आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं
आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाचं गाणं तर आपण सर्वांनीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातलं आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत जायचो सिक्का नगरला. आजोळी माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे. आमची मावस भावंड बेंगलोरला राहात असल्याने फारशी येत नसत. माझे दोन्ही मामा माझ्या आईपेक्षा लहान. त्यामुळे मी तिसरी किंवा चौथीमध्ये असताना एका मामाच लग्न झालं आणि दुसऱ्याच तर मी दहावीत असताना. त्यामुळे नातवंडं म्हणून आम्हीच होतो. म्हणून देखील लहानपणी आजी, आजोबा आणि मामा लोकांकडून सगळे लाड फक्त आणि फक्त आमचेच झाले.
माझी पहिली मामी आजही दिसायलाअत्यंत सुंदर आहे आणि त्याहूनही सुंदर तिच मन आणि स्वभाव आहे. त्यावेळी तर ती म्हणजे परीच वाटायची मला. माझी पहिली मैत्रिण अस देखील म्हणता येईल. त्याकाळात म्हणजे साधारण १९८९-९० मध्ये ती पार्लरमध्ये जाऊन केस कापायची. ही घटना माझ्यासाठी खूप मोठी होती. तिचं ते perfect साडी नेसणं आणि केसाला पिन्स लावण मी मन लावून निरीक्षण करायचे. ती कुठल्याश्या क्लासमध्ये काहीतरी शिकवायला जायची. घरून निघताना आम्हाला सांगायची की अमुक एका वेळेला क्लास जवळ या दोघे. मग आम्ही शहाण्या मुलांसारखे तिथे जायचो. त्यानंतर आम्ही तिघे बस ने कधी 'म्हातारीचा बूट' तर कधी चालत 'चौपाटी' तर कधी 'गेट वे ऑफ इंडिया' ला जायचो. बाबूलनाथ देवळावरून जाताना तिथे असलेली कायमची गर्दी मला नेहेमी कोड्यात टाकायची. मामीला मी अनेकदा विचारलं देखील होतं; आपल्या सिक्कानगरच्या देवळात आणि या देवळात काय फरक आहे? इथे इतकी गर्दी असते.... मग तिथे का नाही? पण असे प्रश्न काही सेकंदांसाठीच मनात यायचे. मूळ आकर्षण तर म्हातारीच्या बुटाचं असायचं. त्यामुळे तिथे कधी एकदा पोहोचतो अस झालेलं असायचं. तिथे गेल्यावर मी आणि माझा भाऊ बऱ्यापैकी मस्ती करायचो. मग येताना भेळ, कुल्फी किंवा घराजवळ आलं की प्रकाशकडंच पियुष आणि साबुदाणा वडा ठरलेलं असायचं. कधी कधी सिक्कानगरच्या जवळच्या मंदिरांमध्ये मामी मला न्यायची. फणस वाडीतल व्यंकटेश मंदिर तर मला आजही आठवतं. ते मंदिर म्हणजे एखाद्या राजा सारख त्या परिसरात मिरवायचं. त्या मंदिरात संध्याकाळी प्रसाद म्हणून दही भात आणि भिसिबिली भात द्यायचे. तिकडचे पुजारी अगदी साऊथचा छाप होते. त्यांचं ते हेल काढून बोलणं आणि परत एकदा भाताची मूद वाढतानाचं ते कौतुकाने बघणं अजूनही आठवतं. अलीकडेच त्या मंदिराकडे जाण्याचा योग आला होता. पण आता तिथलं चित्र आगदी बदलून गेल आहे. कुठेतरी आत खोलात एक गरीब बिचारं दगडी मंदिर उभ आहे अस आता त्याच्याकडे बघताना वाटत होत.
आजोळी असलं की रोज सकाळी लवकर उठवून आजी आम्हाला फडके मंदिरात न्यायची. ती कलावती आईंची उपासना वर्षानुवर्षे करायची. सुट्टीत ती आम्हाला देखील बालोपासना करायला लावायची. म्हणजे सकाळी मंदिरात जाऊन इतर मुलांबरोबर बसून लहान मुलांसाठी लिहिलेली स्तोत्रं म्हणायची. आजीच भजन वगैरे आटपेपर्यंत आम्ही मुलं मंदिराच्या आवारत किंवा मंदिराच्या व्हरांड्यात खेळायचो. आंता मात्र मंदिराचा व्हरांडा बार्स लावून बंद केला आहे आणि आवारात गाड्या लावलेल्या असतात.
आम्ही घरी यायचो तोवर आण्णानी (माझे आजोबा) बेकरीतून मस्त ताजी गरम बटर आणलेली असायची. ही खास फर्माईश माझ्या भावाची असायची. मे महिना असेल तर बटर बरोबर आंबा चिरलेला असायचा. आजोळच आंबा पुराण हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण आम्ही तिथे गेलो की दुसऱ्याच दिवशी आण्णा बाजारातून एक पेटी आंबे आणायचे. त्याकाळची ती पाच डझन आंबे असलेली लाकडी पेटी बघितली की आमचे डोळे चमकायचे. मग आजी आणि मामी मिळून त्याचे खिळे काढायच्या आणि घराच्या त्या प्रशस्त पुरुषभर उंचीच्या खिडकीत एका चादरीवर ते आंबे पसरायच्या. मग काय सकाळी आंबा, दुपारी आणि रात्री जेवताना आंबा! आम्ही सारखे आंबे खायचो. आज जेव्हा माझ्या मुलींच चिमणीसारख खाणं बघते त्यावेळी आमचं न मोजता हवतस आणि हवं तेवढं खाणं आठवून हसायलाच येतं.
फडके मंदिराच्या समोरच आण्णांच सोन्याच्या दागिन्यांचं दुकान होत. दिवसभरात माझी आणि माझ्या भावाची एक तरी फेरी दुकानात असायची. पण त्याचं कारण खास होतं. बाजूलाच गिरगावातलं प्रसिद्ध आवटेंच आईस्क्रीमच दुकान होत. आमच्या दुकानातल मागलं दार त्यांच्या किचनमध्ये उघडायचं. त्यामुळे आम्ही आवटे आईस्क्रीम आमचंच असल्यासारखं हक्काने मागच्या दाराने आत जाऊन हव ते आईस्क्रीम काढून घ्यायचो. त्याकाळात प्लास्टिकच्या बॉलमध्ये आईस्क्रीम भरलेलं असायचं. त्याच सर्वात जास्त आकर्षण असायचं आम्हाला.
त्याकाळी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साहित्य संघात बरीच बालनाट्य असायची. आण्णा आम्हाला त्यांच्या लुनावरून तिथे सोडायचे. बरोबर खाऊचा डबा दिलेला असायचा. नाटक संपलं की मी आणि माझा भाऊ गायवाडीमधून चालत घरी परत जात असू. त्याकाळातली नाटकं अजूनही मनात घर करून आहेत. हिमागौरी आणि सात बुटके नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकीण होते. त्यांनी त्यांची एन्ट्री सभागृहातल्या एकदम मागच्या दारातून घेतली. मोठ्याने चित्र-विचित्र आवाज काढत ते धावात स्टेजच्या दिशेने गेले. सभागृहातल्या आम्हा सगळ्या मुलांच्या छातीत तेव्हा धडकी भरली होती ती चेटकीण बघून. अनेक मुलं तर मोठ्याने किंचाळली होती. अशी कितीतरी नाटकं आम्ही तिथे बघितली. मी आणि माझा भाऊ अनेकदा हट्ट करून मुद्दाम लवकर आयचो तिथे. अजून नाटकाचा सेट लागत असायचा. त्यामुळे तो भव्य सेट बघता यायचा. एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं तेव्हा. बालनाट्य सृष्टीचा सुवर्णकाळ अक्षरश: जगलो आम्ही.
गिरगावातल्या त्या गल्ल्या.... ती चाळ संस्कृती. लहानात लहान सण असो किंवा कोणाच्याही घरातला समारंभ असो... सगळे एकत्र येऊनच साजरा करायचे. त्याकाळात गम्मत म्हणून वर्गणी काढली जायची. वर्गणी म्हणजे 'दिलंच पाहिजे;' असं अकाउंट नव्हतं तेव्हा.
आज चाळींमधल्या मोकळ्या जागेत दुचाकी-चारचाकी लावलेल्या असतात. पूर्वी तिथे शनिवारी रात्री दिवे लावून क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या. गणपतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. संक्रांतीला गच्चीत सगळे मिळून पतंग उडवायचे. त्याकाळी देखील तिथे गुजराती लोकांचं वास्तव्य जास्त होत. मग 'जलेबी अने फाफडा' ची टेबलं लागायची गच्चीत. कोणीही यावं आणि हवं तितकं खावं. एक वेगळीच धम्माल असायची त्यात. तीच धम्माल आम्ही कायम अनुभवली ती गोपालकाल्याच्या वेळी. वेगवेगळी स्थिरचित्रं बनवलेले रथ आणि दही-हंडी फोडण्यासाठी निघालेल्या पथकांचे ट्रक्स. मग ज्यांची घरं रस्त्याच्या बाजूने असायची त्यांच्या घरी सगळ्या मुलांची गर्दी व्हायची. घरातल्या बादल्यांमधून पाणी भरून आणून त्या पथकांवर टाकायची आणि घरात चिखल करून टाकायचा. पण कधी कोणाची आई रागावल्याचं नाही आठवत. दिवाळीच्या वेळी कोणत्या मजल्यावर कोणत्या रंगाचे आकाशकंदील लावले जातील याची चर्चा रात्र-रात्र व्हायची. मग ते एकत्र जाऊन कंदील आणणं.... फटाकेसुद्धा असे एकत्रच उडवले जात. आजच्या सारखं नव्हतं तेव्हा. अलीकडे बघते तर आई-वडीलच सांगतात मुलांना त्यांच्या घरातले उडवून होऊ देत मग आपण जाऊ फटाके उडवायला. 'सर्वांनी मिळून' संपून 'आपलं-तुपलं' कधी आपल्या मनात आणि घरात शिरलं ते बहुतेक आपल्यातल्या अनेकांना कळलं देखील नसेल.
मात्र त्या आजोळच्या.... गिरगावातल्या.... सोनेरी आठवणी आजही मनाच्या कस्तुर कुपीमध्ये दरवळतात.
ते बालपणीचे रम्य क्षण आजही सुखावून जातात. शाळा संपली आणि कॉलेज सुरु झाल्यावर मात्र दर सुट्टीतलं गिरगावात जाण कमी झालं. आता तर तिथे इतके मोठे मोठे बदल झाले आहेत; की पूर्वीचं गिरगाव त्यात हरवूनच गेलं आहे. आता आजोळी जाणं हे फक्त काही ना काही समारंभाच्या निमित्तानेच होतं. क्वचित कधीतरी मुद्दाम ठरवून माझ्या अजूनही खुप सुंदर दिसणाऱ्या आणि खूप खूप प्रेमळ मामीला भेटायला जाते. तिथे गेलं की जुन्या आठवणीमध्ये हरवून जाते. परत एकदा ते दिवस जगावेसे वाटतात.... आणि मनात येत राहातं...... जाने कहां गये वो दिन!!!