Friday, May 6, 2022

अनाहत सत्य (भाग 23)

 अनाहत सत्य

भाग 23

"सुमंत कल्याण, काहीतरी घडतं आहे तिथे." नाथाच्या आवाजात काळजी होती. त्याचा परिणाम सुमंतांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

"काहीतरी म्हणजे काय नाथ? थोडं स्पष्ट सांगशील का?" सुमंत कल्याण यांनी थोड्या करड्या आवाजात प्रश्न केला.

"मलाही नक्की काय ते माहीत नाही. पण भीमा आणि राजकुमार यांचं बोलणं मी ऐकलं. थोडा दूर होतो त्यामुळे पूर्ण कळलं नाही; पण राजकुमारांच्या मनात अपालाला घेऊनच तिथून निघायचं आहे. बहुतेक तीक्ष्णाचा याला विरोध आहे. भीमा राजकुमारांना मदत करायला तयार आहे. हे सगळं घडणार आहे ते नजीकच्या काळात. कारण श्रीशिव मंदिराचं काम पूर्ण होत आलं आहे." नाथाने माहिती दिली.

सुमंत विचारात पडले. 'जर काम पूर्ण होत आलं आहे तर याची कल्पना महाराजांना नक्की असणार. कदाचित म्हणूनच तीक्ष्णा महाराजांना भेटून गेली असावी. राजकुमारांना जर याची कल्पना असेल तर ते नक्कीच अपालाला सोबत घेऊनच तिथून बाहेर पडतील. अर्थात एकदा काम पूर्ण झाल्यानंतर जर अपालाने राजकुमारांसोबत रहाण्याचा निर्णय घेतला तर तीक्ष्णाची हरकत का असावी? अपाला स्वतःचे निर्णय घेण्याइतकी सक्षम नक्कीच आहे. तीक्ष्णा आणि तिच्या सोबत आलेले सर्वच लोक बरेच वेगळे आहेत आणि कदाचित ते कायमच एकत्र प्रवास करणारे कारागीर असतील देखील; पण तरीही जर त्यांच्यामधील एखाद्या व्यक्तीने स्वतःचा असा काही निर्णय घेतला तर तो इतर कोणी अमान्य का करावा? याचा अर्थ असा तर नव्हे की ते ज्या सामाजिक व्यवस्थेत राहातात तिथले नियम वेगळे आहेत. जर तसं असेल तर मग शोध घेणं आवश्यक आहे.'

सुमंत कल्याण नाथाकडे बघत म्हणाले; "नाथा आता यापुढे तू राजकुमारांची सावली बनून राहा. मी तुझ्या सोबत अजून एकजण जोडतो. म्हणजे तुला नगरापर्यंत येण्याची गरज उरणार नाही. त्याच्या सोबत तू निरोप पाठवत जा."

"सुमंत, मला खरंच सोबतीची गरज नाही. मी सर्व काळजी घेईन आणि आपल्यापर्यंत सर्व माहिती योग्य वेळी पोहोचवत जाईन." नाथा म्हणाला.

सुमंत कल्याण यांनी नाथाकडे अत्यंत धारदार नजरेने बघितलं. ते काही क्षण काहीच बोलले नाहीत. पण मग जेव्हा ते बोलले त्यावेळी त्यांचा आवाज अत्यंत हळू होता पण त्यांच्या आवाजातील धारेने नाथाचं मन चरकलं. ते म्हणाल; "नाथा, मी तुला विचारत नाही आहे; सांगतो आहे. तुझ्या सोबत एक व्यक्ती यापुढे राहणार आहे. मी तुला मागे एकदा देखील सांगितलं आहे. राजकुमारांचा मित्र असल्याची तुला फक्त बतावणी करायची आहे. याचा अर्थ तू खरा मित्र नाही होत त्यांचा. त्यामुळे मी जे आणि जसं सांगेन तसंच ते घडलं पाहिजे." नाथाने मान खाली घालून समजल्याची मान हलवली आणि तो तिथून मागील पावली निघाला.

***

राजकुमार गोविंद अपालाला शोधत होता. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला अपाला आणि कुंजर एकत्र एका झऱ्याच्या काठावर खेळताना दिसले. त्यांना हसताना बघून गोविंदच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या जवळ जात तो देखील त्यांच्या सोबत खेळण्यात रमला. खेळता खेळता कुंजरने गोविंदला प्रश्न केला; "तात, आता आपण इथून जाण्याचा काळ जवळ येतो आहे असं मला भागीनेय अपाला म्हणाली. ते जर खरं आहे तर तुम्ही तुमच्या तातांना सोडून येणार का? मग त्यांना तुमची आठवण आली की ते काय करतील? त्यांनी नाही म्हंटलं तर मग? मग इथून गेल्यावर मला तुमची आठवण येईल... तेव्हा मी काय करायचं?" कुंजरचे प्रश्न संपत नव्हते आणि हाताने पाणी उडवणं थांबत नव्हतं. मात्र त्याच्या त्या प्रश्नांनी गोविंदला मोठा धक्का बसला. त्याने अपालाकडे वळून बघितलं. आज मुद्दाम कुंजर सोबत खेळण्यासाठी वेळ काढून अपालाने गप्पांमधून त्याला कल्पना द्यायला सुरवात केली होती की आता आपण इथून निघणार आहोत. आपण हे सर्व गोविंद सोबत देखील बोलून घेतलं पाहिजे याची तिला कल्पना होती. त्यामुळे ती आज त्याच्याकडे देखील विषय काढणार होती. मात्र कुंजरने अचानक प्रश्न विचारून गोविंद आणि अपाला या दोघांनाही धर्मसंकटात टाकलं होतं.

"अपाला...." गोविंद अपाला समोर जाऊन उभा राहिला.

"राजकुमार यावर आपण बोलू.... बोललंच पाहिजे.... पण आत्ता इथे नको. कुठे आणि कधी याबद्दल मी नक्की सांगेन. पण तोपर्यंत याविषयी कोणाशीही बोलू नका. अगदी भिमाशी देखील." अपाला म्हणाली आणि अचानक उठून निघून गेली. गोविंद ती गेली त्या दिशेने बघत राहिला.

***

"भीमा, माझं काम संपत आलं आहे. मुळात माझी संकल्पना जरी तीक्ष्णाला अमान्य असली तरी भूतप्रमुखांना मान्य आहे. विशेषतः धराभूतप्रमुख आणि वायूभूतप्रमुख यांनी तर संपूर्ण कल्पना उचलून धरली आहे. मात्र तरीही..." अपाला पुढे काही सांगणार होती इतक्यात भीमाने तिला अडवलं आणि विचारलं; "तू नक्की कोणत्या संकल्पनेबद्दल बोलते आहेस अपाला? मला माहीत आहे की वायुविजन या एकाच कामासाठी तुझी नेमणूक झाली होती. हे देखील माहीत आहे की मंदिराचे बांधकाम होत असताना तुझ्या हाताखाली देखील काही विशेष कामकरी होते; जे संपूर्णपणे तू सांगशील तेच काम करत होते. परंतु तरीदेखील तुझं काम नक्की काय आहे ते मला अजूनही कळलेलं नाही." भीमा म्हणाला.

"भीमा, तुला कल्पनाच आहे की आपल्या भूगर्भातील नगराच्या वायुवीजनासाठी काहीतरी सोय होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यासाठी मी अत्यंत सोपी योजना आखली होती. या सर्व गुंफा आणि सभोवतालचा परिसर... इथे बांधल्या जाणाऱ्या मंदिरामुळे हा भूभाग भविष्यकाळात अति चर्चित राहणार आहे. अर्थात तो तसा असावा हीच आपली इच्छा आहे. जितका जास्त मनुष्य वास तितके आपणास नक्षत्रांशी संपर्क करण्यास योग्य वातावरण राहणार आहे. परंतु या अति चर्चित भूभागामुळे आणि मनुष्यवासामुळे माझं काम अवघड होऊन गेलं होतं. सुरवातीस मी काही मनोरे निर्माण केले होते; जेणेकरून सूर्यप्रकाश आणि वायुवहन दोन्ही अत्यंत योग्य प्रकारे आपल्या नगरापर्यंत पोहोचणार होतं. मात्र हळूहळू माझ्या लक्षात आलं की या मनोऱ्यांमुळे आपलं अस्तित्व भविष्य काळात धोक्यात येऊ शकतं. भविष्यातील मानव आकाशाला आणि अवकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे; असा कयास भूतप्रमुखांनी बांधला आहे. याकाळातील मानव जसजसा प्रगत होत जाईल तसतसा तो अनंताचा आणि अज्ञाताचा शोध घ्यायला सुरवात करेल. मूलतः मनुष्य स्वभावच तसा आहे नाही का? मनुष्याला कायमच गूढ, अगम्य आणि अनाहत अशा सर्वस्वाची ओढ असते. त्यातून हे मनोरे जरी या कड्यांमधून निर्माण केलेले असले आणि संपूर्णतः नैसर्गिक निर्मिती वाटावी इतके योग्य काम केले असले तरी पुढे मानव कोणत्या थरापर्यंत शोध घेऊ शकेल याला मर्यादा नाही.

भीमा तुला आठवतं.... काही हजार वर्षांपूर्वी मानवीय संस्कृती तिच्या अत्यंत उच्चतम बिंदूला पोहोचली होती; उत्तम नगरविकास आणि पर्जन्यजल विकास त्यांनी केला होता. त्यामुळे उत्तम जीवन जगत होते ते. मात्र हळूहळू ते हे विसरले की त्यांना निर्माण निसर्गाने केलं आहे. आपण निसर्गाला जपलं पाहिजे आणि वृद्धिंगत केलं पाहिजे; याचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी निसर्गाला गवसणी घालण्याचा चंग बांधला होता; त्यावेळचा मानव वेगळा होता. त्यावेळी त्यांनी भूगर्भातील अनेक सत्य भूतलावर आणली होती; कारण त्यांना भूगर्भातील गूढाचा शोध घ्यायचा होता. त्यातीलच एका टप्प्यात त्यांनी आपला शोध जवळ-जवळ लावलाच होता. भावनिकतेच्या आहारी जाऊन निर्णय घेणाऱ्या मानवापासून दूर रहाणं या आपल्या उद्देशाला त्यामुळे धक्का लागणार होता. त्यावेळी देखील मी आपल्या नगररचनेच्या कामामध्ये तीक्ष्णासोबत काम करत होते. माझ्या हातून एक चूक झाली होती; आणि त्यामुळे आपल्या अस्तित्वाची दारं या मानवांसाठी उघडली गेली होती. अर्थात त्याचवेळी मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळल्यामुळे भूतलावरील प्रगत मानवीय अस्तित्व संपूर्णत: भूगर्भात सामावलं गेलं.

पण मला त्यावेळची चूक परत होऊ द्यायची नव्हती. म्हणूनच अगोदर ज्या मनोऱ्यांचा विचार मी केला होता; ते मनोरे उभे करण्याचा निर्णय मी बदलला. परंतु सुरवातीला मनोरे तयार करण्याचा निर्णय भूतप्रमुखांकडून मान्य करून घेणं आणि ते काम सुरू झाल्यानंतर आपल्याच कामातील चुका त्यांच्या समोर ठेऊन ते काम थांबवणं; यातच माझी सुरवातीची अनेक वर्ष निघून गेली. मला कळतं रे भीमा, या माझ्या चुकलेल्या निर्णयामुळे भागीनेय तीक्ष्णा माझ्यावर नाराज झाली. तिच्या त्या नाराजीमुळे पहिल्यांदा मला दुःखाची भावना खोलवर स्पर्शून गेली. कदाचित त्यामानसिकतेमध्ये मी असताना गोविंद इथे आले आणि म्हणून मी केवळ शारीरिक आकर्षणापुढे जाऊन त्यांच्यात गुंतले. अर्थात त्याचा परिणाम मी माझ्या कामावर कधीही केला नाही. तीक्ष्णाला ते चांगलंच माहीत आहे; परंतु तरीही ती माझ्यावर नाराज आहे.

तिच्या मते मी गोविंदमुळे माझ्या अस्तित्वाबद्दलचे निर्णय बदलणार आहे. भीमा; खरं सांगायचं तर मला गोविंद सोबत कायमस्वरूपी राहायला आवडेल. पण तरीही मी माझी जवाबदारी दूर करून हा निर्णय घेणार नाही. अर्थात यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. दुर्दैवाने मात्र मी कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही रे." अपाला बोलायची थांबली आणि कधी नव्हे ते तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते पाहून भीमा देखील मनातून हलला.

तिच्या जवळ जाऊन तिचे डोळे पुसत तो म्हणाला; "अपाला, तुझे माझे बंध खूप वेगळे आहेत. ते काय आहेत ते तू किंवा मी इतर कोणालाही सांगण्याची गरज नाही. अर्थात तू जे म्हणते आहेस ते सत्य आहे. तू कोणता नवीन उपाय केला आहेस ते मला माहीत नाही. पण भूतप्रमुखानी तो स्वीकारला आहे; हे मला कळलं आहे. मंदिराचं काम देखील पूर्ण झालं आहे. आता आपण इथून सर्व आवरून घेऊन परतीचा मार्ग घेण्यास सुरवात करायची आहे. त्यामुळे तुझं हे असं भावनिक होणं तुझ्या निर्णयाच्या आड येईल; हे विसरू नकोस. अपाला; आपलं आयुष्य वेगळं आहे. तुझा कुंजर आजच्या मानवाचा अंश घेऊन जन्मला असला तरी तो तुझ्या वळणावर गेला आहे. तो पुढे जाऊन परत एकदा भूतलावर अवतरणार आहे; आणि त्यावेळी तो संपूर्ण मानवीय समाजाला जागं करणार आहे. अर्थात हे सगळं पुढचं."

भीमा अचानक बोलायचा थांबला हे अपालाच्या लक्षात आलं. तिने नजर उचलून त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातील बदललेले भाव बघून ती स्थिर झाली.

अचानक भीमा अपाला पासून दूर झाला. त्याने आवाजातील गंभीरपणा काढून टाकून आणि तरीही काहीतरी अत्यंत महत्वाचं बोलत असल्याचा भाव आणि आव चेहेऱ्यावर आणला आणि म्हणाला; "अपाला, तुझं कार्य पूर्ण झालं आहे; याची कल्पना तू भागीनेय तीक्ष्णाला देणं अत्यंत आवश्यक आहे. भागीनेय तीक्ष्णा महाराजांना भेटून आली आहे. आपल्या इथल्या कामाचा संकल्प पूर्ण झाल्याची कल्पना तिने महाराजांना दिलीच असेल. याचाच अर्थ आपण आता इथून परतागमन करणार आहोत; हे सत्य आहे. तू देखील तुझ्या भावना आवर आणि योग्य तो निर्णय घे. मी तुला इतकंच सांगेन." असं म्हणून भीमा उठला आणि निघून गेला. मात्र जातानाच त्याने अपालाला डोळ्यांनी खुण केली होती... भीमा गेल्या नंतर अपाला मान खाली घालून बसून राहिली. थोड्या वेळाने तिला डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून हालचाल जाणवली. तिने केवळ त्या हालचाली वरून ओळखलं होतं की लपून नाथ भीमा आणि तिचं बोलणं ऐकत होता. अपालाने याविषयी गोविंदशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि ती उठली.

क्रमशः

No comments:

Post a Comment