Friday, February 28, 2020

#खजुराहो दर्शन!!! भाग १

#खजुराहो दर्शन!!!



#खजुराहो म्हंटल की एकतर आपण एकमेकांकडे बघून डोळा मारतो किंवा त्या विषयाला बगल देऊन दुसरंच काहीतरी बोलायला लागतो. का? कारण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये #कामशास्त्र या विषयावर उघडपणे चर्चा होऊच शकत नाही.... मात्र बहुतेक ज्या काळामध्ये #खजुराहोची शिल्प बनली आहेत; त्या काळामध्ये #कामशास्त्र हा विषय चोरून बोलण्यासारखा किंवा चर्चा न करण्यासारखा नसावा असा माझा कयास आहे. याव्यतिरिक्त ही मंदिरे आणि त्यातील #शिल्पकला बघितल्यानंतर असं वाटतं की त्या काळामध्ये स्त्रियांना सामाजिक स्तरावर अनन्यसाधारण महत्व होतं. त्यांचं अस्तित्व, त्यांची मतं, त्यांचे विचार आणि त्यांचे सामाजिक स्थान हे अत्यंत आदरपूर्ण स्वीकारले गेले होते. का वाटावं बरं असं? कारण या #शिल्पकला बघताना एक गोष्ट लक्षात येते की केवळ पुरुषांच्या समाधानासाठी मैथुन क्रिया केली गेलेली नाही; तर स्त्रीच्या सुखाच्या परमोच्च क्षणाचा देखील विचार केला गेला आहे. तिला देखील शारीरिक सुख हे हक्काने आणि योग्य प्रकारे मिळाले पाहिजे असा त्या काळातील दृष्टिकोन होता... असं या शिल्पांवरून प्रतीत होतं. या शिल्पांमध्ये दाखवल्या गेलेल्या स्त्री-पुरुषांच्या दोघांच्याही चेहेऱ्यावर एका अलौकिक आणि दैवी आनंदाची आभा सतत जाणवते. जरी ही शिल्पं कामकलेवर आधारित असली तरी त्यामध्ये जराही अश्लीलता नाही. तसे बघितले तर शरीरसुख हा विचार ना रहस्यपूर्ण आहे; ना त्यात कोणतीही पशुवृत्ती आहे. ते पाप किंवा पुण्याशी जोडलेले नाही; किंवा तोच एक आयुष्याच्या सुखाचा परमोच्च मार्ग आहे असा विचार कुठेही प्रतीत होत नाही. शरीरसुख अनुभवणे ही एक अत्यंत सामान्य कृती आहे. उलट याविषयी चर्चा होऊ न देणे, मुलांना प्रबोधन करताना देखील याविषयी एकप्रकारची गूढता निर्माण करणे, सर्वसामान्य सामाजिक व्यवस्थेमध्ये याविषयाची उदासीनता यामुळेच हा विषय केंद्रस्थानी असतो. अर्थात ही सर्व माझी मतं झाली... आता थोडं #खजुराहोबद्दल... त्याच्या इतिहासाबद्दल.... पुरणकाळातील दाखल्यांबद्दल आणि नंतर तेथील शिल्पकलांच्या फोटोंसाहित तेथील गाईडने सांगितलेल्या माहितीबद्दल!!!

असं म्हणतात.....

काशीच्या राजपंडितांची मुळगी हेमावती अपूर्व सौंदर्यवती होती. एका रात्री ती कमलपुष्पांनी भरलेल्या तळ्यामध्ये स्नान करत असताना तिच्या अनन्यसाधारण सौंदर्यावर चंद्रदेव मोहित झाले आणि मानव रूप धारण करून पृथ्वीवर उतरले. ती रात्र त्यांनी एकत्रित व्यतित केली. परंतु पहाटे चंद्रदेव परत निघाले असता हेमवतीने त्यांना थांबण्याचे आर्जव केले आणि ती गर्भवती झाली असल्याचे संगितले. हे ऐकताच चंद्रदेवांनी हेमवतीला आशीर्वाद दिला की ती एका वीर पुत्राला जन्म देईल. त्याला हेमवतीने खजुरपुराला न्यावे. हा मुलगा पुढे एक महान राजा बनेल आणि उद्यान आणि तलावांनी घेरलेल्या अनेक मंदिरांचे निर्माण करेल. पुढे चंद्रदेव हेमवतीला म्हणाले की राजा झाल्यावर तुझा वीर पुत्र एका विशाल यज्ञाचे आयोजन करेल; ज्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट होतील. बदनामी होऊ नये म्हणून आणि आपल्या पुत्राला जन्मदेण्यासाठी हेमवतीने पित्याचे घर सोडले आणि ती एका लहान गावामध्ये जाऊन राहिली. यथावकाश तिला पुत्रप्राप्ति झाली. हेमवतीचा पुत्र चंद्रवर्मन आपल्या पित्याप्रमाणे तेजस्वी, शक्तिशाली आणि वीर होता. असे म्हणतात की तो सोळाव्या वर्षीच कोणतेही आयुध न घेता वाघाची शिकार करत असे. चंद्रवर्मनने अनेक युद्धे जिंकली. त्यानंतर हेमवतीच्या सांगण्यावरून त्याने सुंदर उद्याने आणि तलावयुक्त अशी एकूण पंच्याऐशी अद्वितीय मंदिरे निर्माण केली. त्यानंतर त्याने एक मोठा यज्ञ केला; ज्यायोगे हेमवतीचे सर्व पाप नष्ट झाले. पुढे चंद्रवर्मनच्याच नावाने निर्माण झालेल्या चंदेलवंशाच्या राजांनी खजुराहोमध्ये अनेक मंदिरे निर्माण केली.

आजही ही पौराणिक कथा या भागातील प्रत्येक व्यक्ती सांगते. कदाचित ही कथा अशीच पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगितली गेली आहे आणि म्हणूनच ती जिवंत राहिली आहे. #खजुराहोचा इतिहास देखील इतकाच रोचक आहे. ऐतिहासिक दाखल्यांप्रमाणे चंदेलवंशाच्या राजानी दहा ते बाराव्या शतकात मध्य बारावर राज्य केले आहे. त्याचप्रमाणे याच ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की #खजुराहो येथील मंदिरांचे निर्माण इ. स. ९५० ते इ. स. १०५० दरम्यान चंदेल राजांकरवी झालेलं आहे. मात्र असे म्हणतात की या मंदिरांना निर्माण केल्यानंतर चंदेल राजांनी त्यांची राजधानी महोबा येथे स्थलांतरित केली. मात्र तरीही त्याकाळात देखील #खजुराहोच्या मंदिरांचे महत्व अबाधित होते.

ही एकूण पांच्याएशी मंदिरांची शृंखला असून ही मंदिरे लक्ष्मण, शिव आणि पार्वती यांना समर्पित आहेत. #कंदारिया महादेवाचे मंदिरावरील #शिल्पकला विशेष आहे. हे मंदिर #खजुराहोमधील सर्वात विशाल आणि उत्तम #शिल्पकला असलेले आहे. याची उंची एकशे सतरा फूट असून लांबी देखील तेवढीच आहे. या मंदिराची रचना सप्तर्थ शैलीमधील आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस सहाशे सेहेचाळीस शिल्प असून आतमध्ये दोनशे सव्वीस शिल्पे आहेत. सर्वसाधारणपणे एका मंदिरामध्ये इतकी शिल्पे सापडणे अवघड आहे. या दीराचे प्रवेशद्वार नऊ शाखांचे आहे. या मंदिराचे विशेष महत्व म्हणजे त्यावेळच्या राजा विद्याधर याने मोहम्मद गजनीला दुसऱ्यांदा हरवल्यानंतर इ.स. १०६५ दरम्यान बांधले.

या मंदिरांचा शोध साधारण इ.स. १८५२ ते इ.स. १८८५ या काळात इंग्रजानी लावला. तोपर्यंत याप्रदेशामध्ये घनदाट जंगल होते आणि हिंस्त्र प्राण्याचा प्रभाव खूप मोठा होता. आज या पांच्याएशी मंदिरांपैकी केवळ बावीस मंदिरे आपण बघू शकतो. बाकीच्या मंदिरांचा ह्रास काळाच्या ओघात झाला. अर्थात जी मंदिरे आजही आहेत त्यांच्यावरील #शिल्पकलेच्या सौंदर्यावरून या मंदिरांचा सुवर्णकाळ किती उज्वल असेल याची आपण कल्पना करू शकतो. सर्वसाधारणपणे या शिल्पकलेमधून कामसूत्रात वर्णन केलेल्या अष्ट मैथुनचे चित्रीकरण आहे. कदाचित प्राचीन काळातील स्त्री-पुरुष देव, धर्म, नैतिकता याचा फार विचार न करता मुक्तपणे शरीरसुखाचा अनुभव घेत असावेत असे या शिल्पकलेवरून वाटते.

मंदिराचा संध्याकाळचा देखावा


 दहाव्या शतकातील गणपती मूर्ती


राजाला रिझवणारी नर्तकी आणि दरबारी


त्या काळात समूह मैथुन प्रथा असावी असं या शिल्पणवरून वाटतं


युद्धावर असताना योध्याना शरीरसुखाची इच्छा झाली असता ते अनेकदा घोड्यांचा पर्याय निवडायचे


राजा आणि दरबारी नृत्य आणि गायनात मग्न आहेत




विविध कामशास्त्र क्रिया


कामकलेची सुरवात चुंबनाने होते हे इथे प्रतीत होते


स्त्री अत्यंत प्रेमाने प्रियकराला रिझवत आहे. दोघांच्याही चेहेर्यावरील भाव अत्यंत आनंदी आहेत




पुरुष स्त्रीला प्रेमाने आलिंगन देऊन कामक्रियेसाठी उद्युक्त करतो आहे


एक रुपगर्वीता पायाला अल्ता लावते आहे. या शिल्पातील खासियत ही की तिला अल्ता लावायला मदत करणाऱ्या स्त्रीकडे सुंदर बॅग आहे.... 


कामक्रीडेतील अजून एक शिल्प




मंदिरातील छत


लक्ष्मण मंदिराच्या समोरच वराह शिल्प आहे. 


साजशृंगार करणारी सौंदर्यवती


पार्वती मंदिराबाहेरील हत्तीचे शिल्प


या प्राण्याचे निरीक्षण केले असता धड हत्ती प्रमाणे आणि शरीर घोड्याचे दिसते. कदाचित त्या काळात युद्धावरील प्राण्यांना मुखवटे घालून त्यांचे रूप उग्र करत असतील. शत्रू सैन्याला भिती वाटावी म्हणून


एक म्हटवाची माहिती. त्याकाळातील मंदिरे locking systim ने जोडलेली होती. सर्वच मंदिरातील दगड हे तुम्हाला आशा प्रकारच्या क्लिप्स नी जोडलेले दिसतील


घोड्याला राक्षस मुखवटा दिसतो आहे


सर्वसाधारणतः सर्व मंदिरांच्या भिंतींवरील शिल्पांची सुरवात अशा प्रकारच्या राक्षस चेहेऱ्यानी झालेली आहे


हत्ती, घोडे हे प्राणी माणसाळवून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे


संध्याकाळच्या सुमाराच मंदिर परिसर


दहाव्या शतकातील बुद्ध मूर्ती


मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूने घेतलेला व्हिडीओ


मनापासून सांगते.... प्रत्येकाने या सुंदर मंदिरांना भेट द्यावीच. आपला सोनेरी इतिहास आणि त्याकाळातील श्रीमंत संस्कृती जाणून घेणे खूप म्हटवाचे आहे. त्याव्यतिरिक्त देखील खूप काही आहे खजुराहोमध्ये पाहण्यासारखे. ते पुढील भागात.

No comments:

Post a Comment