Friday, April 30, 2021

हंपी... एक अनुभव (भाग 3)

 हंपी.... एक अनुभव (बॅग 3)


विजयनगर ही राजा कृष्णदेवराय यांची राजधानी होती. सहाजिकच महाराजांच्या इतमामाला शोभेल असाच तामझाम इथे पाहावयास मिळतो. अर्थात हे म्हणत असताना एक सत्य विसरणे शक्यच नाही की माहाराज कृष्णदेवराय अत्यंत सृजनशील राजे होते. त्यांना केवळ उत्तम स्थापत्य निर्माणाची आवड होती असं नसून ते सर्वच क्रीडाप्राकारांचे भोक्ते होते. याची कितीतरी उदाहरणं जागोजागी दिसून येतात. मागील भागामध्ये मी ज्या पुष्कर्णी उल्लेख केला आहे त्या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक अत्यंत मोठा तरण तलाव निर्माण केला आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आंतरराष्ट्रीय तरण स्पर्धेसाठी अत्यंत योग्य असा हा तरण तलाव आहे. ऐंशी फूट लांब आणि किमान पस्तीस/चाळीस फूट रुंद असा हा तरण तलाव आहे. त्याच्या दोन्ही बाजुंना बसण्याची सोय आहे. बहुतेक स्वतः महाराज कृष्णदेवराय देखील या तरण तलावात होणाऱ्या स्पर्धांना भेट देत असावेत. कारण या तरण तलावाच्या एका बाजूला दगडी घुमत असलेली मेघडंबरी आहे. एका नजरेत न मावणारा विस्तार आहे या तलावाचा.

तरण तलावाजवळील मेघडंबरी


तरण तलावाची माहाराज बसत असलेली बाजू


या फोटो वरून तरण तलावाचा अंदाज येऊ शकतो


तरण तलावाच्या एका बाजूला पुष्कर्णी आहे आणि त्याच्या पुढेच माहाराजांच्या नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा येतो. (हे इतकं मोठं वाक्य लिहिताना या राजदरबारासाठी एक उल्लेख मनात आला. 'दीवणे-आम'. पण मग मनात आलं हा काही आपल्या शब्दकोशातील शब्द नाही. मग थोडं मोठं वाक्य होईल... पण नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा.... असं म्हणणंच जास्त योग्य होईल! असो!) माझ्या गाईडने मला सांगितलं की महाराज कृष्णदेवराय ठराविक दिवशी सर्वसामान्यांसाठी म्हणून खास दरबार भरवायचे. यावेळी माहाराज एका उच्चासनावार बसत असत. त्यामागे दोन कारणं होती... अर्थात पहिलं कारण माहाराजांची सुरक्षा हे होतं आणि दुसरं कारण ऐकून माझा कृष्णदेवराय माहाराजांबद्दलचा मनातील आदर खूपच वाढला. ते कारण म्हणजे.... या उच्चसनावरून माहाराजांना समजू शकत असे की नक्की किती लोक त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. त्यामूळे दारवान किंवा शिपाई किंवा कोणी अधिकारी जर कोणा नागरिकाला थांबवत असेल तर ते महाराजांना दिसत असे आणि ते असं होऊ देत नसत. किती वेगळा विचार करणारा राजा होता तो.... 'जेव्हा मी माझ्या रयतेचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी वेळ काढीन त्यावेळी सर्वांचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत मी तिथे उपस्थित राहीन.' कदाचित म्हणूनच अगदी नेपाळ-भूतान पर्यंत महाराज कृष्णदेवरायांनी युद्ध मजल मारली आणि त्यांच्या सोबत त्यांचं सैन्य कायम राहिलं. 


महाराजांचे उच्चसन



माहाराजांच्या नागरिकांना भेटण्यासाठी असलेल्या उच्चसनावरून दिसणारा संपूर्ण भाग. इथून होळी समारंभासाठी बांधलेला चौथरा देखील दिसतो आहे. 


महाराजांच्या नागरी दरबाराच्या चौथऱ्यावरून दिसणारा ऐकूण भाग.

पुढच्या एका अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद भुयाराबद्दल सांगण्या अगोदर एक खूपच महत्वाच्या स्थापत्य निर्माणाबद्दल सांगण आवश्यक आहे. त्याकाळातील स्थापत्य विशारदांचं कौतुक करू तितकं कमीच. किंबहुना मी तर म्हणेन की आपली लायकीच नाही त्या अत्यंत विचारी आणि समयोचित नियोजन करण्याचं सामर्थ्य असलेल्या लोकांचं कौतुक करण्याची. त्यांनी निर्माण केलेले स्थापत्य आपण बघावं आणि तोंडात बोट घालून गप बसावं इतकंच काय ते आपलं कर्तृत्व असू शकतं. तर...

महाराज कृष्णदेवराय यांचा राज परिवार सामावणारा परिसर अत्यंत मोठा आणि दूरवर पसरलेला आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. या अतिप्रचंड भागामध्ये राज परिवार आणि त्यासोबत त्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या सर्वांसाठी विविध सोयी तर केल्या तरी सर्वात महत्वाची आणि अत्यावश्यक सोय म्हणजे पाणी. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण परिसराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा होईल अशाप्रकारचे दगडी चर संपूर्ण परिसरात फिरवलेले आहेत. तरण तलावात पडणारे पाणी असो किंवा पुष्कर्णीमध्ये जाणारे पाणी असो... महाराजांच्या राज महालाचे आता फार अवशेष उरले नसले तरीही त्याठिकाणी पाणी पुरवठा करणारे कालवे अजूनही शाबूत आहेत. खरंच हे निर्माण करणं फारच अवघड आहे. या पाणीपुरवठयाचा विचार किती खोलवर केला असेल हे देखील समजून घेण्यात मजा आहे. माहाराजांच्या राजपरिवरासाठी निवडण्यात आलेल्या जागेच्या थोड्या दुरावरून नदी वाहाते. नदीच्या पात्राच्या उताराचा अभ्यास करून पाण्याच्या दबाव तंत्राचा वापर करून राजपरिवर जागेपासून काही अंतरावर दोन तलाव बांधण्यात आले आहेत. हे तलाव दगडाचे असले तरी यामध्ये नैसर्गिक झरे येऊन मिळतात. या तलावांपासून एक मोठा कालवा तयार करून तो राजपरिवार जागेपर्यंत आणण्यात आला आहे. संपूर्ण जागेवरून हा कालवा फिरवल्या नंतर त्याचा उतार एका अशा बाजूला निर्माण केला आहे की जिथे त्याकाळात राज परिवाराव्यतिरिक्तच्या लोकांसाठी अन्न शिजवलं जात असे. (माहाराज कृष्णदेवराय यांना भेटण्यासाठी अनेक राजे-माहाराज येत असत. त्यांच्या सोबत त्यांचा लावाजमा असे. त्यांच्यासाठी अन्न बनवले जात असे ती जागा). तिथून हा कालवा अजून पुढे देखील जातो आणि मग हळू हळू जमिनीला समांतर जात अजून एका मानव निर्मित तलावात त्याचे पाणी सोडलेले आढळते. जिथे तो कालवा जमिनीला समांतर जातो त्याच्या दोन्ही बाजुंनी दगडात कोरलेली जेवायची ताटं आहेत. काही केळीच्या पानांच्या आकाराची तर काही नुसती आयताकृती. वट्यांसाठीचे खड्डे देखील आहेत त्यात. या ताटांमधून देखील नादनिर्मिती होते.



विविध आकारांमधील ताटे आणि उजव्या बाजूला असणारा खड्डा म्हणजे कालवा






पुढचा विडिओ नक्की बघा हं. एका कृत्रिम तलावाखाली तयार केलेली खोली आहे. सहज बघितलं तर राज परिवारासाठी तयार केलेला पाण्याचा साठा. मात्र खाली एक महत्वाच्या व्यक्तींसोबत खलबतं करण्याची खोली. यातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे वरती पाणी असल्याने खालील चर्चा इच्छा असूनही कोणालाही ऐकायला येणे शक्य नाही. (हा खलबतखाना बघताना मला शिवरायांची आठवण झाली. अनेक गड आणि किल्ले बघितले आहेत मी आजवर. त्यापैकीच कोणत्यशा गडावर शिवाजी माहाराजांनी देखील असाच काहीसा खलबतखाना तयार करून घेतला होता; तो बघितल्याचं आठवत मला. पण कोणता किल्ला आणि कधी बघितलं आहे ते मात्र आता आठवत नाही. अर्थात इथे एक इंग्रजी म्हण चपखल बसते असं वाटतं... All great people think alike.)



या चोर खोलीच्या पुढेच महाराज कृष्णदेवराय यांचा कला दरबार भरत असे. इथे एक मोठा चौथरा आहे. चार फूट उंच असा. याच्या चारही बाजूंनी बसता येईल अशी सोय असल्याचं दिसतं. चारही बाजूनी या चौथऱ्यावर चढता येतं. या जिन्यांच्या दोन्ही बाजूंना हत्ती आहेत आणि या हत्तींच्या कानांना भोकं आहेत. त्याशिवाय चौथऱ्याच्या प्रत्येक कोणाकडे देखील भोक आहे. माझा गाईड सांगत होता की या चौथऱ्याच्या मध्यावर एक सुंदर रंगीत तलम कापडांनी सजवलेला प्रचंड उंच बांबू उभारला जायचा. त्या कापडांची दुसरी टोकं या हत्ती आणि इतर चार कोनांमधील भोकांमधून घालून एक सुंदर आणि वेगळी सजावट केली जात असे. या चौथऱ्यावर कला प्रदर्शन करण्यासाठी परदेशातून नामवंत कलाकार येत असत. त्याशिवाय महाराज कृष्णदेवराय यांच्या पदरी देखील अनेक अलौकिक नृत्यांगना होत्या. यांची कला देखील या चौथऱ्यावर प्रदर्शित होत असे. राजा कृष्णदेवराय यांचे वेगळेपण असे की ज्याप्रमाणे राज परिवारासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी असे कार्यक्रम आयोजित होत; त्याचप्रमाणे आम जनतेसाठी देखील असे कला प्रदर्शनाचे कार्यक्रम होत असत. त्यात देखील अजून एक वेगळी बाजू म्हणजे जर महाराजांच्या जनतेमधून आयत्यावेळी कोणी पुढे येऊन स्वतःची कला सादर करण्याची इच्छा व्यक्त केली तर माहाराज ही इच्छा देखील पूर्ण करत असत.




                                    कला दरबार चौथऱ्यावरून काढलेला फोटो. दूरवर महानवमी चौथरा दिसतो आहे


                                                         चौथऱ्याच्या बाजूच्या भोकांचा विडिओ

दंडनायकाचा बुरुज नावाचा एक बुरुज आहे कमल महालाजवळ. अशी वदंता आहे की कृष्णदेवराय माहाराज स्वारीवर जात असत त्यावेळी त्यांचा स्त्रीपरिवर या कमल महाल आणि परिसरात राहायला येत असे. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा दंडनायकाचा बुरुज बांधलेला होता. केवळ या बुरुजावर काही पुरुष पाहरेकरी ठेवले जात. बाक आतील बाजूस केवळ महिला पाहारेकरी आणि दासी असत.



                                                                          दंडनायकाचा बुरुज

कृष्णदेवराय माहाराजांची गजशाला खरच पाहण्यासारखी आहे. माहाराजांच्या प्रमुख अकरा हत्तींना राहण्यासाठी बनवलेली ही गजशाला अजूनही अत्यंत सुंदर आणि सुस्थितीत आहे. हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी आतून लहान दरवाजे देखील आहेत. प्रत्येक दळणाला वर गोल घुमट आहे आणि घुमटाखाली लोखानदी हुक आहे. यांच्या आधारे दोरखंडांनी हत्तींना बांधून ठेवत असत. गजशालेच्या एका बाजूला अजून एक इमारत दिसते. ती देखील अजूनही उत्तम स्थितीत आहे. मात्र आता लोखंडी गेट्स बसवून ती बंद केली आहे. इथे पाहारेकरी आणि माहुतांचे वसतिस्थान असावे. 


सुस्थितीत असलेली गजशाला


माहुतांचे निवासस्थान


गजशाला


                                        हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाताना मध्ये लहान दरवाजे आहेत

राजा कृष्णदेवराय यांच्या राज परिवारासाठी तयार केलेला परिसर वरील फोटोंमधून आपल्याला दिसलाच असेल. या हजारो एकरांवर पसरलेल्या महाराजांच्या राहण्याच्या जागेबरोबरच; विविध सण-समारंभ किंवा कला प्रदर्शनासाठी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या चोहोबाजूंनी एक कणखर तटबंदी होती. परंतु दुर्दैवाने काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. मात्र या तटबंदीच्या मधोमध एका अखंड शिळेतून बनवलेला दरवाजा मात्र अजूनही एका बाजूस ठेवलेला दिसतो. कदाचित फोटोमधून त्या अजस्त्र दरवाजाचा अंदाज पूर्ण येणार नाही. पण थोडी तरी कल्पना करू शकाल तुम्ही म्हणून हा फोटो देखील इथे देते आहे.





पुरातन काळातील स्थापत्य शैलीचं कौतुक करावं तितकं कमीच म्हणता येईल. महाराज कृष्णदेवराय यांनी त्यांच्या राजकुळातील स्त्रियांसाठी विविध वैशिष्ट्यांनी सजवलेले स्नानगृह देखील निर्माण करवले होते. या स्नानगृहाला वरून गोपुराचा आकार दिला गेला आहे. मध्यभागी तलाव निर्माण करून त्यात दगडी पन्हाळीमधून पाणी सोडण्याची सोय केली आहे. कौतुकाचा भाग हा की या तलावातील वापरलेले पाणी वेगळ्या पन्हाळीमधून बाहेर काढून ते सभोवतालच्या बगीचाला पुरवले जाईल अशाप्रकारे सोय केली आहे. कितीतरी खोल विचार केला आहे हे स्नानगृह बांधताना. स्नानगृहातील तलावाच्या चारही बाजूनी व्हरांडा आहे आणि त्याला तलावाच्या बाजूने झरोके देखील केले आहेत. कोपऱ्यांमधून स्नानगृहाच्या वरील गच्ची सदृश भागात जाण्यासाठी जिने आहेत. परंतु ते आता बंद करून टाकले आहेत. माझ्या गाईडने सांगितले की लहानपणी इथे सर्व मुलं लपाछपी खेळण्यास येत असत. कधीतरी पुढे वास्तुशास्त्र तज्ञ आले आणि मग लहान मुलांसाठी खेळण्याची एक जागा बंद झाली.





हंपीमध्ये आलात आणि सूर्योदयाचं नयनमनोहर दृष्य बघितलं नाहीत असं नक्की करू नका. हजारराम मंदिराच्या जवळच लहानशी टेकटी आहे. तिथे थोडं चढून गेलं की दगडी कुटी आहे. कदाचित पूर्वकाळातील साधू-संतांच्या राहण्यासाठी आणि तपश्चर्येसाठी तयार केलेल्या त्या परिसरातील अनेक कुटींमधली ही कुटी असावी. तर अगदी अंधार असताना या कुटीच्याही वर चढून जाऊन बसावं लागतं. एक लांबलचक वाट बघण्याची वेळ... पण मग ते लवकर उठणं, ते धडपडत वरपर्यंत चढून जाणं आणि ते वाट बघणं खरंच फळतं.... केशररंग घेऊन सामोरा येणाऱ्या आदिनारायणाचं ते शुचिर्भूत दर्शन पुढचे अनेक दिवस मन प्रसन्न ठेवायला पुरेसं ठरतं.


त्या आदित्यनारायणाची वाट पाहताना


हजारराम मंदिर आणि एकूण परिसर



माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून घेतलेला विडिओ


दिनकराला वंदन करून खाली उतराल तर समोरच हजारराम मंदिर म्हणून ओळखलं जाणारं रामाचं मंदिर दिसतं. या मंदिराचं विशेष म्हणजे असं मानतात की रावणाने सितामातेचे हरण केल्यानंतर ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण सितामातेला शोधायला निघाले त्यावेळी त्यांनी याठिकाणी काहीकाळ विश्रांती घेतली होती. मंदिराच्या आवारामध्ये एक प्रचंड मोठा सभामंडप आहे. या सभामंडपाचं विशेष म्हणजे या सभांमंडपामध्ये कोरलेली शिल्पे ही रामायण काळातील कथांवर आधारित असली तरी या शिल्पांचे चेहेरे प्रचंड भिन्न आहेत. काही चेहेरे हे नेपाळ-भूतान येथील लोकांसारखे आहेत; तर काहींचे चेहेरे लांबाकृती आहेत. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक कुटी असल्याचं मी म्हंटलंच आहे. मला वाटतं कदाचित या मंदिरामध्ये शिल्पकला शिकण्यासाठी येणारे दूरदेशीचे विद्यार्थी राहात असतील. आपल्या शिक्षकांनी शिकवलेली विद्या येथील सभामंडपातील खांबांवर ते कोरत असतील. मात्र आपल्या देशाची किंवा जेथून आलो तिथली ओळख या ठिकाणी राहावी या उद्देशाने कथा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे कोरली तरी त्यातील चेहेरेपट्टी आपल्या देशाची निर्माण करत असतील. 




कर्नाटकातलं हे हंपी म्हणजेच राजा कृष्णदेवराय यांचं विजयनगर किंवा रामायण काळातील किष्किंदा नगरी म्हणजे निसर्ग आणि पुरातन स्थापत्याने नटलेलं गाव/शहर. तुम्ही जितकं फिराल तितकं कमीच. आपापल्या आवडीनुसार किती दिवस जायचं ते प्रत्येकाने ठरवावं. माझ्याबद्दल सांगायचं तर सानापूर मधल्या home stay मध्ये काहीही न करता मी आठवडाभर राहूच शकते. रोज उठून नदीवर जायचं आणि खळाळत पाणी बघत राहायचं. जमलंच तर गावातल्या पोरांबरोबर मासे पकडायचे. दहा मिनिटात फिरून संपणाऱ्या गावात फिरायचं.... आणि मग पुरातन वारसा लाभलेलं जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारं हंपी बघायला निघायचं. अर्थात या संपूर्ण वर्णनामध्ये इथल्या कर्नाटकी जेवणाचा उल्लेख मी केला नाही... तुम्हाला असं तर नाही ना वाटलं की मी न खाता-पिता फिरत होते. असं मुळीच नाही हं. इथले लोक खाण्याच्या बाबतीत प्रचंड हौशी आहेत. विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक अत्यंत स्वच्छ आणि सुंदर खानावळ आहे. तिथलं जेवण अप्रतिम आहे. एकदम कर्नाटकी पध्दतीचं. मी माझ्या गाईडला आग्रहपूर्वक सांगितलं होतं की मला रोज इथल्या सर्वसाधारण ढाब्यावर जाऊन जेवायचं आहे. दोन वेळा तर आम्ही एकशे पंचवीस रुपये प्रत्येकी भरून बुफेमध्ये जेवलो. भरपूर भात... मग तो एकदा सांबार बरोबर, एकदा रस्सम बरोबर, मग भाजी बरोबर आणि शेवटी दही-दुधाबरोबर खायचा असतो. गोड म्हणून इथे खीर देतात. इथली थंड पेय देखील अगदी खास... एक तर ताक; साधं किंवा मसाला घातलेलं. दुसरं पोटासाठी अत्यंत उत्तम असं पुदीना सरबत. इथले ढाबे अत्यंत स्वच्छ आणि भारतीय बैठकी असलेले आहेत. अर्थात ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी टेबल-खुर्ची अशी सोय देखील आहेच.


विरुपाक्ष मंदिराजवळील ढाबा


मँगो ढाब्यामधील टेबल खुर्ची बैठक


मँगो ढाब्यामधील भारतीय बैठक


थंडगार ताक


कर्नाटकी शाकाहारी जेवण. विरुपाक्ष मंदिर जवळ असल्याने इथे मांसाहार वर्ज आहे. मात्र थाळी unlimited



गावातील ढाबा भारतीय बैठक


जेवणाची सुरवात साडेबारा नंतर होते. त्याची तयारी अगोदर करण्यात येते


भातासोबतची थाळी


गावातील ढाब्यावर मांसाहार मिळतो


पोळी सोबतची थाळी


पुदिना सरबत


हंपी बद्दल इथे मी जरी लिहिलं असलं तरी हंपी पाहणं हा एक खरंच अनुभव आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तो अनुभव एकट्याने घेण्यात खरी मजा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी जरी थोडा जास्त वेळ थांबलात तरी चल-चल म्हणून कटकट करणारं कोणी नसतं. माझं मत विचाराल तर हंपीमधला निसर्ग फक्त डोळ्यात नाही तर मनात साठवून घ्या. इतक्या सहज नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसता येण्याचं सुख आता भारतात फारसं उरलं नाही. एकतर भडभुंजे मागे लागतात नाहीतर काही न काही विकायला येणारे लोक असतात. तुंगभद्रेचा किनारा अजूनही अशा दृष्टीकोनातून अस्पर्श आहे. इथे अजूनही शांतता आणि पक्षांची किलबिल आहे. एक अजून अनाहूत सल्ला. इथल्या नदीकिनारी बसताना कोणतंही गाणं नका हं लावू... मला देखील आशा-किशोर-लता-मन्ना डे आणि सगळेच जवळ घेऊन बसावंस वाटलं होतं पहिल्या दिवशी. पण मग लक्षात आलं की मी गाण्याच्या शब्दांमध्ये हरवते आहे.... समोर पसरलेल्या या प्राकृतात नाही.... आणि मग फक्त आणि फक्त हंपी जगायचं ठरवून फिरायला बाहेर पडले.

जाता जाता.... हा माझा लेख वाचून जर हंपीला जाणं ठरवलंत आणि खरंच गेलात तर नक्की कळवा हं मला.

अच्छा!!!!


#निसर्गसुंदर आणि #ऐतिहासिक_वारसा लाभलेलं #कर्नाटक मधील #हंपी म्हणजे #सर्वार्थाने #नेत्रसुख देणारं #गाव  याच हंपीचा माझ्या कॅमेऱ्यातून घेतलेला आढावा! #sanapur #hampi #humpi #introducing #hampitourism  through my #videocapture hope #everyone will #likeit  #hampifocus #ancient #scalptures #architecturephotography #beautifulhampi #beautifulnature #homestays #peace_in_nature #realworld #loveyourhistory #indianhistoryvideos #ancientindia






























4 comments:

  1. खूपच छान माहिती मिळाली. छान लेख आहे वाचतांना डोळ्यांसमोर सर्व चित्र उभे राहिले.
    धन्यवाद 🙏🏻

    ReplyDelete
  2. खूपच तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.खूप छान...हंपी चा ख्याल रंगतदार होऊन संपला...आता पुढचे destination कुठले?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद

      एकदा करोना संपला की मग ठरविनच

      Delete