Friday, March 29, 2019

एक शोध.... एक गुण!

एक शोध..... एक गुण!

विजय, प्रकाश, प्रसाद आणि राजेश लहानपणापासूनचे मित्र. अगदी शाळे पासूनचे. ज्या वयात मैत्री फक्त मैत्रिसाठी असते. तिला कोणतेही कारण किंवा मतलबीपणा चिकटलेला नसतो; त्यावयातले मित्र. १९८७-८८ मध्ये एकत्र दहावी पास झाले होते सगळे. पुढे जरी चौघांचेही मार्ग बदलले तरी ही शाळेतली मैत्री अतुट राहिली होती.

विजयने कायद्याचा अभ्यास केला आणि वेगवेगळ्या परीक्षा देत खूपच लवकरच्या वयात हायकोर्टात जज्ज झाला. प्रकाशने सी. ए. पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता; त्याने आश्चर्यकारक रीतीने प्रगती करत सरकार दरबारी वशिले लावत सरकारचेच अकाउंट्स बघण्याचे काम मिळवले होते. मोठ्या पोस्टवर होता तो. मंत्रालयात त्याचे स्वतःचे केबिन होते. प्रसादने बराच प्रयत्न केला शिक्षण घेण्याचा. पण त्याला शिक्षणात गोडी नव्हती. शेवटी त्याने त्यांच्या कुटुंबाच्या लोणावळयाच्या घराचा कायापालट करून तेथे लॉजिंग-बोर्डिंग सुरु केले होते. सुरवात लहान असली तरी गेल्या काही वर्षात त्याने त्याजागी मोठे हॉटेल उभे केले होते. राजेश या चौघांमधला खूपच हुशार मुलगा होता. खर तर तो अनाथ होता. पण अनाथालयात राहून आणि खूप मेहेनत करून त्याने  आय. आय. टी. मध्ये प्रवेश मिळवला होता. त्यामुळे त्याच्याकडून या सर्वांनाच् खूप अपेक्षा होत्या. शिक्षण संपल्यावर त्याने एका मल्टिनॅशनल कंपनीमधे खूप मोठ्या पगारावर काही वर्ष नोकरी देखिल केली होती. पण मग अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी खुळ शिरलं आणि नोकरी सोडून, सगळ्यांशी फारकत घेऊन तो साताऱ्याला निघून गेला. त्याने तिथे एक घर भाड्याने घेतलं आणि एकटाच रहायला लागला.

विजय, प्रकाश, प्रसाद यथावकाश विवाहित होऊन संसाराला लागले. ते तिघे महिन्या-दोन महिन्यातून कोणा एकाच्या घरी भेटायचे आणि थंडगार बियरच्या ग्लास बरोबर जुन्या नव्या गप्पा मारायचे. प्रत्येक भेटित राजची आठवण काढायचे आणि पुढच्या महिन्यात मुद्दाम वेळ काढून त्याला भेटण्याचा प्लॅन करायचे. मात्र जेऊन निघेपर्यंत तो प्लॅन त्यांच्यासारखाच् ढगात गेलेला असायचा. मग एखाद-दोन दिवसांनी फोनवरून गप्पा झाल्या की परत एकदा राजची आठवण निघायची .... बास!

मात्र त्या तिघांच्या आयुष्यात एक दिवस खूप वेगळा उगवला. तो जून महिन्यातला शुक्रवार होता. ढगाळ वातावरण होत. विजयला वीक एन्डचा फील आला होता. तो प्रकाशला फोन करून प्रसादकडे जाऊ या का अस विचारण्याच्या मूड मद्दे होता आणि प्रसादचाच फोन आला.


"हॅलो विजय? लगेच निघ. मी प्रकाशलासुद्धा सांगितलं आहे. दोघे एकमेकांशी बोलून घ्या आणि 2 तासात माझ्याकडे पोहोचा." प्रसादने विजयला विचारही करायला वेळ न देता घाईघाईत सांगितले. त्याच्या आवाजातली अस्वस्थता विजयला समजलीच नाही. तो स्वतःच्याच् धुंदीत होता. "इसको केहेते हे दोस्त। अरे मी पण तुझ्याकडेच यायचा विचार करत होतो. बायकोला काय कारण सांगू हाच विचार करत होतो आणि प्रकाशला फोन लावायला मोबाईल उचलला तेवढ्यात तुझा फोन आला. चल छान झालं. म्हणजे आपण भेटतो आहोत तर. बरं! बोल मी काही स्पेशल घेऊन येऊ रात्री बसण्यासाठी की तू आणून ठेवशील?" विजयने हसऱ्या आवाजात विचारले.


"विजय, तुला कळतं आहे का मी काय म्हणतो आहे? अरे इथे इमर्जन्सी निर्माण झाली आहे. त्यामुळे मी तुला ताबडतोब निघुन यायला सांगतो आहे. प्रकाशला घे आणि ताबडतोप निघ." प्रसादचा आवाज भलताच गंभीर होता. आत्ता कुठे विजयला प्रसादच्या आवाजातला बदल लक्षात आला.

 "प्रसाद? काय झालं? सगळं ठीक ना? वाहिनी बरी आहे ना?" विजयने काळजी वाटून विचारले.

"ती ठीक आहे रे तिला काय धाड भरणार आहे? कधी काही झालच तर मलाच होईल. बर ते राहुदे.... ऐक मी काय सांगतो आहे. विजय... राजेश.... आपला राज... माझ्याकडे आला आहे. आत्ता इथे माझ्यासमोर बसला आहे. बस. इतकंच. याहून जास्त मी तुला फोनवरून काहीच सांगणार नाही. किंबहुना सांगूच शकत नाही. तू अन् प्रकाश लगेच इथे निघून या. बाकी तुम्ही इथे आलात की मग बोलू." अस म्हणून प्रसादने फोन ठेवला.

 विजयने प्रसादचा फोन ठेवला आणि तो विचार करायला लागला. तेवढ्यात त्याला मोबाईलवर प्रकाशचा फोन आला. "तुला प्रसादचा फोन होता का विजय?" प्रकाशने काळजीभरल्या आवाजात विचारले.

"हो. राज आला आहे प्रकाश! मुख्य म्हणजे मला प्रसादचा आवाज नीट नाही वाटला. तू बोल! किती वाजेपर्यंत तू निघु शकतोस? माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी घरी फोन करून सांगेन. तसंही माझी बायको माहेरी जाणार आहे दोन दिवसांसाठी. त्यामुळे माझा काहीच प्रश्न नाही." विजय म्हणाला.

"ठिक. मीदेखील घरी फोन करून कळवतो. बायको थोडी वैतागेल. पण तशी तिला सवय आहे माझ्या अचानक बाहेरगावी जाण्याची. त्यामुळे माझाही काही प्रश्न नाही. तू मला माझ्या ऑफिसमधून घे. तू येईपर्यंत मी आवाराआवर करतो कामाची. तसच जाऊ पुढे." प्रकाश म्हणाला.


"ठीक. अर्ध्या तासात पोहोचतो मी." विजय म्हणाला. त्याने ड्राईवरला गाडी काढायला सांगितली. लोणावळयाला जायचं आहे याची कल्पना त्याला दिली. घरी कळवले आणि निघाला. प्रकाश ऑफिसच्या खालीच येऊन उभा होता. तो गाडीत बसला आणि गाडी लोणावळयाच्या दिशेने निघाली. दोघेही अस्वस्थ होते. पण दोघेही एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितिमधे नव्हते.

तीन तासात विजय आणि प्रकाश दोघे लोणावळ्याला प्रसादच्या हॉटेलवर पोहोचले; इथे तिथे न थांबता ते दोघे तडक प्रसादच्या स्पेशल रूमवर जाऊन थडकले. दरवाजा  वाजवण्याची  गरजच नव्हती; तो उघडाच होता आणि समोरच्या सोफ्यावर राजेश...... त्यांचा बालपणीचा मित्र राज बसला होता. त्याच्या हातात बिअरचा ग्लास होता आणि त्याचा चेहेरा शांत होता. तिथेच त्याच्या शेजारी प्रसाद बसला होता. तो मात्र डोक्याला हात लाउन दाराकडेच बघत होता. विजय आणि प्रकाशने प्रसादकडे बघितलं. पण त्याची नजर जरी अस्वस्थ असली तरी एकूण परिस्थिति कंट्रोलमधे असावी अस दिसत होत. दोघांनी नकळत एक निश्वास टाकला आणि खोलीत प्रवेश केला.


"साल्या प्रसाद घाबरवून टाकलस न आम्हाला. मला तर वाटलं राज शेवटचा श्वास घेतो आहे. अरे जोराची लागली होती तरी गाडी थांबवली नाही. थेट मारली आणि इथे आलो. बघतो तर काय हा राज एखाद्या बादशहा सारखा मस्त बसून गार बियर मारतो आहे आणि तू काही कारण नसताना डोक्याला हात लावून बसून आहेस. साल्या बुकलुन काढू का तुला? पण ते नंतर... थांब आलोच." वैतागलेला विजय बाथरूमकडे जात चिडून म्हणाला.

प्रकाशसुद्धा वैतागला होता एकूण परिस्थिति बघुन. राज आणि प्रसादचा आपल्याला मुद्दाम त्रास देण्याचा प्लॅन असावा असा विचार त्याच्या मनात आला. कदाचित फक्त 'राज आला आहे'; असं प्रसादने सांगितलं असतं आणि आपल्याला काही महत्वाचं काम असतं तर आपण आता आलो तसं धावत आलो नसतो, म्हणून या दोघांनी मिळून हा प्लान केला असावा असं प्रकाशला वाटलं.

 "नाही. असा आमचा कोणताही प्लॅन नाही." राज हसत म्हणाला.

प्रकाश अवाक्..."काय?"

 प्रसाद हताशपणे...."तू आत्ता मनात याच्याबद्दल काही विचार आणालास का प्रकाश?" "नाही..... म्हणजे... हो.... मला आणि विजयला त्रास देण्याचा तुझा आणि राजचा प्लॅन असावा असं आलं माझ्या मनात. का? काही गडबड आहे का? काय हा लफडा आहे साल्यानो?" प्रकाशने गोंधळत विचारले.


 "नाही..... म्हणजे... हो.... मला आणि विजयला त्रास देण्याचा तुझा आणि राजचा प्लॅन असावा असं आलं माझ्या मनात. का? काही गडबड आहे का? काय हा लफडा आहे साल्यानो?"


प्रकाशने गोंधळत विचारले. "बस... सांगतो... विजयला येऊ दे." प्रसाद शांतपणे म्हणाला.

 "वा! आत्ता कुठे मोकळं वाटलं मला!" विजय बाहेर येत म्हणाला. "बोला दोस्तानो. काय प्रसाद.... हे असं अचानक का बोलावून घेतलंस? म्हणजे राज आला आहे हे खूपच खास कारण आहे तुझ्याकडे यायला. पण तुझ्या आवाजात आनंद कमी आणि काळजी जास्त होती. म्हणून विचारतो आहे." विजय प्रसाद समोर बसत म्हणाला.


"बस विजय. प्रकाश तुही बस." प्रसाद म्हणाला. "राज... बाबा... आता तूच बोल. माझ्याकडे शब्द नाहीत."

"काय रे राज? काय स्टोरी आहे? पळून जाऊन लग्न केलं आहेस की लग्न न करताच सगळं केलं आहेस? कोर्ट मॅटर आहे का?" विजयमधला वकील जागा झाला.

"नाही रे. आणि हा प्रसाद जितका बाऊ करतो आहे तितकं ते विचित्र किंवा भयानक नाहिये. त्यामुळे तुम्ही इतके घाबरून जाऊ नका. मस्त बियर उघडा. खर तर मी तुम्हाला एक झक्कास बातमी द्यायला आलो आहे.  मी एक शोध लावला आहे आणि अनेक प्रकारे प्रयोग करून खात्री केली आहे. माझा शोध फुल प्रुफ आहे. म्हणूनच ही माहिती तुमच्याशी शेयर करायला आणि पुढे काय करू शकतो ते बोलायला आलो आहे; कारण तुम्ही तिघे सोडलात तर माझं या जगात कोणीही नाही आहे. इतकंच." राज म्हणाला.


'राज म्हणतो इतकंच असेल का हे? मग प्रसाद का इतका चिंतेत दिसतो आहे?' प्रकाशच्या मनात आलं.

"हो इतकंच रे.... पुढे काय विचार केलास? फ़क्त माझ नाव  घे मनात आणि तेच वाक्य रिपीट कर नं. दुसऱ्याच नाव घेतलं की लिंक तुटते." राज म्हणाला.

प्रकाश दचकला. विजय गोंधळाला. आणि प्रसाद डोक्याला हात लावून खुर्चीला मागे टेकला.


"राज जरा नीट समजावशील आम्हाला?" प्रकाश म्हणाला.


"ओके. सांगतो. तुमच्या लक्षातच असेल मी आय. आय. टी. नंतर झकास जॉब करत होतो. पण तिथे प्रचंड पॉलिटिक्स होत यार. माझ्या प्रत्येक नवीन कल्पना एकतर चोरीला जायच्या किंवा रिजेक्ट व्हायच्या. मी खूप प्रयत्न केला टिकायचा. पण माझे शत्रूच् जास्त होते तिथे. आणि सतत माझ्याविरुद्ध कट करत होते. बर वरिष्ठांशी बोलावं तरी पंचाईत. कारण रोज तर सोबतच्या लोकांबरोबरच राहायचं होत नं. शेवटी कंटाळून मी ती नोकरी सोडली. त्याचवेळी मनात विचार आला की माझ्याबद्दल सतत कट करणा-यांच्या मनात माझ्याबद्धल काय विचार चालु आहेत हे कळले तर मी त्यावर काहीतरी करू शकेन. आणि मग मी कामाला लागलो. खूप विचार केला... खूप प्रयोग केले. कमावलेले सगळे पैसे आणि आजवरचं सगळं आयुष्य या प्रयोगावर खर्च केले आणि स्वतःच्या हिमतीवर मी माझा प्रयोग तडीला नेला आहे..... मी असं एक मशिन बनवलं आहे की जे मला समोरची व्यक्ति माझ्याबद्दल काय विचार करते ते सांगत. फ़क्त त्या व्यक्तिने माझं नाव घेणं आवश्यक आहे विचार करताना. प्रकाश, तू आत्ता विचार केलास ना की हे इतकंच असेल का? ते मला लगेच समजलं. पण मग पुढच वाक्य ऐकायच्या अगोदर माझी लिंक तुटली. नाहीतर ते पण कळलं असतं." मग तो विजयकडे वळत म्हणाला,"विजय, विचार कर... तू तर जज्ज आहेस. तुला जजमेंट देताना या मशीनचा कितीतरी उपयोग होईल की नाही? प्रकाश तुला तुझा क्लायंट किती इनकम सांगतो आहे आणि किती लपवतो आहे हे समजलं तर चांगलंच आहे न?" राज बोलायचा थांबला.

विजय आणि प्रकाशने न बोलता प्रसादकडे बघितले. "दोस्तानो तो खर बोलतो आहे. ते मशीन हरभ-याच्या दाण्या एवढं आहे... त्याच्या कानात. मी बघितलं आहे ते. त्यामुळे त्याला वेड लागलेलं आहे असं समजू नका." प्रसाद म्हणाला.

प्रसादचं बोलणं ऐकून विजयने त्याचा मोर्चा राजकडे वळवला. "राज तुझा शोध खरच खूप मोठा आहे. त्याचा आवाका खूपच मोठा आहे. पण मला अजूनही एक कळलं नाही की आता पुढे तू काय करायचं ठरवलं आहेस?"

"माझ्या मनात एक विचार आला विजय. तुमच्या दोघांच्याही सरकार दरबारी मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. मुख्य म्हणजे माझ्या या शोधाचा उपयोग आपल्या सरकारला खूपच होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दोघेही माझी ओळख योग्य चॅनेल मधल्या योग्य व्यक्तिशी करून द्या. बाकी माझ्या या प्रयोगाबद्दल कसं आणि काय सांगायचं ते मी बघतो." राज विजय आणि प्रकाशकडे बघत म्हणाला.

"राज अरे तुला वाटतं तितकं हे सोप नाही आहे. अरे....."प्रकाश पुढे काही बोलायच्या आत राजने त्याला थांबण्याचा इशारा केला.

"हे बघा मित्रानो, मी तुम्हाला भेटायला आलो आणि मदत मागतो आहे कारण तुम्ही माझे लहानपणापासूनचे मित्र आहात. तसं बघायला गेलं तर माझे आप्त... माझे नातेवाईक आहात तुम्ही... त्यात आता चांगल्या पोस्ट वर आहात. त्यामुळे माझ काम लवकर होईल इतकंच. मात्र तुम्ही जर मला मदत न करता इथे बसून बोधामृत पाजणार असाल तर मी निघतो कसा. मला माझे मार्ग शोधता येतिल. एकच सांगतो... आज मी एक काळाच्या पुढचा शोध लावला आहे हे खरं आहे. आज दुसऱ्याच्या मनातले विचार समजणं म्हणजे एक गुन्हा किंवा खूप काही चुकीची गोष्ट वाटू शकते. पण खरच सांगतो दोस्तानो, मी यावर खूप अभ्यास केला आहे आणि  जर मी केलेला अभ्यास खरा असेल तर पुढे येणारी पिढी उपजत हे आणि असेच काही गुण घेऊन येणार आहे. मानवी पिढी आता अजून प्रगत होते आहे. पूर्वी प्रत्येक घरात फोन नसायचा आणि आज लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल असतो. त्या एवढ्याश्या माशीनमधून लोक संपूर्ण व्यवसाय सांभाळतात. तरीही अजूनही आपल्याला अनेक कामांसाठी अनेक इक्विपमेंट्स वापरावी लागतात. पण पुढे ही मशिन्स कमी होतणार आहेत. त्यांची गरजच पडणार नाही आहे. आपल्या मनातले विचार सामोरच्याला सांगणे किंवा एकादी गोष्ट हवी असल्यास विचार प्रवाहाने ती मिळवणे हे सर्व उपजतच असणार आहे पुढच्या पिढीकडे. त्यामुळे आज तुम्ही मला थांबवाल... पण मग तेव्हाच काय?" राज आवाज चढवून म्हणाला.


राजचं बोलण एकून विजय आणि प्रकाशचे चेहेरे विचारी झाले. ते बघून प्रसाद पटकन म्हणाला,"अहं... विजय... प्रकाश..... मनात कोणताही विचार आणु नका. तो ते विचार ऐकतो आहे. फक्त हे ठरवा की तुम्ही मदत करणार की नाही. कारण आत्ता तुम्ही चांगल्या मनाने कोणताही विचार केलात तरी राज तुमचे विचार समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. मी प्रयत्न करून बघितला आहे. राजला फक्त विचार ऐकता येतो... त्यामागची चांगली-वाईट भावना नाही समजत. राज तू आत्ता जे सांगितलंस ते सगळ मान्य आहे मला. पण तूदेखील समजून घे की विचाराच्या मागे काही भावना असते आणि ती अनेक अनुभवातून निर्माण झालेली असते. ती समजून घेण्याची शक्ती तुझ्या प्रयोगात नाही. हा... कदाचित् पुढच्या पिढीला ते समजू शकेल. पण तुला नाही."

"खरं आहे तुझं प्रसाद." विजय म्हणाला. मग राजकडे वळत तो म्हणाला,"ओके... राज... मी तुला मदत करतो. कितीही म्हंटलं तरी प्रकाश सरकारी नोकर आहे. त्यामानाने माझा हुद्दा मोठा आहे. एक काम कर, तू सोमवारी माझ्या घरी ये. मी उद्याच्या दिवसात जिथे बोलायचे तिथे बोलून ठेवतो. पण एकदा तुझी गाठ घालून दिली की मग तुझ तू बघायचं. ठीके?"


राज खुश झाला. "ये हुई ना बात दोस्त. प्रसाद मला तुझ म्हणणं पटतं आहे. चला,  मला माझ्या पुढच्या प्रयोगाला विषय मिळाला. कारण एकदा हा प्रयोग आपल्या देशातल्या योग्य व्यक्तींच्या हातात दिला की मी परत रिकामाच होणार आहे. तेव्हा पुढचा प्रयोग याविषयातला असेल. बर, आता सोडा हा विषय. हे बघा मी हे यंत्रसुद्धा काढून ठेवतो कानातून. आता माझ्या प्रयोगाच्या विजया प्रीत्यर्थ आपण मस्त थंडगार बियर पिउया." तो हसत म्हणाला.

राजने कानातून त्याचे संशोधन केलेले यंत्र काढून ठेवले आणि ते चौघे मित्र जुन्या गप्पात रंगून गेले. त्यानंतर थोडावेळ थांबून विजय आणि प्रकाश निघाले. मात्र गाडीत बसता क्षणी प्रकाश भडकुन विजयला म्हणाला,"साल्या विज्या काय आहे तुझ्या मनात? तो राज मुर्ख आहे; पण तुला काही अक्कल आहे की नाही? अरे भले त्या राजचा शोध मोठा आहे आणि आपल्या सरकारसाठी मोठा आहे; पण तुला आपलं सरकारी काम आणि सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता माहीत नाही का? अरे ते लोक राजला उभं तरी करतील का? उगाच का त्याला नको ती आशा लावली आहेस?"


विजय शांत होता. तो म्हणाला,"प्रकाश, अरे, तूच विचार कर. आपण मदत केली नाही तर राज गप्प बसणार आहे का? तो स्वतः प्रयत्न करणार म्हणाला न? म्हणजे तो करणारच्. अरे निदान आपण त्याला योग्य ओळख लावून त्यामानाने चांगल्या लोकांसोमोर उभं करू शकतो. तो बोलायच्या अगोदरच त्याचा आवाज दाबला जाऊ नये एवढी मदत तर आपण मित्र म्हणून करू शकतो न? आणि कोणी सांगावं? त्याचा शोध स्वीकारलाही जाऊ शकतो. उगाच का सुरवातीलाच नकारात्मक भूमिका घ्यायची?"

प्रकाशला ते फारसे पटले नाही. पण तो शांत झाला. विजयने राजला शब्द दिला आहे म्हणजे त्याने काहीतरी विचार केलाच असेल अस मनात म्हणत तो गप बसला.


सोमवारी राज उत्साहाने विजयकडे आला. विजयने अगोदरच बोलणं करून ठेवलं होतं. त्यामुळे त्याने स्वतः त्याच्या बरोबर जात त्याला योग्य व्यक्तिशी गाठ घालून दिली. मीटिंग खूपच चांगली झाली. अगदी अपेक्षेबाहेर! राज आणि विजय खुश होते. दोघे बाहेर पडले आणि खुशीत विजयने प्रकाशला फोन लावला. राज बाजूलाच उभा होता. पण आतून एक कारकून आला आणि त्याने  राजला परत आत बोलावलं आहे असं सांगितलं. फोनवरचं बोलणं क्षणभरासाठी थांबवत विजय म्हणाला," जा रे तू आत. आता तू काय मोठा माणूस होणार. सगळीकडे तुला एकट्यालाच बोलावणार. चल! मी निघतो. संध्याकाळी घरी ये. मी प्रकाश आणि प्रसादला पण बोलावून घेतो. आता खरं सेलिब्रेट करू. बाय"

राजेश देखील खुश होता. "हो रे दोस्ता. आता मागे वळून बघायची गरज नाही मला. चल मी जातो आत. संध्याकाळी भेटू." राज म्हणाला आणि परत आत वळला.


विजय गाडीत बसताना परत एकदा मागे वळला आणि त्याने आत जाणाऱ्या त्याच्या मित्राकडे प्रेमाने आणि अभिमानाने बघितले आणि निघाला.

2050......

 ]विजय, प्रकाश आणि प्रसाद आज भेटले होते........ प्रसादच्या लोणावळ्यातल्या हॉटेलच्या शेजारीच बांधलेल्या वाडयाच्या गच्चित बसले होते. वयाची साधारण पंचाहत्तरी सर्वांनीच सेलिब्रेट केली होती. त्यावेळी देखील ते भेटले नव्हते. आता मात्र तिघे अनेक वर्षानंतर भेटले होते. मुद्दाम ठरवून. प्रसाद अलीकडे सारखा आजारी पडायला लागला होता. त्यामुळे त्याने आग्रह करून विजय आणि प्रकाशला बोलावून घेतले होते. कारण राजच्या अचानक गायब होण्यानंतर त्या तिघाना एकमेकांना भेटायची इच्छा उरली नव्हती; किंवा कदाचित् त्यांनी एकमेकांना टाळलं होतं... असं म्हंटल तरी चालेल.त्याचं कारणही तसच होत.............

.................राज विजयला "बाय" म्हणून जो परत आत गेला तो कधीच बाहेर आला नव्हता. तो विजयलाच काय पण इतर कोणालाही कधीच भेटला नव्हता. 2 दिवस वाट बघुन विजयने माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. पण विजयला त्याबद्दल काहीच कळले नव्हते. उलट त्याला गप्प बसवण्यात आले होते. परत राजचे नावही घेऊ नये असे विजयला सांगण्यात आले होते आणि विजयदेखिल गप बसला होता.

आज अनेक वर्षांनी तिघे परत भेटले होते आणि फक्त तिघेच असल्याने त्यांच्यात राजचा विषय निघाला होता. "काय झालं असेल रे राजच?" प्रसादने बियरचा घोट घेत विजयला विचारलं होतं.


"ती संध्याकाळ मी आयुष्यभर मानत घोळवली आहे. आमची मीटिंग खरच खूप छान झाली होती. मी आणि राज खूप खुश होतो. दोघे बाहेर पडलो. मी प्रकाशला फोन लावला होता आणि त्याच्याशीच बोलत होतो, तेवढ्यात राजला परत आत बोलावलं. खर तर मीसुद्धा गेलो असतो आत. पण फक्त त्यालाच बोलावलं होतं. एकूणच तिथे बंदोबस्त आणि शिस्त खूप कडक होती. त्यामुळे त्याला बोलावलं म्हणजे फक्त तोच; हे मला माहित होतं. म्हणून मी त्याला आत जायला सांगितलं. त्यावर मी त्याची थोडी चेष्टा देखील केली. आणि तो आत गेला. संध्याकाळी तुम्हाला दोघांना मी घरी बोलावतो आहे अस मी त्याला सांगितलं होत. आणि मीटिंग आटपून माझ्या घरीच यायला सांगितल होत त्याला. त्यानंतर  गेली पस्तीस वर्ष मीसुद्धा फ़क्त हाच विचार करतो आहे की माझं नक्की कुठे आणि काय चुकलं." विजय म्हणाला.

प्रकाश आणि प्रसाद शांतपणे विजयचं बोलणं ऐकत होते. तिथेच एका बाजूला प्रसादचा सहा वर्षांचा नातू अमेय त्याच्या इलेक्ट्रोनिक गाडीने खेळत बसला होता. तो अचानक विजयकडे वळला आणि म्हणाला,"काय विजय आजोबा खोटं बोलता आहात तुम्ही. मी कुठे आणि काय चुकलो हा विचार करताना... सुटलो रे बाबा त्या मृत्युच्या सापळ्यातून... असा विचार देखील तुमच्या मनात येतोच नं? तुम्हाला माहित नाही राजचं  काय झालं; हे जितकं खरं आहे तितकंच हे देखील खर आहे नं की तुम्ही आत्तासुद्धा हाच विचार करता आहात की तुम्ही स्वःतच वजन वापरून परत राज आजोबांबरोबर आत नाही गेलात ते बरं झालं?" अमेयच बोलणं एकून विजयचा चेहेरा शॉक बसल्यासारखा झाला होता. प्रकाश आणि प्रसाद मात्र अवाक होऊन एकदा विजयकडे आणि एकदा अमेयकडे बघत होते. मात्र आपलं बोलणं संपवून लहानगा अमेय शांतपणे तिथून निघून गेला होता. त्याच्या गावीही नव्हतं की त्याने विजयच्या मनातले खोल दडून बसलेले विचार बोलून दाखवले होते.


विजय... प्रकाश... प्रसाद.... निःशब्द होऊन अमेय गेलेल्या दिशेने बघत बसले. तिघांच्याही मनात राजचे शब्द फिरत होते...........

राज चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीच म्हणाला होता,"खरच सांगतो दोस्तानो, मी यावर खूप अभ्यास केला आहे आणि  जर मी केलेला अभ्यास खरा असेल तर पुढे येणारी पिढी उपजत हे आणि असेच काही गुण घेऊन येणार आहे. मानवी पिढी आता अजून प्रगत होते आहे. पूर्वी प्रत्येक घरात फोन नसायचा आणि आज लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल असतो. त्या एवढ्याश्या माशीनमधून लोक संपूर्ण व्यवसाय सांभाळतात. तरीही अजूनही आपल्याला अनेक कामांसाठी अनेक इक्विपमेंट्स वापरावी लागतात. पण पुढे ही मशिन्स कमी होतणार आहेत. त्यांची गरजच पडणार नाही आहे. आपल्या मनातले विचार सामोरच्याला सांगणे किंवा एकादी गोष्ट हवी असल्यास विचार प्रवाहाने ती मिळवणे हे सर्व उपजतच असणार आहे पुढच्या पिढीकडे. त्यामुळे आज तुम्ही मला थांबवाल... पण मग तेव्हाच काय?"

------------------------------------------------------

8 comments:

  1. सुंदर कथा भविष्यात अस होवू शकत फक्त मानस दूर जातील एक मेका पासून हीच चिंता

    ReplyDelete
  2. कदाचित दूर जातील किंवा कदाचित नकारात्मक विचार बंद करतील.... ग्लास रिकामा आहे म्हणण्यापेक्षा ग्लास भरलेला आहे असा विचार कधीही चांगलाच 😊

    ReplyDelete
  3. कथेचा बाज चांगला आहे. ..पण शेवट अजून व्यवस्थित करायला हवा होता..

    ReplyDelete
    Replies
    1. थोडी शॉक ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे

      Delete
  4. As usual fantastic story...

    We are forging towards robotic generation... I feel we will be an witness to the same...

    Ultimately your penning the future Jyoti ji ...

    ReplyDelete
  5. Fiction ह्या कथाप्रकारातल्या ह्या कथेचा विषय जरा हटके आहे. काही वर्षांपूर्वी संजय नार्वेकरचा " अगबाई अरेच्च्या!" नावाचा सिनेमा आला होता. त्यातील नायकाला बायकांच्या मनातलं एकेदिवशी अचानक कळू लागत अशी कथा होती त्याची आठवण आली. परंतु ह्या कथेत राजेशला अचानक गायब का केलंय कळलं नाही. पटतही नाही. कारण त्याचे मित्र त्याचा शोधही घेत नाहीत हे जरा अशक्य वाटतं. तसं म्हटलं तर ही भारतातली आणि महाराष्ट्रतली कथा दिसतेय. आपल्याकडील लोकशाहीत हे असं गायब होणं शक्य नाही.हां, जर ही कथा रशियात किंवा चीनमध्ये घडत असेल तर शक्य आहे. दुसरं म्हणजे राजेश हा IITian दाखवलेला आहे आणि तो एक काळाच्याही पुढचा शोध लावतो. हा शोध कदाचित " Artificial intelligence(AI)" चा असू शकला असता. कथेत अद्ययावत अश्या मोबाइलचा उल्लेख पण आला आहे. तर असा हा AI चा अॅप मोबाईलमध्ये असल्यानं २०५०च्या पिढयांना हे साधन होवू शकतं असं दाखवता आलं असतं.
    बाकी कथा आणि विषयाची निवड आवडली.

    ReplyDelete
  6. धन्यवाद.

    कथेमधून हे सांगण्याचा प्रयत्न आहे की आज कदाचित हा शोध लागला तर तो पचवण्याची मानसिकता अजून आजच्या मनुष्य प्राण्यात नाही. त्यामुळे राजेश जेव्हा देशाच्या भल्यासाठी आपला शोध समर्पित करण्याचा विचार करतो त्यावेळी ते पचवू न शकलेले लोक त्यालाच गायब करतात. जेणेकरून त्याचा शोध कोणीच मिळवू शकणार नाही.... त्याचे मित्र देखील स्वतःच्या सांसारिक सुखाचा विचार करून त्याचा शोध घेत नाहीत. मात्र राजेशच्या दूरदृष्टीने पुढील होणारे बदल ओळखले असतात. जे 2050 मध्ये दिसतात

    ReplyDelete