अनाहत सत्य
भाग 24
"राजकुमार, तुमचा नाथावर किती विश्वास आहे?" चांदण्याने नाहून निघालेल्या त्या टेकडीच्या टोकावर गोविंदच्या मिठीत बसलेल्या अपालाने त्याला प्रश्न केला.
"हा काय प्रश्न आहे अपाला?" अचानक असा प्रश्न अपालाने केल्याने गोविंद गोंधळून गेला.
"राजकुमार, केवळ मीच नाही तर भीमाने देखील अनेकदा त्याला चोरून ऐकताना बघितलं आहे." अपाला म्हणाली.
"अपाला, नाथाचा जीव आहे आपल्यावर. कुंजर तर त्याचा प्राण आहे... पण तो देखील बांधला गेला आहे ग. त्याचे जवळचे सगळेच नगरात राहातात. सुमंत कल्याण यांच्या छत्रछायेखाली. अपाला तुला कदाचित माहीत नाही पण नाथा मूलतः सुमंतांच्या सांगण्यावरून इथे आला आहे. तो त्यांना उत्तरदायी आहे. त्यांनी सांगितलेलं काम जर त्याच्या हातून झालं नाही तर कदाचित त्याचा परिणाम त्याच्या जवळच्या लोकांवर होईल; ही भिती नाथाच्या मनात असणं स्वाभाविक आहे." गोविंद शांतपणे बोलत होता. मात्र त्याने सांगितलेली माहिती ऐकून अपाला एकदम ताठ बसली.
"राजकुमार, नाथ इथे सुमंतांच्या सांगण्यावरून आला आहे? याचा अर्थ त्याच्या मनातले भाव प्रामाणिक नाहीत. तुम्हाला हे सत्य माहीत असूनही तुम्ही त्याला जवळ केलं आहात. असं का?" अपालाने गोविंदला एका मागून एक प्रश्न विचारायला सुरवात केली.
गोविंद हसला आणि म्हणाला; "मी त्याला जवळ केलं कारण तो प्रामाणिक आहे अपाला. तुला काय वाटतं; त्याने न सांगताच मला सगळं कळलं असेल? नाही ग. नाथाने स्वतः मला त्याचा इथे येण्याचा उद्देश सांगितला. त्याने मला अनेकदा विनंती केली आहे की मी तुझ्या शिवाय एकदा नगर प्रवेश करावा. तुमचं काम पूर्ण होईपर्यंत तू नक्की इथे आहेस. त्यामुळे महाराजांच्या आणि सुमंतांच्या मनाप्रमाणे एकदा माझा नगर प्रवेश आणि महाराजांचा उत्तराधिकारी अशी माझी घोषणा झाली की त्यानंतर देखील मी तुला रीतसर मागणी घालून माझी पत्नी म्हणून घेऊन जाऊ शकतो."
"मान्य आहे हे सगळं. पण आता तर तुला माझं सत्य कळलं आहे. मग अजूनही तुझं मत नाथाप्रमाणे आहे का?" अपालाने प्रश्न केला.
"अपाला, सुरवातीला मी इथे आलो ते महाराजांच्या सांगण्यावरून. तुझ्या भागीनेय तीक्ष्णाने स्वतः ही इच्छा व्यक्त केली होती महाराजांकडे. कदाचित असं असू शकतं की माझा उपयोग करून तुमचं एखादं काम पूर्ण करून घ्यायचं असेल. करण मला आठवतं, सुरवातीला तीक्ष्णा माझ्याशी खूपच मोकळेपणी बोलायची. आपली ओळख झाली, ती वाढली आणि आपण जवळ आलो; तरीही तिची कुठेच हरकत नव्हती. तिने ते मला अनेकदा स्पष्टपणे सांगितलं देखील होतं. पण मग हळूहळू सगळं बदलायला लागलं. अपाला, सुरवातीला तुझं माझ्याकडे आकृष्ट होणं हे केवळ वरवरचं होतं. भावनिक गुंतवणूक नव्हती तुझ्या मनात. पण मग आपण मनाने जोडले जायला लागलो. म्हणजे मी तुझ्यामध्ये गुंतलोच होतो; पण तू देखील हळूहळू माझ्या जवळ यायला लागलीस. हे जेव्हा तीक्ष्णाला लक्षात आलं त्यावेळी ती थोडी सजग झाली. पण तिने आपल्याला दूर करण्याचा निर्णय घेऊन त्यावर काही कृती करावी याआगोदरच तू गर्भवती राहिलीस. तू पहिल्या क्षणापासूनच तो गर्भ ठेवण्याच्या निर्णयाबाबत ठाम होतीस. मात्र तुझा हाच निर्णय तीक्ष्णाला अमान्य होता. कुंजरमुळे तू माझ्यामध्ये पूर्णपणे अडकशील; हे लक्षात आलं आणि तीक्ष्णाने आपल्याला दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रत्येक प्रयत्नाला तू मोडून काढलंस; आणि हे लक्षात आल्यानंतर मात्र माझं इथे असणं तिला नकोसं व्हायला लागलं. पण तोपर्यंत ती स्वतःच्याच निर्णयांच्या जाळ्यामध्ये अडकली होती. माझं असणं तिला इतकं खटकत होतं तर महाराजांशी बोलून ती मला परत नगरात जायला भाग पाडू शकत होती... पण तरीही ती ते करत नव्हती. सुरवातीला मला तिच्या या वागण्याचं कारण कळत नव्हतं. पण आता तो उलगडा होतो आहे."
"काय उलगडा राजकुमार?" नकळून अपालाने विचारलं.
"अग अपाला, मी इथे यावं हा तीक्ष्णाचा नव्हता. तो नक्कीच तुमच्या प्रमुखांचा होता. त्यामुळेच तुझं माझ्यात गुंतण तिला दिसत असूनही आणि ते पटत नसूनही ती काही करू शकत नव्हती. आता तुझं आणि तुझ्या सोबत असणाऱ्या या सर्वांचं सत्य समजल्या नंतर आपण काय करावं या द्विधा मनःस्थितीमध्ये आहे अपाला." गोविंद हसत म्हणाला.
"हम्म... खरंय राजकुमार." अपाला तिच्या विचारांच्या तंद्रीमध्ये होती. "मी तुमच्यामध्ये गुंतत होते हे जितकं खरं आहे; तितकंच हे देखील खरं आहे की माझं माझ्या कामावर प्रेम आहे. त्याहुनही जास्त मला माझ्या जवाबदरीची जाणीव आहे. मी माझ्या अस्तित्वाचं सत्य क्षणभरासाठी देखील विसरले नाही. त्यामुळे माझं गोठवून घेतलेलं आयुष्य, तुमच्यात गुंतलेलं माझं मन, कुंजरचं आपल्या आयुष्याला जोडणं आणि माझ्यावर असणारी जवाबदारी याचं भान ठेवूनच मी जगते आहे. मात्र दुर्दैवाने भागीनेय तीक्ष्णाला ते दिसत नाहीय. तिला केवळ हेच वाटतं आहे की मी माझं काम पूर्ण करून तुमच्या सोबत नगर प्रवेश करणार आहे. मात्र मी अजूनही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही." अपाला म्हणाली. ती अजूनही स्वतःच्याच तंद्रीमध्ये होती. त्यामुळे तिच्या शेवटच्या वाक्याचा गोविंदवर झालेला परिणाम तिच्या लक्षात आला नाही.
"अपाला, तू अजूनही निर्णय घेतलेला नाहीस? काय आहे तुझ्या मनात? अग, मी प्रत्येक वेळी विचार करताना तो दोघांच्या दृष्टीने योग्य झाला पाहिजे असं समजतो. मात्र तुझ्या बोलण्यातून तू कोणता निर्णय घेते आहेस किंवा नाही यामध्ये माझा विचार तू करते आहेस की नाही ते मला कळतच नाही. " गोविंद अपाला जवळ सरकत म्हणाला.
अपालाच्या लक्षात आलं की तिने हे बोलून चूक केली आहे. गोविंद अत्यंत हळवा आणि भावनिक आहे; त्यात याक्षणी तर तो तर्कशुद्ध विचार करण्याच्या मनस्थितीत देखील नाही. ती गोविंदच्या दिशेने वळली आणि म्हणाली; "गोविंद, माझ्या मनाची दोलायमानता समजून घे. अरे, एकवेळ मी माझ्यावर असणारी जवाबदारी पूर्ण करून नंतर कायम तुझ्या सोबत राहण्याचा निर्णय घेईनही. पण मी आज आत्ता जशी दिसते आहे न तशीच कायम दिसणार आहे. कारण माझं आयुष्यच गोठून गेलं आहे या वयामध्ये. त्यामुळे अजून काही वर्षांनी तुझं वय होईल, कुंजर मोठा होईल तेव्हाच देखील मी आहे अशीच राहणार आहे. त्यावेळी आपल्याला सगळ्यांनाच अशा परिस्थितीत जगणं मुश्कील होऊन जाईल. तुझ्या चिरतरुण पत्नीबद्दल जर प्रश्न निर्माण झाले तर त्याचं उत्तर तू काय देणार आहेस? गोविंद, अरे आजचा मानव अजून इतका प्रगत नाही झालेला की हे असं रूप तो स्वीकारू शकतो. मग कदाचित माझ्या अस्तित्वावर आरोप होतील. गोविंद, तुझं आयुष्य मग केवळ माझा बचाव आणि सांभाळ करण्यात जाईल. म्हणजेच तू तुझ्या जवाबदरीपासून दूर राहाशील. ते मला मान्य नाही. म्हणूनच तुझ्या आणि माझ्या दोघांच्या हिताचा विचार करूनच आपल्याला निर्णय घ्यायला हवा."
गोविंदने काही क्षण विचार केला आणि म्हणाला; "अपाला, खरंच तुझं सत्य जोपर्यंत मला माहीत नव्हतं, तोपर्यंत तू तुझं काम संपवून माझ्या सोबत नगर प्रवेश करशील असंच मला वाटत होतं. कदाचित तीक्ष्णा याला विरोध करेल; पण तू आणि मी दोघे मिळून तिला समजावू असं मला वाटत होतं. हे सगळंच माझ्यासाठी इतकं सोपं होतं. पण आता तुझं सत्य समजल्यापासून सगळंच बदलून गेलं आहे. अर्थात तरीही तुझ्या शिवाय आणि कुंजरपासून दूर मी जगूच शकणार नाही; हे देखील सुर्यप्रकाशा इतकं स्पष्ट सत्य आहे." गोविंदचं ते बोलणं ऐकून अपाला काहीशी अस्वस्थ झाली.
तिचं अस्वस्थ होणं लक्षात येऊन गोविंद पुढे म्हणाला; "अपाला, मी स्वतःला ओळखून आहे ग. मी राजकुमार आहे; माझ्यावर राज्याची खूप मोठी जवाबदारी आहे. त्यात महाराज माझ्यावर राज्यकारभार सोडून उत्तरेकडील राज्यांच्या सुव्यवस्था करण्यासाठी प्रयाण करण्याचा विचार करत आहेत; हे देखील मला कळलं आहे. पण तरीही एक सांगू का? मला तुझ्यापासून आणि कुंजरपासून दूर राहाणं शक्य नाही. मी तुझ्याशिवाय जगलो तर केवळ एक मर्त्य असेन... तुझ्या सोबत जगलो तरच मी एक जवाबदारीपूर्ण मनुष्य असेन. हेच माझं सत्य आहे."
त्याचं बोलणं ऐकून अपाला निःशब्द झाली. तिने मान खाली घातली आणि ती विचारात गढून गेली.
"अपाला...." थोडा वेळ गेल्यावर अस्वस्थ होत गोविंदने तिला हाक मारली.
"गोविंद, याचा अर्थ एकच होतो; एकतर तू तुझं जग सोडून आमच्या जगामध्ये प्रवेश करावास; किंवा मी आमच्या भूतप्रमुखांकडून परवानगी घेऊन तुझ्या सोबत नगर प्रवेश करावा. कोणत्याही परिस्थितीत आपल्यापैकी एकाला स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करावा लागणार आहे." अपालाने मान वर करत म्हंटलं.
तिचं म्हणणं अत्यंत खरं होतं. गोविंदला ते पूर्ण पटलं. तो म्हणाला; "अपाला, जर मी तुझ्या सोबत तुझ्या जगामध्ये येण्यास योग्य असलो तर मी याक्षणी देखील तुझ्या सोबत येण्यास तयार आहे."
त्याचं बोलणं ऐकून अपाला हसली. पण तिच्या हास्य केविलवण वाटलं गोविंदला. त्याने पुढे होत तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला; "अपाला.... तुझं हास्य मोकळं नाही. काय आहे तुझ्या मनात?"
त्याच्याकडे एकटक बघत अपाला म्हणाली; "गोविंद, तू आमच्या जगामध्ये येण्यास योग्य नाहीस. तू अति भावनिक आहेस. तू तर्कनिष्ठ निर्णय घेऊच शकत नाहीस. दुर्दैवाने अशी व्यक्ती आमच्या जगामध्ये स्वीकारली जाणारच नाही."
"अपाला.... मग तू चल माझ्या सोबत. तुझं चिरतरुण असणं मी सांभाळीन. मी तुझ्या समोर ढाल म्हणून उभा राहीन... आणि माझ्या नंतर कुंजर! तू मुळीच काळजी करू नकोस." गोविंद म्हणाला.
"गोविंद, मला कोणत्याही ढालीची गरज नाही; हे आतापर्यंत तुला कळायला हवं होतं. असो!" असं म्हणून अपाला शांत झाली. ती खूप काहीतरी विचार करत होती; आणि मग गोविंदकडे वळली आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाली; "गोविंद, निर्णय अवघड आहे. पण आवश्यक आहे. मला वाटतं मी तुझ्या सोबत असणं.... तुझ्या जगामध्ये.... हेच जास्त संयुक्तिक वाटतं आहे."
अपाला असं म्हणाली आणि गोविंदने हर्षाने तिला मिठीमध्ये घेतलं.
***
अपाला, भीमा, गोविंद आणि नाथा ओढ्याच्या काठावर बसले होते.
"अपाला, तुला खरंच हे सगळं सोपं वाटतं आहे का?" भीमाने पुन्हा एकदा अपालाकडे बघत प्रश्न केला.
"सोपं तर काहीच नाही भीमा. अगोदर आपण हे ठरवू की योग्य आणि अयोग्य काय आहे. मग सोपं आणि अवघड याचा विचार करूया." अपाला शांत आवाजात म्हणाली.
"अपाला, योग्य हेच आहे की तू राजकुमार गोविंद यांच्या सोबत नगर प्रवेश करावास. सुमंत कल्याण यांचा तुझ्या राजकुमार गोविंद यांच्या सोबत असण्यावर आक्षेप नाही; तू त्यांना इथे अडकवून ठेवलं आहेस असं त्यांना वाटतं; म्हणून ते तुझ्यावर नाराज आहेत. त्यामुळे जर तू राजकुमार गोविंद यांच्या सोबत नगर प्रवेश करण्याचा निर्णय घेतलास तर ते तुझं स्वागतच करतील." अत्यंत आनंदाने नाथा म्हणाला.
त्याच्या खांद्यावर प्रेमाने थोपटत गोविंद म्हणाला; "नाथा, मी तुझ्या भावना समजू शकतो. परंतु तुला माहीत नसलेली अशी काही सत्य आहेत. त्यामुळे केवळ निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे पावलं उचलली असं आणि इतकं ते सोपं नाही."
"असं काय आहे राजकुमार की त्याविषयी आपण तोडगा काढू शकणार नाही? राजकुमार, आपली राजसत्ता ही सर्वात सबळ आणि अनेक वर्ष राज्यकारभार बघणारी आहे. आपल्याला अशक्य काय आहे?" नाथा म्हणाला.
"नाथा, सगळंच बळाचा वापर करून मिळवता येत नाही." अत्यंत गंभीर आवाजात भीमा म्हणाला.
"भीमा, हे तू बोलतो आहेस या कल्पनेने देखील मला हसू येतं आहे. एकदा स्वतःच्या नावाप्रमाणे असलेल्या शरीरयष्टीकडे बघ आणि परत एकदा तेच वाक्य बोल बघू." नाथा हसत म्हणाला आणि सगळेच मोकळेपणी हसले.
"किती दिवसांनी आपण सगळे मोकळेपणी हसलो आहोत." गोविंद प्रसन्नपणे म्हणाला.
"गोविंद, अपाला कालच माझं आणि भागीनेय तीक्ष्णाचं बोलणं झालं आहे. तिने मला स्पष्ट विचारलं की या नवनिर्मित वास्तूला राक्षकभिंत उभी करण्यासाठी मला किती वेळ लागेल. मी तिला कल्पना दिली आहे की मला किमान पंधरा दिवस लागतील. मी तट संरक्षण भिंत निर्मितीचं काम सुरू करावं याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलं आहे." भीमा म्हणाला.
"मान्य आहे की इथल्या संपूर्ण कामाची जवाबदारी तिच्यावर आहे. पण तरीही कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर तिने माझ्याशी किमान बोलणं करायला हवं होतं." दुखावलेल्या आवाजात अपाला म्हणाली.
"अपाला, मला वाटतं राजकुमारांसोबत सतत राहिल्याने तू देखील भावनिकतेला जास्त महत्व द्यायला लागली आहेस. हे विसरू नकोस की तुझा कोणताही निर्णय तर्कशुद्ध असला पाहिजे." भीमा म्हणाला.
"भीमा, आपण हृदयशून्य नाही आहोत. अति भावनिकतेमुळे मानवीय आयुष्याचं नुकसान होऊ शकत हे आपल्याला माहीत असल्याने आपण प्रयत्नपूर्वक ठरवून भावनांपासून दूर गेलो आहोत. मात्र याचा अर्थ आपण परत एकदा भावनिकतेचा विचार करायचाच नाही असा होत नाही." अपाला म्हणाली.
"भावनिकतेपासून दूर जाणं म्हणजे नक्की काय अपाला?" नाथाने प्रश्न केला. अपाला हे विसरून गेली होती की नाथाला तिचं आणि भिमाचं सत्य माहीत नाही. मात्र ते लक्षात येताच ती सावध झाली आणि म्हणाली; "नाथा, हा विषय खूप गहिरा आहे. याक्षणी हा विचार करणं जास्त महत्वाचं आहे की मी नगर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर तो भागीनेय तीक्ष्णा कशा प्रकारे स्वीकारेल."
नाथाच्या लक्षात आलं की अपालाने विषयाला बगल दिली आहे. परंतु त्याच्या मनात आलं की शेवटी तो एक सेवक आहे. त्यामुळे कदाचीत काही सत्य ती लपवते आहे. त्यामूळे तो काहीच बोलला नाही. इतक्यात तिथे कुंजर आला आणि त्याने नाथाचा हात धरून त्याला खेळण्यासाठी बोलावलं. ही संधी घेऊन नाथा तिथून उठला आणि कुंजर सोबत जात म्हणाला; "मी कुंजरला घेऊन जातो. म्हणजे तुम्ही नीट बोलू शकाल." जाता जाता त्याने गोविंदकडे बघितलं आणि म्हणाला; "राजकुमार कोणी माझ्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो; मी तुम्हाला मनापासून सांगतो... तुमच्या सगळ्याच निर्णयांमध्ये मी तुमच्या सोबत आहे." इतकं बोलून नाथा कुंजर सोबत तिथून निघाला.
तो गेल्या त्यादिशेने बघत गोविंद म्हणाला; "आपण त्याच्यापासून काहीतरी लपवतो आहोत; कारण तो सेवक आहे.. असा त्याचा समज झालेला दिसतो आहे."
"असं असू शकतं राजकुमार. पण आत्ता अपाला आणि तुम्ही मिळून तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने कोणता निर्णय घेता आहात हा प्रश्न जास्त गहन आणि मोठा आहे. आपण नाथाचा समज किंवा गैरसमज नंतर देखील दूर करू शकतो. त्यामुळे आपण आत्ताच योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टीने चर्चा करूया." भीमा म्हणाला.
"भीमा, मला वाटतं भागीनेय तीक्ष्णाने इथून आपल्या परतागमनाचा दिवस नक्की केला आहे. त्यामुळेच कदाचित तिने तुला रक्षक भिंत निर्माण करण्यासंदर्भात सांगितलं असावं." अपाला म्हणाली.
"खरं आहे तुझं म्हणणं. अपाला, मी तीक्ष्णाला ओळखतो. ती असाच दिवस निवडेल जो आजच्या जनजीवनात अत्यंत महत्वाचा असेल आणि त्याचवेळी तो आपल्या परतीच्या दृष्टीने देखील योग्य असेल." भीमा म्हणाला.
"मला वाटतं ती पौर्णिमेच्या दिवसाचा विचार करेल. तशी पौर्णिमा नुकतीच होऊन गेली आहे. म्हणजे अजून एक माह आहे पुढील पौर्णिमेला." अपाला म्हणाली.
विचार करत भीमा देखील म्हणाला; "तुझा अंदाज अचूक आहे अपाला. पुढील माह म्हणजे पर्जन्यकाल सुरू झालेला असेल. जर त्यादिवशी पर्जन्य असेल तर आपल्या सर्वांना इथून हलवणे सोपे जाईल. महाराजांच्या हाती ही नवीन निर्मिती सोपवणे देखील सोयीचे होईल; आणि या एका माह काळात मला देखील माझं काम पूर्ण करणं शक्य होईल."
त्यादोघांची चर्चा गोविंद ऐकत होता. त्याने भीमाला विचारलं; "तू तट रक्षक भिंत उभी करणार म्हणजे नक्की काय भीमा?"
अपाला आणि भीमाने एकदा एकमेकांकडे बघितलं. अपालाने त्याला खुण केली की गोविंद पासून काहीही लपवणे योग्य नाही. भीमाला देखील मनातून ते मान्य होतं. तो गोविंदला म्हणाला; "राजकुमार, हे समजून घेणं थोडं अवघड जाणार आहे तुम्हाला. तरी देखील मी प्रयत्न करतो. तुमच्या राज्यावर कोणतेही संकट नाही आहे. तरीही तुमच्या राजधानीच्या तटावर सतत सैनिक तैनात असतात. तसेच मी देखील या निर्मितीच्या संरक्षणासाठी इथे सैनिक तैनात करणार आहे. मात्र तुमचे सैनिक आपल्या मर्त्य डोळ्यांना दिसतात; माझे सैन्य कधीच कोणालाही दिसणार नाही. कारण ते मनुष्य नसून एक अशी शक्ती आहे की जी शक्ती या निर्मितीला हानी पोहोचू देणार नाही.... आज नाही आणि पुढील भविष्यात देखील नाही."
त्याचं बोलणं ऐकून गोविंद विचारात पडला. "भीमा, तुमचं सगळंच वेगळं आहे हे आतापर्यंत मला समजलं आहे. त्यामुळे मी तुझ्या कामा संदर्भातील माहिती जाणून घेण्यापेक्षा माझ्या आणि अपालाच्या एकत्र येण्यासाठी तू काय मदत करू शकशील हे समजून घेऊ इच्छितो." बराच विचार करून गोविंद म्हणाला.
"राजकुमार, माझ्या या तट रक्षक भिंतीमधून जसं कोणी या निर्मितीला हानी पोहोचवू शकत नाही; त्याचप्रमाणे एकदा हा तट तयार झाला की आमच्यापैकी कोणीही या तटाच्या बाहेर पडू शकत नाही." अचानक भीमा म्हणाला आणि भिमाचं बोलणं ऐकून गोविंद एकदम स्थब्द झाला.
क्रमशः
No comments:
Post a Comment