अनाहत सत्य
भाग 26
"महाराज, केवळ एक माह आहे आपल्या हातात." सुमंत कल्याण काहीसे अस्वस्थ होऊन म्हणाले.
"कल्याण, मला जे माहीत आहे तेच परत सांगू नकोस. दिवस ठरला आहे; हे नक्की. त्यामुळे आपल्याला आता तयारी करणं आवश्यक आहे." महाराज म्हणाले.
"परंतु महाराज, राजकुमार गोविंद यांच्याकडून काहीच खबरबात नाही." सुमंत अजूनही शशांक होते.
"हो! जाणून आहोत आम्ही. परंतु आमच्या मनात विचार आहे की राजकुमार गोविंद यांना देखील त्याच दिवशी नगर प्रवेश करण्यास भाग पाडायचं." महाराज म्हणाले.
"विचार चांगला आहे महाराज. परंतु राजकुमार त्यासाठी तयार होतील का? त्यांच्या मनात नक्की काय आहे; हे अजून आपल्याला समजलेलं नाही." सुमंत म्हणाले.
"कल्याण, तुम्ही स्वतः एकदा जाऊन राजकुमार गोविंद यांची भेट घ्या आणि त्यांच्याशी सर्वच बोलणी स्पष्ट करा. त्यातून योग्य तो मार्ग निघेल. जर काही अडचण आलीच तर आम्ही स्वतः त्यात लक्ष घालू. त्यादृष्टीने बघितलं तर बराच वेळ आहे आपल्या हातात." महाराज म्हणाले. सुमंत कल्याण यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. परंतु ते काहीच बोलले नाहीत. त्यांना माहीत होतं की महाराजांच्या दृष्टीने राष्ट्रकूट घराण्याच्या पराक्रमाच्या सीमा वाढवणं आणि जनतेला एकछत्री सुखी जीवन देणं जास्त महत्वाचं आहे. महाराज त्याच दृष्टीने पुढील तयारी देखील करून घेत होते. म्हणून तर राजकुमारांचा नगर प्रवेश महत्वाचा होता. आपल्या युद्ध प्रयणाची तयारी महाराज करत असताना; आपण त्यांनी दिलेल्या जबाबदारी संदर्भात सतत प्रश्न निर्माण करणे योग्य नाही; याची जाणीव सुमंत कल्याण यांना सतत होत होती.
***
"तुझी खात्री आहे का नाथा? हे बघ... केवळ तू देत असलेल्या माहितीच्या आधारावर राष्ट्रकूट राजघराण्यातील अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत." सुमंत कल्याण अत्यंत काळजी भरल्या आवाजात बोलत होते.
"सुमंत, आपण माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतः साक्ष होतो जे घडत होतं त्याचा. मी दूरवर उभ्या तीक्ष्णाला देखील बघितलं होतं. भीमा आणि अपाला सोबत उभे असलेले तिने देखील बघितले होते." नाथ म्हणाला.
"तुला काय वाटतं नाथा?" सुमंत गोंधळून गेले होते.
"सुमंत, आपण मला कायम सांगत आलात की अपालाने राजकुमार गोविंद यांना भुरळ पाडली आणि वश करून घेतलं. सुमंत, आज सांगतो... मात्र मी त्यावर कधीही विश्वास ठेवला नव्हता. त्याचं कारण देखील माझ्यासाठी खूप स्पष्ट होतं. राजकुमार गोविंद यांच्या सोबत मी सतत इथे राहात होतो. त्यामुळे अपालाचा सहवास देखील मला होता. तिचं त्यांच्या सोबत असतानाचं अस्तित्व इतकं स्वच्छ आणि निर्मळ होतं की तिने करणी करून राजकुमार गोविंद यांना वंश करून घेतलं असेल; यावर माझा विश्वास बसत नव्हता. मूलतः अपाला सारखी हुशार आणि विशेष कार्याची जवाबदारी मिळालेली स्त्री वशीकरण करत असेल हे स्वीकारणे एकूण अवघडच." नाथा अजूनही जे बघितलं त्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. "परंतु सुमंत, आता मात्र माझ्या डोळ्यासमोरील अंधश्रद्धेचा पडदा दूर झाला आहे. सुमंत, मी राष्ट्रकूट घराण्याचा एकनिष्ठ सेवक आहे; याविषयी आपण मनात कोणताही किंतु आणू नये. यापुढे मी आपल्या शब्दाबाहेर नाही." नाथा म्हणाला.
"नाथा, तुझ्या एकनिष्ठेबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही; किंबहुना कधीच नव्हती. मात्र राजकुमार गोविंद यांच्या सोबत राहात असताना मी जे सांगतो आणि तू जे पाहातो आहेस यात मोठी तफावत निर्माण होत होती. अशा वेळी सर्वसाधारण मनुष्यधर्माप्रमाणे तू राजकुमार जे सांगतील त्याबरहुकूम वागशील; हे मला माहीत होतं. त्यामुळे तुझ्या डोळ्यावरील अपालाच्या खोट्या वागण्याची पट्टी सुटणं आवश्यक होतं." सुमंत कल्याण म्हणाले.
"सुमंत, आता मात्र आपण जे आणि जसं सांगाल त्याबरहुकूम मी वागणार आहे. राजकुमार गोविंद यांना इथून सुखरूप बाहेर काढणं हेच माझं जीवित कार्य आहे; याविषयी आपण मनात किंतु आणू नये." नाथा म्हणाला.
सुमंत कल्याण यांच्या चेहेऱ्यावर समाधानाची एक हलकी रेषा उठली... पण ती केवळ क्षणिक होती. सुमंत कल्याण यांचा चेहेरा अत्यंत दगडी झाला आणि कठोर आवाजात ते नाथाला म्हणाले; "नाथा, नीट कान देऊन ऐक आणि पूर्णपणे समजून घे. तीक्ष्णाने अत्यंत योग्य जाळे विणले आहे. सर्वांसमक्ष अपाला आणि तीक्ष्णा एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत; असे चित्र निर्माण झाले आहे. तीक्ष्णाने स्वतः महाराजांची भेट घेऊन पुढील पौर्णिमेचा मुहूर्त योग्य असल्याचं सांगितलं आहे. महाराजांच्या मनात त्याच दिवशी राजकुमारांचा नगर प्रवेश करण्याचा विचार आहे; याची कल्पना तीक्ष्णाला नक्कीच असणार. आपण पूर्णपणे या दोन महत्वाच्या घटनांमध्ये अडकले असताना तीक्ष्णा तिच्या लोकांना इथून हलवणार आणि मग अपालाच्या मदतीने शेवटचा हेतू तडीस नेणार; असा माझा कयास आहे."
"परंतु त्यांचे लोक तर उजळ माथ्याने इथून प्रस्थान करूच शकतात. आम्ही कामासाठी आलो होतो; ते काम पूर्ण झालं आहे तरी आम्ही आता येथून निघतो; इतकं म्हणणं जरी त्यांनी महाराजांसोमोर ठेवलं तरी त्यांचं योग्य आदरातिथ्य करून महाराज त्यांची पाठवणी करतील." नाथा म्हणाला.
"अगदी बरोबर. काही कारण असणार नाथा, की तीक्ष्णाला ते मान्य नाही. नाथा, ज्यावेळी या भव्य निर्मितीचं काम सुरू झालं त्यावेळी तुझा जन्म देखील झाला नव्हता. ही तीक्ष्णा अचानक कुठूनशी प्रकट झाली आणि महाराजांना जाऊन भेटली. तिचा केवळ एक शब्द आणि महाराजांनी मला कक्षा बाहेर जाण्यास सांगितलं. त्या दिवशी आणि त्यानंतर तीक्ष्णा ज्या-ज्यावेळी महाराजांना भेटली त्यावेळी तिने कटाक्षाने मला लांब ठेवलं. तिला महाराजांच्या स्वप्नाबद्दल माहीत होतं. तिने काम हाती घेताना तिचे नियम आणि तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. नाथा, तुला आज इथे अनेक ठिकाणांहून आलेले कारागीर दिसत आहेत. मात्र सुरवातीच्या काळात केवळ तीक्ष्णाने आणलेले कारागीर आणि कामकरी होते इथे. त्यांचं असं स्वतःचं वसतिस्थान त्यांनी निर्माण केलं होतं. त्याकाळातील कामाचा आवाका आणि गति ही पुढील काळात कमी होत गेली... म्हणजेच आपले कारागीर इथे आल्यानंतर त्यांना जे शिकवलं गेलं आणि त्यांनी जे आत्मसाद करून त्यांच्या क्षमतेनुसार जे निर्माण केलं ते तीक्ष्णाने स्वीकारलं. मात्र मूळ श्रीमंदिर निर्मिती तिने केवळ स्वतःच्या हातात आणि स्वतःच्या कामगार आणि कारागीर यांच्या हातात ठेवली. यामागे नक्की काही कारण असणार. अपाला देखील तीक्ष्णा प्रमाणे काम करू इच्छित असावी असा माझा कयास आहे. कारण सुरवातीच्या काळातील त्यादोघींमधील ताळमेळ दृष्ट काढण्याइतपत सुंदर होता. मात्र राजकुमारांच्या आगमनानंतर; ज्याची इच्छा खुद्द तीक्ष्णाने महाराजांकडे व्यक्त केली होती; सगळं बदलून गेलं. हळूहळू करत तीक्ष्णाने अपालाच्या हाताखालील त्यांचे कारागीर आणि कामगार कमी केले आणि त्याजागी आपले लोक नेमले. तरीही अपाला आपलं वेगळं असं कौशल्य दाखवत होती. यासगळ्या कृत्यामागील कारण समजून घेणं अत्यावश्यक आहे. मात्र आत्ता आपल्याला तेवढा वेळ नाही नाथा. आत्ता आपल्याला केवळ राजकुमार गोविंद यांना इथून सुरक्षित रीतीने बाहेर काढायचं आहे आणि महाराज तीक्ष्णा यांची भेट सहज पार पडली पाहिजे." सुमंत नाथाशी बोलता बोलता स्वमग्न देखील होत होते.
नाथाला त्यांच्या एकूण बोलण्याचा पल्ला लक्षात आला नाही. मात्र त्याच्या मनाची खात्री झाली होती की अपालाने राजकुमार गोविंद यांच्यावर काही जादू केली असल्यानेच बहुतेक ते तिच्या आहारी गेले असावेत. त्यामुळे यापुढे केवळ सुमंत जे सांगतील त्याबरहुकूम आपण काम करायचे याचा निर्णय त्याने घेतला होता.
सुमंत काही काळ विचार करत होते आणि त्यानंतर त्यांनी नाथाला जवळ बोलावलं आणि त्याच्याशी अत्यंत खालच्या आवाजात बोलायला सुरवात केली.
***
"भीमा, मला खात्री आहे तुझं काम योग्य प्रकारे सुरू आहे. तरीदेखील या निर्मितीची प्रमुख म्हणून मला संपूर्ण कार्यासंदर्भात समजून घ्यायला आवडेल." तीक्ष्णाने भीमाला बोलावून घेऊन म्हंटलं.
"भागीनेय तीक्ष्णा, आपण म्हणाल त्यावेळी आपणास संपूर्ण माहिती देईन." भीमा अत्यंत सावधपणे शब्द वापरत होता. अर्थात त्याला कल्पना होती की तो अत्यंत तल्लख आणि नावाप्रमाणे तीक्ष्ण अशा तीक्ष्णाशी बोलतो आहे.
तीक्ष्णा हसली आणि म्हणाली; "भीमा, मी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अर्थात या निर्णयांची पूर्तता तुझ्या मदतीशिवाय शक्य नाही. त्यामुळे मला वाटतं आपण दोघांनी संपूर्ण परिसर फिरावा आणि त्यावेळी तू मला तुझ्या शक्ती; त्यांचे चयन आणि व्यवस्थापन सांगावंस असं मला वाटतं."
भीमाला मनातून ही अपेक्षा होतीच. तो हसला आणि होकारार्थी मान हलवत म्हणाला; "भागीनेय, आपण म्हणत असाल तर आत्ताच..."
"अंह... आपण संपूर्ण परिसराची पाहणी उद्या करू." तीक्ष्णा म्हणाली.
"मी प्रत: वेळी तयार असेन." भीमा म्हणाला.
"जरूर." इतकंच बोलून तीक्ष्णा शांत झाली.
ती अजून काही बोलेल म्हणून भीमा थांबला आणि ती काहीच बोलत नाही हे लक्षात आल्यावर तिथून निघाला.
***
"प्रत: समयी?" अपालाने परत एकदा विचारलं.
"हो! तुला याविषयी शंका का आहे अपाला?" भीमाने अपालाला प्रश्न केला.
"कारण भागीनेय तीक्ष्णाने आपल्या लोकांना हलवताना कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही." अपाला म्हणाली.
"मान्य. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. तू तिच्या सोबत नाहीस. त्यामुळे सर्वच निर्णय ती एकटीने घेते आहे आणि त्याबरहुकूम काम करते आहे." भीमा म्हणाला.
"तरीही..." काहीतरी वेगळं होणार आहे असं अपालाचं मन तिला सांगत होतं. मात्र भीमाच्या शाश्वत नजरेमुळे ती शांत होती.
***
"दिवस कलता होत आला आहे भीमा... तू किमान चार वेळा स्वतः तीक्ष्णाला भेटून परिसर दाखवण्याची इच्छा सांगितली आहेस. तरीही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने ते टाळते आहे." गोविंद भीमाच्या शेजारी बसून बोलत होता.
"खरंय तुझं." काहीही लक्षात येत नसल्याने भीमाने केवळ दोन शब्दात विषय संपवला. त्याचवेळी समोरून अपाला येताना दिसली.
"कुंजर कुठे आहे अपाला?" तिला येताना बघून गोविंदने प्रश्न केला. त्याने अपालाला स्पष्ट कल्पना दिली होती की तीक्ष्णा कुंजरचा वापर करून आपल्या दोघांना वेगळं करेल. त्यामुळे कुंजर सतत आपल्या पैकी कोणाकडे असणं आवश्यक आहे.
"नाथा त्याच्या सोबत आहे." अपाला म्हणाली.
"ठीक." गोविंद हसत म्हणाला.
"भीमा...!?" अपालाने भिमाकडे बघितलं.
"अजून काहीही निरोप नाही अपाला." भीमा म्हणाला.
"ती आपला अंत बघते आहे; असं मला वाटतं. भीमा, तीक्ष्णाने भर पर्जन्यकाळात या हसतांतरणाचा निर्णय घेतला आहे; यात नक्कीच काही खास कारण असावं असं मला वाटतं." अपाला म्हणाली.
"हा निर्णय तिचा नाही अपाला. मी स्वतः भूतप्रमुखांशी बोललो आहे. त्यांनी आग्रहपूर्वक हा दिवस निवडला आहे; हा निर्णय त्यांचा आहे. किंबहुना तीक्ष्णाने काहीसा विरोध केला होता या दिवसासाठी असं मला कळलं आहे." भीमा म्हणाला.
"तिने विरोध केला होता? त्याचं कारण कळलं का?" अपालाने अस्वस्थ होत भीमाला विचारलं.
इतक्यात नाथा समोरून येताना दिसला. तो एकटाच येत होता. अपाला एकदम उभी राहिली आणि तिने त्याला विचारलं; "कुंजर कुठे आहे नाथा? आपलं ठरलं आहे की त्याला एकट्याला सोडायचं नाही."
"तो तुझ्या पिताजींबरोबर आहे. ते स्वतः माझ्याजवळ येऊन म्हणाले की तू मला इथे बोलावलं आहेस आणि कुंजर त्यांच्या सोबत रहावा असं तूच सांगितलं आहेस." नाथा म्हणाला.
"माझे पिताजी?" अपाला झटक्यात उभी राहून पळत निघाली. भीमा, नाथा आणि गोविंद देखील तिच्या मागे पळत निघाले. इतक्यात तीक्ष्णा समोर येऊन उभी राहिली. तक्षणी भीमा थांबला. मात्र गोविंद, नाथा आणि अपाला तिथून निघून गेले. गोविंद किंवा नाथावर तीक्ष्णाचा अधिकार नव्हता आणि अपाला तिचं काहीही ऐकणार नाही याची तीक्ष्णाला कल्पना होती. त्यामुळे ती ते गेले त्या दिशेने बघत राहिली; मात्र बोलली काहीच नाही.
"भागीनेय..." भीमाला काय करावं सुचत नव्हतं.
"अं? हं... भीमा... चल; एकदा तुझी रचना बघू." इतकं बोलून तीक्ष्णा चालू पडली.
ती अपाला, गोविंद आणि नाथा गेले होते त्याच्या विरुद्ध दिशेने जाते आहे हे बघून भीमाला काहीतरी घडणार आहे याचा अंदाज आला. जर याक्षणी आपण काही हालचाल केली नाही तर सगळंच हाताबाहेर जाईल याची त्याला जाणीव झाली. त्याने तीक्ष्णाला हाक मारली आणि म्हणाला; "भागीनेय, आपण दुसऱ्या टोकापासून सुरवात करणं योग्य ठरेल."
तीक्ष्णा क्षणभरासाठी थांबली आणि मग अगदी सहजपणे मागे वळून म्हणाली; "काहीच हरकत नाही भीमा. जसं तुला योग्य वाटेल तसं. मात्र मला संपूर्ण माहिती हवी आहे." भीमाने होकारार्थी मान हलवली आणि हलकेच हसला. तीक्ष्णाने देखील स्मित केलं आणि दोघेही अपाला, गोविंद आणि नाथा गेले होते त्या दिशेने निघाले.
तीक्ष्णा आणि भीमा पुढे आले. त्यांच्या समोरच अपाला, गोविंद आणि नाथा उभे होते. अपालाने कुंजरचा हात धरला होता. ते बघताच भीमा स्वस्थ झाला. त्याने तिच्याकडे आश्वासक नजरेने बघितलं आणि तो तीक्ष्णासोबत पुढे निघाला.
***
"भीमा, तुला पूर्ण कल्पना आहे न?" तीक्ष्णाने भिमाकडे बघत प्रश्न केला.
"हो भागीनेय तीक्ष्णा. या जगामध्ये आपण निर्माण केलेली ही तिसरी निर्मिती आहे जिचं रक्षण ही आपली प्रथम जवाबदारी ठरते. विशेषतः आपण निर्माण केलेल्या श्रीमंदिराचा कळस! त्याचं अनन्य साधारण महत्व आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. परकीय तारकासमूहातील साधर्मीय घटकांशी संपर्क निर्माण करण्यासाठीची रचना हाच तर प्रमुख उद्देश आहे या कळसाचा. कालौघात पुढे या कळसाकडे प्रगतनशील मानवाचं दुर्लक्ष होणार आहे... त्यावेळी देखील हा कळस त्याच्या संपूर्ण वैभवासकट टिकला पाहिजे; याची मी पूर्ण काळजी घेतली आहे." भीमा म्हणाला.
बोलत बोलत तीक्ष्णा आणि भीमा श्रीमंदिर मध्य ठेवून निर्माण केलेल्या इतर सौंदर्यपूर्ण लेण्यांच्या उजव्या टोकाला पोहोचले होते.
"भीमा, तुला वाटत असेल की मी अपालाच्या विरोधात आहे..." बराच वेळ शांतपणे चालणारी तीक्ष्णा क्षणभरासाठी थांबली आणि भिमाकडे बघत म्हणाली.
"नाही भागीनेय. मला खात्री आहे की आपण जे निर्णय घेता ते मानव हितासाठी आणि त्याचवेळी आपल्यासोबत असणाऱ्या पूर्व मानवांच्या सुरक्षिततेसाठी योग्य असतात." भीमा म्हणाला.
तीक्ष्णा केवळ हसली आणि म्हणाली; "आपण ठरवलं होतं की आपल्यामध्ये कोणताही शब्दच्छल असणं योग्य नाही. पण दुर्दैवाने आज आपण देखील अशा वळणावर उभे आहोत की एकमेकांवरचा विश्वास डळमळीत झाला आहे." तिच्या त्या शब्दांनी भिमाचं मन द्रवल. पण त्याला काहीही बोलायला वेळ न देता ती पुढे म्हणाली; "असो. तर भीमा, तू तुझ्या कामासंदर्भात माहिती दे."
"भागीनेय, या संपूर्ण परिसराच्या भोवती मी माझ्या सर्वोत्तम शक्तीस्थान असणाऱ्या जीवात्माना कायमस्वरूपी उभं केलं आहे. विशेषतः या पहिल्या काही कक्षांमध्ये, जिथे अपालाने आपल्याला आवश्यक अशा रचना निर्माण केल्या आहेत; त्याठिकाणी सर्वसामान्य मानवाचा वास कमी राहील अशा प्रकारे व्यवस्था केली आहे." भीमा माहिती देत होता. तीक्ष्णा आणि भीमा एक एक कक्ष बघत पुढे सरकत होते.
नवव्या कक्षापाशी ते पोहोचले. ही रचना खूपच खास होती. तीक्ष्णाने महाराजांशी बोलून इथली जागा मागितली त्यावेळी इथे अगोदरच काही गुंफा होत्या. जिथे काही महंत राहात होते. सुरवातीचे कक्ष हे त्या महंतांचे निवासस्थान होते. ज्यामध्ये अपालाने आवश्यक बदल केले होते. मात्र नववी रचना तीक्ष्णाने स्वतः नियोजित करून निर्माण करून घेतली होती. तिच्या सोबत त्यांच्या नगरातून आलेले सर्व प्रमुख कारागीर तिथे राहात होते. त्यांची मुलं अगदी कुंजरच्या वयापासूनच स्वतःच निर्मिती करायला लागली होती. आपले माता-पिता, भावंडं यांच्या प्रतिकृती ती मुलं अत्यंत कुशल हातांनी निर्माण करत होती.
"भागीनेय, ही आपल्या योजनेतील पहिली निर्मिती आहे. अर्थात इथे देखील योग्य ती व्यवस्था केली आहे." भीमा म्हणाला आणि तीक्ष्णाने स्मित केलं. "भीमा, अपालाने केलेल्या कामाचं संरक्षण तू योग्यच करशील याची मला खात्री आहे." ती म्हणाली.
"भागीनेय...." भीमा काहीतरी बोलणार होता. त्याला हाताने थांबवत तीक्ष्णा म्हणाली; "भीमा, मला श्रीमंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याची तू काय व्यवस्था केली आहेस ते समजून घेण्यात जास्त रस आहे. कारण मी माझ्या नजरेने जे बघते आहे; त्यात मला हे दिसतं आहे की फार दूर नाही की या निर्मितीमध्ये काही खंडित होणार आहे."
"ही निर्मिती जर खंडित झाली भागीनेय तर मी माझी शक्ती त्यागीन आणि परत एकदा सर्वसाधारण मानव जन्म स्वीकारीन." भीमा म्हणाला आणि त्याचं बोलणं अत्यंत भावनाहीन चेहेऱ्याने तीक्ष्णाने ऐकून घेतलं. दोघे पुढे निघाले.
मात्र..... भिमाचं लक्ष नसताना तीक्ष्णाने फक्त एकदाच मागे वळून बघितलं होत.....
क्रमशः