चिरंजीवी
भाग 7
हॉस्पिटल मधून discharge मिळाल्यानंतर सिद्धार्थ घरी आला. त्याला काही दिवस संपूर्ण विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. त्यामुळे तो कुठेही बाहेर जाणं शक्य नव्हतं. कृष्णाने एक दोन दिवस घरी आराम केला खरा.. पण मग ती रोज संध्याकाळी सिध्दार्थकडे जायला लागली. दहा दिवस झाले होते. सिद्धर्थच्या अनेक टेस्ट्स करण्यात आल्या होत्या. झालेल्या अपघाताचा कोणत्याही प्रकारचा परिणाम त्याच्या शरीरावर झालेला नाही न याची खात्री करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं. सिध्दार्थ या प्रकाराला कंटाळला होता. कारण या सततच्या हॉस्पिटलच्या वाऱ्यांमुळे तो कृष्णाशी कोणत्याही विषयावर निवांतपणे बोलू शकत नव्हता. त्याचा अस्वस्थपणा तिला कळत होता पण तिला देखील त्यावर उपाय सुचत नव्हता.
कृष्णाला सिध्दार्थला घराबाहेर काढायचं होतं. पण त्याचे वडील त्यासाठी परवानगी देत नव्हते. कृष्णला सिध्दार्थला घराबाहेर का न्यायचे आहे त्याचं कारण माहीत असूनही सिध्दार्थची आई देखील नकार देत होती. कृष्णा अगदीच हवालदिल झाली होती. त्यात एकदिवस तिला तिच्या कॉलेजमधून फोन आला की तिची अटेंडेन्स कमी पडायला लागली होती. परीक्षा द्यायचा विचार असेल तर तिने एकदा कॉलेजमध्ये जाणं आवश्यक होतं. कृष्णाने सिध्दार्थला फोन करून सांगितलं की आज तिला यायला थोडा उशीर होईल; कारण ती कॉलेजमध्ये जाऊन येणार आहे.
कॉलेजमध्ये कृष्णा तिच्या सरांना भेटली आणि तिने अपघाताचं कारण सरांना सांगितलं. त्यांना देखील ते पटलं कारण कृष्णाच्या कपाळावरची जखम दिसत होती. सरांना भेटून कृष्णा लायब्ररीमध्ये जायला वळली. सध्या कॉलेजमध्ये येणं शक्य नाही हे तिच्या लक्षात आलं होतं; त्यामुळे किमान काही पुस्तकं घेऊन जाऊन जमेल तसा घरीच अभ्यास करायचं तिने ठरवलं होतं. त्याप्रमाणे तिने हवी ती पुस्तकं मागून घेतली आणि ती निघाली.
कृष्णा तिच्या गाडीजवळ पोहोचली तर तिच्या गाडीला टेकून एक व्यक्ती उभी होती. पांढरीशुभ्र दाढी, धोतर आणि स्वच्छ पांढरा कुर्ता असा त्यांचा पेहेराव होता. कृष्णाने एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि स्वतःची गाडी उघडली.
"कृष्णा, मी ऋषी पराशर आणि माता सत्यवती यांचा पुत्र व्यास. माझी ओळख वेद व्यास अशी देखील आहे. मला तुझी आणि सिध्दार्थची भेट घ्यायची आहे. हे कसं शक्य होईल?" व्यासांनी अत्यंत शांतपणे कृष्णला विचारलं.
'आपल्या समोर उभी असणारी व्यक्ती खरंच वेद व्यास आहे का?' कृष्णाच्या मनात प्रश्न उभा राहिला.
"मुली, अत्यंत स्वाभाविक आहे तुझ्या मनात हा प्रश्न येणं. हेच तर भगवान हनुमान सांगत होते. विश्वास असणे हे जीवनावश्यक सत्य आहे. स्थिर मनासाठी आणि वाहत्या जीवन प्रवासासाठी विश्वास ही भावनिक गरज आहे. हा विश्वास केवळ पूर्ण भक्तीतून येतो. तू सध्या महाभारतीय युद्धातील पांडव पुत्र संहार या विषयाचा अभ्यास करते आहेस ना... मग त्यातलंच एक उदाहरण देतो...
अर्जुनाने ज्यावेळी समोर युद्धासाठी उभे असलेले सर्व आप्त बघितले आणि त्याने युद्धास नकार दिला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला जीवन सार सांगितले. मुली, हे काही 'पी हळद आणि हो गोरी'; इतके सोपे नसते. जरी श्रीकृष्णाने भगवत गीतेच्या स्वरूपात जीवन सत्य उघड केले होते तरी युद्धभूमीवर उभा अर्जुन त्यावेळी शिष्य दशेमध्ये नव्हता. त्यामुळे गीतेमध्ये कथित केलेल्या जीवन सत्याची उपरती होऊन अर्जुन युद्धास तयार झाला.... यापेक्षा थोडा असा विचार पटतो का बघ. भगवत गीता अर्जुनाला सांगणारा खुद्द श्रीकृष्ण होता; त्याचा परमप्रिय मित्र! मात्र गीतेमध्ये सांगितलेले विचार हे एका मित्राने दुसऱ्या मित्राला सांगितलेले नव्हते. त्यामुळे युद्धभूमीवर असताना गीतेमधील कर्तव्य आणि सामाजिक जवाबदारी हे मुद्दे किती लक्षात आले असतील अर्जुनाच्या ते सांगता येत नाही. मात्र भावनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत नाजूक अशा विषयाला आपला मित्र-बंधू एका वैश्विक दृष्टिकोनातून सांगतो आहे हे नक्की अर्जुनाच्या लक्षात आलं. विचारांनी इतका स्थिर असणारा आपला बंधू जर आपल्याला युद्ध करायला सांगतो आहे तर ते योग्यच असेल; या विश्वासातून पुढील परिणामांचा विचार न करता अर्जुनाने युद्धासाठी धनुष्य पेललं. मग या विश्वासाला हनुमंत भक्ती म्हणतील आणि तुम्ही पूर्वानुभवातून आलेलं शहाणपण म्हणा.. पण मूलतः सत्य हेच राहातं की विश्वास होता म्हणूनच अर्जुनाने गांडीव उचललं."
व्यास मुनी बोलायचे थांबले आणि त्यांचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन एकणारी कृष्णा मंद हसली. "चला, मी सिध्दार्थलाच भेटायला जाते आहे." ती म्हणाली.
***
"अरे काका तुम्ही आज इतक्यात घरी कसे?" घरी पोहोचताच कृष्णाने समोर सिध्दार्थच्या वडिलांना बघून प्रश्न केला.
"अग, वैदेहीचं एक महत्वाचं सेमिनार आहे पुढचे तीन दिवस. म्हणून तिने मला घरी थांबायला सांगितलं आहे. नाहीतर तुम्ही दोघे अगदी बेभरवशाचे आहात. कोणी थांबवायला नाही म्हंटल्यावर लगेच भटकायला बाहेर पडाल." हसत हसत सिध्दार्थचे बाबा म्हणाले.
बोलताना त्यांची नजर कृष्णा सोबत असलेल्या व्यक्तीकडे पडली. कृष्णला ते लक्षात आलं आणि अगदी सहज आवाजात ती म्हणाली; "काका, हे माझे सर आहेत. व्यास सर. सिध्दार्थला ते ओळखतात. त्याला भेटायला आले आहेत ते."
"ओह! ठीक ठीक. म्हणजे तुमच्या गप्पा आता मस्त रंगतील न? एन्जॉय. सर, आता तुम्ही इथे आला आहात तर सिध्दार्थ कुठेही बाहेर जाणार नाही. बरं, मग मी जरा ऑफिसला जाऊन येतो." असं म्हणून ते लगेच निघाले देखील.
व्यास मुनींनी एकदा कृष्णाकडे बघितलं आणि म्हणाले; "हेच सांगायचा प्रयत्न मी करतो आहे. बघ! सिध्दार्थच्या वडिलांचा त्यांच्या कामावर दृढ विश्वास आहे; भक्ती करतात ते त्यांच्या कामाची.. त्यामुळे त्यांच्या समोर साधारण त्यांच्याच वयाची व्यक्ती दिसल्या क्षणी त्यांना आपल्या विश्वासाच्या किंवा भक्तीच्या मागे जाणं जास्त योग्य वाटलं. 'भक्ती' हा शब्द तुम्ही कशा प्रकारे समजून घेता त्यावर 'विश्वास' ही भावना अवलंबून आहे."
एक अत्यंत वेगळा विचार समोर घडलेल्या घटनेतून इतक्या सोप्या प्रकारे त्यांनी सांगितला होता की कृष्णा एकदम सीमित झाली. तिला भानावर आणत मुनी व्यास म्हणाले; "आपण इथे सिध्दार्थला भेटण्यास आलो आहोत मुली."
कृष्णाने पुढे होत त्यांना सिध्दार्थच्या खोलीकडे आणले आणि दार उघडत ती म्हणाली; "सिध्दार्थ, माझ्या सोबत...."
"गुरुवर्य अखेर आपण आलात!" कृष्णाचं वाक्य अर्धवट तोडत सिध्दार्थ पलंगावर उठून बसत म्हणाला.
"पुत्रा, मी येईन हे वचन दिलं होतं तुला स्वप्नात; आणि मी अशा कालातील आहे की चुकून झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग करतो." मुनी व्यास खोलीमध्ये येत म्हणाले.
कृष्णला त्या दोघांच्या बोलण्यावरून अंदाज आला की सिध्दार्थला स्वप्नामध्येचं मुनी व्यास त्याला भेटायला येणार आहे हे कळले होते. ती काहीएक न बोलता सिध्दार्थच्या शेजारी जाऊन बसली.
"सिध्दार्थ, मुला 'स्वप्नात देखील दिलेलं वचन आम्ही पाळतो' याचा अर्थ तुला समजला आहे का?" मुनी व्यास सिध्दार्थ समोर बसत म्हणाले.
"होय गुरुवर्य." सिध्दार्थने तात्काळ उत्तर दिले.
सिध्दार्थने दिलेल्या उत्तराने कृष्णा एकदम चमकली. त्यावर तिच्याकडे बघत मुनी व्यास म्हणाले; "मुली थोडा धीर धर आणि तुला सर्वच विषयांची उकल होईल." एकदा कृष्णाकडे बघून सिध्दार्थने बोलायला सुरवात केली.
"गुरुवर्य, अपघातानंतर मी घराबाहेर पडू शकत नाही हे मला लक्षात आले. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. पण मग माझ्या मनात आलं, कदाचित या सक्तीच्या विश्रांतीचं देखील काहीतरी प्रयोजन असेल. मी गेली अनेक वर्षे योगाभ्यासकरतो आहे; त्यामुळे ध्यानस्थ बसणे; ज्याला आजच्या आमच्या युगामध्ये मेडिटेशन म्हणतात; सुरू केले. अगोदर काही मिनिटांचे ध्यान करणे मी आत्मसद केले. त्यानंतर हळूहळू मी वेळ वाढवायला लागलो. गुरू कृपाचार्यांनी सांगितले होते की; आत्मविश्वास आणि स्वप्रजल्पनं.... स्वतःशी साधलेला संवाद.... ही दोन सुखी मानवीय आयुष्याची सत्य आहेत. याची अनुभूती मला हळूहळू यायला लागली. मुनिवर, यातूनच मला तुमच्या पर्यंत मनोबलाने पोहोचता आलं. अत्यंत खेदाने मला सांगावंसं वाटतं गुरुवार की या मात्र आजचा मानव या दोन सत्यांपासून दूर जातो आहे; हे दुर्दैव आहे."
"मुला, स्वप्रजल्पनं असणे आणि स्वकेंद्री असणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. याचं अत्यंत योग्य उदाहरण म्हणजे महात्मन बिभीषण. रावणासारखा अत्यंत हुशार आणि दशग्रंथी ब्राम्हण; मात्र त्याने लंकेचा उत्कर्ष घडवून आणला आणि स्वप्रजल्पनं ह्रास पाऊन केवळ स्वकेंद्री मानसिकता राहिली त्याची. त्याचे फळ देखील त्याला मिळालेच. बिभीषणांच्या बाबतीत मात्र त्यांनी स्वप्रजल्पनं कधीच सोडले नाही. म्हणूनच श्रीरामांनी ज्यावेळी त्यांना चिरंजीवित्व बहाल केले त्यावेळी त्यामागील मतितार्थ ते समजू शकले होते. किंबहुना म्हणूनच त्यांची याकाळातील किंकर्तव्यमूढता जास्त समजून घेतली जाऊ शकते.
जे सत्य बिभीषणासाठी अबाधीत होतं तेच सत्य बळी राजाच्या बाबतीत देखील लागू होतं. मात्र बळी राजाचा प्रवास स्वकेंद्रीपणा पासून सुरू होऊन स्वप्रजल्पनं पर्यंत येऊन थांबतो. म्हणूनच कृपाचार्य हस्तिनापुराचे राजगुरू होऊ शकले." आपण जे बोलतो आहोत ते सिध्दार्थ आणि कृष्णाला पटतं आहे का याचा अंदाज घ्यायला मुनी व्यास थांबले.
"मुनिवर, गेल्या काही दिवसातील अनुभवांमुळे आम्ही दोघेही समोरच्या व्यक्तीचे विचार स्विकारण्याच्या मानसिकतेमध्ये आलो आहोत. अर्थात सत्यासत्यता समजून घेतल्या नंतरच." मुनिवर बोलण्याचे का थांबले असावेत याचा अंदाज घेऊन कृष्णा म्हणाली.
"मुली, तू आत्ता जे बोललीस न त्यामुळे महात्मन परशुरामांचा निर्णय योग्य होता हे मला पुन्हा एकदा पटलं." मुनी व्यास म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून कृष्णा आणि सिध्दार्थ एकदम गोंधळले.
"मुली, भगवान परशुराम यांनी तुला सांगितलं होतं स्वतःला दुय्यम स्थान देऊ नकोस; तू सिध्दार्थहून कोणत्याही बाबतीत कमी नाहीस.. ज्यावेळी या काळातील कोण? असा आम्ही विचार केला त्यावेळी केवळ सिध्दार्थ नाही तर त्याच्या बरोबरीने विचारपूर्वक पाय उचलणारी अशी तू असू शकतेस हे परशुरामांनी आम्हाला संगीतलं होतं.
बरं, नमनालाच घडाभर तेल घटल्यासारखं झालं आहे. माझी आणि तुमची भेट का व्हावी याचं कारण अगोदरच ठरलेलं आहे. त्यानुसार मी माझे विचार तुमच्यासमोर मांडतो आहे...."
असं म्हणून मुनिवर पद्मासन घालून बसले आणि बोलायला सुरवात केली;
आपल्या हिंदू संस्कृतीला स्वतःच्या अस्तित्वावर इतका विश्वास होता की आपण आपल्या धर्मचा प्रचार करण्याचा विचार कधीही केला नाही. परंतु त्याचा परिणाम असा झाला की पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली आपली संस्कृती आज आपण परदेशीय लोकांडून समजून घेतो आहोत. किती मोठा ह्रास आहे हा आपल्या अस्तित्वाचा. आजच्या पिढीतील अनेकांना 'मी नास्तिक आहे'; हे बिरुद मिरावण्यास आवडतं. मात्र नास्तिकता म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर आस्तिकता समजून घेणे जास्त महत्वाचे वाटते मला. मी नास्तिक आहे, धर्म, जात, असमानता मी मानत नाही... असं म्हंटलं की कोणतीही गोष्ट नाकारणे सोपे जाते. प्रामुख्याने धर्म आणि जात या दोन्ही विषयी जितक्या जोरात नकारात्मक तुम्ही बोलाल तितके जनमानसात चर्चिले जाल; ही मानसिकता तर सर्वात धोकादायक.
आपला उज्वल इतिहास बघितला तर सम्राट शंतनु यांनी एका मासे पकडण्याऱ्या स्त्रीशी लग्न केलं. माझा जन्म त्याच स्त्रीच्या गर्भातून आहे. माता सत्यवती आणि पराशर मुनींचा मी पुत्र आहे. म्हणजे मी जन्माने कोळी पुत्र असलो तरीही स्वकर्तृत्वावर महर्षी पदाला पोहोचलो आहे. आज ज्या live in नात्याबद्दल नकारात्मक भावनेने चर्चिले जाते ते त्याकाळात स्त्री-पुरुषाच्या इच्छेचा भाग होता. त्यामुळे सामाजिक बंधनांचा ह्रास होत नव्हता. विवाह संस्था देखील तितक्याच ताकदीने अस्तित्वात होती. याचाच अर्थ स्वीकाराह्यता होती मानवात. जी आजच्या काळात नाहीशी झाली आहे.
विदुर अंबालिकेच्या दासीला माझ्याकडून प्राप्त झालेले पुत्र आहेत. तसेच धृतराष्ट्र आणि पांडू देखील अनुक्रमे अंबिका आणि अंबालिकेला झालेले माझेच पुत्र आहेत. विदुर महान पंडित म्हणून ओळखले गेले तर धृतराष्ट आणि पांडू महान क्षत्रिय होते.
त्यानंतरच्या पिढीतील भीमाने वनवासी हिंडीबेशी विवाह केलाच न! पुत्र प्राप्ति नंतर भीम परत निघून आला. हिडिंबेने स्त्रीसत्ताक राज्य पद्धती सुरू करून आपल्या पुत्राला उत्तम युद्धनीती शिकवली. तोच भीम आणि हिडिंबेचा पुत्र पुढे महाभारतीय युद्धात पांडवांच्या बाजूने लढला.
स्वतः श्रीकृष्णाने राजपुत्र असून दूध विकणाऱ्या पुरुषांसोबत काम केले; तर बलराम शेती करत असत.
थोडक्यात सांगायचं तर पुराण काळापासूनच कोणतीही व्यक्ती जन्माने त्यांच्या आयुष्याचं कर्तव्य ठरवत नसे... तर त्याचे कर्तव्य त्यांची ओळख ठरवत असे.
परंतु आज मात्र धर्म, जात, लिंगभेद यामध्येच समाजमन अडकून गेलं आहे. त्यामुळे प्राचीन इतिहास असणाऱ्या स्वतःच्याच धर्माचा अभ्यास करण्याची इच्छा आणि उर्मी उरलेली नाही. मुलांनो.... स्वतःच्या मूळ अस्तित्वाचा जेव्हा आपल्याला विसर पडतो आणि आपण ते नाकारू लागतो त्यावेळी मनुष्य कर्तव्यहीन आणि अल्पायु होतो. हाच मोठा फरक आहे... चिरंजीवित्व आणि मानवीय आयुष्यात.
त्यामुळे मी चार वेदांचा रचिता मुनी व्यास... सातवा चिरंजीवी तुम्हा दोघांना हा आदेश देतो आहे की हा धर्माचा आणि पर्यायाने मानवीय अस्तित्वाचा होणारा ह्रास थांबवा. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं ते तुम्हाला नक्की सुचेल. कधीतरी मार्ग अवघड होईल... कधीतरी तो खुंटला आहे असं वाटेल. पण चालत राहा! कधीही विसरू नका की एखादं दार बंद झालं तर दुसरं नक्की उघडलं जातं. फक्त आपण डोळे उघडे ठेवून दार बंद होऊ द्यायचं नाही; आणि झालंच तर दुसरं दार शोधण्यास सुरवात करायची."
सिध्दार्थ आणि कृष्णला व्यास मुनींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटली होती. मात्र इतक्या मोठ्या विषयाला हात कसा घालायचा हा प्रश्न होता. अर्थात कालौघात सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात यावर त्यांचा विश्वास होता.
क्रमशः