Friday, May 29, 2020

गूढ (रहस्य कथा) (भाग 2)

गूढ (भाग 2)



गूढ (भाग 2)

...................................उमरगाव कोकणातलं एक लहानसं गाव. इतकं लहान की जेम-तेम पाच-सहाशेच कुटुंब असतील. ताडा-माडांनी नटलेलं, सुंदरसा समुद्रकिनारा लाभलेलं एका कोपऱ्यातलं स्वतःमधेच सुखी असलेलं असं गाव होत ते. गावात एक मंदिर होतं. खूप जुन बांधकाम होत त्याच. मंदिरात अनेक देव होते पण शंकराची पिंडी गाभाऱ्याच्या मध्यावर असल्याने ते मंदिर शंकराचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं. प्रचंड मोठा मंडप होता मंदिराचा. आजूबाजूला आवार देखील होतं. गावातले मोठे समारंभ या मंडपातच व्हायचे. गावात तशी मोजून पाच-पन्नास ख्रिश्चन कुटुंब देखील होती. पण म्हणण्यापुर्ती ख्रिश्चन... बाकी त्यांचे सगळे व्यवहार इतर गावकऱ्यांसारखेच होते. देवळात वेगवेगळ्या दिवशी त्या-त्या दिवसांप्रमाणे कीर्तनं-भजनं चालायची; पण कोणाचा कोणाला त्रास होत नव्हता. सगळं गाव आनंदाने मिळून-मिसळून रहात होत.

गावाच्या उत्तरेला मंदिरा इतकाच जुना एक वाडा होता. त्याच जुन्या धाटणीच्या बांधणीचा. मोठं आवार असलेला वाडा एकलकोंडा वाटायचा कारण आवारात आंबा फणसाबरोबरच वड पिंपळाची झाडे देखील खूप होती. चिंचा, नारळ, पोफळी... म्हणाल ती झाडं. आणि गिनती एक किंवा दोन नाही तर दहा-वीस च्या संख्येत सहज. दोन विहिरी देखील होत्या. एक वाड्याच्या मागल्या अंगाला आणि एक पुढे. वाडा कौलारू होता. दुमजली! पक्क बांधकाम. भिंतींची जाडीच मुळी तीन-चार फुट असेल. खोल्या प्रशस्त. वेगळ्या कपाटांची गरजच नव्हती. भिंतीतली अंगची कपाटंच खूप होती. त्यामुळे ती प्रशास्तता अंगावर यायची. मोठ्या खिडक्या. पुरुष-पुरुष उंचीच्या. चौपदरी वाडा. मागील अंगणात चार फुटी सुंदर तुळशी वृंदावन.

प्रत्येक प्रदेशाचा आपला असा एक स्वभाव असतो. तसा कोकणाचा आहे. एकूण जगात होणाऱ्या उलाढाली-राजकारण यावर चावडीवर बसून खूप काथ्याकुट होत असतो. पण शेजारच्या घरात कधी आवाज चढला तर त्याकडे मात्र सगळे दुर्लक्ष करतात. म्हणून असेल.......... किंवा गावातल्या प्रत्येकालाच माहित असेल की  तो वाडा आणि त्यात रहाणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे नसते, त्यामुळे मनात अनेक प्रश्न असूनही गावकरी कधी वाड्याचा किंवा त्यात राहणाऱ्या लोकांचा उल्लेखही करत नव्हते. जणूकाही तो वाडा गावात असूनही नव्हता.

थंडीचे दिवस होते. अंधारून लवकर येत असे. त्यात उंच-उंच माड असल्याने काळोख अजून गडद भासायचा. गावाकडे येणारी एसटी तीन कोसावारच थांबायची. तिथून मग बांधांवरून चालत गावाकडे यावं लागायचं. गाव कोकणातलं असल्याने 'वेशी तितक्या गोष्टी' म्हणी प्रमाणे त्या गावातसुद्धा अनेक वंदता होत्याच. त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर उमरगावाकडे कोणी येत नसे. अगदी गावातलं माणूस असलं तरी निघायला उशीर झालाच तर आहे तिथेच वस्तीला राहून दुसऱ्या दिवशीची गाडी पकडून येत.

पण हे झालं गावातल्याच लोकांसाठी. नवीन येणाऱ्या प्रवाशाला हे कस माहित असणार? संध्याकाळचे सात वाजून गेले होते. बांधावरून तोल सांभाळत येणारा शहरी बाबुसुद्धा नवीनच होता. शेताला दुपारीच पाणी पाजलेलं होतं. पण थंडीचे दिवस असल्याने बांधाकडे चिखल तसाच होता. बाबूचे बूट चिखलाने पार माखून घेले होते. चिखलातून चालताना फच-फच असा मोठा आवाज होत होता. त्यामुळे बरोबर अजूनही कोणीतरी चालत आहे असा भास होत होता. बाबू थांबून सारखं मागे वळून बघत होता. पण तसं कोणीच दिसत नव्हतं त्याला. स्वतःवर वैतागत अंधारातून धडपडत बाबू गावात पोहोचला तेव्हा चावडीच्या गप्पा आटपत आल्या होत्या. घरा-घरातून सुरमई-कोलमिच्या रश्याचा आणि रटरटणाऱ्या भाताचा सुगंध दरवळायला लागला होता. त्यामुळे पुरुष मंडळी मुलांना हाकून घराकडे चालती झाली होती. एकटा म्हादू चीलीमिचा झुरका घेत पारावर बसला होता. दोन-चार झुरके मारून तो देखील खोपटीकडे वळणार होता. तितक्यात बाबू तिथे पोहोचला.

"नमस्कार" बाबूने म्हादुकडे बघत म्हंटले.

"राम राम." म्हादूने प्रतिउत्तर दिले आणि बाबूचे निरीक्षण करायला लागला. गुढग्यापर्यंत असलेले आणि आता चिखलाने भरलेले बूट. हातात मोठी पेटी. खाकी विजार आणि बुशर्ट. डोक्यावर इंग्रजासारखी टोपी. ते रूप बघून म्हादुला आश्चर्य वाटलं आणि हसायला देखील आलं. "कोनिकडचं पाहुनं तुमी?" त्याने बाबुला विचारलं.

'मी शहरातून आलो आहे. उमरगाव ते हेच ना?" बाबूने हातातली पेटी खाली ठेवत विचारले.

म्हादू हसला आणि म्हणाला,"हो हो! हेच उमरगाव. कोणाकडे आलात जणू?"

"खरातांकडे." बाबूने म्हंटले आणि सैलावून बसलेला म्हादू दचकला. त्याने चीलीमिचे झुरके मारणे बंद केले आणि एकूणच आपलं बस्तान आवरायला सुरवात केली.

"कुठे आहे हो वाडा? तुमच्या गावात अजिबात उजेड नाही. मी नवीन आहे. जरा सोबत कराल का? मला वाड्यावर वेळेत पोहोचायचे आहे. फारच उशीर झाला आहे मला." बाबू आपल्याच नादात होता. त्याला अजून म्हादूची लगबग लक्षात आली नव्हती.

"वाडा ना? त्या तिकडे पार गावाच्या पल्याडच्या अंगाला. बर मी येतो पावन. वाईच घाई होती." अस म्हणून म्हादू बसली घोंगडी खांद्यावर मारून चालुदेखील पडला.

बाबू एकदम गोंधळून गेला म्हादुच्या गडबडीने. म्हादू जात असलेल्या दिशेने तोंड करून तो मोठ्याने म्हणाला,"अहो.. अहो.... मागल्या अंगाला म्हणजे नक्की कुठे?"

पण उत्तर द्यायला म्हादू थांबलाच नव्हता. बाबू अजूनच वैतागला आणि अचानक त्याला मागून आवाज आला....

"खरातांच्या वाड्याकडे जायचं आहे का तुम्हाला? चला मी तिथेच जात आहे."

अचानक मागून आलेल्या आवाजामुळे दचकून बाबूने मागे वळून बघितले. किनऱ्या आवाजातले ते वाक्य म्हादुने देखील ऐकले होते. पण मागे वळून बघायची त्याची हिम्मत झाली नाही. तो तसाच पुढे पुढे चालत अंधारात त्याच्या घराकडे निघून गेला. बाबूच्या मागे एक अप्रतिम सुंदर तरुणी उभी होती. तिने ख्रिश्चन लोकांसारखा काळा झगा अंगात घातला होता. हातात एक कंदील होता. असं अचानक एका सुंदर तरुणीला अशा गावात इतकं उशिरा स्वतःहून मदतीला आलेलं पाहून बाबू बावचळला आणि दोन पावलं मागे सरकला.

"चिंता करू नका. या माझ्या मागून." ती तरुणी शांतपणे  म्हणाली आणि बाबू येतो आहे की नाही हे न बघता वळून चालूही पडली.

बाबू तिच्यामागून चालताना विचार करत होता. खरातांचा वाडा दाखवायला या बाईला आपल्या बरोबर येण्याचे कारण काय असेल? रस्ता सांगितला असता तरी आपल्याला जाता आलच असत की. जणूकाही बाबूचे विचार ऐकायला यावेत अशा प्रकारे ती मागे वळली आणि म्हणाली, "माझं म्हणत असाल तर मी तिथेच असते. त्यामुळे मुद्दाम नाही येत तुम्हाला रस्ता दाखवायला." बाबू तिच्या बोलण्याने भलताच दचकला. पण काहीच झाल नाही अश्या प्रकारे म्हणाला,"अहो पण मी काहीच म्हणत नाही आहे. उलट तुम्ही मला इतकी मदत करता आहात त्याबद्दल धन्यवाद."

परत पुढे बघून चालायला सुरवात करत ती म्हणाली,"तुम्ही आभार मानून घ्या आताच. नंतर वेळ मिळेल-नाही मिळेल."

तिच ते गूढ वागणं आणि बोलणं बाबुला अस्वस्थ करत होतं. पण आता बरंच अंधारून आलं होतं. काहीच दिसत नव्हतं. गावातही पुरतं सामसूम झाल होतं. त्यामुळे तिच्याशिवाय कोणी मदत करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो काही बोलत नव्हता. सवयीचा रस्ता असल्याने असेल बहुतेक पण ती मात्र भराभर चालत होती. त्यामुळे तो मुकाट तिच्यामागे चालत राहिला.

बराच वेळ चालल्यानंतर ती अचानक थांबली. बाबुला कळेना ती अशी अचानक का थांबली. पण क्षणभराने डोळे सरावले आणि त्याला तिच्या पुढे असलेले लाकडी गेट दिसले.

"हाच खरातांचा वाडा. जा तुम्ही आत. अंधार असला तरी फर्लांगभर चाललात की वाड्याचा दरवाजा लागेल." ती त्याच्या वाटेतून बाजूला होत म्हणाली.

"अरे तुम्ही नाही येत आत?" बाबूने गोंधळून विचारले. एव्हाना त्याचं असं मत झालं होतं की ती तरुणी खरातांच्याकडे कामाला असावी आणि त्याच वाड्यात राहात असावी. त्याने आजूबाजूला बघितले पण कोणतेही घर दिसत नव्हते. 'मग ही अशी इथून कुठे जाणार?' त्याच्या मनात आले.

"मी वाड्याच्या मागच्या अंगाला असते. तुम्हाला माझी गरज न लागलेलीच बरी." ती म्हणाली आणि त्याला गेट उघडून दिले.

काही न बोलता बाबू आत शिरला आणि वाड्याच्या दिशेने चालू पडला. वाडा तसा आतच होता. त्यात आता गुडुप्प अंधार झाला होता. कुठेही नावालाही उजेड नव्हता. आजूबाजूला मोठ-मोठी झाडं होती. त्यामुळे बाबूला अस्वस्थ वाटायला लागले. परत मागे वळून गावात कोणाकडेतरी रात्र काढावी आणि सकाळी वाड्यावर जावे असे त्याच्या मनात आले. पण असा विचार करेपर्यंत तो वाड्याच्या दरवाज्यासमोर उभा होता. दारावर एक कंदील लटकत होता. त्याच्या उजेडात त्याने एकदा त्या भल्यामोठ्या दरवाज्याचे निरीक्षण केले आणि कोयंडा हलवून दार वाजवले. केवढातरी मोठा आवाज झाला. आतून खोल कुठूनतरी "कोssssण?" असा आवाज आला आणि त्याबरोबरच दरवाज्याच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचा आवाज आला.

"मी बाबू. शहरातून आलो आहे." नक्की काय उत्तर द्यावे हे न कळून बाबूने जे सुचले ते उत्तर दिले.

दरवाजा उघडला गेला; आत कंदील घेऊन एक मध्यम वयातली स्त्री उभी होती. तिच्या चेहेऱ्यावर भलताच गोंधळलेला आणि घाबरलेला भाव होता. तिने कंदील वर केला खरा पण बाबुला बघण्यापेक्षा त्याच्या मागे कोणी आहे का याचा ती अंदाज घेत होती असं बाबुला वाटलं. जेमतेम क्षणभर त्याच्याकडे बघितल-न बघितल्यासारखं करून तिने खरखरीत आवाजात बाबुला विचारलं, "कोण हवाय तुम्हाला?"

"मी बाबू." काय उत्तर द्यावे हे न सुचून बाबू म्हणाला.

"बर! मग?" तोच खरखरीत आवाज.

"मग? मग काही नाही. उमरगाव मधल्या खरातांच्या वाड्यासाठी व्यवस्थापक हवा आहे अशी जाहिरात वाचली. म्हणून मी आलो आहे." बाबूने माहिती दिली.

"हो. हवा आहे हे खरं. मग?" त्याच आवाजातला प्रश्न. नजर मात्र बाबुच्या पल्याड लागलेली.  "नोकरी मला मिळेल का ते बघायला आलो आहे. फार गरज आहे हो मला नोकरीची. मी जाहीरात आणली आहे." बाबू म्हणाला. अजून काही प्रश्न येऊ नयेत म्हणून त्याने पटकन जाहिरातीचा कागद काढून पुढे केला. बाबूने पुढे केलेला कागद तिने हातात घेतला पण त्याकडे बघितले देखील नाही. आता तिचा आवाज थोडा बदलला होता. तिने बाबुला म्हंटले,"हे बघा.. मला व्यवस्थापक हवा आहे पण त्याने बाहेर राहूनच सगळी व्यवस्था बघायला हवी. तुम्ही कधीही या वाड्याच्या आत यायचे नाही. तसा विचर देखील करायचा नाही. तुमच्या पगाराची काळजी करू नका. तो तुम्हाला महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळत जाईल." इतकं सगळं ती बोलली तरीही अजूनही तिने बाबुकडे निट बघितले देखील नव्हते. तिची नजर बाबूच्या मागेच लागली होती. त्यामुळे बाबू पुरता गोंधळून गेला होता. हे अस दाराच्या बाहेर उभं राहून बोलत रहाण्याचा त्याला आता वैताग आला होता. त्यात ती बाई त्याला आत घ्यायला तयार नसावी हे त्याच्या लक्षात आले होते. 'बाहेर राहूनच सगळी व्यवस्था बघायची;' म्हणजे नक्की काय आणि कसे करायचे... या विचाराने तो गडबडला होता. बाहेर राहायचे म्हणजे गावात का? तो तर गावात कोणालाही ओळखत नव्हता. आता उशीर देखील इतका झाला होता की परत मागे वळून गावात जागा शोधणं त्याच्या जीवावर आलं होतं. दिवसभर प्रवास आणि त्यानंतरच्या पायपिटीने तो खूप दमला होता.

 त्याने आर्जवी आवाजात म्हंटले,"वाहिनी, मला आत येऊ द्या हो. आता इतक्या उशिरा मी गावात कुठे जागा शोधायला जाऊ?"

त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्या बाई दरवाजा बंद करायला लागल्या. त्याबरोबर न कळत भांभावलेल्या अवस्थेतल्या बाबूने बंद होणाऱ्या दरवाजात पाय घातला. त्याबरोबर मागून कोणीतरी मोठ्याने हसल्याचा आवाज ऐकू आला. वाड्याच्या आतल्या त्या बाईंच्या डोळ्यात मूर्तिमंत भिती उभी राहिली आणि मग काही न बोलता त्यांनी बाबुला आत घेतले आणि दरवाजा लावून घेतला.

बाईंची इच्छा नसताही आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि कोकणातल्या इतर खऱ्या-खोट्या वंदतांमध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खरं सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण  त्या घटने नंतर मात्र खरातांच्या वाड्याच्या  दिशेने जाणंच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही.......

कथा वाचून संपली आणि चंद्रभान भानावर आला. रात्रीचा एक वाजून गेला होता. कथा वाचताना नकळत त्याने दोन पेग्स घेतले होते आणि पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. त्यामुळे चंद्रभानचे डोके फारच जड झाले होते. तो तसाच सोफ्यावर आडवा झाला आणि त्याला झोप लागली.

"तुम्ही तुमची ही कथा शोधून वाचावित म्हणूनच मी काल सकाळी तुम्हाला येऊन भेटले होते. कराल ना मदत मला? चंद्रभान! उठा ना! मी तुम्हाला चहा करून देकू का?" निशा चन्द्रभानच्या शेजारी बसून त्याला हलवत विचारात होती.

चंद्रभान दचकून जागा झाला. त्याच डोकं गरगरत होत. क्षणभर आपण कुठे आहोत आणि काय होत आहे हेदेखील त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने आजूबाजूला बघितलं. पण त्याच्या जवळ कोणीही नव्हत. डोकं गच्चं धरून तो बसून राहिला. आपण खरच आत्ता स्वप्न बघितलं की ती निशा आपल्या बाजूला बसली होती? तो सोफ्यावर बसून विचार करत होता. इतक्यात दाराची बेल वाजली आणि चंद्रभान पुन्हा एकदा दचकला. त्याने घड्याळाकडे बघितले. नऊ वाजून गेले होते. त्याने दार उघडले. दारात मीराताई होत्या. गेली अनेक वर्ष त्याच त्याच्या घरातलं सगळं काम करायच्या. त्याच्यासाठी स्वयंपाकही करून जायच्या.

आत आल्या आल्या त्यांची बडबड सुरु झाली. "साहेब मी नेहेमीसारखी  आठला येऊन गेली की. पण तुम्ही आज दार आतून लावून घेतलं होतं. म्हनून माझी चावी लागली न्हाई. बर घंटी वाजवली तरी तुम्ही दार उघडलं न्हाई. मंग मी पुढचं काम करून परत आले." मीराताईंचे हाताने काम आणि तोंडाने बडबड असं चालू झालं होतं. चंद्रभान सोफ्यावर डोकं धरून बसला होता. मीराताईंनी त्याच्याकडे बघितलं. "साहेब बरं नाही का वाटत?" त्यांनी आस्थेने विचारलं.

"ताई जरा कडक चहा करून देता का मला? डोकं दुखत आहे खूप." चंद्रभान म्हणाला.

"हो साहेब." अस म्हणून मीराताई स्वयंपाकघराकडे वळल्या. त्यांनी आत जाताच आतून चंद्रभानला विचारलं,"साहेब, कुनी आलंत का?"

चंद्रभान त्या प्रश्नाने दचकला. "का हो?" त्याने विचारलं.

"न्हाई... चहाची तयारी हित हाय ना. म्हणून म्हंनल. आलंबी बाहेर काढून ठेवलेलं दिसतय न." मीराताई म्हणाल्या.

त्यांचं बोलणं ऐकून चंद्रभान अस्वस्थ झाला. "नाही हो ताई. मीच करत होतो चहा." अस म्हणून तो आत खोलीत गेला. खोलीत त्याच्या पलंगावर काल तो वाचत असलेली कथा उघडी पडली होती आणि पानं फडफडत होती. चंद्रभानला ती कथा आत पलंगावर कोणी ठेवली हे कळत नव्हते. कारण त्याला आठवत होते त्याप्रमाणे तो कथा वाचत बाहेर सोफ्यावर बसला होता. नकळत तो त्या दिशेने वळला आणि फडफडणारी पानं त्याने हातात घेतली.

कथेचं शेवटचं पान चंद्रभानच्या समोर आलं. आणि तो शेवट वाचून चंद्रभानच्या हातातून कथा गळून पडली. तो खूप घाबरला आणि धडपडत परत बाहेर आला. कारण काल रात्री त्याने वाचलेल्या शेवटच्या ओळीच्या पुढे अजून काही शब्द उमटले होते. कितीही प्रयत्न केला तरी ते शब्द चंद्रभानच्या नजरेसमोरून हलत नव्हते...........

...........आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि कोकणातल्या इतर खऱ्या-खोट्या वंदतांमध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खरं सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण  त्या घटने नंतर मात्र खरातांच्या वाड्याच्या  दिशेने जाणंच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही.......

खरं तर चंद्रभानची कथा इथेच संपली होती. पण............. त्यापुढे उमटलेले शब्द असे होते.......आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूचं नक्की काय झालं हे तिला माहित करून घ्यायचं होतं आणि जमलं तर त्याला परत आणायचं होतं. म्हणून एकटीच निघाली होती ती... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!!

कोण असेल ही 'ती'? चंद्रभान विचार करत होता. 'का बरं तिला त्या बाबूचं काय झालं ते समजून घ्यायचं आहे? आणि ही जी कोणी ती आहे तिला कोणाबद्दल अशी खात्री आहे की तो तिच्या मदतीला जाईलच?'

"साहेब चहा." मीराताईच्या आवाजाने चंद्रभान केवढ्यांदा तरी दचकला. त्याचे ते दचकणे बघून मीराताई हसायला लागली. "साहेब, तुम्ही पन दचकता? न्हाई म्हंनल भुताखेताच्या कथा लिहिता... घरात एकटे रहाता आन खऱ्या मानसाच्या आवाजाने दचकता..... म्हंजी कमाल म्हणायची."

"ताई भय किंवा गूढ कथा लिहिणारा माणूस दचकत नाही असं तुम्हाला का वाटलं? मीसुद्धा एक माणूसच आहे ना?" चंद्रभान मिराताईंकडे बघत म्हणाला आणि त्याक्षणी आपण असाचं काहीसं निशाला म्हणालो होतो ते त्याला आठवलं.

"अवो मानुस आहात तर मानसांची मदत करा की साहेब." अस म्हणून मीराताई परत आत गेल्या.

त्या गेलेल्या दिशेने चंद्रभान काही क्षण बघत बसला. आणि मग त्याने मोठ्याने ताईंना विचारलं,"काय म्हणता आहात तुम्ही ताई? आज हे असं कोड्यात का बोलता आहात तुम्ही माझ्याशी?"

आतून काहीच उत्तर आलं नाही म्हणून चंद्रभानने अजून एकदा अजून थोड्या मोठ्या आवाजात तोच प्रश्न केला. तरी आतून शांतता. आता मात्र तो गडबडला आणि ताई गेलेल्या दिशेने दबकत दबकत जायला लागला. तेवढ्यात ताई झपकन बाहेर आल्या आणि चंद्रभान अजून एकदा दचकला. त्याच्याकडे बघत मीराताई मोठ्याने हसायला लागल्या आणि चंद्रभानला देखील हसू आले.

"काय साहेब? मी पार आत होते म्हनून एकू न्हाई आलं. काय म्हणत होतात?" मिराताईंनी हातातल्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालत चान्द्रभानला विचारले.

"तुम्ही कोणाच्या मदतीबद्दल म्हणत होतात ताई?" चंद्रभानने परत सोफ्यावर बसत विचारले.

"ती कोनी बया आली होती ना सक्काळी सक्काळी. तिला तुमची मदत हवी म्हन. मी आत येत हुतु आन ती बाहेर उभी हुती. तर मी म्हन्ली कुनाकडं? तर म्हनली तुमच्या सायबाकडं. आन मी काही बोलायच्या आत म्हन्ली सांगा सायबांना मला मदत करायला वो... एकटीच हाय आन अडकली हाय. मी म्हन्ल कोन तुम्ही बाई आन कूट अडकल्या. तर म्हन्ली सायबांना माहित हाय तुमच्या.... सांगा निशाला मदत करा. ती वाट बघती हाय. मी बर म्हनून पुढे आली." मीराताई आपल्याच नादात कपड्यांच्या घड्या घालत बोलत होत्या. पण त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक चंद्रभान अस्वस्थ होत होता. त्यांनी निशाचे नाव घेताक्षणी तो ताडकन उभा राहिला.

आज आपला साहेब हे असं का वागतो आहे त्याचा उलगडा काही केल्या मिराताईंना होत नव्हता. "काय झालं साहेब?" त्यांनी चान्द्रभानला विचारलं.

"काही नाही मीराताई. बर ते जाऊ दे. तुम्ही कोकणातल्या ना ताई?" त्याने अचानक मिराताईना विचारल.

"हो.. पार रत्नागिरीच्या पन फुड्च गाव हाय नव्ह" त्यांनी हसून चंद्रभानला म्हंटलं.

"तुम्हाला उमरगाव माहित आहे का हो ताई?" चंद्रभानने सावधपणे चेहेऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता मीराताईंना प्रश्न केला. पण तो प्रश्न एकताक्षणी कपड्यांच्या घड्या घालणाऱ्या मीराताईंचा हात थांबला. त्यांनी चन्द्रभानकडे मोठ्ठे डोळे करत बघितलं.

"तुम्हाला काहून उमरगाव माहित वो साहेब?" त्यांनी चंद्रभानच्या प्रश्नचं उत्तर द्यायचं टाळत त्यालाच उलटा प्रश्न केला.

"ते महत्वाचं नाही ताई. सांगा ना तुम्हाला माहित आहे का ते गाव?" चंद्रभानने परत एकदा प्रश्न केला.

"हो! पन माझ्या गावाकडं जातानाचा तो एक थांबा आहे या पलीकडं मला कायबी माहित न्हाई. बरं तुम्ही चाय संपवा मी दुसऱ्या कामाला जाते. नंतर यीन मी." अस म्हणत मीराताईंनी तो विषय तिथेच निदान त्यांच्यापुरता तरी संपवला. "ताई ती निशा त्याच गावची आहे. तुम्ही म्हणता आहात की मी तिला मदत केली पाहिजे. पण जर मी तिला मदत करायची तर मुळात मला तिचं आणि त्या गावाचं काय नातं आहे ते समजून घेतलं पाहिजे. जर मला तिची मदत करायला त्या उमरगावाला जावं लागणार असेल तर त्यासाठी मला त्या गावाबद्दल पण समजलं पाहिजे ना?" चंद्रभान म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून मीराताई विचारात पडल्या. चंद्रभानने त्यांना कळू दिले नाही की त्याला उमरगावाबद्दल अगोदरच माहिती आहे. कारण त्याला मीराताईंकडे काय माहिती आहे ते समजून घ्यायचे होते.

"साहेब गाव तस झ्याक हाये वो. पन म्हणतात तिथं एक वाडा हाय. गावाच्या मागल्या अंगाला. एकटाच... मोठ्ठा... कधी कुणाला तिकड गेलेलं कोणी बघिटलंच न्हाई. म्हन कोणी शहराकडचा बाबू ग्येला होता तिथं आन कधी परत आलाच न्हाई. मंग तवापासून त्या वाड्याबद्दल कोनी बोलत न्हाई. ती पोरगी तिकडची हाय व्हय? नका लागू तिच्या नादी मंग. तुम्हाला काय कराचं हाय? एक तर भूता-खेताच्या गोस्ती लिवता. नकोच ते." मीराताई म्हणाल्या. त्यांना शांत करायला म्हणून चंद्रभान 'बरं' म्हणाला. त्याच्या त्या एका 'बरं' म्हणण्याने मीराताईंचे समाधान झाले आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या. 

क्रमशः

Friday, May 22, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 1)



गूढ


भाग


चंद्रभान एक प्रथितयश  लेखक. विशेषतः भय कथा आणि गूढ कथा लिहिण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नसे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते तीन आवृत्या निघत असत. येत्या काही दिवसात त्याची टी. व्ही. वर मुलाखत दाखवण्यात येणार होती; त्यामुळे चंद्रभान खुप खुश होता. तो स्टुडियोमध्ये वेळेच्या अगोरच पोहोचला. कार्यक्रमाचा दिग्दर्शक राजन पूर्णपात्रे त्याचा मित्र होता. चंद्रभानला बघून तो खूप खुश झाला.
"ये ये भानू! लवकर बरा आलास?" राजनने त्याला मिठी मारत विचारले.

"अरे आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. वर मुलाखत आहे. त्यामुळे थोडा एक्साईट झालो आहे. राहावलं नाही म्हणून लवकर आलो. तू बिझी आहेस का? तस असेल तर तुझ्या केबिनमध्ये थांबतो मी." चंद्रभान हसत म्हणाला. राजन काही म्हणणार इतक्यात... "अरे वा! तुमच्यासारखी भय आणि गूढ कथा लिहिणारी व्यक्तीसुद्धा एक्साईट होऊ शकते?" एक नाजूक किनाऱ्या आवाजातला प्रश्न चंद्रभानच्या मागून आवाज आल्यामुळे त्याने मागे वळून बघितले.

आवाजाप्रमाणेच नाजूक आणि मोहक तरुणी त्याच्या मागे उभी होती. गुलाबी रंगाची साडी आणि स्लीव्जलेस ब्लाऊज असा तिचा पेहेराव होता. चेहेऱ्यावर हलकासा मेकप होता.

'मेकपशिवायच चांगली दिसेल ही.' चान्द्रभानच्या मनात आलं. राजनकडे वळत त्याने 'ही कोण?' असे नजरेनेच विचारले.

राजनने चंद्रभानकडे हसून बघितले आणि त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला,"निशा तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते आत्ताच विचारून घे भानुला. त्या निमित्ताने तुमची ओळखसुद्धा होईल. तुलाही गरज आहे त्याची ओळख होण्याची. भानु ही निशा बर का! आमची स्टार मुलाखतकार. असे गुगली टाकते ना एक एकदा...  तयार रहा हो तिच्या प्रश्नांना." आणि मग निशाकडे वळत तो म्हणाला,"निशा, तुम्ही दोघे इथे गप्पा मारत बसा. सगळी अरेन्ज्मेंट झाली की मी तुम्हाला बोलावून घेतो सेटवर."

"नमस्कार निशा. तुम्हाला असं का वाटलं की गूढ किंवा भय कथा लिहिणारी व्यक्ति एक्साईट होऊ शकत नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे हो." हसत हसत चंद्रभान म्हणाला आणि जवळच्याच एका खुर्चीवर बसला. अजून एक खुर्ची ओढून घेत निशा देखील त्याच्या समोर बसली; पण अजूनही तिच्या चेहेऱ्यावर हसू नव्हतं. काहीसं गूढ आणि हरवलेल्या नजरेने ती चंद्रभानकडे बघत होती.

"काय हो? अस का बघता आहात माझ्याकडे? मी कोणी भूत किंवा जादूटोणा करणारा वाटतो आहे की काय तुम्हाला? एक साधासा लेखक आहे मी फक्त." चंद्रभान हसत म्हणाला.

तरीही निशा मात्र शांत होती. ती एक टक त्याच्याकडे बघत होती. तिची नजरदेखील अजूनही गूढ... हरवलेली होती. आता मात्र चंद्रभानला तिच हे वागणं आवडलं नाही. तिच्या चेहेऱ्यासमोर टिचकी वाजवत त्याने तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या टिचकीचा परिणाम मात्र लगेच झाला. निशा एकदम खोल झोपेतून जागी व्हावी तशी दचकली आणि काहीश्या गोंधळलेल्या आणि आश्चर्यचकित चेहेऱ्याने चंद्रभानकडे बघायला लागली.

"काय हो निशाजी. कुठल्या जगात अडकला आहात? मी तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही मात्र नजर माझ्यावार रोखून कुठल्यातरी दुसऱ्याच विचारात हरवल्या आहात. सगळ ठीक आहे ना?" चान्द्रभानाने तिला विचारले.

"हो... ठीकच असावं....  मी खर तर हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे. जाऊ दे; मी कशी आहे हे फारसं महत्वाचं नाही. पण खर सांगू का...... मला आश्चर्य वाटतं की तुमच्यासारख्या तिशीतल्या तरुण व्यक्तिने हे असं भय आणि गूढ कथांमध्ये का गुंतून राहावं? मला माहित आहे की तुम्ही इतरही साहित्य लिहिता. काही रोमँटिक कथा देखील तुम्ही लिहिल्या आहात. पण तरीही तुमची ओळख गूढ किंवा भय कथा लेखक अशीच आहे. अस का? रोमँटिक किंवा इतर असं काही लेखन जास्त करावसं नाही वाटत का तुम्हाला?" निशाने चन्द्रभानला विचारलं. अजूनही ती त्याच्याकडे ऐकटक बघत होती.

"बऱ्याच वेग-वेगळ्या कथा मी लिहिल्या आहेत हे खरं आहे. पण मला गूढ आणि भय हे दोन विषय आकर्षित करतात. अशा कथा लिहिण्यात खूप थ्रील आहे हो." चन्द्रभानाने तिला म्हंटल.

"पण असे विषय तुम्हाला कसे सुचतात?" निशाने विचारले.

"कसे सुचतात ते मला नाही माहित. बस सुचतात." चंद्रभान म्हणाला. पण निशाच्या चेहेऱ्यावर उत्तराने समाधान झालं नसल्याचं त्याला दिसलं. मग हसत म्हणाला,"त्याचं असं आहे नं निशाजी की एखादी छोटीशी पण वेगळी घटना किंवा एखादी वेगळी वस्तू ..... जागा... बघितली की मला त्यातून काहीतरी गूढ असं आपोपाप दिसायला लागतं आणि मग पुढे असंच सुचत जातं. मग  लिहायला सुरवात केली ना की आपोआप कथा तयार होत जाते." चंद्रभान असाच मूडमध्ये येऊन बोलायला लागला होता. पण त्याला मध्येच थांबवत निशाने विचारले,"आपोआप तयार होते कथा? म्हणजे नक्की काय चंद्रभान?" तिचा किनारा आवाज थोडा कातर झाला होता.

तिच्या अशा कातर आवाजाने तो थोडा गोंधळला. पण मग त्याकडे दुर्लक्ष करून परत बोलायला लागला,"म्हणजे असं निशाजी की एखादी शांत जागा किंवा एखादी जुनी वास्तू बघितली की तिथे कधीतरी काहीतरी वेगळ घडलं असेल असं माझं मन मला सांगतं. मग ते काय असेल याचा विचार मी करायला लागतो आणि कागद पेन घेऊन बसलो की आपोआप सुचायला लागतं आणि मी लिहित जातो. अनेकदा तर कथा लिहित असताना माझ्या मनात शेवट वेगळाच असतो. पण कथा पूर्ण होते तेव्हा माझ मलाच आश्चर्य वाटतं कारण शेवट मी अजून काहीतरी वेगळाच लिहिलेला असतो." अस म्हणून चंद्रभान थांबला.

"आश्चर्य का वाटतं चंद्रभान?" निशाने अधिरतेने विचारले.

"निशा... मला आश्चर्य वाटतं कारण मी जो शेवट माझ्या मनात ठरवलेला असतो तो मी लिहीतच नाही. माझ्या हातात जी कथा असते तिचा शेवट काहीतरी खूप वेगळा मी न विचार केलेला असाच असतो. जसं काही तो शेवट मी लिहिलेलाच नाही." बोलता बोलता चन्द्रभानची तंद्री लागली. पण निशाच्या ते लक्षात आलं नाही. ती त्याच्या उत्तराने थोडी अस्वस्थ झाली होती. तिची नजर खाली जमिनीवर खिळलेली होती. तशीच नजर असताना ती म्हणाली,"अहो शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते; तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला असं कसं होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेलच नं?"

निशाच्या प्रश्नामुळे चंद्रभानची तंद्री भंगली. मुळात तंद्रीमध्ये असल्याने ती काय म्हणाली ते त्याला समजलं नव्हतं. पण माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं असं म्हणणं वाईट दिसेल असं वाटून त्याने तिच्या हो ला हो केलं. मात्र त्याच्या त्या एका 'हो'मुळे निशा एकदम खुश झाली.

"तुम्हाला माहित नाही चंद्रभान पण तुमच्या या एका 'हो' ने मला किती मोठा दिलासा दिला आहे. कधी कधी काही शेवट अर्धवट असतात. त्यामुळे अनेक जीव अडकून राहातात नाही का? पण आता मला खात्री आहे की असं होणार नाही.  आता माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की मिळेल. आता मी उमरगावला जायला मोकळी झाले. " निशा मनापासून हसत चंद्रभानला म्हणाली.

आपण नक्की कशाला 'हो' म्हणालो आहोत याची चंद्रभानला अजूनही कल्पना नव्हती. आणि अचानक मुलाखती संदर्भातले प्रश्न विचारायचे सोडून ही निशा हे असं कुठेतरी जाण्याबद्दल का बोलायला लागली हे देखील त्याला कळलं नव्हतं. 'उमरगाव? कुठेतरी ऐकलं आहे हे नाव!' चंद्रभानच्या मनात आलं. त्याबद्दल निशाला विचारावं म्हणून चंद्रभान तिच्याकडे वळला आणि तेवढ्यात राजनचा असिस्टंट तिथे आला आणि म्हणाला,"निशा काम झालं आहे. चल."

"हो! आलेच मी वैभव. तू हो पुढे." निशा चंद्रभानची नजर चुकवत म्हणाली. निदान अस चंद्रभानला वाटलं.

"नाही नाही. तुला पुढ्यात घालून घेऊन यायला सांगितलं आहे. चल तू माझ्याबरोबर." वैभव अगदी तिच्या शेजारी उभा राहून म्हणाला.

"इतका वेळ गेला तरी माझी  आठवणसुद्धा नव्हती तुम्हाला. आणि आता काम  झाल्यावर एका क्षणाची फुरसत नाही काय?" ती थोडी वैतागत म्हणाली. "बरं! माझी मी पोहोचेन. तू यांना घेऊन जा." असं म्हणून ती बाजूच्या दारातून निघून गेली.

"सर, तुम्ही चला माझ्या बरोबर." क्षणभर निशा गेली त्या दिशेने बघून वैभव चंद्रभानकडे वळून म्हणाला आणि चंद्रभानदेखील त्याच्या मागे निघाला.

चंद्रभान काही न बोलता वैभवच्या मागोमाग सेटवर आला. ते दोघे तिथे पोहोचले पण सेट वरचे सगळेच दिवे बंद होते. "अरे सगळे दिवे का बंद आहेत कळत नाही. मी आलो तेव्हा सेटवर लखलखाट होता. सर तुम्ही इथेच थांबा. मी बघून येतो. काहीतरी घोटाळा झालेला दिसतो आहे. कुठेतरी शॉर्ट सर्किट असेल. राजन सर वैतागले असतील. मी आलोच." अस म्हणून आणि चंद्रभानला काही लक्षात यायच्या आत वैभव गायब झाला.

चंद्रभानला काही कळले नाही. तो बराच वेळ तिथे थांबला. पण त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल आजूबाजूला जाणवत नव्हती. सेट जर तयार असेल आणि फक्त दिवे बंद असतील तर मग कोणी एकमेमांशी बोलत का नाही; याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. शेवटी अंधारात उभं राहून वैतागलेला चंद्रभान राजनला हाक मारत पुढे सरकला. नवीन-अनोळखी जागा  असल्याने त्याला नक्की कुठे जावं ते लक्षात येत नव्हतं.

"राजन... राजन.... अरे भय कथा मी लिहितो तू नाही. हे असे दिवे बंद करून तू मला घाबरवायचा प्रयत्न तर करत नाहीस ना?" राजनला हाक मारत आणि काहीसं मोठ्याने बोलत चंद्रभान पुढे सरकत होता. अचानक त्याचा धक्का कशाला तरी लागला आणि मोठ्ठा आवाज झाला. चंद्रभान देखील चांगलाच धडपडला. झालेल्या आवाजाने एकदम अनेकजण तिथे आले. कोणीतरी दिवेसुद्धा लावले. त्याठिकाणी एकदम लखलखाट झाला. चंद्रभानला खाली पडलेला बघून राजनला खूप आश्चर्य वाटले.

"अरे चंद्रभान तू कधी आलास? बरं, आलास तर सरळ माझ्या ऑफिसमध्ये यायचं नं. इथे या बंद सेटवर काय करतो आहेस?" त्याला उठायला मदत करत राजन म्हणाला.

"राजन काय चेष्टा चालवली आहेस? अरे मी कधीच आलो आहे. तुझ्या ऑफिसमध्ये आपण भेटलो. मग तू सेट लावायला गेलास तेव्हा निशाला माझ्या बरोबर सोडून गेलास. आम्ही गप्पा मारत होतो तर तुझा असिस्टंट वैभव आला बोलवायला. निशा बहुतेक तयार व्हायला गेली असेल. मी तुझ्या त्या वैभव बरोबर इथे आलो. पण इथे अंधार होता. त्याचं कारण शोधायला म्हणून तो वैभव मला इथेच सोडून गेला. मी बराच वेळ थांबलो पण काहीच हालचाल नाही वाटली. कोणी इथे आहे की नाही ते देखील कळत नव्हते. बरं तुला सोडून मी इथे कोणालाही ओळखत नाही. म्हणून मग तुला हाक मारत पुढे सरकलो तर धडपडलो." चंद्रभान राजनला म्हणाला.

चंद्रभान जे सांगत होता त्यामुळे राजनला खूप आश्चर्य वाटलं. पण इतरांच्या मनात काही येऊ नये म्हणून त्याने चंद्रभानचा हात धरला आणि म्हणाला,"बरं बरं... चल. जरा चहा घेऊ. मग सुरु करू तुझी मुलाखत." आणि त्याला घेऊन परत आपल्या केबिनच्या दिशेने निघाला.

केबिनमध्ये शिरताच राजनने चंद्रभानला सोफ्यावर बसवले आणि विचारले,"हा आता बोल. हे काय  चालवालं आहेस तू? कोणत्यातरी गूढ कथेचा काहीतरी प्लॉट मनात आहे का? त्याचा प्रयोग तू माझ्यावर करून बघतो आहेस का?"

"मी? मी काय चालवालं आहे? म्हणजे काय राजन? काय म्हणायचं आहे तुला नक्की?" राजनच्या भडीमराने गोंधळून चंद्रभान म्हणाला.

"तू बाहेर काय म्हणत होतास चंद्रभान? निशा तुला भेटली? वैभव बोलवायला आला होता? तू कसं ओळखतोस निशाला आणि त्या वैभवला?" राजनने चंद्रभानला विचारले.

"मी कसं ओळखतो? अरे तूच ओळख करून दिलीस ना निशाशी आता थोड्या वेळा पूर्वी इथेच तुझ्या ऑफिसमध्ये." चंद्रभान वैतागत म्हणाला.

"मी? भानू... अरे मी कधी ओळख करून दिली तुझी?" राजन आश्चर्याने म्हणाला.

राजनच्या बोलण्याने चंद्रभानच्या लक्षात आले काहीतरी गडबड होते आहे. त्यामुळे तो एकदम शांत झाला आणि म्हणाला,"राजन काहीतरी गैरसमज होतो आहे दोघांचाही. काय घडलं ते मी सांगतो आणि मग तुला काय माहित आहे ते तू सांग. ठीक?"

"ठीक आहे." राजनने मान्य केले.

"तर असं झालं आहे की मी आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. इंटरव्यू देणार असल्याने थोडा एक्साईट होतो. म्हणून तू सांगितलेल्या वेळेच्या अगोदरच आलो; काही वेळापूर्वी. इथेच तुझ्या केबिनमध्ये आपली भेट झाली. तू माझ्याशी बोलत असताना इथे निशा आली. तू मला तिची ओळख करून दिलीस की ती तुमची स्टार मुलाखतकार आहे आणि माझी मुलाखत देखील तिच घेणार आहे. मग तू तिला म्हणालास की माझी चांगली ओळख व्हावी महणून आम्ही दोघांनी इथे बोलत बसावं आणि पुढची तयारी करायला म्हणून तू  गेलास. आम्ही दोघे इथे गप्पा मारत बसलो होतो. थोड्यावेळाने वैभव इथे आला. निशाने त्याचे नाव घेतले म्हणून मला कळले त्याचे नाव. तर... तू आम्हाला बोलावले आहेस असे त्याने म्हंटले. बहुतेक निशाला मेकअप करायचा होता म्हणून मग ती या इथल्या दाराने आत गेली आणि मी वैभव बरोबर बाहेर पडलो. सेटवर आम्ही पोहोचलो तर अंधार होता. काहीतरी शॉर्टसर्किट झालं असेल अस म्हणून वैभव गेला. जाताना म्हणाला देखील की तू रागावशील. त्याने मला तिथेच उभं राहायला सांगितलं म्हणून मी थोडावेळ उभा राहिलो. पण कोणतीच हालचाल जाणवत नव्हती किंवा कोणाचाही आवाज येत नव्हता. म्हणून मग मी तुला हाक मारत थोडा पुढे सरकू लागलो आणि धडपडलो. झालेल्या आवाजाने तुम्ही सगळे तिथे आलात.... पुढचं तुला माहीतच आहे." चंद्रभान म्हणाला.

राजन चंद्रभानचं बोलणं शांतपणे ऐकत होता. चंद्रभानच्या प्रत्येक वाक्यागणिक त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य फुलत होत. चंद्रभान बोलायचा थांबला आणि राजन म्हणाला,"चंद्रभान................. हे सगळ आत्ता झालं? तू मला काही वेळापूर्वी इथेच भेटला होतास असं तुझ म्हणणं आहे का? मी तुझी आणि निशाची ओळख करून दिली? मग तुम्हाला सोडून मी सेटवर गेलो? मी वैभवला पाठवलं?"

आता मात्र चंद्रभान पूर्ण वैतागला आणि म्हणाला, "राजू, अरे मी तुला जे घडलं ते सगळं तसंच्या तसं सांगितलं ना? मग हे असे परत परत तेच प्रश्न विचारून तू मला परत तेच सांगायला का लावतो आहेस?"

"मी तुला परत परत तेच विचारतो आहे भानू; पण तू तेच परत सांगू नयेस असं मला वाटतं आहे............ कारण तू जे म्हणतो आहेस तसं काहीही घडलेलं नाही. मी सकाळपासूनच स्टुडियोच्या दुसऱ्या कोपऱ्यात काम करतो आहे. कारण तुझ्या मुलाखतीसाठी फार मोठा सेट लावायची गरजच नाही. मी माझ्या दुसऱ्या एका सिरीयलच्या सेटची तयारी करतो होतो. बरं........ त्याहूनही महत्वाचं म्हणजे निशाला माझ्याकडचं काम सोडून अनेक महिने झाले आहेत. महत्वाचं म्हणजे वैभव नावाचा माझा कोणी असिस्टंट नाहीच आहे." राजन चंद्रभानकडे एकटक बघत म्हणाला.

हे ऐकताच चंद्रभानला मोठा धक्का बसला. "राजू........... अरे.............. तू काय बोलतो आहेस?" चंद्रभान सुन्न झाला.

चंद्रभानची अवस्था बघून राजनला काळजी वाटली. त्याच्या हातावर थोपटत राजनने विचारले,"भानू बरा आहेस नं तू? अरे काहीतरी भास झाला असेल तुला. जाऊ दे. मी आत येतानाच दोन कॉफी पाठवायला सांगितल्या आहेत. मस्त कॉफी घेऊ या आणि मग तुझा इंटरव्यू घेऊया. ठीक?"

"राजू आज इंटरव्यू नको प्लीज. मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. मी घरी जातो." अचानक अस्वस्थ होत चंद्रभान म्हणाला.

त्याची एकूण मानसिक स्थिती बघून राजनने देखील त्याला आग्रह केला नाही. " ठीक. इंटरव्ह्यू काय कधीही होईल. तू जाऊ शकशील ना एकटा? की माझ्या गाडीने जातोस? माझा ड्रायव्हर सोडेल तुला.  मी सगळं काम आटपलं की तुझी गाडी घेऊन तुझ्या घरी सोडायला येतो. तेव्हा गप्पा मारू." राजन म्हणाला.

"ठीक! तुझ्याच गाडीने जातो मी. रात्री नक्की भेटू. अच्छा." चंद्रभान म्हणाला आणि कॉफीची वाटही न बघता राजनच्या गाडीत बसून निघून गेला.

रात्री साधारण दहा साडेदहाच्या सुमाराला राजन चंद्रभानच्या घरी पोहोचला. चंद्रभान त्याचीच वाट बघत होता. "खूप उशीर झाला रे तुला राजू? सध्या कसलं शूटिंग चालू आहे तुझं?" उगाच काहीतरी विचारायचं म्हणून चंद्रभानने विचारलं आणि राजनला बसायला सांगून तो बारच्या दिशेने वळला. "काय घेणार ते बोल. एक मस्त स्कॉच आणली आहे. नवीनच आहे; उघडतो. काय?"

"नको भानू. तू बस बघू माझ्या शेजारी. मला तुझ्याशी बोलायचं आहे." चंद्रभानला अडवत आणि त्याचा हात धरून आपल्या शेजारी बसवत राजन म्हणाला. "त्यात मला देखील अजून एका पार्टीला जायचं आहे."

"अरे तुला यापुढे पार्टी आहे? बापरे! बर मग तू निघ हव तर. आपण काय उद्या बोलू." चंद्रभान म्हणाला.

"नाही. मला तुझ्याशी बोलायचंच आहे." राजन आग्रहाने म्हणाला.

त्यावर हसत चंद्रभान म्हणाला,"बर बोल. माझी काही हरकत नाही."

"भानू; अरे आज सकाळी जे काही घडलं ते तुला विचित्र नाही वाटत का?" राजनने अस्वस्थ होत चंद्रभानला विचारले.

"विचित्र? नाही. थोड वेगळं वाटलं मला. पण असं काळजी करण्यासारखं काही वाटलं नाही. त्यावेळी मी थोडा गोंधळलो होतो. पण आता नाही."चंद्रभानच्या चेहेऱ्यावर हसू होते.

"याचा अर्थ तू खोटं बोलत होतास ना सकाळी? तू त्या सेटवर मला भेटलास तेव्हाच आला होतास ना तू तिथे?" राजनने चंद्रभानचा हात धरून त्याला विचारले.

त्यावर चंद्रभान क्षणभर राजनकडे टक लावून बघत राहिला आणि मग अचानक खो-खो हसत सुटला. आता मात्र राजनचा धीर सुटायला लागला.

"अरे असा हसतो का आहेस? काय ते निट सांग बघू मला. तू सकाळी खोट बोलत होतास ना?" राजनने चिडून चंद्रभानला विचारले.

त्यावर अजून गडगडाटी हसून चंद्रभानने होकारार्थी मान हलवली. आणि आपलं हसू आवरत म्हणाला,"अरे राजू; थोडी गम्मत केली तुझी तर तू इतका अस्वस्थ झालास? जर असं खरंच घडलं असतं तर बहुतेक तुझी चड्डीच फाटली असती. चल विसर ते आणि निघ बघू आता. नाहीतर अजून उशीर होईल तुला तुझ्या पार्टीला."

त्यावर सुटकेचा निश्वास टाकत राजन उठला आणि "साल्या ही कसली चेष्टा रे?" असं म्हणत निघाला. दारापर्यंत जाऊन मात्र तो गरकन मागे वळला मोठे डोळे करत चंद्रभानला त्याने विचारले,"जर तू खोटं बोलत होतास भानू तर मग तुला निशाबद्दल कसं कळलं?"

"राजू; अरे मी सकाळी तुझ्याकडे यायला निघालो त्यावेळी तुझ्या सेटच्या अगोदरच्या सेटवर निशा मला भेटली. जाम सुंदर आहे रे ती. मला बघून स्वतः बोलायला आली. तिनेच मला सांगितलं की ती अगोदर तुझ्याकडे काम करत होती. पण आता नाही. मग मला हे सुचलं आणि तुझी गम्मत करावी म्हणून मी हे नाटक केलं. तिचा नंबर मी घेतला आहे. काही निरोप आहे का तिला? असेल तर मला सांग. त्या निमित्ताने तिला फोन करीन म्हणतो." डोळा मारत चंद्रभान म्हणाला.

"भानू... तू खरं बोलतो आहेस नं? निशा तुला भेटली? खरंच?" राजनने डोळे बारीक करत चन्द्रभानला विचारले.

"कमाल करतोस राजू. नाहीतर निशा नावाची तरुण सुंदर मुलगी तुझ्याकडे काम करते असं मला स्वप्न पडेल का? असं का विचारतो आहेस तू?" चंद्रभान काहीसा मनात गोंधळा होता पण वरकरणी मात्र शांतपणे म्हणाला.

"भानू देव करो आणि तू म्हणतो आहेस तेच खरं असो. कारण निशा जेव्हा तिचा राजीनामा द्यायला आली होती तेव्हा मी तिला विचारले होते की दुसरीकडे कुठे अजून चांगला पगार मिळतो आहे म्हणून सोडते आहेस का? तर म्हणाली नाही.. तिला तिच्या गावाला जायचे ठरवले होते. काहीतरी घडलं होत म्हणे; आणि त्याचा शेवट तिला स्वतःलाच करायला लागणार होता, अस तिचं म्हणणं होतं.  मी तिला खूप समजावले होते असं अचानक चांगली नोकरी सोडून जाऊ नकोस. तुला खूप प्रोस्पेक्ट्स आहेत इथे. सुंदर आणि हुशार मुलींची आमच्या इंडस्ट्रीमध्ये वानवाच आहे. हवं तर सुट्टी घे काही दिवसांची. तू खूप चांगलं काम करते आहेस; त्यामुळे तुला सुट्टी मिळेल. गावाकडेचं काम झालं की ये परत. पण तिने ऐकले नाही. म्हणाली परत आलेच तर नक्की येईन तुमच्याचकडे. पण परत येईन की नाही ते मलाच माहित नाही. मला कळलंच नाही ती नक्की काय म्हणत होती. पण मग मी अजून काही नाही विचारलं तिला. कदाचित तिला अवडलं नसतं. उगाच कशाला कोणाच्या वयक्तिक गोष्टीत लक्ष घालायचं? परत आलीस तर जरूर ये अस म्हंटल होतं. तरीही ती माझ्याकडे आली नाही आणि दुसरीकडे जॉईन झाली... आणि ते ही तू सांगतो आहेस तेव्हा कळलं. ठिक! तिची इच्छा." राजनने चंद्रभानला सांगितले.

"तिने तिच्या गावाला जाण्यासाठी नोकरी सोडली? कमाल आहे!"चंद्रभान म्हणाला.

"अरे मला देखील आश्चर्य वाटलं होतं. मुख्य म्हणजे एकीकडे ती म्हणत होती की फक्त काहीतरी काम आहे आणि तरीही ती परत येईल की नाही ते तिलाच माहित नव्हतं. हे थोड विचित्र वाटलं मला." राजनने माहिती दिली.

एकूण राजन जे सांगत होता ते एकून चंद्रभान थोडा विचारात पडला. पण ते राजनच्या लक्षात आल नाही. तो आपल्याच नादात निघाला. राजनने दार उघडले आणि चंद्रभान भानावर आला. "अरे राजू; तिच्या गावाचं नाव काय म्हणालास रे?" त्याने बाहेर पडणाऱ्या राजनला विचारले.

"गावाचे नाव? सांगितलं होतं खरं तिने...... एक मिनिट.... हा ...... उमरगाव का नगर  असं काहीसं होतं."असे म्हणून राजन घराबाहेर पडला.

राजन गेला. त्याच्या शेवटच्या वाक्याने चंद्रभानला धक्का बसला होता. चंद्रभान विचारात पडला. कारण तो राजनशी खोट बोलला होता. त्याचा सकाळचा अनुभाव त्याच्या इतकाच सच्चा आणि खरा होता. याचा काय अर्थ असू शकतो? चंद्रभानने आजवर अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्याचा कल भय कथा आणि गूढकथांकडेच जास्त होता. पण सकाळी आलेल्या अनुभवाने त्याला पुरतं गोंधळवून टाकलं होतं. त्यात जाता जाता राजनने ज्या गावाचा उल्लेख केला होता... सकाळी भेटलेल्या त्या निशाने त्याच गावाचा उल्लेख केला होता. हा योगायोग नव्हता. हे नक्की काय चाललं आहे ते चंद्रभानला कळत नव्हतं. मात्र सकाळी  आलेला अनुभव खरा होता याची त्याच्या मनाला खात्री होती. त्यामुळे तो अनुभव येण्यामागे काहीतरी कारण असणार असं त्याला प्रकर्षाने वाटत होतं. त्यामुळे वेळ न घालवता त्याने स्वतः लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या ठेवलेले कपाट उघडले आणि उमरनगर किंवा उमरगाव असा उल्लेख असलेली कथा शोधायला सुरवात केली.

खूप शोधल्यानंतर चन्द्रभानला ती कथा मिळाली. त्याच्या खूप सुरवातीच्या कथांमधली ती एक अत्यंत लहान अशी कथा होती. आता त्याला ती फारशी आठवत देखील नव्हती कारण त्यावेळी तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि एक आवड म्हणून अधून मधून कथा लिहित होता. ती कथा देखील त्याला सुचली होती कारण मित्रांबरोबर रत्नागिरीला जाताना मध्ये एक उमरगाव थांबा लागला होता. त्यावेळी एका मित्राने तिथेल्या वाड्याचा उल्लेक करून त्याबद्दलच्या काही वंदता सांगितल्या होत्या. आणि मग एक गम्मत म्हणून त्याने ती कथा लिहिली होती. कथा मित्राने वाचली होती आणि चांगली आहे म्हणून चंद्रभानच्या मागे लागून त्याला ती एका मासिकाकडे पाठवायला लावली होती. कशी कोणजाणे पण ती छापून आली होती. खर तर चंद्रभानच्या अगदी सुरवातीच्या काळात.... म्हणजे लेखकच व्हायचं असा केवळ मनात विचार होता........ त्यावेळी छापून आलेली ती कथा होती. ती कथा मिळाली आणि त्यानुषंगाने चंद्रभानला मागील सगळं आठवलं. या कथेचा आणि आजच्या सकाळच्या अनुभवाचा काहीतरी संबंध असावा असं त्याला वाटायला लागलं. पण त्याला अजूनही ती कथा पूर्ण आठवत नव्हती. म्हणून मग त्याने आपलीच कथा परत एकदा वाचायला घेतली.

क्रमशः

Friday, May 15, 2020

हेवा (शतशब्द कथा)


मिसळपाव हे इंटरनेट वरील एक मराठी वाचकांसाठीचे उत्तम संस्थळ आहे. या संस्थळाची मी गेली काही वर्षे सभासद आहे. या संस्थळावर अनेक स्पर्धा होत असतात. त्यातीलच एक 'शतशब्द कथा स्पर्धा.' या स्पर्धेत मी याअगोदर देखील भाग घेतला आहे. मात्र यावेळच्या स्पर्धेमध्ये माझी 'हेवा' ही शतशब्द कथा द्वितीय क्रमांकावर आली; हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. तीच कथा आज तुमच्यासमोर सादर करते आहे.

###############

हेवा

उर्वशीचं रात्री उशिरा येणं, उशिरा उठणं, नवऱ्याने तिची सरबराई करणं... राधा खिडकीतून बघायची आणि तिच्या सुखाचा हेवा करायची. ते सुख मिळावं म्हणून मनोमन प्रार्थना करायची.

एक दिवस राधा उर्वशीच्या कायेत शिरली. आज राधेने उशिरा उठून नवऱ्याने केलेला नाष्टा आरामात खाल्ला. दिवसभर तो काम करत होता आणि राधा आराम करत होती. संध्याकाळ झाली; नवऱ्याने राधेला तयारी करायला सांगताच ती खुशीत तयार झाली. एक गाडी येऊन राधेला घेऊन गेली.

रात्री उशिरा घरी परतताना राधेला स्वतःचीच किळस वाटत होती. शरीर उर्वशीचं असलं तरी मन तर राधेचं होतं. दार उघडताच नवऱ्याने पैशांसाठी हात पसरले आणि समोरच्या घरातून तिच्याकडे बघणाऱ्या उर्वशीकडे बघत राधेने डोळे पुसले....

Friday, May 8, 2020

पिंजऱ्यातली अंबा!

पिंजऱ्यातली अंबा

हो! मी अडकले आहे या पिंजऱ्यात. तुम्हाला नाही कळणार ते... कारण तुम्हाला अंबा म्हणजे पितामह भीष्मांच्या मृत्यूचे कारण होणारी स्त्री! इतकेच माहीत आहे. अर्थात त्या अनुषंगाने माझ्याबद्दल महाभारतात जे सांगितलं आहे; ते देखील माहीत असेलच.

मी काशी राजाची ज्येष्ठ मुलगी. माझ्या दोन भगिनी अंबिका आणि अंबालिका. ज्यांनी काहीही न बोलता हस्तिनापूरचे महाराज विचित्रविर्य यांच्याशी विवाह केला. आम्हाला जिंकून आणलं होतं हस्तिनापुराचे रक्षणकर्ते पितामह भीष्मांनी... मात्र विवाह झाला महाराज विचित्रविर्यांशी. मी नाकारला हा प्रस्ताव. कारण मी आणि शाल्व नरेश विवाह करणार होतो. प्रेम होतं आमचं एकमेकांवर. मी हे सांगताच माझी आदरपूर्वक पाठवणी देखील केली महाराज विचित्रविर्यांनी. पण शाल्व नरेशने नकार दिला मला; 'भीष्मांनी तुला जिंकून नेलं आहे. आता मी तुझा स्वीकार करणे म्हणजे भीक स्वीकारण्या प्रमाणे आहे. ते मला कदापि मान्य नाही.' अस म्हणाला तो. त्यावेळी 'आता कुठे जाऊ? या त्रिकाल खंडात कोण आहे माझं?' असा प्रश्न मला पडला. त्यावर 'जा भीष्मांकडे आणि त्यांनाच तुझा स्वीकार करण्यास सांग'; असे शाल्व नरेश म्हणाले आणि मला ते शब्दशः पटले. मी तशीच मागे फिरले आणि सरळ भीष्मांसमोर जाऊन उभी राहिले आणि म्हणाले 'शाल्व नरेशाने माझ्याशी विवाह करणे नाकारले कारण तुम्ही माझे विवाह मंडपातून अपहरण केलेत. त्यामुळे आता माझ्याशी विवाह करणे ही तुमची जवाबदारी ठरते.' मात्र 'मी कायम अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली आहे;' असे म्हणून त्यांनी माझ्याशी विवाह करण्यास नकार दिला. विवाह वेदीपासून सतत होत असणाऱ्या या अपमानांनी मी वेडीपिशी झाले. माझ्या या अपमानांचे कारण केवळ आणि केवळ भीष्म होते.... आणि म्हणूनच मी देखील तिथेच भर सभेत एक प्रतिज्ञा केली.... 'मी भीष्मांच्या मृत्यूचे कारण बानेन'; आणि तात्काळ तेथून निघाले.

अगोदर मी परशुरामांकडे गेले आणि माझ्या अपमानाची काहाणी त्यांना सांगितली. त्यांनी मला वचन दिले की ते मला न्याय देतील. भीष्म परशुरामांचे शिष्य होते; त्यामुळे परशुरामांनी बोलावून घेताच ते ताबडतोप तेथे आले. मात्र माझ्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला. गुरू असूनही भीष्मांनी आपली आज्ञा अमान्य केलेली ऐकून परशुरामांनी त्यांना युद्धासाठी आव्हान दिले. दोघांचे तेवीस दिवस घनगोर युद्ध झाले; परंतु निर्णय होत नव्हता. शेवटी ते युद्ध थांबले. मला इथे न्याय मिळणार नाही; हे लक्षात येऊन मी तेथून देखील निघाले.

मी घोर अरण्यात प्रवेश केला आणि श्री शंकर भगवनांना मनात ठेऊन तप केले; असा किती काळ लोटला माहीत नाही पण माझ्या हट्टाला यश आले आणि श्री शंकर भगवान माझ्यासमोर अवतीर्ण झाले. माझ्या मनातील भीष्मांबद्दलचा राग अजूनही तेवढाच उग्र होता. त्यामुळे मी श्री शंकर भागवानांकडे एकच मागणी केली;'भीष्मांच्या मृत्यूचे कारण मला व्हायचे आहे.' ते 'तथास्तु' म्हणून अंतर्धान पावले..... आणि माझा पुनर्जन्म झाला; द्रुपद देशाचे नरेश द्रुपदराज यांच्या कांपिल्य नगरीमध्ये. मला मिळालेल्या वरामुळे मी माझा मागील जन्म विसरले नव्हते. मात्र एका मुलीच्या जन्मामुळे महाराज द्रुपद मात्र दुःखी झाले होते; कारण त्यांना देखील कौरव-पांडवांचे गुरू द्रोण यांनी त्यांच्या केलेल्या अपमानचा बदला घेण्यासाठी पुत्र हवा होता. त्यामुळेच की काय त्यांनी मला एका मुलाप्रमाणे वाढवण्यास सुरवात केली. शस्त्र-शास्त्र विद्या, घोडेस्वारी, पिसाळलेल्या हत्तीला काबूत आणणे.... एका राजकुमाराप्रमाणे माझे शिक्षण चालू होते.

मी वयात आले होते... मात्र नगरवासीयांसाठी मी राजकुमार होते आणि म्हणूनच आता माझा विवाह होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे माझा विवाह दशार्णराज हिरण्यवर्मा यांच्या कन्येशी झाला. मात्र विवाहाच्या पहिल्याच रात्री माझ्या पत्नीस सत्य समजले आणि ती परत तिच्या पित्याकडे निघून गेली. आता हिरण्यवर्मा आक्रमण करणार याची मला कल्पना आली. माझ्या स्त्री असण्यामुळे माझ्या पित्याला मान खाली घालण्याची नामुष्की सहन करावी लागेल या विचाराने मी त्यारात्रीच कांपिल्य नगरी सोडून वनात निघून गेले. मात्र तेथे माझी भेट स्थुणाकर्ण यक्षाशी झाली. माझी कथा ऐकून त्याने एका रात्रीपुरते त्याचे पौरुष्य मला बहाल केले आणि मी कांपिल्य नगरीत परतले. मला पुरुष रुपात पाहून महाराज द्रुपद आणि दशार्णराज हिरण्यवर्मा समाधान पावले आणि येणारे अरिष्ट टळले. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर मी एका दिवसासाठी मिळालेले पौरुष्य परत करण्यास परत एकदा यक्ष स्थुणाकर्णला भेटण्यास गेले.

तेथे यक्ष स्थुणाकर्ण दुःखी कष्टी होऊन बसला होता. मी कारण विचारले असता तो म्हणाला मी निघाले आणि त्याच्या वनात यक्षराज कुबेर आले होते. यक्षराजांना न विचारता स्थुणाकर्णने पौरुष्य दानाचा घेतलेला निर्णय यक्षराजांना आवडला नव्हता आणि त्यांनी त्याला शाप दिला की 'आता श्रीखंडी मरेपर्यंत तुला स्त्रीरूपातच राहावे लागेल;' खरं तर मला मदत करायला गेलेल्या स्थुणाकर्ण यक्षाला शाप मिळाला हे ऐकून मला वाईट वाटले; पण क्षणभरच! याचा अर्थ आता मी माझ्या मृत्यूपर्यंत हे पुरुषाचे शरीर घेऊन वावरणार होते; याचा मला मनात कुठेतरी आनंद झाला होता. अर्थात हा आनंद पुढे जाऊन किती दुःख देणार होता याची मला त्याक्षणी कल्पना नव्हती.

पुढे माझ्या पित्याने महाराज द्रुपदनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला आणि या यज्ञातून माझी शामवर्णी कोमलांगी अत्यंत सुंदर आणि त्याहूनही जास्त हुशार अशी भगिनी द्रौपदी आणि माझा शूर आणि सर्व शस्त्र-शास्त्र पारांगत भाऊ दृष्टदृमन्य प्रगटले. हळूहळू सभोवतालची परिस्थिती बदलत गेली. कौरव-पांडवांमधील वाद वाढत होता. कौरवांनी पांडवांना जाळून मारल्याची खबर पसरली; काही दिवसात माझ्या भगिनीच्या विवाहाची तयारी आम्ही सुरू केली. विवाहदिनी एका ब्राम्हण कुमाराने तिला जिंकले... त्यावेळी मी तिथेच होते.

माझे रूप पुरुषाचे असले तरी मी मनाने स्त्रीच होते न! माझ्या भगिनीच्या विवाहासाठी ठरवलेला पण सोपा नव्हता. तो जिंकण्यासाठी ज्यावेळी तो ब्राम्हणकुमार उभा राहिला त्याचवेळी माझ्या स्त्री नजरेने त्याला ओळखले होते. अत्यंत सुदृढ आणि बलदंड पिळदार बाहू, उत्तरियामध्ये लपवायचा प्रयत्न केला तरी लक्षात येणाऱ्या युद्धभूमीवर झालेल्या जखमांच्या खुणा... ते कणखर पौरुष्य.... मी भान हरपून अनामिष नेत्रांनी न्याहाळत होते त्याला. 'कोणत्याही स्त्रीला हवासा वाटशील असा आहेस तू;' माझ्या स्त्रीमनाने त्याला साद घालून म्हंटले..... आणि... आणि त्याक्षणी मला सत्याची जाणीव झाली. मी एक पुरुष होते आणि दुसऱ्या एका पुरुषाला असे आसक्तीपूर्ण नेत्रांनी पाहाणे योग्य नव्हते. मी कष्टाने माझी नजर त्याच्यावरून बाजूला वळवली आणि त्या काही क्षणात त्याने पण जिंकला. माझ्या भगिनीने त्याला वरले आणि पुढे माझ्या स्त्री मनाने मला जे सांगितले तेच खरे ठरले. तो ब्राम्हणकुमार अर्जुन होता.

माझ्या भगिनीला पांडवांच्या मातेच्या आज्ञेवरून पाचही भावांना वरावे लागले. पुढे कधीतरी श्रीकृष्णाशी मी सहज बोलत होते त्यावेळी त्याने सांगितले की यज्ञासेनी सुरवातीस पाचही जणांना वरण्यास तयार नव्हती.... आणि एका क्षणासाठी मला तिचा हेवा वाटून गेला..... हो! मला.... हेवा वाटला.... कारण इतरांसाठी हा श्रीखंडी पुरुष असला तरी त्याचं मन तर एका स्त्रीचं आहे न.... माझं... या अंबेचं!

द्रौपदी विवाहानंतर पांडव परत हस्तिनापुराला परतले होते आणि त्यांचा हक्क असूनही महाराज धृतराष्ट्रांनी त्यांना खांडववन हा घोर अरण्याचा भाग देऊन त्यांच्यावर अन्याय केला. तरीही ते शूरवीर पुरुष मागे हटले नाहीत. त्यांनी तेथेच इंद्रप्रस्थ उभे केले. मयसभा तर शब्दातीत होती. यज्ञ संपन्न होताना पांडवांनी सर्वांनाच आमंत्रण केले; तसे ते कौरावांना देखील केले. कौरवांसोबत आलेले इतर रथी, महारथी, योध्ये, वीर सर्वच मयसभा पाहण्यासाठी आले होते. दुर्योधनासोबत अंगराज कर्ण होता. मी काही अतिथींना मयसभेतील खास रचना सांगत त्यांच्या सोबत फिरत होते. समोरूनच दुर्योधन आणि अंगराज येत होते. कर्णाचे ते दमदार पावले टाकीत चालणे, त्याची ती लखाखती अंगभूत कुंडले, सोनपिवळी तकाकणारी कवचधारी कांती, त्याचे ते पौरुष्यपूर्ण शरीर.... खरं सांगू? अंगराज कर्णाला पाहून मी सोबतच्या अतिथींना विसरून गेले. मोहून गेले माझे स्त्रीमन त्याच्यावर. माझ्या नजरेत झालेला बदल कोणाच्याही लक्षात येण्याअगोदर मी तिथून निघून गेले. नंतर माझ्या कानावर तेथे घडलेला प्रसंग आला; परंतु त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येण्याइतकी मी भानावर आलेच नव्हते.

दिवस जात होते..... माझ्या भगिनीचा हस्तिनापूरच्या सभेत झालेला दुर्दम्य अपमान... त्यानंतर वीर भीमाने केलेल्या प्रतिज्ञा, पांडवांचे आणि माझ्या सुकुमार भगिनीचे बारा वर्षांचे वनातील गमन त्यापुढील एक वर्षाचा अज्ञातवास... सर्व वार्ता कानी येत होत्या. अज्ञातवास संपला आणि पांडव माझ्या बहिणी सोबत कांपिल्य नगरीमध्ये आले. श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने शिष्ठाई करण्यासाठी हस्तिनापुराला गेला.

ते दिवस फारच तणावपूर्ण होते. द्रौपदी कायम अस्वस्थ असायची. एकदिवस मी आणि द्रौपदी संध्यासमयी सौंधावर उभे होतो. ती मला अज्ञातवासातील घडामोडी सांगत होती. बल्लवाचार्य झालेल्या भीमाने द्रौपदीसाठी किचकाचा वध केला. त्याप्रसंगाचे वर्णन पांचाली मनापासून करत होती. तिने पिळदार शरीराच्या त्या अफाट शक्तीधारी भिमाबद्दल सांगण्यास सुरवात केली आणि.... आणि पुरुषरुपधारी या श्रीखंडीला त्याच्या भगिनीचा क्षणभरासाठी हेवा वाटला.... हो! या पुरुषाला.... कारण मन तर माझे होते न एका स्त्रीचेच!!!

दिवस जात होते.... अज्ञातवासानंतर देखील पांडवांचा हक्क देण्यास दुर्योधनाने नकार दिला आणि मी हस्तिनापुरीतील राजसभेमध्ये झालेल्या अपमानापासून आजवर ज्यासाठी थांबले होते तो अपमान धुवून काढण्यासाठी जे आवश्यक होते ते कौरव-पांडवांमधील युद्ध ठरले. मी अत्यंत आनंदी झाले होते. युद्ध सुरू झाले. एक एक दिवस जात होता... माझी उत्कंठा शिगेस पोहोचली होती.

श्रीखंडीचा जन्मच मुळी अंबेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झाला होता. हे सत्य जसे पितामह भीष्मांना माहीत होते तसेच ते सर्वज्ञानी श्रीकृष्णाला देखील माहीत होते. त्यामुळे मी केवळ वाट पाहात होते...

आणि तो दिवस उगवला. आज माझ्या शिबिरामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन आले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत... मात्र अर्जुनाने श्रीखंडीच्या वीरतेचे खूपच गुणगान केले. मी शांत चेहेऱ्याने सर्व ऐकून घेत होते... माझे कौतुक ऐकण्यात मला जराही रस नव्हता. काही वेळ गेल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला नेत्रपल्लवी करून खुणावले आणि तो वीर आजानुबाहु मदन माझ्या दिशेने आला आणि माझ्या मंचकावर माझ्या शेजारी बसला. प्रसंग कोणता आहे हे समजत असूनही माझे स्त्री मन त्या मोहक पुरुष सोबतीने हलले. डोळे समोरील अंधारामध्ये स्थिर ठेवत मी चेहेरा गंभीर केला. अर्जुनाने मला काहीसे आर्जवी स्वरात विचारले;"श्रीखंडी, बंधू मी आपले मागील जन्माचे रहस्य समजून चुकलो आहे आणि म्हणूनच आपणास एक विनंती करण्यास आलो आहे. पितामह भीष्मांना पराजित करणारा वीर या पृथ्वीतलावर नाही; आणि जोपर्यंत ते परास्त होत नाहीत तोपर्यंत पांडवांचा विजय शक्य नाही. आपण या जन्मी एक शूरवीर म्हणून प्रसिद्ध पावले आहात... आणि तरीही मी आपणास विनंती करीत आहे की उद्या युद्धाच्या दशम दिनी आपण माझ्या रथावरून माझ्या सोबत युद्धभूमीवर याल का?"

अखेर... तो दिन आला होता.... अंबेचा अपमान धुवून काढण्याचा तो सुदिन!!! मी अर्जुनाचा प्रस्ताव स्वीकारला आणि महाभारताच्या दशम दिनी अर्जुनाच्या रथावरील श्रीखंडीला पाहून पितामहांनी आपले धनुष्य खाली केले... ते स्त्रीवर शरसंधान करणार नव्हते... आणि श्रीखंडीच्या मनाचा थांग भीष्मांइतका कोणाला लागला असता? भीष्म शरपंजरी पडले आणि एका अपूर्व समाधानाने माझे मन भरून आले..... माझ्या जन्माची इतिकर्तव्यता झाली होती. मन शांत झाले होते. अंबा आता समाधानी होती.....

आणि म्हणूनच श्रीखंडीच्या शरीरातील माझे मन माझ्याशी बोलू लागले आहे....

हो! अडकले आहे मी या पिंजऱ्यात. या श्रीखंडी नामक पुरुषाच्या शरीररूपी पिंजऱ्यात! युद्ध अजूनही सुरू आहे; पुरुषरूपी श्रीखंडी वीरतेचे दर्शन देत युद्ध करतो आहे. मात्र त्याच्या शरीरातील स्त्रीमन धारण करणारी ही अंबा आता सुटकेचा मार्ग शोधते आहे.

एका उद्दिष्टाने जन्म घेतलेली मी... पुरुष शरीरातील स्त्री... बाह्य रूप जे दिसते तेच जनमानसात स्वीकारले जाते... आणि म्हणूनच पुरुष शरीरात अडकलेली मी एक स्त्री आहे हे आत्ता तरी कोणाच्याही लक्षात येत नाही आहे. उद्धिष्ट पूर्ण झाले आहे आणि आता हे शरीर माझ्यासाठी पिंजरा आहे माझ्यासाठी!!!



Friday, May 1, 2020

मंथरा (भाग 2) (शेवटचा)



मंथरा (भाग 2) (शेवटचा)


दुसऱ्या दिवशी दिवस चांगलाच वर आल्यावर मंथरा राणी कैकयीच्या महालात पोहोचली. तोपर्यंत महाराज राणी कैकयी सोबत असल्याने अंत:पुरात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती; याची तिला कल्पना होती. मंथरेने आत शिरताच राणी कैकयीचे मुख न्याहाळले आणि तिच्या लक्षात आले की काल अंत:पुरातून बाहेर पडताना तिने राणी कैकयीशी जो संवाद केला होता त्याचा योग्य तो परिणाम झाला आहे. राणी कैकयी काहीतरी खूप मोठे मिळवल्याच्या समाधानात होती. थोडावेळ इकडे-तिकडे केल्यानंतर मंथरेने राणीला विचारले;"स्नानाची तयारी करू ना?" त्यावर मंथरेचा हात धरून तिला मंचकावर बसवून राणी कैकयीने तिच्या डोळ्यात पाहात म्हंटले;"स्नानाचे राहू दे. मी काय सांगते ते तर ऐक." त्यावर आपल्या मनातील उत्सुकता लपवून ठेवत अत्यंत कोऱ्या चेहेऱ्याने मंथरा म्हणाली;"काही खास आहे का राणी? आपण अगदी आग्रहपूर्वक मला इथे मंचकावर बसवलंत म्हणून विचारते." त्यावर तिचे दोन्ही हात हातात घेऊन राणी कैकयी म्हणाली;"मंथरे, तू माझी दासी नाही माझी मैत्रीण आहेस. त्यामुळे तू असं काही बोलू नकोस हं. बरं, ऐक तर मी काय सांगते आहे ते... काल महाराज अंत:पुरात आले न तर मी उगाच त्यांच्यावर रागावल्याचा आव आणला. त्यांनी कितीतरी वेळ माझी मनधरणी केली; पण मी बोललेच नाही. ते अगदीच काकुळतीला आले आणि मग मी म्हंटले की तुम्ही न सांगता-सवरता महाराणी कौसल्या यांच्या माहाली जाता; मात्र मी कधीपासून आपली वाट बघत आहे आणि मला मात्र तिष्ठत ठेवता.... हे काही बरोबर नाही. आपलं माझ्यावर प्रेमच नाही. मी असं म्हणाले आणि महाराज अगदीच कसेनुसे झाले. मंथरे, त्यानंतर जे काही झालं ते तू मला विचारू नयेस आणी मी तुला सांगू नये; बरका!" असं म्हणून राणी कैकयी परत एकदा कालच्या त्या मोहमयी घटिकांच्या आठवणींमध्ये रमून गेली.

राणी कैकयीचे कथन ऐकून मंथरा समाधान पावली. आपण सुरू केलेल्या खेळाची सुरवात आपल्या मनासारखी झालेली पाहून ती मनातच हसली. मंचावरून उठताना ती सहज म्हंटल्यासारखे करून राणी कैकयीला म्हणाली;"राणी, ही खूपच चांगली गोष्ट आहे की महाराजांचे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे; जे त्यांनी काल तुमच्याकडे व्यक्त केले. मात्र माझ्या मंद बुद्धीला असं वाटतं की केवळ प्रेम असून पुरेसं नसतं." हे ऐकून राणी कैकयी तिच्या स्वप्नातून जागी झाली आणि मंथरेकडे आश्चर्याने पाहात म्हणाली;"म्हणजे काय ग मंथरे? महाराजांचे माझ्यावर खूप प्रेम आहे; हे ऐकून तुला आनंद नाही झाला?" राणी कैकयीच्या हातावर हात ठेवत मंथरा म्हणाली;"विश्वास ठेवा राणी; महाराजांचे प्रेम तुमच्यावर सर्वात जास्त आहे हे ऐकून माझ्या इतकी आनंदी या त्रिकाल खंडात कोणी नाही." हे म्हणतांना मंथरेने मुद्दाम सर्वात जास्त या दोन शब्दांवर जास्त भार दिला होता. राणी कैकयीने दाखवले नाही तरी ते तिच्या लक्षात आले आहे हे देखील मंथरेला कळले होते.

आता राणी कैकयी महाराज दशरथांची पट्ट राणी होती. तिचे हट्ट पुरवणे आणि लाड करणे यात महाराज दशरथांना कोण आनंद होत होता. राणी कैकयी येण्या अगोदर महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा यादेखील अत्यंत मानाने अयोध्येला सालंकृत राण्या म्हणून आल्या होत्या. मात्र दोघींनाही अजूनही मूल झालेले नव्हते. त्यामानाने राणी कैकयी अत्यंत तरुण होती. त्यामुळे हे देखील एक कारण होते की महाराज दशरथ राणी कैकयी सोबत जास्त वेळ घालवत होते.

असेच दिवस जात होते; मात्र अजूनही धर्मानुचरित सूर्यवंशी महाराज दशरथांच्या वंशाला दिवा प्राप्त झाला नव्हता. यामुळे महाराज दशरथ अलीकडे खूपच दुःखी राहू लागले होते. एकदिवस मुनी वशिष्ठ महाराज दशरथांना भेटण्यास आले आणि त्यांनी महाराजांनी पुत्रकानेष्टी यज्ञ करण्यास सांगितले. महाराज दशरथांनी अत्यंत मनोभावे आणि भक्तीपूर्ण भावनेने या यज्ञात आहुत्या दिल्या. यामुळे अग्निदेव महाराज दशरथांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी महाराजांच्या हातात सुवर्ण पात्रातील पायस ठेवले आणि म्हणाले;"राजा, मी तुझ्या भावपूर्ण आहुतींमुळे प्रसन्न झालो आहे. तू हे पायस दान तुझ्या प्रिय पत्नीस दे. या पायसाच्या प्राशनानंतर तुझ्या प्रिय पत्नीस अशा पुत्राची प्राप्ति होईल ज्याचा जयजयकार त्रिकाल खंडात युगानुयुगे होत राहील." महाराजांनी सुवर्ण पात्र स्वीकारताच अग्निदेव पवित्र होमकुंडामध्ये अंतर्धान पावले.

महाराज दशरथ अत्यंत आनंदीत झाले आणि पायसामृत असलेले सुवर्ण पात्र महाराणी कौसल्या यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र त्यावेळी त्यांची नजर त्यांची प्रिय राणी कैकयीकडे होती. हे लक्षात येऊन अत्यंत प्रेमळ आणि समंजस महाराणी कौसल्या महाराज दशरथांना म्हणाल्या;"महाराज, हे पायसामृत माझ्या बरोबरीने राणी कैकयीने देखील घ्यावे असे मला वाटते." असे म्हणून त्यातील अर्धे पायसामृत महाराणी कौसल्याने राणी कैकयीला दिले. मंथरा राणी कैकयी जवळच उभी होती. ती राणी कैकयीला काही सांगणार एवढ्यात राणी कैकयी पुढे झाली आणि तिने अत्यंत प्रेमाने राणी सुमित्रेकडे बघितले आणि आपल्याला मिळालेल्या पायसामृतातील अर्धा भाग राणी सुमित्रेला दिला. त्याचवेळी महाराणी कौसल्या यांनी देखील त्यांच्यातील अर्धे पायसामृत राणी सुमित्रेला दिले.

यथावकाश महाराज दशरथ यांच्या तीनही सुलक्षणा पत्नी गरोदर राहिल्या आणि योग्य वेळी प्रसूत देखील झाल्या. महाराणी कौसल्याने श्रीरामाला जन्म दिला, राणी कैकयीच्या पोटी भरताचा जन्म झाला आणि राणी सुमीत्रेच्या ओटी दोन पुत्रांचा योग जुळून येऊन लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला.

वर्षांमागून वर्षे जात होती आणि चारही सुर्यवंशी राजकुमार आवश्यक अशा योग्य विद्या आणि शास्त्रांचा अभ्यास आत्मसाद करत मोठे होत होते. एक दिवस ऋषी विश्वामित्र महाराज दशरथांकडे आले आणि म्हणाले;"महाराज, मी एक महायज्ञ करीत आहे. परंतु यज्ञ चालू असताना राक्षसांकडून सतत हल्ला होतो आणि विघन आणले जात आहे. आपण आपले दोन पुत्र राम आणि लक्ष्मण यांना माझ्या सोबत पाठवावेत. माझा हा यज्ञ पूर्ण होईपर्यंत ते माझ्या सोबत राहून माझ्या यज्ञ कार्याचे सौरक्षण करतील." महाराज दशरथ मनातून शशांक होते. कारण राम केवळ सोळा वर्षांचा होता. लक्ष्मण त्याहून लहान. महाराजांच्या मनातील चिंता ओळखून ऋषी विश्वामित्र म्हणाले;"महाराज, आपल्या मनात कोणतीही चिंता नसावी. आपले पुत्र दिंगत कीर्ती मिळवणार आहेत. येऊ दे त्यांना माझ्यासोबत." ऋषी विश्वामित्रांनी असे म्हंटल्यानंतर महाराजांच्या मनातील प्रश्न मिटला आणि त्यांनी राम आणि लक्ष्मण यांना बोलावून ऋषी विश्वमित्रां सोबत जाण्यास सांगितले.


राम आणि लक्ष्मणाने अत्यंत योग्य रीतीने ऋषी विश्वामित्र यांच्या महायज्ञाचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण केले. त्यांच्या कार्यामुळे ऋषी विश्वामित्र अत्यंत खुश झाले. त्याचवेळी मिथिला नगरीचे महाराज जनक यांनी त्यांची सुकन्या सीता हिच्या विवाहाची घोषणा केली. महाराज जनक यांच्याकडे शिव धनुष्य होते. विवाहाचा पण होता की या शिवधनुष्याला पेलून त्याला प्रत्यंचा लावणाऱ्या वीरालाच राजकुमारी सीता वरणार होती. या विवाहपूर्तीची शोभा बघण्यासाठी ऋषी विश्वामित्र राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन मिथिला नगरीमध्ये पोहोचले. अनेक शूरवीर राजा-महाराजांनी शिव धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न केला. प्रत्यंचा तर दूर कोणालाही ते धनुष्य उचलता देखील आले नाही. त्यावेळी ऋषी विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली आणि श्रीरामाने अत्यंत सहजपणे ते शिव धनुष्य पेलून त्यास प्रत्यंचा लावण्यासाठी ते वाकवले. मात्र एक गगनभेदी आवाज करत ते शिव धनुष्य मोडून पडले.

महाराज जनकांनी ऋषी विश्वामित्रांकडून राम आणि लक्ष्मणाबद्दल समजून घेतले आणि अयोध्या नगरीला दूत पाठवून घडलेली घटना कळवली. रामाने जनक जननीच्या विवाहाचा पण जिंकला आहे ही वार्ता ऐकून महाराज दशरथ अत्यंत हर्षोल्लासित झाले. यथावशाक श्रीरामाचा विवाह जनक नंदिनी सीतेशी झाला. याचवेळी महाराज जनक यांच्या इतर तीनही कन्या राजकुमारी उर्मिला हिचा विवाह लक्ष्मणाशी, राजकुमारी मांडवी हिचा विवाह भरताशी आणि राजकुमारी श्रुतकीर्ती हिचा विवाह शत्रुघ्न यांच्याशी अत्यंत थाटामाटात झाला. महाराज दशरथ आपल्या चारही पुत्र आणि सुकुमार स्नुषा घेऊन अयोध्या नगरीला आले.

आता दिवस अत्यंत आनंदात आणि सुखाने व्यतित होत होते. अशावेळी महाराज दशरथांनी निर्णय घेतला की आता राम अयोध्येचा राजा होऊन योग्य प्रकारे राज्यकारभार करण्याइतका मोठा झाला आहे. त्यामुळे रामाचा राज्यभिषेक करावा. आनंदीत करणारी ही वार्ता ऐकून संपूर्ण अयोध्या नगरी हर्षोल्लासित झाली. महाराणी कौसल्या, राणी सुमित्रा आणि राणी कैकयी यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. राणी कैकयी तर समोर येणाऱ्या प्रत्येक दास-दासीला मानत येईल ती वस्तू देऊन आनंद साजरा करत होती. मग ते मग ते एखादे अत्यंत सुंदर आभूषण असेल किंवा वर्णनातीत तलम वस्त्र असेल. भोजन समय असल्यास येणाऱ्या प्रत्येकास राणी कैकयी आग्रहाने भोजन देखील देत होती. राणी कैकयीच्या आनंदाला पारावार नव्हती; आणि मंथरेच्या चिरफडण्याला अंत नव्हता. 'राज्याभिषेक रामाचा होता; भरताचा नव्हे;' इतके देखील राणी कैकयीला समजू नये याचे मंथरेला राहून राहून वैषम्य वाटत होते.

शेवटी न राहून एका रात्री मंथरा राणी कैकयीच्या अंत:पुरात दाखल झाली. राणी कैकयी दिवसभराच्या दगदगीने दमून मंचकावर पडून आराम करीत होती. मंथरा तिच्या जवळ बसली आणि राणी कैकयीचे पाय चेपू लागली. राणी कैकयीने डोळे उघडले आणि मंथरेला पाय चेपताना बघून उठून बसत म्हणाली;"अग मंथरे तू का माझे पाय चेपते आहेस? बस बघू अशी स्वस्थ इथे माझ्या जवळ. अग, तू तर अगदीच दृष्टी दुर्लभ झालीस. रामाचा राज्यभिषेक होणार आता... किती हर्षभरीत बातमी आहे ही. कितीतरी कामं आहेत करण्यासारखी." राणी कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेने तिचे तोंड लहान केले आणि मान खाली घालून म्हणाली;"आपण म्हणाल तसं." राणी कैकयीला मंथरेच्या पडलेल्या आवाजात बोलण्याचे खूपच वैषम्य वाटले आणि तिचा हात हातात घेत राणी म्हणाली;"मंथरे, तुला काही होतं आहे का? अशी पडलेल्या चेहेऱ्याने का बसली आहेस?"

मंथरेला राणी कैकयीने हेच विचारायला हवे होते. राणीचा प्रश्न संपतो न संपतो तो मान वर करून राणीच्या डोळ्यात पाहात मंथरा म्हणाली;"राणी कैकयी आपणाला माझ्यावर किती विश्वास आहे?" तिच्या या प्रश्नाने गोंधळलेली राणी कैकयी म्हणाली;"हा काय प्रश्न झाला मंथरे? माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणीच म्हंटले होते की मंथरा असताना कैकयीच्या सुखाची चिंता नाही. जो विश्वास माझ्या वडिलांना तुझ्यात होता; तोच विश्वास माझा आहे. माझं कायमच सर्व चांगलं व्हावं यासाठी त कायम तनमनाने झटशील यात मला तिळमात्रही शंका नाही." राणी कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेने एक निश्वास टाकला आणि म्हणाली;"राणी आपण माझ्यावर इतका विश्वास ठेवता हे ऐकून मी शेवटचा श्वास घेण्यास मोकळी झाले." त्यावर तिच्या मुखावर आपला तळवा ठेवत राणी कैकयी म्हणाली;"हे असे अभद्र काय बोलते आहेस मंथरे आत्ताच्या या आनंद भरल्या सोहोळ्याच्या वेळी?"

त्यावर राणी कैकयीच्या डोळ्याला डोळा भिडवत मंथरा म्हणाली;"राणी, कुठला आनंद सोहळा? कोणाचा? महाराणी कौसल्या यांचा पुत्र राम याचा राज्यभिषेक होणार हा सोहळा! राज्य रामाला मिळणार. तो राजा होणार. पण भरताचे काय राणी?"

मंथरेच्या बोलण्याने गोंधळून गेलेली कैकयी म्हणाली;"भरताचे काय मंथरे?"

त्यावर अत्यंत शांत पण खंबीर आवाजात मंथरा म्हणाली;"राणी, मी आता जे बोलणार आहे ते केवळ आणि केवळ आपल्या आणि राजकुमार भरत यांच्या उज्वल भविष्याचा विचार करून यावर आपण विश्वास ठेवावा ही विनंती. राणी, थोडा विचार करावात... राजा होणार राम. त्याची पट्ट राणी होणार सीता. म्हणजे यापुढील संपूर्ण आयुष्य मानाने जगणार महाराणी कौसल्या..... आणि राणी......"

मंथरा बोलताना थांबली आणि मनलावून तिचे बोलणे ऐकणाऱ्या राणी कैकयीने न राहून विचारले;"आणि काय मंथरे?"

"आणि राणी यापुढील संपूर्ण आयुष्य तुमचा लाडका भरत त्या रामाचा दास होऊन राहणार. तुमची सुकुमार स्नुषा मांडवी ही सीतेच्या वचनात राहणार. आणि आपण स्वतः राणी.... विचार करावा! आजवर महाराजांची लाडकी राणी म्हणून आपण मिरवले आहे. मात्र आता महाराज दशरथ पायउतार झाल्यानंतर आपण जरी त्यांची लाडकी राणी असलात तरी राजमाता मात्र महाराणी कौसल्या होणार. म्हणजे यापुढे राजमाता कौसल्यादेवी सर्वच कौटुंबिक निर्णय घेणार. मग तुमच्या मनात जे काही येईल त्यासाठी अगोदर आपणास राजमाता कौसल्यादेवींची परवानगी घ्यावी लागेल. राणी, विचार करा.... यात तुमचे काय सौख्य आणि मान? आणि अशा वेळी आपल्या तातांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यासारखे नाही का होणार? मग मी शेवटचा श्वास घेणेच योग्य नाही का?"

मंथरेचे बोलणे ऐकून राणी कैकयी विचारात पडली. त्यावर तिला फार विचार करण्यास वेळ न देता मंथरा म्हणाली;"राणी, यावर एक उपाय मला सुचतो आहे. आपले अभय असेल तरच मी बोलेन."

आपल्याच विचारात गढलेल्या राणी कैकयीने म्हंटले;"मंथरे तुला माझ्याशी बोलताना अभय का हवे बरे? तरीही तू म्हणतेस तर दिले अभय... बोल!"

पुन्हा एकदा राणी कैकयीच्या डोळ्यात खोल पाहात मंथरा म्हणाली;"राणी, विचार करा... आपला भरत, तुमचा लाडका राजकुमार भरत.... वीर भरत जर अयोध्येचा राजा झाला तर? तर आपण राजमाता व्हाल... राजकुमारी मांडवी महाराणी... आपल्या सुखाला पारावार राहणार नाही."

हे ऐकताच राणी कैकयी ताठ बसली. तिची मुद्रा पूर्णपणे गोधळलेली होती. तिला मंथरेच्या बोलण्याचा राग आला होता; मात्र तरीही त्यात काही तथ्य आहे असेही एकीकडे वाटत होते. थोड्या विचाराअंती राणी कैकयीच्या कपाळावर आठ्या निर्माण झाल्या आणि तिने काहीशा रागाने मंथरेला म्हंटले;"मंथरे, तू माझी सखी आहेस आणि केवळ माझ्या सुखाचा विचार करतेस; यात मला बिलकुल शंका नाही. मात्र तरीही तुझे हे बोलणे मला मुळीच पटलेले नाही. अग, माझा राम त्याच्या माते प्रमाणेच माझा देखील तितकाच आदर करतो." त्यावर काहीसे न पटणारे कुत्सित हास्य चेहेऱ्यावर आणून मंथरा म्हणाली;"राणी, आजवर अशी किती उदाहरणे आपण बघितली आहेत की सर्वस्व मिळाल्या नंतर देखील एखादी व्यक्ती आदरयुक्त भावनेने वागते? आणि मी अशी किती उदाहरणे सांगू की जिथे मानसन्मान मिळताच आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना सहज विसरले जाते? तरीही, आपला रामावर आणि महाराणी कौसल्या यांच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास असेल तर आपण राजकुमार रामाचा राज्यभिषेक होणार म्हणून नक्कीच आनंदीत व्हा आणि मला मात्र निरोप द्या." एवढे बोलून मंथरा राणी कैकयीपासून लांब झाली आणि अंत:पुराबाहेर जाण्यास निघाली. त्यावर तिला थांबवत राणी कैकयी म्हणाली;"मंथरे थांब. हे असे माझ्या मनात प्रश्न निर्माण करून तू कुठे जाते आहेस? यावर काही उपाय असेलच न? मला खात्री आहे की तू याचा विचार केलाच असशील."

मंथरेला हेच हवे होते. परत मागे फिरून अत्यंत उत्साहित आवाजात ती राणी कैकयीला म्हणाली;"राणी कैकयी, आपण विसरला असालही कदाचित; मात्र मी अजूनही तुमच्या आयुष्यातील एक प्रसंग विसरलेले नाही. राणी, आपण एकदा महाराज दशरथांना देवांकडून विनवणी करण्यात आली की दानव त्यांना सतत त्रास देत आहेत तरी यासाठी होणाऱ्या युद्धामध्ये महापराक्रमी महाराज दशरथांनी देवांना मदत करावी. त्यावेळी राणी कैकयी आपण स्वतः महाराज दशरथांची सारथी बनून गेला होतात. त्यावेळी केवळ सारथ्य केलेत असे नाही तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपली अंगुली रथ निडामध्ये घालून आपण व्यूहातून रथ बाहेर काढून महाराज दशरथांचे प्राण वाचवलेत. त्यानंतर देखील महाराजांच्या अमोघ बाणांपुढे तग न धरता पळून जाणाऱ्या दानवांचा पाठलाग करून आपण महाराजांना आणि पर्यायाने देवांना विजयश्री मिळवून दिली होतात. त्यावेळी महाराज दशरथांनी स्वखुशीने आपणास दोन वर दिले होते. मात्र आपण आपल्या सरळ साध्या स्वभावानुसार ते नाकारले होते. परंतु महाराजांनी आग्रह केल्यानंतर 'योग्य वेळी मी माझे वर मागून घेईन'; असे म्हणाला होतात."

मंथरेचे हे बोलणे ऐकून राणी कैकयी परत एकदा त्या युद्ध भूमीमध्ये पोहोचली होती. तिच्या चेहेऱ्यावर विजयश्रीचे तेज झळकू लागले होते. मंथरेकडे मंद हास्य करीत बघत राणी कैकयी म्हणाली;"मंथरे, मला वाटते हीच ती योग्य वेळ आहे. मी माझे दोनही वर महाराजांकडे मागण्याची ही वेळ आहे." त्यानंतर काही क्षण विचार करून राणी कैकयी मंथरेला म्हणाली;'मंथरे, अशीच जा आणि महाराजांना माझा निरोप दे... तू स्वतः.... म्हणावे राणी कैकयी शोकाकुल आणि क्रुद्ध दोन्ही आहे याक्षणी. त्यांनी आहे त्या स्थितीमध्ये मला भेटायला यावे."

राणी कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेच्या मनाला समाधानाचा स्पर्श झाला. तिची खात्री होती की सूर्यवंशी महाराज दशरथ दिलेला शब्द नक्कीच पाळतील. ती राणी कैकयीच्या महालातून बाहेर पडली ती थेट महाराज दशरथ विश्रांती घेत असलेल्या त्यांच्या महालाच्या दिशेनेच. तिने महाराजांच्या द्वारपालकडे महाराजांना भेटण्याची परवानगी मागितली. मंथरा राणी कैकयीची खास दासी आहे हे माहीत असल्याने द्वारपालाने देखील तिला अडवले नाही. मंथरा थेट महाराजांच्या अंत:पुराजवळ जाऊन थांबली आणि तिने आदबीने राणी कैकयींचा निरोप महाराजांना दिला. महाराजांना राणी कैकयींचा निरोप ऐकून आश्चर्य वाटले आणि ते तसेच राणी कैकयीच्या माहाली जाण्यास निघाले.

राणी कैकयीने महाराज दशरथांकडे आपले दोन वर मागितले आणि त्यांनी कितीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी ती तिच्या मागणीवर ठाम राहिली. 'जर तुम्हाला मी मागितल्या प्रमाणे रामाला चौदा वर्षे वनवास आणि माझ्या भरताचा राज्यभिषेक ही माझी इच्छा पूर्ण करायची नसेल तर; मी माझे वर परत मागे घेतो; असे म्हणा आणि मला आणि स्वतःला त्या वरांमधून मुक्त करा..." असे एकच म्हणणे होते तिचे. दुःखाने विव्हल झालेले महाराज दशरथांनी शेवटी राणी कैकयीची मागणी मान्य केली. मात्र त्याक्षणापासून त्यांची वाचाच बंद झाली.

महाराजांनी होकार देताच अत्यानंदी झालेल्या राणी कैकयीने रामाला बोलावणे पाठवले. राम येताच तिने महाराज दशरथांसमोर रामाला सांगितले;"रामा, महाराजांनी मला दिलेल्या वरांची मागणी मी आज केली आहे. त्याप्रमाणे तू पुढील चौदा वर्षे वनवासास जावे आणि माझा मुलगा राजकुमार भरत अयोध्येचा राजा व्हावा; असे त्यांनी मान्य केले आहे. तरी आता वेळ वाया न घालवता तू उद्याच निघावेस हे बरे. राजकुमार भरत आत्ता त्याच्या आजोळी जरी असला तरी मी त्याला बोलावून घेऊन त्याचा राज्यभिषेक करेनच."

राणी कैकयीचे बोलणे ऐकून रामाने मंद स्मित केले आणि राणीला नमस्कार करून म्हणाला;"माते आपण महाराजांकडे वर न मागता देखील मला सांगितले असतेत तरी मी लगेच वनवास स्वीकारला असता. असो; तातांची इच्छा म्हणजे माझ्यासाठी ती धर्माज्ञा ठरते. आपण मुळीच चिंतीत होऊ नयेत... मी उद्या प्रत:समयीच निघेना."

रामाचे बोलणे ऐकून तेथेच दुःखाकुल झालेल्या महाराज दशरथांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे अश्रू पुसत राम म्हणाला;"तात, विधिलिखित कोणालाही टाळले नाही. आपण का शोकाकुल होऊन त्रास करून घेत आहात? मी स्वखुशीने वनवास स्वीकारत आहे." एवढे बोलून राम उठला आणि राणी कैकयीच्या अंत:पुरातून बाहेर पडला.

ती संपूर्ण रात्र राणी कैकयीने एका वेगळ्याच आनंदाच्या आणि विजयाच्या उन्मादात घालवली. तिला तिच्या आनंदापुढे तिच्या प्रिय पतीचे; महाराज दशरथांचे दुःख देखील दिसत नव्हते. उष:काली महालाच्या सज्जामध्ये ती आली असता तिला दिसले की रामाच्या सोबतीने वल्कले नेसून लक्ष्मण आणि सीता देखील निघाले आहेत. ते पाहाताच मात्र राणी कैकयीचे काळीज हलले. हे नक्की काय होते आहे हे समजून घेण्यासाठी कोणालातरी विचारावे या हेतूने तिने मागे वळून पाहिले तर तेथे मंथरा होती. राणी कैकयीच्या चेहेऱ्यावरील प्रश्नार्थक भाव बघून मंथरा पुढे झाली आणि तिने राणी कैकयीला माहिती दिली;"राणी, राजकुमार राम यांच्या बरोबर त्यांची धर्मपत्नी पत्नी धर्माचे पालन करण्यासाठी निघाली आहे. राजकुमार लक्ष्मणाने त्याच्या मूळ स्वभावानुसार हट्टाने सोबत जाण्याचे ठरवले आणि तो देखील निघाला आहे. राणी आपण यावर फार विचार करू नयेत हेच योग्य. आपणास माहीतच आहे की राजकुमार लक्ष्मण तसे तापट स्वभावाचे आहेत. कदाचित त्यांचे आणि राजकुमार भरत यांचे पटले नसते. त्यामुळे हे योग्यच झाले. सुकुमार सीतेने मात्र हा निर्णय घ्यायला नको होता. परंतु पती सोबत जर पत्नी जात असेल तर तिला अडवण्याचा हक्क कोणाला असणार? त्यामुळे आता जे जात आहेत त्यांचा विचार करण्यापेक्षा राजकुमार भरत यांना त्यांच्या आजोळहुन बोलावून घेऊन त्यांचा राज्यभिषेक करणे योग्य." मंथरेचे बोलणे ऐकून राणी कैकयी परत एकदा हसऱ्या मुद्रेने महालाकडे वळली.

राजकुमार भरताला बोलावून घेण्यासाठी राणी कैकयीने दूत पाठवला आणि ती इतर कोणताही आणि कोणाचाही विचार न करता भरताच्या राज्यभिषेकाच्या तयारीस लागली. राजकुमार भरत परत आला आणि येताच त्याला त्याच्या मातेने त्याच्या पित्याकडे मागितलेल्या वरांसंदर्भात समजले. त्याक्षणी अत्यंत क्रुद्ध होऊन तो त्याच्या मातेच्या अंत:पुरात पोहोचला.

राणी कैकयी त्याला पाहून अत्यंत आनंदाने त्याला सामोरी गेली. मात्र अत्यंत तीक्ष्ण शब्दात तिची निर्भस्ना करत राजकुमार भरत म्हणाला;"कसला एवढा आनंद झाला आहे तुला? तुला मी कोणत्या तोंडाने माता म्हणू ग? माझ्या प्रिय बंधू रामाला तू वनवासास पाठवलेस. माझी सुकुमार वहिनी... जी मला मातेसमान आहे.... ती देखील त्याच्या सोबत निघाली तरी तुझे काळीज हलले नाही.... तुला मी स्त्री तरी कसे म्हणू? अग पापिणी तुला असे वाटले तरी कसे की मोठा बंधू राम राजा न होता मी राजा व्हावे असे माझ्या मनात तरी येईल? ऐहिक सुखलोलुप मनाच्या हे पापिणी यापुढे मला तुझे मुख देखील पाहायचे नाही. मी आज याक्षणी बंधू राम, माझी माता सीता आणि माझा बंधू लक्ष्मण यांना वनातून परत आणायला निघतो आहे. मला हे राज्य नको आणि तू तर मुळीच नको आहेस."

आपल्या पुत्राचे ते शब्द ऐकून मंथरेच्या बोलण्यामुळे बिथरले राणी कैकयीचे मन जागे झाले. मात्र आता फारच उशीर झाला होता. राजकुमार भरत मागे वळला आणि आपला काळा पडलेला चेहेरा हाताने झाकून घेत राणी कैकयी मूर्च्छित होऊन खाली कोसळली. हा प्रसंग लांबून पाहणारी मंथरा धावत पुढे आली आणि राजकुमार भरताला थांबवत म्हणाली;"राजकुमार, आपण आपल्या मातेशी या शब्दात बोलाल आणि तिची अशी निर्भस्ना कराल असे मला स्वप्नात देखील खरे वाटले नसते. मागे वेळा राजकुमार. तुमची माता मूर्च्छित होऊन पडली आहे. तिला सांभाळा. ते तुमचे प्रथम कर्तव्य आहे."

मंथरेला पाहाताच आणि तिचे बोलणे ऐकताच राजकुमार भरताचे डोळे जणू अग्नी ओकू लागले. आपल्या तलवरीकडे हात नेत राजकुमार भरत म्हणाला;"मंथरे, तू? तुझा शिरच्छेद करण्यासाठी माझे हात कधीचे शिवशिवत आहेत. इतर कोणालाही माहीत नसले तरी मी खात्रीने सांगू शकतो की माझ्या मातेच्या मनात माझ्या प्रिय रामाविषयी मत्सर आणि राग भरणारी तूच आहेस. मी माझ्या जन्मापासून पाहात आलो आहे. तुला ऐहिक सुखाची लालसा कायम राहिली आहे; आणि लहानपणापासून तुझी सोबत लाभलेल्या माझ्या मातेला देखील ती इच्छा उत्पन्न झाली आहे. आत्ता याक्षणी मला माझ्या बंधू रामशिवाय काहीही दिसत नाही आहे. त्यामुळे मी निघतो आहे. यापुढे तू आणि राणी कैकयी यांचे नशीबच तुमची सोबत करेल." असे म्हणून राजकुमार भरत तिथून निघून गेला.

मंथरा राणी कैकयीकडे धावली आणि तिने राणीला शुद्धीवर आणले. डोळे उघडताच राणी कैकयीला मंथरा दिसली. त्याक्षणी मंथरेला ढकलून देत राणी कैकयी कडाडली;"तू? दूर हो तू माझ्यापासून. कायम माझ्या सुखाचा विचार करते आहेस असे म्हणून तू मला फसवत आलीस. कायम तू तुझ्या मनातील अपेक्षा माझ्याकडून पूर्ण करून घेत आलीस. पण तुला तरी काय दोष देऊ? तू लाख मला काहीही सांगितलेस तरी त्यावर मी विश्वास ठेवला. ही माझी चूक झाली. आज माझ्या पुत्राने माझे डोळे उघडले आहेत. यापुढील माझे आयुष्य म्हणजे पाश्चातापाचे आणि प्रायश्चित्तपूर्ण असणार आहे. काय केले मी कलंकिणीने? आपल्याच हाताने आपले सुख दूर लोटले. क्षणिक ऐहिक सुखाच्या मोहात पडून मी माझे सर्व पुण्य गमावले. मंथरे.... जा निघून जा. तुझा वध करण्यास मी कोणालातरी सांगण्या अगोदर माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो..... आणि हो! एक मात्र नक्की कर मंथरे....... जर कधी वाटलेच तर आत्मपरीक्षण नक्की कर. परमोच्च सुख हे आत्मसमाधानात असते. जा मंथरे जा......."

असे म्हणून राणी कैकयीने मंथरेकडे पाठ फिरवली..... आणि..... आणि...... अजूनही स्वतःची चूक न समजलेली ऐहिक सुखलोलुप मंथरा खालच्या मानेने राणी कैकयीच्या माहालातून बाहेर पडली.

समाप्त

Friday, April 24, 2020

मंथरा

मंथरा

"काय सांगू मंथरे, चाकाची कुणी निघाली होती. रथ पुढे काढणे अशक्य होते. चारही बाजूंनी दानवांनी घेरले होते आमच्या रथाला. महाराज त्यांच्या अमोघ शरसंधानाने समोरील दानवांना दूर ठेवत होते. परंतु रथ त्या व्यूहातून बाहेर निघणे अत्यंत आवश्यक होते. क्षणभराचा विचारही न करता मी रथाचा लगाम दातांमध्ये धरून कुणीच्या जागी माझी अंगुली लावली आणि एकच असा आसूड ओढला हवेत; क्षणभरासाठी दिशाहीन झालेले माझे प्रिय अबलख मारुत, वारुण, चापल्य आणि माझी लाडकी शलाका! माझ्या अंतर्मनाची भाषा समजून घेत त्यांनी उधळून दिले स्वतःला त्या व्यूहातून. समोरील दानवांच्या लक्षात येण्याआगोदरच आम्ही व्यूहाच्या बाहेर होतो. आमची सुटका झालेली पाहाताच आपल्या अयोध्येचे शूर आणि हुशार सैनिक आणि ज्यांच्यासाठी महावीर महाराज दशरथ धावून गेले असे भयभीत झालेले देव सर्वच दानवांवर असे काही तुटून पडले की त्यांना युद्धभूमीमधून पळून जाण्या व्यतिरिक्त काही उपाय उरला नाही. संध्या समय समीप आला होता. त्यावेळी युद्ध थांबते तर दुष्ट दानवांना जोर धरण्यास अवधी मिळाला असता; हे महाराजांच्या अंतरीचे विचार ओळखून मी रथ तसाच पळणाऱ्या दानवांच्या मागे पळवला. आम्ही दानवांचा पाठलाग करतो आहोत पाहून आपल्या सैनिकांना आणि त्याचबरोबर देवांना देखील जोर आला आणि सूर्यनारायण कलायच्या आत आम्ही दानवांवर विजय मिळवला. रथ थांबला आणि चाकाच्या कुणीमधून हात बाजूला करतानाच मी मूर्च्छित झाले.

ज्यावेळी मी नेत्र उघडले त्यावेळी मी युद्धभूमीवरील उभारलेल्या आमच्या शिबिरामध्ये होते. राजवैद्यांनी आवश्यक ते लेप लावून माझा हात औषधी पर्णामध्ये बांधून ठेवला होता. मी मंचावर पहुडले होते आणि महाराज नेत्रांमध्ये अश्रू आणून माझ्या मुखाचे निरीक्षण करत होते. त्यांना पाहून मी उठणार तोच त्यांनी मला अडवले आणि म्हणाले; 'कैकयी, प्रिये... आज केवळ तुझ्यामुळे हा विजय देवांना प्राप्त करून देऊ शकलो. हा दशरथ देखील केवळ तुझ्या शौर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे आज येथे तुझ्या जवळ बसला आहे.' 'आर्य आपण असे बोलून मला लाजवता आहात. मी केवळ माझे कर्तव्य करत होते;' मी म्हणाले."

कैकयीच्या हाताची शुश्रूषा करणारी मंथरा काही क्षणासाठी थांबली आणि आपल्याच तंद्रीमध्ये असणाऱ्या कैकयीला थांबवत म्हणाली;"महाराणी, आपलं कर्तव्य रथ हाकण्यापर्यंत मर्यादित होतं; असं आपलं माझ्या अल्पमतीला वाटतं." त्यावर एकवार मंथरेकडे बघत कैकयी म्हणाली;"मंथरे, युद्धभूमीवर रथ हाकताना जे जे म्हणून करावे लागते ते सगळेच कर्तव्य असते बरे!" यावर मनात असूनही मंथरा काही बोलली नाही. आजवरच्या अनुभवाने ती एक शिकली होती की राणी कैकयीला दशरथ महाराजांचा विरह झाला असला आणि ती त्या दुःखात असली की तेव्हाच ती मंथरेचे बोलणे ऐकत असे. त्यामुळे तिच्या मानत आले; आत्ता याक्षणी गप्प बसणेच योग्य. कैकयी परत एकदा मनानेच युद्धभूमीवर पोहोचली होती. तिने पुढील प्रसंग सांगण्यास सुरवात केली...

"तर... महाराजांनी माझ्याकडे अत्यंत प्रेमभराने पाहिले आणि म्हणाले 'कैकयी, राणी... आज हा दशरथ तुझ्या ऋनांमध्ये बांधला गेला आहे; आणि ते ही एकदा नाही तर दोनदा! तू त्या व्यूहातून माझी सुटका केलीस एवढेच नव्हे तर जीवावर उदार होऊन तू शत्रूचा पाठलाग केलास. तुझ्या या कृत्यामुळे आपले सैनिक आणि भयभीत झाल्याने किंकर्तव्यमूढ झालेले देव देखील इरेस पेटले आणि मला त्या दुष्ट दानवांवर विजय मिळवणे सहज शक्य झाले. आज दशरथाच्या शौर्य कथा जर विश्वात दुमदुमत आहेत तर त्या केवळ तुझ्यामुळे. सांग प्रिये; या ऋणातून मी कसा उतराई होऊ? आज तू जे मागशील ते देण्यास मी बांधील आहे. एक नाही दोन वर मागून घे प्रिय पत्नी. तो तुझा केवळ अधिकार नाही तर तुझ्या शूरतेला अयोध्येने केलेलं नमन आहे.' त्यांचे बोलणे ऐकून मी धन्य झाले होते मंथरे...." राणी आपल्या हाताची पीडा विसरून अजूनही त्या मंतरलेल्या क्षणामध्ये अडकली होती.

मात्र '.... एक नाही दोन वर मागून घे प्रिय पत्नी....' असे महाराज दशरथ म्हणाले, हे राणी कैकयीने म्हंटल्या क्षणापासून मंथरेचे कान तीक्ष्णपणे पति-पत्नीमधील पुढील वार्तालाप समजून घेण्यास उत्सुक झाले होते. त्यामुळे अचानक बोलणे बंद केलेल्या आपल्या राणीकडे बघून मंथरेने विचारले;"महाराणी, मग आपण काय मागून घेतलेत महाराजांकडून?" एक कटाक्ष मंथरेकडे टाकून कैकयी म्हणाली;"मी काहीही मागितले नाही." हे ऐकताच मंथरेचे मन अस्वस्थ झाले. हातातील लेप भरला सोन्याचा वाडगा एका बाजूला ठेवत मंथरा राणी कैकयीच्या कानाजवळ आली आणि म्हणाली;"महाराणी आपण काहीच मागितले नाहीत? मी आजवर आपणास जे सांगत आले आहे त्याचा आपण कधीच विचार का करत नाही?" मंथरेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कैकयी म्हणाली;"मी परोपरीने महाराजांना सांगायचा प्रयत्न केला की मला काहीही नको आहे. आपण प्रेमभराने माझे कौतुक केलेत यातच सर्व आले. परंतु महाराज काहीही ऐकायला तयार नव्हते. सरते शेवटी मी म्हणाले,'महाराज, आत्ता याक्षणी काय मागावे हे मला सुचत नाही आहे. तरी आपली परवानगी असली तर आपण दिलेले हे दोन वर मी योग्य वेळी मागून घेईन.' माझे बोलणे ऐकून महाराज मंद हसले आणि होकारार्थी मान हलवत म्हणाले,'प्रिये,जशी तुझी इच्छा! तुला योग्य वाटेल त्यावेळी तू हे दोन वर मागून घे. बर आता तुला विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे मी निघतो'. आणि असे म्हणून महाराज त्यांच्या शिबिराच्या दिशेने गेले."

'.....आपण दिलेले हे दोन वर मी योग्य वेळी मागून घेईन.' राणी कैकयीने उच्चारलेले हे शब्द ऐकून मंथरेच्या मनातील विचारांनी परत एकदा उचल ख्खाली. तिचे डोळे आनंदाने चमकले. मात्र त्यावेळी काहीही बोलणे अयोग्य ठरेल हे अनुभवाने ती शिकली होती. त्यामुळे शांतपणे लेपाचा वाडगा उचलून मंचकापासून दूर होत ती म्हणाली;"महाराणींनी आता विश्रांती घ्यावी. आपण योग्य वेळी योग्य विचार करून वर मागाल याची या मंथरेला पूर्ण खात्री आहे. त्या योग्य वेळेची वाट पाहण्यास ही मंथरा तयार आहे." राणी कैकयीला मंथरेच्या त्या बोलण्याचा अर्थ कळला नाही; परंतु त्याक्षणी कैकयीच्या शरीरात आणि मनात एवढे त्राण नव्हते की कोणत्याही विषयावर ती अजून काही चर्चा करेल. त्यामुळे एकदा मंथरेकडे पाहून तिने तिचे नेत्र मिटले.

अशाच काही घटका गेल्या आणि महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा कैकयीच्या अंत:पुरात येत असल्याची वर्दी अंत:पुराबाहेर उभ्या कलिकेने आत येऊन मंथरेला दिली. महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा येत आहेत हे ऐकून मंथरेने नाक मुरडले आणि म्हणाली;"अग कलिके आत्ता कुठे राणी कैकयी यांचा डोळा लागला आहे. जिवावरच्या दुखण्यातून अजून त्या बऱ्या देखील झालेल्या नाहीत. युद्धभूमीवर खूप मोठा पराक्रम आपल्या राणींनी गाजवला हे जितके खरे आहे तेवढेच त्यांचा क्षीण अजून गेलेला नाही हे देखील खरे आहे. मग अशा वेळी त्यांना विश्रांती मिळावी म्हणून ना तुला बाहेर उभे केले होते? तरीही कोणी येत असल्याची वर्दी बरी घेऊन आलीस?" मंथरा अत्यंत कुजबुजत्या आवाजात कलिकेला रागवत असली तरी तिची कुजबुज कैकयीच्या कानापर्यंत पोहोचलीच. कैकयीने मंचकावर उठून बसण्याचा प्रयत्न करीत विचारले;"कोण आहे ग तिथे मंथरे? कोणाशी बोलते आहेस?" त्यावर एक जळजळीत कटाक्ष कलिकेच्या दिशेने टाकून मंथरा मंचकाजवळ गेली आणि म्हणाली;"राणी, आपण विश्रांती घेत असल्याने मी या कलिकेला स्पष्टपणे सांगून ठेवले होते की कोणीही आले तरी वर्दी घेऊन आत येऊ नकोस. तुम्हाला आराम वाटेपर्यंत उगाच भेटायला येणाऱ्यांची दगदग नको; असे आपले मला वाटले... तेही तुमच्यावरील माझ्या श्रद्धेमुळे."

मंथरेकडे मऊ नजरेने पाहात कैकयी म्हणाली;"मंथरे, मी विवाह करून अयोद्धेमध्ये आले ते तुला माझी पाठराखीण म्हणून घेऊनच. त्यामुळे तुझी माझ्यावरचा श्रद्धा आणि माझ्यावरील प्रेम याविषयी मला कदापिही संशय नाही. माझ्या मातेने माझी पाठवणी करताना मला म्हंटले होते की मंथरा तुला तुझी इच्छा असेपर्यंत साथ देईल.... आणि खरं सांगायचं तर इथे आल्यावर सर्वच नवीन असताना आणि दोन थोरल्या सवती असताना तुझं असणं मला कायम हवसं वाटलं. सुरवातीला स्त्रीसुलभ भावनेने मला माझ्या सवती आवडल्या नाहीत. त्यामुळे आपण दोघींनी सुरवातीला त्यांच्याबद्दल खूप काही अयोग्य चर्चा देखील केली. त्याकाळात महाराज केवळ माझे असावेत आणि त्यांनी केवळ माझ्या अंत:पुरात यावं ही माझी इच्छा होती. मात्र मी जसजशी मोठी होत गेले तसे मला महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा यांच्या मोठ्या मनाचा उलगडा होत गेला. त्यांच्याबद्दल मनात असलेली अढी देखील पुसली गेली. त्यांच्याविषयी आदरपूर्ण प्रेमभाव माझ्या मनात निर्माण झाले. आज मला माझ्या सवती या माझ्या थोरल्या भगिनींप्रमाणे आहेत. मात्र तुझ्या मनातील अढी मात्र मी काढू शकले नाही. कितीदा तुला सांगितले की मनात काही एक विचार कायमचा धरून ठेऊ नये. मात्र तुला ते समजत नाही... काय करावे? जाऊ दे! महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा मला भेटण्यासाठी येत असल्या तर तू कलिकेबरोबर बाहेर जाऊन थांब आणि त्या दोघींना आदराने आत घेऊन ये बरं!" कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेने मान खाली घातली आणि ती अंत:पुराबाहेर जाऊन उभी राहिली. महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा येताच त्यांना आदरपूर्वक तिने राणी कैकयीच्या अंत:पुरात आणले आणि त्या स्थानापन्न होताच ती केशरयुक्त दुधाचे पेले आणण्यास बाहेर पडली.

राणी कैकयीच्या मुदपाक घराकडे जाताना मंथरेच्या डोळ्यासमोरून आजवरचा तिचा जीवनपट पुन्हा एकदा झरझर जाऊ लागला. जेमतेम नऊ वर्षांची होती मंथरा; जेव्हा तिची माता तिला घेऊन अश्वपती महाराजांच्या महालात आली. महाराजांच्या बाजूलाच काहीशी मोठी दिसणारी एक खूपच सुंदर मुलगी राज वस्त्रे आणि कधी न पाहिलेले अलंकार घालून उभी होती.

अश्वपती महाराजांनी मंथरेला जवळ बोलावले आणि विचारले;"बाळ, तुझं नाव काय?"

एकवार आपल्या मातेकडे बघत धीट मंथरा ताठ उभी राहिली आणि म्हणाली;"मी मंथरा... अलका आणि वसू यांची कन्या. महाराज, ही आपणा शेजारी उभी आहे ती कोण?"

मंथरेचा धीटपणा बघून अश्वपती महाराजांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. प्रेमाने आपल्या लाडक्या कन्येच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले;"ही कैकयी. माझी कन्या... या राज्याची राजकुमारी... आणि कैकयी ही तुझी सखी. यापुढे ती कायम तुझ्यासोबत असणार आहे."

हे ऐकताच मंथरेने बावरून जाऊन आपल्या मातेकडे बघितले. तिच्या नजरेतील अस्वस्थता ओळखून महाराज अश्वपती म्हणाले;"मंथरे, तुझी आई कैकयीची दाई आहे. त्याअर्थी तू कैकयीची दुग्ध भगिनी झालीस."

महाराजांच्या मुखातून उच्चारलेले शब्द ऐकताच मंथरेने काहीशा आश्चर्याने परत एकदा कैकयीकडे बघितले आणि महाराजांना विचारती झाली;"मग याचा अर्थ मला देखील असेच उत्तमोत्तम वस्त्र आणि अलंकार मिळणार का?" महाराजांना तिच्या या प्रश्नाचे खूपच आश्चर्य वाटले. कारण हा प्रश्न विचारण्याइतकी ती मोठी नव्हती. पण काहीसे हसत त्यांनी म्हंटले;"कैकयीने उतरवलेली आणि तिला नको असणारी सारी वस्त्रे आजपासून तुझी मंथरे. कैकयी आपणहून तुला तिचे जे अलंकार देईल ते देखील तुझे होतील. अट मात्र एकच... यापुढे संपूर्ण आयुष्यात तू कैकयीची साथ सोडणार नाहीस.... आणि तुझ्या मनात कायम फक्त आणि फक्त कैकयीच्या सुखाचा, आनंदाचा आणि उत्कर्षाचा विचार असेल. बोल काबुल आहे?"

कैकयीच्या अंगावरील त्या तलम वस्त्रांकडे आणि अभूतपूर्व अलंकारांकडे पाहात मंथरेने होकारार्थी मान हलवली. मागे वळूनही न बघता तिने आपल्या मातेला म्हंटले;"जा तू माते. तुला आता यापुढील आयुष्यात माझी चिंता करायची गरज नाही. माझ्या इतर बंधू-भगिनींची काळजी कर तू... यापुढे मंथरा कायम सुखीच असेल." त्यानंतर एक पाऊल पुढे येऊन महाराजांना लावून प्रणाम करून तिने कैकयीकडे बघितले आणि हसून म्हणाली;"राजकुमारी, आपण अत्यंत सुंदर आहात. मी आयुष्यभराची तुमची सखी झाले यात मी माझा गौरव समजते. आपण यापुढे जे म्हणाल ते मला प्रमाण असेल."

महाराज अश्वपतींना क्षणात मंथरेच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आला आणि त्यांनी मनात ही खूणगाठ बांधली की आपल्या सरळ आणि अत्यंत भावनिक कैकयीसाठी अगदी योग्य सखी मिळाली आहे. यापुढे कैकयीची काळजी करण्याचे कारण उरलेले नाही. कधी काळी जर कैकयीने भावनेच्या आवेगात काही निर्णय घेतला तरी मंथरा कैकयीसाठी योग्य आणि तिच्या सुखाचा विचार करून कैकयीला तिचा निर्णय बदलायला लावेल. कारण मंथरेला 'सुखाची व्याख्या' फारच लहान वयात कळली आहे.

असेच दिवस जात होते. कैकयी आणि मंथरा आता अगदी जवळच्या सख्या झाल्या होत्या. कैकयीला मंथरेशिवाय अजिबात करमत नसे. त्यामुळे अलीकडे तर मंथरा कैकयीच्या सोबत कायम असे. कैकयीने आपल्या तातांकडे हट्ट करून मंथरेसाठी एक खास राखीव असा भाग स्वतःच्या अंत:पुरात करून घेतला होता. त्यामुळे कैकयी झोपली की मग मंथरा तिच्या मंचकाच्या दिशेने जात असे आणि सकाळी दोघीही एकत्रच सूर्य नारायणाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरवात करीत असत.

कैकयी आता मोठी झाली होती आणि तिचा विवाह अयोध्येचे महापराक्रमी महाराज दशरथ यांच्यासोबत ठरल्याप्रमाणे मोठ्या थाटामाटात पार पडला. कैकयीने अयोध्येला येताना आग्रहपूर्वक मंथरेला सोबत आणले; आणि मंथरा देखील आनंदाने कैकयी सोबत पुन्हा एकदा अखंडित ऐहिक सुख उपभोगण्यासाठी आली.

मात्र कैकयीची जवळीक प्रेमळ आणि सौम्य स्वभावाच्या महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्राशी होऊ लागताच मंथरा मनातून अस्वस्थ झाली. तिने कितीही प्रयत्न केला तरी मूळच्या भावुक स्वभावाच्या कैकयीचा महाराणी कौसल्या आणि राणी सुमीत्रेच्या दिशेने वाढणारा ओढा ती कमी करू शकत नव्हती. सरते शेवटी मंथरेने विचारपूर्वक पावले उचलण्यास सुरवात केली.... आणि....

महाराज दशरथ अनेक दिवसांनंतर राणी कैकयीच्या अंत:पुरात येणार असल्याचा निरोप द्वारपाल घेऊन आला आणि राणी कैकयी आनंदाने शृंगाराच्या तयारीला लागली. तिने तिच्या सर्वच दासींना बोलावून घेतले. उत्तमोत्तम उटणी करून घेऊन कैकयीने अभ्यंग स्नान केले. मूलतः लांब आणि सुंदर असा केशसंभार सुगंधित धूप घालून वाळवून घेतला आणि कुशल दासिकडून अत्यंत मोहक अशी केशरचना करून घेतली. विचारपूर्वक तलम आणि मोहक वस्त्र आभूषणे चढवली. मंथरा देखील कैकयीच्या पुढे-मागे करत तिला शृंगार करण्यासाठी मदत करत होती. सौंदर्यवती तर राणी कैकयी होतीच; परंतु आजचा तिचा साज-शृंगार शब्दातीत होता. महाराज येण्याची वेळ झाल्याने ती अत्यंत व्याकुळपणे ती महाराजांची वाट पाहू लागली.

महाराजांना काही कारणाने उशीर होऊ लागला आणि अजून वयाने लहान असलेल्या आणि आजवर मनात येईल ती इच्छा लगेच पूर्ण होण्याची सवय असलेल्या राणी कैकयीला होणारा हा उशीर समजून घेणे शक्य होत नव्हते. एक एक घटिका पुढे सरकत होती आणि राणी कैकयी हिरमुसली होऊन आपल्या शृंगारातील एक एक आभूषण उतरवून ठेवत होती. मंथरा देखील राणी कैकयी सोबत तिच्या अंत:पुरात होती. ती राणीला मदत करण्याच्या बाहण्याने तिच्या जवळ गेली आणि केवळ राणीला ऐकायला येईल अशा प्रकारे म्हणाली;"राणी, आपणास एक सांगायचे होते. आपण माझ्याबाबतीत मनात किंतु आणणार नसाल तरच सांगीन म्हणते." राणी कैकयी आपल्याच भावनांच्या आवेगात असल्याने त्यांनी केवळ एक कटाक्ष मंथरेच्या दिशेने टाकला; तीच परवानगी समजून मंथरा म्हणाली;"कालच मी महाराणी सुमित्रा यांच्या महालाजवळून जात होते त्यावेळी त्यांच्या खास दासीला मी भेटले. तिला अवेळी महालाबाहेर उभे पाहून मी सहज विचारले की महाराणींच्या या विश्रांतीच्या वेळी तू इथे बाहेर काय करते आहेस? महाराणींची सेवा करण्यास आत का नाही गेलीस? त्यावर ती सटवी माझ्याकडे बघत ओठ मुडपत म्हणाली, आज खुद्द महाराज महाराणींची सेवा करण्यास आले आहेत; मग माझे काय काम? मला तर तिचा असा राग आला होता.... पण तुम्ही मला कितीही मान दिलात तरी शेवटी मी पडले दासी. काही एक न बोलता तिथून निघाले."

मंथरेचे बोलणे ऐकून राणी कैकयीच्या भृकुटी ताणल्या गेल्या. त्यावर सारवासारव केल्याच्या आवाजात मंथरा म्हणाली;"राणी आपण महाराणी कौसल्यांसाठी मनात किंतु आणू नये. त्यांची विश्रांतीची वेळ असताना महाराज अचानकच गेले त्यांच्या महालात. काल जे झाले ते झाले; पण आज महाराजांनी येतो म्हणून निरोप देऊन देखील न येणे योग्य नाही. अर्थात त्यासाठी आपण त्यांच्यावर राग धरणे जरी योग्य असले तरी आपण असे करू नका. महाराजांना फारच वाईट वाटेल त्याचे." मंथरा अजूनही काही बोलली असती मात्र त्याचवेळी महाराज येत असल्याचा निरोप घेऊन एक दासी धावत आली आणि मंथरा त्वरेने अंत:पुरातून बाहेर पडली. बाहेर पडणाऱ्या मंथरेकडे कोणाचेही लक्ष नव्हते आणि ते एका अर्थी तिच्यासाठी चांगलेच होते. कारण युद्ध जिंकल्याचा भाव मंथरेच्या चेहेऱ्यावर होता.

क्रमशः

Friday, April 17, 2020

धात्री (भाग 2) (शेवटचा)

धात्री (भाग 2) (शेवटचा)

राजकुमारीच्या उत्साहाने भरलेल्या आवाजामुळे मी काही क्षण स्थब्ध झाले. परंतु ऋषी दुर्वास कसे आहेत याची राजकुमारीला कल्पना नसावी असा माझा कयास होता. त्यामुळे मी तिच्या उत्साहाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे तिला सांगण्याचा प्रयत्न केला."राजकुमारी, ऋषी दुर्वास अत्यंत तापट म्हणून प्रसिद्ध आहेत; याची तुला कल्पना आहे का?" त्यावर हसत कुंती म्हणाली;"धात्री, दाई, मला ते कसे आहेत याची पूर्ण कल्पना आहे. तू कदाचित त्यांच्याबद्दल आज ऐकलं असशील. पण मी पिताजींकडून; महाराज कुंतीभोजांकडून त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं आहे. ते तापट जरूर आहेत; पण त्यांच्या रागाला कारण असते. केवळ राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी शाप दिला; असं नाही आहे बरं!" राजकुमारीच्या या बोलण्यावर मी काय बोलणार होते? कितीही म्हंटले तरी शेवटी मी एक दाई होते; याचे मला पूर्ण भान होते. बोलता बोलता राजकुमारी थांबली आणि तिची नजर माझ्याकडे वळली. कदाचित माझा चेहेरा तिला काहीतरी सांगत असावा. कारण मंचावरून उठून ती माझ्याजवळ चालत आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,"अर्थात, मला तुझी काळजी कळते आहे धात्री. पण तू खरंच चिंता करू नकोस. त्यांना राग येईल असं मी काहीही वागणार नाही." कुंतीचं बोलणं ऐकून देखील माझ्या मनाचे समाधान होत नव्हते.  मात्र तिने तिचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता यावर जास्त काही बोलणे योग्य नाही; हे माझ्या ध्यानात आले होते. मी मनातच निश्चय केला की काहीही झाले तरी राजकुमारी कुंतीची पाठ क्षणभरासाठी देखील सोडायची नाही. माझ्या या निश्चयामुळे असेल; पण मनात काहीसं हायसं वाटलं.

दुसऱ्या दिवशी पहाटेच्या प्रथम प्रहरी राजकुमारी कुंती स्नान उरकून तिच्या महालाच्या द्वारात उभी होती. तिला बघून मी देखील आश्चर्यचकित झाले. अत्यंत साधी अशी शुभ्र वस्त्र तिने परिधान केली होती आणि अगदीच मोजके मोत्यांचे दागिने अंगावर घातले होते. कोणत्याही दासीच्या मदतीशिवाय तिला तयार झालेले पाहून माझ्याप्रमाणेच इतर दासींना देखील आश्चर्य वाटले. ती रागावलेली आहे की काय असा विचार करून नीला तिची खास दासी पुढे झाली आणि म्हणाली."राजकुमारी आपण मला हाक का नाही मारलीत? मी इथेच तर महालाच्या द्वाराबाहेर बसले होते. तुम्ही उठलात ते कळलेच नाही. नाहीतर तशीच आत येऊन तुम्हाला तयारीला मदत केली असती."

त्यावर तिच्या खांद्यावर थोपटल्या सारखे करून राजकुमारी कुंती हसली आणि म्हणाली;"अग, अशी काही खास तयारी करायचीच नव्हती; म्हणून नाही हाक मारली तुला. बरं, आता लक्षात ठेव; जोपर्यंत ऋषी दुर्वास आहेत तोपर्यंत मला तयारीला मदतीची गरज नाही आहे. तेव्हा तू उगाच माझ्या महालाबाहेर जागरणं करत बसू नकोस." राजकुमारीच्या या बोलण्यापुढे नीला काहीच बोलली नाही. होकारार्थी मान हलवून ती मागे झाली. माझ्याकडे एकवार हसरा कटाक्ष टाकून राजकुमारी ऋषींच्या कुटीच्या दिशेने निघाली. मी देखील तिच्या सोबत काही अंतर राखून निघाले. मी तिला सोबत करते आहे हे लक्षात आल्यावर राजकुमारी मागे वळली आणि माझ्याकडे पाहात म्हणाली;"धात्री, तू देखील पहाटेच्या या पहिल्या प्रहरी उठायची गरज नाही बर का! ऋषी दुर्वास असे पर्यंत मी एकटीच जाणार आहे त्यांच्या कुटीमध्ये. तिथून परत कधी येईन ते माझे मलाच माहीत नाही. त्यामुळे तू उगाच कष्ट कशाला घेतेस? काहीसा आराम कर; आणि सकाळी येत जा तिथे." राजकुमारीच्या त्या बोलण्यावर हसून मी उत्तर दिले;"राजकुमारी, मी इथे कुंती नगरीमध्ये तुमची दाई म्हणून आले आहे. मी तुमची आई नाही याची मला कल्पना आहे; तरीही मी माझी दाईची कर्तव्य विसरलेले नाही. जिथे तुम्ही... तिथे ही धात्री. आता चलावं राजकुमारी. नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर झाला एवढे कारण देखील ऋषी दुर्वासांना पुरेसे होईल कोप पावायला." माझ्या नजरेतील निर्धार लक्षात आल्याने माझ्याकडे हसून पाहात राजकुमारी कुंती ऋषी दुर्वासांच्या कुटीच्या दिशेने चालू पडली.

राजकुमारी कुटीमध्ये शिरण्यासाठी वाकली आणि मी देखील तिच्या मागे जाईन याची कल्पना असल्याने तिने मागे न बघताच मला बाहेर थांबण्याची खूण केली. मी देखील काहीएक न बोलता कुटीच्या द्वारापाशीच थांबले. राजकुमारी आत गेली आणि काही क्षणातच बाहेर आली. तिची मुद्रा अजूनही हसरीच होती. तिने ओठांवर बोट ठेवत मला न बोलण्याची खूण केली आणि मला घेऊन ती पुष्पवटीकेच्या दिशेने निघाली. काही अंतर गेल्यानंतर राजकुमारी मला म्हणाली;"धात्री, तू बाहेर आहेस याची ऋषींना कल्पना आलेली आहे असे दिसते. त्यांनी मला पुष्प गोळा करून आणण्यास सांगितले आणि म्हणाले; 'मी असेपर्यंत मी सांगितलेली कामे फक्त तूच करशील अशी माझी अपेक्षा आहे; राजकुमारी.' मला वाटतं मला कोणत्याही कामात कोणीही मदत करू नये असंच त्यांना सुचवायचं आहे." राजकुमारीचं म्हणणं ऐकून मी स्तब्ध झाले. ऋषी दुर्वास हे त्यांच्या तामस स्वभावासाठी जसे ओळखले जायचे तसेच ते आंतरज्ञानी होते हे देखील मला माहीत होते. त्यामुळे राजकुमारी बरोबर सतत राहायचे एवढेच मी त्याक्षणी ठरवले.

रोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी तयार होऊन ऋषींच्या कुटिकडे जाणे हा राजकुमारीचा दिनक्रमच झाला. ते सांगतील ती सर्व कामे; मग ती कितीही अवघड किंवा कष्टप्रद असली तरी; राजकुमारी विना तक्रार एकटीनेच पूर्ण करत असे. ऋषी जवळ जवळ एक मासापेक्षा देखील जास्त दिवस सतत हवन करत होते. त्यांनी कधी उच्चरवाने तर कधी मंद्र आवाजात उच्चारलेले मंत्र मला कुटीबाहेर ऐकू येत असत. ते कधीही कोणत्याही गोष्टीची मागणी करतील किंवा कोणतीही आज्ञा करतील म्हणून राजकुमारी कुंती त्यांची आज्ञा होईपर्यंत त्यांच्याच कुटीमध्ये थांबत असे. मात्र एक दिवस असा उगवला की संध्यासमयी ऋषींच्या कुटीतून बाहेर येऊन राजकुमारीने मला सांगितले की ऋषींचा यज्ञ पूर्ण झाला आहे; आणि तिने केलेल्या अविरत सेवेवर ऋषी दुर्वास अत्यंत खुश झाले आहेत. हे ऐकून मी त्या विधात्याला मनोमन हात जोडले. आता ऋषींची मनीषा पूर्ण झाली असल्याने दुसऱ्यादिवशी राजकुमारीला लवकर उठण्याचे काहीच प्रयोजन नाही असे माझ्या मनात आले. तिला तिच्या अंत:पुरात सोडताना 'आता काही दिवस पूर्ण आराम कर राजकुमारी'; असे सांगून मी बाहेर पडले. बाहेर नीला माझीच वाट बघत बसली होती. "कशा आहेत आता राजकुमारी? उद्या देखील लवकर जायचे आहे का त्यांना?" मला पाहाताच तिने मला तिचा नेहेमीचा प्रश्न विचारला. राजकुमारी रोज आपणहून तयार होत असली तरी नीला रोज पहाटेच्या प्रथम प्रहरी तिच्या अंत:पुराबाहेर हजर असे; हे मला माहीत होते. त्यामुळे तिच्याकडे हसत बघत मी म्हणाले;"राजकुमारी बरी आहे. फारच दमली आहे. ऋषी दुर्वासांचा मानस पूर्ण झाला आहे. त्यामुळे उद्या पहाटे राजकुमारीला जावे लागणार नाही. तू देखील आज आराम कर. उद्या कोणतीच घाई नाही." माझे बोलणे ऐकून नीलाने हलकेच निश्वास सोडलेला मला जाणवला.

दुसऱ्या दिवशी काहीशी उशिराच मी राजकुमारी कुंतीच्या महालाकडे निघाले. बघते तर नीला तेथे अगोदरच उपस्थित होती. तिला पाहून मला फारच आश्चर्य वाटले. "अग, तू आज सकाळीच हजर कशी?" तिच्या जवळ जात मी विचारले. त्यासरशी आपल्या उरावर हात ठेऊन मोठे डोळे करत ती म्हणाली;"दाई धात्री, राजकुमारींना ऋषी दुर्वासांकडून बोलावणे आले भल्या पहाटे. त्यामुळे नेहेमीप्रमाणे उठून राजकुमारी ऋषींच्या कुटिकडे गेल्या आहेत." हे ऐकताच माझ्या काळजात धडकी भरली. मी लगोलग ऋषी दुर्वासांच्या कुटीच्या दिशेने निघाले. मी तिथे पोहोचले आणि समोरून राजकुमारी कुंती येताना दिसली. तिच्या जवळ जात मी तिचा चेहेरा न्याहाळला. मी तिच्या बाजूला आल्याचे तिच्या लक्षात देखील आले नव्हते. आपल्याच विचारात चालत ती तिच्या महालाकडे निघाली होती. मी तिच्या खांद्याला स्पर्श करून तिला थांबवले. तशी तिने माझ्याकडे वळून बघितले. मला पाहाताच मोकळेपणी हसत ती म्हणाली;"माई, काही मंत्र मनात कायमचे घर करून बसतात नाही?" राजकुमारी अत्यंत भावुक झाली की मला 'माई' म्हणून हाक मारत असे. त्यामुळे तिच्या हसऱ्या डोळ्यांमध्ये बघत मी म्हणाले;"हो पोरी. पण हे असे अचानक का बरे तुझ्या मनात आले?"

त्यावर अनेक दिवसांनंतर आपल्या वयाप्रमाणे खळखळून हसत ती म्हणाली;"असंच ग. आज ऋषी दुर्वासांनी मला आशीर्वाद देण्यासाठी बोलावले होते. माझ्या डोक्यावर हात ठेऊन काही मिनिटं ते डोळे मिटून बसून होते. त्यांनी त्यांचा हात बाजूला केला आणि तेव्हापासून माझ्या मनात एक मंत्र रुंजी घालतो आहे. ते तातांना न भेटताच तसेच निघून गेले. निघताना मला एवढेच म्हणाले की 'मी दिलेला हा मंत्र योग्य वेळी आणि नीट विचार करून वापर. या मंत्राच्या केवळ उच्चाराने तू विश्वातील कोणत्याही शक्तीला तुझ्या कह्यात करू शकशील.' मला त्याविषयी अजून जाणून घ्यायचे होते. काही प्रश्न विचारायचे होते. मात्र ऋषी तडक निघून गेले ग." हे सर्व सांगताना राजकुमारी खूपच मोकळी आणि आनंदी दिसत होती. तिच्या मनावर कोणतेही दडपण नव्हते हे मला जाणवले.

ऋषी दुर्वास गेले आणि ते असताना कोणताही अनर्थ झाला नाही याचा मला खूपच आनंद झाला होता. त्यात हसऱ्या आणि खुशीत असलेल्या राजकुमारीला बघून तर माझ्या मनातील सगळ्या चिंता दूर झाल्या. तिला जवळ घेऊन तिचा चेहेरा कुरवाळत मी म्हणाले;"राजकुमारी, तू एका आदर्श कन्येप्रमाणे तुझ्या पित्याची इभ्रत राखली आहेस. यासाठी तू खूपच मेहेनत घेतली आहेस. रोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी उठावे आणि दिवसभर ऋषींच्या आज्ञेची वाट पाहात त्यांच्या कुटीत बसावे यामुळे तू पूर्णपणे कोमेजून गेली आहेस. त्यामुळे आता काही दिवस पूर्ण विश्राती घेणे तुला गरजेचे आहे." माझे बोलणे ऐकून राजकुमारी देखील खुदकन हसली आणि म्हणाली;"खरं आहे. मी विचार करते आहे की पिताजींनी माझ्यासाठी गंगेकिनारी जो महाल बांधून दिला आहे तेथेच काही दिवस जाऊन राहावे. तुला काय वाटते धात्री? महाराज मला परवानगी देतील का?" त्यावर हसत मी म्हणाले;"अग, तू त्यांची एकुलती आणि लाडकी लेक. त्यात तू ऋषी दुर्वासांना संतुष्ट केले आहेस. महाराज आनंदाने तुला तेथे राहण्याची परवानगी नक्की देतील." हे ऐकून राजकुमारी खुशीत हसली आणि तिच्या महालाच्या दिशेने निघाली.

महाराज कुंतीभोजांनी राजकुमारी कुंतीला तिच्या गंगेकिनारच्या महालात जाऊन राहण्याची परवानगी लगेच दिली. मोठ्या आनंदाने राजकुमारीने काही दासींना आणि मला घेऊन महालाच्या दिशेने कूच केले. आम्ही गंगेकिनारी पोहोचलो आणि सर्व दास-दासींना कामे नेमून देणे, बल्लवाचार्यरांना स्वयंपाकाविषयी सूचना देणे, राजकुमारीचे अंत:पूर तिला आवडणाऱ्या रंगांच्या पडद्यांनी आणि आकर्षक पुष्परचनांनी सुशोभित करणे यात माझा सगळा दिवस गेला. तो संपूर्ण दिवस राजकुमारी मात्र काही मोजक्या दासींना घेऊन गंगेच्या पाण्यामध्ये पोहत-डुंबत होती. आदित्य नारायणाच्या कलतीच्या किरणांच्या उजेडात मी गंगेकिनारी राजकुमारीजवळ पोहोचले. त्यावेळी सर्व दासी किनाऱ्यावर बसून राजकुमारीची वाट बघत होत्या. राजकुमारी मात्र एकटीच गंगेच्या पाण्यामध्ये आदित्य नारायणाकडे तोंड करून उभी होती. मी पाण्यात शिरून तिच्या जवळ जाऊन उभी राहिले. माझी चाहूल लागताच माझ्याकडे वळून बघत राजकुमारी काहीशा गूढ आवाजात म्हणाली;"धात्री, हा अंतर्धान पावणारा अग्निगोल किती सुंदर, किती देखणा वाटतो नाही का?" त्यावर एकदा त्या पश्चिमेकडे कललेल्या आदित्याकडे पाहून मी हसून हो म्हणाले आणि राजकुमारीला आग्रह पूर्वक नदीतून बाहेर यायला लावून महालाच्या दिशेने प्रयाण करवले.

राजकुमारी रोज गंगेच्या किनारी दिवसभर जाऊन बसत असे. कधी त्या खळाळत्या पाण्यात पोहावे, कधी अंगावर सूर्यकिरणे घेत प्रासादाच्या पायऱ्यांवर पडून रहावे... असा तिचा दिवस जात होता. चौथ्या दिवशी मी राजकुमारीच्या महालाच्या दिशेने निघाले होते त्यावेळी कुंती नगरीमधून कोणी निरोप्या महाराजांचा निरोप घेऊन आल्याची वर्दी नीलाने मला दिली. माहाराजांनी दिलेले निरोपाचे भूजपत्र निरोप्याने माझ्या हातात दिले. ते घेऊन मी राजकुमारीच्या माहालात पोहोचले. राजकुमरीने ते भूजपत्र वाचले आणि म्हणाली;"धात्री, महाराजांना माझी आठवण येत आहे. त्यामुळे त्यांनी परत बोलावले आहे. परंतु मला अजून काही दिवस इथे राहावेसे वाटते आहे. त्यामुळे तू स्वतः जा नगरीमध्ये आणि महाराजांना अजून काही दिवस इथे राहण्याची परवानगी घे. तूच स्वतः गेलीस म्हणजे ते नक्की परवानगी देतील."

आजवर एकही दिवस राजकुमरी कुंती मला सोडून राहिली नव्हती. जरी आज आत्ता या क्षणी मी नगराकडे जायला निघाले असते तरी देखील महाराजांना भेटून आणि राजकुमारीचा मानस सांगून परवानगी मिळवायला मला एक दिवस लागला असता. तरीही तिने मलाच जायला सांगितले हे पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. मात्र आता राजकुमारी वयात आली होती... तिला कधीतरी तिच्या वयाच्या या दासींमध्ये राहावेसे वाटत असावे असे वाटून मी तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आणि कुंती नगराच्या दिशेने लगेच निघाले.

महाराज कुंतीभोजांना भेटून मी राजकुमारी कुंतीच्या मनीची इच्छा त्यांना सांगताच त्यांनी लगेच परवानगी दिली. त्यांची अनुमती घेऊन मी तशीच तडक राजकुमारी कुंतीकडे गंगा किनारीच्या माहाली पोहोचले. मी राजकुमारीला भेटायला गेले त्यावेळी संध्या समय झाला होता. आदित्य नारायण कधीच क्षितिजाआड गेले होते. त्यामुळे राजकुमारीचा महाल दिपांनी उजळून गेला होता. राजकुमरी एकटीच तिच्या मंचावर पहुडली होती. मी तिच्या जवळ पोहोचले आणि म्हणाले;"राजकुमारी, महाराजांनी तुला इथे जितके दिवस हवे तितके दिवस राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे..........." माझे पुढील शब्द माझ्या घशातच अडकले. मंचावर पहुडलेल्या राजकुमारीकडे पाहाताच काहीतरी वेगळे घडून गेल्याची जाणीव मला झाली. मी राजकुमारी कुंतीच्या मंचकाच्या एका बाजूला बसून राजकुमारीच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला आणि तिला मऊ आवाजात विचारले;"काय झाले आहे राजकुमारी?" माझे मऊ शब्द कानी पडताच राजकुमारीचा बांध फुटला आणि माझ्या मांडीमध्ये डोके खुपसून ती हमसून हमसून रडू लागली. तिला थोपटत मी तशीच तिथे बसून राहिले. मन शांत झाल्यावर राजकुमारी मंचावर उठून बसली आणि बोलू लागली....

"माई, आज मी तुला जे सांगणार आहे ते आयुष्यात केवळ तुझ्यापुरतेच मर्यादित राहील याची मला पूर्ण खात्री आहे... माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे... आणि तरीही मी तुझ्याकडे एक वचन मागते आहे....." राजकुमरीचे शब्द माझे काळीज चिरत गेले. तिला पुढे काहीही बोलू न देता मी म्हणाले;"कुंती.... मी ज्याक्षणी तुझ्या सोबत कुंती नगराकडे मार्गस्थ झाले त्याक्षणी माझे आयुष्य तुझे झाले. आता मला आठवत देखील नाही माझा असा काही भूतकाळ होता.. माझे भविष्य संपूर्णपणे तुझ्याच आयुष्यात गुंतले आहे. त्यामुळे तू निश्चिन्त राहा. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचून विरून जाणार आहे." माझे बोलणे ऐकून राजकुमारीचे डोळे परत एकदा भरून आले. तिने बोलायला सुरवात केली....

"माई, तुला आठवते ऋषी दुर्वासांनी जाताना मला आशीर्वाद दिला होता आणि त्या दिवसापासून माझ्या मनात एक मंत्र रुंजी घालतो आहे; असे मी म्हणाले होते? ऋषी दुर्वासांनी मला तो मंत्र आशीर्वाद म्हणून दिला होता आणि म्हणाले होते की या मंत्राच्या केवळ उच्चाराने मी विश्वातील कोणत्याही शक्तीला माझ्या कह्यात करू शकेन. माई, त्यांचे ते शब्द सतत माझा पाठलाग करत होते. आपण इथे आल्यापासून एकीकडे तो मंत्र माझ्या मनात रुंजी घालत होता... ऋषी दुर्वासांचे ते शब्द... आणि आल्यापासून मला भुरळ घातलेला तो तेजोमय शक्तीचा आदित्य नारायण! तू गेल्यानंतर संपूर्ण वेळ मी गंगेकिनारीच होते. सांजसमयी मावळतीची किरणे माझ्या कायेला स्पर्श करून सुखावत होती. तू रोजच्या प्रमाणे मला माहालात घेऊन जाण्यासाठी येणार नाही आहेस हे मला माहीत होते. त्यामुळे मी सोबतच्या दासींना महालाकडे पाठवून त्या मावळतीच्या तेजगोलाकडे पाहात तशीच बसून राहिले...... आणि........ आणि माझ्याही नकळत मी ऋषी दुर्वासांनी दिलेला तो मंत्र उच्चारला. त्याक्षणी माझ्यामनी तो केशर रंगाचा, मोहक, तेजोमय शक्तीचा गोल केवळ होता. अचानक आजूबाजूचे वातावरण तापायला लागले. मला कळेना नक्की काय होते आहे... माई, मी खूप घाबरले. तुला मी मनाच्या गाभ्यातून हाक मारली ग! पण माझी हाक माझ्या मनातून देखील बाहेर पडली नाही. कारण माझ्या भोवती त्या अग्निगोलाची मोहक आणि हवीहवीशी मिठी पडली होती. माई, तो आदित्य नारायण.... तो विश्वाला व्यापुनही उरलेला, सौंदर्याचा धनी मला मिठीत घेऊन उभा होता. आणि माझी भीती गळून पडली. माई, मी त्याच्या त्या तेजोमय शक्तीसौंदर्यात विरघळून गेले.... त्याची झाले!!! किती घटका गेल्या मला माहीत नाही. परंतु मी भानावर आले त्यावेळी मी इथेच याच मंचकावर होते. दासी माझ्या सांजसमयीचे दीपक प्रज्वलित करत होत्या... आणि तू आलीस."

राजकुमारी कुंतीचे बोलणे ऐकून मी धास्तावून गेले. राजकुमारीच्या त्या तेज:पुंज चेहेऱ्यावरील क्लांत आणि तरीही परमोच्य सुखाने नाहून निघालेले भाव मी समजून चुकले होते. मात्र जे घडून गेले होते त्याची राजकुमारीला कल्पना आहे की नाही हे मला समजत नव्हते. त्यामुळे तिला जवळ घेत हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी म्हणाले;"कुंती, पुत्री, काय घडून गेले आहे याची तुला कल्पना आहे का?" त्यावर कालवर खळखळत्या झऱ्याप्रमाणे हसणारी-बोलणारी माझी कुंती एकदम गंभीर होऊन म्हणाली;"धात्री, कालच्या एका रात्रीमध्ये मी मोठी झाले आहे. मी चुकले आहे याची मला कल्पना आहे. केवळ एका मोहाच्या क्षणी आणि लहान वयात मिळालेल्या मंत्ररूपी आशीर्वादाचे महत्व न कळल्यामुळे मी अग्नीलाच माझ्या ओटीमध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे काय घडून गेले आहे ते मला कळते आहे... मात्र आता माझ्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हा मोठा प्रश्न आहे."

राजकुमारीचे बोलणे ऐकून मी स्थब्द झाले. राजकुमारी कुंतीचे भविष्य हे केवळ तिचे नव्हते; तर त्यासोबत महाराज शूरसेन यांनी दिलेल्या संस्कारांचे आंदण, महाराज कुंतीभोज यांच्या आशांचे कुंभ आणि पुढे जाऊन राजकुमारीच्या आयुष्यात पती म्हणून येणाऱ्या कोणा महाप्रतापी राजाचे देखील होते. मी राजकुमारीला शांत केले आणि म्हणाले;"राजकुमारी कुंती, आता तुम्ही मोठ्या झाला आहात. त्यामुळे मी काय बोलते आहे ते नीट समजून घ्या. तुम्ही म्हणालात ते सत्य आहे. तुमच्या ओटीमध्ये त्या तेजोमय शक्तीच्या आनंदसूर्याने त्याचा अंश घातला आहे. हे तुमच्या इच्छेने घडले नसले तरी तुमच्या मंत्रोच्चारांमुळे घडले आहे. जे घडून गेले आहे ते बदलणे आता शक्य नाही; मात्र आता यापुढे आपण जो निर्णय घेऊ तो तुमच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरणार आहे."

माझे बोलणे मध्येच थांबवित राजकुमारी कुंती म्हणाल्या;"धात्री, मला मान्य आहे की तो मंत्र मी उच्चारल्यामुळे हे घडले आहे. मी माझ्या भविष्याची जवाबदारी नाकारत नाही. म्हणूनच मी याक्षणी या माहालातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत मला फक्त तू हवी आहेस. बाकी मला काही नको. यापुढील आयुष्य मी दूर कोणा अनोळखी नगरीत माझ्या या बाळासोबत एकटीने घालवण्यास तयार आहे."

राजकुमारीचे बोलणे ऐकून मी खिन्नपणे हसले. माझे हसणे पाहून राजकुमारी गोंधळली. "दाई, मी काही चुकीचे बोलले का? या अंकुराची जवाबदारी माझीच आहे न?" तिने माझ्या डोळ्यात पाहात विचारले. तिच्या डोळ्याला डोळा देत मी उत्तर दिले;"नाही राजकुमारी... तुमच्या ओटीमध्ये वाढणाऱ्या अंकुराची जवाबदारी तुमची नाही. तो अंकुर तुमच्या ओटीमध्ये घालणाऱ्या त्या आदित्य नारायणाची आहे ती जवाबदारी. तुमचं अल्लड वय आणि ऋषींनी दिलेल्या मंत्राचे अप्रूप यामुळे तुम्ही त्या तेजशक्तीला बोलावलेत. मात्र तुम्हाला जवळ करणारा तो तर पूर्ण विचारी होता. त्याला देखील तुमचा मोह पडलाच ना. मग या मोहाची जवाबदारी त्याची आहे. राजकुमारी, एक लक्षात घ्या की तुमची पहिली जवाबदारी तुम्ही ज्या कुळात जन्मला आहात आणि आता ज्या कुळाचे नाव लावता आहात... त्या दोन्ही कुळांच्या सन्मानाची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कुळाच्या विस्तारासाठी विवाह कराल त्यांच्या सन्मानाची ठरते... आणि मग सरते शेवटी जर तुमचे आयुष्य तुमच्यासाठी म्हणून शिल्लक उरलेच तर तुमच्या या क्षणिक उत्सुकतेपाई केलेल्या मोहाच्या जवाबदरी तुम्ही घेऊ शकता. आता उठा... आपण आत्ताच कुंती नगराकडे प्रस्थान करूया. तुमच्या ओटीतील अंकुराच्या खुणा जोपर्यंत जाणवणार नाहीत तोपर्यंत आपण कुंती नगरीमध्ये राहणार आहोत. तेथे राहात असतानाच तुम्ही तुमच्या तातांना, कुंतीभोज माहाराजांना, पटवून देणार आहात की तुम्हाला गंगेकिनारी राहण्याची इच्छा झाली आहे आणि पुढील काही माह या महालात राहून तुम्ही गंगेची आराधना करणार आहात. कुंतीभोज महाराजांना हे पटले की आपण दोघी येथे येऊन राहणार आहोत. तुमचे दिवस भरले की योग्य वेळी तुम्ही प्रसूत व्हाल.... आणि...."

"आणि? आणि मग काय धात्री???... माझ्या ओटीतून जन्मलेल्या त्या अंकुराचे काय धात्री? बोल न..." राजकुमारी कुंती डोळ्यात अश्रू आणून मला विचारत होत्या.

त्यांच्या त्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांकडे शांतपणे पाहात मी म्हणाले;"आणि मग त्यावेळी जे योग्य असेल ते राजकुमारी.... सध्या तरी मी जे सांगते आहे ते आणि तेवढेच करा." एवढे बोलून मी शांतपणे राजकुमारीच्या मंचकावरून उठले आणि तिच्या अंत:पुरातून बाहेर पडले. मला माहीत नव्हते की मी जे सांगितले आहे ते राजकुमाराला कितीसे पटले आहे; मात्र मला एका गोष्टीची खात्री होती की राजकुमारी माझे नक्की ऐकेल. आम्ही परत कुंती नगरीमध्ये आलो. राजकुमारीमध्ये आता अचानक खुपच बदल घडला होता. तिचा अल्लडपणा कुठल्याकुठे पळाला होता. ती अचानक पोक्त झाली होती. स्वतःला सांभाळत तिच्यात होणारे बदल कोणालाही कळणार नाहीत अशा प्रकारे ती आता माहालात वावरायला लागली होती. मी तिच्या सोबत सावलीसारखी राहात होते. पहाता-पहाता चार मास उलटून गेले. अलीकडे राजकुमरीची चाल बदलायला लागलेली काही अनुभवी दासींच्या लक्षात येऊ लागले होते; याची मला जाणीव झाली. मग मात्र मी राजकुमारीकडे घाई केली आणि राजकुमारीने महाराज कुंतीभोजांना पटवून दिले की तिला गंगा आराधना करायची असल्याने काही मास ती गंगेकिनारी असलेल्या महालात जाऊन राहणार आहे. महाराजांनी परवानगी देताच अगदीच मोजक्या तरुण दासींना सोबत घेऊन मी आणि राजकुमारी गंगे किनारी आलो. येथे आल्यानंतर राजकुमारी मनाने काहीशी आश्वस्त झाली. दिसा-मासाने राजकुमारीच्या ओटीमधील अंकुर वाढत होता आणि राजकुमारीचा मूळचा मोहक चेहेरा तेज:पुंज होऊ लागला होता. तिची कांती सुर्याप्रमाणे तळपू लागली होती.

राजकुमारीचे दिवस पूर्ण भरले होते. ती कोणत्याही क्षणी प्रसूत होणार होती. त्यामुळे मी आता माझा मुक्काम तिच्या अंतःपुरात हलवला होता. कोणत्याही दासीला आत येण्याची परवानगी नव्हती. एका रात्री बाहेरचे वातावरण ढवळून निघालेले होते; विजा कडकडत होत्या. गंगेच्या पाण्याला उधाण आले होते. मिट्ट काळोख दाटून आला होता. मी राजकुमारीचा हात हातात घेऊन तिच्या मंचाजवळ बसले होते. राजकुमारी अस्वस्थपणे पहुडली होती. उत्तर रात्री राजकुमारीला कळा येऊ लागल्या. तिचा श्वास कोंडला गेला.... मी सतत तिच्या बाजूला उभी राहून तिला येणाऱ्या कळांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्या विश्वनियंत्याकडे प्रार्थना करत होते. पहाटेच्या पहिल्या प्रहराची जाणीव झाली आणि त्याचवेळी राजकुमारी कुंती माता झाली. तिने एका तेज:पुंज, अप्रतिम सुंदर अशा बालकाला जन्म दिला होता. त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मी उचलून घेतले आणि माझे लक्ष त्याच्या कानांकडे गेले. ते तेजोमय अर्भक जन्मतःच सुंदर मांसल आणि रक्तवर्ण तेजाने चमकणारी कुंडले घेऊन जन्मले होते. बालकाची नाळ त्याच्या आईपासून तोडताना मला अतोनात कष्ट झाले आणि माझ्या लक्षात आले की हे असाधारण अर्भक केवळ जन्मजात कुंडलेच नाही तर अंगभूत कांतीमध्येच कवच धारण करून आले आहे. निसर्गाचा हा चमत्कार मी आयुष्यात कधी ऐकला न्हवता आणि पहिल्यांदाच पाहात होते. प्रसूत कळांमधून सुटका होताच क्लांत असूनही राजकुमारी कुंती उठून बसली आणि तिने अतीव प्रेमाने तिच्या त्या पहिल्या पुत्राला पाहण्यासाठी माझ्याकडे मागितले.

क्षणभरासाठी राजकुमारीच्या त्या मातेच्या प्रेमाने भरलेल्या डोळ्यांकडे मी बघितले आणि मग त्या अर्भकासह कुंतीकडे पाठ करत म्हणाले;"राजकुमारी, तुम्ही विसरता आहात की या अर्भकाची जवाबदारी खुद्द त्या आदित्य नारायणाची आहे; तुमची नाही. कदाचित म्हणूनच त्याचा जन्म पहाटेच्या प्रथम प्रहरी झाला आहे. तुमची अशी काही जवाबदारी असलीच तर; त्या अग्निगोलाने दिलेला अंकुर आपल्या उदरी नऊ माह वाढवून आणि त्याला सुखरूपपणे जन्म देऊन तुमची जवाबदारी तुम्ही पूर्ण केली आहे... आता यापुढे या अर्भकाचे काय करायचे ते त्याचा पिताच काय ते पाहून घेईल. त्याला पाहण्याचा आग्रह धरू नका. कारण एकदा तुम्ही त्याला बघितलेत तर मग ममतेच्या मोहाने किमान एकदा तरी त्याला पदराखाली घेण्याचा मोह तुम्हाला होईल; आणि मग मात्र त्याला दूर करणे तुम्हाला शक्य होणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की तुमची जवाबदारी तुम्ही ज्या कुळात जन्मला आहात आणि आता ज्या कुळाचे नाव लावता आहात... त्या दोन्ही कुळांच्या सन्मानाची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कुळाच्या विस्तारासाठी विवाह कराल त्यांच्या सन्मानाची ठरते... आणि मग सरते शेवटी जर तुमचे आयुष्य तुमच्यासाठी म्हणून शिल्लक उरलेच तर तुमच्या या क्षणिक उत्सुकतेपाई केलेल्या मोहाच्या जवाबदरी तुम्ही घेऊ शकता. मी या अर्भकाला आता याक्षणी हिरे-मोत्यांनी सजवलेल्या पेटीकेमध्ये घालून गंगेमध्ये सोडून देणार आहे. यापुढे या बालकाचे आयुष्य हे त्याच्या ललाटावर लिहिलेल्या भविष्याप्रमाणे घडेल. तुम्ही काळजी करू नका... जन्माबरोबरच शरीरावर कवच-कुंडले घेऊन आलेला हा बालक तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात नक्की भेटेल. कसा... कुठे... कधी... ते मला सांगता येणार नाही... मात्र माझे मन सांगते आहे की तो तुम्हाला नक्की भेटेल. सावरा स्वतःला.... मी जाऊन येते."

असे म्हणून मी चालू पडले. त्याक्षणी कुंतीने मोठ्याने हंबरडा फोडला आणि ती मंचकावरून उठून माझ्या दिशेने येऊ लागली. तिला जवळ येऊ न देताच मी तिला थांबवले आणि अत्यंत कठोर शब्दात म्हणाले;"कुंती, मागे हो! स्त्रीचे आयुष्य हे तिच्या इच्छेनुसार आणि मर्जीनुसार घडत नसते; हे स्वीकार. या एका पुत्राच्या मोहापायी तू किती जणांचे आयुष्य, इभ्रत, आशा-आकांशा, स्वप्न पणाला लावते आहेस याचा विचार कर. त्या सर्वांना निराश करून या बालकासोबत जगणे तुला शक्य होणार आहे का? मला अडवू नकोस कुंती..." माझे शब्द तिचे काळीज चिरत गेले होते याची मला कल्पना होती. परंतु तरीही मागे वळूनही न बघता मी त्या मोहक अर्भकासह गंगेच्या किनारी पोहोचले. अगोदरच तयार करून ठेवलेल्या सुंदर पेटीकेमध्ये मी त्याला ठेवले आणि ती पेटी गंगेच्या प्रवाहात सोडून दिली.

पुढे पुढे जाणाऱ्या त्या पेटीकेकडे टक लावून पाहताना मात्र माझे डोळे भरून आले. हात जोडून मनोमन मी त्या बालकाची, त्या तेज:पुंज शक्तीयुक्त आदित्य नारायणाची आणि माझ्या प्रिय कुंतीची माफी मागून मी परत एकदा आयुष्याच्या पुढील जवाबदरीचे ओझे उचलण्यासाठी राजकुमारीच्या महालाच्या दिशेने पाऊल उचलले.

समाप्त