Friday, February 21, 2020

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर.. #वाराणासी दर्शन!

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते. #नमामिगंगे कार्यक्रमाबद्दल माहिती वाचल्यापासूनच मनात होतं की परत एकदा #वाराणासी ला जाऊन आलं पाहिजे. एकदिवस सहज ठरवलं आणि तिकीट काढून निघाले. निघताना पंधरा वर्षांपूर्वीच्या #वाराणासी च्या आठवणी सोबत होत्या. #गंगाआरती, वारणासीचा बाजार, रस्ते.... अस्वच्छता, गर्दी, धक्काबुक्की आणि मुलांना सांभाळत #गंगाआरती नंतर मनाचा हिय्या करून गंगेच्या त्या काळ्या पाण्यात तीन वेळा मारलेल्या डुबक्या... हे सगळं आठवत होतं. #वाराणासीच्या विमानतळावरून बाहेर पडले आणि स्वच्छ आणि चौपदरी रस्ते बघून मनाला दिलासा मिळाला. हॉटेलच्या दिशेने निघाले आणि आजूबाजूचा परिसर बघता बघता #वाराणासीच्या भूतकाळात हरवून गेले.

पौराणिक कथेमध्ये असा उल्लेख आहे की ब्रम्ह देवाने काशी येथे गंगे किनारी दहा अश्वमेध केले होते. त्यामुळे याठिकाणी गंगा स्नान केल्यास या दहा अश्वमेधांचे पुण्य मिळते. कदाचित म्हणूनच येथील अश्वमेध घाट हा खूपच महत्वाचा मानला जातो. पुढे श्री शंकर ब्रम्हाला भेटायला काशी येथे आले आणि त्यांना हा निसर्ग सुंदर परिसर आणि येथील पवित्रता खूप भावली. त्यांनी श्री ब्रम्हाकडून काशी मागून घेतली. तेव्हापासून श्रीकाशी क्षेत्र हे श्रीशंकराचे निवास्थान झाले.

तसं बघितलं तर #वाराणसी म्हणजे भारताचं किंबहुना जगभरातलं सर्वात प्राचीन शहर! इजिप्त, बगदाद, तेहरान, मक्का, रोम, एथेन्स, जेरुसलेम, बाईब्लोस, जेरिको, मोहन-जो-दारो, हडप्पा अशी अनेक शहरं जगातील प्राचीन शहरं म्हणून ओळखली जातात. मात्र पौराणिक आणि ऐतिहासिक सत्यता पडताळली तर जगातील सर्वात प्राचीन शहर हे #वाराणासी आहे. याचा उल्लेख इतिहासात देखील अगदी इसवीसनाच्या पुर्विपासूनचा आहे. जवळ जवळ तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी पासून या शहरात लोकांचा निवास होता याचे दाखले आहेत. आपल्या धर्मग्रंथांमधील उल्लेखाचा अभ्यास केला तर हे शहर पुराण काळात देखील अत्यंत श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जात होतं हे लक्षात येईल. महाभारत आणि उपनिषदांमध्ये देखील काशीचा उल्लेख झालेला आढळतो. भगवान बुद्ध, शंकराचार्य, वल्लभाचार्य, संत कबीर, गुरू नानक, तुलसीदास, चैतन्य महाप्रभू कालीदास असे अनेक महान संत या नगरमध्ये आले किंवा राहिले होते. संत तुलसीदासांनी रामचारीतमानस वाराणासी येथेच लिहून पूर्ण केले होते. गौतम बुध्दानी देखील बौध्द गया येथुन ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वाराणासी येथे येऊन त्यांचे पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले होते. हे शहर पुरातन काळापासून ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. महाभारत काळामध्ये काशीचा उल्लेख तीर्थक्षेत्र म्हणून आढळतो. मात्र त्याअगोदर आणि त्यानंतर देखील अनेक पिढ्यामध्ये तीर्थक्षेत्र हा विचार नव्हता असं लक्षात येतं. माहाभारत काळातील ब्राह्मवर्त हा उल्लेख आपण अनेकदा ऐकला किंवा वाचला आहे... हे ब्राह्मवर्त म्हणजेच आजची #वाराणासी... आपली काशी!



#काशी हे 'मंदिरांचे शहर', 'भारताची धार्मिक राजधानी', 'भगवान शिवाने वसवलेली नगरी', 'दिव्यांचे शहर', 'ज्ञान नगरी' अशा विविध टोपण नावांनी ओळखले जाते. #काशीचा पहिला उल्लेख अथर्ववेदामध्ये आढळतो. एका श्लोकामध्ये एका रोग्याला उल्लेखून म्हंटले आहे की त्याचा ज्वर दूर होवो आणि त्याचा प्रसार काशी, कोशल आणि मगध राजांमध्ये न होवो. इथे हे स्पष्ट होते की ही तीनही शहरे त्याकाळात देखील होती. एका पौराणिक कथेतील उल्लेखाप्रमाणे सत्रजीत राजाच्या पुत्राने शतानिकने काशिवासीयांच्या पवित्र यज्ञाच्या अश्वाला पकडून आपला अश्वमेध यज्ञ पूर्ण केला होता; आणि आपला पवित्र अश्व पकडला गेला या रागापाई काशिवासीयांनी अग्निकर्म आणि अग्निहोत्र करणेच सोडून दिले होते.

या पौराणिक उल्लेखांव्यतिरिक्त काशीचे ऐतिहासिक महत्व तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थी काशीला जाऊन गंगेत सोडल्या आणि त्यांच्या नावाने तेथे पिंड दान केले तर त्या मृत जीवाला स्वर्ग प्राप्ती होते अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. त्याशिवाय वृद्धावस्थेमध्ये संन्यस्त जीवन जगण्यासाठी काशीला जाऊन राहावं असा एक विचार देखील आहेच. काशी शहराचं पुराण आणि ऐतिहासिक काळातील शैक्षणिक महत्व तर जगद्सिद्धच आहे. अशा या #काशी #वाराणासी मधील #काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठी आणि त्याहूनही जास्त स्वच्छ गंगेच्या दर्शनासाठी मी निघाले होते.

दुपारी हॉटेलवर पोहोचून सामान टाकले. मला माझी उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे लगेच गंगा घाटाच्या दिशेने निघाले. खरं सांगू का... माझ्या मनातल्या पंधरा वर्षांपूर्वीच्या सगळ्या आठवणी आजच्या #वाराणासी ने साफ पुसून टाकल्या. संपूर्ण शहरात कमालीची स्वच्छता आहे. एका ठराविक अंतरापर्यंत चार चाकी वाहाने जाऊ शकतात, मग रिक्षा, मग बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा किंवा सायकल रिक्षांनाच परवानगी आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे इथले रस्ते फारच लहान आहेत. त्याच रस्त्यांवर कडेने अनेक भाजीवाले किंवा असंच काहीबाही विकणारे बसलेले असतात. त्यातच लोक चालत असतात. रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी असलेल्या दुकानातील गर्दी तर आपल्याला गोंधळून टाकते. मात्र आपण मजल-दरमजल करत गंगेच्या घाटाच्या दिशेने चालत राहावं. कोणतीही गल्ली शेवटी घाटाच्या दिशेनेच जात असल्याने ही गल्ली की ती गल्ली असा प्रश्नच उदभवत नाही. तरीही शंका आली तर शेजारून जाणाऱ्या कोणालाही तुम्ही फक्त 'गंगा घाट..' इतकंच म्हणा की तुम्हाला काही पावलं सोबत करून अगदी घाटाच्या जवळ नेऊन सोडलंच समजा.

संध्याकाळी पाचच्या सुमाराच्या घाटाचं दर्शन म्हणजे एक नेत्र सोहळाच आहे. रोज संध्याकाळी अगदी तिनशेपाशष्ट दिवस इथे #गंगाआरती होते. त्याची तयारी पाच वाजल्यापासूनच सुरू झालेली असते. एकूण सात पुरोहित षोडशोपचाराने गंगेची आरती करतात. संपूर्ण आसमंत एका वेगळ्याच पवित्र वातारणाने भारलेला असतो. आरतीच्या अगोदरची तयारी.... त्यानंतर धूप, दीपादीने सुरवात होऊन उच्च स्वरात महादेवाच्या जयजयकाराने आणि घंटानादाने होणारा शेवट म्हणजे नास्तिकाला देखील नकळत हात जोडायला लावणारा अनुभव आहे. गंगा आरती बघण्यासाठी वृद्धांसाठी खुर्चा तर इतर भाविकांसाठी चटया अंथरून बसण्याची सोय केलेली आहे. तसेच बोटींमधून देखील हा गंगा आरती बघण्याचा अनुभव घेऊ शकतो. प्रत्येक भाविकांच्या मनातला सात्विक आणि गंगेला समर्पित होण्याचा भाव जाणवत असतो. # गंगाआरती संपल्यानंतर हळूहळू घाट रिकामा व्हायला लागतो. त्यात देखील घाई नव्हती. त्यामुळे घाटावरून चालत गंगेचं मनोहर रूप मनात साठवत होते.

थोड्यावेळाने घाट अगदीच रिकामा झाला. मग श्रीकाशीविश्वेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणून निघाले. जसे सगळे रस्ते शेवटी गंगेच्या घाटाकडे वळतात; तसेच घाटाजवळील सगळ्या गल्ल्या शेवटी श्रीकाशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या दिशेने जातात. त्यामुळे कोणत्याही गल्लीमध्ये शिरून थोडं विचारत पुढे गेलं की मंदिर येतं. अर्थात मंदिर प्रवेश आणि विश्वेश्ववराचं दर्शन तसं सोपं नक्कीच नाही. मंदिरामध्ये कोणतीही चामड्याची किंवा धातूची वस्तू नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे बाहेर अनेक लॉकर्स उपलब्ध असतात तिथे आपल्या सगळ्याच वस्तू ठेवाव्या लागतात.... आणि इथून सुरू होतो आपल्या भावनांचा बाजार! लॉकर फुकट असतो मात्र देवाला नेण्याचा प्रसाद त्याच दुकानातून घ्यायचा असतो. त्याची किंमत तुमच्या वेशभूषेवरून ठरते. दर्शनाची रांग लांबच लांब असते. आपण शांतपणे रांगेत उभे राहातो... वेळ जात असतो आणि रांग फारशी पुढे सरकत नसल्याचे लक्षात आल्याने आपण अस्वस्थ व्हायला लागतो. तेव्हाच एक माणूस येतो. आपला वेगळा शहरिपणा ओळखून विचारतो की लवकर दर्शन करून हवं आहे का? मला काही नको... मात्र आत पुरोहितांना दक्षिणा द्यावी लागेल; ती तुम्हीच तुमच्या हातांनी द्या. रांगेत उभं राहून आपण कंटाळले असतो; त्यामुळे ते आपण लगेच मान्य करतो. प्रत्येक तपासणी द्वारातून तो आपल्याला अगदी सहज पुढे घेऊन जातो. जाताना उजवीकडे अन्नपूर्णा देवीचे मंदिर लागते. 'येताना देवीचे दर्शन नक्की घ्या;' असे सांगून तो आपल्याला पुढे जायला भाग पडतो. मुख्य विश्वेश्ववराचे दर्शन म्हणजे खरोखरच दिव्य आहे. खूपशा धक्काबुक्की नंतर तुम्ही अगदी गाभाऱ्यापर्यंत पोहोचता. पण तरीही आत जाणं अशक्य असतं. तेव्हाच कुठूनतरी तिथे 'मुख्य पुरोहित' येतो आणि तो तुम्हाला त्या गर्दीमधून आत घेऊन जातो. त्याच परिस्थितीत हातातील लोट्यामधून आणलेलं आणि धक्काबुक्कीमध्ये लोट्यामध्ये अगदी थोडंसं उरलेलं गंगाजल आपण श्रीविश्वेश्ववराच्या पिंडीवर ओतायचं. पिंडीला हात लावून नमस्कार करेपर्यंत जेमतेम तीन-चार सेकंद मिळतात आणि आपल्याला लक्षात यायच्या अगोदरच आपण बाहेर फेकले गेलेले असतो. मग आपल्या योग्यतेप्रमाणे पुरोहित सांगतो की त्याने किती अवघड असलेलं दर्शन आपल्याला सुलभ करून दिलं. ते मान्य करत आपण त्यांना दक्षिणा द्यायची आणि मागे फिरायचं. अन्नपूर्णेच दर्शन घेऊन लॉकर मधल आपलं सामान घेऊन बाहेर पडायचं.

हे सगळं मी साग्रसंगीत केलं आणि लहान गल्ल्या-बोळ पार करत बाहेर आले... आणि मग माझ्या मानत आलं की अरे या सगळ्या नादात एकदाही आपण या अतिप्राचीन देवळाच्या रचनेकडे डोळे भरून पाहिलंही नाही. मनातून थोडं वाईट वाटलं. कारण मला पुरातन वास्तुकला बघायला खूप आवडतं. मात्र दर्शन उत्तम झालं होतं. त्या समाधानात बाहेर पडून भैरव मंदिराकडे निघाले. श्रीकाशीविश्वेश्वर आणि अन्नपूर्णा देवीच्या दर्शनानंतर भैरव दर्शन करावं अशी तिथली प्रथा आहे; असं अनेकांनी मला सांगितलं होतं... केवळ म्हणून! भैरव दर्शन मात्र अगदी सहज झालं आणि #वाराणासी ला आल्याचं एक वेगळंच समाधान मनाला मिळालं. आल्या दिवशी #गंगादर्शन, गंगा आरती, श्रीविश्वेश्वर, अन्नपूर्णा आणि भैरव दर्शन असा संपूर्ण वैदिक सोहळा पार पडला होता. मात्र तिथून बाहेर पडेपर्यंत बराच उशीर झाला होता. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. पण तरीही गंमत म्हणजे संपूर्ण शहर जागं होतं. दुकानं ओसंडून वाहात होती. रस्त्यावरील गोलगप्पे, आलूटिक्की, समोसा चाट, लस्सी आणि तत्सम सगळे स्टॉल्स गर्दीने व्यापलेले होते. त्याच चाट भांडारावर मस्त ताव मारला आणि परत एकदा सायकल रिक्षा मग पेट्रोलची रिक्षा आणि मग टॅक्सी असा उलटा प्रवास करत हॉटेलमध्ये पोहोचले.

दुसरा दिवस माझा मला मोकळा होता. त्यामुळे आज जितकं शक्य आहे तितकं वास्तुशिल्प आणि जुनं शहर बघायचं ठरवलं होतं. गौतम बुद्धांचा प्राचीन असा एक स्तूप सारनाथ येथे आहे. तो स्तूप बघण्यास गेले. या स्तुपाची रचना काहीशी इजिप्त मधल्या पिरॅमिड सारखी वाटते. विटांनी बनलेली ही विशाल रचना चंद्रगुप्त काळातील म्हणजे जवळ जवळ चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. बोध प्राप्तीनंतर भगवान बुद्धांची भेट पंचवर्गीय भिक्षूंशी इथेच झाली असे म्हंटले जाते. या स्तुपाचा उल्लेख सातव्या शतकातील विख्यात चिनी यात्री हवेन सांग याने त्याच्या यात्रेच्या लेखन अनुभवामध्ये केला आहे. पुरातत्व विभागाने येथे केलेल्या उत्खननामध्ये ज्या मूर्ती मिळाल्या त्यात धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेमधील बुद्ध प्रतिमा आणि तलवारधारी मानव मूर्ती अशा चंद्रगुप्त काळातील मूर्ती मिळाल्या आहेत; असा तेथील लेखावर उल्लेख आहे. तसं बघितलं तर विटांचं बांधकाम असलेला हा स्तूप फार शोभनिय नाही; मात्र याला असणारा इतिहास नक्कीच संस्मरणीय आहे. सारनाथ हा स्तूप तसा गावाबाहेर आहे. त्यामुळे हा स्तूप आणि त्यानंतर त्यापुढे नवीन बांधले बौद्ध मंदिर आणि तेथील २०११ मध्ये प्रस्थापित केलेली ऐशी फूट उंच बुद्ध मूर्ती बघून मी परत #वाराणासी गावात निघाले. गावामध्ये श्रीलक्ष्मी तलाव हे स्थळ देखील पाहण्यासारखे आहे; हे समजल्यामुळे ते बघण्यास गेले. तेथे एका लहान तलावामध्ये एक लहानसे लक्ष्मी मंदिर आहे. त्यानंतर मात्र माझ्या लक्षात आले की आपापल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येकजण मला त्याच्या इष्ट देवतेचे दर्शन घेण्यास सांगणार. त्यामुळे मग मात्र मी कोणालाही काहीही न विचारता गंगेच्या घाटाच्या दिशेने निघाले. #गंगाआरतीचा अनुभव आदल्याच दिवशी घेतल्यामुळे मी आज त्यापासून थोडं लांब इतर घाटांवरून फिरण्याचे ठरवले. जसजशी काहीशा दूरच्या घाटाच्या दिशेने चालू लागले तसतसं लक्षात आलं की आपला हा निर्णयच बरोबर आहे. कारण आपण जसजसे मुख्य घाटापासून दूर जातो तसतसा गंगेच्या सुंदर घाटांचा अनुभव आपल्याला येतो. सुदंर बांधून काढलेले घाट, त्यांची अलीकडच्या काळात सांभाळलेली स्वच्छता आणि मुख्य घाटापासून दूर असल्याने कोणत्याही प्रकारचा बाजारूपणा नसलेले वातावरण मनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. गंगेच्या वाहात्या पाण्याचा खळखळाट आणि गावातल्या रहिवाशांचे रोजचे घाटावर येऊन बसणे.... खरोखरच इतक्या लांब आल्यानंतर विश्वेश्ववराच्या दर्शनापेक्षा देखील जास्त समाधान या निसर्गरम्य आणि खेडूत अशा वातावरणात जाणवते.

श्रीकाशीविश्वेश्वर दर्शन आणि वाराणासी दर्शन हा मन भारून टाकणारा अनुभव नक्कीच माझ्या हृदयाच्या कुपीत मी कायम जतन करून ठेवणार आहे. तुम्हाला देखील मनःपूर्वक आग्रह आहे की केवळ वय झाल्यानंतरच #काशी ला... #वाराणासी ला जावं असं नाही... तर #नमामिगंगे योजनेआंतर्गत झालेल्या #बनारस चा कायापालट बघण्यासाठी आणि निसर्गरम्य गंगा घाट अनुभवण्यासाठी नक्की तेथे एकदा जावं.
रात्री उशिरा गजबजलेला बाजार
ओसंडून वाहणारा रस्ता

#गंगाआरती

गंगा आरती दरम्यान धुपारती

आरतीला सुरवात होण्या अगोदर होणारी तयारी आणि जमणारे भाविक
#गंगाआरती नंतर गंगेच्या पवित्र पाण्यात दीप सोडले जातात. भाविकांचा असा विश्वास आहे की हे दीप आपल्या सोडून गेलेल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने सोडल्यास त्यांच्या आत्म्याला शांती लाभते.


बनारसी पान भांडार



छोले कचोरी, समोसा छोला, पुरी-भाजी, जलेबी, रबडी, लस्सी, रसमलाई... जो बोलो मिलजाता हें यहा।



रात्री उशिरा गजबजलेला बाजार




ओसंडून वाहणारा रस्ता


#गंगाआरती


धुपारती


गंगा आरतीची तयारी आणि भाविक जमत असताना


2011 मध्ये बांधलेल्या बुद्ध मंदिरातील बुद्ध मूर्ती


2011 मध्ये बांधलेली ऐंशी फूट उंच बुद्ध मूर्ती


2011 मध्ये बांधलेले बुद्ध मंदिर


सारनाथ येथील स्तूप


#गंगाआरती झाल्यानंतर पवित्र गंगेच्या पाण्यात सोडलेले दिवे


सायकल रिक्षा

6 comments: