Friday, November 27, 2020

श्रीकृष्ण - दारूक

 श्रीकृष्ण - दारूक


मनात अनेक प्रश्न कायम दाटत आले. अनेकदा हे प्रश्न स्वामींकडे उधकृत करावेत आणि त्यांची उत्तरे समजून घ्यावीत असा मोह देखील झाला. मात्र मी केवळ एक सारथी आहे, हे माझ्या जीवनाचे सत्य विसरणे मला शक्य नव्हते. त्यामुळे हे प्रश्न कायम मी माझ्या मनातच ठेवले.

कंस माहाराजांच्या वधानंतर कोवळ्या वयातील त्या सावळ्या मोहमयी अस्तित्वाने मी भारित झालो ते आजवर. स्वामींनी माझ्यासारख्या मुखदुर्बल आणि शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ सारथी पुत्राला आयुष्याचा सोबती करणे म्हणजे मुंगीने आकाशाला प्राप्त करून घेण्यासारखे आहे. त्यावेळेस माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण झाला होता.... कोवळ्या वयातील या सावळ्याच्या मनात माहाराज कंसाच्या अत्याचाराने विटलेले मथुरावासीयांच्या दुःखाचे पडसाद कधी उमटले असतील? मात्र तो प्रश्न मी माझ्या मनपटलावरून क्षणात पुसून टाकला होता. कारण या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा देखील त्या सावळ्या मोहक व्यक्तिमत्वाची जादू मोठी होती.


कंस माहाराजांचे श्वसुर जरासंध माहाराज यांनी स्वामींच्या मथुरेवर अठरा वेळा हल्ला केला. शेवटच्या युद्धाच्या वेळी तर त्यांनी स्वतःसोबत दूर देशीचा योद्धा कालिवाहन यास त्यांच्या सोबत मथुरेवर हल्ला करण्यास आमंत्रण दिले. तो देखील त्याची महाप्रचंड सेना घेऊन आला त्यावेळी युद्धनिती निपुण माझ्या स्वामींनी मला त्यांच्या अंतःपुरात बोलावून घेतले आणि सांगितले की त्यांनी खूण केल्याक्षणी मी रथ युद्धभूमीमधून लांब पळवून न्यायचा आहे. त्यावेळी माझे तरुण उसळते रक्त ही आज्ञा मान्य करण्यास तयार नव्हते. मात्र माझ्या मनापेक्षादेखील माझा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास आहे. त्यांनी निरोप पाठवून आव्हाहन केले की युद्ध करून दोन्हीकडील सैनिकांना मृत्युमुखी पडण्यापेक्षा कालिवाहन आणि मी असे दोघेच द्वंद्वयुद्ध करू. स्वतःच्या शक्तीवर आणि बाहूंवर प्रचंड विश्वास असणाऱ्या कालिवाहनाने हे आव्हाहन स्वीकारले. आम्ही युद्धभूमीवर पोहोचलो. केवळ गरुडध्वज रथ चालवणारा मी आणि रथारुढ माझे स्वामी, श्रीकृष्ण! स्वामींनी रथातून उतरताना माझ्या खांद्याचा आधार घेतला. इतरांसाठी ती एक लक्षातही न येणारी कृती होती. मात्र मला त्यांच्या अंतःपुरातील आमची चर्चा पुन्हा एकदा आठवून देणारी होती. भर युद्धामध्ये एका क्षणी स्वामींनी अचानक कालिवाहनाकडे पाठ केली आणि डोळ्याचे पाते लवण्याअगोदरच ते रथारूढ झाले. कोणालाही काहीही समजण्या अगोदर मेघपुष्प, बलाहक, शैब्य, सुग्रीव या स्वामींच्या प्राणप्रिय अश्वांनी आम्हाला दूर सागरकिनारी नेले होते. हो! सागरकिनारी... जिथे स्वामींनी जरासंध माहाराजांच्या लक्षात येण्याअगोदरच त्यांच्या संपूर्णपणे आवाक्याबाहेर असलेल्या या सागरकिनारी द्वारका नगरी वसवली होती. कालिवाहनाशी ठरवलेले द्वंदाचे कारण मथुरावासीयांना द्वारकेस सुखरूप पोहोचवण्यासाठीचा लागणारा वेळ घेणे हे होते..... आणि तरीही माझ्या मनात प्रश्न निर्माण झालाच; स्वामींना कालवाहनास द्वंदात हरवणे अशक्य नव्हते; मग तरीही युद्ध सोडून पळ का काढला असेल स्वामींनी? अर्थात द्वारकेमध्ये प्रवेश करताच मनातील प्रश्न विरघळून गेला.

देवी सुभद्रा यांचे हरण हा तर माझ्या यादवी मनाची हळुवार जखमच आहे. देवींना द्वारकेच्या बाहेरील शिव मंदिरामध्ये नेण्याची जवाबदारी स्वामींनी माझ्यावर टाकली होती. स्वामींच्या सानिध्यात राहून मी देखील काही प्रमाणात शस्त्र विद्या आत्मसाद केली होती. त्यादिवशी देवींना घेऊन जाण्यासाठी मी रथ त्यांच्या अंतःपुरासमोर आणून उभा केला त्यावेळी स्वामींनी हसत मला म्हंटले;'दारुका, तू देवालयात जातो आहेस; युद्धावर नाही. त्यात आता रथावर माझी प्रिय भगिनी सुभद्रा असणार आहे. मग ही शस्त्र सिद्धी कशासाठी? तिचे नाजूक मन दुखावले जाईल रे बाबा. काढून ठेव बघू ती शस्त्रे. स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून मी माझी शस्त्रे जवळच उभ्या सैनिकाकडे सुपूर्द केली. देवी सुभद्रा रथारूढ झाल्या आणि मी आसुडाचा आवाज करणार एवढ्यात स्वामींची दुसरी सूचना आली... दारुका, मित्रा... रथ अंमळ दूरच ठेव हो देवाल्यापासून.... माझे यादवी मन स्वामींच्या मिश्किलतेतील अर्थ शोधत राहिले... आणि स्वामींच्या प्रिय अर्जुन माहाराजांनी देवी सुभद्रा यांचे हरण केले. डोळ्यासमोर घडणारी घटना असूनही मी स्वस्थ राहीन असे स्वामींना का वाटले असेल? या प्रश्नाने मला आयुष्यभर सतावले आहे.


ज्यावेळी स्वामी पांडवांच्या बाजूने शिष्ठाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये दाखल झाले त्यावेळी मीच त्यांना राजसभेच्या द्वाराशी सोडले होते. हस्तिनापुराकडे आम्ही प्रयाण केले त्याक्षणापासून माझे स्वामी अस्वस्थ होते. हस्तिनापुरास आम्ही पोहोचलो आणि रथाचा वेग मर्यादेत आणत मी मेघपुष्प, बलाहक, शैब्य, सुग्रीव यांना दुडक्या चालीने चालण्याचा आदेश दिला. त्यावेळी माझ्या खांद्याला स्पर्श करीत स्वामी म्हणाले होते;"दारुका, परतीच्या वेळी आपणासोबत रथावर काही वेळासाठी तुझ्या हृदयाजवळ असणारी व्यक्ती असणार आहे. जर बोलणे यशस्वी झाले तर हे युद्ध होणार नाही." स्वामींच्या चिंतीत आवाजामुळे व्यथित होऊन मी म्हणालो होतो;"स्वामी, माहाराज भीष्म पांडवांवर जीवापाड प्रेम करतात. ते पांडवांवर कधीच अन्याय होऊ देणार नाहीत. आपली शिष्ठाई कधीच वाया जाणार नाही." यावर त्यापरिस्थितीत देखील स्मितहास्य करीत स्वामी म्हणाले;"अरे, राजसभेमध्ये होणारा निर्णय मला आताच माहीत आहे. मी कर्ण भेटीसाठी उत्सुक आहे." त्यांच्या या उदगारांनी मी अचंबित होऊन मागे वळून बघितले. मात्र तोवर राजसभेचे द्वार समोर आले होते. त्यामुळे स्वामींच्या चेहेऱ्यावरील भाव मला दिसले नाहीत. राजसभेमध्ये नक्की काय चर्चा झाली ते माझ्यासारख्या सारथ्या कळणे दुरापस्थ होते. मात्र परतीच्या वेळी स्वामींसोबत सुतपुत्र अंगराज कर्णाला येताना बघून मी गोंधळून गेलो होतो. स्वामी जे म्हणाले होते ते खरे होते. आमच्या कुळामध्ये जन्म घेतलेले माहाराज कर्ण आज स्वकर्तुत्वाने अंगराज झाले होते. त्यामुळे ते दुष्ट दुर्योधनाच्या बाजूने असले तरीही ते मला फार प्रिय होते. स्वामी अंगराजांच्या भेटीसाठी उत्सुक होते.... माहाराज कर्ण स्वामींसोबत रथारूढ झाले आणि मी रथ हस्तिनापुराबाहेर काढला. गंगेकिनारी एका वटवृक्षाच्या छायेत मी अश्वांना मोकळे केले आणि त्यांच्या सोबत गंगेच्या दिशेने पाऊल उचलले. रथाजवळ आता स्वामी आणि अंगराज कर्ण तेवढे होते. मी अश्वांना पाणी पाजून परतलो त्यावेळी मात्र रथाजवळ विचारात गढलेले एकटे स्वामी होते. रथ सज्ज होताच रथारूढ होत स्वामी अत्यंत कष्टी आवाजात मला म्हणाले;"दारुका, युद्ध आता नक्कीच अटळ!" अशी काय चर्चा झाली होती अंगराज कर्ण आणि माझे स्वामी यांच्यामध्ये?

खरंच; युद्ध अटळ होते आणि माझ्या स्वामींचे पांडवांची बाजू घेणे देखील. हातात शस्त्र न धरण्याचे वचन दिलेले... आपल्या प्रिय पार्थाच्या रथाचे सारथ्य स्वीकारणारे माझे स्वामी धर्म-अधर्माचे युद्ध घडवत होते. येणाऱ्या पुढील प्रत्येक युगांसाठी आदर्श निर्माण करण्यासाठी स्वतःकडे कमीपणा घेत.... प्रसंगी बदनामी सहन करत माझे स्वामी सर्वांचाच जीवनरथ हाकत होते.... आणि युद्ध घडले. माझी भूमिका बजावणाऱ्या माझ्या स्वामींच्या सोबत या युद्धाच्या वेळी देखील मी होतोच. एक सारथी आपल्या स्वामींना सोडून कुठे जाणार? संपूर्ण युद्धामध्ये प्राणप्रिय जनांच्या मृत्यूला स्वामी धीराने सामोरे जात होते. प्रिय अभिमन्यूच्या मृत्यूनंतर पार्थाला धीर देऊन दुसऱ्या दिवशी युद्धाला उभे करताना त्यांच्या मनाला झालेल्या यातना मी अनुभवल्या देखील. मात्र सतराव्या दिवशी कौरव सेनापती अंगराज कर्ण आणि अर्जुन यांच्या युद्धसमयी माझ्या स्वामींच्या जिव्हेचे खडग अंगराजांना घायाळ करीत होती आणि अर्जुनाला पेटवत होते याचा मी साक्षीदार होतो........ आणि तरीही युद्धसमाप्ती नंतर सुतपुत्र कर्णाच्या मृतदेहाला एका कातळावर अग्नी देताना स्वामींसोबत देखील मीच होतो. का बरे माझ्या स्वामींचे डोळे पाणावले होते एका सुटपुत्राला अग्नी देताना.... ज्याच्या मृत्यूला त्यांचीचं जिव्हा कारणीभूत होती?

.............. आणि स्वामींनी मला प्रभास तीर्थी नेण्यास सांगितले आणि रथातून उतरताना मला परतीचा प्रवास सुरू करण्यास सांगितले............. का? आयुष्यभर ज्याला सतत सोबत ठेवले त्याचा त्याग स्वामींनी शेवटच्या प्रवासाच्या वेळी का केला?


प्रश्न केवळ प्रश्न!!!! उत्तर एकच.......

श्रीकृष्णार्पणमस्तू!!!








Friday, November 20, 2020

श्रीकृष्ण - पार्थ

 श्रीकृष्ण - पार्थ


युधिष्ठिर : अर्जुना, माझं ऐक. शस्त्रागाराकडे जात असताना मध्ये माझा कक्ष लागतो हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे मी आणि द्रौपदी एकांतात असताना तू मुद्दाम तो एकांत भंग करण्यास आला नाहीस; हे आम्ही जाणतो. ब्राम्हणाच्या गाई चोरीला गेल्या आणि ही तक्रार घेऊन तो तुझ्याकडे आला. त्यामुळे राजकर्तव्य पूर्ण करण्यासाठी तू तुझी शस्त्रे घेऊन त्याच्या मदतीसाठी गेलास. तुझ्याकडे दोष येत नाही प्रिय बंधू. तरीही तुझ्या मनात काही शंका असेल तर खुद्द द्रौपदीला विचार. तिची तक्रार असली तर आपल्यामध्ये ठरलेल्या बंधनानुसार तू एका वर्षासाठी राज्य सोडून जा.

अर्जुन : महाराज, आपण माझी कितीही समजून काढलीत किंवा द्रौपदीने देखील कोणतीही आपत्ती नसल्याचे सांगितले तरीही आपण पाच जणांनी मिळून ठरवलेले बंधन पाळणे माझे कर्तव्य ठरते. त्यामुळे उद्या प्रातःकाळी मी एक वर्षाच्या प्रवासासाठी निघणार आहे.

युधिष्ठिर : तू श्रीकृष्णा व्यतिरिक्त कोणाचे ऐकले आहेस का? जसे तुला योग्य वाटते तसे कर!

असे म्हणून युधिष्ठिराने अर्जुनाला आलिंगन दिले आणि जड अंतकरणाने तो त्याच्या कक्षाच्या दिशेने गेला.

प्रातःकाळी माता कुंतीचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या चारही बंधू आणि प्रिय पत्नी द्रौपदी यांचा निरोप घेऊन अर्जुन केलेल्या चुकीच्या प्रायश्चित्तासाठी निघाला. अर्जुनाचा रथ इंद्रप्रस्थातून बाहेर पडला मात्र आपण नक्की कोणत्या दिशेने जावे हा प्रश्न पडल्याने तो काही क्षण थांबला. त्याचवेळी समोरून धूळ उडवत श्रीकृष्णाचा अबलख अश्व असलेला रथ येताना त्याने बघितला आणि अर्जुन अत्यंत समाधानी मुद्रेने आपल्या रथातून पायउतार झाला.

श्रीकृष्ण : अरे? पार्था, तू इथे राजधानी बाहेर काय करतो आहेस?

अर्जुन : (मंद हसत) देवा, आपण हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकले आहे. तुम्ही माझ्या मानतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहात. असे असूनही तुम्ही मलाच प्रश्न विचारत आहात हे काहीसे जगावेगळे नाही का वाटत?

श्रीकृष्ण : अरे, मी ईशान्य भारतातील काही राजांना भेटण्याचा मानस मनात ठेऊन द्वारकेहून बाहेर पडलो होतो. परंतु माझ्याच नादात नकळतपणे मी माझा रथ इंद्रप्रस्थाकडे वळवला. बरं, तू काहीच ठरवले नसल्यास माझे एक काम करशील का? ईशान्य भारतातील नागलोक आणि इतर गणराज्य येथील राजे अत्यंत उत्तम राज्यकारभार करत आहेत. त्यांची युद्धनीती देखील काहीशी वेगळी आहे. तू माझ्यासाठी या भागामध्ये जाऊन तेथील राजांना भेटून येशील का? तुझा प्रवास संपतेवेळीस मात्र द्वारकेस नक्की ये.

........ आणि श्रीकृष्ण इच्छा आज्ञेसमान मानणारा अर्जुन कोणताही प्रश्न न विचारता ईशान्य भारतातील राजांना भेटण्यासाठी निघाला. प्रवास संपतेवेळी तो द्वारकेस पोहोचला. मात्र त्याअगोदर ईशान्य भारतातील नागराजाची सुंदर आणि कुशाग्र बुद्धीची कन्या उलुपी आणि माहाराज चित्रवाहन यांची शस्त्रास्त्र निपुण एकुलती एक कन्या चित्रांगदा यांनी अर्जुन पत्नी म्हणून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले होते. शिक्षेचे वर्ष पूर्ण होता होता अर्जुनाने द्वारकेहून सुभद्रेचे हरण करून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले. प्रवासामध्ये अर्जुन श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता.

श्रीकृष्ण : पार्था, सुभद्रेचे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. त्यामुळे मनामध्ये कोणताही किंतु न आणता तू तिचा स्वीकार कर.

अर्जुन : देवा, आपल्या सांगण्यावरून मी ईशान्य भारतातील राजांची गाठ घेतली आणि त्याचे फलस्वरून राजकुमारी उलुपी आणि राजकुमारी चित्रांगदा या द्रौपदी नंतरच्या माझ्या दोन भार्यांनी इंद्रप्रस्थाकडे प्रस्थान केले आहे. मोहना, माझे मन देखील सुभद्रेसाठी व्याकुळ आहे. परंतु मी परत गेल्यानंतर द्रौपदीला कोणत्या तोंडाने सामोरे जाऊ? तिच्या विशाल नेत्रातील प्रश्नांची उत्तरे देणे मला शक्य होणार नाही.

श्रीकृष्ण : धनंजया, आपल्या जीवनात असे अनेक प्रश्न येतात की आपण निरुत्तर होत असतो. मात्र याचा अर्थ या प्रश्नांचे उत्तरच नसते असे नाही. काळ ही एकच गोष्ट अशी आहे की ती प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला योग्य वेळी देते. अर्थात तू द्रौपदीला जिंकले असलेस तरी त्या बुद्धिशील स्त्रीला हे कधीच मान्य होणार नाही की तू तिच्या समोर एक नाही दोन नाही तर तीन तीन सवती उभ्या करतो आहेस. त्यात सुभद्रेचे वय आणि तुझे तिच्या प्रेमात आकंठ बुडणे तर तिच्या नजरेतून सुटणार नाही. तरीही...... जे होते आहे तेचं योग्य आहे!

दिवसांमागून दिवस जात होते आणि दुर्योधनाने महाराज युधिष्ठीरांना द्यूत क्रीडेसाठी हस्तिनापुरामध्ये आमंत्रित केले. आपल्या चारही बंधूंना आणि प्रिय पत्नी द्रौपदी हिला घेऊन महाराज युधिष्ठीर हस्तिनापुरात पोहोचले. द्यूतात हरलेल्या युधिष्ठिराने त्यानंतर आपल्या चारही बंधूंना पणाला लावले आणि त्यानंतर पांचाली देखील एका वस्तू समान पणाला लावली गेली. त्यावेळी तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान केवळ आणि केवळ श्रीकृष्णाने ठेवला होता. त्यानंतर द्रौपदीच्या शापवाणीच्या भीतीने धृतराष्ट्राने परत केलेल्या आपल्या राज्याच्या दिशेने निघालेल्या युधिष्ठिराला ज्यावेळी दुर्योधनाने परत एकदा द्यूत खेळण्याचे आवाहन केले आणि बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास या अटीवर युधिष्ठिराने ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर बारा वर्षांचा वनवास पांडवांनी द्रौपदीसह घालवला. मात्र अज्ञातवासाच्या वेळी कोणी कोणती भूमिका घ्यावी हे सांगण्यासाठी पांडवांचा सखा श्रीकृष्ण हजर होता.

अर्जुन : श्रीकृष्णा, मी आणि बृहन्नडा? माझे हे आजानुबाहु, अनेक युद्धांमध्ये शास्त्रांचे वार झेललेली बलदंड छाती मी या बृहन्नडा अवतारामध्ये हे माझे पौरुष्य कसा लपवणार आहे?

श्रीकृष्ण : पार्था, तू हे कसे विसरू शकतोस की उर्वशीने दिलेला शाप तुला कधी ना कधी जगायचाच होता. मग हीच ती योग्य वेळ नाही का? तुझ्या एका वर्षाच्या इंद्रप्रस्थ त्यागाच्या वेळी तू केवळ उलुपी, चित्रांगदा आणि सुभद्रा यांना जिंकेल नव्हतेस तर राजा इंद्राच्या सर्वात सुंदर अप्सरेला तुझ्या याच पौरुष्याने वेडे केले होतेस. मात्र ती पुरुरव महाराजांची, तुमच्या कुरुवंशाच्या आद्य पुरुषाची पत्नी असल्याने तू तिचा स्वीकार केला नाहीस. याचा राग येऊन तिने तुला एका वर्षासाठी स्त्रीभावनेचा अनुभव करण्याचा शाप दिला होता.

..... आणि अशाप्रकारे अज्ञातवासाचे ते वर्ष देखील सरले. हस्तिनापूरच्या राजकुमाराने दुर्योधनाने पांडवांचे हक्काचे इंद्रप्रस्थ तर नाहीच, पाच गावेच काय पण सुईच्या अग्रावर राहील इतकी जमीन देखील देण्याचे नाकारले आणि कुरुक्षेत्रावरील युद्धाला सुरवात झाली.

अर्जुन : श्रीकृष्णा, समोर तर पितामह भीष्म आहेत, माझे गुरू द्रोणाचार्य, माझे बंधू.... सर्वच तर माझे आप्तेष्ट आहेत. यांच्यावर मी शास्त्र प्रहार कसा करू?

यानंतर श्रीकृष्णाने युद्धनीती, धर्मनीती आणि त्यापलीकडे जाऊन मानवीय जवाबदरीचा बोध अर्जुनाला केला. अठरा दिवसांचे युद्ध झाले. अर्जुनाला केवळ कर्णच हरवू शकणार होता. मात्र त्याच्या रथाचे चाक धरतीने गिळंकृत केल्यानंतर ज्यावेळी अर्जुन पायउतार आणि निःशस्त्र कर्णावर शस्त्र उगारण्यास कचरू लागला यावेळी कर्ण वध करण्यासाठी श्रीकृष्णानेच अर्जुनाला उद्युक्त केले.

श्रीकृष्ण : कोणासाठी थांबलास पार्था? या सुतपुत्राने तुला आठवण करून दिली आहे की तो याक्षणी निःशस्त्र आहे म्हणून? तो रथातून पायउतार आहे म्हणून? हा कर्ण तुला आज धर्माचे ज्ञान देतो आहे! ज्याचे संपूर्ण जीवन अधर्मी कृती करण्यात गेले; तो आज केवळ मृत्यूच्या भीतीने तुझ्याशी शब्दच्छल करीत आहे. पार्था, आता विचार करू नकोस. ज्याने तुझ्या प्रिय पत्नीचा भर सभेत वेश्या म्हणून अपमान केला, तो तुझ्या प्रिय पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूसाठी कारणीभूत होता, ज्याने केवळ नाव व्हावे म्हणून आपली कवच-कुंडले दान केली, केवळ दुर्योधनाच्या उपकारांमुळे जो राजा झाला अशा या अधर्मी सुताच्या बोलण्यास तू महत्व देऊ नकोस. तुझ्या गांडीव धनुष्याची प्रत्यंचा ओढ आणि धरतीवरील हा अधर्मी नष्ट कर.

श्रीकृष्णाच्या बोलण्याचा परिणाम पार्थावर न होता तर आश्चर्य! कर्णाच्या अंताने महाभारतीय युद्धाच्या अंताचा शंखनाद करून गेला. युद्ध समाप्त झाले आणि......

श्रीकृष्ण : अर्जुना ऐक..... आजवर मी जे जे सांगितले ते ते तू ऐकत आलास. कधीही प्रश्न नाही केलास. त्याचप्रमाणे आजही मी जे सांगतो आहे ते फक्त ऐक. भारतवर्षातील एकमेव धनुर्धर केवळ तू नाहीस तर तो सुर्यपुत्र कर्ण देखील होता. हो! मी योग्य तेच सांगतो आहे.... तो सूर्यपुत्र होता. मात्र काळाची गरज आणि अधर्माचा नायनाट यासाठी त्याचे बलिदान आवश्यक होते. ज्याप्रमाणे तुझ्या प्रिय पुत्राचे, अभिमन्यूचा मृत्यू देखील त्याच्या जन्माबरोबर विधिलिखित झाला होता. द्रौपदी केवळ तुझी पत्नी होऊ नये ही देखील तुझ्या मातेची नव्हे तर नियतीची इच्छा होती. चार पत्नी असूनही आणि बृहन्नडेच्या वेशात असूनही तुला उत्तरेचा मोह झाला होता; हे माझ्यापासून लपलेले नाही पार्था. मात्र अभिमन्यूच काय तुम्हा पाचही जणांचे सर्वच पुत्र या महाभारतीय युद्धात कामी येणार होते, आणि तरीही हा वंश पुढे चालणे ही काळाची गरज होती. म्हणूनच उत्तरेचा विवाह अभिमन्यूशी झाला. धनंजेया, मला माहीत आहे की युद्धनीती आणि धर्मनीती नंतर आज मी जे काही सांगतो आहे... ते ऐकून तुला संन्यस्त जीवनाकडे वळण्याची इच्छा होईल याची मला कल्पना आहे; आणि तेच योग्य आहे पार्था. तुझ्या चारही बंधूंसोबत आणि पांचाली सोबत तुम्ही महानिर्वाणासाठी हिमालयाच्या दिशेने प्रयाण करावेत हेच योग्य.

अर्जुन : (अश्रू भरल्या नेत्रांनी हात जोडून श्रीकृष्णा समोर उभा होता) वासुदेवा, तू माझ्या हातून जे जे घडवलेस त्याची जवाबदरी कोणी घ्यायची केवळ या एका प्रश्नाचे उत्तर दे; म्हणजे मी माझा हा देह धर्तीवर ठेवण्यास मोकळा होईन.

श्रीकृष्ण : मी घडवले! परंतु ते तू स्वीकारलेस पार्था! मी तुला मार्ग दाखवला! मात्र त्या मार्गावर चालण्याचा निर्णय तुझाच होता धनंजया! मी सांगत गेलो! मात्र माझ्या सांगण्याला प्रश्न न विचारता त्याचा स्वीकार तू केलास अर्जुना! आपल्या कृत्याची जवाबदारी आपलीच असते मध्यमा.... तू कृती केलीस, त्याक्षणी त्याची जवाबदारी तुझ्याकडे आली.

................. आणि अश्रू भरल्या नेत्रांनी त्या कृष्णप्रिय पांडवाने देवेश्वराला पदस्पर्श केला आणि तो मार्गस्थ झाला.

Friday, November 13, 2020

श्रीकृष्ण - कर्ण

 श्रीकृष्ण - कर्ण


श्रीकृष्ण : तू जेष्ठ आहेस हे माहीत असूनही नकार का?

कर्ण : श्रीकृष्णा, तुझ्या व्यतिरिक्त हे कोणालाच कळलेलं नाही. तरीही हा प्रश्न तू का विचारतो आहेस?

श्रीकृष्ण : सुर्यपुत्रा......

कर्ण : अहं! वासुदेवा, मी सुतपुत्र आहे. तुम्ही चुकून माझा उल्लेख काहीतरी वेगळा करता आहात.

श्रीकृष्ण : सुर्यपुत्रा.... जेष्ठ कौंतेया.... दानवीरा.... तुझं अस्तित्व कायमच सुर्यग्रहणाप्रमाणे झाकोळलेलं राहिलं आहे. मात्र आज प्रत्यक्ष तुझी जन्मदात्री माता तुझ्यासमोर उभी राहिली आणि तिने तुला तुझ्या जन्माचं सत्य सांगितलं; ते सत्य नाकारून तू अधर्मी दुर्योधनाच्या बाजूनेच उभं राहण्याचा निर्णय घेतो आहेस... हे योग्य नाही. मला मान्य आहे की ज्यावेळी संपूर्ण हस्तिनापुराने तुला अपमानित केलं होतं त्यावेळी तो एकटा तुझ्यासाठी... तुझ्या बाजूला उभा राहिला होता. त्याने दाखलेल्या मित्रत्वामुळेच तू अंगराज झालास. आयुष्यभर एक सुतपुत्र म्हणून जगला असतास; मात्र आज तू एक राजा म्हणून मान्यता पावला आहेस. मात्र तरीही तू थोडा व्यावहारिक विचार करावास हे सांगण्यासाठी मी मुद्दाम तुला भेटायला आलो आहे. कर्णा, जीवनात योग्य संधीचा योग्य उपयोग करून घेणे हेच अंतिम सत्य आहे. तुला काय वाटतं... त्यावेळी हस्तिनापुरामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये एक सुतपुत्र म्हणून झालेला तुझा अपमान कोणताही विचार न करता तुला अंग देशाचा राजा करून दूर करणारा दुर्योधन तुझ्या प्रेमाखातर ते करत होता का? नाही.... अंगराज कर्णा, तुला देखील चांगलंच माहीत आहे की संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक कलेमध्ये अव्वल असणाऱ्या तुला कायमच अंकित करून घेण्याचा तो त्याचा डाव होता.

कर्ण : हो मला माहीत आहे की दुर्योधनाने दूरदृष्टी ठेवून त्याक्षणी आपल्या राजपुत्र होण्याचा उपयोग करून घेतला होता आणि मला अंग देशाचा राजा केलं होतं. मोहना, मला हे देखील माहीत आहे की दुर्योधन पत्नी भानुमतीने दुर्योधनाला वरताना अट घातली होती की तिच्या प्रिय मैत्रिणीला सुप्रियेला मी स्वीकारले तरच ती दुर्योधनासोबत विवाह करेल. मुरलीधरा, मला हे देखील माहीत आहे की द्यूत क्रीडेच्यावेळी खेळ चालू असेपर्यंत दुर्योधनाने मुद्दाम मला सभागृहाबाहेर ठेवलं होतं कारण ते फासे जरासंधाच्या हाडांपासून बनवलेले होते. जरासंधाला मी बाहुकंटक डाव टाकून मल्ल युद्धामध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रत्येक खेळीच्या वेळी केवळ भीमाच्या अस्तित्वामुळे... आणि त्याच्या अस्वस्थ ओरडण्यामुळे ते फासे पांडवांच्या विरोधात पडत होते; तद्ववतच माझ्या अस्तित्वाचा परिणाम त्या फाशांवर झाला असता. गिरीधरा, केवळ दुर्योधनानेच नाही तर पितामहांनी देखील केवळ मी पांडवांना युद्धात हरवू नये म्हणून माझा अपमान करून ते सेनापती असेपर्यंत त्यांच्या ध्वजाखाली युद्धामध्ये उतरू दिलं नव्हतं. द्वारकाधीशा, मला आता हे देखील माहीत झालं आहे की पांडवांच्या राजसूययज्ञाच्या वेळी तू शिशुपालाच्या दिशेने तुझं सुदर्शन चक्र सोडलंस आणि तो ज्यावेळी माझ्या आसनामागे जाऊन लपला त्यावेळी तुझं ते सूर्यकिरणांनी तेजोमय झालेलं चक्र देखील केवळ माझ्या अस्तित्वामुळे त्याला काही करत नव्हतं. म्हणूनच तू मला यज्ञवेदीच्या दिशेने बोलावलंस आणि त्याचवेळी शिशुपालाचा वध झाला. पद्मनाभा, देवांचा राजा इंद्र देखील माझ्यासमोर भिक्षुक म्हणून उभा राहिला त्याचं कारण मी समजून चुकलो आहे. अपराजिता, ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्या जीवनातील की जिथे समोरच्या प्रत्येकाने व्यावहारिक विचारच केला आहे. अच्युता, ही सर्वच उदाहरणं बाजूला ठेवतो आज. कारण आता मी जे सांगणार आहे ते यासर्वांनी केलेल्या व्यावहारिक विचारांचा कळस आहे. तू जो व्यावहारिक विचार घेऊन माझ्याकडे आला आहेस; तो विचार मुळातच माझ्यासाठी नाही. पांडव माता... राजमाता कुंतीदेवी माझ्याकडे मातेच्या ममत्वाने आल्या नव्हत्याच. त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की त्यांच्या पुत्रांना युद्धामध्ये केवळ मीच हरवू शकतो. त्यामुळे त्या त्यांच्या प्रिय पांडवांच्या जीवनदानासाठी आल्या होत्या. त्यांनी जरी मला त्यांच्या उदरातून जन्म दिला असला तरी त्यांनी मला कधीच ओळखलं नाही. म्हणूनच मी त्यांची मागणी नाकारेन या भीतीमुळे त्यांनी मला पांचालीचा प्रथम पती आणि पांडवांचा जेष्ठ बंधू या नात्याने पुढे जाऊन हस्तिनापुराचा राजा होण्याचं आमिष देखील दिलं. तुला एक सांगू का धनंजया, माझी पालनकर्ती राधाई आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करणारी वृषाली या दोन स्त्रिया आणि माझा प्रिय बंधू शोण हे सोडले तर या जगातील प्रत्येक व्यक्तीने माझ्या जीवनाचा उपयोग त्यांच्या व्यावहारिक गरजांसाठी केला.

श्रीकृष्ण : म्हणजे तू हे मान्य करतो आहेस की विश्वातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फायद्याचा विचार करते आणि त्याप्रमाणे निर्णय घेते.

कर्ण : हिरण्यगर्भा, हे विश्वातील अबाधित सत्य आहे. ते मी मान्य किंवा अमान्य करण्याचा प्रश्नच कुठे येतो?

श्रीकृष्ण : कर्णा, मग केवळ तूच का या विचारापासून दूर जातो आहेस?

कर्ण श्रीकृष्णाच्या कमल चरणांकडे काहिक्षण पाहात राहिला आणि मग एक गूढ-दुःखी मंद स्मित करत तो म्हणाला....

ऋषीकेशा, मी का व्यावहारिक विचारांपासून दूर राहिलो आहे! जगद्नियंत्या, तू मला हा प्रश्न विचारतो आहेस? ही चराचर जीवसृष्टी ज्याने निर्माण केली.... प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ज्याने जीव फुंकला.... आचार-विचार करण्याची शक्ती ज्याने दिली तो विश्वनाथ मला विचारतो आहे की मी व्यावहारिक विचार का नाही केला....

असा विचार मी नाही केला देवेश्वरा, कारण... मी जीवनभर केवळ भावनांच्या भोवऱ्यात अडकत गेलो. दुर्योधनाने माझा अपमान होत असताना माझा गौरव केला मी त्याचा अंकित झालो. मात्र, अनिरुद्धा, आज कुरुक्षेत्राच्या या युद्धभूमीवर तुझ्या समक्ष उभं असताना मी मान्य करतो की माझ्या जीवनातील प्रत्येक चुकीचा निर्णय माझ्या अंतर्मनाला कायम टोचत राहिला. त्या टोचणीचा सल कमी व्हावा म्हणूनच मी जीवनभर दान करत राहिलो आणि माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी हे दान देतच राहणार आहे. माझ्या आयुष्यातील अनेक चुकीच्या निर्णयांनी आज मला इथे आणून उभं केलं आहे; याची मला जाणीव आहे. मी हे देखील समजून आहे धर्माध्यक्षा, की ज्या-ज्या वेळी कौरव-पांडवांचा आणि या युद्धाचा विचार केला जाईल त्या-त्या वेळी प्रत्येक व्यक्ती माझ्या चुकीच्या निर्णयांबद्दल बोलेल.... म्हणूनच केवळ म्हणूनच मी माझी ओळख त्यापुढे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न कायम केला आहे. मात्र देवेशा, कायम दुसऱ्यांना दान देणारा हा कर्ण आज तुझ्याकडे एकच मागणं मागतो आहे..... यापुढे कधीही कुठेही माझा उल्लेख झाला तर तो दानवीर कर्ण म्हणूनच व्हावा.

श्रीकृष्ण : तथास्तु दानवीर कर्णा! 

Friday, November 6, 2020

श्रीकृष्ण - सुदामा

 श्रीकृष्ण - सुदामा 


गुरू सांदीपनी : बलरामा, कृष्णा तुम्ही इथे माझ्या आश्रमामध्ये अध्यायनासाठी आला आहात. या आश्रमात कोणी उच-नीच नाही. येथे अध्ययन करणारा प्रत्येक कुमार हा केवळ विद्यार्थी आहे. तुम्ही देखील येथे असेपर्यंत याचा विसर पडू देऊ नका. विशेषतः तुम्ही कोण आहात हे येथील विद्यार्थ्यांना न कळलेलंच बरं.

बलराम : गुरुवर्य, आपण बिलकुल चिंता करू नये. येथे असेपर्यंत आम्हा दोघांकडून मथुरेचा उल्लेख देखील होणार नाही.

गुरू सांदीपनी : कृष्णा, गोकुळातील तुझ्या लीलांच्या कथा इथवर पोहोचल्या आहेत बरं का! तिथे तू अनेक गोपालांचा म्होरक्या होतास. मात्र इथे तू केवळ एक अध्यायी आहेस; हे विसरू नकोस. राजनिती, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अश्व-गज-अस्त्र-शस्त्र संचालन, मंत्रोपनिषद, वेद - उपनिषद अशा चौसष्ट विद्या इथे या आश्रमात शिकवल्या जातात. ज्या विद्यार्थ्याची जशी गती आणि जी गरज असेल तो त्याप्रमाणे त्या विद्येचे अध्ययन करतो. माझी अशी मनापासून इच्छा आहे की या आश्रमात राहून तू आणि बलरामाने सर्वच चौसष्ट विद्यांचे अध्ययन पूर्ण करावे.

श्रीकृष्ण : गुरुवर्य, आपली इच्छा आम्हा दोघांनाही शिरसावंद्य आहे. कोणत्या अध्ययनापासून सुरवात करावी आम्ही?

गुरू सांदीपनी : कृष्णा, अस्त्र-शस्त्र, अश्वरोहण, गजरोहण यासारख्या विद्या शिकण्यासाठी प्रथम तुला योग्य शरीरयष्टी प्राप्त करणे आवश्यक आहे. बलरामाने मात्र गोकुळामध्ये असताना योग्य मेहेनत घेतल्यामुळे तो या शारीरिक मेहेनतीला तयार आहे. त्याला या विद्यांचे शिक्षण लगेच सुरू करणे शक्य आहे. तरी मी असे ठरवले आहे की प्रथमतः तू मंत्रोपनिषदांचे शिक्षण घ्यावेस आणि बलरामाने अस्त्र-शस्त्र शिक्षणास सुरवात करावी.

बलराम : गुरुवर्य, आपण आमच्यासाठी जो निर्णय घ्याल तो योग्यच असणार याची आम्हाला खात्री आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य.

असे म्हणून बलराम आणि श्रीकृष्ण गुरू सांदिपनींच्या कुटीमधून बाहेर पडले.

श्रीकृष्ण : दादा, तू अस्त्र-शस्त्र शिकायला सुरवात करणार आणि मला मात्र मंत्रोपनिषद शिकावे लागणार. रोज पहाटे उठून आश्रम सेवा करायची आणि मग हवनाच्या वेळी गुरूंसमवेत मंत्र पठण करायचे यात काही मजा नाही रे. तू गुरू सांदीपनींना का नाही सांगत की मी शारीरिक मेहेनत करून शरीर कमावेन. पण मला देखील तुझ्यासोबत ठेवावे.

बलराम : छोट्या, गोकुळात असताना मी तुला कित्येकदा सांगत असे की केवळ दही-लोणी चोरण्यापलीकडे काहीतरी कर. थोडी तब्बेत सुधार. त्यावेळी तर तू माझं ऐकलं नाहीस. आता गुरूंनी जे ठरवून दिलं आहे, ते त्यांना सांगून बदलून घ्यायला मात्र मला सांगतो आहेस. हे काही बरोबर नाही. गुरू सांदीपनींनी आपल्यासाठी जे ठरवलं आहे ते काहीतरी विचार करूनच न? सर्वात महत्वाचं म्हणजे सतत माझा ओचा धरून माझ्या मागे-मागे करणं आता बंद कर बघू. थोडं स्वतःच्या हिमतीने जगायला शिक की. तुझं हे माझ्या मागे राहाणंच कदाचित गुरूंनी ओळखलं असेल; आणि म्हणूनच तुला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आपल्या दोघांना दोन वेगळ्या विद्या शिकण्यासाठी सांगितलं असेल. त्यामुळे कोणतीही कुरकुर न करता तू तुझ्या कुटीच्या दिशेने जा बघू.... आणि लक्षात ठेव तुझ्या सोबत तिथे बहुतांशी ब्राम्हण कुमार असतील. त्यामुळे तू मथुरेचे राजे वसुदेव यांचा पुत्र आहेस; हे कोणालाही कळू देऊ नकोस. नाहीतर त्या दडपणापाई तुझ्याशी कोणी मैत्री करायचे नाही.

कृष्ण : दादा, मी मुद्दाम कशाला सांगेन कुठून आलो आहे! बरं... चलतो मी माझ्या कुटिकडे.

अशाप्रकारे बलराम आणि कृष्णाने गुरू सांदीपनींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपापल्या अध्ययनाची सुरवात केली. कृष्णासोबत त्याच्या कुटीमध्ये अजून दोन कुमार राहात होते. एकाचे नाव होते सुदामा आणि दुसरा होता केवल. केवल एका श्रीमंत सावकाराचा कुमार होता. तो येथे व्यवहार निती शिकण्यासाठी आला होता. मात्र त्याला देखील काही विशेष कारणामुळे प्रथम मंत्रोपनिषद शिकण्याचा सल्ला गुरू सांदीपनींनी दिला होता. त्याला तो अजिबात मंजूर नव्हता. त्यामुळे तो कायम अध्ययन टाळत असे. सुदामा मात्र एका भिक्षुकी करणाऱ्या गरीब ब्राम्हणाचा मुलगा होता. तो अत्यंत हुशार आणि एकपाठी असल्याने त्याच्या पित्याने प्रयत्नपूर्वक त्याला गुरू सांदीपनी सारख्या उत्तम गुरूंकडे अध्ययनाला ठेवले होते. सुदामा देखील मनलावून मंत्रोपनिषद शिकत होता. त्याची एक सुप्त इच्छा होती की त्याने ज्ञानदान करावे. अर्थात त्याच्या दृष्टीने ही इच्छा म्हणजे मुंगीने आकाशाला गवसणी घालण्याइतके मोठे स्वप्न होते. त्यामुळे मनातील इच्छा तो कधीच कोठेही बोलून दाखवत नसे. आपल्या वडिलांप्रमाणेच आपण देखील आयुष्यभर भिक्षुकी करणार आहोत; हे सत्य त्याने स्वीकारले होते. कृष्ण आणि सुदामा इतर विद्यार्थ्यांसोबत गुरू सांदीपनींनी आखून दिलेला दिनक्रम तंतोतंत पाळत असत. केवल मात्र कायम पळवाटा शोधत असे. त्यामुळे कृष्ण आणि सुदामा सोबत तो कधीच नसे. कृष्ण आणि सुदामा मात्र दिवस-रात्र सतत सोबत राहू लागल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली होती. एकमेकांची काळजी घेणं; एकमेकांना आवश्यकतेनुसार मदत करणं यातून ही मैत्री चांगलीच गहिरी होऊ लागली होती.

गुरू सांदीपनींची शिस्त खूपच कडक होती. आश्रमातीलं सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या शाखेप्रमाणे आश्रमातील कामांची वाटणी करून देण्यात आली होती. मंत्रोपनिषद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत गुरूंसोबत राहावे लागत असे; त्यामुळे त्यांच्यावर होमासाठी लागणाऱ्या तयारीची जवाबदारी असे. रोज पाहाटे उठून होमासाठी सुकलेली लाकडे गोळा करणे, फुले गोळा करणे, त्यांचे हार करणे ही कामे तर रोजचीच होती. त्यामुळे रोज प्रथम प्रहरी उठून जंगलात जाणे कृष्ण आणि सुदामाला नवीन राहिले नव्हते. मात्र संध्या समय होता-होता गुरू सांदीपनी नदीच्या दिशेने एकटेच जात असत. त्यामुळे संध्याकाळी मंत्रोपनिषद शिकणारे कुमार काहीसे मोकळे होत असत. आश्रमातील सर्वच विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था गुरू पत्नी पाहात असत. मग हे कुमार गुरू मातेला मदत करण्यासाठी स्वतःहून जात असत. कधी कधी या मदतीचे कौतुक करण्यासाठी गुरुमाता या कुमारांना काही वेगळा खाऊ देत असे. असा खाऊ कृष्ण आणि सुदामा आवडीने वाटून खात.

असेच दिवस झपाट्याने पुढे सरकत होते. कृष्ण आणि सुदामाचे उपनिषदांचे शिक्षण पूर्ण होत आले होते. शिक्षण पूर्ण होत आल्यामुळे सुदामा खुश होता. आपल्या गावाकडे माता-पित्याकडे परतण्यास तो खूपच उत्सुक होता. एका संध्याकाळी कृष्ण सांदीपनी गुरूंच्या सेवेत असताना सुदामा गुरुमातेला मदत करण्यासाठी माजघरात गेला. गुरुमातेने सांगितलेले प्रत्येक काम सुदामाने झटपट करून टाकले. त्यावर मातेने कौतुकाने एक पुरचुंडीभरून मऊसूत पोहे सुदामाला दिले आणि म्हणाली;"बाळा, तू आणि कृष्ण वाटून घ्या बरं का." हसून मानेनेचे रुकार देत मिळालेली कौतुकाची पुरचुंडी घेऊन सुदामा माजघरातून बाहेर पडला.

त्याचवेळी कृष्ण आणि सांदीपनी गुरू होम कुंडाजवळ बसून बोलत होते.

गुरू सांदीपनी : श्रीकृष्णा, उज्जयिनीमधील माझ्या या आश्रमामध्ये अध्यापनाला येऊन तू उज्जयिनीमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे महत्व पर्वत शिखरावर नेऊन ठेवले आहेस. पुढे येणाऱ्या सर्वच युगांमध्ये उज्जयिनीमधील शिक्षण हे सर्वश्रेष्ठ राहील ते केवळ तुझ्या येथील या वास्तव्यामुळे. वासुदेवा, खरं तर मी कोण तुला शिकवणारा? तू कोण आहेस याची मला जाणीव आहे; आणि म्हणूनच तुझ्या सहवासाचा मोह मी टाळू शकलो नाही. त्यामुळे मंत्रोपनिषदांचे शिक्षण तू प्रथम घ्यावेस असं सांगून तुझ्या मंगलमयी अस्तित्वाची सोबत माझ्या निकट ठेवण्याची मनतील इच्छा मी पूर्ण करून घेतली आहे. मात्र आता हे शिक्षण पूर्ण होत आले आहे आणि तुला अस्त्र-शस्त्र शिक्षणासाठी पुढील शाखेत जाणे क्रमप्राप्त आहे.

यावर मंद स्मित करीत श्रीकृष्ण काही बोलणार एवढ्यात त्याला समोरून सुदामा येताना दिसला. त्याला पाहाताच गुरू सांदीपनी म्हणाले : श्रीकृष्णा, तो पहा तुझा जिवलग मित्र इथेच येतो आहे. तू कोण आहेस हे माहीत नसूनही तुझ्यावर जीवापाड माया करतो तो. खरं तर सुदामा अत्यंत हुशार आणि एकपाठी विद्यार्थी आहे. तो स्वतः देखील मंत्रोपनिषदांचे उत्तम अध्यापन करू शकतो. मात्र दुर्दैवाने भिक्षुकी करणाऱ्या ब्राम्हण घरातील कुमार असल्याने तो आयुष्यभर भिक्षुक राहणार. अर्थात एक उत्तम गुरू समाजाला लाभण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे जरुरीचे असते; हे तुला सांगण्याची गरज नाही. असो! तो याच दिशेने येतो आहे; त्यामुळे याहून जास्त काही बोलणे योग्य नाही.

गुरूंचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण उठून उभा राहिला आणि गुरूंना नमसकार करून सुदामाच्या दिशेने गेला.

सुदामा : कृष्णा, काय सांगत होते रे गुरुवर्य?

श्रीकृष्ण : तसं काहीच नाही रे. आपलं शिक्षण पूर्ण होत आलं आहे न, तर मी पुढे काय शिकावं ते सांगण्यासाठी त्यांनी मला बोलावून घेतलं होतं.

सुदामा : खोटं नको हं बोलुस कृष्णा. गुरुवर्य नक्की माझ्याबद्दल तुझ्याशी काहीतरी बोलत होते. सांग बघू काय बोलत होते.

श्रीकृष्ण : मी का खोटं बोलेन सुदामा? बरं, ते जाऊ दे. तू माजघराकडून येतो आहेस. काही दिलं आहे का गुरुमातेने? मला नं भूक लागली आहे. मात्र भोजनाची वेळ अजून झालेली नाही. जर गुरुमातेने काही दिलं असेल तर आपण खाऊया का?

सुदामा : अरे आज काहीच दिलं नाही गुरू मातेने. मला देखील थोडी भूक आहे. पण आपल्याला भोजन समय होइपर्यंत थांबावंच लागणार असं दिसतं आहे.

श्रीकृष्ण : हो का? बरं! मग आपण आपल्या कुटिकडे जाऊ चल.

सुदामा : तू हो पुढे. गुरुमातेने मला थोडं काम दिलं आहे ते पूर्ण करून मी आलोच.

असं म्हणून सुदामा श्रीकृष्णाला तिथेच सोडून दुसरीकडे निघून गेला. दूर जाणाऱ्या सुदामाकडे मंद स्मित करत बघून श्रीकृष्ण त्याच्या कुटिकडे गेला.

खरं तर सुदामाला कृष्णाचा काहीसा राग आला होता त्याक्षणी. गुरू सांदीपनी आपल्याकडे बघत कृष्णाला काहीतरी बोलले याची त्याला खात्री होती. मात्र कृष्ण मुद्दाम ते आपणास सांगत नाही आहे असं त्याचं मन त्याला सांगत होतं. म्हणूनच गुरुमातेने दिलेले चविष्ट मऊसूत पोहे कृष्णाला न देता एकट्यानेच खावे असं त्याने रागाच्या भरात ठरवलं होतं आणि कृष्णाला सोडून तो निघून गेला होता. थोडं पुढे जाऊन सुदामाने मागे वळून पाहिलं तर कृष्ण कुटीच्या दिशेने जाताना त्याला दिसला. ते पाहाताच एक झाडाच्या पारावर बसून त्याने ते पोहे संपवून टाकले आणि मग कुटीच्या दिशेने गेला.

काही दिवसातच मंत्रोपनिषद शिक्षण संपल्याचे गुरू संदीपनींनी सर्व कुमारांना सांगितले. जे कुमार पुढील अजून काही शिक्षण घेणार होते त्यांना त्या शाखेकडे जाण्यास गुरूंनी सांगितले आणि जे आश्रम सोडणार होते; त्यांना निरोप दिला. आश्रम सोडताना सुदामाच्या डोळ्यातून पाणी खळत नव्हते. तो क्षणोक्षणी कृष्णाला मिठी मारत होता.

सुदामा : तुला सोडून जाण्यास मन तयारच होत नाही रे कृष्णा. तुझ्या सोबत असताना लक्षात नाही आलं पण तुझ्या अस्तित्वात एक जादू आहे. तू सोबत असताना कोणतीही चिंता मनाला स्पर्श करत नाही. मात्र आता तुला सोडून जाणार या विचाराने देखील मी अस्वस्थ झालो आहे.

श्रीकृष्ण : असं म्हणून कसं चालेल मित्रा? आयुष्य हे एका झऱ्यासारखं वाहत असतं. केवळ पुढे जाणंच आपल्या आहात आहे बरं.

सुदामा : कृष्णा.....

श्रीकृष्ण : बोल प्रियवरा....

सुदामा : अहं! काही नाही. निघतो मी...

असं म्हणून आपलं गाठोडं उचलून सुदामा निघाला. का कोणास ठाऊक पण निघताना त्याच्या मनात काही दिवसांपूर्वीची ती संध्याकाळ घोळत होती. क्षणभराच्या रागापाई आपण आपल्या प्रिय मित्रासाठी आणलेले पोहे एकट्यानेच खाल्ले; हा विचार त्याच्या मनाला डाचत होता. मात्र आता वेळ निघून गेली; असा विचार करून सुदामा चालत राहिला. आपल्याच विचारांच्या तंद्रीमध्ये जाणाऱ्या सुदामाकडे बघून श्रीकृष्णाने काहीशा खेदाने मान हलवली आणि त्याच्याकडे पाठ केली.

दिवस-महिने-वर्ष सरत होती. आता सुदामाचे लग्न झाले होते. त्याला मुले देखील झाली होती. वृद्धापकाळाने त्याच्या माता-पित्याना देवाज्ञा झाली होती. हुशार, एकपाठी सुदामाचे अध्यापनाचे स्वप्न भिक्षुकीच्या पात्रात विलीन झाले होते. अठराविश्व दारिद्र्य त्याच्या कुटीमध्ये वास करत होते. मुलांना रोजचा अन्नाचा घास मिळणे देखील अवघड झाले होते. तरीही सुदामाची सुशील पत्नी कोणतीही तक्रार न करता संसार करत होती. मात्र मुलांच्या होणाऱ्या आबाळीमुळे मनातून कायम दुःखी राहात होती.

एकदिवस त्यांच्या गावी काही प्रवासी आले. ते धर्मशाळेमध्ये उतरले होते. हे प्रवासी श्रीमंत सावकार असल्याचे समजल्यामुळे सुदामा भिक्षुकी मिळण्याच्या आशेने धर्मशाळेमध्ये गेला; आणि धर्मशाळेमध्ये समोर केवल या आपल्या गुरुबंधुला बघून आश्चर्यचकित झाला आणि ओशाळला देखील. सुदामाला पाहून केवल देखील आश्चर्यचकित झाला. केवलची नजर चुकवून परत निघालेल्या सुदामाचा केवलने हात धरला आणि त्याला आपल्या बाजूला प्रेमाने बसवले.

केवल : अरे सुदामा, तू इथे काय करतो आहेस? काय ही तुझी परिस्थिती मित्रा? गुरू सांदिपनींच्या आश्रमातील सर्वात हुशार आणि एकपाठी विद्यार्थी होतास तू. मला तर वाटलं होतं की तू देखील गुरू सांदीपनीं प्रमाणे आश्रम चालवत असशील.

सुदामा : केवल, मित्रा, मी कुठून मोठा होणार? माझे वडील भिक्षुकी करत असत. मी शिक्षण घेत होतो त्यावेळी मनात होतं की घेतलेलं शिक्षण आश्रमातील विद्यार्थ्यांना दान करावं. पण शिक्षण संपलं आणि आयुष्याचं सत्य समोर येऊन उभं राहिलं बघ. केवळ हुशार असून काही होत नाही. त्यासाठी नशीब देखील लागतं.

केवल : असं नको म्हणूस मित्रा. नशीबाहून देखील मोठी गोष्ट तुझ्याकडे आहे. मात्र तुला अजून त्याची जाणीव झालेली दिसत नाही.

सुदामा : नशीबाहून देखील मोठं काही असतं का केवल?

केवल : अरे ज्याचा जिवलग श्रीकृष्णासारखा द्वारकाधिश आहे; अशा तुझा मला हेवा वाटतो. अरे, नुकताच मी द्वारकेहून येतो आहे. श्रीकृष्णाने मथुरेपासून दूर स्वतःची अशी द्वारकानगरी वसवली आहे. सर्व सुखसोयींनी युक्त अशा नगरामध्ये सर्वच नागरिक आनंदाने राहात आहेत.

सुदामा : कोणाबद्दल बोलतो आहेस तू? कृष्णाबद्दल? माझ्या परमप्रिय मित्राबद्दल? तो राजा आहे?

केवल : कमाल करतोस सुदामा. तुला नाही माहीत? मथुरेचे राजे वसुदेव यांचा सुपुत्र श्रीकृष्ण! त्याच्या राजनिती निपुणतेची चर्चा विश्वभरात होते; कृष्णनिती म्हणून जी ओळखली जाते असा हुषारीचा, ज्ञानाचा, सर्जनशीलतेचा महासागर म्हणजेच तुझ्या माझ्यासोबत गुरू सांदीपनी यांच्या आश्रमातील कृष्ण आहे. तुला हे माहीतच नाही?

सुदामा : अरे, संसाराच्या धकाधकीमध्ये आणि दोन वेळच्या अन्न भ्रांतीपुढे इतर काही समजून घेण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. बरं! तू द्वारकेला जाऊन आला आहेस तर आपल्या मित्राला भेटलाच असशील. तुला ते अवघड देखील नाही. एक मोठा सावकार आहेस तू.

केवल : इथेच तू चुकतो आहेस मित्रा. मी भले मोठा सावकार असेन. पण मी कृष्णसखा नाही. आश्रमामध्ये ज्यावेळी त्याच्याशी मैत्री करणं शक्य होतं त्यावेळी मी त्याला बघून न बघितल्यासारखं केलं. आज केवळ पैशाच्या जोरावर मी त्याला भेटण्याचं मानत आणलं तरी तो ते कधीच मान्य करणार नाही; हे मला माहीत आहे. तो पैशापेक्षा भावनेला तोलतो मित्रा. तू इथे असा भिक्षुकी करण्यापेक्षा त्याला जाऊन भेट. तो नक्की तुला भेटेल.

केवलचे बोलणे ऐकून सुदामा अंतर्मुख झाला आणि आपल्या घराकडे वळला. घरी येऊन त्याने आपल्या पत्नीस सर्व घटना कथन केली. सुदामाचे बोलणे ऐकून त्याची पत्नी हर्षभरीत झाली.

सुदामा पत्नी : काय सांगता? तुमचे मित्र द्वारकाधिश महाराज आहेत? तुम्हाला कसं माहीत नव्हतं ते? अहो, इतका मोठा मित्र असून देखील आपण असे दारिद्र्यात का राहातो आहोत. तुमच्या सावकार मित्राने तुम्हाला योग्य सल्ला दिला आहे. तुम्ही खरोखरच द्वारकाधिशांना जाऊन भेटलं पाहिजे.

सुदामा पत्नीचे बोलणे ऐकून विचारात पडला. बालपणी ज्या कृष्णासोबत आपण प्रतिदिनी प्रत्येक क्षण जगलो तो आता एक मोठ्या नगरीचा राजा आहे. त्यावेळी आपण दोघेही विद्यार्थी होतो. मात्र आता आपण केवळ एक भिक्षुक आहोत. आपल्यामधील दरी खुप मोठी आहे. असे असताना का बरे त्याने आपल्याला भेटावे? मनातील विचार त्याने आपल्या पत्नीला बोलून दाखवला.

सुदामा पत्नी : तुम्ही म्हणता ते खरं असेलही कदाचित. आता ते महाराज आहेत. आपल्यासारख्या गरीब व्यक्तीला ते कदाचित आपणहून भेटणार देखील नाहीत. परंतु आपले मित्रवर्य केवल यांनी काय म्हंटलं ते आपण कसं विसरता? श्रीकृष्ण महाराज भावनांचे भुकेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे काही मागण्यासाठी नका जाऊ. केवळ सुखदुःखाच्या चार गोष्टी करण्याच्या उद्देशाने जा. ते महाराज आहेत. त्यामुळे ते योग्य विचार करतीलच. आजवरचे आयुष्य आपण नशिबावर सोडलं आहे न? तद्वतच ही भेट देखील तुम्ही नशिबावर सोडून द्या.

सुदामाला पत्नीचे म्हणणे पटले आणि तो जाण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या पहिल्या प्रहरी उठून स्नान-संध्या आटोपून सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी निघाला. सुदामा निघत असताना त्याच्या पत्नीने त्याच्या हातात एक लहानशी पुरचुंडी दिली.

सुदामा पत्नी : हे घेऊन जा आपण. गोड, मऊसूत पोहे आहेत यात. आपण रिकाम्या हातांनी जाणे योग्य नाही. ते द्वारकाधिश आहेत. राजे आहेत. त्यांना काय कमी? तिथे तुमचं स्वागत नक्कीच खूप मोठं होईल. पण तरीही आपल्याकडून काहीतरी नेणं हे आपलं कर्तव्य आहे.

सुदामाने काहीएक न बोलता ती पुरचुंडी घेतली आणि तो द्वारकेच्या दिशेने निघाला. मजल दरमजल करीत तो द्वारकेला पोहोचला. संपूर्ण प्रवासामध्ये सोबत असणारी ती पोह्यांची पुरचुंडी सुदामाच्या मनात लहानपणच्या आठवणीचं काहूर उठवत होती. कधीतरी एक वांझोट्या रागापाई आपल्या जीवलगाच्या वाटणीचे पोहे आपण खाल्ले होते; हा विचार त्याला आजही अस्वस्थ करत होता. बालवयातील आपल्या वागण्याचा पश्चात्ताप सुदामाला संपूर्ण प्रवासात होत होता. द्वारकेला पोहोचेपर्यंत त्याची अस्वस्थता इतकी वाढली की तिथे पोहोचताच तो परत निघण्याचा विचार करू लागला. बरेच अंतर चालल्यामुळे सुदामा दमला होता. त्यामुळे आज एकदिवस धर्मशाळेमध्ये विश्रांती घेऊन उद्या परतीचा प्रवास सुरू करावा असा विचार त्याने केला. घरी जाऊन पत्नीस सांगता येईल की द्वारकाधिश भेटलाच नाही. दिवसभर द्वारकानागरीमध्ये फिरून सुदामाने नगरीचे सौंदर्य आणि श्रीमंती बघितली. प्रशस्त रस्ते, मोठे-मोठे प्रासाद, अंतरा-अंतरावरील बगीचे, सर्व वस्तूंनी भरलेली बाजारपेठ आणि सुखी-समाधानी चेहेऱ्याचे नागरिक बघून त्याचे मन भरून आले आणि श्रीकृष्णाला भेटण्याच्या विचाराचे दडपण देखील आले. 'आपल्या आयुष्यातील दुःख काय सांगायचे त्या राजाला?' हा मनातील विचार त्याला पूर्ण पटला.

पुढील दिवशी सुदामा आल्या वाटेने परत निघण्यासाठी धर्मशाळेतून बाहेर आला आणि बघतो तर काय त्याचा लाडका मित्र त्याच्या समोर उभा होता. कृष्णाला सामोरे पाहिल्यावर मात्र सुदामाच्या मनाचा बांध फुटला आणि धावत जाऊन त्याने श्रीकृष्णाला मिठी मारली. सुदामाला बाहुपाशात घेत श्रीकृष्णाने देखील आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून दिली. काही क्षण दोघे जगाला विसरून गेले होते. दोघे भानावर आले आणि मिठीतुन मोकळे होत दोघांनी अत्यंत प्रेमाने एकमेकांकडे बघितले.

श्रीकृष्ण : न भेटताच जाणार होतास प्रियवरा?

सुदामा : खूप मोठा राजा झालास की तू..... तुम्ही! मी एक भिक्षुकी करणारा गरीब ब्राम्हण आहे महाराज. मनात इच्छा असूनही तुमच्यापर्यंत पोहोचणे मला शक्य होते का? म्हणूनच परत निघालो होतो.

श्रीकृष्ण : आता भेटला आहेस न? मग दोन दिवस राहा कसा. माझा पाहुणचार घे आणि मग जा परत.

श्रीकृष्णाची इच्छा सुदामाने लगेच मान्य केली आणि त्याच्यासोबत तो त्याच्या महालाकडे निघाला. ते दोन दिवस कसे सरले त्या दोन जिवलग मित्रांना कळलेच नाही. गुरू सांदीपनींच्या आश्रमातील जुन्या आठवणींमध्ये दोघे रमून गेले होते. दोन दिवस झाले आणि सुदामा श्रीकृष्णासमोर उभा राहिला.

सुदामा : श्रीकृष्णा, इथे येताना मनावर एक दडपण होतं; तुझी ही नगरी बघितल्यानंतर तर ते फारच वाढलं होतं... मात्र तुला भेटलो आणि मनातल्या सगळ्या शंका-कुशंका दूर झाल्या. तुला भेटलो... बालपणीचे दिवस आठवून सुखावलो. पण आता मला परतलेच पाहिजे. घरी माझी पत्नी आणि मुलं वाट बघत असतील.

श्रीकृष्ण : निघतोस मित्रा? ठीक! निघ... मी अडवणार नाही.

असे म्हणून श्रीकृष्णाने सुदामाला आलिंगन दिले. सुदामा आलिंगनामध्ये असताना अत्यंत हळू आवाजात पण अत्यंत मिश्कीलपणे श्रीकृष्ण सुदामाला म्हणाला.... आता तरी माझे हक्काचे पोहे देणार ना मित्रा? आलिंगनातील सुदामाने ते ऐकले आणि मंद स्मित करीत तो म्हणाला.... गुरू सांदीपनी काय म्हणाले होते रे माझ्याकडे बघत?

आलिंगनामधून मोकळे होत दोघेही मनसोक्त हसले. सुदामा भाऊजींना निरोप देण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या रुक्मिणीला त्या दोघांच्या अचानक हसण्याचे कारण काही कळले नाही. मात्र परतीच्या प्रवासाला निघालेल्या सुदामा भाऊजींनी एक लहानशी पुरचुंडी आपल्या पतीच्या हातात ठेवताना तिने पाहिले.

सुदामा गेला त्या दिशेने बघत ती प्रेमभरली पुरचुंडी सोडून श्रीकृष्णाने चिमूटभर पोहे तोंडात टाकले आणि मनभर तृप्ती त्याच्या चेहेऱ्यावर दिसू लागली.

सुदामा परतीच्या वाटेवर गेल्या दोन दिवसांचा विचार करत मनाने समाधान पावत होता. मात्र जसजसे त्याचे गाव जवळ येऊ लागले तसतसा त्याच्या मनात विचार येऊ लागला की आपण तर श्रीकृष्णाकडून काहीच न घेता आलो परत. काय उत्तर द्यावे बरे पत्नीला आणि आशेने वाट बघणाऱ्या आपल्या लेकरांना? विचार करत करत आपल्या कुटिपर्यंत पोहोचलेला सुदामा समोरील दृश्य पाहून सीमित झाला होता...

सुदामाच्या समोर एक प्रशस्त आश्रम उभा होता. त्याची पत्नी आणि त्याची मुले त्याला सामोरी आली.

सुदामा : हे काय ग? आपली कुटी कुठे गेली? हा आजूबाजूचा परिसर इतका कसा बदलून गेला?

सुदामा पत्नी : आपण द्वारकेहून निघालात आणि आपण इथे पोहोचण्याच्या अगोदरच द्वारकाधिश श्रीकृष्ण महाराजांच्या खास मर्जीमधील स्थापत्य विशारद इथे आले. त्यांनी आपल्या नगरीच्या महाराजांशी बोलून आपल्या पर्णकुटीच्या जागेवर आश्रम उभारण्याचा श्रीकृष्ण महाराजांचा मानस सांगितला आणि परवानगी घेऊन मगच हा आश्रम उभारला आहे. नाथ, तुमच्या मित्राने; महाराज श्रीकृष्णांनी तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे.... गुरू सांदीपनींनी तुमच्यामधील एक उत्तम गुरू ओळखला होता. त्यामुळे आता पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून अध्यापनाचे पुण्यकर्म तुम्ही करावे अशी महाराजांची इच्छा आहे.

द्वारका सोडताना आपल्या जिवलग मित्राने आपल्याला आलिंगन देऊन रागावरील ताबा काय मिळवून देऊ शकतो हे कृतीतून दाखवून दिल्याचे लक्षात येऊन गुरू सुदामांनी मनापासून स्मित केले आणि आपल्या आश्रमाच्या दिशेने ते वळले.

(ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे. आपण पुराण कथांमध्ये कायम हेच वाचले आहे की श्रीकृष्णाने सुदामाच्या झोपदीचा महाल केला होता. तो राहात असणाऱ्या अस्मावतीपुराचे नाव सुदामापुरी झाले होते. मात्र मला या कथेमध्ये कायम विसंगिती वाटत आली आहे. सुदामा एक ब्राम्हण होता. त्यामुळे एका राज्य शासकापेक्षा तो एक उत्तम गुरू झाला असता; असं माझं मन मला कायम सांगत आलं आहे. याच कल्पनेचा विस्तार मी येथे केला आहे.)




Friday, October 30, 2020

श्रीकृष्ण - पेंद्या

 श्रीकृष्ण - पेंद्या


(हा लेख संपूर्णपणे काल्पनिक आहे)

श्रीकृष्ण : पद्माकर, किती रे उशीर केलास? मी कधीचा थांबलो आहे. बलराम दादा तर तुझी वाट बघायला न थांबता निघूनसुद्धा गेला. योशोदा माँ मला त्याच्याबरोबर जायचा आग्रह करत होती; पण मी तुझ्यासाठी हट्टाने थांबलो.

पद्माकर : तुझं बरं आहे रे किसना, तुला शिदोरी बांधून द्यायला तुझी यशोदा माँ आहे. मला मात्र माझ्या म्हाताऱ्या आजीचं जेवण करून स्वतःची शिदोरी बांधून घेऊन निघावं लागतं या पहाटवेळी.

श्रीकृष्ण : पद्माकर, तुला किती वेळा सांगितलं की मी तुझी शिदोरी माँ कडून मागून घेईन. तू आपला वेळेत येत जा.

पद्माकर : नाही किसना. कधीतरी प्रेमाखातर तू माझ्यासाठी शिदोरी आणणं आणि रोजची शदोरी तुझ्या घरून येणं यात फरक आहे. आपल्याला नंद बाबांनी स्वाभिमानाने जगायचा धडा लहानपणापासून दिला आहे; विसरलास का? तसंही मी खाऊन-पिऊन सुखी आहे; भले तुझ्याप्रमाणे मला माझ्या घरी रोज पक्वान्न नसतील मिळत. अर्थात तू त्याची देखील सोय केलीच आहेस... आपण सर्वांनी शोदोरी सोडली की तू जो काला करतोस न तो खायला मजा येते. प्रत्येकाची शिदोरी वेगळी असते; मग सर्वच एकत्र करून आपण सगळे जेवतो. त्यामुळे माझ्यासारख्याने काही कमी आणलं असलं तरी पोटभर मिळतं खायला; तुझ्याप्रमाणे पक्वान्न घेऊन येणाऱ्या गोपाळांच्या शिदोरीतील खास पदार्थ देखील मिळतात. किसना, तुझ्या सोबत असणारा प्रत्येक गोपाळ समाधानी आहे बघ. मग माझ्यासाठी तू वेगळं काही करायची गरज नाही वाटत मला. आणि तसही मला आजीसाठी घरचा स्वयंपाक करावाच लागतो न; मग त्यात माझ्यासाठी म्हणून थोडं अजून जास्त करायला काय त्रास असणार? कन्ह्या, तुझं माझ्याविषयीचं प्रेम मी समजू शकतो; तशा तू देखील माझ्या भावना समजून घे.

श्रीकृष्ण : पद्माकरा.... कसं सांगू मी तुला माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत? बरं, तूच सांग मला की मी असं काय करू की तुला आनंद होईल?

पद्माकर : किसना, तू काय देऊ शकशील बरं मला? बरं एक मागतो.... तुला असं नाही वाटतं; माझं हे भलं मोठं नाव माझ्या या कृश शरीरयष्टीसाठी फारच भारदस्त आहे? गाई चरायला नेणाऱ्या गवळ्याच्या कृश अशा या पोरक्या पोराला पद्माकर हे भारदस्त नाव शोभलं तर पाहिजे. कन्ह्या, मला असं नाव दे जे मला शोभेल आणि तुझ्याच काय पण समस्त गोकुळवासियांच्या तोंडात सहज राहील.

श्रीकृष्ण : (मनापासून हसत) पद्माकरा... मला वाटलं होतं 'तुझ्यासाठी काय करू?' अस मी विचारल्यावर तू बरंच काहीतरी मागशील.

पद्माकर : असं मागून का सुख मिळतं कन्ह्या? कसं सांगू केवळ तुझ्या जवळ असणं यात सर्वस्व मिळतं रे!

श्रीकृष्ण : नकोच सांगूस काही. मी समजलो की तू तुझ्या भावव्याकुळ मनाप्रमाणे मागणी केलीस. पद्माकरा, शरीरयष्टीवरून का कोणाचं नाव आणि कर्तृत्व ठरतं? पण तरीही तुझं मागणं एकदम मान्य. तुला आजपासून मी पेंद्या म्हणणार. मात्र मला खात्री आहे; एक दिवस असा येणार आहे की तुझं खरं नाव पद्माकर तुला शोभेल.

श्रीकृष्णाने पेंद्याला आलिंगन दिले आणि दोघेही हसत-खिदळत इतर गोपाळांना जाऊन मिळाले आणि गावाबाहेर खिल्लारांना चरायला घेऊन गेले.

असेच दिवस जात होते आणि तो दिवस आला ज्यादिवशी बलराम दादा सोबत श्रीकृष्णाने गोकुळ सोडले. इतर सर्व गोकुळवासियांप्रमाणे पेंद्याने देखील श्रीचरणांना मिठी घातली.

पेंद्या : किसना, असा कसा तू मला सोडून जाऊ शकतोस? अजून तुझी मोहमयी मुरली मी कानात साठवलेली नाही. तू पेंद्या म्हणून मारलेली अजून कानांना तृप्त नाही करून गेली. अरे, असे कितीतरी खेळ आहेत की जे आपण अर्धेच सोडले आहेत. तू तुझा डाव पूर्ण न करता नाही हं जायचंस. कन्ह्या, तू मला मागे विचारलं होतंस नं मला काय हवंय? आता मला समजलं मला नक्की काय हवं आहे तुझ्याकडून. मला न तुझा सहवास हवा आहे मोहना. तुला माझी गरज आहे की नाही मला माहीत नाही... पण तू माझ्या आयुष्यात असणं ही माझी खुप मोठी गरज आहे. असा अचानक नको रे जाऊस सोडून मला आणि या गोकुळाला. पहाटवेळी तुझी मोहमयी मुरली ऐकल्यावाचून गुरांना चैन पडत नाही. गवळणी पाणी भरायला घरातून बाहेर पडत नाहीत. मी तर तुझ्या सुरांनीच झोपेतून जागे होतो. अरे किसना, मी... फक्त मीच का... समस्त गोकुळातील ही खिल्लारं आणि हे वेडे गोकुळवासी तुझ्या केवळ अस्तित्वाच्या भावनेवर जगतात. गाई जास्त दूध देतात; वासरं सुदृढ राहातात. तुझं असणं म्हणजे आमचं सर्वस्व आहे रे कन्ह्या.

श्रीकृष्णाने प्रेमभराने पेंद्याचे दोन्ही खांदे धरले आणि त्याला उठवून उराशी कवटाळले.

श्रीकृष्ण : पेंद्या, मित्रा, एवढा भावविवश नको होऊस. एक समजून घे आज माझं जाणं अटळ आहे. मात्र राधेप्रमाणे मी तुझ्या प्रेमबंधनात देखील पूर्णपणे अडकलो आहे. गेल्या आठ वर्षांत जे केलं नाही आणि पुढील संपूर्ण जन्मात जे करणार नाही ते आज तुझ्यासाठी नक्की करीन. माझ्या प्रिय पेंद्या... आज दुसऱ्यांदा विचारतो.... गोकुळ सोडून जाताना मी असं काय करू की ज्यामुळे तुला आनंद होईल?

पुन्हा एकदा आपल्या प्रिय मुरलीधराच्या पायांवर पेंद्या कोसळला.

पेंद्या : मनोहरा.... समस्त विश्वात मीच असा भाग्यवान आहे की ज्याच्यावर तुझी कृपादृष्टी दुसऱ्यांदा पडली आहे. पण तेवढाच करंटा देखील आहे... मला याही क्षणी कळतच नाही आहे की 'तू इथून जाऊ नकोस'; याव्यतिरिक्त मी तुझ्याकडे काय मागू? तूच समजून घे मला आणि योग्य असेल ते दान टाक माझ्या झोळीमध्ये.

श्रीकृष्णाचे चरण पेंद्याच्या अश्रूंनी भिजून गेले होते. श्रीकृष्णाने खाली बसून त्याच्या पाठीवर हात ठेवला.

श्रीकृष्ण : पेंद्या, तुझ्या प्रेमाने मला देखील अबोल करून टाकलं आहे रे. या निष्कपट आणि स्वछ मैत्रीपुढे मी तुला काहीही दिलं तरी ते थिटं पडेल. त्यामुळे आज मीच तुझ्याकडे काहीतरी मागतो आहे. तू माझी मागणी पूर्ण कर. मागे तू तुझ्या शरीरयष्टीला शोभेल असं नाव मागितलं होतंस न? आता तू अशी शरीरयष्टी कमव की तुझं पद्माकर हे नाव तुला शोभेल. बाकी सर्व नियतीवर सोड प्रिय मित्रा...

पेंद्याने अश्रूपूर्ण नजरेने श्रीकृष्णाकडे बघितलं आणि त्याच्या नेत्रांमधील भाव समजून तो बाजूला झाला. त्यानंतर गोकुळवासियांना निरोप देऊन श्रीकृष्णाने राधेला.... पेंद्याला.... त्याच्या प्रिय गोकुळाला कायमचे सोडलं.

दिवस सरले; वर्षे उलटली... पांडवांना न्याय देण्यासाठी कृष्णनीती वापरून श्रीकृष्णाने युद्धपरिस्थिती निर्माण केली. मात्र एक सत्य अधोरेखित होते की दुर्योधन बलाढ्य हस्तिनापूर नगरीचा राजकुमार होता. त्याच्या समवेत युद्धकुशल, अनुभवी असे महान रथी-महारथी होते. याउलट पांडवांकडे स्वतःच्या युद्ध निपुणतेव्यतिरिक्त काही नव्हते. त्यामुळे भारतवर्षातील राजांकडे ज्यावेळी दुर्योधनाचा दूत आणि पांडवांचा दूत एकाचवेळी मदतीसाठी जात होते; त्यावेळी हे राजे तुलनात्मक दृष्टिकोनातून दुर्योधनाच्या विजयाचा कयास बांधून त्याच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत होते. त्यामुळे दुर्योधनाच्या तुलनेत पांडवांसोबतचे सैन्यबळ कमी होते; आणि ही चिंतेची बाब होती. श्रीकृष्ण अहोरात्र केवळ हाच एक विचार करत होता की असे कोणते राजे असतील की जे बळ आणि सत्य या दोन बाजूंचा विचार करून योग्य निर्णय घेतील आणि पांडवांचे सैन्यबळ वाढेल. एक एक दिवस पुढे सरकत होता आणि युद्ध सुरू होण्याच्या आदल्या संध्याकाळी श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर युद्धभूमीची पाहाणी करत फिरत असताना अचानक त्याच्या समोर एक अत्यंत सुदृढ, बलवान योद्धा उभा राहिला. आपल्याच विचारात मग्न श्रीकृष्णाने एक स्मित करत त्या योध्याला ओलांडले आणि पुढे निघाला.

योद्धा : किसना......

आणि त्या एका हाकेने त्या विश्वेश्वराच्या शरीरावर रोमांच उभे राहिले.... तो गर्रकन मागे वळला आणि काहीही विचार न करता त्याने त्या योध्याला आलिंगन दिले.

श्रीकृष्ण : पेंद्या.... माझ्या प्रिय पेंद्या.... (अत्यंत गहिवरलेल्या आवाजात मुरलीधराने आपल्या प्रिय मित्राला साद घातली. मात्र आलिंगनामधून दूर होताच त्याच्या सुदृढ आणि बलवान शरीराकडे बघत श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला...) अहं... पद्माकरा.....

पेंद्या : कन्ह्या तुझ्या तोंडून पेंद्याच बरं वाटतं रे. तू गोकुळ सोडलंस आणि जणू आम्हाला विसरूनच गेलास. परत कधीच आला नाहीस. तू गेलास आणि माझा जीव कशातच रमेनासा झाला. मनाचा अस्वस्थपणा दूर करण्यासाठी मी रोज कालिंदीच्या प्रवाहात उलट्या दिशेने पोहण्यास सुरवात केली. त्या जोरकस प्रवाहाला भिडण्याच्या नादात हळूहळू मन शांत होऊ लागलं. तुझ्या विषयीचे विचार मनातून जात नसत परंतु किमान त्याची धार नदीच्या धारेत थोडी बोथट होत असे. मित्रा, असेच पोहता पोहता काही मास उलटून गेले आणि एकदिवस मी आपल्या लाडक्या डोहाजवळ उभा असताना पाण्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे माझी नजर गेली. काय सांगू किसना; मी स्वतःला ओळखलंच नाही. समोर पेंद्या नव्हता तर तू माझ्याकडे मागीतलेला पद्माकर होता. माझ्याही नकळत मी शरीर कमावायला सुरवात केली होती. मग मात्र एकच ध्यास लागला. तू निघताना माझ्याकडे केलेली मागणी पूर्ण करायची. बाकी नियतीवर सोडून द्यायचं. माझ्या शरीराने आकार घेण्यास सुरवात केली आणि आपले सर्वच सवंगडी माझ्याकडे आले. त्यांनी देखील माझ्याकडे त्यांचं मन मोकळं केलं. तुझ्या जाण्याने सर्वच अस्वस्थ होते. मग खिल्लारांसोबत डोंगरावर गेल्यानंतर धावण्याच्या शर्यती लावणं, पैजा लावून जोर बैठका काढणं, कोयती-कुऱ्हाडीने वाळलेले वृक्ष तोडणं आणि कालिंदीच्या पात्रात पोहणं यातून सर्वांनीच शरीर कमावायला सुरवात केली. वयं वाढली आणि आम्ही सर्वच आपापल्या पुढील आयुष्यात गुंतत गेलो. मात्र आमच्या मुलांमध्ये देखील सुदृढ शरीराविषयीचं महत्व आम्ही निर्माण केलं आणि आमची पुढची पिढी देखील आपलं पारंपारिक गवळ्याचं काम करताना स्वतःकडे लक्ष देऊ लागली.

श्रीकृष्ण : अरे वा पद्माकरा, तू तर गोकुळातल्या गवळ्यांच्या शरीराबरोबरच मनाचं परिवर्तन देखील करून टाकलंस की. परंतु मित्रवरा, आत्ता मी तुझ्यासोबत फार वेळ बोलू शकणार नाही आहे. आजचा दिवस वेगळा आहे पद्माकरा. तुझ्याशी गप्पा मारायची इच्छा असूनही मी तुला वेळ देऊ शकणार नाही आहे. उद्यापासून धर्म आणि अधर्म यामध्ये युद्ध सुरू होणार आहे. मी निःशस्त्र राहून पांडवांच्या बाजूने या युद्धामध्ये पार्थाच्या रथाचे सारथ्य करणार आहे. त्यासाठीच या युद्धभूमीची पाहाणी करण्यासाठी मी आत्ता इथे आलो आहे. त्यामुळे पटकन सांग बघू की आज असा अचानक तू इथे का आला आहेस?

पद्माकर : मनमोहना, मी काय किंवा आमची पुढील पिढी काय; केवळ तुझ्या दर्शनाची आस नियतीवर सोडून तू शब्दात न सांगता दाखवून दिलेल्या मार्गावरून चालत राहिलो. आणि पहा... आज जेव्हा धर्माच्या विजयासाठी तू उभा राहिला आहेस त्यावेळी आम्ही देखील आमची चिमूटभर शक्ती घेऊन तुझ्या सोबत उभे राहाण्यासाठी आलो आहोत. यापुढील सर्व निर्णय तुझेच श्रीकृष्णा!

असं म्हणून पद्माकर पुन्हा एकदा श्रीकृष्णाच्या चरणांवर लीन झाला.

महाभारताचे अनीती विरुद्ध नितीचे, अन्यायाविरुद्ध न्यायचे, अधर्मा विरुद्ध धर्माचे घनघोर युद्ध झाले. नीतिमान, न्यायी आणि धर्मपालन करणाऱ्या पांडवांचा विजय झाला; आणि मग युद्धामध्ये जख्मि झालेल्या योध्यांची प्रेमळ विचारपूस करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण निघाला. एका-एका योध्याला भेटून त्याच्या पराक्रमाची प्रशंसा करत श्रीकृष्ण पुढे जात होता; आणि अचानक त्याच्या समोर गोकुळातील त्याचा परममित्र पेंद्या आला. संपूर्ण शरीर जखमांनी घायाळ झाले होते; मात्र चेहेऱ्यावरील समाधानी भाव श्रीकृष्णाला सर्वकाही सांगून गेले. पेंद्या त्याच्या लाडक्या मोहनाच्या चरणस्पर्श करण्यासाठी वाकला. त्याला मध्येच थांबवत आणि हृदयाशी कवटाळत केवळ पेंद्यालाचं ऐकू जाईल अशा आवाजात श्रीकृष्ण म्हणाला;

श्रीकृष्ण : माझ्या मागील श्रीराम अवतारात देखील खारीच्या रूपाने तू सेतू बांधायला मदत केलीस... आणि आज माझ्या मनातील चिंता समजून परत एकदा माझ्या सोबत उभा राहिलास. कोण आहेस ते तरी सांग माझ्या प्रियवरा!

.......आणि पेंद्या देखील तेवढ्याच मंद स्वरात बोलता झाला...

पद्माकर : पद्मनाभा, माझ्या नावामध्ये आणि तुझ्या या नावामध्ये जे साम्य आहे तोच मी! पुरुषोत्तमा, वाम हस्तातील तुझे पद्म तू अवतार जीवनात विसरून जात असशीलही. पण सतत तुझ्या करकमलाच्या स्पर्शाची सवय असणाऱ्या मला तुझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार करता आलाच नाही. त्यामुळे तुझे चिंतन आणि तुझ्या अस्तित्वाचा कोंब मनात ठेऊन माझ्या जीवाला जमले ते मी केले आहे. माझी मदत खारीच्या वाट्याची.... माझी मदत पेंद्याच्या तुटपुंज्या शक्तीची........ पण जीकाही आहे ती सर्वस्वी श्रीकृष्णार्पणमसुस्तू!!!

Friday, October 23, 2020

 श्रीकृष्ण - बलराम

 श्रीकृष्ण - बलराम


श्रीविष्णु : कमाल झाली बरं का तुझी शेषा! मागील अवतारात आणि या अवतारात देखील मी तुझी मनीषा पूर्ण केली आणि करतो आहे. तरीही तुझी माझ्यावरील नाराजी संपत नाही.

शेषनाग : देवाधिदेवा, मी कोण तुमच्यावर नाराज होणार? आपल्या सेवेसाठी आपण माझी निवड केलीत यातच सर्वस्व आलं. अनादी-अनंतकालासाठी सर्पवंशाला आपण मोठा मान दिला आहात. याहून जास्त माझं काही मागणंच नाही परमेश्वरा.

श्रीविष्णु : उगा विषयाला बगल देऊ नकोस शेषा. आत्ता यावेळी या क्षीरसागरातळी श्रीलक्ष्मी देखील नाही; कारण श्रीकृष्ण अवतार अजून समाप्त झालेला नाही. मात्र तरीही मी इथे आलो आहे तुला घेऊन; ते काही काळ विश्रांती घेण्यासाठी. या कृष्ण जन्मामध्ये मला सतत मन जागरूक ठेवावे लागते आहे. घडणाऱ्या घटनांवरील पकड एक क्षण देखील सैल होऊन चालणार नाही; याचं भान ठेवावे लागते आहे. एखाद्या सूक्ष्म घटनेकडील दुर्लक्ष संपूर्ण मानव जातीवर खूप मोठा परिणाम करेल; केवळ या एका जाणिवेने मन अस्वस्थ असते. म्हणूनच ही घटिकेची विश्रांती मला फार फार आवश्यक वाटली रे.

शेषनाग : केशवा, तुम्ही विश्रांतीसाठी आला आहात. अशावेळी माझ्या शरीराच्या थंडाव्याने मी आपले मन शांत शीतल करावे; हे माझे कर्तव्य आहे. देवन, आपण आराम करावात आणि मौन धारण करून मी आपली सेवा करावी; हेच सद्य स्थितीत योग्य ठरेल.

श्रीविष्णु : मनातील विषयापासून दूर नको जाऊस शेषा. मीच तुला तुझे मन मोकळे करायला सांगितले आहे; त्यामुळे तू तुझे मन मोकळे करण्यास काहीच हरकत नाही. कोणताही संकोच न ठेवता बोल.

शेषनाग : पुरुषोत्तमा, शब्द खेळीमध्ये आपणावर कोणी विजय मिळवू शकले आहे का? आपण अभय दिलंच आहात तर मी बोलायचे धारिष्ट्य करतो. ऋषीकेशा, आजवर आपण मत्स्य, कस्य, वराह, नृसिंव्ह, वामन, परशुराम आणि श्रीरामावतार घेतलेत. आपल्या मत्स्य, कस्य, वराह, नृसिंव्ह, वामन आणि परशुराम या आवतारांच्या वेळी माझी आपणास काहीच मदत झाली नाही.

श्रीविष्णु : शेषा, तुला माहीतच आहे की पाहिले पाचही अवतार ही त्या-त्या क्षणाची गरज होती.

शेषनाग : अगदी मान्य सर्वेश्वरा... परंतु परशुराम अवताराच्या वेळी देखील आपण माझा विचार केला नाहीत.

श्रीविष्णु : परशुराम अवतार ही देखील पृथ्वी मातेची गरज होती शेषा. पाप आणि अधर्मचा भार इतका वाढला होता की केवळ त्याच्या परिपत्यासाठी मला परशुराम अवतार हा माझा पहिला मानवीय अवतार घ्यावा लागला. मातेच्या गर्भातून जन्म घेण्याची माझी पहिली वेळ होती ती. पृथ्वी मातेच्या मनावरील ओझे उतरवण्यासाठी संपूर्ण मनुष्य जन्म जगणे ही आवश्यकता होती. परंतु माझ्यासाठी देखील तो अनुभव नवखा होता. माझे ध्येय आणि कर्तव्य मला ठाऊक होते. मात्र एक मनुष्य प्राणी त्याच्या संपूर्ण जीवनात केवळ कर्तव्यासाठी जगू शकत नाही याची मला कल्पना होती. अनेक भावभावनांच्या फेऱ्यांमधून मनुष्याला प्रवास करावा लागतो. ते समजून घेताना मला माझी वयक्तिक बंधने नको होती. म्हणूनच लक्ष्मी देवीची देखील इच्छा असूनही या अवतारात मी तिचा सहभाग नाकारला होता. संन्यस्त जीवन जगत मी मनुष्य जन्माचा अनुभव घेतला. म्हणूनच तर श्रीराम अवतार घेण्याची वेळ आली त्यावेळी लक्ष्मी देवीचा हट्ट आणि तुझी विनंती लक्षात घेऊन मी तुम्हाला देखील माझ्या सोबत भूतलावर घेऊन गेलोच की. माझा धाकटा बंधू लक्ष्मण म्हणून तू जन्म घेतलास आणि राम जीवनात प्रत्येक वळणावर माझ्या बरोबरीने उभा राहिलास.

शेषनाग : आपला धाकटा बंधू होऊन आपली साथ मी प्रत्येक क्षणी दिली. देवा, आपण कदाचित रुष्ट व्हाल, परंतु केवळ आपली साथ असे नाही तर काहीवेळा मी आपल्यावर येणारे संकट स्वतःवर ओढावून देखील घेतले होते.

श्रीविष्णु : परंतु मी हे कधी अमान्य केले शेषा? हे तर सत्यच आहे. मग मी रुष्ट का होईन?

शेषनाग : अच्युता, तुम्ही ते कधीच अमान्य केले नाही. मात्र अवतार समाप्तीनंतर ज्या-ज्या वेळी मी भूतलावर प्रवास केला त्या प्रत्येक वेळी मनुष्यप्राणी केवळ तुम्हाला आळवताना मला आढळला. माझा उल्लेख इतरांधील एक असाच तर झाला.

श्रीविष्णु : अरे तू या अनुभवामुळे बेचैन होऊन माझ्याकडे आलास त्यावेळी भूतलावर परत एकदा अत्याचार आणि अधर्माचे अराजक माजायला सुरवात झाली होती. मी पुढील अवतार धारणेचा विचारच करत होतो. त्यावेळची तुझी बेचैनी समजून घेऊन आणि तुझ्या इच्छेला मान देऊन मी सद्य कृष्ण अवतारामध्ये तुला माझ्या मोठ्या भावाचा मान दिलाच आहे ना....

शेषनाग : नारायणा, तुम्ही मला तुमचा मोठा भाऊ केलेत यात शंकाच नाही. परंतु....

श्रीविष्णु : शेषा, तुझे पण आणि परंतु राहू देत. आपण परत आपल्या अवतार कायेमध्ये जाणे आवश्यक आहे. चल पाहू....

असे म्हणत श्रीविष्णु पुन्हा एकदा कृष्ण भूमिकेमध्ये आले. त्यांच्या सोबत शेषनांगाने देखील जेष्ठ बंधू म्हणून काया प्रवेश केला. जीवन वाहात होते आणि विविध वळणे घेत महाभारतीय युद्ध समाप्ती नंतर एका निवांत क्षणी जेष्ठ बंधू बलराम आणि कृष्ण गप्पा मारत बसले होते.

बलराम : कृष्णा, खरे सांग. जरासंधाचा मृत्यू हा तुझाच कट होता ना?

श्रीकृष्ण : दादा, मी कट का बरे करेन. भीमाने जे योग्य होते ते केले.

बलराम : जरासंधाचे शरीर उभे चिरले तरी तो परत एकसंध होऊन उभा राहातो याविषयी भीमाला माहीत होते; असे तुला म्हणायचे आहे काय? कुस्ती होत असता भीमाच्या डावांचे कौतुक करण्याच्या कारणाने अचानक तू मोठमोठ्याने ओरडू लागलास आणि भीमाचे लक्ष तू तुझ्याकडे खेचून घेतलेस. त्याचवेळी नेमकी तुला एक शुष्क गवत पात मिळाली आणि भिमाचे लक्ष असताना अगदी सहज म्हणून ती गवत पात मध्यभागी तोडून तू विरुद्ध दिशांना दूर भिरकावून दिलीस; असे तर तुला म्हणायचे नाही धाकट्या?

श्रीकृष्ण (गालात हसत) : आपण अगदी योग्य समजून घेतले आहात दादा. तुमच्या इतके चांगले मला कोण समजून घेईल सांगा बरे.

बलराम : शब्दच्छल करू नकोस कृष्णा. तुझ्या कृतीचे निरीक्षण करणाऱ्या भीमाने पुढील डावामध्ये जरासंधाचे शरीर मधोमध फाडून विरुद्ध दिशांना फेकले आणि अपराजित जरासंध मृत्यू पावला. तुला कधीच जरासंधाला हरवणे शक्य नव्हते. किंबहुना द्वारका वसवणे हे जरासंधाला घाबरून मथुरेहून पळून जाण्याचे कारण होते. कृष्णा, मला काही तुझी ही कुटनिती पटत नाही. अरे तू किमान एकदा तरी माझ्याकडे येऊन माझी मदत मागायला हवी होतीस. जरासंधाला यमसदनाला पाठवण्यासाठी माझा एकच कुस्ती डाव पुरेसा ठरला असता.


श्रीकृष्ण : दादा, पण समोर काय घडते आहे हे दिसत असूनही आपण देखील तटस्थतेची भूमिका घेतलीतच न?

बलराम : उगाच माझ्यावर आरोप करू नकोस हं कृष्णा.

श्रीकृष्ण : बरं, मग माझ्या केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर द्या दादा. धर्म आणि अधर्म समोरासमोर उभे असताना आपण कोणासोबत राहण्याचा निर्णय घेतलात?

बलराम : कृष्णा, शब्दच्छल करण्यात आणि समोरच्या व्यक्तीला उमज पडणार नाही अशा शब्दात प्रश्न विचारण्यात तुझा हात कोणी धरणार नाही. परंतु हे विसरू नकोस की मी तुझा जेष्ठ बंधू आहे. त्यामुळे माझ्याशी बोलताना तुझ्या मनात हे असेल ते स्पष्टपणे सांग.

श्रीकृष्ण : दादा, कौरव-पांडवांच्या युद्धाच्या वेळी आपण ताटस्थतेची भूमिका घेतलीत आणि हिमालयाकडे प्रयाण केलेत. हे योग्य कसे ते मला समजावाल का?

बलराम : हे पहा धाकट्या, गुरूने आपल्या शिष्यांमध्ये कधीही दुजाभाव करू नये हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे तर तुला मान्य आहे ना? दुर्योधन आणि भीम हे दोघेही माझे शिष्य. ते दोघे आपापली सेना घेऊन जर एकमेकांसमोर युद्धासाठी उभे राहिले तर कोणा एकाची बाजू घेऊन युद्धात उतरणे एक गुरू म्हणून मला योग्य वाटले नाही.

श्रीकृष्ण : म्हणून मी समजावयास येईन याचा अंदाज येताच आपण हिमालयामध्ये निघून गेलात ना?

बलराम : तुला नाही कळायचे ते कृष्णा. त्यामुळे तुझ्यासाठी तू म्हणतो आहेस तेच सत्य मानून चल.

......... आणि त्यानंतर काही कालावधीमध्ये श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवले. श्रीकृष्ण प्रयाणापूर्वीच ज्येष्ठ बंधू बलराम यांनी समाधी घेतली होती.

.....श्रीविष्णु पुन्हा एकदा क्षीरसागरामध्ये आपल्या शेषशैयेवर पहुडले होते. शेषनाग पुन्हा एकदा काहीशा नाराज मनाने डोलत होता.

श्रीविष्णु : शेषा... मला तुझे काही कळत नाही. रामावताराच्या वेळी माझा धाकटा बंधू असल्याने तुला योग्य तो मान नाही मिळाला अशी तुझी तक्रार होती. ते समजून मी यावेळी तुला माझ्या मोठ्या बंधूचा मान दिला. तरीही तुझी नाराजी काही संपत नाही.

शेषनाग : प्रभो, उगा का मला टोचून बोलत आहात. मी आपली सेवा करून खुश आहे. माझ्या मनामध्ये कणभरही नाराजी नाही. परंतु वासुदेवा मला राहून राहून एकच प्रश्न सतावतो आहे... आजही भूतलावर श्रीकृष्ण अवताराची चर्चा आहे. मात्र कृष्णाच्या मोठ्या भावाची चर्चा देखील नाही. देवा, बलराम एक उत्तम योद्धा तर होताच. मात्र कोणीही कल्पना केली नसेल असे नांगर या शेत नांगरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आयुधाला त्याने शस्त्र बनवले. बलरामा इतका उत्तम कुस्ती योद्धा कोणी नव्हता. सर्व शक्तिमान दुर्योधन आणि अजस्त्र भीम यांचा तो गुरू होता. तो वसुदेव बाबांनंतर द्वारकेचा राजा होता. तो धर्मनिष्ठ होता... तो ज्येष्ठ होता... तो...

श्रीविष्णु : शेषा, तू कृष्णाचा ज्येष्ठ बंधू होतास तरीही भूतलावरील मनुष्य तुला आठवत नाहीत; याचे दुःख तुला आहे... हे मला समजले आहे. असे का? असा तुझ्या मनातील प्रश्न देखील मला समजला आहे... अरे, युगानुयुगे आणि गेले दोन अवतार तुझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर फारच सोपे आहे....

तुम्ही जेष्ठ आहात की कनिष्ठ... उत्तम योद्धा... नव कल्पनाविष्कारक... अतुलनीय गुरू आहात... याने काहीही सिद्ध होत नाही. शेवटी तुम्हाला जर जनमानसात तुमचे स्थान निर्माण करायचे असेल तर केवळ आणि केवळ कर्मयोग हा एकच मार्ग आहे.... याहून जास्त मला बोलणे नलगे आणि तुला ऐकणे...

असे म्हणून श्रीविष्णूंनी मंद स्मित करीत आपले नेत्र मिटून घेतले.






Friday, October 16, 2020

श्रीकृष्ण - नंदबाबा

 श्रीकृष्ण - नंदबाबा


तो : बाबा....

नंदबाबा : कान्हा, आज मथुरेचे राजमंत्री अक्रूर आले म्हणून नाही; तर तू गोकुळात आलास त्याक्षणापासून मला माहीत होतं की तू काही इथे फार काळ राहणार नाहीस. जसं तुझं येणं एक दैवी संकेत होता; तुझं गोकुळात असणं एक संकेत होता.....

तो : माझं गोकुळात असणं एक संकेत? बाबा!

नंदबाबा : हो माझ्या प्रिय पुत्रा... तू येण्याअगोदर गोकुळातील सर्व दही-दुभतं मथुरेत जात होतं. आम्ही कधीच इथल्या बालगोपाळांना धष्टपुष्ट करण्याचा विचार केला नव्हता. गुरांना राखणं आणि दुसऱ्यांसाठी दूध-दुभतं तयार करून विकणं इतकाच इथल्या लोकांचा दृष्टिकोन होता. तू आलास आणि प्रत्येक घरातील दही-लोणी चोरून बाळ-गोपाळांना दिलंस. आपल्या मुलांची तब्बेत अचानक चांगली कशी होते आहे याचा विचार करण्यास गोकुळवासीयांना भाग पाडलंस. शरीर संपदा सर्वात मोठी ठेव असल्याचं तुझ्या कृतीतून तू दाखवून दिलंस. आजचा धष्टपुष्ट झालेला गोकुळ कुमार आयुष्यभर तुझा ऋणी राहील आणि उद्या कोणत्याही युद्धात तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील हे नक्की.

तो : पण गोकुळातील कुमार युद्ध का करेल बाबा?

नंदबाबा : (मंद स्मित करीत) गवळी नाही रे युद्ध करणार. पण हा माझ्या समोर उभा असलेला आठ वर्षांचा बालक ज्यावेळी भविष्यात एक कर्मयोगी योद्धा होऊन एक मोठा निर्णय घेईल आणि पुढील अनेक युगांना तत्वनिष्ठित आयुष्याचे धडे सांगण्यासाठी सत्य-असत्याचे युद्ध घडवून आणेल त्यावेळी त्याच्या सोबत त्याची शक्ती म्हणून हेच दही-लोणी चोर गोकुलकुमार उभे राहातील; याची मला खात्री आहे; आणि हाच तुझ्या गोकुळात येण्याचा संकेत आहे.

तो आठ वर्षांचा बालक काहीसं गूढ हसला आणि म्हणाला : बाबा, तुम्ही कधीही इतकं मोकळेपणी बोलला नाहीत. मग आजच का?

नंदबाबा : आज का? कारण तुझं गोकुळात येणं आणि राहाणं जसा एक संकेत होता तद्ववत तुझं उद्या गोकुळ सोडून कायमचं जाणं हे अबाधित सत्य आहे; हे माहीत असूनही तू जाऊ नयेस असं माझं मन मला सांगतं आहे. गोपाला, मला हे सगळं माहीत होतं. कसं ते विचारू नकोस; मात्र ही गोष्ट मी यशोदेला कधीच सांगितली नाही. तुझं आमच्या सोबत असणं किमान तिने तरी मनसोक्त उपभोगावं असं मला कायम वाटलं. पण आत्ता तिची जी अवस्था झाली आहे ती पाहून मात्र माझं चुकलं की काय असं मला वाटायला लागलं आहे. अजूनही तिचं मला हेच सांगणं आहे की मल्लक्रीडेसाठी माझा कान्हा लहान आहे; अजून एक-दोन वर्षांनंतर त्याला आपण पाठवू. तिला वेडीला हे कळलेलंच नाही की तिचा कान्हा... तिचा मोहन.... तिला सोडून कायमचा जातो आहे.... केवळ मल्लक्रीडेसाठी इतक्या लहान वयात बोलावणं आलेलं समजल्यावर तिची झालेली अवस्था; तू कायमचा जाणार हे कळल्यावर काय होईल याची मला कल्पना देखील करवत नाही रे! मोहना तू तुझ्या इथल्या वास्तव्याने आम्हा गोकुळवासियांना युगानुयुगांसाठी पावन करून टाकलं आहेस. तुझा निरागस सहवास जो आम्हाला मिळाला आहे तो कधीच कोणालाही मिळणार नाही. हे भाग्य फक्त आणि फक्त गोकुळवासीयांचं आहे हे मान्य; पण तरीही तुझं जाणं... कन्हैया... नको रे जाऊस.

तो : बाबा, सर्वकाही समजून देखील तुम्हीच जर असं म्हणाल तर यशोदा माता, रोहिणी माता आणि वेड्या गोकुळाला कोण सांभाळणार?

नंदबाबा : माझ्यात ती ताकद नाहीच रे मोहना. या आठ वर्षात तुझं रूप हृदयात साठवण्याव्यतिरिक्त मी काही केलेलं नाही. त्यामुळे यासर्वांची समजून काढून तुझं जाणं.... कायमच जाणं.... त्यांना स्वीकारायला लावण्याची जवाबदारी तुलाच घ्यावी लागणार आहे. केवळ तुझी यशोदा माता आणि रोहिणी माताच नाही तर तुझ्या प्रेमात वेडी झालेली राधा... तिला तुझ्या व्यतिरिक्त कोण सांभाळू शकेल रे.

तो : बाबा.... तुम्ही राधेबद्दल...

नंदबाबा : अरे मीच का.... संपूर्ण गोकुळ जाणून आहे. जिथे तिच्या पतीने; अनयने; तिला जशी आहे तशी स्वीकारली आहे तर मग इतर कोणीही काय बोलावं? मथुरेचे राजमंत्री आल्याची खबर हळूहळू गोकुळामध्ये पसरायला लागली आहे. ते कशासाठी आले आहेत हे समजून घेण्यासाठी या वेड्या गवळ्यांची रांग लागली आहे आपल्या वाड्याच्या दिशेने. तुझ्या तक्रारी सांगण्याच्या निमित्ताने सतत तुला कवटाळण्यासाठी येणाऱ्या गोपीदेखील राजमंत्री अक्रूर आल्यापासून माजघरात गर्दी करून आहेत. मग एकटी राधाच कशी लांब राहील? तिला तुझ्याव्यतिरिक्त कोणीही ही परिस्थिती समजावू शकेल का? मोहना, तुझं शारीरिक वय आठ वर्षे आहे. मात्र तू....

कानांवर हात ठेवत नंदबाबांना थांबवत तो म्हणाला : नको बाबा. किमान तुम्ही तरी असं बोलू नका.

नंदबाबा : (खिन्नपणे हसत) मी न बोलल्याने सत्य तर लपणार नाही ना कृष्णा? तू जगदनियंता आहेस. अनादिकालापासून तुझं अस्तित्व या विश्वाला व्यापून राहिलेलं आहे! तुझ्या लीला अगाध आहेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. हे सत्य मी स्वीकारलं आहे.

एकवार काहीशा खिन्न नजरेने आपल्या प्रिय वडिलांकडे बघत तो मनमोहन बाहेर जाण्यास वळला. नंदबाबा धावले आणि आपल्या प्रिय पुत्राला मिठीत घट्ट कवटाळून घेत म्हणाले : नको जाऊस कान्हा. तू गेलास की गोकुळाचा प्राणच निघून जाईल. आम्हा सर्वांना जगणं अवघड होईल रे.

काही क्षण कोणीच काहीच बोलले नाही. पण मग मात्र नंदबाबांची ती प्रेमभरली मिठी सोडवून घेत श्रीकृष्ण लांब झाला. आपल्या वडिलांकडे पाठ करून तो बोलू लागला....

बाबा, जगणं अवघड होईल; यातच सर्व आलं! जे अशक्य असतं ते शक्य करण्यासाठी माझा जन्म आहे हे तुम्ही देखील ओळखून आहात. माझ्याशिवाय अवघड झालेलं जगणं तर तुमचे हे वेडे गवळी हळूहळू सोपं करून टाकतील. मात्र अत्याचार, हिंसा, असत्य वर्तन याचं अराजक आज जगात माजायला सुरवात झाली आहे; ते निपटून काढणं जास्त महत्वाचं आहे. माझं या कोवळ्या वयातील गोकुळ सोडण्याचं कारण तेच तर आहे. बाबा, आज तुम्ही क्षणात मला तुमचा आठ वर्षांचा बालक म्हणता आहात आणि क्षणात देवत्व देऊन मोकळे होता आहात. यापुढील आयुष्यात मला कायम हेच ऐकून घेत जगायचं आहे. कदाचित म्हणूनच मी माझ्या आयुष्याचे निरागस आणि मनमोकळे क्षण या गोकुळात घालवले आहेत. बाबा, उद्या मी निघणार. तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे मला निघण्यापूर्वी गोकुळवासीयांची, माता यशोदा, माता रोहिणी यांची समजूत घालायची आहे. राधेला भेटणं तर मलाही शक्य नाही. परंतु ते ती देखील समजून घेईल याची मला खात्री आहे. बाबा, निघतो मी. पण जाता-जाता एकच पण खूप मनापासून सांगतो. खरतर मी कोणी विश्वव्यापक, विश्वविधाता किंवा जगदनियंता नाही. तर ज्यावेळी जो निर्णय घेणे आवश्यक असते तो निर्णय त्याच्या परिणामांची जवाबदारी घेत घेण्याचे साहस मनात कायम ठेवणारा एक मनुष्यप्राणी आहे; इतकंच! जे इतरांना जमणार नाही आहे ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणीतरी आरसा दाखवणे आवश्यक असते. मी तेच काम माझ्या पुढील आयुष्यात करणार आहे. बाबा, आत्ता तुम्ही भावुक झाले आहात; त्यामुळे मला अडवता आहात हे मी समजून आहे. मात्र माझ्याबद्दलचे हे भावुक भाव जसे तुम्ही आजवर स्वतःच्या मनात जपलेत त्याप्रमाणे पुढे देखील ते स्वतःपुरतेच ठेवा; ही एकच विनंती करतो आहे. बाबा, पुढे तुम्हाला माझ्याबद्दल बरंच काही ऐकू येणार आहे... मी भगोडा आहे; मी पाताळयंत्री दूत आहे; मी युद्धपुर्व युद्धाचे परिणाम ठरवणारा निष्ठुर निर्णायक आहे... असं बरंच काही! त्यावेळी तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागणार आहे. कारण माझ्याबद्दलच्या प्रत्येक चर्चच्यावेळी हेच गोकुळवासी कासावीस होऊन तुमच्याकडे येणार आहेत. आज तुम्ही त्यांना सामोरं जाणं टाळता आहात; मात्र आजनंतर तुम्हाला प्रत्येक क्षणी माझा पिता होण्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बाबा, सांभाळा स्वतःला. कोणीही कोणाच्याही आयुष्याला कायमचं पुरलं नाही; हे जितकं सत्य आहे; तितकंच मोठं सत्य हे देखील आहे की एकदा एखादं नातं स्वीकारलं की त्या नात्याचं उत्तरदायित्व आपल्यावर कायमचं राहातं. येतो मी नंदबाबा!