Friday, December 2, 2022

Best Of Luck

 Best of Luck


एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या लॉबीमध्ये अनेकजण इंटरव्ह्यू देण्यासाठी बसले होते. प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती आणि ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मात्र त्यातली एक मुलगी सतत मोबाईलमध्ये बघत काहीतरी बोलत होती. निमिष दुरून हे सगळं बघत होता. मध्ये असलेल्या काचेच्या पार्टीशनमुळे त्याला कळत नव्हतं ती कोणाशी बोलते आहे. पण इंटरव्ह्यू द्यायला आली असूनही व्हिडीओ कॉलवर हसत बोलणारी ती त्याला खूप आवडली. आज दिवसभर इंटरव्ह्यू चालणार होते; हे एकुण आलेल्या गर्दीवरून निमिषच्या लक्षात आलं होतं. तिचा नंबर उशिरा लागावा असं तो मनातल्या मनात सतत म्हणत होता... 'किमान तेवढा वेळ ती दिसत राहील;' एक चुकार विचार त्याच्या मनात येऊन गेला आणि तो हसला.

अबोल निमिषला स्वतःशीच हसताना बघून अमेय त्याच्या टेबलाजवळ आला आणि बाहेरच्या गर्दीकडे बघत त्याने हसत पण डोळ्यांनीच निमिषला 'काय?' म्हणून विचारलं. निमिष ओशाळला आणि 'कुठे काय?' असं खांदे उडवून दाखवून मान खाली घालुन कामाला लागला. अमेय गेल्यावर निमिषची नजर चुकारपणे परत तिच्याकडे वळली. ती अजूनही फोनवर बोलत होती..... हसत होती; मध्येच लॉबीमध्ये तिचा फोन फिरवत होती.

'बहुतेक लांबून आली असावी. आई किंवा वडिलांशी बोलत असेल.' निमिषच्या मनात आलं.

"बॉयफ्रेंड असू शकतो हं."

निमिष एकदम दचकला आणि त्याने समोर बघितलं. समोर अमेय हसत उभा होता.

"काय? कोणाचा? तिचा? तुला काय माहित? I mean.... कोणीही असुदे. मला काय त्याच?" निमिष म्हणाला आणि अमेय खो खो हसायला लागला. निमिषच्या चेहेऱ्यावर देखील हसरे भाव आले.

"साल्या... मी कधीपासून बघतो आहे; तुझी नजर तिच्यावरून हलत नाहीय. क्या मामला है?" अमेयने निमिषच्या टेबलावर बसत विचारलं.

"कसला मामला यार? उगाच काहीतरी बोलू नकोस." निमिष अमेयकडे बघायचं टाळत म्हणाला.

"फोकट मे दिल मत लगाना यारा... पेहेले समझ तो ले कौन है? कैसी है? और सबसे बडी बात.... मगासपासून जर ती फोनवर बोलते आहे; तर कोणाशी बोलते आहे. नाहीतर तुझ्यासारखा अबोल आशिक म्हणजे जीव गुंतेल आणि मग गाठ सोडवणं देखील अवघड होईल." अमेयचा आवाज अजूनही चेष्टेचा होता.

"अबे... असं काही नाही आहे. सोड न यार. चल लंचला जाऊया." असं म्हणत निमिष उठला आणि अमेय सोबत कॅन्टीनमध्ये गेला.

निमिष परत आला आणि कामाला लागला. पण त्याची नजर सतत बाहेर जात होती आणि देवाने देखील त्याचं ऐकायचं ठरवलं होतं... कारण ती अजूनही तिथेच होती. अर्थात अजूनही ती फोनवर बोलत होती. अगदी पाचच्या सुमाराला तिचा नंबर लागला आणि ती आत गेली.... मग मात्र ती निमिषला दिसलीच नाही.

..... आणि मग अचानक ती त्याच्याच फ्लोरवर त्याला दिसली. बहुतेक आजच जॉईन झाली होती. निमिषला ती दिसली कारण ती परत एकदा एकूण ऑफिस कोणालातरी दाखवत होती.... तिच्या मोबाईलमधून.

"आयला... लकी आहेस यार. ती बघ तुझी मोबाईल गर्ल." अमेय निमिष जवळ येत म्हणाला.

"ए गप हा. उगाच तुझी वगैरे म्हणू नकोस. कोणी ऐकलं तर काय म्हणतील? आणि तिला कळलं तर? मला फुकटचे गैरसमज नको आहेत." निमिष तिच्याकडे बघत पण अमेयला म्हणाला. अमेय हसला आणि त्याच्या टेबलाकडे जाताना म्हणाला; "ए गुमसुम आशिक.... सांभाळून. नक्की कोणीतरी आहे तिच्या आयुष्यात. बघ! आत्ता देखील ती व्हिडीओ कॉलवर आहे."

निमिषने अमेयला डोळे मोठे करून दाखवले आणि तो त्याच्या कामाला लागला. लंचची वेळ झाली आणि निमिष त्याचा डबा घेऊन कँटीनमध्ये गेला. ती एका बाजूला बसली होती. परत एकदा तिचा व्हिडीओ कॉल सुरू होता. ती हसत होती.... कँटीन दाखवत होती.....

"इतकं सतत कोणाशी बोलते ही?" निमिषच्या मनात आलं. तिच्यापासून काहीसं लांब बसून डबा खाताना त्याचं लक्ष सतत तिच्याकडे जात होतं. ती मात्र स्वतःमध्ये आणि तिच्या फोनमध्ये मशगुल होती.

दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होती. निमिष निघायची तयारी करत होता. आतापर्यंत त्याच्या लक्षात आलं होतं की ती सतत कोणाशीतरी बोलते. याचा अर्थ नक्कीच आई-वडील नाहीत..... मग? हम्मम! त्याने तिच्याकडे बघायचं नाही असं ठरवून टाकलं होतं.

"तुला कळलं की नाही? चांदनीला वॉरनींग मिळाली आहे आज." अमेय निमिष जवळ येत म्हणाला.

"कोण चांदनी?" निमिष गोंधळून म्हणाला.

"अबे फोकट के आशिक.... तुझ्या मोबाईल गर्लचं नाव देखील तू शोधलं नाहीस?" अमेय वैतागत म्हणाला.

निमिष एकदम चमकला आणि तिच्या दिशेने बघत म्हणाला; "चांदनी? ओह! म्हणजे मराठी नाही का ती?"

"आयला! मी काय सांगतो आहे.... हा काय बोलतो आहे? नाही! ती मराठी नाही आणि ती तुला सूट होईल अशी देखील नाही." अमेय म्हणाला.

"म्हणजे?"

"अरे ती सतत फोनवर बोलते ते तिच्या बॉयफ्रेंडशी नाही..... ती सतत फेसबुक लाईव्ह असते. त्याचीच वॉरनिंग मिळाली आहे तिला आज." अमेय म्हणाला आणि तिथून निघाला.

निमिषने चमकून चांदनीच्या दिशेने बघितलं. तिचा चेहरा उतरला होता. ती तिचं टेबल आवरून निघायच्या तयारीत होती.... इतक्यात तिला आत कॉन्फरन्स रूममध्ये बोलावल्याच निमिषने बघितलं. इतर सगळे निघत होते; पण निमिष मात्र थांबला.

कॉन्फरन्स रूम मधून बाहेर आलेली चांदनी कोणीतरी वेगळीच असावी इतकी बदलली होती. तिचा हसरा चेहेरा.... एकूण सळसळता उत्साह एकदम गायब झाला होता. ती तिच्या टेबलाकडे आली आणि तिची बॅग उचलून लिफ्ट जवळ गेली. निमिष हे सगळं लांबून बघत होता. 'बहुतेक मोठं फायरिंग मिळालं असावं;' त्याच्या मनात आलं. तिच्याशी बोलून तिचं मन हलकं करावं असा विचार करून तो देखील निघाला.

निमिष लिफ्ट जवळ पोहोचला. चांदनी जवळ जाऊन तिला बरं वाटेल असं काहीतरी बोलण्यासाठी तो शब्दांची जुळवाजुळव करत होता.... आणि त्याच्या कानावर चांदनीचा आवाज पडला.

"Hey friends.... this is Chandanee with double 'E'. दोस्तांनो मी उद्या पासून ऑफिसच्या वेळात तुमच्याशी बोलू शकणार नाही. कारण मला सॉलिड फायरिंग मिळालं आहे. खरं तर सोशल मीडिया म्हणजे आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.... पण दुर्दैवाने अजून याची जाणीव सगळ्यांना झालेली नाही. त्यामुळे ऑफिसचं काम सांभाळून देखील मी फेसबुक लाईव्ह करू शकते हे माझ्या बॉसला मान्य नाही. बरं! Friends bye for a while. Am entering lift. Catch u in a while." चांदनीने तिचा फोन बंद केला आणि तिचं लक्ष बाजूला गेलं. तिच्या बाजूला निमिष उभा होता; पण तो तिच्याकडे थेट बघणं टाळत होता.

चांदनीला निमिष एकदम आवडून गेला.

"हाय. मी चांदनी." त्याच्याकडे थेट बघत चांदनी म्हणाली.

तिच्या असं पटकन बोलण्याने निमिष गोंधळाला. कारण तो अजूनही मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता.

"हाय... I know you." निमिष म्हणाला.

"How come?" चांदनी.

"अरे आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतोय. मी तुला इंटरव्ह्यूच्या दिवशीच बघितलं होतं. काल जॉईन झालीस न तू?" तो म्हणाला.

"ओहो! माझा ट्रॅक ठेवतो आहेस की काय?" खळखळून हसत चांदनी म्हणाली. तिच्या त्या बोलण्याने निमिष एकदम बावचळून गेला.

"अं? नाही नाही! मी आपलं सहज...."

त्याच्या गोंधळलेल्या चेहेऱ्याकडे बघून चांदनीला अजूनच हसायला आलं.

" अरे चिल चिल. मी तुला फासावर नाही लटकवणार." ती म्हणाली.

निमिष हसला आणि म्हणाला; "तू तर मस्त मराठी बोलतेस ग."

"मी मराठीच आहे." चांदनी हसत म्हणाली.

"अरे? हो का? मला वाटलं...." निमिष पुढे काही बोलणार तेवढ्यात चांदनी म्हणाली; "ओह... चांदनीमुळे गोंधळालास का? अरे माझं खरं नाव चंदना आहे. पण चांदनी happening नाव वाटलं म्हणून मी सगळीकडे चांदनी नाव लावते."

"ओह! तुझं तूच नाव बदललंस?" आश्चर्य वाटून निमिषने विचारलं.

"हो! का? काय हरकत आहे?" तिने प्रति प्रश्न केला.

"हरकत काहीच नाही. पण तुझ्या आई-बाबांनी...."

"हे बघ. मला वाटलं की चंदना प्रमाणे झिजण्यापेक्षा चांदनी प्रमाणे आकाशात राहून लुकलुकण जास्त सुंदर आहे. मी माझं मत आई बाबांना पटवलं. त्यांनी मान्य केलं आणि मी माझं नाव ऑफिशियली बदललं." चांदनी म्हणाली.

"ओह! क्या बात है." निमिष म्हणाला.

इतक्यात लिफ्ट आली आणि दोघेही निघाले.

$$$

निमिष आणि चांदनीची मैत्री म्हणजे ऑफिसमधला चर्चेचा विषय झाला होता. चांदनीचं सोशल मीडिया वरचं प्रेम पहिल्याच आठवड्यात सर्वश्रुत झालं होतं; आणि गंम्मत म्हणजे निमिषचं कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर अकाउंट नव्हतं. तरीही दोघांमध्ये एक सुंदर नातं फुलत होतं.

त्यांच्या मैत्रीला आता सहा महिने झाले होते. दोघेही एकत्र येत ऑफिसला आणि एकत्रच निघत. निमिष एकटाच राहात होता. चांदनी तिच्या दोन मैत्रिणींबरोबर राहात होती.

त्यादिवशी चांदनीची बराच वेळ वाट बघून निमिष थोडा उशिराच ऑफिसला पोहोचला. त्याच्या नंतर काही वेळाने चांदनी आली. निमिषला एक मीटिंग अटेंड करायची होती. त्यामुळे तो तिच्याशी बोलू शकला नाही. पण चांदनीचा उतरलेला चेहेरा मात्र त्याच्या लक्षात आला होता.

"काय झालं ग?" लंचच्या वेळी चांदनीला गाठत निमिषने विचारलं.

"निमिष... एक मोठ्ठा प्रॉब्लेम झाला आहे." चांदनी डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

"काय झालं चांद?" निमिषने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.

"अरे आज माझ्या फ्लॅट मेट्स सोबत माझा मोठा वाद झाला. म्हणजे मी तयार होऊन निघणार होते... पण थोडा वेळ होता तर मी फेसबुक लाईव्ह केलं. इतक्यात प्रिया अंघोळ करून बाहेर आली आणि माझ्या मागे उभी राहिली. मला लक्षात आल्या क्षणी मी ऑफ लाईन गेले. पण काही सेकंदांसाठी टॉवेल गुंडाळलेली ती माझ्या लाईव्हमध्ये दिसली. त्यावरून तिने मोठा हंगामा केला यार. रिनाने देखील तिलाच सपोर्ट केलं." चांदनीने निमिषला सकाळची घटना सांगितली.

"मग?"

"मग काय? त्यांनी मला आजच फ्लॅट सोडायला सांगितलं आहे." चांदनीच्या डोळ्यातलं पाणी ओघळलं.

"ओह! मग आता तू काय करणार आहेस?" निमिषने काळजी वाटून विचारलं.

"तेच तर माहीत नाही. मी ओनरला देखील फोन लावला होता. पण त्याअगोदरच प्रिया त्यांच्याशी बोलली होती. प्रिया आणि रिना मिळून माझा भाड्याचा हिस्सा देणार आहेत. त्यामुळे ओनर म्हणाले तुमचं तुम्ही बघा. काय करू रे आता?" चांदनी एकदम हतबल झाली होती.

"चांद... एक सांगू? गैरसमज करून घेणार नसलीस तरच हं." निमिष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"Come on निमिष. तू काही सांगितलंस तर मी का गैरसमज करून घेईन?" चांदनी म्हणाली.

"हे बघ! मी एकटाच राहातो. तसा माझा फ्लॅट लहानच आहे. बेडरूम एकच आहे. पण तू राहा बेडरूम मध्ये. मी हॉल मध्ये झोपत जाईन." निमिष म्हणाला आणि चांदनीने ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये आहोत हे विसरून एकदम निमिषला मिठीच मारली.

$$$

आता फक्त ऑफिसमधल्या लोकांनाच नाही तर निमिष आणि चांदनीच्या घरच्यांना देखील माहीत होतं की ते दोघे एकत्र राहात आहेत. घरच्यांची काहीच हरकत नव्हती; कारण निमिषच्या डोळ्यातलं चांदनीबद्दलचं प्रेम अगदी स्पष्ट दिसत होतं. चांदनीचा तर प्रश्नच नव्हता. तिच्या प्रत्येक फेसबुक लाईव्हमध्ये तो दिसतच होता.... त्यावरून सगळं समजत होतच की.

चांदनी अनेकदा त्यांचे स्पेशल मोमेंट्स देखील फेसबुक लाईव्ह करायची. निमिषला ते फारसं रुचत नव्हतं. तो अधून मधून तिला हे सांगायचा.

एकदा दोघे फिरायला गेले होते. नरिमन पॉईंटची ती शांत सुंदर संध्याकाळ होती. निमिषच्या मनात चांदनीला प्रपोज करायचा विचार होता. पण चांदनी फेसबुक लाईव्ह वरून तिच्या त्या so called चाहत्यांना सूर्यास्त दाखवत होती. निमिष काहीसा वैतागला.


"चांद.... मला तुझं सोशल मिडियावर सतत असणं फारसं आवडत नाही. But after all that's your choice. So I won't say anything. पण आपले दोघांचे असे खास क्षण तरी फक्त आपलेच असावेत असं मला वाटतं. त्यावेळी तू नको करत जाऊस फेसबुक लाईव्ह." निमिषने एकदा न राहून चांदनीला सांगितलं.

"अरे निमिष... असं काय करतोस? असे रोमँटिक मोमेंट्स बघायला सगळ्यांना खूप आवडतं. तुला माहीत आहे न; आपण एकत्र राहायला लागल्यापासून माझे फॉलोअर्स कितीतरी पटींनी वाढले आहेत. त्यांच्यासाठी करावं लागतं रे हे सगळं." चांदनी म्हणाली.

"अग, पण का करायचं हे असं दुसऱ्यांसाठी?"

"अरे... याचा उपयोग नक्की होईल बघ कधीतरी. मला खात्री आहे. माझे फॉलोअर्स मिलिअन्स झाले आहेत. नक्की कोणती तरी ऍड एजन्सी मला कॉन्टॅक्ट करेल बघ." चांदनी म्हणाली.

"पण ते सगळं का? आपली चांगली नोकरी आहे. सेटल आहोत आपण. घर आहे.... आपल्या घरचे देखील समजूतदार आहेत. मग आपण...." निमिष काहीतरी बोलणार होता पुढे; पण चांदनीने एकदम फेसबुक लाईव्ह सुरू केलं....

"हाय माय डिनर फॅन्स... this is Chandanee with double 'E' once again. And guess what? Here is my boyfriend... who's saying something very special to me.... Sooooooo.... Nimish... what is it that you want to tell me?

असं म्हणून चांदनीने निमिषच्या दिशेने मोबाईलचा कॅमेरा फिरवला आणि ती एकदम गोंधळून गेली. कारण.... कारण तिला निमिष दिसला.... पण तो तिच्यापासून लांब जाताना!!!

समाप्त

No comments:

Post a Comment