Friday, September 25, 2020

 'युगंधर' शिवाजी सावंत लिखित कादंबरी

 'युगंधर' शिवाजी सावंत लिखित कादंबरी


शिवाजी सावंत हे सिद्धहस्त कादंबरीकार. 'मृत्युंजय' ही त्यांची कर्णावरील सर्वात जास्त गाजलेली कादंबरी, 'छावा' ही संभाजी राजांवरील कादंबरी, आणि 'युगंधर' ही श्रीकृष्णवरील एक अद्भुत कादंबरी. याव्यतिरिक्त देखील श्रीयुत सावंत यांनी बरेच लेखन केलं आहे. मी आज थोडं 'युगंधर' बद्दल सांगणार आहे.

'श्रीकृष्ण'! या एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण जितकं लिहू किंवा वाचू तितकं कमीच असं मला नेहेमी वाटतं. खरं सांगू? कधी कधी वाटतं आपण उगाच त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला देवत्व देऊन आपल्यापासून दूर नेऊन ठेवलं आहे. खरं तर तो आपल्यातलाच एक आहे. त्याने प्रत्येक वयात त्या-त्या वयातल्या टप्प्याचा पूर्ण उपभोग घेतला आहे किंवा फारतर असं म्हणू की प्रत्येक वयात सर्वसामान्य व्यक्तीने कसं वागावं याचा आदर्श ठेवला आहे आपल्यासमोर. कडेकोट बंदोबस्तामध्ये जन्मलेलं देवकी-वसुदेवाचं बाळ संपुर्णपणे आपल्या आई-वडिलांच्या निर्णयावर अवलंबून होतं. नंदराज-यशोदेचा कान्हा बाललीलांमध्ये रमला होता. मोठा होत असताना घरच्या गाई चरायला नेताना त्याने घरची जवाबदारी आपल्या वयाप्रमाणे घ्यावी हे आपल्याला सांगितलं. मथुरेहून कंस मामाचं बोलावणं आलं आणि कृष्णाने नंदनवन सोडलं. त्याचबरोबर बालपणाचा निरागस किसना संपून गेला. त्यानंतरचं श्रीकृष्णाचं आयुष्य म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जगासाठी आदर्शवत राहूनदेखील आकंठ जगणे; असंच आहे. 'युगंधर' मध्ये हेच अत्यंत उत्कृष्ट रितीने सांगितलं आहे. संपूर्ण कादंबरी विविध व्यक्तिरेखांच्या मनाचा मागोवा घेत पुढे सरकते. सुरवातच श्रीकृष्णापासून होते.

श्रीकृष्णाने सुरवातीलाच त्याला 'देव' न मानता आपल्यातलाच एक मानण्यास सांगितलं आहे; आणि त्यानंतर कृष्णाने त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचा कार्यकारणभाव मोकळेपणी सांगितला आहे. 'राधा माझी पहिलीच 'स्त्री गुरू' होती'; हे म्हणताना स्त्रीत्वाच्या भाव-भावनांचा अर्थ कृष्णाने सामजावून सांगितला आहे.

श्रीकृष्णच्या मनोगतानंतर त्याची प्रथम पत्नी आणि त्याची खऱ्या अर्थाने जीवनसाथी रुक्मिणीचं मनोगत आपल्या सोमोर येतं. श्रीकृष्णाने खरोखर प्रेम केलं ते रुक्मिणीवर. मात्र पुढे त्याने अजून सात लग्न केली. रुक्मिणीने देखील तिच्या सात सवतींना आपल्या धाकट्या बहिणींप्रमाणे स्वीकारून कायम आदराने वागवलं. कदाचित रुक्मिणीच्या मनाचा हाच वेगळेपणा कृष्णाने ओळखला होता. जांबवती, सत्यभामा, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी या रुक्मिणीनंतर द्वारकेत आलेल्या कृष्ण पत्नी. दोन माता, अष्ट पत्नी, बहीण सुभद्रा, प्रेयसी राधा अशी अनेक स्रीरूपं आयुष्यात असूनही कृष्णाची खरी सखी मात्र कायम यज्ञासेनी राहिली.

'युगंधर'मध्ये रुक्मिणी नंतर एका वेगळ्याच व्यक्तीचं मनोगत आपल्या समोर येतं. ते म्हणजे दारुकाचं! दारूक म्हणजे श्रीकृष्णाचा सारथी. ज्या श्रीकृष्णाने जगाचा रथ हाकला त्याचं सारथ्य करण्याचं भाग्य लाभलेला एक अबोल आणि आयुष्यभर साथ दिलेला जीव. त्याचं मनोगत वाचताना आयुष्याचे वेगळेच पैलू आपल्या सोमर येतात. दारुकानंतर येते ती द्रौपदी. श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातंच शब्दातीत आहे असं मला वाटतं. मला वाटतं द्रौपदीशी हितगुज करणारा कृष्ण आपल्याला नेहेमी सांगायचा प्रयत्न करतो की आयुष्यात कोणताही विचार न करता मनमोकळं बोलण्यासाठी एकतरी सखी/सखा असलाच पाहिजे. द्रौपदी प्रमाणेच एका व्यक्तीवर कृष्णाने मनापासून प्रेम केलं; तो म्हणजे अर्जुन! अर्जुनाचं मनोगत म्हणजे गुरू-शिष्य नात्याचे विविध पदर उलगडून समोर आल्यासारखं आहे. खरं तर महारथी कर्ण हा अर्जुनापेक्षा काकणभर सरसच होता सर्वच बाबतीत... आणि याची श्रीकृष्णाला पूर्ण जाणीव होती. मात्र अंगीचे गुण अयोग्य ठिकाणी वापरले तर काय होतं हे अधोरेखित करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं आणि ज्यावेळी महारथी कर्णाच्या रथाचं चाक जमिनीने गिळंकृत केलं त्यावेळी अर्जुनाला न्याय-अन्याय आणि योग्य-अयोग्य याची महती समजावून देत धनुष्याची प्रत्यंचा खेचण्यास भाग पाडलं. अर्जुनानंतर आपलं मन आपल्यासमोर मोकळं करतो तो सात्यकी. श्रीकृष्णाच्या अफाट मोठ्या सेनेचा सेनापती आणि कृष्णाचा आयुष्याच्या शेवटापर्यंत असलेला सोबती. सर्वात शेवटी आपल्यासमोर येतो तो उद्धव! मी श्रीकृष्णाचा 'भावविश्वस्त' होतो; या उद्धवाच्या एकाच वाक्यात त्याचं आणि श्रीकृष्णाचं नातं अधोरेखित होतं.

'युगंधर' म्हणजे श्रीकृष्णाचं आपल्यातलाच एक असणं! 'युगंधर' म्हणजे न्यायप्रविण, उत्तम राजकारणी, आपल्या भावनांवर विजय मिळवूनही अत्यंत भावुक असणाऱ्या त्या आकाशायेवढ्या महानायकाचं 'देवत्व' त्यागून मानवात वावरणं!!!

'युगंधर' एकदा तरी नक्की वाचावी अशी कादंबरी! श्रीकृष्णार्पणमस्तु!





Friday, September 18, 2020

 'स्वामी' रणजित देसाई लिखित

 'स्वामी' रणजित देसाई लिखित 


मला खात्री आहे की 'स्वामी' कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी अनेकवेळा वाचली असेल. मी देखील ही कादंबरी अनेक वेळा वाचली आहे. आज 'स्वामी' बद्दल लिहायचंच असं ठरवून गेले काही दिवस निवांतपणे वाचत असलेली ही कादंबरी आजचं संपवली. या कादंबरीने माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला वेगवेगळी सत्य सांगितली. त्यामुळे या कादंबरीमध्ये काय आहे हे सांगण्यापेक्षा मला माझ्या वाढत्या आयुष्यात या कादंबरीने काय दिलं ते सांगायला जास्त आवडेल.

मी पहिल्यांदा 'स्वामी' कादंबरी वाचली तेव्हा मी साधारण सतरा-अठरा वर्षांची होते. त्यामुळे त्यावेळी मला या कादंबरीमधले फक्त रमा-माधवच दिसले. त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम, आदर खूप भावून गेला मला. माधवराव पेशव्यांना पेशवाईच्या जवाबदरीमुळे रमेला वेळ देता येत नसे; त्याचा सल त्यांच्या मनात कायम होता. मात्र त्यांनी तो सल रमाबाईंकडे कधी मोकळेपणी बोलून नाही दाखवला. संपूर्ण कादंबरीमध्ये माधवराव मोकळेपणी रमाबाईंशी बोलले असतील तर त्यांच्या शेवटच्या थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी. आजही त्यादोघांचे संभाषण वाचताना डोळे भरून येतात. वयाच्या सोळाव्या वर्षी माधवरावांनी पेशवाईची वस्त्र धारण केली; आणि केवळ अकरा वर्षात; वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी; त्यांचे देहावसान झाले. या अकरा वर्षात त्यांनी अनेक स्वाऱ्या-मोहिमा केल्या. त्यामुळे संपूर्ण तारुण्य रमाबाईंनी शनिवारवाड्यात माधवरावांची वाट पाहण्यात घालवलं. त्यांना माधवरावांचा खरा सहवास लाभला तो त्यांच्या शेवटच्या काही दिवसांचा; थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी....... मात्र माधवरावांना रमाबाईंचा सहवास त्यांच्या मृत्यूनंतर देखील लाभला. रमा-माधवाचं प्रेम शब्दातीत होतं हेच खरं. खरा संसार असा दोघांनी केलाच नाही आणि तरीही एकमेकांमध्ये गुंतलेलं त्यांचं मन मृत्यूला देखील वेगळं करता आलं नाही.

लग्नानंतर परत एकदा 'स्वामी' हातात घेतली. त्यावेळी संपूर्ण कादंबरीमधील एक प्रसंग आयुष्यभराचं सार शिकवून गेला. माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यावर नजरकैदेत ठेवले होते. राघोबादादा तेथून पळून जात असताना पकडले गेले. त्यावेळी माधवराव थेऊरला त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये राहण्यास गेले होते. पकडलेल्या राघोबादादांना माधवरावांसमोर पेश केले. त्यावेळी माधवरावांनी हताशपणे राघोबादादांना पेशवाईची वस्त्रे बहाल केली. त्यावेळी डोळ्यात पाणी आणून राघोबादादांनी माधवरावांना म्हंटले की त्यांच्या पदरचे लोक त्यांचे कान भरतात आणि त्या तिरिमिरीमध्ये राघोबादादा चुकीचे निर्णय घेत मराठेशाहीशी बंड करतात.... त्यावेळी माधवरावांनी दिलेले उत्तर आपण सर्वांनीच आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहे... ते म्हणाले... आमच्या पदरीही सारे योग्य सल्ला देणारे आहेत, असं नाही.... अक्कल शाबूत ठेवायची ती आम्ही. थोडक्यात सांगायचे तर कोणीही काहीही सांगितले तरी कोणावर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यतले निर्णय स्थिर बुद्धीने घ्यायचे हे आपण समजून घेतले पाहिजे.

त्यानंतर माझ्या दोन्ही लेकींच्या जन्मानंतर कधीतरी परत एकदा 'स्वामी' हातात घेतली आणि माझ्याही नकळत त्यावेळी देखील झापटल्यासारखी वाचून संपवली. यावेळी जाणवलं ते जेमतेम सोळाव्या वर्षी पेशवेपद स्वीकारून माधवरावांनी सावरलेली कर्जबाजारी पेशवाई. हलक्या कानांच्या काकांच्या बंडखोरीचा आयुष्यभर सोसलेला त्रास; कठोर निर्णयामुळे दुरावलेला मातोश्रींचा सहवास; सततच्या लढाया आणि मोहिमांमुळे पेशवाईवर झालेलं कर्ज या माधरावांच्या पेशवे पदाच्या काळातील अडचणी अगदी अंगावर आल्या. माझ्या वयाच्या जेमतेम चोविसाव्या वर्षी माझ्या पदरात माझ्या लाडक्या दोन लेकी होत्या. त्यावयात देखील त्या दोघींचे शिक्षण; शालेय शिक्षणाव्यतिरिक्त काय शिकवावं; त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण व्हावं यासाठी काय आणि कसं करावं हेच विचार मनात घोळायचे. 'स्वामी' वाचताना सतत जाणवलं की माधवरावांनी केवळ आणि केवळ मराठी साम्राज्याचा विचार केला ते या साम्राज्याला पुत्रवत मानलं म्हणूनच.

नंतर कधीतरी एकदा पुन्हा ही कादंबरी हातात आली. यावेळी ती अगदी तब्बेतीत वाचली. प्रत्येक प्रसंग जगण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगू? जगले देखील. यावेळच्या वाचनात एक मात्र प्रकर्षाने जाणवलं; आपल्याला तो काळ कधीच उमजणार नाही.... पेशवाईच्या काळातील अनेक धारावाईक आणि सिनेमे आपण सर्वांनी बघितले आहेत. तरीही ही कादंबरी वाचताना मनात येत होतं की त्यावेळचं पुणं.... तेथील सर्वसामान्य जनजीवन.... राजकीय स्थैर्य-अस्थैर्य... याची खरी कल्पना आपण या धारावाईक किंवा सिनेमांमधून करूच शकत नाही. मात्र तरीही या दृक्श्राव्य माध्यमांमुळे आपला उज्वल इतिहास किमान थोड्याफार प्रमाणात आपल्यापर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो आहे; याचं समाधान आहे.

..... आणि आज जेव्हा ही कादंबरी पुन्हा एकदा वाचली त्यावेळी मनापासून भावलेला भाग तुम्हाला सांगितल्याशिवाय राहावंत नाही आहे......

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ #yogiaditynath यांनी आग्र्यामधील #agra मुघल म्युझियमला #mughalmuseum छत्रपती शिवाजी माहाराजांचे #chatrapatishivajimaharaj नाव देण्याचे घोषित केले आहे. यावेळी त्यांनी म्हंटले आहे की 'हम सबके नायक शिवाजी माहाराज हैं!' किती सत्यता आहे या एका वाक्यात. आपल्यापैकी कितीजणांना माहीत आहे की मराठ्यांची सत्ता केवळ माहाराष्ट्रपुर्ती मर्यादित नव्हती; तर दिल्लीच्या तक्तापासून ते पार कर्नाटकापर्यंत मराठा साम्राज्य पसरलेले होते. माधवराव पेशव्यांनी निजामाला हरवून शरणागती पत्करायला लावली होती; आणि त्यानंतर त्याला सौहार्दपूर्ण वागणूक देत त्याच्याशी मैत्री करून मराठा साम्राज्याचा एक शत्रू कायमचा संपवून टाकला होता. हैदराचा कायमचा बंदोबस्त केला होता. पेशवाईचा कारभार मार्गी लावत असताना माधवरावांचा आजार बळावला. मात्र त्या आजारात देखील त्यांनी दख्खन स्वारीवर आपले खंदे मुत्सद्दी वीर पाठवून त्यांच्याकरवी तेथे विजय मिळवला. माधवराव पेशव्यांच्या शेवटच्या काही दिवसात दक्खन स्वारीवरील वीरांनी दिल्लीपतीला सिंहासनस्थ केले. म्हणजेच मराठ्यांच्या मदतीमुळेच केवळ दिल्लीमधील मुघलांचे राज्य टिकले. मराठ्यांचे मांडलिक होणे मान्य करून त्यांनी दिल्ली राखली. आपल्याला सगळ्यांना पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठी साम्राज्याचा पानिपतचा पराजयच केवळ माहीत आहे. मराठ्यांच्या पराभवामुळे पेशवाईला लागलेले पानिपताचे गालबोट देखील या स्वारीत पुसले गेले. याची इतिहासात ठळक नोंद नाही.... किंवा खेदाने म्हणावे लागते आहे की या विजयाची नोंद सर्वसामान्य लोकांच्या सहज वाचनात येईल असा प्रयत्न आपल्या इतिहासकारांनी केला नाही. दुर्दैवाने आपल्याला माहीत असणारा इतिहास हा भारतावर इंग्रजांच्या अगोदर मुघलांचे राज्य होते; हाच आहे. मात्र मराठेशाही.... मराठा साम्राज्य.... उत्तरेपासून ते थेट दक्षिणेपर्यंत पसरले होते; हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

मुघलांना नमवणाऱ्या त्या दूरदृष्टी लाभलेल्या जनतेच्या राजाचे छत्रपतींचे नाव आजवर मुघल नाव वागवणाऱ्या संग्रहालयाला देण्याचा निर्णय घेऊन योगी आदित्यनाथ यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास सर्वांनी परत एकदा समजून घ्यावा हे सांगितले आहे असे मला वाटते.

आज पुन्हा एकदा 'स्वामी' कादंबरी वाचून संपवताना या कादंबरी मधील रमा-माधवाचं प्रेम; माधवरावांची दूरदृष्टी; सार्वभौम भारतामध्ये बसवला गेलेला पेशवाईचा अंमल... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा साम्राज्याचा आवाका नजरेसमोर आला आणि खूप खूप समाधान वाटलं.


Friday, September 11, 2020

विश्वस्त' वसंत वसंत लिमये लिखित कादंबरी





 

विश्वस्त' वसंत वसंत लिमये लिखित कादंबरी

विश्वस्त. श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा ठसा!

महाभारताचा काळ! आपल्या पुराणकथा की आपला इतिहास?

याच महाभारत काळातील माझं - किंबहुना अनेकांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण! तो अनादि-अनंत, तो सर्वत्र-समावेशक, कर्ता-करविता. तो निर्गुण-सगुण, निर्मोही. मात्र त्याचं अस्तित्व मोहमयी! देवत्व असूनही आपल्यातलाच एक असा! तो व्यावहारिक, हिशोबी, बेरकी आणि तो द्रष्टाही! म्हणूनच कदाचित स्वतःच्या मानव असण्याचा आणि मानवी मर्यादांचा त्याने कायम स्वीकार केला. त्याच श्रीकृष्णाच्या असीम दूरदृष्टीची कथा म्हणजे वसंत वसंत लिमये लिखित 'विश्वस्त'! श्रीकृष्णाच्या बालपणाचा काळ, तारुण्य, त्याचं प्रौढत्व, त्याची सुजाण बुद्धी याबद्दल आपण खूप वाचलं आहे. मात्र ‘विश्वस्त’च्या निमित्ताने आपल्याला कृष्ण नावाच्या मानवाचा वृद्धापकाळ समोर येतो. आपल्या वारसदारांचा होणारा र्‍हास याचि देही याचि डोळा पाहात असतानादेखील पुढच्या अनादि-अनंत काळातील आपल्या पिढ्यांसाठी त्या द्रष्ट्या पुरुषाने करून ठेवलेली तजवीज म्हणजे ‘विश्वस्त’!


c26d6f64095649329af6d96da7918602

ही कादंबरी अनेक दिवस डोळ्यासमोर ठेवली होती. पण वाचायचा मुहूर्त लागत नव्हता. ५२३ पानं असल्याने कसा वेळ मिळेल असं सारखं वाटत होतं. पण मिसळपाववरील दिवाळी अंकाचं आवाहन वाचलं आणि ठरवलं - 'विश्वस्त'चं रसग्रहण लिहायचं. मग लगेच पुस्तक हातात घेतलं आणि तीन दिवसात, किंबहुना तीन रात्रींत वाचून संपवलं. त्या तिन्ही रात्री मी एका वेगळ्याच जगात होते. तो श्रीकृष्णाचा काळ होता.... चाणक्याचा काळ होता.... आणि तरीही वर्तमानाचं पूर्ण भान होतं. श्रीकृष्ण आणि पर्यायाने महाभारत काळ म्हणजे आपल्या 'पौराणिक कथा' असं आजवर मी मानत आले. मात्र त्या विचारालाच या कादंबरीने धक्का दिला आहे. चाणक्य काळ आपण आपला इतिहास आहे असंच मानतो. त्यापूर्वीदेखील आपला इतिहास होताच नं? तो काय होता? याचा विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'! साध्या सरळ शब्दात विश्वस्त म्हणजे संचिताचा 'सांभाळ करणारा' आणि योग्य व्यक्तीस किंवा योग्य वेळेस पुढे सुपुर्द करणारा. हा सांभाळ करण्याचा काळ ज्या वेळी खूप मोठा होतो आणि योग्य व्यक्ती किंवा योग्य वेळ किंवा योग्य समाजव्यवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत सांभाळ करता करताच त्याला वारसदारदेखील व्हावं लागतं, याची उकल करून सांगणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'!

लेखकाने स्पष्ट शब्दात म्हटलं आहे - कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आट्यापाट्या खेळणारी नाट्यपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी... आणि तरीही ही एक कल्पित कथा नसून संपूर्ण सत्यकथन आहे असं आपल्याला प्रत्येक क्षणी वाटत राहतं. यातील अनेक प्रसंग आणि अनेक दाखले आपल्याला खिळवून ठेवतात. आजच्या अगदी पाच-सात वर्षांपूर्वीचे दाखले जसे यात आहेत, तसेच महाभारत काळातले आणि चाणक्य काळातलेदेखील दाखले आहेत.

एक कथा म्हणून विश्वस्त कशी आहे हे प्रत्येक वाचकाचं वैयक्तिक मत असू शकतं. पण या कादंबरीची खासियत ही की ती आपल्याला विचारात पाडते. काय असेल आपला खरा इतिहास? असं म्हणतात की आपण जो वाचतो किंवा ऐकतो, तो जेत्याचा इतिहास असतो. मग असं तर नाही की आपण इंग्रजांनी सांगितलेल्या आणि लिहिलेल्या कथनाला आपला इतिहास मानतो? हिंदू हा धर्म नसून सिंधू, सरस्वती नद्यांच्या किनारी उगम पावलेली आणि पुढे संपूर्ण आर्यवर्तात पसरलेली ही एक सारस्वत संस्कृती आहे. म्हणूनच कदाचित इतर धर्म (की पंथ?) यांचे प्रेषित किंवा स्थापनकर्ते आपल्याला माहीत आहेत. मात्र हिंदू धर्म यांनी स्थापन केला असा संदर्भ कधी माझ्या वाचनात आला नाही. पूर्वी लिखित साहित्यापेक्षा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक माध्यमातून ऐतिहासिक सत्य सांगितलं जायचं. दुर्दैवाने एखादी शृंखला ढळली तरी त्यामुळे आपल्या इतिहासाचं केवढं तरी नुकसान झालं असेल. ‘विश्वस्त’मध्ये आपल्या इतिहासाची आणि पुराणांची खूप रोचक सांगड घातलेली आहे.

या कादंबरीमध्ये अनेक ठिकाणांची ऐतिहासिक किंवा पौराणिक दाखले देत गुंफण केली आहे. मुंबई, नालासोपारा, दापोली ते अगदी द्वारका आणि सोमनाथ मंदिर असा आपला वारसा इतका सुंदर रितीने समोर येतो की एकदा हातात घेतलेली ही कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटतच नाही. तर, 'विश्वस्त' ही एक वाचायलाच हवी अशी कादंबरी आहे; हे सांगणे नलगे!

P-20170521-103302

***

माझ्या मनात गेली अनेक वर्षं येत आहे की आपल्या मुंबईला एक वलयांकित इतिहास आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. या कादंबरीच्या निमित्ताने 'जरा हटके, जरा बचके' अशा या 'मुंबई मेरी जान'मधील ऐतिहासिक संदर्भ आणि खदाडीसाठीच्या काही जागा मला समजल्या, त्या आपल्यासमोर या लेखाच्या निमित्ताने मांडते आहे.

खादाडी :

१. लीलावती हॉस्पिटलसमोरील चिंचोळ्या गल्लीमधील 'जमवा आओजी' हे खास पार्शी हॉटेल. 'आकुरी' खास पार्शी पद्धतीची मसालेदार अंडाभुर्जी.

२. नागीनदास मास्टर रोड, फोर्ट येथील 'कॅफे मिलिटरी'. मटण कटलेट ग्रेव्ही आणि सली बोटी.

३. मेट्रोजवळील 'कयानी' इराणी रेस्टॉरंट

४. याझदानी बेकरी, फोर्ट. ब्रून मस्का पाव. आजही या बेकरीमध्ये लाकडावर आणि कोळशावर चालणारी पारंपरिक भट्टी आहे. जिंजर बिस्किट्स आणि अ‍ॅपल पायदेखील खास.

ऐतिहासिक मागोवा :

१. जीपीओ परिसरातील जमिनीखाली सापडलेलं भुयार (कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड आणि ऑईस्टर रॉक ही मूळ मुंबई येते आणि मलबार हिल अशा दक्षिण मुंबईतील विविध भागात भुयारी मार्ग असू शकतात.)

२. आत्ताचं वेस्टर्न नेव्हल कमांडचं हेडक्वार्टर, फोर्ट भागात ज्या ठिकाणी आहे, त्याचं मूळचं नाव ‘कॅसा डी ओरटा’ ( Casa da Orta) म्हणजेच बाँबे कॅसल.

३. एलिफंटा केव्हज म्हणजेच घारापुरीची लेणी (सहाव्या शतकातील निर्मिती)
जवाहरद्वीप म्हणजेच 'बुचर आयलंड', 'मिडल ग्राउंड' आणि 'ऑईस्टर रॉक' बेटं मुंबईच्या इतिहासाची शान अजूनही जपतात.

४. तेराव्या शतकातील राजा भीमदेव याची राजधानी महिकावती म्हणजे आजचं माहीम.

५. फोर्ट भागात सहज फिरलं तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या 'निओ गॉथिक' आणि 'आर्ट डेको' अशा शैलीत बांधलेल्या अनेक इमारती दिसतात.

६. वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव (जबरेश्वर मंदिराच्या कोपऱ्यावर उजवीकडील चिंचोळी गल्ली)

७. ओल्ड कोर्ट हाऊस ते आझाद मैदान, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल ते कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड ते जी.पी.ओ., मिडल ग्राउंड ते ऑईस्टर रॉक, सेंट जॉर्ज फोर्ट ते सेंट जॉर्जेस हॉस्पिटल
(कदाचित मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूंना जोडणारी भुयारं असू शकतील)

८. बाँबे कॅसलच्या ईशान्य टोकाकडे सेंट जॉर्ज फोर्ट (सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड) होता. तेथे दारूगोळ्याचं कोठार होतं. आता तिथे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याचं ऑफिस आहे.


श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रं श्री. वसंत वसंत लिमये ह्यांजकडून


पुस्तकाचे नाव: विश्वस्त
लेखक: वसंत वसंत लिमये
प्रकाशक: राजहंस प्रकाशन ( प्रथम प्रकाशन १ जानेवारी २०१७)
ISBN 8174349995 (ISBN13: 9788174349996)


Friday, September 4, 2020

एक प्याला स्त्रीजन्माचा (कविता)

 एक प्याला स्त्रीजन्माचा


पुढील जन्मी पुन्हा फिरुनी
लाभू दे मज जन्म स्त्रीयेचा
या जन्मी जे राहील जगणे
आकंठुन रस प्रशिन मी त्याचा

नसेन दश भुजा काली मी
किंवा मखरातील कोणी देवी
सर्वव्यापी मानव ज्योत ती
अंतरी ठेवीन माझ्या तेवती

थोडे जगणे स्वतःसाठी अन्
मग थोडा विचार इतरांचा 
वैचारिक-सामाजिक बेडीला
झुगारून स्वीकारी स्वच्छंदाला

सन्मानाचा-सुंदर-तृप्त जन्म
या जन्मी लाभला मला हा
मागून घेईन त्या आत्मशक्तीतून
एक प्याला परत स्त्रीजन्माचा

Friday, August 28, 2020

सिझोफ्रेनिया.... आजार की परसेप्शन!(?) (भाग 4)(शेवट)

 

सिझोोफ्रेनिया.... आजार की परसेप्शन!(?)

भाग 4

विक्रमला गीताबद्दल खूप विश्वास वाटत होता हे उघडचं होतं. म्हणूनच केवळ त्याने आजवर काय आणि कसं केलं ते सांगितलं होतं. जे आजवर तो कोणाकडेही बोलला नव्हता. जर ह्या त्याच्या विश्वासाला तडा गेला असता, तर मग त्याला परत सामान्य जीवनात आणणं केवळ अवघड नाही तर अशक्य झालं असतं. गिताला कोणत्याही परिस्थितीत विक्रमला हरवायचं नव्हतं. म्हणून मग तिने त्याच्या कलाने घ्यायचं ठरवलं. त्याहूनही मोठा निर्णय तिने हा घेतला की जोवर ती काही निर्णयापर्यंत येत नाही तोवर डॉक्टरकाकांना किंवा बाबांना काही सांगायचं नाही.

गिता शांत झाली आहे हे बघून विक्रम अस्वस्थ झाला. "गिता, तुझा पण माझ्यावर विश्वास बसत नाही ना?" त्याने तिला विचारलं.

"तसं नाही विक्रम. पण मला सारखा एकच प्रश्न पडतो आहे की तू म्हणतोस ते सगळं बरोबर असेल तर मग तुला इतका अवघड आणि तोही मनाचा आजार झाला आहे, असं तुझे स्वतःचे वडील का म्हणतील? अजूनही आपल्या समाजाने मनाचे आजार शरीराच्या आजारांसारखे सहज स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे मनाचा आजार असलेल्या व्यक्तीला वेगळ्या नजरेने बघितल जातं. सर्वसाधारणपणे 'वेड लागलं आहे या व्यक्तीला,' अस सहज म्हंटलं जातं. असं असताना तुझे वडील का तुला डॉक्टर खरातांसारख्या मानसरोग तज्ञांकडे आणतील? तुला मानसिक आजार आहे असं म्हणताना त्यांना काही आनंद होत नसणार नं?" गीताने विक्रमला विचारलं.

त्यावर विक्रमने दिलेलं उत्तर तिला काहीसं अपेक्षितच होतं. तो म्हणाला;"माहित नाही ग. पण माझे बाबा कायम त्यांच्या कामात गुंतलेले असतात. त्यांना माझ्यासाठी कधी वेळच नव्हता आणि अजूनही नसतो. त्यामुळे त्यांना मनातून अपराधी वाटत असेल. त्यात मी माझ्या मित्रांमध्ये जास्त रमतो हे त्यांना आवडत नसेल. म्हणून मग त्यांच्यापासून तोडायला काही सबळ कारण हवं, म्हणून मग मला आजार आहे अस सिद्ध करणं त्यांना सोपं वाटत असेल."

गिता म्हणाली;"अरे ते तुझे वडील आहेत विकी. तुला आजार आहे असं सिद्ध झाल्याने त्यांना आनंद कसा होईल? तुझे मित्र तू म्हणतोस म्हणून आहेत असं कसं म्हणता येईल? तुझ्या बाबांना तर ते दिसत नाहीत; त्यांचं एकवेळ बाजूला राहु दे. बाकी कोणाला ते दिसतात का?"

तिला थांबवून विक्रम म्हणाला;"गिता, असं तर नसेल की माझ्या बाबांनाच सिझोफ्रेनिया हा आजार असेल? ते म्हणतात की फक्त मलाच माझे मित्र दिसतात; पण कदाचित त्यांनाच ते दिसत नसतील. ते वडील आहेत.... मोठे आहेत... त्यामुळे आजार त्यांना स्वतःला झाला आहे हे त्यांना स्वीकारायचं नसेल. मग सोपा उपाय काय... तर मला आजार आहे असं म्हणायचं. काय वाटत तुला?"

त्याचे हे विचार ऐकून मात्र गिता आवाक झाली. क्षणभर तिला काय बोलावं सुचेना. पण मग थोडा विचार करून ती म्हणाली,"विकी, जर तुझ्या वडिलांना तुझे मित्र दिसत नाहीत हे मान्य केलं, तर मग तुला हे सिद्ध करावं लागेल की त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना तुझे मित्र दिसतात. ते कसं सिद्ध करशील?" गीताची इच्छा होती की विक्रमने म्हणावं की चल तुला माझ्या मित्रांची ओळख करून देतो.

पण विक्रम अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला,"अग बाबांना माझे मित्र दिसत नसले तरी इतरांना दिसतात; आणि ते मी सिद्ध देखील करू शकतो."

गीताला माहित होतं की विक्रम सिझोफ्रेनिक आहे. त्यामुळे त्याच्या त्या आत्मविश्वासपूर्ण वाक्याने ती पुरती गोंधळून गेली.

"कोणाला दिसतात तुझे मित्र विकी?" तिने आवाजावर ताबा आणत त्याला विचारलं.

"अग, इतर कोणी कशाला बोलावू मी माझं म्हणणं सिद्ध करायला? आमच्या बिल्डिंगचा वॉचमन आहे ना त्याला नक्कीच दिसतात. कारण आम्ही कधी कधी गच्चीवर बसतो ना तेव्हा जर मी वाकून बघितलं आणि त्याचवेळी तो वर बघत असला तर खालूनच ओरडतो... तुम बच्चा लोग उप्परसे झुकता हे और गाली हमको पडती हे. चलो पिछे हो जाव." विक्रमने तिला सांगितले.

"अरे, कोणीही वाकून बघितलं तर तो हेच सांगणार न विकी? त्यातून काय सिद्ध होतं?" गीता म्हणाली.

"अग, तुला कस समजत कसं नाही? तो म्हणतो तुम बच्चा लोग... याचा अर्थ त्याला आम्ही सगळे दिसतो ना?" विक्रम तिला समजावत म्हाणाला.

त्याने असं म्हणताच गिताच्या लक्षात त्याचा मुदा आला; आणि तिच्या मानत आलं,'खरंच जर तो वॉचमन असं म्हणत असेल, तर त्याचा अर्थ त्याला विक्रमचे मित्र दिसत असतील नाही का? खात्री करून घेतली पाहिजे.' पण तिने हा विचार विक्रमला बोलून नाही दाखवला. उलट ती म्हणाली,"त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे का विकी ज्यांनी तुझे मित्र बघितले आहेत?"

विक्रम विचारात पडला. निदान आता तरी तो तिच्या मनातलं बोलेल अशी तिला आशा होती. आणि विक्रम तेच म्हणाला;"दुसऱ्या कोणाची साक्ष कशाला हवी गिता? चल, तुझीच ओळख करून देतो मी माझ्या मित्रांशी. त्यांना मी सांगितलेलं नाही अजून की मला तू किती जवळची वाटतेस. त्यामुळे अचानक तुला माझ्याबरोबर बघून त्यांना आश्चर्य वाटेल. पण मी त्यांना समजावू शकतो. चल येतेस आत्ताच? तुझी भेट घालून देतो मी माझ्या मित्रांशी."

शेवटी एकदाचं विक्रने तिच्या मनात असलेला विचार बोलून दाखवला. तो स्वतःहूनच तिला घेऊन जायला तयार होणं महत्वाचं होतं. गीताने उत्सुकता दाखवली असती तर तो घेऊनही गेला असता, आणि तिला कोणी दिसत नाही असं तिने म्हंटलं असतं तर म्हणाला असता की 'मुळात माझ्या मित्रांना तू आवडत नाहीस, त्यात मी त्यांना न विचारता तुला घेऊन आलो, म्हणून तेच समोर यायला तयार नाहीत.'

विक्रम स्वतःच म्हणाला की तो गिताला त्याच्या मित्रांना भेटवायला तयार आहे; हे एकून तिचा चेहेरा खुलला. खरं तर त्यावेळी विक्रमच्या एकूण आत्मविश्वासपूर्वक बोलण्यामुळे तिच्या मनात विक्रमच्या वडीलांबद्धल देखील थोडा संदेह निर्माण झाला होता; त्यामुळे ती विक्रमबरोबर जायला उत्सुक होती. जर ते मित्र खरंच तिला भेटले असते तर मोठाच प्रश्न उभा रहाणार होता. पण जर ते नाहीच भेटले किंवा दिसले तर मात्र तिला विक्रमला त्याच्या कलाने घेत समजावावे लागणार होते. पण त्याला तिची तयारी होती. तिचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता.

हा सगळा विचार करून गीता विक्रमला म्हणाली;"हे मस्तच झालं. कधी जाऊया आपण? मला आता बरं वाटतं आहे. त्यामुळे मी कधीही बाहेर पडू शकते. उद्या चालेल का तुला? मी उद्या येणार आहे क्लिनिकला. मग तिथूनच जाऊ."

गिताला वाटलं होत तो म्हणेल माझ्या मित्रांना विचारून सांगतो. तिलाही तेच हवं होतं. त्यामुळे तिला थोडा वेळ मिळाला तयारी करायला. मुख्य म्हणजे विक्रमच्या वडिलांना काही मानसिक तणाव किंवा तसेच काही नाही ना हे तपासून बघणं देखील आवश्यक होतं.

पण त्यादिवशी बहुतेक गिताला धक्यांमगून धक्के बसणार होते. कारण विक्रम घड्याळाकडे बघत म्हणाला;"चल आत्ताच जाऊ. आता बाबा नसतील घराजवळ. त्यामुळे ते तिघे मोकळेपणाने भेटतील आपल्याला. तसा उशीर झाला आहे, मान्य आहे. पण तू फक्त त्याना भेट आणि ये परत. मी थांबवणार नाही तुला. तसं त्यांनासुद्धा त्यांच्या घरी जायचं असतं. पण अलीकडे आम्ही ठरवलं आहे की रोज निदान पाच मिनिटं तरी भेटायचं. नाहीतर मला फार फार एकटं वाटतं. चल निघू. ते फक्त माझ्यासाठी थांबले असतील."

गिताला काय करावं सुचेना. नाही म्हणायची इच्छा होती. पण नाही म्हणण्यासाठी तिला सबळ कारण सापडत नव्हतं. तिनेच काही मिनिटांपूर्वी म्हंटलं होतं की आता तिला बरं वाटतं आहे. तिने क्षणभर विचार केला आणि मनाशी निश्चय करून ती उठली. म्हणाली;"चल विकी, येते मी. पाच मिनिटात तयार होते."

खरोखरंच गिता पाच मिनिटात बाहेर आली. तिने आई-बाबांसाठी टेबलावर चिट्ठी लिहून ठेवली... मला बरं वाटतं आहे, जरा चक्कर मारून येते आहे. काळजी करू नका. जेवायच्या वेळेपर्यंत घरी येते.' आणि ती विक्रम बरोबर निघाली. मुद्दामच तिने कुठे आणि कोणाबरोबर जाते आहे ते चिठ्ठीत लिहीलं नाही. ते लिहीलं असतं तर तिची आई उगाच घाबरली असती आणि सतत मोबाईलवर फोन करत बसली असती.

गीताने लगेच आपलं म्हणणं ऐकलं आणि ती यायला तयार झाली हे बघून विक्रम खुश होता. तो तिच्याबरोबर निघाला.

बाहेर पडताच त्याने रिक्षा थांबवली आणि स्वतःच्या घराचा पत्ता दिला. रिक्षात बसल्यावर गीताने त्याला विचारलं;"अरे, तुझ्या मित्रांना मोबाईलवर फोन करून खात्री तर करून घे ते थांबले आहेत का." तिला बघायचं होतं की विक्रम खरंच फोन करतो का.

विक्रमला तिच म्हणणं पटलं. त्याने त्याचा मोबईल बाहेर काढला. पण त्याचं चार्जिंग पूर्ण संपलं होतं. ते पाहून तिने लगेच स्वतःचा मोबाईल त्याला दिला आणि म्हणाली;"अरे माझ्या फोनवरून कर न फोन." विक्रमने एकदा तिच्याकडे बघितलं आणि तिचा फोन घेऊन नंबर लावला. क्षण दोन क्षण गेले आणि विक्रम बोलायला लागला;"राजन आहात न? हो रे! थोडा उशीर झालाय आज. पण तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतो आहे. थांबा हं. अरे? का? कसलं काम? नाही चालणार. थांबा म्हणजे थांबा." असं म्हणून त्याने फोन ठेवला.

गीताने फोन परत घेत विचारलं;"काय झाल विकी? नाहीत का ते तिथे?"

"अग आहेत की. फक्त त्यांना थोडी घाई आहे. म्हणत होते उद्या दाखव तुझ सरप्राईज. पण मीसुद्धा सांगितलं त्यांना ते नाही चालणार. थांबाच तुम्ही." अस म्हणून विक्रमने हसत गीताकडे बघितलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला;"गिता, मला माहित आहे की तुझा माझ्यावर विश्वास आहे. पण तरीही खोल कुठेतरी तुझ्या मनातही काही प्रश्न येत असेलच न? मला तू हवी आहेस गिता. मनात कुठलाही पण किंवा परंतु न घेता तू मला स्वीकारावस असं वाटतं. म्हणूनच मी तुला आजच त्या तिघांना भेटवायचं ठरवलं. मी मानसिक आजाराचा बळी नाही; हे मला देखील सिद्ध करायचं आहेच."

गिता विक्रमकडे टक लावून बघत होती. तिच्या मनाचा पुरता गोंधळ उडाला होता. खरंच विक्रम म्हणत होता त्याप्रमाणे तो ठीकच होता आणि त्याच्या वडिलांना काही त्रास होता की विक्रम अत्यंत बेमालूमपणे गीताशी खोटं बोलत होता.... ते तिला कळत नव्हतं. शेवटी तिने ठरवलं की जे जे होत आहे ते पहायचं. करणं तोपर्यंत निर्णयापर्यंत पोहोचण शक्य नव्हतं.

विक्रमचं घर आलं. त्याने रिक्षा थांबवली आणि खाली उतरून पैसे दिले. गीतादेखील त्याच्याबरोबर उतरली. विक्रमच्या घराजवळ अजिबात रहदारी नव्हती. रस्ता पुढे बंदच होता; त्यात त्यांची बिल्डिंग अगदी शेवटची. रिक्षा परत गेली. गीताने प्रश्नार्थक नजरेने विक्रमकडे बघितलं. कारण आजू-बाजूला कोणीच दिसत नव्हतं.

"विकी कुठे आहेत तुझे मित्र?" तिने विक्रमकडे बघत विचारलं.

"गिता मनातला संशय दूर ठेव बघू. ते बिल्डींगच्या मागच्या टाकीवर बसले असतील. आमची ती ठरलेली जागा आहे. किंवा मग गच्चीत असतो आम्ही." विक्रम तिच्याकडे बघत म्हणाला.

बोलताना विक्रम गीताकडे रोखून बघत होता. गिताला त्याचं असं रोखून बघणं आवडलं नाही. पण ती काहीच बोलली नाही. त्याला पुढे चलायची खुण करून ती त्याच्या मागून चालू लागली. दोघे बिल्डिंगला वळसा घालून मागे आले. पण तिथे कोणीच नव्हतं. विक्रमने आजू बाजूला बघितलं आणि म्हणाला;"वर गच्चीत असतील ते. चाल."

ते दोघे जिन्याकडे आले तेवढ्यात समोरून वॉचमन आला. विक्रमने पुढे होत गिता काही बोलायच्या आत त्याला विचारलं;"चाचा, मेरे दोस्त उप्पर गये क्या?" वॉचमनने एकदा गीताकडे बघितलं आणि मग विक्रमकडे बघत तो म्हणाला;"हां हां! उप्पर गये. जाव तुम आपने घर जाव." आणि गेटच्या दिशेने तो निघून गेला.

त्याला कल्पना नव्हती पण विक्रम जग जिंकल्याच्या नजरेने गीताकडे बघत होता आणि गीताचा चेहेरा प्रचंड मोठा धक्का बसल्यासारखा दिसत होता. विक्रमने तिचा हात धरला आणि तिला लिफ्टकडे नेले. दोघे लिफ्टमध्ये शिरले आणि विक्रमने शेवटच्या मजल्याचे बटन दाबले.

गिता थोडी शांत झाली आणि म्हणाली;"विकी, तुझ्या बाबांना माहित आहे का की वॉचमनला तुझे मित्र इथे येतात ते माहित आहे?"

तिच्याकडे बघत विक्रम म्हणाला;"नाही गिता. खरं सांगायचं तर जे लोकं म्हणतात की माझे मित्र खरच आहेत त्यांच्याशी माझे बाबा बोलत नाहीत."

हे एकून गिता काहीच बोलली नाही. लिफ्ट शेवटच्या मजल्यावर पोहोचली. दोघे लिफ्टच्या बाहेर पडले आणि गच्चीवर जाण्याच्या जिन्याकडे वळले. गच्चीच्या दाराशी आल्यावर विक्रांतने गिताला हळूच कानात सांगितले;"तू २ मिनिटांनी आत ये. ते तिघे वर टाकीवर बसले असतील. आमची ती खास जागा आहे. मी काहीतरी कारणाने त्यांना खाली बोलावतो. मी टाळी वाजवली की तू आत ये. ठिक?"

गीताने हसून मान डोलावली आणि विक्रम गच्चीत गेला. विक्रम गेला आणि जिन्यात उभ्या असलेल्या गिताला प्रत्येक क्षण युगांसारखा वाटायला लागला. तशीच अजून २-३ मिनिटं गेली. गच्चीतून काहीतरी बोलल्याचा आवाज आला आणि अचानक टाळी वाजली. गिताला लक्षात आलं विक्रम तिला आत बोलावतो आहे. ती हसत हसत गच्चीत शिरली.

विक्रम दाराच्या उजवीकडे होता आणि तिच्याकडे हसत बघत उभा होता. त्याने हाताची घडी घातली होती. गिताला वाटलं होतं की त्याचे मित्र त्याच्या बाजूलाच असतील. पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने हसतच तिला खुण केली की तिने मागे वळून बघावं. गिता मागे वळली. आता तिची पाठ विक्रमकडे होती. पण तिला विक्रमचा आवाज एकू येत होता;"राजन, प्रकाश, हरी कस वाटलं सरप्राईज? ही गिता. माझ्या आयुष्याची होणारी जोडीदार आणि गिता हे राजन, प्रकाश आणि हरी. माझे जीवाभावाचे मित्र. मी खरंच खूप खूप लकी आहे. आज माझ्या मित्रांनी माझ्या होणाऱ्या सहचारिणीला स्वीकारलं आणि तिने देखील त्यांना स्वीकारलं."

विक्रम असाच काहीसं बोलत होता..... आणि गिताला आयुष्यातला मोठ्ठा धक्का कसा पचवावा हा प्रश्न पडला होता. कारण तिच्या समोर कोणीच नव्हतं!!!

विक्रमच्या मते राजन, प्रकाश आणि हरी तिथेच होते. गिता आणि विक्रमच्या समोर. तो खरंच ते तिघे समोर उभे असल्यासारखा बोलत होता. मधून मधून थांबत होता. जणूकाही त्यांच्यापैकी कोणीतरी काहीतरी बोलत होतं आणि तो त्यांना उत्तर देत होता. गिता मात्र हतबल होऊन उभी होती. तिला काहीच सुचत नव्हतं बोलायला. अचानक विक्रमने तिच्याकडे वळून बघितलं. मग परत त्याच्या त्या कल्पनेतल्या मित्रांकडे बघत म्हाणाला;"नाही रे. तिला दिसता आहात तुम्ही तिघे. फक्त काय बोलायचं ते सुचत नसल्याने ती गप्प आहे. हो की नाही ग गीता? अरे तिला समजून घ्या रे. बाबांच्या बोलण्यामुळे असेल पण तिला असंच वाटत होतं खोल मनात की तुम्ही नसणारच. त्यामुळे तुम्ही आहात हे बघून थोडी गोंधळली आहे इतकंच." आणि गीताकडे वळत त्याने विचारलं;"हो की नाही गिता?"

गीताने विक्रमकडे बघितलं पण ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहेऱ्याकडे बघून विक्रम एकदम शांत झाला. तिच्या जवळ आला आणि तिचा हात धरून तिच्या डोळ्यात बघत त्याने तिला विचारलं;"गिता तुला माझे मित्र दिसत आहेत नं? राजन, प्रकाश आणि हरी इथे आहेत गिता. ते खरच आपल्या समोर उभे आहेत. तुला पटतं आहे नं मी म्हणतो आहेत ते?"

गिता फक्त त्याच्याकडे बघत होती. तिला काय बोलावं सुचत नव्हतं.

विक्रमने एकदम धक्का बसल्याप्रमाणे तिचा हात सोडला. दोन पावलं मागे जात त्याने गिताला विचारलं;"गिता तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही का? तुला माझे मित्र दिसत आहेत की नाही?"

गीताने स्वतःला सावरलं. त्याच्या दिशेने पाउल उचलत ती म्हणाली;"विकी, हे बघ....."

"अहं! नाही! आत्ता याक्षणी फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर गिता. बाकी काही बोलू नकोस." विक्रम म्हणाला.

"माझा तुझ्यावर विश्वास आहे विकी." त्याला शांत करण्यासाठी गिता म्हणाली.

"गिता जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तुला माझे मित्र दिसतील." विक्रम अजून दोन पावलं मागे सरकत म्हणाला. त्याने त्याच्या डाव्या बाजूला बघितलं आणि कोणीतरी काहीतरी बोललं असेल त्याला उत्तर दिल्याप्रमाणे म्हणाला;"हो! खरंय तुमचं. पण माझा गीतावर विश्वास आहे........... होता!" परत गीताकडे बघत तो म्हणाला;"बघ ते पण म्हणत आहेत की तुझा माझ्यावर विश्वास नाही. तूदेखील माझ्या बाबांच्या आणि डॉक्टर खरातांच्या विश्वातली निघालीस गिता."

गिताला काय करावं सुचत नव्हतं. विक्रमला शांत करण्यासाठी जरी ती म्हणाली की तिचा त्याच्यावर विश्वास आहे तरी तिला तिथे त्याचे मित्र दिसत नव्हते हे खरं होतं. आणि ते विक्रमच्या लक्षात आलं होतं. गीताला त्याक्षणी असहाय्य वाटायला लागलं. तिने परत एकदा विक्रमला समजावायचा प्रयत्न केला.

"विकी, ऐक माझं. हे बघ........." ती म्हणाली.

"नाही गिता. तू माझं ऐक." विक्रम एकदम चिडून म्हणाला. "गिता जा तू इथून आताच्या आता. खरंच जा. मला तुझा राग नाही आलेला. फक्त वाईट वाटतं गं की तू सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवलास."

आता मात्र विक्रमला सत्य परिस्थिती सांगावी असं गिताला वाटलं. ती म्हणाली;"विकी, माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर मी तू म्हणता क्षणी तुझ्याबरोबर निघाले न. तुझाच माझ्यावर विश्वास नाही आहे विकी. म्हणूनच तर तू माझं ऐकून घ्यायला तयार नाही आहेस."

विक्रम तिच्याकडे बघत उदासवाण हसला. म्हणाला;"गिता, जा तू. माझा तुझ्यावर विश्वास होता म्हणून तर तुला सगळं सगळं खरं सांगितलं मी. अगदी ते सुद्धा जे फक्त माझ्या मनात होतं आणि माझ्या मित्रांना देखील मी सांगितलं नव्हतं. जाऊ दे गिता. फक्त एकंच प्रश्न विचारतो. मला उत्तर नको आहे, तुझ तूच ते शोध आणि स्वतःला दे. तुला माझे मित्र दिसत नाहीत. पण त्यांना तू दिसतेस. बाबांना ते दिसत नाहीत. पण त्यांना बाबा दिसतात. तुमच्या सगळ्यांच्या मते मला सिझोफ्रेनिया हा आजार आहे. पण गंम्मत म्हणजे तुम्ही सगळे माझे मित्र नाकारता आहात. मी मात्र तुम्हालाही स्वीकारतो आणि त्यांना ही आणि ते देखील तुम्हाला स्वीकारायला तयार आहेत; पण तुमच्या नकारामुळे गोंधळलेले आहेत. आता तूच ठरव गिता; आजारी नक्की कोण आहे? मी की माझ्या मित्रांना अमान्य करणारा हा समाज? मला सिझोफ्रेनिया हा आजार आहे असं तुम्ही म्हणता... ते तुमचं मत आहे की तुमच पेर्सेप्शन? जा... गिता... प्लीज जा...." असं म्हणून त्याने तिच्याकडे पाठ केली.

गिता खूप खूप गोंधळली होती. गडबडली होती. ती धडपडत जीना उतरली आणि खाली आली. खाली गेटजवळ तिला वॉचमन बसलेला दिसला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारलं;"चाचा, अभी में जिनके साथ उप्पर गई उनको तो आप पेहेचानते हो न?"

वॉचमन उभा राहात म्हणाला;"हा हा दीदी. वो तो विकी बाबू हे. क्यो क्या हुवा? फिरसे दौरा पड गया क्या उनको? अभी साहाब नही आये क्या?"

गिता त्याचं बोलणं ऐकून एकदम गोंधळली. "आप क्या कह रहे हो चाचा?" तिने त्याना विचारलं.

"अरे दीदी, वो विकीबाबू को उनके दोस्त दिखते हे ना.... तो वो मुझे पुछते रेहेते हे.... क्या मेरे दोस्त इधर दिखे? उनके पिताजीने मुझे बोल के रखा हे की अगर विकी बाबूने ऐसें कूच पुछा तो मैने हा केहेना हे. अगर विकी बाबू जो बोलते हे वो माना नही तो वो काबू के बाहर हो जाते हे. मै वो जो केहेते हे उस्को हा बोलता हूं और उनके साथ बाते करते हुवे उपर जाके उनको घर पर छोड आता हूं. अभि भी मैने विकी बाबू जो केहे रहे थे उसमे हामी भर दि. और फिर आप तो थी उनके साथ... तो फिर मै नही आया." वॉचमन गिताला सांगत होता. त्याच्या प्रत्येक वाक्याने गिता अजून अजून ढेपाळत होती.

ती एकदम मागे फिरली आणि लिफ्टची वाट न बघता दोन दोन पायऱ्या पार करत गच्चीत पोहोचली. तिने विक्रमला बेंबीच्या देठापासून हाक मारली. "विक्रम...... विकी.... विकी??? I TRUST YOU! कुठे आहेस विक्रम? विकी? माझा तुझ्यावर विश्वास आहे. चल, तुझ्या घरी जाऊन बोलूया आपण. विक्रम.... कुठे आहेस तू?"

गिता हाका मारत होती. विक्रमला शोधत होती. पण तिच्या जगाच्या पेर्सेप्शन प्रमाणे विक्रम त्या गच्चीत नव्हता. त्यामुळे टाकीवर मित्रांबरोबर बसलेला विक्रम इच्छा असूनही तिला उत्तर देऊ शकत नव्हता.


समाप्त

Friday, August 21, 2020

सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)(भाग 3)

 

सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)

भाग 3

ती शांत झालेली बघून तिच्या वडिलांनी तिला हाक मारली. "गिता.... बेटा.... काय झालं?"

"बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे. माझ्या लक्षात नाही आलं. नक्कीच विचार करण्यासारखा आहे हा मुद्दा. पण बाबा माझं म्हणणं वेगळंच आहे. हे मान्य की विकी एक पेशंट आहे. त्याने बर झाल्याची बतावणी बेमालूमपणे आजवर केली आहे. हे ही खरं की जर त्याची संपूर्ण केस स्टडी केली तर असा अर्थ निघेल कदाचित की तो कधीच पूर्ण बारा होऊ शकत नाही. पण म्हणून तो एक भाऊक मुलगा आहे आणि तो मला आवडायला लागला आहे; या दोन गोष्टींकडे मी कसं दुर्लक्ष करू?" गिता थोड्या दु:खी स्वरात म्हणाली.

तिचे बाबा तिच्याकडे बघून हसले. "आईचा राग आला आहे ना तुला गीतू?"

"हो!" थोड्या घुश्श्यात गीताने उत्तर दिलं.

बाबांनी तिच्या हातावर थोपटलं. ते म्हणाले,"बेटा ती तुझी आई आहे. विक्रमची नाही. त्यामुळे ती फक्त तुझाच विचार करते आहे न."

"बाबा, जर ती माझा विचार करते आहे तर मग तिला समजलं पाहिजे की मला विकी आवडायला लागला आहे. तिने किती ठाम भूमिका घेतली आहे. तिला माझ्या भावना समजत नाहीत असं नाही मी म्हणत. पण ती विकिचा विचार करायलाच तयार नाही आहे, हे मला खटकत आहे."

"गिता तिच्या बाजूने जर विचार केलास ना तर तुला तिची भूमिका पटेल बेटा. अग, तूच आत्ता म्हणालीस ना की कदाचित विक्रम कधीच बरा होऊ शकणार नाही? अग, मग अशा कायमस्वरूपी पेशंट बरोबर तू तुझं संपूर्ण आयुष्य काढावस अस तिला कसं वाटेल? बरं, तिचं जाऊ दे गिता; एक सायकॉलॉजिस्ट म्हणून तूच मला सांग... जर विक्रम सारखी केस तुझ्याकडे आली आणि असंच एखादी मुलगी तुला भेटायला आली. तिने जर तुला सांगितलं की या मुलाबरोबर मला माझं संपूर्ण आयुष्य काढायचं आहे, तर तू तिला काय सांगशील? भावनिक न होता प्रामाणिक उत्तर दे हं." गीताचे बाबा तिला म्हणाले.

मग मात्र गिता एकदम शांत झाली. थोडा विचार करून ती म्हणाली;"बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे. कदाचित मी अशा पेशंट बरोबर संपूर्ण आयुष्य घालवायला कोणा मुलीला सांगणार नाही. पण कोणा एका मुलीत आणि माझ्यात फरक नाही का बाबा? मी स्वतः सायकॉलॉजिस्ट आहे. त्यामुळे तर मी कायम विकिची ट्रीटमेंट निट चालू आहे की नाही यावर कायम लक्ष ठेवू शकेन ना!" गिताच्या या बोलण्याने तिच्या वडिलांच्या एक लक्षात आलं की गिता खरंच बरीच अडकली आहे विक्रांतमध्ये. त्याक्षणी गिता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे त्यांच्या लक्षात आलं; आणि मात्र त्यांनी त्यांचा पवित्रा बदलला. ते म्हणाले;"ठीक आहे गिता. आपण यावर अजून काही महिन्यांनी बोलू. चालेल का?"

गितालासुद्धा विचार करायला थोडा वेळ हवा होता. ती जरी वडिलांशी वाद घालत असली तरी तिलाही हे पटत होतं की तिची बाजू थिटी आहे. त्यामुळे तिने लगेच ते मान्य केलं.

तिचे बाबा म्हणाले;"गीतू पण मग तू मला शब्द दिला पाहिजेस की तू तुझं मन आणि तुझा पेशा याचा निट समतोल राखशील. बेटा, अजून तर तुझी सुरवात आहे करियरची. त्यामुळे घाई करू नकोस कोणताही निर्णय घेण्याची; एवढंच सांगेन."

गिताला वडिलांच हे सांगणं पटलं. ती म्हणाली;"बाबा, काळजी करू नका. मी निर्णय घेऊन तुम्हाला येऊन सांगितला असं करणार नाही. तुम्ही माझ्या लहानपणापासून घरातला प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला आहात; हे मी पाहिलं आहे. आणि माझे विचार आणि मतं तुम्ही प्रामाणिकपणे समजून घ्याल आणि मगच तुमचं मत सांगाल याची मला खात्री आहे. आणि खरं तर मला पण थोडा वेळ हवा आहे विचार करायला."

तिच्या या समजूतदार बोलण्यावर तिचे बाबा हसले... तीसुद्धा हसली आणि बाबांना जाऊन बिलगली.

मध्ये दोन दिवस गिताची तब्बेत बिघडली. त्यामुळे ती क्लिनिकला गेली नव्हती. दिवसभर तशी झोपूनच होती ती. तिच्या आईने तसं कळवलं देखील होत क्लिनिकमध्ये. विक्रांतने गिताला त्याच्या मोबाईलवरून अनेकदा फोन केला होता. पण तापात असल्याने गीता फोन बंद ठेऊन आराम करत होती. दोन दिवसांनी गीताला थोडं बरं वाटत असल्याने ती दिवाणखान्यात बसली होती. त्यावेळी दरवाजाची बेल वाजली आणि तिने दार उघडलं तर दारात विक्रम उभा होता. त्याला अस अचानक घरी आलेलं बघून तिला खूप आश्चर्य वाटलं.

"अरे विकी तू कसा काय आत्ता? क्लिनिकमध्ये नाही गेलास?" तिने त्याला आत घेत विचारलं.

"नाही गेलो. जावसंच नाही वाटलं तू नसताना." असं म्हणून तो क्षणभर शांत बसला आणि मग अचानक तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला जवळ बसवलं आणि म्हणाला;"गिता मला तू खूप खूप आवडतेस ग. कसं सांगू तुला? अग राजन, प्रकाश आणि हरीने अनेकदा सांगितलं की मी तुझ्याशी बोलण सोडलं पाहिजे. कारण तू कदाचित त्यांना स्वीकारणार नाहीस. पण तरीही आयुष्यात पहिलांदाच..... मी त्यांना न सांगता तुझ्याशी बोलणं चालू ठेवलं आहे. गिता आजवर मी माझ्या मित्रांशी कधीच खोटं बोललो नाही किंवा काही लपवलं नाही. पण तुझा विचार आला ना की तुझं माझ्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं वाटतं."

विक्रमच्या अशा अचानक झालेल्या उद्रेकामुळे गिता गोंधळली होती. पण मग तिच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे की विक्रमशी काही गोष्टी बोलता येतील. ती म्हणाली,"विकी मलाही तू खूप आवडतोस. तुलाही हे कळलं आहे. पण हे जे तू सारखं तुझ्या मित्रांना घाबरून असतोस ना ते मला अजिबात पटत नाही. मुळात तुला आणि तुझ्या मित्रांना असं का वाटतं की मी तुला त्यांच्यापासून तोडेन?" अस म्हणून गिताने त्याच्या डोळ्यात खोल बघितलं आणि त्याला विचारलं;"विकी, असं काही आहे का जे तू माझ्यापासून लपवतो आहेस?"

विक्रमच्या मनाचा निर्णय होत नव्हता. खरंच त्याचा जीव गीतामध्ये गुंतला होता. पण अजूनही त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता.

"ठीक आहे विकी. मी समजू शकते. असा काही विषय असेल जो मला सांगायचा की नाही असा तुझ्या मनात विचार येत असेल; तर ते चुकीचे नाही. मी थांबीन तू आपणहून बोलेपर्यंत." गीता मुद्धाम म्हणाली.

आता मात्र विक्रमच्या डोळ्यात तिला निश्चय दिसला. तो गीताकडे बघत म्हणाला;"गिता मी सिझोफ्रेनियाचा पेशंट आहे; अस डॉक्टर खरात आणि माझ्या वडिलांचं म्हणणं आहे."

तो अशी सुरवात करेल आणि लगेच इतके स्पष्ट बोलेल अस तिला वाटलं नव्हतं. पण म्हणूनच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, जे आवश्यक होतं. अर्थात एका क्षणात गिता भानावर आली. आता तिची खरी कसोटी होती. तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली;"विकी माझी चेष्टा करतो आहेस का? अरे, मी स्वतः सायकॉलॉजिस्ट आहे. मला नसतं का कळलं आतापर्यंत की तू पेशंट आहेस? मुख्य म्हणजे तुला माहित आहे ना की डॉक्टर खरात माझ्या वडिलांचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांनी मला सांगितल नसतं का?"

"गीता त्यांनी तुला तसं सांगितलं नाही कारण त्यांच्या मते मला सिझोफ्रेनिया हा आजार झाला होता. पण आता मी संपूर्ण बरा आहे असं त्यांना आणि बाबांना वाटतं आहे." विक्रम म्हणाला.

"विकी आता मात्र हद्द झाली हं! मला वेडं ठरवण्यासाठी आला आहेस का तू आज? अरे तुला आजार होता; मग तू बरा झालास. काय प्रकार आहे हा?" गीता त्याला बोलतं करण्यासाठी म्हणाली.

"अस काय करतेस गिता? ऐकून तर घे माझं. माझी आई गेली ना त्यावेळी मी मनाने मोडून गेलो होतो. अग सुरवातीला मला आधार द्यायला माझी आई यायची माझ्याजवळ. मला धीर द्यायची; म्हणायची बेटा मन घट्ट कर; असा रडू नकोस. आता तुझ्या बाबांसाठी तूच आधार आहेस. आजी तुझं किंवा बाबांचं काही करणार नाही. उलट ती त्यांनासुद्धा बोलेल माझ्यावरून. तू रडत राहिलास तर तुलासुद्धा रागावेल. म्हणून रडू नकोस. बाबांना सांभाळ. सुरवातीला ती रोज यायची. पण मग एक दिवस म्हणाली; मी काही अशी रोज नाही येऊ शकणार तुला भेटायला. गिता, खरं सांगू का... मी काही खूप लहान नव्हतो माझी आई गेली तेव्हा. मला सगळं कळत होतं. बाबा म्हणायचे आई आता येऊ शकत नाही. पण हे देखील खरं आहे की माझी आई यायची. आणि ती गेली की मला खूप रडायला यायचं. आजीला नाही आवडायचं मी रडलेलं. म्हणून मग आई येऊन गेली की मी खाली जायचो मित्रांकडे. अगदी बाबा घरी येईपर्यंत मी त्यांच्याबरोबर असायचो. त्या तिघांनी मला खूप सांभाळलं ग त्यावेळी. अग, हरीला तर माझी आई एकदा घरातून बाहेर पडताना दिसलीसुद्धा होती. तोच म्हणाला होता मला. पण मी कितीही सांगितलं तरी माझ्या बाबांचा माझ्यावर विश्वास बसला नाही. अग माझी आई म्हणजे त्यांची पत्नी ना. पण तरीही ती मला भेटायला येऊ शकते; हे मान्य करायला ते तयार नव्हते. पण मग मी त्यांच्याशी कधी वाद नाही घातला. पण मग कधीतरी त्यांनी माझे मित्रदेखील नाहीत असं म्हणायला सुरवात केली. कुठूनतरी डॉक्टर खरातांना शोधून काढलं आणि मला तिथे घेऊन गेले. डॉक्टर खरातांनी अगोदर असं दाखवलं की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे; आणि माझ्याकडून सगळं काढून घेतललं. मग मात्र त्यांनीसुद्धा माझ्या बाबांसारखं मला सांगायला सुरवात केली की माझी आई येतंच नाही. काही दिवसांनी आम्ही घर बदलंल. तोपर्यंत मला लक्षात आलं होत की माझ्या बाबांना बरं वाटायला हवं असेल तर मी आई भेटते हे म्हणणं बंद करायला हवं. मी आईबद्दल बोलायला लागलो की बाबा अस्वस्थ व्हायचे न. आणि आईने देखील मला बाबांना सांभाळायला सांगितलं होतं. शिवाय नवीन घरात आम्ही आलो आणि आईने येण बंद केलं. अग मी तिला नवा पत्ता द्यायला विसरलो होतो. त्यामुळे ती या नवीन घरी येऊ शकत नसेल. हळूहळू मी आईचं जाणं स्वीकारलं आणि मग हळूहळू सगळं ठीक होत गेलं."

गिता त्याचं म्हणणं नीट ऐकत होती. आणि तिला धक्यांवर धक्के बसत होते. तिच्या लक्षात आलं होतं की विक्रम कधीच बरा झाला नव्हता. विक्रम इतक्या सफाईने स्वतःच्या खऱ्या विचारांना लपवत होता की डॉक्टर खरातांसारखे अनुभवी आणि यशस्वी डॉक्टरसुद्धा तो बरा झाला आहे असं समजत होते.

विक्रम आपल्याच तंद्रीत बोलत होता. "गिता, मी नवीन घरी रहायला आलो ना तेव्हा जसं मी आईला नवा पत्ता द्यायला विसरलो होतो तसा माझ्या मित्रांना देखील नवा पत्ता द्यायला विसरलो होतो. पण माझे मित्र खरंच ग्रेट आहेत. त्यांनी मला शोधून काढलं; आणि मग ते अधून मधून थोडा वेळ मला भेटायला आमच्या नवीन घराकडे यायला लागले. यावेळी मात्र मी माझ्या बाबांना काही सांगतीलं नाही. एकतर त्यांनी परत घर आणि शाळा बदलली असती आणि परत मला सांगायला सुरवात केली असती की जशी आई नाही तसे हे मित्रदेखील नाहीत. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. दहावी नंतर त्या तिघांनी माझ्याच कॉलेजमध्ये दाखला घेतला. मी त्या दिवशी खूप खुश होतो. त्याच आनंदात मी बाबांना सांगितलं की माझे तिन्ही बेस्ट फ्रेंड्स माझ्याच बरोबर माझ्याच कॉलेजमध्ये आहेत आणि मग माझ्या लक्षात माझी चूक आली. तरी राजन म्हणाला होता की बाबांना आमच्याबद्यल सांगू नकोस. त्यांना आम्ही आवडत नाही, त्यामुळे ते परत तुला आमच्यापासून तोडायचा प्रयत्न करतील. पण चुकून मी बोलून गेलो होतो.

बाबांनी पूर्वीप्रमाणे परत मला डॉक्टर खरातांकडे नेलं. डॉक्टर खरातांनी परत मला सांगायला सुरवात केली की माझे मित्र नाहीतच. त्यांचं म्हणणं खरं करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की मीचं आजारी आहे आणि माझ्या आजाराचं नाव सिझोफ्रेनिया आहे. अगोदर मला खूप राग आला होता त्यांचा. पण मग मी जेव्हा राजन, प्रकाश आणि हरीशी बोललो तेव्हा माझ्या मनातले प्रश्नच सुटले."

"अरे वा! सुटले तर! काय उपाय मिळाला तुला?" गीताने मुद्दाम त्याची तंद्री भंग केली. बोलतांना अडवल्यानंतर विक्रम काय करतो ते तिला पहायचे होते. तिच्या मते तो गोंधळायला हवा होता. किमान त्याची लिंक तोडली म्हणून तिच्यावर थोडा वैतागायला हवा होता. पण असं काहीच झालं नाही. विक्रमने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला;"अग गिता असं बघ, तुझ्या हातात आत्ता ग्लास आहे की नाही?" गिताने ग्लासकडे बघितलं आणि म्हणाली;"हो विकी! तुलासुद्धा तो दिसतो आहे की नाही?"

मात्र त्यावर विक्रमच उत्तर तिला पूर्णपणे अनपेक्षित होत. "गिता, तुझ्या हातात ग्लास नाही आहे. मी फक्त कल्पना करतो आहे की ग्लास आहे."

त्याच्या त्या उत्तराने गीताला एकदम धक्का बसला. कारण ग्लास तिच्याच हातात होता. क्षणभर तिला वाटलं की तिने कदाचित तो समोरच्या टीपॉयवर ठेवलाय की काय. पण मग त्या ग्लासचा स्पर्श विक्रमला करत ती म्हणाली;"विक्रम, अरे तुला स्पर्श जाणवत नाही का? हा बघ, तुझ्या हाताला मी हा ग्लास लावला आहे."

"तू म्हणतेस तर हो... होतोय स्पर्श माझ्या हाताला." विक्रम म्हणाला.

आता त्याच्या अशा उत्तराने गिता निरुत्तर झाली. ती शांतपणे विक्रमकडे बघत बसून राहिली. कारण तिला लक्षात आलं की जर विक्रम असं काहीतरी उत्तर देतो आहे तर त्याचा अर्थ त्याला त्याचा मुद्दा कदाचित पटवायचा आहे.

"विक्रम मला कळतं आहे की तुला ग्लास दिसतो आहे. नाहीतर तू त्याचा उल्लेखच केला नसतास. पण तुला तुझा मुद्दा मला सांगायचा आहे. म्हणूनच तू हा ग्लास माझ्या हातात असणं हे फक्त माझ म्हणणं आहे असं म्हणतो आहेस. तू बोल विक्रम; मी ऐकते आहे." गिता म्हणाली आणि विक्रम हसला.

"गीतू तू ना मला ओळखायला लागली आहेस माझ्या मित्रांसारखी! तर, तुझ्या हातात ग्लास आहे असं तू म्हणते आहेस. किंवा समजा आत्ता इथे अजून ४-५ माणसं असती आणि त्यांनी म्हंटलं असतं... तर मग खरंच तुझ्या हातात ग्लास आहे हे सिद्ध झालं असतं. बरोबर? आणि समजा तू एकटीनेच म्हंटलं असतंस की तुझ्या हातात ग्लास आहे पण बाकीच्यांनी म्हंटलं असतं की तुझ्या हातात असं काहीच नाही... तर मग पलीकडच्या खोलीतल्या लोकांना काय वाटलं असतं?" विक्रमने तिला विचारलं.

गिता एकदम गोंधळली. "अरे काय म्हणतो आहेस तू?" तिने विक्रमला विचारलं.

"अग, असं काय करतेस? बरं! परत सांगतो. थोडं वेगळ्या पद्धतीने. तू जर एखादी गोष्ट या खोलीत आहे म्हणते आहेस आणि इतरांनी दुजोरा दिला, तर तू जे म्हणते आहेस ते खरं ठरतं; बरोबर? पण जर तू म्हणते आहेस त्याला दुजोरा नाही मिळाला तर मग तू कितीही ओरडून सांगितलंस तरी ते खरं ठरत नाही. हो की नाही?" विक्रमने परत एकदा त्याचं म्हणणं सांगायचा प्रयत्न केला.

गिताला आता त्याचा मुद्दा लक्षात आला. "विकी, तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. पण मुळात माझ्या हातात ग्लास आहे हे इतरांना दिसत असतंचं नं. त्यामुळे जर त्यांनी ते नाकारलं तर मी ते सिद्ध करू शकते न? त्या ग्लासचा स्पर्श त्यांच्या हाताला करून. किंवा काचेचा ग्लास असल्याने तो जमिनीवर फोडून... त्यामुळे केवळ मी म्हणते म्हणून हे सिद्ध होत नाही की ग्लास आहे; तर त्याच्या अस्तित्वाला सिद्ध केल्यानंतर ते मान्य होतं." गीताने एकूण चर्चेला तिला हवं तसं वळण द्यायला सुरवात केली. तिच्या एक लक्षात आलं होतं की विक्रमच्या विचारांना योग्य मार्गावर आणणं; आणि तेही इतर कोणी नाही तर त्याने स्वतःच; हाच एक उपाय आहे तो बरा होण्यासाठी.

"विकी तो ग्लास आणि त्याचं असणं याबद्धल आपण नंतर बोलू. अगोदर तू मला जे सांगत होतास ते पूर्ण कर बघू. तुझं आणि तुझ्या मित्रांचं असं काय बोलणं झाल रे की सगळे प्रश्नच सुटले." तिने त्याला आठवण करून दिली.

"गिता तुलासुद्धा मी सिझोफ्रेनिक वाटतो आहे का?" अचानक विक्रमने तिला विचारलं.

"विकी, मी जे विचारते आहे ते सोडून तू असं मलाच का सारखे प्रश्न विचारतो आहेस? जर तुला नसेल सांगायचं की तू आणि तुझ्या मित्रांनी मिळून तो प्रश्न कसा सोडवला तर राहु दे. मी आग्रह करणार नाही. पण मी तुला हे सगळं माझ्या उत्सुकतेमुळे विचारते आहे." त्याच्या प्रश्नाचं उत्तर टाळत गीताने थोडा त्याच्या भावनांना हात घातला. आणि त्याचा योग्य तोच परिणाम झाला.

"असं नाही ग. पण तू अगदी डॉक्टरच्या भूमिकेतून विचारल्यासारखं विचारते आहेस म्हणून मला वाटलं." विक्रम नरमून म्हणाला आणि सांगायला लागला;"अग उत्तर सोप्प होतं. आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून ते शोधलं होतं. मी पूर्वी प्रमाणेच डॉक्टर खरातांचं म्हणणं मान्य करायचं. ही पहिली गोष्ट. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे सिझोफ्रेनिया आजाराचा अभ्यास स्वतःच करायचा. उत्तर तर मिळालं होतं. फक्त ते कसं करायचं ते कळत नव्हतं. कारण मी जरी अभ्यास करायचा म्हंटलं तरी बाबांचं माझ्यावर बारीक लक्ष असणार. त्यात डॉक्टर आता परत औषध सुरु करणार. म्हणजे एकतर मी थोडा जास्त झोपायला लागणार, जेवण-खाण नकोस होणार. उत्साह नाही वाटणार.... हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे काय करावं याचा मी विचारच करत होतो; आणि उत्तर डॉक्टर खरातांनीच दिलं. त्यांनी मला विचारलं की मी त्यांच्याच क्लिनिकमध्ये काम करेन का! मी लगेच हो म्हणून टाकलं. पण जर मला केसेसचा अभ्यास करायचा असला तर ते मी एकटा असतानाच शक्य होतं. म्हणून मग मी पोस्ट ग्रजुएशन करणार आहे असं सांगून क्लिनिक बंद असताना आत थांबायची परवानगी घेतली.

गिता त्यानंतर मात्र मी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला या आजाराचा. केसेसचा खजिनाच होता डॉक्टर खरातांच्या क्लिनिकमध्ये. शिवाय इंटरनेट होताच; जास्तीच्या माहितीसाठी.

त्या अभ्यासातूनच मला कळलं की सिझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे. हा काही दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा विषय नाही. किंवा हा आजार असणारी व्यक्ती समाजासाठी भयावह देखील नसते. अनेकदा हा आजार अनेक पिढ्यांअगोदर त्या घरातील कोणालातरी झालेला असतो. म्हणजे किमान ७०% वेळा असं असतं. मेंदूमधल्या काही रसायनांच्या असंतुलनामुळे हा आजार होऊ शकतो. serotonin आणि dopaminc अशी त्या केमिकल्सची नावं आहेत. त्यांच्या असंतुलनामुळे मेंदू विचित्र प्रतिक्रिया देतो. हा आजार असणाऱ्यांना आवाज, वास, दृष्टी, चव या बाबतीत भ्रम होऊ शकतात.

ही माहिती कळल्यानंतर मी स्वतःचा अभ्यास सुरू केला. मुळात बाबांना गप्पांमधून विचारलं की त्यांच्या किंवा आईकडंच्या नात्यामध्ये मागच्या पिढीत हा आजार कोणाला कधी झाला होता का? पण तसं काही नव्हतं. मग मी स्वतःच्या serotonin आणि dopaminc टेस्ट्स करून घेतल्या. बाबांच्या किंवा डॉक्टरांच्या नकळत हं. त्यात थोडं असंतुलन आलं खरं. पण हे असंतुलन अस्वस्थ मनःस्थितीत येऊ शकतं हे मी शोधून काढलं. बाबांना मी आजारी आहे असं वाटतं यामुळे मी सतत अस्वस्थ तर होतोचं न. म्हणजे असंतुलन असूनसुद्धा मी सिझोफ्रेनिक आहे असं म्हणणं योग्य होत नव्हतं. बरं वास, दृष्टी, चव, आवाज या बाबतीत मला भ्रम देखील नाहीत. डॉक्टर खरातांच्या क्लिनिककडे जातांना ती कचऱ्याची पेटी आहे तिथून येताना मला खूप त्रास व्हायचा वासाचा. एकदा तिथून जातांना मी मुद्धाम बाबांना म्हणालो किती छान वाटतंय नं? तर ते म्हणाले हा वास सोडला तर सगळं छान आहे. अशाच प्रकारे मी दृष्टी, चव आणि आवाजाच्या बाबतीत खात्री केली. गीतू, इतरांना प्रत्येक गोष्ट जशी दिसते किंवा जाणवते तशीच ती मला दिसते किंवा जाणवते. मग मी समजून चुकलो की मला असा कोणताही आजार नाही आहे." विक्रमचं ते बोलणं ऐकून गिताला काय बोलावं तेच कळेना.

एखाद्या अत्यंत हुशार आणि सयुक्तिक विचार करणाऱ्या व्यक्तीसारखा विक्रम बोलत होता. मुख्य म्हणजे त्याचे मुद्दे सरळ खोडून काढणं अवघड होतं हे गिताच्या लक्षात आलं. त्याने सिझोफ्रेनिया या विषयाचा खूप चांगला अभ्यास केला होता आणि त्याच्या वागण्याचं स्पष्टीकरण त्याने स्वतःलाच देऊन तेच योग्य आहे अशी समजूत देखील करून घेतली होत. बरं, त्याने याविषयी आत्ता जे सांगितलं होतं ते वैज्ञानिक निकषावर बरोबरच होतं. त्याला त्याचे मित्र दिसतात हा दृष्टी भ्रम आहे हे त्याला मान्यच नव्हतं; त्यामुळे त्याविषयी तो बोलायलाच तयार नव्हता.

आता गीता समोर एक खूप मोठं आव्हान उभं राहीलं होतं. तिला विक्रमला संशय येऊ न देता हे समजावायचं होतं की त्याचे मित्र मुळात नाहीच आहेत. म्हणजे त्याला दृष्टिभ्रम आहे. हे एक आव्हान एवढ्यासाठी होतं कारण आता विक्रमला याविषयातील माहिती होती; त्यामुळे गीताने कितीही प्रयत्न केला असता तरी तिचे मुद्दे तो खोडून काढू शकत होता.

क्रमशः

Friday, August 14, 2020

सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?) (भाग 2)

 सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?) 


भाग 2

ठरल्याप्रमाणे गिता लंचच्या वेळी बाहेर पडली. दुपारी क्लिनिक बंद असायचं. परंतु विक्रम तिथे बसून सगळे रिपोर्ट्स टाईप करायचा. म्हणून मग गीता रोजच एकटी निघायची. त्यामुळे विक्रमला काही त्यात वेगळ नाही वाटलं.

ठरल्याप्रमाणे गिता डॉक्टर खरातांना भेटली. त्यांच्याबरोबर अजून एक गृहस्थ होते. हॉटेलमध्ये बसल्यावर डॉक्टरांनी त्यांची ओळख गिताला करून दिली. ते विक्रमचे वडील होते. त्यांना डॉक्टरांनी बोलावलेलं पाहून गिताला खूप आश्चर्य वाटलं. डॉक्टर म्हणाले;"गिता, हे विक्रमचे वडील. सुहास राजे! तुझ्या बोलण्यात असा उल्लेख होता की वडील बोलवायला येईपर्यंत विक्रम गच्चीत मित्रांबरोबर बसला होता. बरोबर? तू ते सांगितलंस तेव्हाच माझ्या मनात आलं की असं काही जर विक्रम म्हणाला असेल तर त्याच्या वडिलांनी मला कसं काहीच कळवलं नाही? म्हणून मग मी त्यांना फोन करून इथे बोलावून घेतलं. एकतर आपलं बोलणं त्यांच्या समोर झालेलं बरं म्हणजे त्यांना ही जर काही सांगायचं असेल तर ते सांगतील आणि मुख्य म्हणजे विक्रमच्या वागण्यात काही बदल झालेच असतील आणि त्यांना ते कळले नसतील तर आता ते निट लक्ष ठेऊ शकतील.

तर मी तुला सांगितलं की विक्रमची केस माझ्याकडे कशी आली आणि तोवरचे त्याच्याबाबातीतले अनुभव ते देखील मी तुला सांगितले. विक्रम त्यावेळेस खूपच लहान होता. त्यामुळे त्याला कोणता मानसिक आजार आहे हे सांगूनही त्याला समजले नसते. आणि जर ही गोष्ट बाहेर पडली असती तर त्याच्या एकूणच आयुष्यावर यासर्वाचा परिणाम झाला असता. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की सुरवातीला विक्रमला त्याचे मित्र म्हणजे त्याच्या मनातली कल्पना आहे असं सांगायचं नाही. कारण त्यावेळी विक्रम त्याचे विचार त्याच्या या नसलेल्या मित्रांच्या नावाने सांगत होता."

"म्हणजे नक्की काय काका?" गीताने विचारले.

संभाषणात प्रथमच भाग घेत विक्रमचे वडील म्हणाले," मलाच ते लक्षात आलं होतं. त्याचं असं झालं; जेव्हा मी त्याला विचारलं की, तू मित्रांना घरी का नाही आणत खेळायला? तेव्हा तो म्हणाला, आजीला कदाचित माझे मित्र नाही आवडणार. कारण तिला माझी आईदेखील आवडत नाही. त्याचं उत्तर एकून मला खूप आश्चर्य वाटलं. आणि जेव्हा मी खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा माझी आई विक्रमला त्याच्या आईवरून जे बोलायची ते विक्रमने मला सांगितलं. मी त्याला विचारलं,'बेटा तू मला अगोदर का नाही सांगितलंस हे सगळं?' तेव्हा तो म्हणाला,'बाबा, आईने सांगितलं होतं की तुम्हाला त्रास होईल. म्हणून मी नाही सांगितलं आणि आजीला पण आवडलं नसतं. मग ती मला खूप रागावली असती. मला आजीची भिती वाटते. म्हणून तर तुम्ही नसताना मी घरी फार वेळ नाही थांबत. त्यामुळेच तर राजन, प्रकाश, आणि हरीशी माझी मस्त मैत्री झाली आहे.' त्याचं हे उत्तर एकून मला वाटलं की माझ्या आईमुळेच कदाचित माझ्या मुलाला असले भास होऊ लागले आहेत."

"त्यांचा हा गैरसमाज मी दूर केला." डॉक्टर खरात म्हाणाले. " हे खरं आहे की अशा पेशंट्सवर आजुबाजूच्या लहान लहान भावनिक घटनांचा परीणाम होतो. पण अशा घटनांमुळे किंवा कोणा एका व्यक्तीमुळे हा आजार होत नाही; हे सुहासजींना सांगणे खूप महत्वाचं होतं. नाहीतर त्यांच्या मते त्यांची आईच दोषी ठरली असती आणि त्यामुळे प्रश्न सुटण्या ऐवजी वाढला असता."

"खरंय डॉक्टर. मला अगोदर माझ्या आईचा खूप राग आला. परंतु तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती जुन्या पिढीतली स्त्री आहे. त्यामुळे सून कायम आजारी असते हे स्वीकारणं तिच्यासाठी खूप अवघड आहे. कदाचित म्हणूनच ती कधी काही बोलली असेल. हे सर्वसाधारणपणे स्वाभाविक आहे. तिला बिचारीला हे कळलंच नसेल की तिच्या अशा वागण्याचा लहानग्या विक्रमवर चुकीचा परिणाम होत असेल. कारण तिचा तिच्या नातवावर खूप जीव होता. परंतु जेव्हा मी तिला विक्रमच्या आजाराबद्धल सांगितलं तेव्हा मात्र तिने ऐकून घ्यायची तयारी नाही दाखवली. तिच्या मते विक्रमला त्याची आई दिसत होती आणि हे नसलेले मित्रही दिसत होते; याचा अर्थ त्याला भूताने पछाडलं होतं. आणि त्यासाठी तिच्याप्रमाणे मी देखील कसलेसे तंत्र-मंत्र करावेत असं तिचं म्हणणं होतं. ते ऐकल्यावर मात्र मला कठोर निर्णय घ्यावा लागला. मी आमचं मोठं घर विकलं आणि दुसऱ्या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये पण वर-खाली अशी दोन लहान घरं घेतली. आता माझी आई आमच्या वरच्याच मजल्यावर राहाते. तिच्या वयामुळे आता तिच्या सोबतीसाठी एक मुलगी देखील मी ठेवली आहे. हा बदल विक्रमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरला. पण मग विक्रमला शाळेव्यतिरिक्त कुठे ठेवायचं हा प्रश्न उभा राहिला. त्याला सर्वसाधारण पाळणाघरात ठेवणं शक्य नव्हतं. कारण त्याचा आजार एका वेगळ्या दृष्टीने बघितला गेला असता. म्हणून मग मी माझी ऑफिसची जागा देखील विकली आणि माझं काम मी घरातूनच करायला लागलो."

"हे सगळे बदल सुहासजींनी माझ्याशी बोलूनच केले होते. विक्रम अजून बराच लहान होता. त्यामुळे जागा बदलल्यामुळे तो कदाचित लवकर सुधारला असता. मुख्य म्हणजे त्याचे मित्र मागेच जुन्या घराजवळ राहिले आहेत आणि आता त्याने नवीन मित्र करावेत हे त्याच्या मनावर बिंबवणे सोपे झाले असते."

"पण मग विक्रमने हा बदल सहज स्वीकारला का?"गीताने विचारले.

"नाही गिता. तुझा अंदाज बरोबर आहे. मुळात घर बदलण्यासाठी विक्रम तयार नव्हता. पण मग त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं; आणि सांगितलं की नवीन जागी नवीन मित्र मिळतील तेव्हा तो अनिच्छेने का होईना पण तयार झाला." डॉक्टर म्हणाले.

"आम्ही नवीन जागी राहायला आलो. मी त्याची शाळादेखील बदलली. असे अनेक बदल अचानक झाले होते त्याच्या आयुष्यात. पण सुरवातीचे दोन दिवस सोडले तर मग त्याने फारसा त्रास नाही दिला हे बदल स्वीकारताना. तो नवीन घरात आणि नवीन शाळेत छान रमला. मात्र या नव्या इमारतीमधल्या मुलांशी त्याने मैत्री नाही केली. तसा तो आपल्यातच मग्न असायचा. अधून मधून खाली जायचा. बराचवेळ. पण डॉक्टर म्हणाले होते त्याला फार प्रश्न विचारू नका. किंवा त्याच्यावर लक्ष ठेवता आहात असं त्याला कळू देऊ नका. विक्रम मोठा होत होता....

त्याचं दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे शाळा, क्लासेस आणि अभ्यास यात तो खूपच अडकला. त्याने परत कधी त्याच्या मित्रांचा उल्लेख नाही केला आणि त्याची आईदेखील देवाघरी गेली आहे हे स्वीकारलं त्याने. खूप शहाण्यासारखा वागायचा तो. खरं तर म्हणूनच मग मला ते थोडं विचित्र वाटायला लागलं. दहावीचा निकाल लागला. तो उत्तम गुणांनी पास झाला आणि जवळच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये मी त्याचा दाखला करून घेतला. सगळ सुरळीत होतं. एक दिवस तो घरी आला ते खूप खुश होऊन. मी त्याला कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला की राजन, प्रकाश आणि हरीसुद्धा त्याच्याच कॉलेजमध्ये आहेत. आता जुन्या मित्रांबरोबर जास्त वेळ राहता येणार म्हणून तो खुश आहे. त्याच्या 'जास्त वेळ' या शब्दांचा मला संशय आला. पण त्याक्षणी मी काहीच बोललो नाही. मात्र रात्री जेवताना त्याच्या कलाने घेत प्रश्न विचारले आणि माझ्या लक्षात आलं की मला वाटत होतं की माझा विकी बरा झाला आहे, परंतु तो जे कधी कधी बाहेर जायचा संध्याकाळी ते त्याचे जुने मित्र त्याला भेटायला यायचे म्हणून. मग मी त्याला विचारलं की आता तर आजीदेखील नाही आपल्याकडे. मग तू त्यांना घरी का नाही आणलंस कधी. त्यावर त्याचं उत्तर मलाच निरुत्तर करून गेलं... तो म्हणाला बाबा खरं सांगा तुमचा विश्वास आहे का की माझे हे मित्र घरी आले तर तुम्ही त्यांच्याशी नीट बोलू शकाल? मुळात त्याचे असे कोणी मित्र नव्हतेच. तर मग मी काय उत्तर देणार होतो त्याला."

"त्यांच्यातल्या या संभाषणा नंतर सुहासजी मला येऊन भेटले. याचा अर्थ विक्रम त्याच्या विचारांमधून बाहेर पडला नव्हता हेच खरं होतं. म्हणून मग मी सुहासजींना सांगितलं की आता विक्रम एवढा मोठा आहे की त्याला त्याच्या आजाराची कल्पना आपण दिली पाहिजे. त्यांना देखील हे पटले. मी विक्रमला भेटायला सुरवात केली. तुला तर माहीतच आहे आपला सायकॉलॉजिच्या दृष्टिकोनातून भेटी कशा असतात! अगोदर त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि मग त्याच्या कलाने घेत त्याला सत्य सांगत गेलो. सुरवातीला विक्रमला काही पटायचं नाही. तो माझ्याकडे यायला देखील तयार नसायचा. पण मग हळू हळू त्याने सत्य स्वीकारायला सुरवात केली. हे मी आत्ता सांगताना सोपं वाटत असलं तरी यासगळ्याला बराच कालावधी लागला. तो त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे सामान्य वागायला लागला तोवर तो पदवीधर देखील झाला होता. गिता तुला अंदाज आहेच, असे पेशंट्स मनाने खूप कमकुवत....हळवे म्हणू हवे तर.... असे असतात. त्याला पुढे शिकायचं होतं. त्याच्या वडिलांनी आणि मी देखील त्याच्या या निर्णयाला प्रोत्साहन दिलं. पण आता तो अशा वयात होता की त्याच्यावर सतत लक्ष ठेवलेलं त्याला आवडलं नसतं आणि अजूनही तो पूर्ण बरा झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर लक्ष असणं आवश्यक होतं. म्हणून मग मीच त्याला म्हंटलं की तू माझ्याकडे कामाला यायला लाग. दुपारी क्लिनिक बंद असेल तेव्हा अभ्यास करत जा. बाकी माझं काम बघशील. त्यामुळे तुला स्वतःसाठी थोडं फार कमावता पण येईल आणि अभ्यास देखील होईल. त्याने देखील थोडा विचार करून ते मान्य केलं. त्याला माझी सवय झाली होती आणि तोच म्हणायचा की त्याला इथे सुरक्षित वाटतं. म्हणून मग सुहासजींनी देखील त्याने माझ्याकडे कामाला येण्याला हरकत घेतली नाही." डॉक्टरांनी सुहासजी सांगत होते त्यापुढची माहिती गिताला दिली.

हे सगळं ऐकून गीताने विचारलं,"काका, जर त्याने एकूणच स्वीकारलं होतं की त्याचे राजन, प्रकाश आणि हरी नावाचे मित्रच नाहीत; तर मग हे अचानक त्याने माझ्याकडे त्यांचा उल्लेख का केला? सुहास काका, तो मला म्हणाला होता की काल तो आणि त्याचे मित्र गच्चीत होते आणि तुम्ही आलात म्हणून त्याचे मित्र पळाले आणि विकी तुमच्याबरोबर घरी आला. काल नक्की काय झालं होतं?"

"गिता हे खरं आहे की विकी कुठे आहे आणि इतका वेळ का लावतो आहे हे बघण्यासाठी मी गच्चीत गेलो. विकी टाकीवर बसून कुठलंस गाणं गुणगुणत होता. मी हाक मारली तसं त्याने माझ्याकडे वळून बघितलं आणि आलो म्हणून लगेच खाली उतरून आला आणि माझ्याबरोबर घरी आला. अग, मला कल्पनाच नव्हती की त्याला परत त्याचे ते मित्र दिसायला लागले आहेत, नाहीतर मी त्याला तिथेच छेडलं असतं." विक्रमचे वडील म्हणाले.

"बर मग आता पुढे काय काका?" गीताने डॉक्टर खरातांना प्रश्न केला.

"पुढे असं गिता, की तू त्याच्याशी बोलत रहायचं. कारण त्याचा तुझ्यावर विश्वास बसला आहे. त्याच्या मित्रांना तू आवडली नाही आहेस असं त्याचं म्हणणं आहे. पण तरीही तो तुझ्याशी बोलतो आहे याचा अर्थ तो हळूहळू तुला सगळं सांगणार. मी त्याची औषध चालू करतो. सुहासजी आपण त्याची औषध चालू करोत आहोत हे मात्र त्याचा संशय आल्यामुळे नाही; हे त्याला सामजावावं लागेल. ते मी बघतो." डॉक्टर खरात विचार करून म्हणाले.

"डॉक्टर साहेब, का हो असं होतं आहे माझ्याच मुलाबरोबर?" सुहासजींच्या डोळ्यात पाणी आलं. "आता माझी शक्ती संपत आली आहे हो. जरा बरा झाला आहे असं म्हणेपर्यंत परत हा त्या कुठल्याश्या नसलेल्या मित्रांचा उल्लेख करतो आणि मी हताश होऊन जातो. त्याला कधीच सर्वसामान्य आयुष्य जगता नाही येणार का हो?" सुहासजी खूपच दुःखी झाले होते. त्यांना गिता खूप आवडली होती. अशी आपली सून असती तर; असा विचार मनात येऊन ते जास्त कष्टी झाले होते. कारण असं कधीच होणार नाही याची त्यांच्या मनाला कल्पना होती.

डॉक्टर खरातांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं. पण ते काहीच बोलले नाहीत. डॉक्टर खरातांना विक्रमच्या वडिलांना खोटी आशा दाखवायची नव्हती आणि विक्रमचे वडील त्याक्षणी तरी खरं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पूर्वी गीताचा विक्रमकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. तिला तो मनापासून आवडायला लागला होता. पण आता मात्र मनाच्या एका कोपऱ्यात तो एक पेशंट आहे हा विचार कायम जागा राहायला लागला.

गीतामधली सायकोलॉजीस्ट तिला कायम आठवण करून द्यायची की विक्रम आजारी आहे. त्यामुळे आता ती त्याच्याशी बोलताना कायम सतर्क राहायला लागली. पण तिचं तरुण मन विक्रमकडे सारखं ओढ घेत होतं. त्यामुळे तिची मनापासून इच्छा होती की तो पूर्ण बरा व्हावा.

त्याच दिवशी रात्रीच्या जेवणाच्यावेळी तिने तिच्या आई-वडिलांकडे विक्रमचा विषय काढला. तिने त्याअगोदर जेव्हा विक्रमच्या मित्रांना ती आवडत नाही हे तिच्या आई-वडिलांना सांगितलं होतं तेव्हा त्यांनी तो विषय थोडा थट्टेवारी नेला होता. कारण साहजिक होतं. गिता आता लग्नाच्या वयाची झाली होती. त्यामुळे चांगल्या घरच्या सुशिक्षित मुलासोबत गीताची मैत्री होत असेल तर त्यात तिच्या आई-वडिलांना काही वावग वाटत नव्हतं.

परंतु जेव्हा गीताने विक्रमचा एकूण आजार आणि त्याचं वागणं सांगितलं तेव्हा मात्र तिच्या आईचा पवित्रा बदलला. गीताने विक्रममध्ये जास्त इंटरेस्ट दाखवू नये अस त्यांना ठामपणे वाटायला लागलं. मोकळ्या स्वभावाची आपली आई असा विचार करेल असं गिताला कधीच वाटलं नव्हतं. तिने तिचं मन मोकळं केलं होतं तिच्या आई-वडिलांकडे.

"आई असं काय करतेस? अग त्याच्यात इंटरेस्ट घेऊ नको म्हणजे नक्की काय करू? तो मला रोज भेटतो आणि भेटणार आहे. मी काही त्याला अजून I love you म्हंटलेलं नाही किंवा त्यानेही असं काही म्हंटलेलं नाही. पण मला तो आवडतो हे सत्य मी किती दिवस डोळ्याआड करू? त्याच्याशी बोलताना तो पेशंट आहे हे कायम कसं मनात राहील? बरं! एक त्याचे ते नसलेले मित्र हा विषय सोडला ना तर एरवी तो खूप नॉर्मल असतो ग. अग, त्याने डॉक्टर काकांना किंवा त्याच्या वडिलांना नाही सांगितलं कधी. पण तो कविता करतो ग. आणि खूप भावूक असतात त्याच्या कविता. त्याने ते फक्त मलाच सांगितलं आहे." गिता म्हणाली.

प्रथमच एकूण संभाषणात भाग घेत तिच्या वडिलांनी तिला विचारलं;"गिता फक्त तुलाच सांगितलं आहे? नक्की?"

"हो बाबा! मी का खोटं बोलेन?" गिता वडिलांच्या प्रश्नाने दुखावून म्हणाली.

"गिता, बेटा तू खोटं बोलशील म्हणून नाही विचारलं. बरं, मला सांग तो नक्की काय म्हणाला?" तिचे बाबा तिच्या जवळ जाऊन खांद्यावर थोपटत म्हणाले.

गिता म्हणाली;"बाबा, त्याने एकदा गप्पांच्या ओघात मला सांगितलं की मी कविता करतो. मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हणाले खरंच? मग एखादी वाचून दाखव बघू. तर लगेच त्याने एक कविता वाचून दाखवली. मन या विषयावर होती ती कविता. खूप सुंदर होती हो! मी विचारलं कविता कधी पासून करतोस? तो म्हणाला अग खूप दिवस झाले... दिवस नाही वर्ष. मी करतो कधी कधी कविता. पण कधी बाबांना नाही सांगितलं. मी विचारलं, म्हणजे तुझी कविता ऐकणारी मीच पहिली ना? त्यावर तो हसून म्हणाला; हो तूच पहिली मुलगी. तस राजन, प्रकाश आणि हरीला माहित आहे. पण ते फक्त ऐकून घेतात. तुझ्यासारखे त्यांचे डोळे चमकत नाहीत माझी कविता ऐकताना. मला एकदम लाजल्यासारखं झालं बाबा. किती हळुवार आहे हो तो. प्रेमसुद्धा कसं हळुवार व्यक्त करतो." गिता सांगताना हरवून गेली होती.

तिच्या वडिलांनी एकदा आईकडे बघितलं आणि 'मी बघतो' अशी डोळ्यानीच खुण केली. ते गीताच्या जवळ बसले आणि म्हणाले;"गिता, अग तू त्याच्या कवितेत आणि त्याच्या हळूवारपणात इतकी अडकलीस की त्यामुळे तुला हे लक्षातच आलं नाही विक्रम बोलता-बोलता म्हणाला,'त्याच्या त्या तीन मित्रांनी देखील कविता ऐकल्या आहेत. तू पहिली मुलगी आहेस.' गिता याचा अर्थ असा आहे की त्याने खरातची आणि त्याच्या वडिलांची कायम दिशा भूल केली आहे. तो कधीच बरा झालेला नाही. गिता, तुला भले तो आवडत असेल, पण तू हे कधीच विसरून चालणार नाही की तो एक पेशंट आहे. अग त्या एका वाक्यातून त्याने तुला खूप काही सांगितलं. त्याचे ते फक्त त्यालाच दिसणारे तीन मित्र त्याच्याबरोबर कायम आहेत. अगदी त्यांनी घर बदललं तरी आणि तो कॉलेजला गेला तरी... किंबहुना त्यानंतरही; अगदी आजपर्यंत! फक्त त्याने त्यांचा उल्लेख सर्वांसमोर करणं सोडून दिलं होतं. कारण त्याचं असं मत झालं असणार की खरात किंवा त्याचे वडील त्याच्या या मित्र असण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण तुझ्याबाबतीत थोडं वेगळं घडलं आहे. गिता, त्याच्या मते तुला त्याच्या आजाराची माहिती नाही. अजून तू त्याच्या त्या मित्रांवर अविश्वास व्यक्त नाही केला आहेस. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला तू आवडायला लागली आहेस. तू म्हणतेस की अजून त्याने स्पष्ट शब्दात तुला असं म्हंटलं नाही. पण कधीतरी भावूक झालाकी तो त्याच्या भावना मोघमपणे तुला सांगतो. हो ना? गिता, सर्वात महत्वाचं म्हणजे अजून तू त्याच्याकडे त्या मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त नाही केली आहेस. त्यामुळे त्याने स्वतःभोवती निर्माण केलेलं सुरक्षा कवच अजून अबाधित आहे.

बेटा, तुला तो आवडतो आहे आणि त्याला तू कदाचित मैत्रिण किंवा प्रेयसी किंवा अगदी सहचारिणी म्हणूनही हवी असशील. कदाचित् तुलाही त्याच्याबद्दल अशाच काहीशा भावना असतील. पण तू हे विसरून कसं चालेल की तो पहिल्यांदा एक पेशंट आहे आणि तू एक सायकालोजीस्ट."

गीताने एकदा वडिलांकडे बघितलं. तिला त्यांचं म्हणणं पटत होत ही आणि नव्हतं ही. तिने मान खाली घातली. तिच्या मनात विचार आला,'खरंच की. विकीच्या त्या एका वाक्यातून खूप काही अर्थ निघू शकतात. मला त्यावेळी लक्षात आलं नाही. किंबहुना आत्ता बाबांनी सांगेपर्यंत हा मुद्दासुद्धा असू शकतो हे मनात आलं नाही. खरंच का मी इतकी त्याच्या प्रेमात अडकायला लागले आहे?'
क्रमशः