Friday, May 24, 2019

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......


एक शहरात राहणारी, मध्यम वयातील स्त्री; देशात होणाऱ्या सततच्या राजकीय घडामोडींमुळे जिच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही तिने २०१९ च्या देशाच्या निवडणुकीत मनापासून मतदान केलं. मोठी लाईन लागलेली होती मतदानासाठी. खूप उकडत होतं; प्रौढ मतदारांना पुढे जाण्याची परवानगी असल्याने असलेल्या रांगेमध्ये देखील अजून वेळ लागत होता... तरीही ही स्त्री उभी होती. 'मी माझा मतदानाचा हक्क.... किंबहुना जवाबदारी जर आज पूर्ण केली नाही आणि असंच एक-एक करत अनेकांनी मत दिलं नाही तर कदाचित काँग्रेस म्हणजेच पर्यायाने राहुल गांधी निवडून येईल.... नको रे बाबा! मोदीच बरे आहेत.' अशी भावना तिच्या मनात होती आणि रांगेत उभं राहून इतरांशी बोलताना तिच्या लक्षात येत होतं की इतरांच्या मानत देखील हेच भाव आहेत.... आणि मग 'मोदीच बरे आहेत'; असं आपल्याला का वाटतंय बरं याचा ती विचार करायला लागली.

मोदी आल्यामुळे माझ्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही हे खरंय; पण....... अलीकडे कॉलेजमध्ये जाणारी माझी दोन्ही मुलं देशात होणाऱ्या घडामोडींवर बोलताना दिसतात. माझ्या तारुण्यात काहीतरी बफोर्स नावाचा भ्रष्टाचार झाला होता. जन्मले तेव्हा इमर्जन्सी का असंच काहीतरी होतं असं आई सांगायची. पण आपण कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं देशात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूक असणं....... मनाला समाधान देऊन जातं.

मोदींनी 'घर घर शौचालय' योजना सुरू केल्याचं वाचलं आणि घरी कामाला येणाऱ्या आशाताईंना त्याबद्दल सांगितलं. त्यांच्या सासूबाई तशा बऱ्याच वृद्ध आहेत त्यामुळे त्यांना सार्वजनिक शौचालयात जायला खूप त्रास व्हायचा. रात्री घरातच पॉट द्यावं लागायचं. घरात सासूबाई आणि आशाताईंव्यतिरिक्त त्यांच्या दोन वयात आलेल्या मुली आणि एक मुलगा आणि नवरा इतकी माणसं. त्यामुळे पॉट देताना देखील खूप अडचण असायची. त्यामुळे त्यांनी 'घर घर शौचालय' बद्दल लगेच चौकशी सुरू केली. जवळ जवळ तीन वर्षांनंतर त्यांच्या घरात त्यांनी शौचालय बांधून घेतलं. त्या म्हणाल्या खूप मागे लागावं लागलं हो; पण आता समाधान वाटतं. लेकी देखील मोठ्या झाल्यात. बाहेर जाण्यापेक्षा आता त्या घरातलंच शौचालय वापरतात. आशाताईंचं बोलणं.......... मनाला समाधान देऊन गेलं.

एकदिवस नवरा ऑफिसमधून आला आणि म्हणाला आपण गॅसची सबसिडी सोडून देऊ. मी लगेच हिशोबाला बसले. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. मग गॅस कंपनीमध्ये जाऊन चौकशी करून सगळ्या formalities पूर्ण केल्या. अलीकडे अनेक जाहिराती बघते आहे की गावांमधल्या स्त्रियांना गॅस मिळायला लागला आहे. आता त्यांचा लाकडं जमवून चूल पेटवायचा त्रास बंद झाला आहे. एका स्त्रीचा सुखावलेला चेहेरा जाहिरातीत दिसतो. कदाचित ती खरी महिला नसेलही. कोणी कलाकार असेल. पण त्या जाहिरातीत सत्यता आहे; हे............ मनाला समाधान देऊन जातं.

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते झाडायला सुरवात केली तेव्हा मनात आलं होतं... काय पण स्टंटबाजी आहे. असं पंतप्रधानाने झाडल्याने स्वच्छता होते का? इतर महत्वाची कामं सोडून हे काय करायला लागले मोदी? पण अलीकडे घराच्या कोपऱ्यावरची कचरा पेटी वाहून जात नसते... आणि असलीच तर मी लेकाला त्याचा फोटो काढून फेसबुकवर टाकायला सांगते. लगेच सफाईला सुरवात होते. हा दिसणारा बदल........ मनाला समाधान देऊन जातो.

मोदींच्या काळात समजायला लागलं की आपले जवान किती प्रतिकूल परिस्थितीत राहातात. पाकिस्तान सतत त्यांच्यावर छुपे हल्ले करतच असतो. आजवर आपल्या जवानांचे हात बांधलेले होते. त्यामुळे ते फक्त स्वतःचा बजाव करत होते. पण आता केंद्र सरकारने त्यांना free hand दिला आहे. त्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आपले जवान देखील जोरदार उत्तर द्यायला लागले आहेत. माझ्या देशाच्या सीमारेषा आता सुरक्षित हातात आहेत. गेली पाच वर्ष देशाचे पंतप्रधान दिवाळी त्या जवानांमध्ये जाऊन साजरी करतात. हा विचार........ मनाला समाधान देऊन जातो.

नोट बंदीचा किती त्रास झाला. इतकी चिडचिड व्हायची माझी. मी एकटीच होते न रिकामटेकडी घरात. त्यामुळे सतत बँकेच्या रांगेत जाऊन उभं राहायला मीच होते. त्यात पै-पै जोडून नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये बँकेत जमा करायला लागले होते. इतका राग आला होता त्या मोदींचा. यांचं काय जात एका दिवसात सगळं बदलायला? याला ना घर ना दार.... ना बायको ना पोर.... आमचं कसं होणार? पण मग एक दिवस एक रिक्षावाला भेटला. म्हणाला भाभी घर मे बहुत पैसा पडा था. तो मैने बीबी का अकाऊंट खोला. मोदीने लेडीज को जादा फायदा दिया हें ना बँक मे. बहुत तकलीफ हुवा. लेकीन अपने को तो सिर्फ लाईन मे खडा रहना था. ये काला पैसा वालोको मोदीने अछा सबक सिखाया. त्याचं बोलणं ऐकलं आणि मनात आलं खरंच की; खोट्या नोटा आता बंद होतील. मला माझे दीड लाख नवऱ्याला सांगावे लागले. पण ते माझ्या अकाऊंट मध्ये जमाँ तर झाले. हे काळा पैसा वाले तर कर्माने गेले. मग लक्षात आलं; कितीतरी लोकांनी माझ्याप्रमाणे पैसे बँकेत ठेवायला सुरवात केलीय. त्यामुळे देशाची आथिर्क स्थिती सुधारते आहे. हे सगळंच...... मनाला समाधान देऊन जातं.

तसं बरंच काही केलं की त्यांनी. अधून मधून नवरा आणि मुलांच्या चर्चमधून कळत असतं आपल्याला.

ती अजूनही मतदानाच्या रांगेत उभी होती. अजूनही ती विचार करत होती. तरीही 'मोदीच बरे' अस का?

तिच्याच मनाने तिला विचारलं......

मग कोण राहुल गांधी? त्याचं ते बालिशपणे वागणं. मोदींना त्याने म्हणे भर संसदेत मिठी मारली होती आणि मग डोळा मारला होता. बघितला होता मी तो व्हिडियो. शोभतं का हे असलं वागणं त्याला? अरे लग्न नाही केलंस तू. पण म्हणून तू काही पंचवीशीतला नाहीस न. आमच्या देवेंद्र फडणविसाच्या वयाचा आहेस. त्याची प्रगल्भता बघ की जरा. राज्य चालवतो आहे तो. दिसायला कसा गोंडस बाळासारखा आहे. कायम हसतो. वाटतं आपलं सगळं म्हणणं एकूण घेईल. पण पक्का आहे हो निर्णय घेताना. 'मनात आलं तेच केलं; विकासाच्या मार्गाने राज्याला नेलं;' हे दाखवून दिलं की त्यानं. नाहीतर तू! माझे बाबा महान.... माझी आजी महान... मी.... माझी आई... माझी बहीण.... यातच अडकलास. तू जर झालास पंतप्रधान तर मलाच देश सोडून जावं लागेल.

समजा मोदीही नाही आणि राहुल देखील नाही..... मग कोण ती ममता? की ते यादव? अरे देवा!

मोदींनी काही सगळे प्रश्न सोडवले नाहीत. पण किमान त्यांच्या असण्याने प्रश्न सुटतील ही आशा आहे.

अजून तास लागला तरी चालेल मत देऊनच बाहेर पडणार मी!!! एकदाचा तिचा नंबर लागला आणि मतदान करून आणि आपण केलेल्या मतदानाची खात्री करून ती समाधानाने बाहेर पडली.

मात्र............. २३ मे ला घरातले सगळे बाहेर पडले आणि तिने टीव्ही चालू करून ठेवला. आपली कामं आवरताना अधून मधून ती अंदाज घेत होती. 'काय होतंय ग बाई? मोदीच आले पाहिजेत हो.' तिने आशाताईंना म्हंटलं. त्या देखील म्हणाल्या;"वहिनी, त्योच येणार हो. मला काय बी चिंता न्हाई." आशाताईंचा आत्मविश्वास बघून तिला देखील बरं वाटलं. दुपार पर्यंत तिला देशाचा कल समजायला लागला आणि समाधानाने तिने टीव्ही बंद केला. संध्याकाळी नवरा आला तोच सांगत की मोदींच भाषण आहे आता आणि परत एकदा तिने घाईघाईने टीव्ही लावला.

मोदी म्हणत होते....... तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नाही देणार. फक्त आणि फक्त देशाचाच विचार करिन. पुढच्या पाच वर्षात जितकी म्हणून प्रगती करणे शक्य आहे ती करेन. कदाचित चूक झाली तर ती सुधारेन.... पण चूक त्याचीच होते जो मार्गक्रमण करतो आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहात त्याने फुशारून जाणार नाही. चला कामाला लागुया!

रात्रीच्या जेवणाची तयारी करताना तिच्या मानत येत होतं आईचे संस्कार चांगले हो! शहरातली असो किंवा गावातली. शिक्षित असो किंवा अशिक्षित..... संस्कार तर तेच असतात न!




9 comments:

  1. छान मांडले आहे सामान्य महिलेचे मनोगत

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद

      Delete
  2. Thank u swati. खरच आपल्या वयाच्या शहरी स्त्रीच्या मनात असंच काहीसं असेल काल असं वाटलं आणि लिहिलं लगेच

    ReplyDelete
  3. एका सामान्य महिलेच्या मनातील विचारांचे साक्षेपी प्रकटीकरण;तेही नेमक्या शब्दांत!!!सहज सोप्या शब्दांत विचारांची मांडणी करण्याची तुमची हातोटी कमाल आहे.फक्त एकच वाटते...हे लेखन मोदीजींपर्यंत पोहोचावं....खूप छान...

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार. याहूनही चांगलं लिहिणारे खूपच आहेत. मात्र तुमच्या भावनांबद्दल आभार

      Delete
  4. खूप छान. आणि समतोल. शहरी, मध्यमवर्ग, सामान्य स्त्री कसा विचार करते हे आपण चांगल्या पद्धतीने मांडलेत... कुठलाही राजकीय रंग न देता.. परंतु ग्रामीण भागातील चित्र कदाचित वेगळे आहे. मोदीजींचे कार्य तेथे अजून पोहोचले नाही. दुष्काळ, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ... मोदीजी ह्या समस्यांना अजून समाधानकारक उत्तर शोधू शकले नाहीत. भारत विरुध्द् इंडिया ही दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच छान. सामान्य महिलेच्या भूमिकेतून व्यक्त होणं.!!

      Delete
  5. खूप छान.... लिहिण्यातील सहजता भावली.एखाद्या सामान्य ग्रुहिणीच्या मनातील भावना/ विचार अगदी असेच असतील.

    ReplyDelete