्या मागून अशोकच्या घराकडे गेल्या. सर्वात पुढे ते बाहेरून आलेले गृहस्थ होते. त्यांच्या मागे त्या अनोळखी महिला आणि मग शेटजी आणि काका-काकू.

त्या गृहस्थांनी पुढे होऊन अशोकच्या घराची बेल वाजवली. बेलचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू आला. तो आवाज ऐकताच काकूंना कमालीचं आश्चर्य वाटलं. कारण आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा त्या आणि काका आले होते आणि त्यांनी बेल वाजवली होती तेव्हा मात्र बेल वाजली नव्हती. काकू काहीतरी बोलणार होत्या. पण तेवढ्यात आतून दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि त्या गप झाल्या. दारात अशोक उभा होता. त्याने क्षणभर दारात उभ्या असलेल्या गृहस्थांकडे बघितलं आणि त्याची नजर मागे उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे गेली. त्यादोघांना पहाताच अशोकच्या कपाळावर असणाऱ्या आठ्यांचं जाळं नाहीसं झालं. बाकी सर्वांकडे दुर्लक्ष करत त्याने त्या स्त्रीचा हात हातात घेतला आणि म्हणाला,"आई, तू कधी आलीस? अगं, किती जोरात बेल वाजवलीस? संध्या अजून झोपली आहे गं. जाग येईल ना तिला." तो हे बोलतंच होता तेवढ्यात त्याची नजर शेटजी आणि त्यांच्या बरोबर उभ्या असलेल्या काका आणि काकूंकडे गेली. त्याबरोबर अशोकला आश्चर्य वाटलेलं दिसलं. तो शेटजीकडे वळून म्हणाला,"भानू शेटजी तुम्ही इकडे कोणीकडे सकाळीच? आणि काका-काकू तुम्ही देखील सकाळीच कसे आलात. बरं, ओळख करून देतो ही माझी आई. आई, हे जोशी काका आणि या जोशी काकू. मला आणि संध्याला अगदी घरच्या सारखं वागवतात हो. इतक्या वेळा त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं आहे." एवढ बोलून अशोक थांबला. काकूंना आश्चर्य वाटत होतं ते एकाच गोष्टीचं की काल संध्याकाळी घडलेल्या प्रसंगाची एकही खूण अशोकच्या चेहेऱ्यावर किंवा वागण्या-बोलण्यात दिसत नव्हती.

त्या सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकून अशोक परत एकदा त्याच्या आईकडे वळला आणि म्हणाला,"बर, ते जाऊ दे. तू अशी अचानक कशी काय आलीस ते सांग बघू." अशोकच्या आईने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणल्या,"सगळे प्रश्न इथे दारातच विचारणार आहेस का अशोक? मला आत नाही का येऊ देणार?" त्यावर अशोक एकदम अस्वस्थ झाला आणि म्हणाला,"अग, संध्या झोपली आहे आत. तिला रात्रभर झोप नव्हती ग. कालच वर्ष झालं ना त्या प्रसंगाला. त्यामुळे तिला स्वस्थ झोप नव्हती. आत्ता पहाटे डोळा लागला आहे तिचा." त्यावर त्याच्या हाताला थोपटत त्याची आई म्हणाली,"बरं, मग आपण हळू आवाजात बोलू. पण आत तर जाऊ या." अशोक त्यावर एकदम मागे होत म्हणाला,"तू एकटीच ये. या सगळ्यांना जायला सांग." तशी त्या अशोकच्या खांद्याला थोपटत म्हणल्या,"अशोक कोणीही आवाज करणार नाही याची खात्री मी देते. पण ते सगळेच आत येणार आहेत." अशोकच्या आईच्या आवाजात खंबीरपणा होता. त्यामुळे अशोक काही न बोलता मागे वळला आणि घरात शिरला. त्याच्या पाठोपाठ अशोकची आई, ते नवीन आलेले गृहस्थ, भानू शेटजी, काका आणि काकू सगळेच आत गेले आणि सोफ्यावर बसले. अशोकची नजर मात्र सारखी आतल्या खोलीकडे वाळत होती.

आत जाताच अशोकला त्याच्या आईने बरोबर आलेल्या गृहस्थांच्या सामोरं करून विचारलं,"अशोक, यांना तू ओळखतोस ना?" त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत अशोक एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला,"मी जरा आत जाऊन संध्या जागी झाली आहे का बघून येतो." त्याने असं म्हणताच काकूंची उत्सुकता ताणली गेली. आता तरी आपण संध्याला बघू शकू या विचाराने त्या सावरून बसल्या. मात्र उभ्या राहिलेल्या अशोकला एका रिकाम्या खुर्चीमध्ये बसवत ते आलेले गृहस्थ म्हणाले,"अशोक, माझ्याकडे बघ बघू." अशोक मात्र त्यांच्याकडे बघायला तयार नव्हता. एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे तो नजर खाली करून बसला होता. त्या गृहस्थांनी अशोकच्या दोन्ही खांद्याला धरलं आणि म्हणाले,"अशोक, संध्या आत नाही आहे." त्यांनी असं म्हणताक्षणी मात्र अशोक उफाळून उठला आणि त्यांना ढकलत तो आतल्या खोलीकडे धावला. धावताना तो ओरडत होता,"आई, तू माझी आई आहेस की वैरीण? का आणलस तू यांना इथे? संध्या आहे.... इथे आहे... या खोलीत ती झोपली आहे. जा तुम्ही सगळे जा इथून. मला आणि संध्याला जगू द्या."

अशोकच्या या अशा अचानक ओरडत धावण्यामुळे काका, काकू आणि भानू शेटजी गोंधळून गेले. अशोकची आई मात्र शांत होती. त्यांच्या बरोबर आलेले गृहस्थ चपळतेने पुढे झाले आणि त्यांनी अशोकला चटकन धरून खाली पाडले. कोणालाही कळायच्या अगोदरच त्यांनी अशोकला इंजेक्शन दिले. काही क्षण अशोकने धडपड केली. मग मात्र तो शांत झाला. त्याला झोप लागली होती. त्या गृहस्थांनी शेटजींच्या मदतीने अशोकला आतल्या खोलीत नेऊन झोपवले.

एकूण चाललेला प्रकार काका आणि काकूंच्या आकलनापलीकडचा होता. ते एका बाजूला बसून घडणाऱ्या घटना बघत होते फक्त. अशोक झोपला आहे याची खात्री झाल्यावर मात्र ते गृहस्थ बाहेर येऊन बसले. त्यांनी एक स्मित करून काकांकडे बघितलं आणि आल्यापासून पहिल्यांदाच बोलायला सुरवात केली.

"तुम्हीच न जोशी काका आणि काकू? तुमचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत. काल जर तुम्ही प्रसंगावधान राखून अशोकच्या आईला फोन केला नसतात तर आम्ही याच गैरसमजात असतो की अशोक बरा झाला आहे. तुम्ही अशोकच्या आईला फोन केलात आणि लगोलग त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला जे सांगितलं त्यावरून माझ्या लगेच लक्षात आलं की अशोक अजूनही बरा झालेला नाही. म्हणून मग मी वेळ न दवडता अशोकच्या आईला घेऊन इथे यायला निघालो....."

ते बोलत असताना अचानक त्यांना अडवत काका म्हणाले,"अगोदर आम्हाला हे कळेल का की तुम्ही कोण आहात? मी अशोकच्या आईला फोन केला होता ते हे सांगायला की अशोकपासून संध्याला धोका आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. पण मला वाटतं अशोकने अगोदरच संध्याला काहीतरी केलं आहे. कारण तुम्ही अशोकला आत झोपवून आला आहात; पण तुमच्या बरोबर संध्या बाहेर आलेली नाही. त्यामुळे तुम्ही इथे कसे पोहोचलात ते समजून घेण्याच्या अगोदर संध्या ठीक आहे की नाही ते बघणे आत्ता जास्त महत्वाचे आहे."

काकांचं बोलणं ऐकून ते गृहस्थ काहीसे हसले आणि मग गंभीर होत म्हणाले,"काका आणि काकू तुम्हाला हे एकून कदाचित् धक्का बसेल; पण संध्या इथेच काय पण या जगातच नाही आहे."

त्यांचं ते बोलणं एकून काकूंना खरच मोठ्ठा धक्का बसला. त्यांनी काकांचा हात घट्ट धरला. काका देखील अवाक झाले. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने अशोकच्या आईकडे बघितलं. अशोकच्या आईचा चेहेरा दु:खाने पिळवटला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. त्यांनी त्या गृहस्थांना थांबण्याची खूण केली आणि बोलायला सुरवात केली.

"जोशी काका आणि काकू, हे डॉक्टर शेटे. ते सायकॉलॉजिस्ट आहेत. मी तुम्हाला एकूणच सर्वकाही पहिल्यापासून सांगते... आमचा एक वाडा आहे मुंबईला गिरगावात आणि वाड्यात एक झोपाळा देखील आहे तुमच्या घरात आहे तसाच. अशोक माझा मुलगा. अशोकचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते. त्यामुळे मीच अशोकला वाढवले होते. अशोकची आणि संध्याची कॉलेजमध्ये ओळख झाली. संध्या मोठी गोड मुलगी होती. त्यामुळे मीच त्यांचे लग्न लावून दिले होते चार वर्षांपूर्वी. अशोक चांगली नोकरी करत होता. आमच चांगलं चाललं होतं. दोन वर्षांनी अशोक-संध्याला मुलगी झाली. खूप गोड होती आमची मृदुला. ती तीन एक महिन्यांची होती. एकदा दुपारी संध्या मृदुलाला घेऊन वाड्यातल्या झोपाळ्यावर बसली होती. ती हलकेच झोके घेत होती. कसं कोण जाणे पण अचानक तिच्या हातून मृदुला सटकली आणि खाली पडली. त्या एवढ्याश्या जीवाला ते पडणं सहन नाही झालं आणि आमची मृदुला तिथल्या तिथे गेली. संध्याने देखील झोपाळ्यावरून खाली उडी मारली. तिने मृदुलाला हातात घेतली. पण मृदुला हालचाल करत नव्हती. झालेल्या आवाजामुळे मी आतून बाहेर धावत आले. संध्याला मोठा धक्का बसला होता. ती एकदम दगड होऊन बसली होती. मी संध्या आणि मृदुला जवळ गेले. पण मृदुलाच्या बाबतीत काही करता येणार नाही हे माझ्या त्याक्षणीच लक्षात आल. मी संध्याला हलवत होते. पण ती एकदम स्थब्द बसली होती. पार घाबरून घेले होते मी. त्यामुळे अशोकला फोन करायला आत धावले. अशोकला कळवून मी बाहेर आले तर मला संध्या आणि मृदुला दोघीही कुठेच दिसेनात. तशी मी वाड्याच्या दरवाजाकडे धावले. तिथे मला कोणीतरी सांगितले की संध्याला हातात बाळाला घेऊन समुद्राकडे धावत जाताना त्यांनी बघितलं.

मी तशीच समुद्राच्या दिशेने धावले. पण खूप उशीर झाला होता. संध्या मृदुलाच्या कलेवराला कवटाळून समुद्रात शिरली होती. मी लगेच पोलिसांना कळवले. तोवर अशोक देखील तिथे पोहोचला होता. आम्ही खूप शोध केला संध्याचा समुद्रात. पण ती हाती लागली नाही. संध्याचे कलेवर दुसऱ्या दिवशी सकाळी किनाऱ्याला लागलेले आम्हाला मिळाले. आमच्या मृदुलाचा तर पत्ताच लागला नाही. पत्नी आणि मुलगी एका दिवसात गेल्याचा धक्का अशोक पचवू शकला नाही. काही दिवस तो एकदम बधीर होता. पण मग त्याने हे स्वीकारले की मृदुला गेली आहे. मात्र संध्या देखील गेली आहे हे मान्य करायला तो तयार होत नव्हता. हळूहळू तो फारच भ्रमिष्टासारखं वागायला लागला. त्यामुळे मी त्याला डॉक्टर शेटे यांच्याकडे घेऊन गेले. अशोकला त्यांची ट्रीटमेंट वर्षभर चालू होती. हळूहळू तो माणसात आला. त्यानंतर तो माझ्याशी निट बोलायचा.

डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की अधून मधून मुद्दाम संध्याचा विषय काढून अशोकचे विचार मी समजून घ्यावेत. मात्र संध्याचा विषय काढला तर तो दुखावेल म्हणून मी कधीच तिच्याबाद्द्ल बोलत नव्हते. ही माझी मोठी चूक होती. कारण अशोकने त्याच्या मनात संध्याला जिवंत ठेवलं होतं. मात्र त्याने याची मला कल्पना देखील येऊ दिली नाही. काही महिन्यांपूर्वी त्याने ही नोकरी धरली. अशोक संध्याचा विषय सोडला तर एकदम नॉर्मल वागायचा-बोलायचा. त्यामुळे कोणालाही काहीही संशय आला नाही. त्या लोकांना देखील अशा छोट्या गावात येऊन कामाची सगळी जवाबदारी घेईल असा तरुण मुलगा हवा होता. त्यामुळे त्यांनी देखील बाकी कोणतीही चौकशी केली नाही. मात्र अशोकच्या मनातले खेळ त्याने या गावात आल्यावर प्रत्यक्षात उतरवले. त्याने इथे आल्याक्षाणापासून त्याच्या मनातल्या संध्याला परत जिवंत केलं. जणूकाही ती जिवंत आहे आणि त्याच्याबरोबर राहाते आहे अशा प्रकारे तो वागत होता. इथे त्याला कोणीच ओळखत नसल्याने त्याने जे सांगितलं ते तुम्हाला सर्वांनाच खरं वाटत गेलं. अर्थात हे मला जोशी काकांनी काल फोन केल्यानंतर लक्षात आलं. काकांनी मला काल घडलेला प्रसंग सांगितला आणि मला एकटीला अशोकला सांभाळणं अशक्य आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे लगेच मी डॉक्टर शेटेंना फोन लावला आणि माझ्या विनंती वरून ते माझ्या बरोबर इथे यायला तयार झाले.

बाकी आम्ही इथे आल्यापासून जे काही घडलं आहे ते तुमच्या समोरच आहे. त्यामुळे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल सगळ." अशोकची आई बोलायची थांबली. तिचा गळा दाटून आला होता. जोशी काकुंचे डोळे देखील ओलावले. त्या उठून अशोकच्या आईजवळ गेल्या आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांना थोपटायला लागल्या. अशोकच्या आईने काकूंच्या खांद्यावर दमून डोकं टेकवलं आणि आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

काकांचे डोळे देखील पाणावले होते. त्यांनी डोळे कोरडे केले आणि हळव्या आवाजात ते म्हणाले,"अशोकच्या आई, तुमचं दु:ख आम्ही समजू शकतो. मात्र मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काल आम्ही जेव्हा इथे आलो आणि ज्या प्रकारे अशोक आमच्याशी वागला त्यावरून आम्हाला संशय आला की बहुतेक अशोकनेच संध्याला अडकवून ठेवलं आहे. मी एकदा अशोकला शेटजींच्या दुकानातून फोन करताना बघितलं होतं. त्यावेळी मी त्यांना विचारलं तेव्हा शेटजी म्हणाले होते की अशोक अनेकदा त्यांच्या दुकानात फोन करायला येतो. मला वाटलं की अशोक ज्यांना फोन करतो त्यांनाच जर त्याचे हे वागणं कळवलं तर कदाचित् संध्यावर होणारा अन्याय थांबवता येईल. मात्र आता जे सत्य पुढे आलं आहे ते ऐकून आम्हाला अशोकबद्दल खूप वाईट वाटतं आहे. पण मग आता तुम्ही नक्की काय करणार आहात डॉक्टर?"

डॉक्टर शेटे इतकावेळ काहीच बोलले नव्हते. त्यांनी एकदा अशोकच्या आईकडे बघितलं आणि ते म्हणाले,"आता मी अशोकला झोपेचं इंजेक्शन दिलं आहे. तो उठल्यानंतर कसा वागेल याची काहीही खात्री देता येत नाही. त्यामुळे अशोकला लवकरात लवकर इथून घेऊन जाणंच योग्य आहे." अशोकच्या आईने देखील मान हलवून मूक संमती दिली; आणि मग काही वेळातच अशोकची आई आणि डॉक्टर शेटे अशोकला घेऊन निघून गेले.

समाप्त

No comments:

Post a Comment