एक red wine नातं (भाग 9)
जीवापाड जपत होती ती ते red wine नातं. वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत होती ती त्याच्याकडे. कधी पाठवलेले मोठे मोठे मेल्स तर कधी व्हाट्सऍप वर लिहिलेल्या कविता. नवऱ्या सोबत केलेल्या टूर्सची सुंदर मोहक वर्णनं, लेकाचं मोठं होणं आणि त्यासोबत तिची त्याच्याशी होत असलेली मैत्री! सगळं सगळं लिहीत होती ती त्याला आणि भरभरून रिक्त होत होती.
एकदिवस ती नात्यातल्या एका समारंभासाठी ट्रेनने जात होती. आपल्याच तंद्रीत ती बसली होती. अचानक तिचं लक्ष डब्यातल्या एका बाईकडे गेलं. आनंदाने ती एकदम चित्कारलीच! तिची शाळेतली लाडकी मैत्रीण प्रणिता बसली होती. डब्यातली गर्दी... परत बसायला जागा मिळणार नाही याची जाणीव सगळं विसरून ती एकदम धावली प्राणिताकडे. तिच्या त्या गर्दी चिरत येण्याकडे प्राणिताचं देखील लक्ष गेलं. तिचा चेहेरा देखील आनंदाने फुलला. त्यानंतर दोघी आजूबाजूचं जगच विसरल्या जणू. येणाऱ्या प्रत्येक स्टेशनचं नाव ऐकायला येत होतं म्हणून... नाहीतर त्यांचं स्टेशन देखील चुकलं असतं. प्रणिताचं स्टेशन तिच्या अगोदर आलं आणि तिला घट्ट मिठी मारत आणि परत नक्की भेटायचं आश्वासन देत प्रणिता ट्रेनमधून उतरली. प्रणिता गेली आणि तिचा त्या समारंभासाठी जाण्याचा उत्साहच ओसरून गेला. पण तरीही जावं लागणारच होतं. ते आपल्याकडे कित्येकदा येऊन गेले आहेत. लेकाला गिफ्ट दिलं आहे... त्याची परतफेड नको का! तिच्या मानत आलं आणि इच्छा नसूनही ती त्या समारंभात सामील झाली.
मात्र त्या रात्री परत एकदा एक कविता व्हाट्सऍप वरून प्रवास करत त्याच्याकडे गेली होती.
एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली...
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली!
ऑफिसची वेळ; नवऱ्याचा डबा...
पोरांची शाळा; boss चा चेहरा..
आठवलं क्षणात सारं; अन् पाठ केली तिच्याकड़े...
थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवलं तिचं हिरामुसणं फुगणं...
पण वेळ नव्हता मला... मनात होतं office ला वेळेत पोहोचणं!
संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या confusion मध्ये होती;
मी हसले... तशी ती पण हसली...
पटकन् जवळ येउन कुशीत शिरली..
'कळत ग मला तुझ्या असण्याचं महत्व...
सुटत नाही पण हे संसाराचं देणं'
तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटलं;
Station आलं म्हणून स्वतःला आवरलं.
ती हसली ... समजूतदार आहे पठ्ठी!
तिच हो ती...
कुमारी मैत्री विश्वास आठवणी!!!
'तुझ्या कवितांमध्ये चटका लावणार सत्य असतं एकएकदा. पण लिहीत जा... जे आणि जसं मानत येईल ते आणि तसं. पण एक सांगू? मला न तुझ्या त्या रोमँटिक आणि हळुवार प्रेम व्यक्त करणाऱ्या कविताच जास्त आवडतात.' त्याचं उत्तर आलं दुसऱ्या दिवशी आणि ती परत एकदा खुदकन हसली.
***
आता तशी ती बरीच मोकळी व्हायला लागली होती. त्यामुळे ते रिकामपण अस्वस्थ करायला लागलं होतं तिला. तिच्या मेल्स मधून ते त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं. एकदिवस त्याचा मेसेज आला....
तुझ्यासाठी एक gift पाठवलंय कुरियरने. मिळालं की नक्की कळव.
त्यानंतर ती रोज कुरियरची वाट बघत होती. पुढचे पाच दिवस खूपच वेगळे गेले तिचे. मनातली उत्सुकता तिला चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती. कारण तिच्या चेहऱ्यावर होणाऱ्या लहानात लहान बदलांनी देखील तिचा नवरा अस्वस्थ होत होता. तिला कळत होतं की हे त्याचं प्रेम आहे तिच्यावरचं. तिचं देखील प्रेम होतंच की त्याच्यावर. पण लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर त्या प्रेमावर इतर अनेक भावनांची पुटं चढली होती. त्यामुळे तो जसं त्याचं प्रेम केवळ अस्वस्थतेतून दाखवत होता तशी ती तिचं प्रेम तिची सगळी कर्तव्य पूर्ण करून दाखवत होती. याहून जास्त काही तिला देता येत नव्हतं आणि त्याला हवं असून मागता येत नव्हतं. तिच्या बाजूने तिने सोपा मार्ग काढला होता... न बोलण्याचा!
कुरियर आलं आणि तिने ते अगदी परकरी मुलीच्या उत्सुकतेने उघडलं. हातातलं गिफ्ट बघून ती हरकून गेली होती. ते एक अप्रतिम सुंदर मुखपृष्ठ असलेलं पुस्तक होतं..... तिच्या कवितांचं!!!!
त्याच्या मेसेजमध्ये असंख्य लाल हर्ट्स होती.... ती सर्वात सुंदर पोचपावती असावी जगातली!!!
***
दोनच दिवसांनी तिला मेल आला त्याचा. यावेळी परत घोळ झाला आहे... म्हणजे मीच केला आहे. बडा ही बलंडर हुई गवा है। अग, तुझ्या कवितांचं पुस्तक एका मित्राच्या मदतीने बनवलं होतं आणि तुझा पत्ता देऊन त्यालाचं कुरियर करायला सांगितलं होत. जेणेकरून घरी कळणार नाही. पण त्या मूर्खाने receipt delivery चा पत्ता माझ्या घराचा टाकला. मी घरी नसताना दुपारी आली पोचपावती! आता ही पावती मला पोहोचवणार बहुतेक!!! पण काळजी करू नकोस.... काही दिवस मी तुझा नंबर ब्लॉक करतो आहे. मेल्स पण नाही. कोणताच संपर्क नसेल. सगळं ठीक होईपर्यंत तू कोणत्याही प्रकारे मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस. सगळं ठीक झालं की मी फोन करीन. फोनच करीन. माझ्या मेल्सना किंवा मेसेजना मुळीच उत्तर देऊ नकोस. माझ्याकडून मेल्स किंवा व्हाट्सऍपवरून मुद्दाम मेसेज करून घेतले जातील... म्हणून ही काळजी घ्यायला सांगतो आहे.
राणी.... बोललो नाही तरी माझ्या मनात तू कायम आहेस!! मला माहीत आहे की तुला हे माहीत आहे.... पण तरीही!!!
bye माझ्या जीवा!!!
***
तो मेल तिने किती वेळा वाचला असेल ते मोजणं तिने बंद केलं होतं. कारण गेल्या सहा महिन्यात त्याने एकदाही फोन केला नव्हता. बाकीचे कॉन्टॅक्ट करण्याचे प्रकार तर अशक्यच होते.
आज परत ती नरिमन पॉईंटवर एकटी येऊन बसली होती. किती वर्ष होतो बरं आपण एकत्र??? ती गणित लावत होती... बारा वर्ष! एक तप!!! आणि आता सहा महिने झाले..... एका कागदाच्या तुकड्याने संपलं सगळं? हम्म!!!
तिचे डोळे ओले होते... आयुष्यातला एक गोड ओलावा हरवला म्हणून; आणि त्या ओलाव्याच्या सोबतीने फुलणारी तिच्यातली मुलगी आता एकटी पडली होती म्हणूनही!
समोर ओहोटीचा समुद्र सोनेरी गोळा पोटात घेत दूर जात होता.... किनाऱ्याकडे येणारी प्रत्येक लाट एकमेकांत मिसळत असूनही मागे सरकत होती.... आणि ती.... पुढे काय? या विचारांनी मनातून हलली होती. तिच्याही नकळत तिने तिचं लाडकं गाणं लावलं. तिचं! फक्त तिचं असं! आजवर तिने कधीच कोणाशीही ते शेअर केलं नव्हतं. तिच्या मनात आलं.... कदाचित आजसाठीच आणि पुढच्या प्रवासाची सोबत म्हणून आपण हे फक्त स्वतःसाठी ठेवलं होतं!
समाप्त
https://youtu.be/hBvdIsBmQ6g
अप्रतिम लिहिले आहेस ज्योती
ReplyDelete