दोस्ती
नितिन, विकास आणि सुधीर लहानपणापासूनचे मित्र. एकाच वयाचे. एकाच शाळेत जायचे. एकाच सोसायटीत रहायचे. कायम एकत्र. अगदी जीवश्च कंठश्च मित्र!
नितिनची आई शिक्षिका आणि वडील प्राइवेट फर्ममधे नोकरीला होते. नितिन शांत स्वभावाचा आणि अभ्यासु मुलगा होता. एखादा विषय तो उत्तम फोड़ करून सांगायचा. त्याने साधारण कॉलेजमध्ये असतानाच पुढे काय करायचं ठरवल होत. त्याप्रमाणे ग्रेजुएशन आणि पोस्ट ग्रेजुएशन नंतर तो एका उत्तम कॉलेज मधे प्रोफेसर म्हणून जॉइन झाला. विषय शिकवायची हातोटी चांगली होती म्हणून अल्पावधितच नाव झाल आणि मग तर त्याने आपले प्राइवेट कोचिंग क्लासेस् सुरु केले. सकाळी 6 ते रात्रि 10 तो बिझी असायचा. नितीनची कॉलेजमध्ये असतानाच स्वाप्नाशी ओळख झाली होती आणि पुढे त्या ओळखीचे रुपांतर मैत्री....प्रेम.... आणि मग दोघांच्याही आईवडीलांच्या परवानगीने लग्न असा छानसा प्रवास त्यांच्या ओळखीचा झाला होता. नितीन-स्वप्नाला दोन मुल होती. मोहन आणि राधिका. स्वप्ना देखील पोस्टग्रजुएट होती. पण तिने कधी नोकरी करण्याचा विचार केला नव्हता. अगोदर मुल आणि संसार याला वेळ देण तिला जास्त महत्वाच वाटायचं. अर्थात दोघांनी मिळून मुलांना छान वाढवाल होत. परंतु मुल मोठी झाली आणि शाळेत जायला लागली. त्यानंतर नितीनने स्वप्नाच्या मागे लागायला सुरवात केली. "आता मुल मोठी झाली आहेत, मग तू फक्त घरात का बसून राहातेस? तू क्लासची जवाबदारी थोडी तरी घेतलीस तर आपण दोघे मिळून क्लास जास्त व्यावास्थित चालवू शकू." अस म्हणत तो नेहेमी तिच्या मागे लागायचा. स्वप्नाला देखील त्याच म्हणण पटायला लागल.म्हणून मग एकदा मुलांच रुटीन तिने व्यवस्थित लावून दिल, आणि मग तीदेखील त्याच्या क्लासेस् मधे शिकवायला लागली आणि मग हळूहळू त्यात रमली. उच्च मध्यम वर्गातल सुखी चौकोनी कुटुंब होत ते.
विकासचे वडील सरकारी कर्मचारी होते. तो ग्रेजुएशनच्या दुस-या वर्षाला असतानाच ते ह्रदय विकाराच्या झटक्याने गेले आणि विकास त्यांच्या जागेवर नोकरीला लागला. त्याने जेमतेम ग्रेजुएशन पूर्ण केले. त्यामुळे विकासच आयुष्य तस सरळ साध राहील होत. 9 ते 6 ची नोकरी तो अगदी लहान वयापासून करायला लागला होता. लग्नाच वय झाल आणि सरकारी नोकरी असल्याने मुली लगेच सांगून यायला लागल्या. त्याने नेहेमीच्या साच्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून नीताला पसंत केल आणि त्यांच लग्न झाल. नीता देखील एका प्रायवेट कंपनीमध्ये क्लार्क होती. अरुण हा एकुलता एक मुलगा होता त्यांचा. साधासा पण सुखी संसार होता. विकास आणि नीताच बालपण साधारण सारखच गेल होत. त्यामुळेच असेल पण त्यांची स्वप्न देखील खूप श्रीमंत होण्याची कधीच नव्हती. परंतु एकूण सांपत्तिक स्थिती चांगली होती. दोघेही नोकरी करत असल्याने कधी पैशांची चणचण जाणवली नाही. त्यानी मॉल्समध्ये जाण्यापेक्षा समुद्र किनारा किंवा विविध बागांमधून फिरण्याची सवय अरुणाला लावाली होती. त्यामुळे उगाच डोळे दिपवणारी आणि आवाक्याबाहेरच्या स्वप्नाची अपेक्षा अरुणने देखील कधी व्यक्त केली नव्हती. कधी एख्याद्या शनिवार-रविवार ट्रेकला जाण तर कधी नातेवाईकांना घरी बोलावण आणि कधी त्यांच्याकडे जाण... असा काहीसा असायचा त्यांचा कार्यक्रम. साधस मध्यमवर्गीय आणि तरीही सुखी समाधानी आयुष्य होत विकासच आणि त्याच्या कुटुंबाच.
तिघा मित्रांमध्ये सुधीरची स्वप्न मात्र पहिल्यापासूनच खूप मोठी होती. त्याला कायमच काहीतरी खूप मोठ मिळवाव, नाव कमवाव, खूप श्रीमंत व्हावं.... अस वाटायच. तसा हुशारही होता तो. मेहेनती देखील होता. ग्रेजुएशन नंतर मग त्याने MBA केल. काही दिवस मल्टिनॅशनल कंपनी मधे नोकरी केली. आणि त्या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा कॉन्सिल्तान्च्सी चा व्यवसाय सुरु केला. यथावकाश आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलीशी सुधीरने लग्न केल होत. सुधीरची पत्नी मिता नोकरी करत नसे. अर्थात दोन मुलगे होते.... सुमित आणि मितेश....त्यांना सभाळणे आणि घरचे सगळे बघणे यातच ती अड़कलेली होती ती. सुधीर कामानिमित्त कायम बाहेर गावी आणि परदेशात फिरत असायचा. घराला वेळ देणे त्याला शक्य नव्हते. म्हणूनच तिने स्वतः निर्णय घेऊन घराची पूर्ण जवाबदारी उचलली होती. कारण सुधीरच्या मते अशा लहान लहान विषयात चर्चा करण्यासारखे कधी काही नव्हतेच. त्याच्या मते तो यात दाखल न देतां मीताला पूर्ण मोकळीक देत होता. परंतु त्यामुळे मिता आणि सुधीरमध्ये कधी मैत्री झालीच नव्हती. ते दोघे उत्तम पती-पत्नी होते. मिता सुधीरबरोबर मोठ-मोठ्या पार्टीजना जायची आणि त्याची सुविध्य पत्नी असण्याचा उत्तम अभिनय करायची. सुधीरला घरातले सगळे अपडेट्स असायचे... पण संवाद माहित नसायचे. अर्थात हे सुधीरच्या कधीच लक्षात आले नाही. कारण संसारात अडकणे हा त्याचा स्वभावाच नव्हता. मुळात सुधीर थोडासा अलिप्त स्वभावाचा होता. मी.. माझी स्वप्न... माझं यश... हेच त्याचे विचार होते. त्यामुळे सुरवातीला मीताने प्रयत्न केला. पण त्याचा स्वभाव लक्षात आल्यावर तिनेही तो विषय सोडून दिला. नंतर तर लागोपाठ मुल झाली आणि मग तीदेखील मुलांमध्ये रमून गेली.
अशीच वर्षा मागून वर्षे जात होती. नवीन टेक्नॉलजीमुळे सगळ्यांकडे मोबाईल्स आले होते. त्यामुळे नितीन, विकास आणि सुधीरचा एकमेकांशी चांगलाच संपर्क असायचा पण आलीकडे त्यातला ओलावा कमी झाला होता. तिघांचा असा एक whatsaap वर ग्रुप होता. पण त्यावर अलीकडे जास्त करून फोर्वार्ड्सच असायचे. मात्र हरवणारा हा ओलावा टिकवण्यासाठी विकास कायम प्रयत्न करायचा. ग्रूपवर मुद्दाम कसे आहात हे तो विचारायचा आणि उत्तर आल नाही तर मग स्वतःहून अनेकदा दोघानाही फोन करायचा. अशा वेळी तो अगदी सहज... मिनिट दोन मिनिट बोलत असे. पण त्यामुळे एकमेकांची खाबर मिळायची तिघांना. सुधीरच्या आयुष्याला शेडूल अस नव्हतच. अनेकदा तो मीटिंग मध्ये असायचा. त्यामुळे सुधीर फोन उचलायचाच असं नव्हत. पण तरीही विकासने फोन करण सोडलं नव्हत. मात्र नितीनच शेद्युल विकासने साधारण समजून घेतल होत. त्यामुळे तो कधी फ्री असेल याचा अंदाज घेऊन तो फोन करत असे. तिघा मित्रांच्या मैत्रित मात्र अजिबात अंतर नव्हतं. खूप जीव होता त्यांचा एकमेकांवर. आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि साजरा करता येतील अशा सर्व घटनांची माहिती त्याना एकमेकांना असायची. असेच दिवस... वर्ष सरकत होते.
एक दिवस संध्याकाळी 7 च्या सुमारास नितिनचा मोबाईल वाजला. विकासचा नंबर बघुन त्याला खूप आश्चर्य वाटल. नितिनला 12वी च्या वर्गावर जायच होत. पण विकास असा अवेळी फोन करणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळे काळजी वाटून त्याने फोन घेतला.
"काय रे विकास? काय झाल? सगळ ठीक ना?" नितिनने फोन उचलून काळजीच्या आवाजात विचारल.
"सगळ एकदम मस्त यार. सहज केला होता फोन. आज तुझी आणि सुधीरची खूप आठवण आली म्हणून. डिस्टर्ब केल न तुला? आत्ता तुझी लेक्चर्स असतात न? अरे आवाज एकावासा वाटला रे. चल ठेवतो मी फोन." विकास म्हणाला.
"अरे लेक्चर्स रोजच असतात. थोड़ा उशिरा गेलो वर्गावर तर मुल खुशच होतील. तू बोल यार. कसा आहेस? खूप बर वाटल तुझा आवाज ऐकून." नितिन म्हणाला. त्यात विकासला बोलत करण्याचा त्याचा उद्देश होता. कारण विकास असा सहज फोन करणार नाही याची नितीनला खात्री होती.
"मी मस्त मजेत आहे. नितिन एकदा भेटु या ना यार. किती महीने... महिने का वर्ष होऊन गेल आपण तिघे भेटलो त्याला." विकास थोडा भाऊक होत म्हणाला.
"हो रे. गेल्या वर्षी मी नवीन जागा घेतली क्लाससाठी त्याच्या पूजेला आला होतास न तू तेव्हा भेटलो होतो आपण. सुधीर तर बाहेर गावी होता. त्याला जमलच नाही शेवटी." नितिन म्हणाला. "खरच भेटलं पाहिजे रे. तुम्हाला दोघांना भेटलो ना की नवीन शक्ती मिळाली आहे अस वाटत. तू सांग. कधी भेटु या? नाहीतर एक काम करतोस का... सुधीरला विचार. त्याच्या सोईनी भेटु. कारण आपण दोघांनी ठरवून काही उपयोग नाही. सुधीरला देखील जमायला हव न. त्याची सोय बघितली की तिघही भेटू शकू. काय?"
"ठीके. तुला मेसेज करतो मी त्याच्याशी बोलून." अस म्हणून विकासने फोन ठेवला.
बंद झालेल्या फोनकडे नितिन काही सेकंद बघत राहिला. त्याच्या मनात आल... विकास असा अचानक फोन नाही करणार. काहीतरी कारण आहे नक्की. चांगली न्यूज असती तर त्याने लगेच सांगितली असती. काही अडचणीत असेल का? संकोचाने बोलला नसेल का? नितीनला थोडी काळजी वाटली. पण मग त्याच लक्ष मनगटावरच्या घड्याळाकडे गेलं आणि लेक्चरला जायला उशीर होतो आहे ते त्याच्या लक्षात आल आणि तो लेक्चरला निघाला. दोन दिवसात विकासकडून काहीच मेसेज आला नाही. म्हणून रात्रि शेवटच्या लेक्चरनंतर त्याने विकासाच्या एवजी अगोदर सुधीरला फोन केला. त्यादिवशी विकासने संध्याकाळी म्हणजे खर तर तसा अवेळी फोन केला होता ते काहीसं वेगळ होत अस सारख नितीनच्या मनात येत होत. कारण विकास कायम दुसऱ्याचा विचार करून मगच कोणतीही कृती करेल याची नितिनला खात्री होती. हे मानातले विचार सुधीरला सांगाव अस वाटल आणि त्याला देखील अस काही जाणवल का ते विचाराव असही त्याच्या मनात होत.
फोनची रिंग बराच वेळ वाजली आणि आता नितिन फोन कट करणार तेव्हा सुधीरने फोन उचलला. "नितिन अरे यार ज़रा गड़बडित आहे. उद्या एक महत्वाची मीटिंग आहे. त्याची तयारी करतो आहे. नंतर बोलतो तुझ्याशी." नितिन काही बोलायच्या आत सुधीर म्हणाला. "ठीके." एवढच म्हणून नितिनने फोन ठेवला. सुधीरची सोय बघून भेटायच्या संदर्भात मेसेज करतो अस म्हणूनही विकासचा मेसेज का आला नसेल ते त्याच्या लक्षात आल. तरीही विकासच अस फोन करण त्याला साध वाटत नव्हतं.
रात्रि जेवताना त्याने हा विषय स्वप्नाकडे काढला. तिने सल्ला दिला "तुला जर काही वेगळ वाटतय तर मग तू जाऊन ये बघू लगेच उद्या. उगाच मनात संशय ठेवला की धड कामात लक्ष नाही लागणार तुझ. मुख्य म्हणजे विकास तुझा जुना आणि खरा मित्र आहे. त्यात तुम्ही बऱ्याच दिवसात भेटलेला नाहीत. मग सहज म्हणून भेटून आलास तरी काय हरकत आहे. तू क्लासची आणि लेक्चर्सची काळजी करू नकोस. मी करेन संध्याकाळची लेक्चर्स मॅनेज." नितिनला देखील ते पटल आणि तो दुस-या दिवशीच् संध्याकाळी विकासाच्या घरी अचानक जाऊन थड़कला. त्याने विचार केला होता की अचानक जाऊन आपण विकासाला आश्चर्यचकित करुया. पण त्या एवजी नितिन केवळ सरप्राइज नाही तर पुरता कोलंमडून गेला; विकासाच्या घरी पोहोचल्यावर.
नितिनने बेल वाजावली आणि विकासच्या आठवीत शिकणा-या अरुणने दार उघडल. घरात पाऊल ठेवताच नितिनला दवाखान्यातील औषधांच्या वासासारखा वास जाणवला. त्याक्षणी काहीतरी गडबड असावी हे नितीनच्या मनात आल. त्याने हलक्याच आवाजात अरुणला विचारलं,"काय रे सगळ ठीक ना बेटा? बाबा कुठे आहेत तुझे?" अरुणने आत खोलीकडे बोट दाखवलं. विकास त्याच्या खोलीत झोपला होता. त्याची पत्नी नीता नितिनला तिथे घेऊन गेली. विकास प्रचंड बारीक झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. नितिन पुरता गड़बडला. त्याने नीताकडे गोंधळून बघितल. ती कसनुस हसली आणि डोळ्याला पदर लावून बाहेर गेली. नितीन तिला जाऊन काही विचारणार इतक्यात विकासने डोळे उघडले आणि नितिनला बघुन उठून बसला.
"काय रे हे विकास?" नितिनने त्याच्या शेजारी बसत आणि त्याचा हात प्रेमाने हातात घेत विचारले.
त्याचा हात दाबत विकास म्हणाला,"अरे काय सांगू? मला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे. last stage आहे. no hopes." त्याच अस शांतपणे बोलण एकूण नितीन हबकून गेला. अवाक् झाला. "अरे no hopes काय म्हणतोस? तुला काही कळत आहे का? सायन्स इतकं पुढे गेल आहे. माझ्या ओळखित एक डॉक्टर आहेत. एक्सपर्ट आहेत. मी त्यांची उद्याच् अपॉइंटमेंट घेतो. तू चल फ़क्त."
विकास हसला. "नितिन तुला खरच वाटत की मी किंवा नीताने हे काही केल नसेल? अरे नीताचा सख्खा भाऊच डॉक्टर आहे. त्यामुळे माझी योग्य तिच ट्रीटमेंट चालू आहे. फ़क्त सत्य हे आहे की कॅन्सिर आहे हेच उशिरा लक्षात आल्यामुळे एकूण सगळच हाताबाहेर गेलं आहे. आता काही उपयोग नाही" त्याने नितीनच्या हातावर थोपटत उत्तर दिल. नितीनला काय बोलाव सुचत नव्हत. तो विकासकडे बघत होता आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आल. विकासच्या ते लक्षात आल. त्यामुळे त्यानेच विषय बदलत म्हंटल,"बर ते जाऊ दे. तू सांग ... तू कसा आहेस? अरे मी सुधीरला कॉल केला होता. पण तो थोड़ा बिझी होता; म्हणून मग तुला मेसेज नाही केला मी. तुझ काही बोलण झाल आहे का त्याच्याशी?"
"झाल होत बोलणं. पण थांब आत्ताच सुधीरला फोन करतो." नितिन त्याचा मोबाईल बाहेर काढत म्हणाला.
विकासने त्याचा हात धरला. म्हणाला,"नितिन प्लीज माझ्या आजारपणाबद्धल कोणालाही सांगू नकोस. मला कोणाची दया नको आहे. दोस्तीच्या ओढीने तो आला तर ठिक. नाहीतर नको. माझा इलाज व्हावा... मदत मिळावी म्हणून नाही मी तुला किंवा त्याला कॉन्टेक्ट केला. तुम्हाला भेटावस वाटल म्हणून कॉन्टेक्ट केला आहे."
नितिनला त्याच म्हणण पटल. त्याने फोन आत ठेवला. मग विकास आणि नितीन गप्पात रंगले. मग पुढचे 3 तास ते दोघे जुन्या आठवणी आणि मस्ती केलेले दिवस यावर गप्पा मारुन खूप हसले. साधारण रात्रि 10 च्या सुमाराला नितिन निघाला. निघताना नितीनने विकासचा हात हातात घेतला आणि थोपटला. त्या एका स्पर्शात दोघा दोस्ताना प्रेमाची भाषा समजली. नितीन आल्यापासून विकास खूप वेळ बसल्याने दमला होता. तो आडवा झाला आणि लग्गेच् झोपला.
निघताना नितिनने नीताला सांगितल.."काही लागल तर लग्गेच् कळव वहिनी. मी इथेच आहे. खर तर माझ्या मनात एक गोष्ट आहे. माझा एक खूप चांगला मित्र डॉक्टर आहे. मी त्याला उद्या घेऊन येतोच."
नीता शांत होती. ती म्हणाली,"नको नितिन भावजी. विकासला नाही आवडणार. मुख्य म्हणजे जे जे म्हणून शक्य आहे ते सर्व काही आम्ही करतो आहोत. माझा भाऊच डॉक्टर आहे. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट चालु आहे. माझ्या एका बहिणीच्या ओळखीने आयुर्वेदिक औषध पण चालू केली आहेत मी. तुम्ही आलात आणि विकास आज खूप दिवसानी असा उठून बसला. गप्पा मारल्या. त्याला अस बघून मला खूप बर वाटल भावजी. खूप जीव आहे त्याचा तुमच्यावर आणि सुधीर भावजिंवर. त्यामुळे फ़क्त एकच विनंती आहे; तुम्ही फ़क्त जमेल तस भेटायला या, त्याच्या जवळ बसा, गप्पा मारा. अजून काय म्हणू मी?" एवढ़ बोलून तिने डोळ्याला पदर लावला. नितीनच्या डोळ्यात देखील पाणी उभ राहील. जमेल तसं विकासला भेटायला यायचं हे तिथल्या तिथे नितीनने ठरवलं आणि नीताचा निरोप घेऊन तो तिथून निघाला.
जड़ मनाने नितिन घरी पोहोचला. घरी त्याने स्वप्नाला सर्व कल्पना दिली. "जीव तुटतो आहे ग. माझा विकास आयुष्यभर कायम परिस्थितिशी झगड़ला. पण कधीही तक्रार नाही केली. वडील लवकर गेले आणि तो त्यांच्या जागी लागला. कायम हसत मुख. आज मनात येत ग की त्याची काय एम्बिशन होती ते कधी आम्ही त्याला विचारलच नाही. तो जे जगतो आहे तीच त्याची इच्छा असावी हे गृहीत धरल. आणि आता काही विचारायला उशीर झाला आहे ग. मुख्य म्हणजे आजही तो शांत आहे.हे एवढ मोठ आजारपण देखील त्याने स्वीकारलं आहे ग. मी उद्याच् सुधीरला फोन करुन सगळ सांगतो. विकास नको म्हणाला आहे; पण त्याची तब्बेत खूपच खालावली आहे. काहीच सांगता येत नाही ग. सुधीर भेटला तर त्याला बर वाटेल." नितीन बोलत स्वप्नाशी होता.... पण खर तर ते स्वगतच होत.
दुस-या दिवशी नितिनने सुधीरला फोन केला. पण सुधीरने फोन उचलला नाही. म्हणून मग नितिनने एक मेसेज केला. "थोडं म्हत्वाच काम आहे. जमेल तसा पण लगेच फोन कर." मात्र त्या दिवशी सुधीरचा फोन आला नाही. नितीन सुधीरच्या फोनची वाट बघत होता. फोन आला नाही हे बघून नितिन खूप डिस्टर्ब झाला होता. त्याचा अस्वस्थपणा बघुन स्वप्ना म्हणाली;"मी काही दिवस संध्याकाळची क्लासेस् बाघिन नितीन. तू तुझ्या विकासला भेटायला जात जा. खर सांगू का नितीन विकासला भेटायची गरज त्याच्यापेक्षा तुलाच जास्त आहे. कारण आपण काही करू शकत नाही हे समजून तू जास्त अस्वस्थ झाला आहेस. "
नितिनला स्वप्नाच म्हणण पटल. मग त्याने आणि स्वप्नाने कामाच वेळापत्रक बनवलं आणि तो एक दिवसा आड़ विकासकडे जाऊन बसु लागला. दोघे जुन्या आठवणी जागवायचे... त्यातून निघणा-या संदर्भातुन ज्यांची नावं आठवायची त्यांना दोघे मिळून फोन करायचे. एकच अट होती... विकासाची सद्य परिस्थिती सांगायची नाही. मग नितिन फोन लावून म्हणायचा की सहज आलो होतो विकासकड़े तर तुमची आठवण निघाली आणि फोन केला. आणि मग दोघे बोलायचे त्या व्यक्तिशी. कधी सोसायटी मधले जुने मित्र... तर कधी एकमेकांचे नातेवाईक.. असा फोन्सचा सिलसिला चालत असे. अशाच गप्पांमधून एकदा सुधीरला देखील त्यांनी फोन लावला होता. अगदी सहज.. फक्त गप्पा माराव्यात या उद्देशाने. पण तेव्हाही सुधीरने फोन उचलला नाही. त्यानंतर मात्र नितिन मनातून रोज सुधीरच्या फोनची किंवा निदान मेसेजची वाट बघत होता. पण सुधीरचा काहीच पत्ता नव्हता.
असेच दोघे एकदिवस गप्पा मारत बसले होते आणि विकासने नितीनचा हात धरून विचारल;"नितीन तुला ती मनीषा आठवते का रे?"
"आयला विकी तू पण ग्रेट हा! तुला आठवते ती अजून? पहिल्या बिल्डिंगमध्ये भाड्याने आली होती ती ना?" हसत नितीनने विचारले.
"हो रे! काय वेडे झालो होतो ना आपण तिघेही तिच्या मागे? कुठल्या शाळेत जाते.. कधी येते... तिच्याबद्धालच्या सगळ्या बातम्या काढल्या होत्या आपण." विकास हसत म्हणाला.
"हो! साल्या तूच काढल्या होत्यास. सुधीरसाठी. पागल झाला होता ना तो तिच्यासाठी." नितीन म्हणाला.
"का रे त्याच्यावर नाव ढकलतो आहेस? तू काय कमी होतास तिच्या मागे? तिची शाळा आपल्या नंतर अर्ध्या तासाने सुटायची. तर आम्हाला चुकवून तू धावत यायचास सोसायटीमध्ये. आणि ती दिसेल असा गेट जवळ रेंगाळत राहायचास." विकासने त्याला आठवण करून दिली.
"जा रे! मी भले लवकर यायचो. पण तुला सुधीरबद्धल जास्त प्रेम होत न. त्यामुळे तू मनीषाशी ओळख करून घेऊन त्याची आणि तिची भेट घालून दिली होतीस हे मला कळल नव्हत अस समजतोस का?" नीतीनेने विकासला कोपरखळी मारली.
"हो रे. त्याला ती जाम आवडायची. सारखा तिच्याकडे टक लावून बघायचा. मला राहावल नाही. मग मीच तिची ओळख काढून तिच्याशी मैत्री केली आणि मग तिची आणि सुधीरची मैत्री करून दिली होती. यार ती पण त्याला मस्त लाईन द्यायची रे. पण मग तिच्या बाबांची बदली झाली आणि गेले ते लोकं दोन वर्षात. पण कमाल तर सुधीरची आहे. विसरला यार तो त्या मनिषाला लगेच. साला पटकन बाहेर पडायचा कुठल्याही भावनिक बंधनातून." विकास म्हाणाला.
"पण काहीही म्हण विकी तुझा सुधीरवर जास्त जीव होता की नाही?" नितीनने विचारल.
विकास हसत म्हणाला;"नाही रे. अस का म्हणतोस? आपण तिघे घट्ट मित्र होतो."
"ते होतोच रे. पण तुला का माहित नाही त्याच्याबद्धल एक वेगळा ओलावा होता. कधी कोणी तुला काही दिल आणि ते सुधीरला आवडणार असेल तर तू तो येईपर्यंत वाट बघायचास आणि मग त्याच्याशी शेअर कारयाचास. मला कधी जेलस नाही वाटल. पण ते माझ एक ओब्झरवेशन होत. खर सांग ह."
"हो रे! खर सांगू का सुधीरच्या व्यक्तीमत्वात तस काहीस आहे. तो जिथे जातो ना तिथे त्याला हव तस घडवून आणतो. मला त्याचा हा स्वभाव खूप आवडायचा. बघ न! आज त्याच्या त्याच स्वभावाने त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे. हो की नाही? खूप खूप अभिमान वाटतो रे सुधीरचा. कधी कुठल्या बिझनेस मागझीनमध्ये त्याच नाव वाचल की उर भरून येतो. मी सगळ्याना दाखवतो ते मागझीन आणि सांगतो हा माझा बालपणीचा घट्ट मित्र आहे. बस... एकच वाटत रे! जसा मोठा होत गेला तसा तो खूप जास्त बिझी होत गेला रे. घरच्यांना तरी वेळ देतो की नाही कोण जाणे. अर्थात ही तक्रार नाही ह. सहज आपलं मनात आल म्हणून म्हंटल." अस म्हणून विकास हसला आणि सगळ समजून नितीनही हसला.
असे 8-10 दिवस गेले. एक दिवस दुपारी नीताचा नितिनला फोन आला. ती रडत होती; म्हणाली; "भावजी या..." बस इतकंच.
नितिन जीवाच्या आकांताने धावला.... पण सगळ संपल होत. विकासच्या मुलाला.... अरुणला... पोटाशी घेऊन नितिन खूप रडला. अगदी लहान मुला सारखा. "मी त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही.." बस नितीन एवढाच परत परत म्हणत होता. नीता त्याच्या जवळ आली आणि म्हणाली,"भावजी अस काय करता? तुमच्यामुळे विकासचे शेवटचे दिवस खूप चांगले गेले. तुमच्या येण्याकड़े तो डोळे लावून बसलेला असायचा. तुम्ही असे पर्यंत तो त्याच दुखण देखील विसरून जायचा. आता जर तुम्ही असा त्रास करून घेतलात तर त्याच्या जीवाला तिथे त्रास होईल. सांभाळा स्वतः ला." नितिनने त्या धीराच्या स्त्रीकडे बघितल आणि मन आक्रंदत असूनही तो शांत झाला.
2-3 दिवस गेले आणि सकाळीच् नितिनला सुधीरचा फोन आला. आवाज गोंधळालेला होता. "नितिन आज न्यूज़ पेपरमधे एक फोटो आणि बातमी दिसते आहे निधनाची. अरे नाव विकास राजे आहे. फोटो देखील आपल्या विकाससारखा आहे यार. इतका घाबरलो आहे मी. विकासचा फोन लावतो आहे पण बहुतेक तो ऑफिसला जायला निघाला असेल; त्यामुळे ट्रेन मधे असेल. रेंज नसावी. कारण लागत नाहिये...."
नितिनच्या डोळ्यात पाणी आल; त्याचा आवाज भरून आला आणि तो म्हणाला,"सुधीर बातमी आपल्या विकासचीच आहे. मीच दिली आहे काल."
सुधीर गडबडला. "अरे काय म्हणतो आहेस तू? बरा आहेस ना तू? मला काहीच कळत नाहीये" त्याचा आवाज घाबरलेला होता.
मग मात्र नितिन शांत झाला आणि म्हणाला,"सुधीर अरे विकासला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. लास्ट स्टेज होती. डॉक्टर्सनीसुद्धा कल्पना दिली होती. मी तुला 2-3 वेळा कॉन्टेक्ट करायचा प्रयत्न केला होता. पण तू फारच बिझी होतास."
सुधीर हतबलपणे म्हणाला,"अरे मी परदेशात गेलो होतो रे. पण तू मला काहीतरी कल्पना द्यायचीस न. बर आपण नीतावाहिनीना भेटायला गेल पाहिजे रे. मी आज थोडा गड़बड़ित आहे. आपण उद्या संध्याकाळी जाऊ या. चालेल का तुला?" त्यावर नितिन शांतपणे म्हणाला,"सुधीर मी जातोच वाहिनी आणि अरुणला भेटायला सध्या रोज. तुला किती वाजता जमेल ते सांग."आणि त्याने फोन ठेवला.
दुस-या दिवशी संध्याकाळी नितिन आणि सुधीर दोघे विकासकडे गेले. अरुणने दार उघडले आणि नितिनकड़े बघुन हसला. ते दोघे आत आले. अरुण आतल्या खोलीत निघून गेला. नीता तिथेच बसली होती विकासच्या फोटोकडे बघत. नितिन आणि सुधीर बसले. काय बोलाव कुणालाच सुचत नव्हतं. शेवटी सुधीर म्हणाला,"वाहिनी मला काहीच कल्पना नव्हती हो. नाहीतर मी नक्की वेळ काढला असता आणि येऊन गेलो असतो. निदान माझ्या ओळखीतले स्पेशालीस्ट डॉक्टर्स पाठवले असते. खूप वाईट झाल. विकास मी आणि नितिन बेस्ट फ्रेंड्स होतो. काल पेपरमध्ये बातमी वाचली तेव्हापासून खूप अस्वस्थ आहे मी. शेवटच भेटू पण नाही शकलो मी माझ्या मित्राला. त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही मी." अस महणून सुधीर क्षणभर थांबला आणि मग म्हणाला," वहिनी तुम्हाला जर काही मदत लागली तर नक्की सांगा ह."
नीताने सुधीरकडे बघितल. ती काही बोलणार इतक्यात आतून सर्व संभाषण ऐकणारा अरुण बाहेर आला.
"सुधीर काका. माझ्या वडिलांना योग्य ट्रीटमेंट चालु होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे उपाय करत होतो. माझे मामाच डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टर्सची पण कमी नव्हती. पण माझ्या बाबांना फ़क्त मैत्रीचा ओलावा हवा होता. नितिनकाका गेले अनेक दिवस एक दिवसा आड़ येऊन बाबांबरोबर बसायचे. गप्पा मारायचे. काकांची यायची वेळ झाली की बाबा नितीनकाकांची वाट बघत असायचे. आम्हाला त्यांनी तस कधीच म्हंटल नाही. पण आम्हाला दिसत होत की त्यांच्या मनात तुम्हाला भेटायची खूप ओढ होती. पण आपल्यामुळे कोणाच काहीही अडू नये; हा त्यांचा स्वभाव होता. आजही आम्हाला काहीच मदत नको आहे. कारण त्यांना त्यांचा आजार कळल्यानंतर त्यांनी आमची योग्य ती सोय करून ठेवली आहे. मी अजुन लहान आहे मान्य आहे. पण माझा क्लेम माझ्या बाबांच्या जागी त्यांच्या नोकरीत रहाणार आहे; तसा पत्रव्यवहार त्यांनी करून ठेवला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. माझी आई प्रायवेट फर्ममध्ये नोकरी करते आहे. त्यामुळे आम्हाला पैशाची चणचण नाही जाणवणार. बाबांनी चांगल्या इन्वेस्टमेंट्स केल्या होत्या. त्यामुळे भविष्याची चिंता देखील नाही काका. त्यांनी मलाही सांगून ठेवल आहे की जर मला वेगळ काही करियर करायचं असेल तर मी ते जरूर केल पाहिजे. त्याना ते जमल नाही, कारण त्यांच्यावर वडीलांनतर घराची जवाबदारी होती. पण माझ्या सुदैवाने मला ती काळजी नाही आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही.
काका, फक्त एकच सांगतो.... मला माहित आहे लहान तोंडी मोठा घास वाटेल तुम्हाला; पण तुम्ही आत्ता येऊन जे बोलता आहात त्यापेक्षा तुम्ही जर बाबा असताना एकदा तरी आला असतात न तर त्यांना खूप बर वाटल असत. तुम्ही तुमची एखादी खूप महत्वाची मीटिंग केली नसतीत तर अजुन 15 वर्षानी ते कोणालाही लक्षात राहणार नव्हतं. पण मी आयुष्यभर हे लक्षात ठेविन की माझ्या बाबांनी ज्यांच्यावर मित्र म्हणून मनापासून प्रेम केल ते सुधीरकाका माझ्या वडिलांना एकही संध्याकाळ देऊ शकले नाहीत त्यांच्या शेवटच्या दिवसात. अर्थात हे माझ मत झाल. माझ्या बाबांनी नक्कीच तुम्हाला कधीच माफ केल असेल."
त्याच बोलण ऐकून सुधीरचा चेहेरा उतरला. त्याक्षणी त्याला भावना... प्रेमाचा ओलावा... याचा अर्थ जाणवत होता. कालपासून त्याच्या मनात विकासच्या खूप आठवणी दाटून आल्या होत्या. त्याला ते सगळ अरुणला सांगाव अस मनातून वाटत होत. पण त्याच्या लक्षात आल की आता खरच खूप खूप उशीर झाला होता. त्याचा विकास त्याला सोडून गेला होता.... त्याची वाट बघत गेला होता.... आज सुधीरला जाणवत होत की एक्स्पर्ट डॉक्टर्सचा ताफा उभा करण अवघड नसत. पण हृदयाच्या जवळ जी असतात त्यांच्या भावना समजून घेण आणि सांभाळण जास्त महत्वाच असत. त्याला नीता वाहिनीची माफी मागायची होती. त्याला अरुणला जवळ घ्यायचं होत. त्याच्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायची होती. पण सुधीरने काहीच केल नाही.... आज अरुण जे बोलला त्या सत्याचा विचार त्याच्या मनात आला. तो काहीही न बोलता तिथून बाहेर पडला.
-----------------------------------------------------------------------------------------.
Nice story. Beautifully crafted.
ReplyDeleteThank u
ReplyDeleteनिशःब्द झालोय या क्षणी!!!मी उद्याच माझ्या मित्रांना call करणार!!!! एकदम तीव्रतेने त्यांच्या स्मृती जागवल्या गेल्या.....Thank You...
ReplyDelete