अनाहत सत्य
भाग 25
"कोणी तटाच्या बाहेर पडू शकणार नाही; याचा अर्थ...." गोविंद अस्वस्थपणे म्हणाला.
"याचा अर्थ अपाला देखील या तटाच्या बाहेर येऊ शकणार नाही. अर्थात मुळात ज्या दिवशी भागीनेय तीक्ष्णा महाराजांच्या हाती ही निर्मिती सुपूर्द करणार आहे त्या दिवसापर्यंत भूतप्रमुख आपल्याला इथे थांबू देतील का?" अपालाने प्रश्न केला.
"म्हणजे?" गोविंदला तिच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही.
"राजकुमार, आमचे मागील अनुभव सांगतात की ज्यावेळी त्याकाळातील मानवाच्या हातात आम्ही निर्माण केलेली निर्मिती सोपवण्याची वेळ येते त्यावेळी त्या निर्मितीमध्ये सहभागी असणारे कोणीच तिथे नसते. स्वनिर्मितीमध्ये कोणीही गुंतून पडतो हे सर्वनाशी सत्य आहे. मग ती निर्मिती सजीव असो किंवा निर्जीव. एक केवळ माता.... हे सन्माननिय भावविश्व सोडलं तर इतर कोणतीही निर्मिती करणारे स्वनिर्मिती स्वतः च्या ताब्यात ठेऊ इच्छितात. कदाचित अशी स्वत्वाची भावना घातक ठरू शकते. म्हणूनच आम्ही अगदी मोजके सोडलो तर कोणालाही थांबायची परवानगी नसते. आजवरच्या माझ्या अनुभवामध्ये अपाला शेवटापर्यंत थांबते. परंतु यावेळी कदाचित सगळंच बदलून जाईल. भागीनेय तीक्ष्णा भूतप्रमुखांकडून परवानगी घेऊन अपालाची रवानगी देखील अगोदरच करेल. जेणेकरून तुमची आणि तिची भेट शेवटच्या दिवशी होणार नाही." भीमा म्हणाला.
"मग यावर काहीतरी उपाय असूच शकतो न भीमा?" गोविंद अस्वस्थपणे म्हणाला.
"नाही राजकुमार. यावर कोणताही उपाय नाही. कारण आजवर कोणीही कधीही भूतप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात गेलेलं नाही." भीमा म्हणाला.
"पण म्हणून कोणी कधी जाणार नाही असं देखील नाही भीमा." अपाला म्हणाली. भीमा आणि गोविंद दोघांनी एकाचवेळी अपालाकडे वळून बघितलं. दोघांच्याही डोळ्यात आश्चर्य होतं.
"काय?" दोघेही एकाच वेळी म्हणाले.
"अपाला तुला कळतं आहे का तू काय बोलते आहेस ते?" भीमाने प्रश्न केला.
"असं होऊ शकत अपाला?" गोविंदचा प्रश्न होता.
अपाला त्या दोघांकडे बघून हसली आणि म्हणाली; "भीमा, मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मला कळतं आहे मी काय म्हणते आहे. गोविंद.... हो! असं होऊ शकतं. परंतु हे करत असताना मोठी संकटं येऊ शकतात. मुळात हे करण्यासाठी भीमा तुझी अतूट साथ आवश्यक आहे."
"अपाला, तुझ्यासाठी मी काहीही करीन.... आणि तुला देखील हे माहीत आहे." भीमा म्हणाला.
"भीमा, मी तुला भूतप्रमुखांच्या विरोधात जाण्यासाठी सांगते आहे; हे तुझ्या लक्षात आलं आहे का?" अपालाने अत्यंत शांत आवाजात म्हंटलं आणि भीमा एकदम अंतर्मुख झाला.
"तुझ्या मनात नक्की काय आहे अपाला?" गोविंदने विचारलं.
"ठीक! मी माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला सांगते. त्यानंतर आपण असं काही करू शकतो का; याचा विचार तुम्ही दोघे वयक्तिक पातळीवर करा... आणि तुमच्या मनात निर्णय पक्का झाल्यावर आपण परत एकदा बोलू." अपाला म्हणाली.
"अपाला, माझ्या मते आपण आज आत्ताच जो निर्णय असेल तो घेऊया. कारण त्याप्रमाणे पावलं उचलणं आपल्याला सोपं जाईल असं मला वाटतं." गोविंद म्हणाला. भीमाने देखील त्यावर होकारार्थी मान हलवली.
"ठीक. तर माझ्या मनातील विचार तुम्हाला सांगते. भीमा म्हणाला ते मला देखील मान्य आहे. कदाचित भागीनेय तीक्ष्णा मला यावेळी थांबू देणार नाही. त्यासाठी ती भूतप्रमुखांशी बोलणं नक्की करेल. त्यांचा आदेश जर असेल तर मला देखील इतरांसोबत इथून वेळे आधी निघावं लागेल. पण मुळात जर आपण भागीनेय तीक्ष्णाची थोडी दिशाभूल केली तर? या दोन दिवसांमध्ये गोविंद आणि मी आमच्यामध्ये बेबनाव होईल; अशा प्रकारे आम्ही वाद निर्माण करू. त्यानंतर गोविंदने तो नगर प्रवेशास तयार आहे हे नाथाकडून महाराजांना कळवायचं. जेणेकरून राजकुमारांच्या नगर प्रवेशाची तयारी सुरू होईल. या निर्णयामुळे कदाचित महाराज भागीनेय तीक्ष्णाला नवनिर्मिती हस्तांतरण पुढे करण्यास सांगतील. यामुळे आपल्याला थोडा जास्त अवधी मिळू शकतो. पण मी ज्या तीक्ष्णाला ओळखते ती तीक्ष्णा; यागोष्टीला तयार होणार नाही. माझा आजवरचा अनुभव सांगतो की राजकुमारणांच्या नगर प्रवेशाला देखील ती या हस्तांतरणाशी जोडेल. जर असं झालं तर आपल्याला दुसरा मार्ग अवलंबायला लागेल." इतकं बोलून अपाला थांबली.
"अपाला, तुझ्या मनातला दुसरा मार्ग केवळ अवघडच नाही तर अत्यंत धोकादायक देखील आहे." भीमा थेट तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.
अपाला तिच्या बसलेल्या जागेवरून उठली आणि भीमाच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने त्याचे प्रचंड मोठे बाहूंना आपल्या दोन्ही हातांनी विळखा घातला आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत भावपूर्ण आवाजात म्हणाली; "भीमा, इथेच तर तुझी परीक्षा आहे."
भीमाने अपालाचा नाजूक चेहेरा त्याच्या दोन्ही हातात धरला. क्षणभरासाठी अपालाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण तिने ते डोळ्यातून ओघळू दिलं नाही. भीमा आणि अपाला काही क्षण जणूकाही या जगातच नव्हते. भीमा भानावर आला आणि तो अपाला पासून दूर झाला. अपाला देखील भानावर आली आणि तिने वळून गोविंदकडे बघितलं. गोविंद अत्यंत समजूतदारपणे दोघांच्या त्या भावस्पर्शी अबोल बोलण्याकडे बघत होता. अपालाने वळून बघताच तो तिच्याकडे बघून समंजस हसला..... मात्र दूरवर कुंजर सोबत खेळणाऱ्या नाथाला घडणारा एकूण प्रकार अत्यंत चुकीचा वाटला होता.
"मला काही कळू शकेल का अपाला?" गोविंदने हळुवारपणे प्रश्न केला.
"राजकुमार, माझी परीक्षा असेल कारण भागीनेय तीक्ष्णा तुमचा नगर प्रवेश आणि हस्तांतरण दोन्ही जर जोडू शकली तर आपण तिची दिशाभूल करण्यासाठी ठरवलेली योजना यशस्वी तर होणारच नाही; पण परिस्थिती संपूर्णपणे तिच्या हातात जाईल." भीमा म्हणाला.
"म्हणजे नक्की काय होईल भीमा?" गोविंदने विचारलं.
"नगर प्रवेशाच्या निमित्ताने ती तुम्हाला आणि नाथाला इथून दूर करेल. त्यानंतर ती भूतप्रमुखांशी बोलून अपालाचं परतण नक्की करेल आणि त्याबरहुकूम ते होतं की नाही याकडे जातीने लक्ष देईल. मी तयार केलेली तटरक्षक भिंत स्वतः तपासेल आणि मगच महाराजांना आमंत्रित करेल. तुम्ही नसल्याने आम्हाला तुमच्या बाजूने मिळणारी मदत बंद होईल. जर अपालाने इथून जाण्याचा दिवस हस्तांतरणाच्या बराच अगोदर ठरला तर तिला त्या दिवसापर्यंत लपून रहाणे अवघड होईल. यासर्व घटनांमध्ये भागीनेय तीक्ष्णाचा विश्वास संपादन करून मलाच जे करणं शक्य असेल ते करावं लागेल." भीमा म्हणाला.
"म्हणजे एकूण मार्ग आहे ..... पण त्यावर चालणे शक्य नाही; असं तुम्हाला दोघांना म्हणायचं आहे." हताश होत गोविंद म्हणाला.
"तसंच काहीसं. पण तरीही जोखीम तर उचलावीच लागेल. तुम्ही दोघे एकत्र येणं ही आता केवळ तुमची इच्छा नाही; राजकुमार तो माझा देखील आग्रह आहे. एकदा गोठवून घेतल्यानंतर आजवर आमच्यापैकी कोणीच भावनेचा विचार केलेला नाही. आम्ही हृदयशून्य तर होत नाही आहोत न... असा विचार अलीकडे मला सतत सतवायचा. विशेषतः अपालाकडे बघितलं की तर फारच." इतकं बोलून भीमा थांबला आणि त्याने अतीव प्रेमाने अपालाकडे बघितलं. तो पुढे बोलायला लागला; "राजकुमार, तुम्हाला खरी अपाला अजूनही कळलेलीच नाही. पण तिला स्वतःला देखील ती किती ओळखते हा माझ्या मनातला कायमचा प्रश्न आहे. असो! पण आज जेव्हा मी तिला तुमच्या सोबत बघतो; त्यावेळी तिच्या चेहेऱ्यावरचं समाधान आणि पूर्णत्व किती मोलाचं आहे ते मला जाणवतं. तिच्याकडे बघितलं की वाटतं गोठवून घेण्यापेक्षा हे असं भावनिक असणं सुंदर असावं. त्यामूळे तिच्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे."
गोविंद उठला आणि भिमाजवळ गेला. "भीमा, मला तुमच्यातले बंध कळणं अशक्य आहे; पण ती भावना मी समजू शकतो. मला त्यातील पवित्रता समजते आहे. त्यामुळे माझ्या मनात कोणतीही शंका नाही. खरंच! इतकं निर्व्याज आणि पूर्णाहुती देऊन एखाद्या व्यक्तीविषयी ममत्व मी आजवर बघितलं नाही. बर, पण आता मी जे बोलतो आहे ते फक्त आपल्या तिघांमध्ये असलेलं बरं... यापुढे आपण तिघे निवांत गप्पा मारतो आहोत असं एकदाही होणं योग्य नाही... असं उठून तुमच्या जवळ येण्याचं हे देखील महत्वाचं कारण आहे." असं म्हणून त्याने भीमाला मिठी मारली. भीमाने देखील गोविंदला आलिंगन दिलं.
दुर्दैवाने त्यावेळी नाथा तिथून निघून गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर अपाला आणि भीमा हे भावनिक बांधनाने जवळ आले होते आणि राजकुमार ते पाहात होते... हेच सत्य तो समजत होता.
...... आणि तीक्ष्णाची तीक्ष्ण नजर होणाऱ्या प्रकाराचा वेध घेत होती.
***
दुसऱ्या दिवशी कुंजर आणि गोविंद खेळत असताना अपाला त्याच्या दिशेने आली आणि कुंजरचा हात धरून त्याला तिथून घेऊन जाताना म्हणाली; "राजकुमार, कुंजरमध्ये माझ्या रक्ताचे जे गुण आहेत त्याविषयी मला भूतप्रमुखांशी बोलायचं आहे. त्यासाठी कुंजरला घेऊन मी दोन दिवसांसाठी इथून जाते आहे. तरी आपण याविषयी मला फार प्रश्न विचारू नका."
"पण अपाला...." गोविंदने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. पण अपाला काहीएक न ऐकता कुंजरला घेऊन तिथून निघून गेली.
दूरवर उभी राहून तीक्ष्णा होणारा प्रकार बघत होती. ती केवळ हसली आणि तिथून निघून गेली.
***
"भीमा, तुझी तयारी कितपत झाली आहे?" तीक्ष्णाने भीमाला बोलावून घेऊन प्रश्न केला.
"भागीनेय, तुम्ही सांगितल्या दिवसापासूनच मी कामाला सुरवात केली आहे. आपण मला जर योग्य दिवस संगीतलात तर त्याप्रमाणे मी माझ्या कामाचा वेग वाढविन." तीक्ष्णाने विचारलेल्या प्रश्नाला बगल देत भीमा म्हणाला.
"ठीक... मग पुढील माहातील पौर्णिमा नक्की. मी आज महाराजांसोबत बोलणं करण्यास जाणार आहे. त्यावेळी मी त्यांना हा दिवस योग्य वाटतो का ते विचारते." तीक्ष्णा म्हणाली.
"योग्य निर्णय भागीनेय तीक्ष्णा." भीमा म्हणाला आणि तिथून निघाला.
***
"महाराज, आपल्या अंत:पुरात येऊन आपणाला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही.... परंतु...." तीक्ष्णा महाराजांच्या अंत:पुरात महाराजांच्या पुढ्यात उभी होती.
"आपण इथे?" महाराज काहीच बोलू शकले नाहीत.
"होय! माफ करा. मात्र एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो आपणापर्यंत आज आणि आत्ताच पोहोचवणे योग्य वाटले म्हणून कोणतीही पूर्व कल्पना न देता मी इथे आपल्या अंत:पुरात येण्याची दृष्टता केली आहे." तीक्ष्णा म्हणाली.
"इतर कोणीही अशी दृष्टता केली असती तर...." महाराज नाराज झाले होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावर ते अगदी स्पष्ट दिसत होतं.
"मला माफ करा महाराज." तीक्ष्णाचा आवाज कमालीचा अपराधी येत होता. केवळ त्या आवाजातील लीनतेमुळे महाराजांचं मन पांघळलं आणि काहीसं मंद स्मित करत ते म्हणाले; "आपल्या कोणत्याही कृतीबद्दल आमची हरकत नाही. कारण आम्हाला खात्री आहे की राज्यासाठी आणि श्रीशंभो मंदिरासाठी योग्य अशीच आपल्या हातून घडेल.
"नक्कीच महाराज. मी आपणास एक अत्यंत महत्वाचा आणि आनंददायी निर्णय सांगण्यासाठी आले आहे." तीक्ष्णा हसत म्हणाली. "महाराज, पुढील मासातील पौर्णिमेच्या दिवशी संध्यासमयी श्रीशंभो मंदिर आणि परिसरातील संपूर्ण नवनिर्मिती आपल्या शुभ आणि सुयोग्य हाती सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
तीक्ष्णाच्या त्या शब्दांनी महाराज मंचकावरून एकदम उठून उभे राहिले. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
"खरंच? ही बातमी आपण देत असताना आपला योग्य तो सन्मान मी करू शकत नाही यासारखी दुःखदायक गोष्ट नाही." महाराज म्हणाले.
"आपण आम्हाला श्रीमंदिर रचनेसाठी परवानगी दिलीत महाराज; याहून मोठा सन्मान असूच शकत नाही आमच्यासाठी. त्यामुळे आपण अजिबात दुःख करू नका. बरं मी येते आता. आपण आराम करावा आणि त्यासुदिनाची तयारी करण्यास प्रारंभ करावात ही विनंती." असं म्हणून तीक्ष्णा मागे वळली. मात्र दोन पावलं पुढे जाऊन परत एकदा महाराजांच्या दिशेने बघत ती म्हणाली; "महाराज, मला खात्री आहे की राजकुमार देखील नगर प्रवेशासाठी तयार होतील... अगदी काही दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत ही बातमी येईल; याविषयी मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही त्या तयारीला देखील लागावंत असा सल्ला मी तुम्हाला देईन. मात्र मी तुम्हाला ही बातमी दिली हे कोणालाही कळू देऊ नका. काही गुपितं ही तुमच्या सोबत केवळ असणं राज्यासाठी योग्य ठरेल असं मला वाटतं." इतकं बोलून तीक्ष्णा झपकन तिथून बाहेर पडली.
तीक्ष्णाच्या दुसऱ्या बातमीने तर महाराजांचा आनंद गगनात मावणं अशक्य झालं. त्यानंतर पहाट होण्याची केवळ वाट बघणं महाराजांच्या हाती होतं.
***
पहाटेच्या पहिल्याच प्रहरी महाराजांच्या अंत:पुरातून आलेल्या निरोपामुळे सुमंत कल्याण गोंधळून गेले होते.
क्रमशः
No comments:
Post a Comment