Friday, May 31, 2019

अशीही एक गोष्ट

अशीही एक गोष्ट

कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली.

"Hey! I really mean it. I really love you." रोहनने तिच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करत आर्जवी स्वरात तिला सांगितले.

"Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली.

रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली.

****

मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा. रोहनला मोजकेच मित्र होते आणि ते ही सगळे एकदम करियर ओरियेंटेड! त्यांच्याबरोबर राहून रोहन देखील सतत पुढे काय शिकायचं आणि कसं शिकायचं याचा विचार करत असे आणि तेवढंच बोलत असे.

बारावीनंतर मितालीने पॅरामेडिकल विषय घेतले आणि रोहनने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. दोघांचे रस्ते वेगळे झाले. आता त्यांचं भेटणं अगदीच होईनास झालं. मितालीच अधून-मधून मुद्दाम रोहनला भेटायला घरी यायची. पण ती आली म्हणून रोहन हातातली कामं सोडून कधी तिच्याबरोबर बसला नाही. शिक्षण होत होते. मिताली ग्रॅज्युएट झाली आणि रोहन इंजिनिअर.

रिझल्टच्या दुसऱ्याच दिवशी रोहनच्या वडिलांनी त्याला विचारलं,"मग आता आपल्या ऑफिसमध्ये कधीपासून येणार आहेस?"

त्यांनी हा प्रश्न विचारला आणि रोहनने घरात मोठा बॉम्ब फोडला. "बाबा, आई.... आजी....

 मी लंडनला जाणार आहे. मला अजून शिकायचे आहे. मी फक्त बावीस वर्षांचा आहे. मला अजून शिकायचं आहे. मुख्य म्हणजे इतक्या लवकर बाबांबरोबर कामाला लागलो तर मग मी माझं आयुष्य कधी जगायचं?"

त्याच्या या निर्णयाने घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मात्र त्यावर कोणीही काहीही बोललं नाही. "बर! शिक हवा तेवढा." अस म्हणून वडिलांनी विषय संपवला.

दुसऱ्या दिवसापासून रोहनची धावपळ सुरू झाली. लंडनच्या सर्वात चांगल्या  युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोर्ससाठी त्याने स्कॉलरशिप मिळवली आणि जाण्याची तयारी सुरू केली.

एकदिवस संध्याकाळी त्याची आई त्याच्या खोलीत आली आणि म्हणाली,"रोहन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मोकळा आहेस का?"

आई हे असं का विचारते आहे ते रोहनच्या लक्षात येईना. त्याने हातातले काम बाजूला ठेवले आणि आईचा हात धरून तिला पलंगावर बसवले आणि म्हणाला,"आई, मला माहित आहे की माझ्या जाण्याच्या निर्णयाने तुम्ही फारसे खुश नाही आहात. माझ्याशी कोणी धड बोलतही नाही आहे. पण आई, मला खरच अजून शिकावस वाटत आहे. इतक्या लवकर बाबांच्या व्यवसायात मला नाही पडायचं."

त्यावर हसून अशी म्हणाली,"रोहन, आमचं तुझ्या अजून शिकण्याबद्दल काहीच हरकत नाही. मला तुला दुसरंच काहीतरी विचारायच आहे."

तिच्या शेजारी बसत रोहन म्हणाला, "आई, असं फॉर्मल नको बोलुस. विचार न तुला काय विचारायचं आहे ते."

आईने रोहनच्या थेट डोळ्यात बघत त्याला विचारले,"रोहन, तुझा मितालीच्या बाबतीत काय विचार आहे? तू जाण्या अगोदर असपन साखरपुडा करून घ्यायचा आहे की लग्नच उरकून टाकायचं आहे? म्हणजे ती देखील येईल तुझ्याबरोबर लंडनला."

आईच्या त्या प्रश्नाने रोहन चक्रावूनच गेला. हे अचानक मितालीच काय आहे? आपण तर असा विचारही केलेला नाही. मग आईला असं का वाटावं?

त्याने आईकडे गोंधळून बघत विचारलं,"आई, हे साखरपुडा-लग्न काय बोलते आहेस?"

आता गोंधळून जायची पाळी आईची होती. तिने प्रश्नार्थक नजरेने रोहनकडे बघितले आणि म्हणाली,"अरे रोहन; तुझं आणि मितालीच एकमेकांवर प्रेम आहे न? नाहीतर ती तुझ्या खोलीत येऊन तासंतास का बसायची? तुम्ही इतक्या काय गप्पा मारायचात? अरे, तुम्ही दोघे लहानपणापासून एकत्र आहात; बारावीनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी तुमचं भेटणं तसंच राहिलं. तुला कोणी नवीन मैत्रीण नाही; ती हक्काने आपल्या घरी येते... काय समजावा आम्ही याचा अर्थ?"

"आई, याचा अर्थ इतकाच की आमची चांगली मैत्री आहे." रोहन थोडा वैतागून म्हणाला. नेमकं त्याचवेळी मिताली त्याच्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली होती. तिला पाहून रोहनची आई पलंगावरून उठली आणि खोलीबाहेर गेली. जाताना तिने मितालीच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले.

आई बाहेर जाताच मिताली खोलीत शिरली आणि रोहनच्या पुढ्यात उभी राहिली. "रोहन, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला इतके दिवस वाटत होतं की तुझ्याही मनात माझ्याबद्दल अशाच भावना आहेत."

मितालीच्या या अचानक स्पष्ट बोलण्याने रोहन गडबडला. मात्र तिच्या समोर उभा राहात तो म्हणाला,"मिताली, तू माझी एकदम खास मैत्रीण आहेस. मात्र सध्या तरी माझ्या मनात पुढच्या शिक्षणाव्यरीरिक्त दुसरा कोणताही विचार नाही."

त्याच्या डोळ्यात डोळे घालून मिताली क्षणभर उभी राहिली आणि मग शांतपणे म्हणाली,"रोहन, I understand. काहीच हरकत नाही. तू जा लंडनला शिकण्यासाठी. मला देखील अजून दोन वर्षे पुढचं शिक्षण घ्यायला लागतीलच. मात्र मला एका प्रश्नच उत्तर दे. कधीतरी तर तू नक्कीच लग्नाचा विचार करशील ना? त्यावेळी किमान तुझ्या मनातल्या माझ्याबद्दलच्या भावना मला सांगशील का?"

तिच्या बोलण्याने का कोणास ठाऊक पण रोहनला सुटल्यासारखे वाटले. तिच्याकडे बघत तो म्हणाला,"नक्की मिताली. लंडनचं शिक्षण संपवून मी परत येण्याचा विचार करतो आहे. एकदा शिक्षण संपलं की मला देखील छान लग्न करून संसार करायचा आहे. त्यामुळे आपल्यात काहीतरी घडू देखील शकतं हं."

त्याचं उत्तर ऐकून मिताली मनापासून हसली.

रोहन लंडनला गेला आणि त्याचं शिक्षण सुरू झालं. नवीन शहर, नवे मित्र, नवं आयुष्य! रोहन जणूकाही मगच सगळं सोडून आला होता. परदेशातल आयुष्य तो तिथल्याच पद्धतीने जगू लागला होता. पाहाता पाहाता दोन वर्ष सरली आणि रोहनचं शिक्षण संपलं. मात्र कॅम्पस इंटरव्युमध्ये रोहनला लंडनमधील एका खूप चांगल्या कंपनीकडून उत्तम ऑफर आली. पुढचा-मागचा विचार न करता त्याने ती स्वीकारली. घरी कळवून टाकले की अजून एक वर्ष अनुभव घेण्यासाठी तो लंडनलाच राहणार आहे.

त्याच्या आईने त्याला फोनवरून आठवण करून दिली की त्याने तिला शब्द दिला होता की तो शिक्षण संपताच परत येईल. रोहनने आईला समजावले की या नोकरीच्या अनुभवाचा उपयोग त्याला पुढे व्यवसायात खूप होईल. त्याच्या त्या बोलण्याने आई निरुत्तर झाली.

रोहनची नोकरी सुरू झाली. बघता बघता दिवस...  महिनेच काय पण फोन वर्षे देखील उलटून गेली. सुरवातीला एकदा रोहनचे आई-वडील दोघांनी आणि मग एक-दोन वेळा आईने त्याला परत येण्याबद्दल विचारले. मात्र "मी अजून काहीही ठरवलेले नाही;" असे उत्तर देऊन रोहनने विषय संपवला.

असेच दिवस जात होते आणि रोहनच्या ऑफिसमध्ये एक मुलगी जॉईन झाली. तिचं नाव कॅटी होते. रोहनची आणि कॅटीची दोस्ती फारच पटकन झाली. दोस्तीचं प्रेमात रूपांतर कधी झालं दोघांच्याही लक्षात आलं नाही. कॅटी तशी एकटीच राहात असल्याने ती दोन-तीन महिन्यातच रोहनच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली.

आता दोघांच्या रिलेशनशिपला सहा महिने हकुन गेले होते. एका शनिवारी संध्याकाळी रोहनने फिरंगीपद्धतीने कॅटीला लग्नाची मागणी घातली., भर रस्त्यात एका गुडघ्यावर बसत त्याने तिला अंगठी दिली. कॅटीने देखील ती अंगाठी स्वीकारत लग्नाला होकार दिला.

रोहनने लगेच आई-वडिलांना त्याच्या लग्नाची बातमी दिली. ते दोघे देखील त्याला आणि कॅटीला आशीर्वाद द्यायला लंडनला आले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते परत जायला निघाले. रोहनची इच्छा होती की त्यांनी अजून काही दिवस राहावं. पण वडिलांनी त्याला सांगितलं,"रोहन, तुला मध्ये कळवलं होत ते आठवत का? अरे, तुझ्या आजीची तब्बेत अलीकडे ठीक नसते. त्यामुळे आम्ही लगेच परत गेलेलंच बरं. त्यात तुझं नवीन लग्न झालं आहे. उगाच आमची अडचण नको."

यावर रोहन काहीच बोलला नाही. लग्न सोहळा असा काही नव्हताच. कॅटीच्या इच्छेप्रमाणे चर्चमध्ये लग्न झाले आणि दुसऱ्याच दिवशी रोहनचे आई-वडील भारतात परतले.

रोहन त्याच्या आयुष्यावर भलताच खुश होता. तो आणि कॅटी एकत्र ऑफिसमध्ये जायला बाहेर पडत आणि एकत्र येत. आता अनेक वर्षे परदेशात राहिल्यामुळे रोहनने तिथली जीवनपद्धत स्वीकारली होती. सगळं सुरळीत चाललं होतं. अशीच तीन वर्षे उलटली आणि एका सकाळी कॅटीने रोहनला गोड बातमी दिली. ती आई होणार होती आणि रोहन वडील! रोहनचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने त्याच्या आईला लगेच फोन करून कळवले आणि कॅटीच्या बाळंतपणासाठी येण्याचा आग्रह केला. आईने देखील लगेच होकार दिला. कॅटी शेवटच्या महिन्यापर्यंत ऑफिसला जाणार होती; त्यामुळे रोहनने आईला नवव्या महिन्यातच यायला सांगितले.

रोहनच्या इच्छेप्रमाणे त्याची आई कॅटीला नववा महिना लागल्यावर आठ दिवसांनी आली. रोहनचे वडील देखील तिच्याबरोबर आले होते. अजून 3 आठवडे वेळ होता आणि कोणताही त्रास होत नव्हता त्यामुळे कॅटी अजूनही ऑफिसला जात होती.

दुसऱ्या दिवशी रोहनच्या आईने कॅटीला सांगितले की आता काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे जास्त दमणे योग्य नाही. जर कॅटी घरी राहिली तर तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खायला घालायची रोहनच्या आईची इच्छा होती. मात्र कॅटीला हे अजिबात मान्य नव्हते. तिने रोहनला स्पष्ट शब्दात सांगितले,"माझे बाळंतपण हा माझा वयक्तिक प्रश्न आहे. तुझी इच्छा म्हणून तु तुझ्या आई-वडिलांना बोलावले आहेस. त्यामुळे त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा तू पूर्ण कर. ती माझी जवाबदारी नाही. फारतर डिलिव्हरी नंतर मी परत कामाला जायला लागेन तेव्हा बाळाला सांभाळायला तुझी आई राहिली तर चालेल. मात्र तिने हे विसरू नये की ती माझ्या घरात राहाते आहे. त्यामुळे या घरातल्या नियमांप्रमाणे तिला राहावे लागेल. मात्र बाळ जन्मले की तुझ्या वडिलांनी परत गेले पाहिजे. बाळ असताना घरात इतकी माणसं असलेली मला चालणार नाही."

कॅटीच्या बोलण्याने रोहन एकदम स्थब्द झाला. ती असं काही सांगेल असं त्याला कधीच वाटले नव्हते. वडिलांना एकट्याला परत जायला सांगणे त्याच्या जीवावर आले होते. त्यामुळे डिलिव्हरी नंतर बघू; असा विचार करून तो गप्प बसला.

यथावकाश कॅटी बाळंत झाली आणि तिला एक गोंडस मुलगी झाली. बाळ आणि बाळंतीण अगदी व्यवस्थित होते. कॅटीला हॉस्पिटलमधील तिच्या रूममध्ये आणल्यानंतर रोहन आणि त्याचे आई-वडील घरी परतले. अजूनही रोहनच्या मनातली द्विधा मनस्थिती संपलेली नव्हती. आपण केवळ आपल्या वडिलांना परत जाण्यासाठी कसं सांगायचं; याचा विचार करत तो सोफ्यावर बसला होता.

त्याचवेळी त्याचे वडील त्याच्याशी बोलण्यासाठी आले. रोहनच्या लक्षात आले की बाहेर येताना त्यांनी त्यांची सुटकेस देखील आणली आहे. एकीकडे त्याला खूप आश्चर्य वाटले आणि त्याचवेळी मनात खोल कुठेतरी सुटल्यासारखे देखील वाटले. चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत त्याने वडिलांना विचारले,"अरे बाबा, असे अचानक कुठे निघालात तुम्ही?"

त्यावर त्याच्याजवळ येऊन त्याच्या खांद्यावर थोपटत त्याचे वडील म्हणाले,"रोहन, मी आणि तुझ्या आईने भारत तर बराच बघितला आहे. पण संसार-व्यवसाय यामुळे भारताबाहेर कधी फिरता नाही आले. आता मात्र असे नाही. मी गेल्याच वर्षी माझा व्यवसाय विकून टाकला. खूपच चांगली किंमत मिळाली आहे. घर तर आहेच. आमचा दोघांचा असा खर्च फार नाही. त्यामुळे मनात युरोप बघायची खूप इच्छा होती; ती आता मी पूर्ण करणार आहे."

वडिलांच्या बोलण्याने रोहन गोंधळून गेला. "पण बाबा, तुम्ही असे अचानक एकटेच कसे फिरणार आहात?" त्याने विचारले.

त्यावर हसत त्याचे वडील म्हणाले,"अरे एकटा कुठे? मी आणि तुझी आई दोघेही बघणार आहोत युरोप. अरे, तिनेदेखील खूप केलंय आयुष्यभर. आपल्याकडे नातेवाईक किती यायचे तुला आठवतं का? तिने कधीच तक्रार केली नाही... उलट सगळ्यांना जोडून घेतलं. पण माझं मात्र तिच्याकडे खूपच दुर्लक्ष झालं. आता कोणतीच जवाबदारी नाही.... बांधिलकी नाही. त्यामुळे आम्ही मोकळेपणी फिरणार आहोत. मी एका टूर कंपनीकडून सगळं बुकिंग करून घेतलं आहे. त्यामुळे तू आमची काळजी करू नकोस."

आई देखील वडिलांबरोबर जाणार हे ऐकून मात्र रोहन गडबडला. बाहेर येणाऱ्या आईकडे जाऊन तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला,"आई, अग कॅटी नुकतीच बाळंतीण झाली आहे. तिला हे सगळंच नवीन आहे. त्यावेळी तिला तुझ्या मदतीची गरज आहे ग. असं अचानक नको जाऊस तू."

रोहनच्या हातावर थोपटत आई म्हणाली,"रोहन, अरे इथली टेक्नॉलॉजी इतकी पुढारलेली आहे की तिला माझी गरजच लागणार नाही."

"अग, तरीपण.... घरच्या मोठ्या बाईचं असणं किती महत्वाचं असतं. आता हे सगळं मी काय सांगू तुला?" रोहन काकुळतीला येऊन म्हणाला.

त्यावर त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेत आणि मंद हसत आई म्हणाली,"अरे, लंडनच्या घरात मोठ्या बाईच्या असण्याने किंवा नसण्याने फार फरक नाही पडणार. पण जर आता मी ह्यांच्या बरोबर नाही राहिले न तर कदाचित्  आम्ही एकत्र बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत; आणि रोहन, स्वप्न बघणं आणि पूर्ण करण हे तुझ्यातकं चांगलं कोणाला समजणार? नाही का?"

रोहन एकदम स्थब्द झाला. "आई, मला असं का वाटत आहे की तू मला ऐकवून दाखवते आहेस?" रोहनने दुखावलेल्या आवाजात आईला विचारले.

"रोहन तुला असं का वाटतय? तू असं काही केलं आहेस का की मी तुला ऐकवून दाखवावं? बर, ते जाऊ दे. आम्ही निघतो आहोत. आम्हाला सोडायला तू येणार आहेस का?" रोहनच्या आईने त्याला विचारले. त्यावर रोहनने काही म्हणायच्या आत त्याचे वडीलच उत्तरले,"अग, तो हॉस्पिटलमधून दमून आला आहे. त्याला कुठे सोडायला सांगते आहेस? मी गाडी बुक केली आहे. येईलच ती एवढ्यात. तुझं सगळ आटपल आहे न?" त्यावर त्यांच्याकडे हसत बघत रोहनची आई म्हणाली,"होय. कधीचच सगळी बांधाबांध करून ठेवली होती. त्यातूनही काही विसरलेच तर नवीन विकत घेऊ. काय?" त्यावर मनापासून हसत रोहनच्या वडिलांनी त्यांची सुटकेस उचलली.

असेच दिवस जात होते. रोहनची मुलगी ऍना तीन वर्षांची झाली होती. तिला तिच्या आई पेक्षा तिच्या वडिलांचाच जास्त लळा होता. ती सतत रोहनच्या पुढे मागे असायची. रोहन आणि कॅटी ऑफिसला जाताना ऍनाला एका day care senter मध्ये सोडून जायचे. संध्याकाळी रोहन तिला घेऊन घरी यायचा. ऍनाच्या जन्मानंतर रोहन घरी जास्त थांबायला लागला होता. मात्र कॅटीच्या दिनक्रमात फारसा बदल झालेला नव्हता. कॅटीला दर शनिवार-रविवार कुठे ना कुठे जायचे असायचे. अशावेळी कधी ऍनाला घेऊन तर कधी न घेता जायला तिची हरकत नसायची. तिच्या मते day care senter मध्ये ऍना मजेत राहू शकत होती. मात्र रोहनला वाटायचे की एरवी सोमवार ते शुक्रवार आपण खूपच कमी वेळ ऍनाला देतो. मग किमान शनिवार-रविवार आपण तिच्याबरोबर राहाणे आवश्यक आहे.

याविषयावरून अलीकडे कॅटी आणि रोहनमध्ये वाद व्हायला लागले होते. हळूहळू रोहन बाहेर जाण्याचे टाळायला लागला. कॅटी मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबरचे कार्यक्रम अजिबात रद्द करायला तयार नसायची. असच वर्ष उलटलं आणि एका शनिवारी संध्याकाळी कॅटी घरीच थांबली. आज रोहनने ऍनाला बागेत न्यायचे ठरवले होते. त्यामुळे तो त्याची आणि ऍनाची तयारी करण्यात मग्न होता. संध्याकाळ झाली तरी कॅटीला घरात बघून त्याला थोडे आश्चर्य वाटले. त्याने तिच्या जवळ जात तिला विचारले,"Sweetheart, is everything fine with you? Are you not well or sothing?"

त्यावर त्याच्याकडे बघत कॅटी म्हणाली,"Ron, I want to tell you something."

धास्तावून रोहनने विचारले,"What is it dear? Why are you sounding so serious? Am getting worried now. Please tell me is everything fine with you?"

"Don't be so dramatic Ron. Everything is fine with me. Its just that, am really board staying with you. You have changed a lot. You are no more that Ron whome is use to love. You are now only Anni's father. I can't see my husband in you. And so don't wnat to stay with you. I have found someone else in my life. Who really loves me." कॅटीने शांतपणे तिच्या मनातले रोहनला सांगितले. तिचा तो शांतपणा बघून आणि तिचे बोलणे एकून रोहनला त्याच्या कानावर विश्वासच बसेनासा झाला. तो पूर्ण हबकून घेला. त्याने कॅटीचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,"Sweetheart, what are you talking? We have a baby now. its nearly six years that we are together and now suddenly you are saying that you don't want to be in this marrage..... I am totally confused dear. Don't say that. If there's anything that you  want me to change.... I will try and change. But don't leave me and Anaa like this........"

कॅटीच्या मते तिने तिला जे सांगायचे होते ते सांगितले होते. त्यामुळे आता यात अजून काही बोलण्यासारखे किंवा चर्चा करण्यासारखे उरले नव्हते. त्यामुळे तिने तिचे सगळे सामान आवरले आणि घराचा दरवाजा उघडून ती बाहेर पडली.

तिला असे जाताना बघून का कोण जाणे पण रोहन म्हणाला,"Caty I'll wait for you. Some day you will reaslise that me and Anaa love you the most. Am sure then you will come back to me..... I'll wait for that day......................."

.................................................कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली.

"Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले.

"Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली.

रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली.

****

ऍना रोहनचा हात धरून उभी होती. काय चालू आहे हे तिला अजिबात कळले नव्हते. तिची आई अशी नेहेमीच निघून जात असे आणि तिचे वडील तिच्या बरोबर असत. त्यामुळे बॅग घेऊन दूर जाणाऱ्या आईला बघून तिला अजिबात रडायला येत नव्हते. उलट आपले वडील आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत या आनंदात ती होती. त्या लहानग्या बाळाला रोहनच्या मनस्थीतीची अजिबात कल्पना नव्हती. रोहनने स्वतःला सावरले आणि लहानग्या ऍना ला वाईट वाटू नये म्हणून तिला घेऊन तो बाहेर पडला. बगिचामध्ये खेळून ऍना खूपच दमली. घरी आल्यावर जेमतेम दूध प्यायली आणि तिथेच सोफ्यावर झोपून गेली. ऍना झोपली आणि रोहनच्या मनातल्या विचार चक्राने वेग घेतला. आज रोहन खरच मनातून हलला होता... त्यामुळे आजवर जगलेल्या आयुष्याचा विचार त्याच्या मनात येत होता.

आपण खूपच चुकत गेलो... फक्त स्वतःचा विचार करत राहिलो..... या जाणिवेने तो अजूनच अस्वस्थ झाला. त्याने फोन उचलला आणि घरी आईला फोन लावला. रोहनचा आवाज एकून आई एकदम गडबडून गेली. काळजीच्या स्वरात तिने विचारले,"रोहन, काय झालं बाळा? तू ठीक आहेस ना? ऍना आणि कॅटी कशा आहेत?" आईचा काळजी भरलेला आवाज एकून रोहनच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मात्र आवाजावर ताबा ठेवत तो म्हणाला,"अग, सगळ ठीक आहे. आज शनिवार न! ऍनाला फिरायला नेलं होत. ती घरी येईपर्यंत दमली आणि लगेच झोपली. सगळच लवकर आटपल होत आणि सहज तुझी आठवण झाली म्हणून फोन केला."

रोहनला आईने सुटकेचा स्वास सोडलेला ऐकू आला. शांतावलेल्या आवाजात त्याची आई म्हाणाली,"अरे तू असा कधी फोन करत नाहीस ना... म्हणून एकदम काळजी वाटली. पण बर वाटलं एकून की तुला माझी आठवण पण येते. बर ते जाऊ दे! कसा आहेस तू? काही नवीन आहे की नाही सांगण्यासारखं?" त्यावर रोहन म्हणाला,"आई, काही नवीन असेल तरच फोन करायचा का मी?" रोहनला आई हसल्याचा आवाज आला आणि ती म्हणाली,"रोहन, तू सहज म्हणून कधीच फोन करत नाहीस. काही सांगायचं असलं की फक्त तू फोन करतोस. ते ही अगोदर मेसेज करतोस की इतक्या वाजता तू फोन करशील आणि तसाच तुझा फोन येतो. त्यामुळे हे असं तू अचानक आणि ते ही सहज फोन केला आहेस यावर विश्वासच बसत नाही. बर, ते जाऊ दे. बर झालं तू फोन केलास ते. मी विचारच करत होते तुला मेसेज करून फोन करू का विचारायचा. तुला एक बातमी द्यायची होती."

आईने विषय बदलला तशी रोहनला बरे वाटले. त्याने आईला मऊ आवाजात आणि उत्सुकतेने विचारले,"काय बातमी आहे ग?"

रोहनची आई उत्साहाने सांगू लागली,"अरे आमची मिताली ती देखील कालच लंडनला आली आहे. तिचा दोन दिवसांचा सेमिनार होता. पण रहाणार नाही फार. उद्याच निघणार बघ ती परत यायला. सोमवारी बाबांच्या काही टेस्ट करून घ्यायच्या आहेत ना. तर ती म्हणाली मी येते मगच जाऊ. तुला तिचा मोबाईल नंबर पाठवते. वेळ मिळाला तर तिला फोन करशील का? बर वाटेल तिला."

आईचं बोलण एकून रोहन म्हणाला,"आई, बाबांना बर नाही आहे का? आणि मिताली का आणि कशी काय येईल तुमच्या बरोबर?" त्यावर रोहनच्या आईने त्याला सांगितले,"अरे रोहन, मितालीच आमची सगळी काळजी घेते. शेजारीच राहाते ना ती. त्यामुळे सगळ तीच बघते." रोहनला ते एकून आश्चर्य वाटले. "मिताली अजूनही आपल्या शेजारच्या घरातच राहते? ओह!" अस म्हणून तो गप झाला. मग विषय बदलत म्हणला,"अग आई, मी आजच मितालीचा विचार करत होतो आणि तू सांगते आहेस ती इथेच लंडनमध्ये आहे; हा कोणता योगायोग तर नाही ना?" त्याच्या बोलण्यावर हसत त्याची आई म्हाणाली,"रोहन, आज खरच सगळच नकळणारं बोलतो आहेस तू. अरे योगायोग.... आपल्या आयुष्यातल्या माणसांचा विचार करण.... अस सगळ तुझ्या तोंडून ऐकायची सवय नाही रे मला." आईच्या त्या बोलण्याने रोहन दुखावला गेला. मात्र तो त्यावर काहीच बोलला नाही. क्षणभर थांबून त्याची आई म्हाणाली,"तुला मितालीचा नंबर मेसेज करते ह. जमलं तर बोलून घे. चल, ठेवते मी फोन. इथे जवळ जवळ बारा वाजत आले आहेत. आमची झोपायची वेळ झाली आहे. मी समजू शकते; तुला तर भारतीय वेळ लक्षात ठेवण्याची सवयच राहिली नसेल न? चल, गुड नाईट."

आईच्या वाक्-बाणांनी दुखावला गेलेल्या रोहनने फोन ठेवला. काही क्षणातच त्याचा फोन वाजला. त्याने बघितले तर आईने मितालीचा मोबाईल नंबर रोहनला पाठवला होता. रोहन कितीतरी वेळ फोनकडे बघत बसला होता. मितालीला फोन करावा की नाही हा निर्णय तो घेऊ शकत नव्हता. शेवटी अंघोळ करून मग ठरवू तिला फोन करायचा की नाही असा विचार करून रोहन अंघोळीला गेला. तो बाहेर आला तर त्याच्या फोनवर मितालीचा फोन येऊन गेला होता. तिचा मिसकॉल बघून रोहनच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याने फोन उचलला आणि लगेच मितालीला फोन लावला. रिंग वाजत असताना त्याला त्याच्याच हृदयाचे थोडे ऐकायला येत होते. पलीकडून फोन उचललेला रोहनच्या लक्षात आला आणि त्याने श्वास रोखून ठेवला.

त्याला मितालीचा तोच जुना हसरा आवाज ऐकू आला. "रोहन? अरे काकुंचा फोन होता की तू त्यांना आज अचानक फोन करून माझ्याबद्दल विचारलेस. त्यांनी मला सांगितले की त्यांनी तुला माझा नंबर दिला आहे. पण मला खात्री आहे तू काही आपणहून फोन करणार नाहीस. म्हणून मग मीच तुला फोन केला." रोहनच्या मनात आलं मितालीच बोलण अजूनही तसच खळाळत्या झऱ्यासारखं आहे. पूर्वी देखील तीच आपणहून येऊन बोलायची....

त्याच्या मनातले विचार थांबत नव्हते. परत त्याला मितालीचा आवाज ऐकू आला. "अरे रोहन? आहेस की फोन ठेवलास? बोल की! गप बसायला फोन अटेंड केला आहेस का? हा माझा भारतातला नंबर आहे बाबा. त्यामुळे मला रोमिंग चार्जेस पडतात. तुझी शांतता ऐकायला नाही मी फोन केला." इतकं बोलून मिताली खळखळून हसली.

आपण अजूनही काहीच बोललेलो नाही हे लक्षात येऊन रोहन ओशाळला आणि म्हणाला,"कशी आहेस मिताली? अचानक लंडनला कशी काय? कसला सेमिनार आहे तुझा?"

"अरे अचानक नाही... आता तिसऱ्यांदा येते आहे गेल्या दोन वर्षात. मी प्रोफेसर झाले आहे बाबा. एका विषयावर लेक्चर द्यायला आले होते. बर, ते जाऊ दे. मी उद्या दुपारच्या विमानाने परत जाते आहे. त्यागोदर तुला भेटता येणार आहे की आपण फोनवरच बोलायचं आहे?" मितालीने त्याला स्पष्ट प्रश्न केला. त्यावर रोहन तिला म्हणाला,"मिताली मला खरच भेटायला आवडलं असत. पण कॅटी नाही आहे आणि ऍना झोपली आहे. शनिवारी संध्याकाळी अचानक बेबी सीटर नाही मिळणार." त्यावर हसत मोकळेपणी मिताली म्हणाली,"अरे काहीच हरकत नाही. भेटायची इच्छा असणे महत्वाचे. बाकी सगळे जमवता येते. तुला नाही जमत तर मी येते तुझ्या घरी. पत्ता मला मेसेज कर."  त्यावर आनंदून रोहन "ठीक आहे;" म्हणाला आणि त्याने लगेच मितालीला त्याचा पत्ता मेसेज केला.

रोहनला खरच अगदी मनापासून मितालीला भेटायचं होत. त्याने आजवर केलेल्या सगळ्या चुकांची माफी मागायची होती. त्यामुळे तो अधीर मनाने मितालीची वाट बघत होता. त्याने ऍनाला हलकेच उचलून तिच्या पलंगावर नेऊन ठेवले. तसे घर आवरलेलेचे होते. तरी देखील परत एकदा सगळे निट जागेवर आहे की नाही ते बघितले. पहाता पहाता दोन तास होऊन घेले. अजूनही मिताली आली नव्हती. शेवटी त्याने तिला फोन लावला आणि तिने फोन उचलताच विचारले,"अग, येते आहेस ना? मी वाट बघतो आहे. कुठे अडकलीस की पत्ता शोधायला अडचण आली?" त्यावर हसत हसत मिताली म्हणाली,"अरे काही तासांची वाट बघायला लागली तर तू इतका अस्वस्थ झालास. इतरांना तर तू आयुष्यभर वाट बघायला लावली आहेस.... त्याचा कधी विचार केला आहेस का?" तिच्या त्या बोलण्याने रोहन एकदम गप झाला. तशी अजूनच जोरात हसत मिताली म्हणाली,"चल दार उघड. 'तुझ्या वाट बघतो आहे;' या फोनची वाट बघत गेला अर्धा तास तुझ्या घराबाहेर थांबले आहे."

तिच्या त्या बोलण्याने मात्र रोहन अगदीच गळून गेला. आज तो कॅटीच्या अचानक जाण्याने मनातून दुखावलेला होता; त्याला त्याच्या आजवरच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला होता. त्याला मनापासून मितालीची माफी मागायची होती. मात्र ती फोनवर बोलताना त्याला जे टँट्स मारत होती त्यामुळे तो खूपच घायाळ झाला होता. तो मुकाटपणे उठला आणि दार उघडले. त्याच्या समोर मिटली उभी होती. अंगाने थोडी भरली होती. पण छान दिसत होती. तिला चक्क चष्मा लागला होता आणि तिने साडी नेसली होती. रोहनने दार उघडताच तिने त्याला शेकहॅन्ड केले आणि ती हसत हसत त्याच्या घरात शिरली.

रोहनने दार बंद केले आणि तो देखील मागे वळला. मिताली त्याचं घर कौतुकाने बघत होती. "रोहन, सुंदर सजवलं आहेस ह घर. तुझी आवड की कॅटीची?" मितालीने अगदी मनापासून दाद दिली. त्यावर रोहनने शांतपणे उत्तर दिले. "दोघांची. तिला जे आवडत ते ती आणते आणि मला जे आवडत ते मी."

"अरे वा! म्हणजे तू इथली फ्री आणि ओपन संस्कृती चांगलीच आत्मसाद केली आहेस म्हणायचं. चांगलं आहे तुझ्यासाठी. बर तुझी लेक कुठे आहे? झोपली आहे म्हणाला होतास न? तिला लांबूनच बघितलं तर चालेल का?" मितालीने विचारले. त्यावर तिला ऍनाच्या बेडरूमच्या दिशेने नेत रोहन म्हणाला,"अग तिची झोप शांत आहे. काहीच हरकत नाही. ये न. तिची बेडरूम इथे आहे."

रोहन आणि मिटली दोघेही हलक्याच पावलांनी ऍनाच्या बेडरूममध्ये गेले. ऍना शांत झोपली होती. तिला बघून मितालीच्या चेहेऱ्यावर एक प्रेमळ हसू उमटलं. तिने हळूच पर्समध्ये हात घालून एक छानसं टेडी बेर बाहेर काढलं आणि ऍनाच्या शेजारी ठेवलं. मग दोघेही बाहेर आले आणि सोफ्यावर बसले.

रोहनला कळेना काही वेळापूर्वी आपल्याला मितालीला भेटायची घाई झाली होती आणि आता ती समोर बसली आहे पण तिच्याशी काय बोलावं ते का सुचत नाही. मिताली देखील तिच्या विचारात गढलेली होती. काही क्षण असेच शांततेत गेले. रोहनने एकदम मितालीला विचारले,"कॉफी घेणार का मिताली?" त्याच्या प्रश्नाने मिताली तंद्रीतून जागी झाली आणि प्रसन्न चेहेऱ्याने म्हणाली,"हो! नक्की घेणार. संपूर्ण दिवस सेमिनारमध्ये बोलून आणि गप्पा मारून कंटाळा आला आहे. मस्त स्ट्रॉंग कॉफी कर."

तिने हो म्हणताच रोहन कॉफी करायला उठला. त्याच्याबरोबर उठत मिताली म्हणाली,"चल, मी पण येते आत. म्हणजे आपल्या गप्पा होतील. नाहीतर तू कॉफी घेऊन येईपर्यंत मी एकटी बसले तर मला झोप येईल."

दोघेही आत आले आणि रोहन कॉफी करायला लागला. मिताली ओट्याला टाकून उभी होती. ती त्याच्या हालचाली निरखत होती. काही क्षण शांततेत गेले आणि मिताली म्हणाली,"रोहन, काय झालं आहे? तू इतका अस्वस्थ का आहेस?" तिच्या प्रश्नाने रोहन थोडासा गडबडला. पण तसे न दाखवता तो म्हणाला,"मी अस्वस्थ वगैरे काही नाही ग. आज आईशी बोलायला फोन केला होता. त्यावेळी तुझा विषय निघाला. आई म्हणाली तू इथेच आहेस; आणि तिने तुझा नंबर दिला. मी तुला फोन करणारच होतो. पण त्यागोदर तुझाच फोन आला."

त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मिताली म्हाणाली,"रोहन, जर तुला काही सांगायचे नसेल तर माझा आग्रह नाही. मात्र तू असा अचानक न कळवता-न ठरवता आईला फोन करणार नाहीस. समजा केलासच तर माझ्याबद्दल विचारण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे नक्की काहीतरी झाले आहे.... असा माझा कयास आहे. बाकी तुझी मर्जी." मिताली शांत आणि स्पष्ट आवाजात म्हणाली.

तिचे बोलणे एकून मात्र रोहनचा धीर सुटला आणि डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याच्या डोळ्यात पाणी बघून मिताली पुढे झाली आणि तिने त्याच्या खांद्याला थोपटले. तिच्या प्रेमळ स्पर्शाने तर रोहनचा बांधच फुटला आणि तो हमसून हमसून रडू लागला. मितालीने त्याला प्यायला पाणी दिले आणि त्याचा हात धरून त्याला बाहेर सोफ्यावर बसायला घेऊन आली. बराच वेळ रोहन स्फुंदून स्फुंदून रडत होता आणि मिताली त्याच्या शेजारी बसून त्याला थोपटत होती. थोड्या वेळाने रोहन शांत झाला आणि त्याने डोळे पुसत मितालीकडे बघितले. त्याने वर बघताच मिताली प्रसन्न हसली आणि म्हणाली,"झालं का मन थोडं मोकळ? मग आता बोल. किती आणि काय काय मनात साठवलं आहेस?"

रोहनने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला,"मिताली, मी तुमच्या सगळ्यांचाच गुन्हेगार आहे ग. आज मला प्रामाणिकपणे सगळ सांगून टाकायचं आहे. मिताली, तू म्हणाली होतीस की तू माझी वाट बघशील. आपल्यात काही होऊ शकतं अशी आशा देखील मी तुला दाखवली होती. मात्र मी लग्न ठरवलं आणि केलं देखील; मला एक मुलगी देखील झाली पण मला तुझी एकदाही आठवण झाली नाही. मी आईला शब्द दिला होता की मी शिक्षण झाल्यावर परत येईन, नंतर म्हणालो की नोकरीचा अनुभव घेऊन येईन.... आणि बाबांचा व्यवसाय सांभाळीन. पण मी अस काहीच केलं नाही. इथेच राहिलो, इथेच लग्न केलं............ मी सर्वस्वी इथलाच झालो ग. मला आई-बाबांची देखील माफी मागायची आहे. मी मुलगा म्हणून कमी पडलो ग. त्यांना माझी गरज कायम भासली असेल; मात्र त्यांनी ते कधीच बोलून दाखवले नाही. आणि मी स्वतःत इतका मग्न होतो की मी आपणहून ते कधी समजून घेतले नाही. आजीची तब्बेत बरी नसल्याचे बाबांनी कळवले होते त्यावेळी माझी आणि कॅटीची नुकतीच ओळख झाली होती. त्यावेळी जर मी तिला सोडून भारतात आलो असतो तर कदाचित् ती माझी झाली नसती; या भितीमुळे मी बाबांना खोटेच सांगितले की इथे खूप काम असल्याने सुट्टी मिळत नाही आहे. त्यानंतर आई-बाबा आमच्या लग्नाला आले ते देखील मोजून चार दिवसांसाठी. तरीदेखील मी त्यांना राहायचा आग्रह केला नाही. आजी गेली.............. बाबांनी व्यवसाय विकून टाकला.................. अनेक गोष्टी घडत होत्या........ मात्र माझा आणि त्या घटनांचा काहीच संबंध नसल्याप्रमाणे मी फक्त एकून घेत होतो आणि सोडून देत होतो.............. मात्र आज अचानक कॅटी मला सोडून गेली ग आणि माझ उभ आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. मिताली, मी खूप खूप चुकलो ग. मला माफ कर. मी तुला विसरून गेलो आणि तू मात्र माझ्या आठवणींवर राहिलीस... कायम माझ्या आई-वडिलांची काळजी घेतलीस................."

अचानक त्याचं बोलण थांबवत मिताली म्हणाली,"रोहन, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे असं वाटत. तुला कोणी सांगितलं की  मी अजूनही तुझी वाट बघते आहे?"

तिच्या त्या बोलण्याने रोहन बुचकळ्यात पडला आणि म्हणाला,"मिताली, आई म्हणाली की त्यांना सगळी मदत करतेस तू. इतकी की परवा बाबांच्या काही टेस्ट आहेत तर तेवढ्यासाठी तू लवकर जाते आहेस. मुख्य म्हणजे तू अजूनही आमच्या शेजारच्या घरीच राहाते आहेस. त्यामुळे मला वाटलं की अजूनही तू माझी वाट बघते आहेस."

त्याच्या बोलण्यावर मिताली खळखळून हसली आणि म्हणाली,"रोहन, तू लंडनला आलास, इथले राहाणीमान स्विकारलेस पण मनातून अजूनही तू टिपिकल भारतीय मानसिकतेचा पुरुष आहेस. रोहन, तुझ्या माहितीकरीता..................... माझं लग्न झालं आहे. प्रेमविवाह आहे माझा! अरे तू इथे आल्यानंतर कधी ना माझ्या मेल्सना उत्तर दिलस; ना कधी फोन केलास........... ना कधी माझी साधी चौकशी केलीस. मी तुला लक्षात ठेवण्यासारखं तू काहीच केलं नाहीस. त्यामुळे मी देखील वर्षा-दीडवर्षात तुला विसरले. मी त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होते. त्यामुळे माझ्या आयुष्यात संदेश आला.... आमचं  प्रेम जमलं... आमचं शिक्षण संपल्या नंतर आम्ही घरी सांगितलं आणि आमच्या आई-बाबांनी आमचं लग्न लाऊन दिलं. मला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे रोहन. हो... हे मात्र खरं की मी अजूनही तुमच्या शेजारीच राहाते. कारण दोन वर्षांपूर्वी माझी आई गेली. बाबांचं वय झालं आहे. त्यामुळे ते एकटे राहाणं मला पटत नव्हत. संदेशचे आई-वडील दोघेही आहेत अजून. त्यामुळे त्यांच्याशी बोलून आम्ही निर्णय घेतला की आम्ही बाबांकडे राहायला यायचं. तुझ्या आई-बाबांना मी माझ्या लहानपणापासून ओळखते.... आणि तू नसलास तरी मी त्यांच्याकडे कायम जाणं-येणं ठेवलं होत. त्यामुळे मी इथे राहायला आल्यानंतर हळूहळू त्यांना लागेल ती मदत करायला लागले. ते दोघे देखल माझ्या मुलांना सांभाळतात. त्यामुळे तू हे मनातून काढून टाक की मी तुझ्या आठवणींवर वगैरे जगते आहे....... किंवा दु:खी-अबला नारी वगैरे आहे. रोहन, तू मुलगा म्हणून कमी पडलास अशातला भाग नाही. तू जे आयुष्य स्वीकारलंस तो तुझा चॉईस होता. एक लक्षात ठेव. कोणाचंही कोणामुळे अडत नाही. त्यामुळे तुझे आई-बाबांचं तुझ्याशिवाय कधी काही अडलं नाही. मात्र तू त्यांच्या सोबत त्यांच्या सुख-दुःखात नव्हतास ही बोज त्यांच्या मनाला कायम राहोळी आहे.

 रोहन, तू खरच फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केलास. तुझं शिक्षण... तुझी नोकरी.... तुझं लग्न... तुझ्या पत्नीच बाळंतपण....... सगळ सगळ तुझं होत. तू इथली संस्कृती स्वीकारलीस. हा तुझा चॉईस आहे. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते तू स्वीकारलं पाहिजेस अस मला वाटत. मला माहित आहे की एकट्याने इतक्या लहान बाळाला वाढवण सोप नाही. पण एक सांगू? तू आता भारतात येऊन तिकडचं राहाणीमान स्वीकारू शकणार नाहीस. आणि आई-बाबा ऍनासाठी इथे आलेच तरी ते इथे कायमचे राहू शकणार नाहीत. अर्थात हे माझं मत झालं. शेवटी काय करायचं ते तुलाच ठरवायला लागेल."

मिताली बोलत होती आणि रोहन एकत होता. जणूकाही कोणीतरी त्याच्या कानात गरम तेल ओततं आहे अस त्याला वाटल. मिताली बोलायची थांबली.... रोहन काहीच बोलला नाही. काही वेळ तसाच गेला. मितालीने तिच्या मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाली,"निघते मी रोहन. उद्या सकाळी मला सगळ्या घरच्यांसाठी शॉपिंग करून मग विमान घ्यायचं आहे. बराच उशीर झाला आहे. अच्छा. आता तुझ्याकडे माझा नंबर आहेच. कधी वाटलं तर फोन कर. बोलू आपण."

रोहन काही बोलायच्या आत मिताली उठली आणि घराचा दरवाजा उघडून बाहेर पडली. बाहेर पडताना तिथल्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे दार ओढून घ्यायला ती विसरली नाही.


----------------------------------------------






Friday, May 24, 2019

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......


एक शहरात राहणारी, मध्यम वयातील स्त्री; देशात होणाऱ्या सततच्या राजकीय घडामोडींमुळे जिच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही तिने २०१९ च्या देशाच्या निवडणुकीत मनापासून मतदान केलं. मोठी लाईन लागलेली होती मतदानासाठी. खूप उकडत होतं; प्रौढ मतदारांना पुढे जाण्याची परवानगी असल्याने असलेल्या रांगेमध्ये देखील अजून वेळ लागत होता... तरीही ही स्त्री उभी होती. 'मी माझा मतदानाचा हक्क.... किंबहुना जवाबदारी जर आज पूर्ण केली नाही आणि असंच एक-एक करत अनेकांनी मत दिलं नाही तर कदाचित काँग्रेस म्हणजेच पर्यायाने राहुल गांधी निवडून येईल.... नको रे बाबा! मोदीच बरे आहेत.' अशी भावना तिच्या मनात होती आणि रांगेत उभं राहून इतरांशी बोलताना तिच्या लक्षात येत होतं की इतरांच्या मानत देखील हेच भाव आहेत.... आणि मग 'मोदीच बरे आहेत'; असं आपल्याला का वाटतंय बरं याचा ती विचार करायला लागली.

मोदी आल्यामुळे माझ्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही हे खरंय; पण....... अलीकडे कॉलेजमध्ये जाणारी माझी दोन्ही मुलं देशात होणाऱ्या घडामोडींवर बोलताना दिसतात. माझ्या तारुण्यात काहीतरी बफोर्स नावाचा भ्रष्टाचार झाला होता. जन्मले तेव्हा इमर्जन्सी का असंच काहीतरी होतं असं आई सांगायची. पण आपण कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं देशात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूक असणं....... मनाला समाधान देऊन जातं.

मोदींनी 'घर घर शौचालय' योजना सुरू केल्याचं वाचलं आणि घरी कामाला येणाऱ्या आशाताईंना त्याबद्दल सांगितलं. त्यांच्या सासूबाई तशा बऱ्याच वृद्ध आहेत त्यामुळे त्यांना सार्वजनिक शौचालयात जायला खूप त्रास व्हायचा. रात्री घरातच पॉट द्यावं लागायचं. घरात सासूबाई आणि आशाताईंव्यतिरिक्त त्यांच्या दोन वयात आलेल्या मुली आणि एक मुलगा आणि नवरा इतकी माणसं. त्यामुळे पॉट देताना देखील खूप अडचण असायची. त्यामुळे त्यांनी 'घर घर शौचालय' बद्दल लगेच चौकशी सुरू केली. जवळ जवळ तीन वर्षांनंतर त्यांच्या घरात त्यांनी शौचालय बांधून घेतलं. त्या म्हणाल्या खूप मागे लागावं लागलं हो; पण आता समाधान वाटतं. लेकी देखील मोठ्या झाल्यात. बाहेर जाण्यापेक्षा आता त्या घरातलंच शौचालय वापरतात. आशाताईंचं बोलणं.......... मनाला समाधान देऊन गेलं.

एकदिवस नवरा ऑफिसमधून आला आणि म्हणाला आपण गॅसची सबसिडी सोडून देऊ. मी लगेच हिशोबाला बसले. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. मग गॅस कंपनीमध्ये जाऊन चौकशी करून सगळ्या formalities पूर्ण केल्या. अलीकडे अनेक जाहिराती बघते आहे की गावांमधल्या स्त्रियांना गॅस मिळायला लागला आहे. आता त्यांचा लाकडं जमवून चूल पेटवायचा त्रास बंद झाला आहे. एका स्त्रीचा सुखावलेला चेहेरा जाहिरातीत दिसतो. कदाचित ती खरी महिला नसेलही. कोणी कलाकार असेल. पण त्या जाहिरातीत सत्यता आहे; हे............ मनाला समाधान देऊन जातं.

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते झाडायला सुरवात केली तेव्हा मनात आलं होतं... काय पण स्टंटबाजी आहे. असं पंतप्रधानाने झाडल्याने स्वच्छता होते का? इतर महत्वाची कामं सोडून हे काय करायला लागले मोदी? पण अलीकडे घराच्या कोपऱ्यावरची कचरा पेटी वाहून जात नसते... आणि असलीच तर मी लेकाला त्याचा फोटो काढून फेसबुकवर टाकायला सांगते. लगेच सफाईला सुरवात होते. हा दिसणारा बदल........ मनाला समाधान देऊन जातो.

मोदींच्या काळात समजायला लागलं की आपले जवान किती प्रतिकूल परिस्थितीत राहातात. पाकिस्तान सतत त्यांच्यावर छुपे हल्ले करतच असतो. आजवर आपल्या जवानांचे हात बांधलेले होते. त्यामुळे ते फक्त स्वतःचा बजाव करत होते. पण आता केंद्र सरकारने त्यांना free hand दिला आहे. त्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आपले जवान देखील जोरदार उत्तर द्यायला लागले आहेत. माझ्या देशाच्या सीमारेषा आता सुरक्षित हातात आहेत. गेली पाच वर्ष देशाचे पंतप्रधान दिवाळी त्या जवानांमध्ये जाऊन साजरी करतात. हा विचार........ मनाला समाधान देऊन जातो.

नोट बंदीचा किती त्रास झाला. इतकी चिडचिड व्हायची माझी. मी एकटीच होते न रिकामटेकडी घरात. त्यामुळे सतत बँकेच्या रांगेत जाऊन उभं राहायला मीच होते. त्यात पै-पै जोडून नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये बँकेत जमा करायला लागले होते. इतका राग आला होता त्या मोदींचा. यांचं काय जात एका दिवसात सगळं बदलायला? याला ना घर ना दार.... ना बायको ना पोर.... आमचं कसं होणार? पण मग एक दिवस एक रिक्षावाला भेटला. म्हणाला भाभी घर मे बहुत पैसा पडा था. तो मैने बीबी का अकाऊंट खोला. मोदीने लेडीज को जादा फायदा दिया हें ना बँक मे. बहुत तकलीफ हुवा. लेकीन अपने को तो सिर्फ लाईन मे खडा रहना था. ये काला पैसा वालोको मोदीने अछा सबक सिखाया. त्याचं बोलणं ऐकलं आणि मनात आलं खरंच की; खोट्या नोटा आता बंद होतील. मला माझे दीड लाख नवऱ्याला सांगावे लागले. पण ते माझ्या अकाऊंट मध्ये जमाँ तर झाले. हे काळा पैसा वाले तर कर्माने गेले. मग लक्षात आलं; कितीतरी लोकांनी माझ्याप्रमाणे पैसे बँकेत ठेवायला सुरवात केलीय. त्यामुळे देशाची आथिर्क स्थिती सुधारते आहे. हे सगळंच...... मनाला समाधान देऊन जातं.

तसं बरंच काही केलं की त्यांनी. अधून मधून नवरा आणि मुलांच्या चर्चमधून कळत असतं आपल्याला.

ती अजूनही मतदानाच्या रांगेत उभी होती. अजूनही ती विचार करत होती. तरीही 'मोदीच बरे' अस का?

तिच्याच मनाने तिला विचारलं......

मग कोण राहुल गांधी? त्याचं ते बालिशपणे वागणं. मोदींना त्याने म्हणे भर संसदेत मिठी मारली होती आणि मग डोळा मारला होता. बघितला होता मी तो व्हिडियो. शोभतं का हे असलं वागणं त्याला? अरे लग्न नाही केलंस तू. पण म्हणून तू काही पंचवीशीतला नाहीस न. आमच्या देवेंद्र फडणविसाच्या वयाचा आहेस. त्याची प्रगल्भता बघ की जरा. राज्य चालवतो आहे तो. दिसायला कसा गोंडस बाळासारखा आहे. कायम हसतो. वाटतं आपलं सगळं म्हणणं एकूण घेईल. पण पक्का आहे हो निर्णय घेताना. 'मनात आलं तेच केलं; विकासाच्या मार्गाने राज्याला नेलं;' हे दाखवून दिलं की त्यानं. नाहीतर तू! माझे बाबा महान.... माझी आजी महान... मी.... माझी आई... माझी बहीण.... यातच अडकलास. तू जर झालास पंतप्रधान तर मलाच देश सोडून जावं लागेल.

समजा मोदीही नाही आणि राहुल देखील नाही..... मग कोण ती ममता? की ते यादव? अरे देवा!

मोदींनी काही सगळे प्रश्न सोडवले नाहीत. पण किमान त्यांच्या असण्याने प्रश्न सुटतील ही आशा आहे.

अजून तास लागला तरी चालेल मत देऊनच बाहेर पडणार मी!!! एकदाचा तिचा नंबर लागला आणि मतदान करून आणि आपण केलेल्या मतदानाची खात्री करून ती समाधानाने बाहेर पडली.

मात्र............. २३ मे ला घरातले सगळे बाहेर पडले आणि तिने टीव्ही चालू करून ठेवला. आपली कामं आवरताना अधून मधून ती अंदाज घेत होती. 'काय होतंय ग बाई? मोदीच आले पाहिजेत हो.' तिने आशाताईंना म्हंटलं. त्या देखील म्हणाल्या;"वहिनी, त्योच येणार हो. मला काय बी चिंता न्हाई." आशाताईंचा आत्मविश्वास बघून तिला देखील बरं वाटलं. दुपार पर्यंत तिला देशाचा कल समजायला लागला आणि समाधानाने तिने टीव्ही बंद केला. संध्याकाळी नवरा आला तोच सांगत की मोदींच भाषण आहे आता आणि परत एकदा तिने घाईघाईने टीव्ही लावला.

मोदी म्हणत होते....... तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नाही देणार. फक्त आणि फक्त देशाचाच विचार करिन. पुढच्या पाच वर्षात जितकी म्हणून प्रगती करणे शक्य आहे ती करेन. कदाचित चूक झाली तर ती सुधारेन.... पण चूक त्याचीच होते जो मार्गक्रमण करतो आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहात त्याने फुशारून जाणार नाही. चला कामाला लागुया!

रात्रीच्या जेवणाची तयारी करताना तिच्या मानत येत होतं आईचे संस्कार चांगले हो! शहरातली असो किंवा गावातली. शिक्षित असो किंवा अशिक्षित..... संस्कार तर तेच असतात न!




Friday, May 17, 2019

सोबत आणि सोबतीचे परिणाम!



सोबत आणि सोबतीचे परिणाम


ज्योती अळवणी


अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झालं असावं अस मला वाटतं. मग हळूहळू गरजेनुसार पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं. त्यामुळे आयुष्य जगण्याला एक वेगळाच अर्थ आला हे नक्की. एका अर्थी नाती जपणं आणि या नात्यांमधला ओलावा वृद्धिंगत कारण हा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव झाला.


मात्र आयुष्याचा स्थायीभाव आणि मनुष्य स्वभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; हे आपण लक्षातच घेत नाही. आपण म्हणतो आपल्याला नात्यांची म्हणजेच पर्यायाने माणसांची सोबत असते. पण खर सांगायचं तर आपण आयुष्यभर एक वेगळीच सोबत जपत असतो; आणि या सोबतीचा परिणाम आपल्या नाते जपण्यावर होतो.


ही सोबत म्हणजे...  क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या भावना! आपण या भावनांपैकी ज्या भावनेची ज्यावेळी सोबत घेतो; त्यावरून आपण त्यावेळी एखादं नातं कसं जपू ते ठरतं. म्हणजे आपण रागावलेले असलो की कधी कधी एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी देखील आपण एखादं नातं संपवून टाकतो. एखादा विषय चर्चा करून सोडवता येत असेल तरी आपण समोरच्या व्यक्तीने काहीही म्हणायच्या अगोदरच आपला राग दाखवून मोकळे होतो. त्यामुळे सहज चर्चा होऊन जो विषय संपू शकतो तो कधीच संपत नाही; किंबहुना एखादं नातं संपतं आणि त्याचा सल आपण आयुष्यभर जपतो. म्हणजे तुटलेलं नातं कायम आपल्या मानत असतं;  पण तरीही ते परत जुळावं यासाठी आपण कधीच प्रयत्न करत नाही. हा सल आपण जपायला तयार असतो पण आपला अहम् सोडायला तयार नसतो... हे किती दुर्दैवी!


कदाचित आपल्याला पुढील कथा माहीत देखील असेल; पण माझा मुद्दा सांगताना ही कथा सांगणं अत्यंत योग्य आहे अस मला वाटतं. एक वृद्ध आणि एक तरुण सन्यासी एकदा हिमालयाच्या पायथ्याशी तपश्चर्येसाठी असणाऱ्या आश्रमाच्या दिशेने प्रवास करत असतात. ते एका नदीकिनारी येतात. ती नदी दुथडी भरून वाहात असते आणि काठावर एक अत्यंत देखणी, कमनीय बांध्याची तरुणी उभी असते. ते दोघे सन्यासी नदी पार करण्यासाठी पाण्यात पाय ठेवतात. त्यावेळी ती तरुणी त्यांच्याजवळ येऊन पाण्याची भीती वाटत असल्याने पलीकडच्या किनाऱ्यापर्यन्त त्यांच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त करते. वृद्ध सन्यासी काही बोलण्याच्या अगोदरच तरुण सन्यासी तिला होकार देतो आणि त्या तिघांचा प्रवास सुरू होतो. थोड्या वेळाने प्रवाहाची धार वाढते आणि ती तरुणी नकळत तरुण सन्याशाचा हात धरते. वृद्ध संन्याशाला ते पटत नाही. परंतु तो काहीच बोलत नाही. काही वेळाने प्रवाहाची धार खूपच वाढते. ती तरुणी घाबरून जाते. तरुण सन्यासी तिला धीर देतो आणि तिला उचलून घेऊन पलीकडचा किनारा गाठतो. किनाऱ्यावर पोहोचताच तो तिला खाली ठेवतो. ती त्याचे आभार मानते आणि निघून जाते. वृद्ध सन्यासी हे सर्व पाहात असतो; त्याला तरुण सन्याशाचे वागणे पटलेले नसते मात्र तो काही बोलत नाही. ते दोघेही त्यांचा पुढील प्रवास सुरू करतात. ते हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचतात. तेथील आश्रमात दोघेही पोहोचतात. 'इथे येताना तुमच्या मनात संन्यस्त जीवन आणि पंचत्वात विलीन ही भावना असावी;' असे त्यांचे गुरू त्यांना सांगतात. त्यावेळी तो वृद्ध सन्यासी तरुण संन्याशाला बाजूला घेऊन म्हणतो;"तू संन्यस्त जीवन जगण्याच्या भावनेने इथे आलेला नाहीस." तरुण संन्याशाला खूप आश्चर्य वाटते आणि तो विचारतो;"तुम्हाला असे का वाटते?" त्यावेळी वृद्ध सन्यासी म्हणतो;"आपण ज्यावेळी दुथडी भरलेली नदी पार करत होतो त्यावेळी तू एका अत्यंत सुंदर आणि कमनीय तरुणीला उचलून घेतले होतेस. तू तिला स्पर्श केलास याचा अर्थ तुझ्या मनात संन्यस्त जीवन जगण्याची भावना नाही." हे ऐकून तरुण सन्यासी हसतो आणि म्हणतो;"आपण वयाने माझ्याहून जेष्ठ आहात. मी आपणास काय सांगावे. तरीही.... माझ्या मनात त्याक्षणी फक्त मदत ही भावना होती. ती मदत मी कोणाला करतो आहे याचा विचार मी क्षणभर देखील केला नाही. मात्र तुमच्या मनात जर शंका होती तर तुम्ही तिचे निरसन त्यक्षणीच करायला हवे होते. कारण मी समोरील तीरावर त्या तरुणीला सोडल्या क्षणी विसरून गेलो. मात्र इथे आश्रमात येईपर्यंत आपण आपल्या मनात संन्यस्त जीवनाची भावना कमी आणि त्या तरुणीचा विचार जास्त ठेवला आहात."


मला वाटतं की राग, लोभ, मोह, मद (गर्विष्ठपणा), आणि मत्सर या भावनांच्या भरात ज्यावेळी आपण एखादे नाते संपवतो त्यानंतर जर परत ते नाते जोडले गेले नाही तर आपली अवस्था त्या वृद्ध सन्याशासारखी होते. आपले मन विविध भावनांचे आगरच आहे. किंबहुना आपण माणूस आल्याचीच ती खूण आहे. त्यामुळे राग, लोभ, मोह, मद आणि मत्सर असूच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र केवळ याच भावनांचा पगडा मनावर जास्त असणे वाईट. या भावना क्षणासाठी असल्या तरी त्यातुन बाहेर पडण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणे खूप महत्वाचे. मात्र आपण एकदा मनात दुजाभाव निर्माण केला की त्यापासून दूर जायला तयार होत नाही त्याचे कारण म्हणजे ते म्हणजे आपण स्वतः! आपला अहम्! आपला Ego!


या अहम् ची सोबत आपण जितकी जास्त जपतो तितके आपण आपल्या नात्यांपासून दूर जातो. प्रांजळपणे विचार केला तर  क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे या अहम् चे वेगवेगळे पैलू आहेत. तुम्ही जितकी जास्त या भावनांची सोबत घ्याल तितके तुम्ही जोडलेल्या नात्यांपासून दूर जाल.

"काय समजतो तो स्वतःला? गेला उडत." क्रोध दिसतो यातून....

"तिच्या सारखे दागिने... महागड्या साड्या... आलिशान बंगला मला देखील हवा" या वाक्याचा संबंध लोभाशी.

"त्याचं जे आहे तेच मला हवं" यातून मोह दिसतो.

"माझ्यासारखा दुसरा कोणी शोधून तर दाखव." मद... गर्विष्ठपणा जाणवतो या वाक्यात.

"भला मेरी साडी उसकी साडीसे सफेद कैसे?" मत्सराचे हे उदाहरण किती योग्य आहे.


म्हणूनच वाटत की आपण ज्या भावनेची किंवा ज्या प्रमाणात आपल्या अहम् ची... इगोची... सोबत घेऊ तितकेच आपले सखे-सोबती आणि नाती आपल्यापासून दूर जातील. त्यामुळे नाती महत्वाची की अहम् महत्वाचा हा विचार आपण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.


सरतेशेवटी केवळ इतकेच की मनुष्याने नाती निर्माणच केली एकटेपणा जावा म्हणून. मग या नकारात्मक भावनांना मनात थारा देऊन आपण आपल्या मूळ स्वाभावाशी फारकत का घ्यावी बरं?





Friday, May 10, 2019

जिंदगी

आयुष्याच्या वळणावर अनेक अडचणी येतात. अनेकदा आपण एकटेच आहोत ही भावना अस्वस्थ करते.... हताश करते आपल्याला. पण असं कोणीतरी असतंच की जे न बोलता देखील आपल्या बरोबर चालत असतं.... त्या कोणीतरीसाठी ही कविता!!!


जिंदगी


चलते चलते... किसी अन्जान राह से गुजरते...
हमें वो मिली.. जिसे सब जिंदगी हें केहेते...


हमने पूछा..
ऐ खूबसूरत जवानी.. कहा चली दी इतराते...
हसकर बोली... तुम्हारी ही हूं... वही की जहा तुम हो रहते...

हम ने कहा...
अन्जान राह... मंजिल का पता नहीं हें हमें...
किसी और का हात थाम लेना... हमारा पता खुद नहीं हे हमें...

वो चलती रही फिरभी... हमारे साथ...
गिरती... संभलती....
बोली...
जिंदगी हु तुम्हारी... किसी और की नहीं...
बेवफा नहीं हूं... भले बेजुबां हूं में...
प्यार करती हूं तुमसे.. तुम्हारे ही साथ हूं में...
क्यों नहीं समझते... संभालते अपने आप को?
प्यार करो खुद से... पाओगे अपने में ही जहाँ को...

वो चलती रही साथ हमारे... और हम संभलते गए...
इंसान हे... समझते हें... बेदर्दीसे ठुकराया नहीं करते...
जिन्दा हुवे फिर हम... जीने लगे प्यार से...
वो हँसी... बोली... जिंदगी हूं... साथ रहूंगी सभी हालात में...

Friday, May 3, 2019

'आई' तिच्या मनातली!


पौगंडावस्थेत आईचं शिस्त लावणं, कामं सांगणं अगदी नको असत तिला. मग सारखी चिडचिड आणि वाद होतात तिचे आईबरोबर.... तारुण्याची वाटचाल मात्र तिच्या नजरेखालून असते.... मात्र सासरी जाताना खरी आई कळते!



'आई' तिच्या मनातली!

जेव्हा ती सोबत असते
तिची किम्मत नसते.....
तिच्या सूचना.....कामे सांगणे...
अगदी नको वाटते!


'किती ग तेच तेच सांगशील?
आता मी मोठी झाले... थोडं थांबशील?'
शिकणार आहे ग घरातली कामं
थोड मला भटकू तर दे...
तुझं ऐकतेच आहे;
पण हवं तसं जगु तर दे...
ए मैत्रिणीचा वाढ दिवस आहे,
गिफ्ट काय देऊ?
तू किती ग ओल्ड फॅशन्ड...
मी थोडा शॉर्ट ड्रेस घेऊ?


पण तिची आयुष्यातली गरज
संपलेली नसते...
ए बाबांना पटवशिल?
हो म्हणायला सांगशील?
रात्रि थोssडा उशीर होईल...
तू सांभाळून घेशील?
ऐक न... त्याने मला विचारलंय;
चिडवू नकोस हंं... पण मला ते आवडलंय!
हो ग बाई... सांगते सगळं...
तू चौकशी कर मगच जाते पुढं...



ए एखादा स्पेशल पदार्थ शिकव न मला
त्याला आवडेल आणि मला जमेल
असाच सांग ह जरा.....
अग.. साडी कशी नेसू?
प्लीज.. आज सगळ मीच आवरू?
तो येणारे... त्याच्या मनासारखं करू?


मी हौसेने सगळ करत असते...
ती मात्र लक्ष ठेउन असते;
हळूच गालात ती हसते..
अन मनात माझ्या कळी उमलते!


ए बाबांना सांगायचंय... मदत कर न...
ते रागावतील? त्यांना समजाव न...
तो आणि त्याच्या घरचे चांगले आहेत;
लग्न त्याच्याशिच करायचंय.. हे मनात पक्क आहे;
बाबांकडून 'हो', म्हणून घ्यायचंय....
अगोदरच सांगते तुला सगळं सांभाळून घ्यायचंय!



माझ लग्न मी एन्जॉय करते...
ती हसताना हळुच डोळे टिपते....
सासरी जात असताना...
तुझी किंमत कळलीय ग....
'अहो आई' चांगल्याच असतात....
पण 'ए आई' ची गोडी तुझ्या कुशीत शिरुनच ग!

Friday, April 26, 2019

अधुरी एक कहाणी

अधुरी एक कहाणी



टक् टक्... 'आत्ता एवढ्या सकाळी आणि ते ही इथे मला भेटायला कोण येणार?' थोडं वैतागत... थोडं आश्चर्य वाटून लेखक महाशय दार उघडायला आले.

एका कादंबरीच्या लेखनासाठी प्रकाशकाच्या आग्रहावरुन ते थंड हवेच्या ठिकाणच्या त्या प्रकाशकाच्या बंगल्यावर काही दिवसांकरता रहायला आले होते. येऊन दोन दिवस झाले होते तरी त्यांना कथेचा प्लॉट सुचत नव्हता; त्यामुळे एकूणच ते थोडे वैतागले होते; रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. जरा झापड येत होती  आणि त्यात सकाळीच दार वाजत होते.


थोड्या वैतागलेल्या मनस्थितीतच त्यांनी दार उघडलं. समोर एक मध्यम वयीन महिला कंबरेवर हात ठेऊन उभी होती. दार उघडलं जाताच दारात उभ्या असणाऱ्या लेखकाकडे दुर्लक्ष करून ती तरातरा आत आली आणि एका खिडकीच्या दिशेने गेली. मात्र जाताना एक खाष्ट कटाक्ष तिने लेखकाकडेे टाकला. लेखक बुचकळ्यात पडला.


'कोण असावी ही बाई आणि अशी आपल्याला न विचारता आत येऊन त्या खिडकीत जाऊन का बसली असेल? मुख्य म्हणजे आत आल्यावर आपल्याकडे रागाने का बघितलं तिने?' लेखकाच्या मनात एकामागून एक प्रश्न उभे राहिले. तो दारातच विचार करत उभा होता तेवढ्यात त्याला आतल्या बेडरूम मधून खोकल्याचा आवाज आला. गोंधळून लेखक आतल्या बेडरूमच्या दिशेने गेला. आत बेडरूममध्ये एका आराम खुर्चीत एक आजोबा बसले होते; ते दरवाजात उभ्या असणाऱ्या लेखकाकडेच पाहात होते. काय प्रकार आहे ते लेखकाला कळले नाही. आपल्यालाच भास होतो आहे अस समाजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो परत बाहेर हॉलमध्ये आला; तर त्याच्या लक्षात आल की एकूण बाहेरच्या खोलीचा चेहरा मोहरा बदलला आहे. मघाशी दार उघडायला तो बाहेर आला होता तेव्हा बैठकीच्या खोलीत फ़क्त एक सोफ़ा होता. पण आता येऊन बघतो तर मेन दरवाजा दिसत नव्हता; एक सोफ़ा एका बाजूला होता आणि आता एका कोप-यात एक डायनिंग टेबल देखील अवतरलं होतं. लेखक पुरता बुचकळ्यात पडला. त्याला त्या बंगल्यात येऊन दोन दिवस झाले होते. त्यामुळे खोल्यांची रचना त्याला माहितीची झाली होती. हे असे अचानक होणारे बदल त्याला गोंधळात टाकत होते. तो थोडासा घाबरला देखील. हा काही भुताटकिचा प्रकार असावा अस त्याच मत झाल.


तेवढ्यात तो ज्या खोलीत झोपले होता तिथे काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि लेखक दचकुन आत खोलिकडे वळला. आत जाऊन बघतो तर त्यांनी त्याचे लिखाणाचे सामान ज्या टेबलावर ठेवले होते ते सामान खाली पडले होते. आणि जी स्त्री दार वाजवून त्याची झोप मोडायला आली होती; ती त्याच्या लेखन टेबला जवळ बसून काहीतरी लिहित होती. लेखक खोलीत आला आहे हे तिच्या लक्षात आले होते तरीही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल लेखनाचे काम चालूच ठेवले.


काय प्रकार आहे हे अजूनही लेखकाच्या लक्षात आले नव्हते. पण हे असे अचानक या घरात उगवलेले आणि आपल्याला दिसणारे लोक काही त्रास देत नाही आहेत हे लक्षात आल्यावर लेखक थोडा शांत झाला. आता त्याच मन थोडं शांत झाल आणि विचार करायला लागलं. लेखकाच लक्ष परत त्या स्त्रीकडे गेलं. ती स्त्री अजूनही काहीतरी लिहित होती आणि तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे असेल कदाचित पण त्याच्या टेबलावर बसून ती काय लिहिते आहे ते समजून घेण्याची लेखकाची उत्सुकता जागृत झाली. त्यामुळे हळूच तिच्या मागे जाऊन उभे राहात त्यानी तिच्या लिखाणावरुन नजर फिरवली.


...............ललिता एकटीच खिड़कीत विचार करत बसली होती. वयात येणारी मुलगी; व्यवसायात खूपच बिझी झालेला नवरा; इंजीनियरिंगच शिक्षण घेण्याच्या नावाखाली उड़ाणटप्पूपणा करणारा मुलगा.... ललिता सर्वच बाजुनी हतबल झाली होती. काय कराव... कोणाशी बोलाव तिला सुचत नव्हतं......... ती स्त्री भराभर लेखकाच्या नेहेमीच्या लिखाणाच्या कागदावर लिहित होती. ते लिखाण पाहुन लेखक बुचकळयात पडला. पण काही क्षणात त्याला आठवलं हा परिच्छेद त्याच्याच एका गोष्टितला होता. पण मग ती गोष्ट त्याने अर्धवट सोडली होती. एका दुसऱ्याच कथेची संकल्पना मनात आली होती म्हणून ही कथा अर्धी सोडून त्याने नवीन कथा सुरु केली होती. काही महिन्यांपूर्वीचीच तर घटना होती ती.


लिखाण पूर्ण होताच ती स्त्री परत खिड़कीजवळ जाऊन बाहेर बघत बसली. लेखकाने जिथे ती कथा सोडली होती तिथेच ती स्त्री थांबली होती. याच त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्या स्त्रीला ती अर्धवट सोडलेली गोष्ट कशी माहित अस विचारायचा मोह लेखकाला झाला. पण तेवढ्यात शेजारच्या खोलितले आजोबा परत खोकले म्हणून लेखक त्या दिशेने वळला. आजोबा त्यांच्या आराम खुर्चित बसून लेखकाकडेच पहात होते. त्यांच्या शेजारी देखिल एक कागद पडला होता. आतापर्यत लेखकाची भीड बरीच चेपली होती. त्यामुळे तो पुढे झाला आणि तो कागद उचलून वाचला.


..............................काणे आजोबा म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्या तारुण्यात तर त्यांनी करियरमधली यशाची शिखरं गाठली होतीच, पण रिटायरमेंट नंतरही ते स्वस्थ बसले नाहीत कधी. सामाजिक संस्थांमधून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम केल. त्यांच्या सुविद्य पत्नीनी त्यांना आयुष्यभर साथ दिली होती. पण साध्या तापाच निमित्त होऊन त्या अचानक गेल्या; आणि त्यानंतर मात्र काणे आजोबांचा आयुष्यातला इंटरेस्टच जणूकाही संपला...............


तो कागद वाचून लेखकाला खूप खुप आश्चर्य वाटलं. 'माझ्याच एका पूर्ण होत आल्या गोष्टीचा शेवटचा भाग.' लेखकाच्या मनात आल. पण मग अचानक काही मासिकांकडून त्याला वेगळ्या विषयाच्या गोष्टिची मागणी झाली आणि ही गोष्ट नंतर पूर्ण करू असे त्याने ठरवले होते. पण मग ती गोष्ट लिहिणे मागेच पडत गेले होते.


'अरे? हे काय गौडबंगाल आहे? माझ्याच गोष्टींची पानं माझ्यासमोर का येत आहेत?' लेखकाच्या मनात आल. त्याचवेळी हॉलमध्ये एक लहान मुल जोरजोरात हसल्याचा आवाज त्याला आला आणि या अचानक आलेल्या आवाजाने धक्का बसलेला लेखक हॉलच्या दिशेने धावला.


बाहेर साधारण ४-५ वर्षांचा मुलगा सोफ्यावर जोरजोरात उड्या मारत होता आणि बाजूला एक स्त्री ............बहुतेक त्याची आई असावी................. त्याला शांत करायचा प्रयत्न करत त्याला समजावत होती;"राजू बाळा, तुला बर नाही आहे न? मग स्वस्थ बस बघू. आत्ता बाबा येतील ह तुझे. मग आपण त्याना सांगू तुझ्यासाठी काहीतरी छान छान आणायला." तिने एवढ म्हणाल्यावर तो मुलागा तिच्याकडे बघायला लागला. क्षणभर सगळ स्थिर झाल आणि मग परत तो मुलगा सोफ्यावर उड्या मारायला लागला. परत ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत तेच वाक्य त्याच प्रकारे बोलत समजावायला लागली.


आता लेखकाला हळूहळू लिंक लागायला लागली.  त्याने एका वेगळ्याच अपेक्षेने आजुबाजुला बघितले आणि त्याला डायनिंग टेबलावर एक कागद फड़फडताना दिसला. मनात कल्पलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने लेखकाने मंद स्मित केले आणि तो कागद उचलला. त्याच्याच एका गोष्टीतल्या दिवाणखान्याच वर्णन त्यात लिहिल होत. आणि पुढे लिहिलं होत की लहानग्या राजूला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला होता. त्याच्या आईवडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे कुठली मदत मिळते का ते बघण्यासाठी राजूचे बाबा सतत वणवण करत फिरत होते. या कशाचीच कल्पना नसलेला राजू मात्र घरात बालसुलभ मस्ती करत होता. मनातून कोलमडलेली आणि ते चेहेऱ्यावर दाखवता न येणारी राजूची आई त्याला सांभाळत त्याच्या वडिलांची वाट बघत होती............................. अशी काहीशी गोष्ट होती ती.... लेखकाचीच! अजुने के पूर्ण न झालेली.


'म्हणजे माझ्या अपूर्ण गोष्टी आज मला भेटायला आल्या आहेत अस दिसत.' लेखकाच्या मनात आल आणि कोडं उलगडल्याच्या स्सामाधानात तो हसत मागे वळला. मागे ललिता आणि काणे आजोबा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात उभे होते. यासर्वांच अस इथे येण्यामागच कारण त्याच्या लक्षात आलेलं नव्हत. त्यामुळे आता यांना काय उत्तर द्याव असा लेखकाला प्रश्न पडला. मुळात यांना आपण काही उत्तर देऊ लागतो का असा मुद्दा देखील त्याच्या मनात होता.  हे खर होत की लेखकाने फारच क्वाचित असेल, पण काही गोष्टी अपूर्ण सोडल्या होत्या. पण म्हणजे आपण अर्ध्या सोडलेल्या कथांमधील पात्र आज आपल्या भेटीला आली आहेत; हे त्याच्या लक्षात आलं. त्याने क्षणभर विचार केला आणि मग हसत ललिता आणि काणे आजोबांना, राजूला आणि त्याच्या आईलासुद्धा एका सोफ्यावर बसायला सांगितल. तो देखील बाजूची एक खुर्ची ओढून त्यांच्या समोर बसला.


"आता मला उलगडा होतो आहे तुमच्या उपस्थितिचा. पण उद्देश् मात्र अजुन लक्षात नाही आला." लेखक त्यांना म्हणाला. यावर त्यांच्यातल कोणीतरी एक उत्तर देईल अशी त्याची अपेक्षा होती. पण पाच मिनिटं झाली तरी ते सगळेच त्याच्याकडे थोड रागाने बघत पण आश्चर्यकारक रितीने स्वस्थ बसले होते. त्याचं हे अस न बोलता स्वस्थ बसण लेखकाला गोंधळवून टाकायला लागलं. हळूहळू लेखक अस्वस्थ व्हायला लागला.


"अरे, तुम्ही माझ्याच अपूर्ण गोष्टींमधली पात्र आहात हे एव्हाना माझ्या लक्षात आल आहे. पण हे अस अचानक इथे येण्यात तूमच काय प्रयोजन आहे; ते मला अजूनही समजल नाही. ते कसं कळावं बर?" लेखक वैतागुन काहीस त्यांच्याशी आणि काहीस स्वतःशीच म्हणाला.


तरीही काहीच घडले नाही. ते सगळे लेखकाने सांगितलेल्या सोफ्यावर स्वस्थ बसून पण रागाने लेखकाकडे बघत होते. एव्हाना चांगलीच सकाळ झाली होती. लेखकाला चहाची तल्लफ आली होती. चांगलीच भूकही लागली होती. एरवी सकाळीच बंगल्यावर काम करायला येणारा गोपाळ अजुन आला नव्हता. त्यामुळे काय कराव लेखकाला सुचत नव्हते.


'चहा मिळाला असता तर बर झाल असत. ही ललितासुद्धा नुसती बसून आहे. तिला काय हरकत आहे चहा करायला.' लेखकाच्या मनात विचार आला.... आणि काय चमत्कार... ललिता उठून उभी राहिली आणि स्वयंपाकघराकडे वळली. लेखक तिच्या मागून गेला आणि त्याला दिसले के ललिता चहा करत होती. लेखकाला आश्चर्य वाटल. आपण फक्त मनात एक विचार केला आणि लगेच तशी कृती ही ललिता करायला लागली हे त्याच्या लक्षात आल. म्हणून मग एक प्रयोग म्हणून त्याने मनात विचार केला,'चहा बरोबर मस्त गरमागरम पोहे असते तर मजा आली असती.' असा विचार करून लेखक त्याच्या खोलीत जाऊन बसला.


थोड्या वेळाने ललिता एका ट्रे मधून गरम गरम पोहे आणि वाफाळता चहा घेऊन त्याच्या समोर येऊन उभी राहीली. तिला बघून लेखक मोकळेपणाने हसला. आता त्याच्या लक्षात आले काय केले पाहिजे. त्यामुळे मग त्याने शांतपणे पोहे खाऊन आणि चहा घेऊन लेखक त्याच्या टेबलाकडे वळला. कागद पेन घेऊन त्याने थोडा विचार केला आणि मग लिहायला सुरुवात केली.


......................................ललिता कंटाळली होती. आणि तिला मन मोकळ करायची खूप इच्छा होती; आणि म्हणूनच तिने ठरवले की आज आत्ता समोर जे कोणी भेटेल त्यांच्याकडे मन मोकळे करायचे.....................


लेखकाचं एवढ़ लिहून होत न होत तोच चहा आणि पोहे लेख्कासमोर ठेऊन परत  खिड़कित जाऊन बसलेली ललिता एक मोठ्ठा सुटकेचा नि:श्वास टाकून तिथून उठून लेखकासमोर येऊन बसली.

"कित्ती बर वाटत आहे म्हणून सांगू तुम्हाला फ़क्त या कल्पनेने की आता मला माझ मन मोकळ करता येईल." ललिताने बोलायला सुरवात केली. "अहो लेखक महाशय किती किती दुःख लिहून ठेवली आहात तुम्ही माझ्या आयुष्यात. कमाल करता हो! अहो, केवळ वाचकांची सहानुभूति मिळवण्यासाठी माझा किती मानसिक छळ चालवाला आहात. अस काही खरच प्रत्यक्ष आयुष्यात असत का? प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जसे दुःखाचे क्षण असतात तसे आनंदाचे क्षण पण असतीलच न? मी आपली सारखी घरातल्या प्रत्येकाच्या वागण्याने दु:खी-कष्टी झालेली असते. मी एकटीनेच का होईना पण आनंदाचे काही क्षण तर जगू शकते की नाही? मला देखिल तुमच्या पत्नीप्रमाणे कधीतरी मॉल्समधे शॉपिंगला पाठवा की. तुम्ही कधी कधी तुमच्या पत्नीच कौतुक करता न? मग माझ्या नव-याच्या तोंडी थोड़ माझ कौतुक टाकलत तर ते काही महा पाप नसेल. तो खूप व्यस्त असतो, त्याला माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो, हे सगळ मान्य केलं तरी कधीतरी अशी वेळ येऊ शकतेच ना की तो माझं देखील थोडसं कौतुक करेल. बर ते नाही तर, अहो किमानपक्षी माझ्या मनात एखादी नोकरी करावी अस आल; एवढ लिहिलत तरी चालेल हो. इतकी काही मी मूर्ख नाही." ललिता भडाभड़ा बोलायला लागली.


'किती दिवस तिने हे सर्व मनात दाबून ठेवल असेल?' लेखकाच्या मनात विचार आला. त्याचच उत्तर म्हणून की काय ती म्हणाली,"अहो कायम असे विचार मनात येत असतात. पण सांगणार कोणाला? बर, तुम्ही मला कोणी जवळची मैत्रिण नाही दिलीत. ना मन मोकळ करता येईल अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात लिहिलीत. म्हणजे मी कायम दुखात पिचेला चेहेरा घेऊन खिडकीत दूरवर जाणार लावून बसायचं का? काहीतरी चांगलं लिहा की माझ्या आयुष्यात, की ज्या बळावर मी माझ आयुष्य जगू शकेन. सर्वात महत्वाच् म्हणजे सुरु केलेली कथा पूर्ण तर करा. अस आम्हाला अर्धवट सोडून तुम्ही दुसरीकडे कसे वळु शकता हो? आमचा थोड़ा तरी विचार करायचा ना." ललिता भडाभडा बोलत होती आणि लेखक अवाक होऊन तिच बोलण एकत होता. लेखकाकडे बघत ललिता पुढे म्हणाली,"परवाच आमची सर्वांची एक बैठक झाली....."


शांतपणे तिच बोलण ऐकणारा लेखात तिचे शेवटचे वाक्य एकताच दचकला. ललिता जरी त्याच्या समोर बसून बोलत होती तरीही ही आपल्या कथेतली एक व्यक्तिरेखा आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे 'आमची बैठक' हे शब्द एकटाच लेखक गोंधळाला आणि तिच बोलण निवांतपणे एकता-एकता अचानक ताठ होऊन बसला. आपला शांतपणा सोडत पहिल्यांदाच त्याने ललिताच्या समोर तोंड उघडले. "बैठक? कोणाची? अहो ललिताबाई काय बोलता आहात आपण?"


"जे घडल आहे न तेच बोलते आहे." ललिता म्हणाली. "तुम्ही आजवर ज्या ज्या  कथा अपूर्ण ठेवल्या आहात न त्यातील आम्ही सर्व व्यक्ती एकत्र येतो दर शुक्रवारी आणि चर्चा करतो."


"चर्चा? आणि ती कसली? कोण कोण असता या चर्चेला?" लेखकाने अजूनच बुचकळ्यात पडत ललिताला विचारले.


"तुम्हीच सांगा कोण कोण असेल. मलाच काय विचारता सगळ? कमाल करता तुम्ही. केवळ पैशासाठी लिहिता का हो? जेव्हा सुरवात केलित तेव्हा मात्र स्वसुखासाठी लिहिता अस सर्वाना सांगायचात न? आजही इतकी प्रतिष्ठा मिळाल्या नंतर जर कोणी मुलाखत घेतली तर तेच सांगता; हे देखील माहीत आहे आम्हाला." ललिता म्हणाली. "पण मग आता हे अस अचानक जे संपादक सांगेल ते त्याने सांगितलेल्या विषयावर ते म्हणतील तस  लिहायला का सुरवात केली आहात? अहो,  तुम्ही खूप पूर्वी ज्या कथा लिहायचात त्या कथांमधील व्यक्तिमतवांशी गप्पा मारायचात म्हणे! अशीच एक खूप जुनी कथा आहे तुमची. हसर दु:ख! आठवते तुम्हाला?" लालीताने लेखकाला विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघतां पुढे बोलायला सुरवात केली,"त्या कथेतली अल्लड मैना नेहेमी सांगते आम्हाला. तुम्ही तिला तिच्या अर्ध्या वयात एका दु:खला सामोरं जायला लावलंत म्हणे. पण मग तुमचं तुम्हला ते फारसं पटलं नाही, मग तुम्ही तिच्याशी बोलायला लागलात. तिनेच तुम्हाला सुचवलं होतं की तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर आणून कथा थांबवा. म्हणजे तुम्हला दुसरा भाग लिहिता येईल. मैनाची कथा लोकांनी खूपच डोक्यावर घेतली होती म्हणे. ती नेहेमी सांगते आम्हाला. तिची कथा एकीकडे पूर्ण आहे अस ती म्हणते आणि शेवटाकडे पुढचा भाग लिहिण्यासारखा मजकूर तुम्ही लिहिलात; त्यामुळे अपूर्ण देखील आहे अस तिचं म्हणण आहे. पण तिच्या मनात तुमच्याबद्दल राग नाही; जसा आमच्या मनात आहे. ती एकटीच आहे जी तुमची बाजू आमच्यासमोर मांडत असते. पण बाकी सगळीजण तुमच्यावर खूपच नाराज आहेत; समजल? काहो, तुम्ही जर दु:खी-कष्टी मैनाशी बोलू शकलात तर मग माझ्याशी कधीच का नाही बोललात? माझ्याही आयुष्यात काय कमी दु:ख लिहीली आहात का तुम्ही?" ललिता मनातल सगळ भडा-भडा बोलत होती.


तिने एक निश्वास टाकला आणि पुढे बोलायला सुरवात केली. "काहो तुम्हाला ते नार्वेकर आठवतात का? तुमच्या उमेदिच्या काळातील एका कथेतले व्यक्तिमत्व. त्यांनी देखील सांगितले आम्हला त्याचं आणि तुमच छान पटायच म्हणे. ती कथा जेव्हा तुम्ही अर्धवट सोडलित तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही सांगितल होत की अचानक त्या कथेने तुमच्याशी बोलण बंद केल होत. आम्ही समजू शकतो हो की एखाद्या वेळी एखादी कथा सुचेनाशी होऊ शकत. म्हणून मग तुम्ही ती कथा अपूर्ण सोडत आहात. पण तुम्ही नार्वेकाराना विश्वासात घेतल होतंत.  नार्वेकर मिटींगमध्ये बोलतात ना तेव्हा नेहेमी म्हणतात की त्याना वाईट वाटत त्यांची कथा तुम्ही अर्धवट सोडलीत. पण त्यांना पटल होत की कदाचित तुम्ही म्हणालात तस त्या कथेने तुमच्याशी बोलण सोडून दिल असेल. मात्र इतरांच अस मत नाही आहे. आम्हला काहीजणांना वाटत की तुम्ही पुढे पुढे केवळ पैशांच्या मागे लागून आमच्या कथा अर्धवट सोडल्या आहात. त्यातलीच माझी एक! अहो... किती वाट बघू मी? सारख नुसत खिड़कीमधे बसून कंटाळा येतो हो. बर कथा अर्धी सोडताना मला एखादा छंद वगैरे तरी लाउन द्यायचात ना? काही म्हणजे काहीच नाही? कमाल करता हो तुम्ही...माझ सोडा एकवेळ. तस माझ वय आहे की मी धीर धरु शकते. पण त्या दुसऱ्या कथेतल्या बिचा-या काणे आजोबांचा विचार करा. ना ते काही करतात; ना त्याचं देहावसान होत. बिचारे तसेच अडकून आहेत. काय तर  म्हणे आराम ख्रुचीत ते बसले होते आणि भूतकाळाचा विचार करत होते. बास? अहो म्हातारे झाले म्हणून फक्त भूतकाळाचा विचार करत असतील का ते? मनुष्याचा स्वभाव विशेष हाच आहे की काही कालावधी दु:ख केल्यानंतर तो भविष्याची स्वप्न बघायला लागतो. त्यात तुम्ही त्याचं संपूर्ण आयुष्य खूप घटनांनी आणि कर्तुत्वाने भरून टाकलेलं आहात. आता मात्र त्यांना एका आराम खुर्चीत अडकवून ठेवलं आहात...." ललिता काही बोलायची थांबत नव्हती.


लेखकाच्या मानत आल; 'हीच एकटी बोलते आहे. बाकीच्यांना कुठे काही हरकत आहे?' मात्र हा विचार करताना लेखक हे विसरला होता की त्याचे विचार हाच खरा आणि एकाच दुवा आहे त्याच्या अर्धवट लिहिलेल्या कथांमधील व्याक्तीमात्वांमध्ये आणि त्याच्यामद्धे. त्यामुळे त्याच्या मनात हा विचार आला आणि त्याच क्षणी मागून काणे आजोबांनी लेखकाला हाक मारली. "अहो! अहो! इथे मागे वळून बघा. हो! मीच काणे आजोबा बोलतो आहे. तुम्ही तिने बोलावं असा विचार मनात आणलात म्हणून ती आम्हा सर्वांच्या वतीने बोलत होती. मात्र मी वाटच बघत होतो की कधी मला बोलता येत आहे. अगदी बरोबर सांगते आहे ती ललिता. कंटाळलो आहे या आराम खुर्चीत झुलून झुलून. आता माझ पुढे काही होणार आहे की नाही? बर, माझं राहुद्या एकवेळ, मला निदान संपूर्ण आयुष्य चांगल जगण्याच सामाधान आहे. पण या राजूने काय तुमच घोड मारल आहे हो? एकतर त्याला कॅन्सर सारखा आजार दिलात. त्यात त्याच्या आई-वडिलांची परिस्थिती बेताची केलीत. मग वडिलाना बाहेर पाठवलत पैशांची सोय करायला आणि राजूला आणि त्याच्या आईला घरात बंद केलत आणि थांबलात. बर आजारी पोर आहे तर त्याला झोपवून ठेवायचं; तर नाही; म्हणे मस्तीखोर राजू आईच एकत नव्हता. ती बिचारी कायम त्याला समजावत असते........ तेही तेच तेच वाक्य परत परत बोलून? का तर तुम्ही पुढे काही न लिहिता ती कथा अर्धी सोडलीत." काणे आजोबा स्वतःबरोबर राजू आणि त्याच्या आईची बाजू देखील मांडत होते.


लेखक त्यांच बोलण एकून गोंधळून गेला. हे खर होत की राजूची गोष्ट तो पूर्ण करणार होता; पण अलीकडे जास्त भावनिक कथा लोकाना नको असते अस एका प्रकाशकाच मत पडल; म्हणून मग त्याने विचार बदलला. पण मग नवीन वळणं जर त्याच कथेत घालावीत तर त्या कथेत खूप जास्त बदल करावे लागणार होते; म्हणून मग ती अर्धवट सोडून देवून लेखकाने नवीन गोष्ट लिहायला सुरवात केली होती आणि ती नवीन गोष्ट पूर्णसुद्धा केली होती.


लेखक एकूणच विचारात पडला. 'अशा अजूनही काही कथा आपण अर्ध्या लिहून सोडल्या आहेत. ती एक रहस्य कथां होती की. ज्यात एका गाढवर एका सरदार घराण्यातल्या लोकांमध्ये होणाऱ्या घटना आपण लिहित होतो; आणि ती दुसरी भय कथा! मग ती देखील आपण पूर्ण केली नव्हती. त्यामधली व्यक्तिमत्व मात्र इथे आलेली दिसत नाहीत. लेखकाच्या मनाला तो विचार स्पर्शून गेला.' त्याने एकदा समोर उभ्या असलेल्या काणे काका, राजू आणि राजूच्या आईकडे बघितलं आणि त्याच्या मनात विचार आला,'एवढीच व्यक्तिमत्व का आली आहेत माझ्याकडे आज? माझ्याशी फक्त बोलायला की काही दुसरा विचार आहे यांच्या मनात?'.......... बस तो एक क्षणभरासाठी आलेला विचार आणि.....


अचानक बोलता बोलता ती सर्वच पात्र उभी राहिली आणि लेखकाच्या दिशेने येऊ लागली. त्यांची नजर थंडगार होती. कुठल्याही भावना त्या नजरेत नव्हत्या. आत्तापर्यंत फक्त आपल दु:ख त्याना सांगणारी ती सर्व त्याच्याच कथेतील पात्र.. एका अर्थी त्यांनीच निर्माण केलेलं जग... आज त्याच्या दिशेने पुढे सरकत होत.  आता मात्र त्यांची बोबडी वळली. काय कराव त्याना सुचेना. तो मागे मागे जाऊ लागला. त्याक्षणी मागून लालीताच्या विकट हसण्याचा आवाज आला आणि काणे काका, राजू आणि राजूची आई यांच्याकडे पाठ करून लेखकाने लालीताच्या दिशेने तोंड फिरवले. मागे वळताच लेखकाला मोठ्ठा धक्का बसला होता. कारण त्याच्या समोर सरदार घराण्यातली प्रत्येक व्यक्ती उभी होती आणि ..... आणि त्या भय कथेतली ती बाई.....


"अहो.... अहो बाई.... मला थोड़ बोलू द्याल का? अहो.. अहो.. सरदार साहेब.... अरे! अरे! थांबा.... एका ना... एक मिनिट..." लेखक एका जागी थिजल्यासारखा उभा राहून हात हलवत ओरडत होता. त्याचा श्वास धपापत होता. त्याला गुदमरल्यासारख होत होत, डोळ्यासमोर अंधार दाटला होता............... आणि अचानक........


......................."साहेब..... अव... साहेब जी....." गोपाळ लेखक महाशायांच्या पलंगाजवाळ उभा राहून त्यांना हाका मारत होता. आणि पलंगावर गाढ़ झोपेत असलेले लेखक महाशय हात-पाय झाड़त 'नाही... नको.. थांबा...अहो... एक मिनिट.... ऐका... ऐकाना...' अस काहिस ओरडत होते.


शेवटी गोपाळने लेखकाला गदागदा हलवल आणि लेखकाला जाग आली. तो दचकुन ओरडत पलंगावर उठून बसला. त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता. नजर पूर्ण गोंधळून गेली होती.  "काय.... काय.... कोण............ कोण......"  गोपाळकड़े बघत लेखक गोंधळून म्हणाला.


"अव साहेब, मगासधरन आवाज देऊन राहिलोय तर तुम्ही उठायच नाव नाही घेत. काय सपान बिपान पडल का काय तुम्हास्नी?अस काय करताय राव? बर बोला जी, चाय बनवु ना?" गोपाळने लेखकाकडे विचित्र नजरेने बघत विचारले.


आता मात्र लेखकाला पूर्ण जाग आली होती. ' म्हणजे ते सगळ स्वप्न होत तर... मात्र किती खर वाटलं होत ते सगळ! क्षणभर तर मला वाटल खरच ती सगळी व्यक्तिमत्व माझ्या अंगावर धावून येत आहेत.' लेखकाच्या मनात आल. क्षणभर विचार केल्यावर मात्र लेखकाच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं,'अरे तस बघायला गेल तर उत्तम प्लॉट आहे की पुढच्या कथेसाठी. वा! वा! भलतेच प्रोफेशनल झालो आहोत की आपण. आपल्याला स्वप्नही आजकाल छान पडायला लागली आहेत. चला लिहायला विषय मिळाला. आता सुरवात केली पाहिजे लगेच.' त्याच्या मनात विचार आला आणि तो स्वतःवरच खुश होऊन हसायला लागला.


लेखकाच असं आपलं आपण हसण अचंब्याने बघणाऱ्या गोपाळकडे बघून तो म्हणला;"गोपाळ.. खरच एक फक्कड़सा चहा कर. मी फ्रेश होऊन लिहायलाच बसणार आहे."आणि मनापासून खुश होत बाथरूमच्या दिशेने वळला.


एक विचित्र कटाक्ष टाकून गोपाळ स्वयंपाक घराच्या दिशेने निघाला. मात्र त्याचा पाय दाराजवळ ठेवल्या एका कप-बशीला लागला. बाजूलाच गार झालेल्या पोह्यांची बशीसुद्धा होती.


"चाय पिउन परत झोपलं की काय साहेब? पोहे पन तसच हायेत. बर म्या तर आताच आलू. मंग ह्ये पोहे आन च्या केला कोनी कोन जान?" अस मनाशी म्हणत आणि अजब करीत कप-बशी घेऊन गोपाळ आतल्या दिशेने वळला.



                                                                        समाप्त

Friday, April 19, 2019

'दोस्ती'




दोस्ती



नितिन, विकास आणि सुधीर लहानपणापासूनचे मित्र. एकाच वयाचे. एकाच शाळेत जायचे. एकाच सोसायटीत रहायचे. कायम एकत्र. अगदी जीवश्च कंठश्च मित्र!


नितिनची आई शिक्षिका आणि वडील प्राइवेट फर्ममधे नोकरीला होते. नितिन शांत स्वभावाचा आणि अभ्यासु मुलगा होता. एखादा विषय तो उत्तम फोड़ करून सांगायचा. त्याने साधारण कॉलेजमध्ये असतानाच पुढे काय करायचं ठरवल होत. त्याप्रमाणे ग्रेजुएशन आणि पोस्ट ग्रेजुएशन नंतर तो एका उत्तम कॉलेज मधे प्रोफेसर म्हणून जॉइन झाला. विषय शिकवायची हातोटी चांगली होती म्हणून अल्पावधितच नाव झाल आणि मग तर त्याने आपले प्राइवेट कोचिंग क्लासेस् सुरु केले. सकाळी 6 ते रात्रि 10 तो बिझी असायचा. नितीनची कॉलेजमध्ये असतानाच स्वाप्नाशी ओळख झाली होती आणि पुढे त्या ओळखीचे रुपांतर मैत्री....प्रेम.... आणि मग दोघांच्याही आईवडीलांच्या परवानगीने लग्न असा छानसा प्रवास त्यांच्या ओळखीचा झाला होता. नितीन-स्वप्नाला दोन मुल होती. मोहन आणि राधिका. स्वप्ना देखील पोस्टग्रजुएट होती. पण तिने कधी नोकरी करण्याचा विचार केला नव्हता. अगोदर मुल आणि संसार याला वेळ देण तिला जास्त महत्वाच वाटायचं. अर्थात दोघांनी मिळून मुलांना छान वाढवाल होत. परंतु मुल मोठी झाली आणि शाळेत जायला लागली. त्यानंतर नितीनने  स्वप्नाच्या मागे लागायला सुरवात केली. "आता मुल मोठी झाली आहेत, मग तू फक्त घरात का बसून राहातेस? तू क्लासची जवाबदारी थोडी तरी घेतलीस तर आपण दोघे मिळून क्लास जास्त व्यावास्थित चालवू शकू." अस म्हणत तो नेहेमी तिच्या मागे लागायचा. स्वप्नाला देखील त्याच म्हणण पटायला लागल.म्हणून मग एकदा मुलांच रुटीन तिने व्यवस्थित लावून दिल, आणि मग तीदेखील त्याच्या क्लासेस् मधे शिकवायला लागली आणि मग हळूहळू त्यात रमली. उच्च मध्यम वर्गातल सुखी चौकोनी कुटुंब होत ते.


विकासचे वडील सरकारी कर्मचारी होते. तो ग्रेजुएशनच्या दुस-या वर्षाला असतानाच ते ह्रदय विकाराच्या झटक्याने गेले आणि विकास त्यांच्या जागेवर नोकरीला लागला. त्याने जेमतेम ग्रेजुएशन पूर्ण केले. त्यामुळे विकासच आयुष्य तस सरळ साध राहील होत. 9 ते 6 ची नोकरी तो अगदी लहान वयापासून करायला लागला होता. लग्नाच वय झाल आणि सरकारी नोकरी असल्याने मुली लगेच सांगून यायला लागल्या. त्याने नेहेमीच्या साच्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून नीताला पसंत केल आणि त्यांच लग्न झाल. नीता देखील एका प्रायवेट कंपनीमध्ये क्लार्क होती. अरुण हा एकुलता एक मुलगा होता त्यांचा. साधासा पण सुखी संसार होता. विकास आणि नीताच बालपण साधारण सारखच गेल होत. त्यामुळेच असेल पण त्यांची स्वप्न देखील खूप श्रीमंत होण्याची कधीच नव्हती. परंतु एकूण सांपत्तिक स्थिती चांगली होती. दोघेही नोकरी करत असल्याने कधी पैशांची चणचण जाणवली नाही. त्यानी मॉल्समध्ये जाण्यापेक्षा समुद्र किनारा किंवा विविध बागांमधून फिरण्याची सवय अरुणाला लावाली होती. त्यामुळे उगाच डोळे दिपवणारी आणि आवाक्याबाहेरच्या स्वप्नाची अपेक्षा अरुणने देखील कधी व्यक्त केली नव्हती. कधी एख्याद्या शनिवार-रविवार ट्रेकला जाण तर कधी नातेवाईकांना घरी बोलावण आणि कधी त्यांच्याकडे जाण... असा काहीसा असायचा त्यांचा कार्यक्रम. साधस मध्यमवर्गीय आणि तरीही सुखी समाधानी आयुष्य होत विकासच आणि त्याच्या कुटुंबाच.


तिघा मित्रांमध्ये सुधीरची स्वप्न मात्र पहिल्यापासूनच खूप मोठी होती. त्याला कायमच काहीतरी खूप मोठ मिळवाव, नाव कमवाव, खूप श्रीमंत व्हावं.... अस वाटायच. तसा हुशारही होता तो. मेहेनती देखील होता. ग्रेजुएशन नंतर मग त्याने MBA केल. काही दिवस मल्टिनॅशनल कंपनी मधे नोकरी केली. आणि त्या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा कॉन्सिल्तान्च्सी चा व्यवसाय सुरु केला. यथावकाश आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलीशी सुधीरने लग्न केल होत. सुधीरची पत्नी मिता नोकरी करत नसे. अर्थात दोन मुलगे होते.... सुमित आणि मितेश....त्यांना सभाळणे आणि घरचे सगळे बघणे यातच ती अड़कलेली होती ती. सुधीर कामानिमित्त कायम बाहेर गावी आणि परदेशात फिरत असायचा. घराला वेळ देणे त्याला शक्य नव्हते. म्हणूनच तिने स्वतः निर्णय घेऊन घराची पूर्ण जवाबदारी उचलली होती. कारण सुधीरच्या मते अशा लहान लहान विषयात चर्चा करण्यासारखे कधी काही नव्हतेच. त्याच्या मते तो यात दाखल न देतां मीताला पूर्ण मोकळीक देत होता. परंतु त्यामुळे मिता आणि सुधीरमध्ये कधी मैत्री झालीच नव्हती. ते दोघे उत्तम पती-पत्नी होते. मिता सुधीरबरोबर मोठ-मोठ्या पार्टीजना जायची आणि त्याची सुविध्य पत्नी असण्याचा उत्तम अभिनय करायची. सुधीरला घरातले सगळे अपडेट्स असायचे... पण संवाद माहित नसायचे. अर्थात हे सुधीरच्या कधीच लक्षात आले नाही. कारण संसारात अडकणे हा त्याचा स्वभावाच नव्हता. मुळात सुधीर थोडासा अलिप्त स्वभावाचा होता. मी.. माझी स्वप्न... माझं यश... हेच त्याचे विचार होते. त्यामुळे सुरवातीला मीताने प्रयत्न केला. पण त्याचा स्वभाव लक्षात आल्यावर तिनेही तो विषय सोडून दिला. नंतर तर लागोपाठ मुल झाली आणि मग तीदेखील मुलांमध्ये रमून गेली.


अशीच वर्षा मागून वर्षे जात होती. नवीन टेक्नॉलजीमुळे सगळ्यांकडे मोबाईल्स आले होते. त्यामुळे नितीन, विकास आणि सुधीरचा एकमेकांशी चांगलाच संपर्क असायचा पण आलीकडे त्यातला ओलावा कमी झाला होता. तिघांचा असा एक whatsaap वर ग्रुप होता. पण त्यावर अलीकडे जास्त करून फोर्वार्ड्सच असायचे. मात्र हरवणारा हा ओलावा टिकवण्यासाठी विकास कायम प्रयत्न करायचा. ग्रूपवर मुद्दाम कसे आहात हे तो विचारायचा आणि उत्तर आल नाही तर मग स्वतःहून अनेकदा दोघानाही फोन करायचा. अशा वेळी तो अगदी सहज... मिनिट दोन मिनिट बोलत असे. पण त्यामुळे एकमेकांची खाबर मिळायची तिघांना. सुधीरच्या आयुष्याला शेडूल अस नव्हतच. अनेकदा तो  मीटिंग मध्ये असायचा. त्यामुळे सुधीर फोन उचलायचाच असं नव्हत. पण तरीही विकासने फोन करण सोडलं नव्हत. मात्र नितीनच शेद्युल विकासने साधारण समजून घेतल होत. त्यामुळे तो कधी फ्री असेल याचा अंदाज घेऊन तो फोन करत असे. तिघा मित्रांच्या मैत्रित मात्र अजिबात अंतर नव्हतं. खूप जीव होता त्यांचा एकमेकांवर. आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि साजरा करता येतील अशा सर्व घटनांची माहिती त्याना एकमेकांना असायची. असेच दिवस... वर्ष सरकत होते.


एक दिवस संध्याकाळी 7 च्या सुमारास नितिनचा मोबाईल वाजला. विकासचा नंबर बघुन त्याला खूप आश्चर्य वाटल. नितिनला 12वी च्या वर्गावर जायच होत. पण विकास असा अवेळी फोन करणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळे काळजी वाटून त्याने फोन घेतला.


"काय रे विकास? काय झाल? सगळ ठीक ना?" नितिनने फोन उचलून काळजीच्या आवाजात विचारल.


"सगळ एकदम मस्त यार. सहज केला होता फोन. आज तुझी आणि सुधीरची खूप आठवण आली म्हणून. डिस्टर्ब केल न तुला? आत्ता तुझी लेक्चर्स असतात न? अरे आवाज एकावासा वाटला रे. चल ठेवतो मी फोन." विकास म्हणाला.


"अरे लेक्चर्स रोजच असतात. थोड़ा उशिरा गेलो वर्गावर तर मुल खुशच होतील. तू बोल यार. कसा आहेस? खूप बर वाटल तुझा आवाज ऐकून." नितिन म्हणाला. त्यात विकासला बोलत करण्याचा त्याचा उद्देश होता. कारण विकास असा सहज फोन करणार नाही याची नितीनला खात्री होती.


"मी मस्त मजेत आहे. नितिन एकदा भेटु या ना यार. किती महीने... महिने का वर्ष होऊन गेल आपण तिघे भेटलो त्याला." विकास थोडा भाऊक होत म्हणाला.


"हो रे. गेल्या वर्षी मी नवीन जागा घेतली क्लाससाठी त्याच्या पूजेला आला होतास न तू तेव्हा भेटलो होतो आपण. सुधीर तर बाहेर गावी होता. त्याला जमलच नाही शेवटी." नितिन म्हणाला. "खरच भेटलं पाहिजे रे. तुम्हाला दोघांना भेटलो ना की नवीन शक्ती मिळाली आहे अस वाटत. तू सांग. कधी भेटु या? नाहीतर एक काम करतोस का... सुधीरला विचार. त्याच्या सोईनी भेटु. कारण आपण दोघांनी ठरवून काही उपयोग नाही. सुधीरला देखील जमायला हव न. त्याची सोय बघितली की तिघही भेटू शकू. काय?"


"ठीके. तुला मेसेज करतो मी त्याच्याशी बोलून." अस म्हणून विकासने फोन ठेवला.


बंद झालेल्या फोनकडे नितिन काही सेकंद बघत राहिला. त्याच्या मनात आल... विकास असा अचानक फोन नाही करणार. काहीतरी कारण आहे नक्की. चांगली न्यूज असती तर त्याने लगेच सांगितली असती. काही अडचणीत असेल का? संकोचाने बोलला नसेल का? नितीनला थोडी काळजी वाटली. पण मग त्याच लक्ष मनगटावरच्या घड्याळाकडे गेलं आणि लेक्चरला जायला उशीर होतो आहे ते त्याच्या लक्षात आल आणि तो लेक्चरला निघाला. दोन दिवसात विकासकडून काहीच मेसेज आला नाही. म्हणून रात्रि शेवटच्या लेक्चरनंतर त्याने विकासाच्या एवजी अगोदर सुधीरला फोन केला. त्यादिवशी विकासने संध्याकाळी म्हणजे खर तर तसा अवेळी फोन केला होता ते काहीसं वेगळ होत अस सारख नितीनच्या मनात येत होत. कारण विकास कायम दुसऱ्याचा विचार करून मगच कोणतीही कृती करेल याची नितिनला खात्री होती. हे मानातले विचार सुधीरला सांगाव अस वाटल आणि त्याला देखील अस काही जाणवल का ते विचाराव असही त्याच्या मनात होत.


फोनची रिंग बराच वेळ वाजली आणि आता नितिन फोन कट करणार तेव्हा सुधीरने फोन उचलला. "नितिन अरे यार ज़रा गड़बडित आहे. उद्या एक महत्वाची मीटिंग आहे. त्याची तयारी करतो आहे. नंतर बोलतो तुझ्याशी." नितिन काही बोलायच्या आत सुधीर म्हणाला. "ठीके." एवढच म्हणून नितिनने फोन ठेवला. सुधीरची सोय बघून भेटायच्या संदर्भात मेसेज करतो अस म्हणूनही विकासचा मेसेज का आला नसेल ते त्याच्या लक्षात आल. तरीही विकासच अस फोन करण त्याला साध वाटत नव्हतं.


रात्रि जेवताना त्याने हा विषय स्वप्नाकडे काढला. तिने सल्ला दिला "तुला जर काही वेगळ वाटतय तर  मग तू जाऊन ये बघू लगेच उद्या. उगाच मनात संशय ठेवला की धड कामात लक्ष नाही लागणार तुझ. मुख्य म्हणजे विकास तुझा जुना आणि खरा मित्र आहे. त्यात तुम्ही बऱ्याच दिवसात भेटलेला नाहीत. मग सहज म्हणून भेटून आलास तरी काय हरकत आहे. तू क्लासची आणि लेक्चर्सची काळजी करू नकोस. मी करेन संध्याकाळची लेक्चर्स मॅनेज."  नितिनला देखील ते पटल आणि तो दुस-या दिवशीच् संध्याकाळी विकासाच्या घरी अचानक जाऊन थड़कला. त्याने विचार केला होता की अचानक जाऊन आपण विकासाला आश्चर्यचकित करुया. पण त्या एवजी नितिन केवळ सरप्राइज नाही तर पुरता कोलंमडून गेला; विकासाच्या घरी पोहोचल्यावर.


नितिनने बेल वाजावली आणि विकासच्या आठवीत शिकणा-या अरुणने दार उघडल. घरात पाऊल ठेवताच नितिनला दवाखान्यातील औषधांच्या वासासारखा वास जाणवला. त्याक्षणी काहीतरी गडबड असावी हे नितीनच्या मनात आल. त्याने हलक्याच आवाजात अरुणला विचारलं,"काय रे सगळ ठीक ना बेटा? बाबा कुठे आहेत तुझे?" अरुणने आत खोलीकडे बोट दाखवलं.  विकास त्याच्या खोलीत झोपला होता. त्याची पत्नी नीता नितिनला तिथे घेऊन गेली. विकास प्रचंड बारीक झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. नितिन पुरता गड़बडला. त्याने नीताकडे गोंधळून बघितल. ती कसनुस हसली आणि डोळ्याला पदर लावून बाहेर गेली. नितीन तिला जाऊन काही विचारणार इतक्यात विकासने डोळे उघडले आणि नितिनला बघुन उठून बसला.


"काय रे हे विकास?" नितिनने त्याच्या शेजारी बसत आणि त्याचा हात प्रेमाने हातात घेत विचारले.


त्याचा हात दाबत विकास म्हणाला,"अरे काय सांगू? मला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे. last stage आहे. no hopes." त्याच अस शांतपणे बोलण एकूण नितीन हबकून गेला. अवाक् झाला. "अरे no hopes काय म्हणतोस? तुला काही कळत आहे का? सायन्स इतकं पुढे गेल आहे. माझ्या ओळखित एक डॉक्टर आहेत. एक्सपर्ट आहेत. मी त्यांची उद्याच् अपॉइंटमेंट घेतो. तू चल फ़क्त."


विकास हसला. "नितिन तुला खरच वाटत की मी किंवा नीताने हे काही केल नसेल? अरे नीताचा सख्खा भाऊच डॉक्टर आहे. त्यामुळे माझी योग्य तिच ट्रीटमेंट चालू आहे. फ़क्त सत्य हे आहे की कॅन्सिर आहे हेच उशिरा लक्षात आल्यामुळे एकूण सगळच हाताबाहेर गेलं आहे. आता काही उपयोग नाही" त्याने नितीनच्या हातावर थोपटत उत्तर दिल. नितीनला काय बोलाव सुचत नव्हत. तो विकासकडे बघत होता आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आल. विकासच्या ते लक्षात आल. त्यामुळे त्यानेच विषय बदलत म्हंटल,"बर ते जाऊ दे. तू सांग ... तू कसा आहेस? अरे मी सुधीरला कॉल केला होता. पण तो थोड़ा बिझी होता; म्हणून मग तुला मेसेज नाही केला मी. तुझ काही बोलण झाल आहे का त्याच्याशी?"


"झाल होत बोलणं. पण थांब आत्ताच सुधीरला फोन करतो." नितिन त्याचा मोबाईल बाहेर काढत म्हणाला.


विकासने त्याचा हात धरला. म्हणाला,"नितिन प्लीज माझ्या आजारपणाबद्धल कोणालाही सांगू नकोस. मला कोणाची दया नको आहे. दोस्तीच्या ओढीने तो आला तर ठिक. नाहीतर नको. माझा इलाज व्हावा... मदत मिळावी म्हणून नाही मी तुला किंवा त्याला कॉन्टेक्ट केला. तुम्हाला भेटावस वाटल म्हणून कॉन्टेक्ट केला आहे."


नितिनला त्याच म्हणण पटल. त्याने फोन आत ठेवला. मग विकास आणि नितीन गप्पात रंगले. मग पुढचे 3 तास ते दोघे जुन्या आठवणी आणि मस्ती केलेले दिवस यावर गप्पा मारुन खूप हसले. साधारण रात्रि 10 च्या सुमाराला नितिन निघाला. निघताना नितीनने विकासचा हात हातात घेतला आणि थोपटला. त्या एका स्पर्शात दोघा दोस्ताना प्रेमाची भाषा समजली. नितीन आल्यापासून विकास खूप वेळ बसल्याने दमला होता. तो आडवा झाला आणि लग्गेच् झोपला.


निघताना नितिनने नीताला सांगितल.."काही लागल तर लग्गेच् कळव वहिनी. मी इथेच आहे. खर तर माझ्या मनात एक गोष्ट आहे. माझा एक खूप चांगला मित्र डॉक्टर आहे. मी त्याला उद्या घेऊन येतोच."


नीता शांत होती. ती म्हणाली,"नको नितिन भावजी. विकासला नाही आवडणार. मुख्य म्हणजे जे जे म्हणून शक्य आहे ते सर्व काही आम्ही करतो आहोत. माझा भाऊच डॉक्टर आहे. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट चालु आहे. माझ्या एका बहिणीच्या ओळखीने आयुर्वेदिक औषध पण चालू केली आहेत मी. तुम्ही आलात आणि विकास आज खूप दिवसानी असा उठून बसला. गप्पा मारल्या. त्याला अस बघून मला खूप बर वाटल भावजी. खूप जीव आहे त्याचा तुमच्यावर आणि सुधीर भावजिंवर. त्यामुळे फ़क्त एकच विनंती आहे; तुम्ही फ़क्त जमेल तस भेटायला या, त्याच्या जवळ बसा, गप्पा मारा. अजून काय म्हणू मी?" एवढ़ बोलून तिने डोळ्याला पदर लावला. नितीनच्या डोळ्यात देखील पाणी उभ राहील. जमेल तसं विकासला भेटायला यायचं हे तिथल्या तिथे नितीनने ठरवलं आणि नीताचा निरोप घेऊन तो तिथून निघाला.


जड़ मनाने नितिन घरी पोहोचला. घरी त्याने स्वप्नाला सर्व कल्पना दिली. "जीव तुटतो आहे ग. माझा विकास आयुष्यभर कायम परिस्थितिशी झगड़ला. पण कधीही तक्रार नाही केली. वडील लवकर गेले आणि तो त्यांच्या जागी लागला. कायम हसत मुख. आज मनात येत ग की त्याची काय एम्बिशन होती ते कधी आम्ही त्याला विचारलच नाही. तो जे जगतो आहे तीच त्याची इच्छा असावी हे गृहीत धरल. आणि आता काही विचारायला उशीर झाला आहे ग. मुख्य म्हणजे आजही तो शांत आहे.हे एवढ मोठ आजारपण देखील त्याने स्वीकारलं आहे ग. मी उद्याच् सुधीरला फोन करुन सगळ सांगतो. विकास नको म्हणाला आहे; पण त्याची तब्बेत खूपच खालावली आहे. काहीच सांगता येत नाही ग. सुधीर भेटला तर त्याला बर वाटेल." नितीन बोलत स्वप्नाशी होता.... पण खर तर ते स्वगतच होत.


दुस-या दिवशी नितिनने सुधीरला फोन केला. पण सुधीरने फोन उचलला नाही. म्हणून मग नितिनने एक मेसेज केला. "थोडं म्हत्वाच काम आहे. जमेल तसा पण लगेच फोन कर." मात्र त्या दिवशी सुधीरचा फोन आला नाही. नितीन सुधीरच्या फोनची वाट बघत होता. फोन आला नाही हे बघून नितिन खूप डिस्टर्ब झाला होता. त्याचा अस्वस्थपणा बघुन स्वप्ना म्हणाली;"मी काही दिवस संध्याकाळची क्लासेस् बाघिन नितीन. तू तुझ्या विकासला भेटायला जात जा. खर सांगू का नितीन विकासला भेटायची गरज त्याच्यापेक्षा तुलाच जास्त आहे. कारण आपण काही करू शकत नाही हे समजून तू जास्त अस्वस्थ झाला आहेस. "


नितिनला स्वप्नाच म्हणण पटल. मग त्याने आणि स्वप्नाने कामाच वेळापत्रक बनवलं आणि तो एक दिवसा आड़ विकासकडे जाऊन बसु लागला. दोघे जुन्या आठवणी जागवायचे... त्यातून निघणा-या संदर्भातुन ज्यांची नावं आठवायची त्यांना दोघे मिळून फोन करायचे. एकच अट होती... विकासाची सद्य परिस्थिती सांगायची नाही. मग नितिन फोन लावून म्हणायचा की सहज आलो होतो विकासकड़े तर तुमची आठवण निघाली आणि फोन केला. आणि मग दोघे बोलायचे त्या व्यक्तिशी. कधी सोसायटी मधले जुने मित्र... तर कधी एकमेकांचे नातेवाईक.. असा फोन्सचा सिलसिला चालत असे. अशाच गप्पांमधून एकदा सुधीरला देखील त्यांनी फोन लावला होता. अगदी सहज.. फक्त गप्पा माराव्यात या उद्देशाने. पण तेव्हाही सुधीरने फोन उचलला नाही. त्यानंतर मात्र नितिन मनातून रोज सुधीरच्या फोनची किंवा निदान मेसेजची वाट बघत होता. पण सुधीरचा काहीच पत्ता नव्हता.


असेच दोघे एकदिवस गप्पा मारत बसले होते आणि विकासने नितीनचा हात धरून विचारल;"नितीन तुला ती मनीषा आठवते का रे?"

"आयला विकी तू पण ग्रेट हा! तुला आठवते ती अजून? पहिल्या बिल्डिंगमध्ये भाड्याने आली होती ती ना?" हसत नितीनने विचारले.


"हो रे! काय वेडे झालो होतो ना आपण तिघेही तिच्या मागे? कुठल्या शाळेत जाते.. कधी येते... तिच्याबद्धालच्या सगळ्या बातम्या काढल्या होत्या आपण." विकास हसत म्हणाला.


"हो! साल्या तूच काढल्या होत्यास. सुधीरसाठी. पागल झाला होता ना तो तिच्यासाठी." नितीन म्हणाला.


"का रे त्याच्यावर नाव ढकलतो आहेस? तू काय कमी होतास तिच्या मागे? तिची शाळा आपल्या नंतर अर्ध्या तासाने सुटायची. तर आम्हाला चुकवून तू धावत यायचास सोसायटीमध्ये. आणि ती दिसेल असा गेट जवळ रेंगाळत राहायचास." विकासने त्याला आठवण करून दिली.


"जा रे! मी भले लवकर यायचो. पण तुला सुधीरबद्धल जास्त प्रेम होत न. त्यामुळे तू मनीषाशी ओळख करून घेऊन त्याची आणि तिची भेट घालून दिली होतीस हे मला कळल नव्हत अस समजतोस का?" नीतीनेने विकासला कोपरखळी मारली.


"हो रे. त्याला ती जाम आवडायची. सारखा तिच्याकडे टक लावून बघायचा. मला राहावल नाही. मग मीच तिची ओळख काढून तिच्याशी मैत्री केली आणि मग तिची आणि सुधीरची मैत्री करून दिली होती. यार ती पण त्याला मस्त लाईन द्यायची रे. पण मग तिच्या बाबांची बदली झाली आणि गेले ते लोकं दोन वर्षात. पण कमाल तर सुधीरची आहे.  विसरला यार तो त्या मनिषाला लगेच. साला पटकन बाहेर पडायचा कुठल्याही भावनिक बंधनातून." विकास म्हाणाला.


"पण काहीही म्हण विकी तुझा सुधीरवर जास्त जीव होता की नाही?" नितीनने विचारल.


विकास हसत म्हणाला;"नाही रे. अस का म्हणतोस? आपण तिघे घट्ट मित्र होतो."


"ते होतोच रे. पण तुला का माहित नाही त्याच्याबद्धल एक वेगळा ओलावा होता. कधी कोणी तुला काही दिल आणि ते सुधीरला आवडणार असेल तर तू तो येईपर्यंत वाट बघायचास आणि मग त्याच्याशी शेअर कारयाचास. मला कधी जेलस नाही वाटल. पण ते माझ एक ओब्झरवेशन होत. खर सांग ह."


"हो रे! खर सांगू का सुधीरच्या व्यक्तीमत्वात तस काहीस आहे. तो जिथे जातो ना तिथे त्याला हव तस घडवून आणतो. मला त्याचा हा स्वभाव खूप आवडायचा. बघ न! आज त्याच्या त्याच स्वभावाने त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे. हो की नाही? खूप खूप अभिमान वाटतो रे सुधीरचा. कधी कुठल्या बिझनेस मागझीनमध्ये त्याच नाव वाचल की उर भरून येतो. मी सगळ्याना दाखवतो ते मागझीन आणि सांगतो हा माझा बालपणीचा घट्ट मित्र आहे. बस... एकच वाटत रे! जसा मोठा होत गेला तसा तो खूप जास्त बिझी होत गेला रे. घरच्यांना तरी वेळ देतो की नाही कोण जाणे. अर्थात ही तक्रार नाही ह. सहज आपलं मनात आल म्हणून म्हंटल." अस म्हणून विकास हसला आणि सगळ समजून नितीनही हसला.


असे 8-10 दिवस गेले. एक दिवस दुपारी नीताचा नितिनला फोन आला. ती रडत होती; म्हणाली; "भावजी या..." बस इतकंच.


नितिन जीवाच्या आकांताने धावला.... पण सगळ संपल होत. विकासच्या मुलाला.... अरुणला... पोटाशी घेऊन नितिन खूप रडला. अगदी लहान मुला सारखा. "मी त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही.." बस नितीन एवढाच परत परत म्हणत होता. नीता त्याच्या जवळ आली आणि म्हणाली,"भावजी अस काय करता? तुमच्यामुळे विकासचे शेवटचे दिवस खूप चांगले गेले. तुमच्या येण्याकड़े तो डोळे लावून बसलेला असायचा. तुम्ही असे पर्यंत तो त्याच दुखण देखील विसरून जायचा. आता जर तुम्ही असा त्रास करून घेतलात तर त्याच्या जीवाला तिथे त्रास होईल. सांभाळा स्वतः ला." नितिनने त्या धीराच्या स्त्रीकडे बघितल आणि मन आक्रंदत असूनही तो  शांत झाला.


2-3 दिवस गेले आणि सकाळीच् नितिनला सुधीरचा फोन आला. आवाज गोंधळालेला होता. "नितिन आज न्यूज़ पेपरमधे एक फोटो आणि बातमी दिसते आहे निधनाची. अरे नाव विकास राजे आहे. फोटो देखील आपल्या विकाससारखा आहे यार. इतका घाबरलो आहे मी. विकासचा फोन लावतो आहे पण बहुतेक तो ऑफिसला जायला निघाला असेल; त्यामुळे ट्रेन मधे असेल. रेंज नसावी. कारण लागत नाहिये...."


नितिनच्या डोळ्यात पाणी आल; त्याचा आवाज भरून आला आणि तो म्हणाला,"सुधीर बातमी आपल्या विकासचीच आहे. मीच दिली आहे काल."


सुधीर गडबडला. "अरे काय म्हणतो आहेस तू? बरा आहेस ना तू? मला काहीच कळत नाहीये" त्याचा आवाज घाबरलेला होता.


मग मात्र नितिन शांत झाला आणि म्हणाला,"सुधीर अरे विकासला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. लास्ट स्टेज होती. डॉक्टर्सनीसुद्धा कल्पना दिली होती. मी तुला 2-3 वेळा कॉन्टेक्ट करायचा प्रयत्न केला होता. पण तू फारच बिझी होतास."


सुधीर हतबलपणे म्हणाला,"अरे मी परदेशात गेलो होतो रे. पण तू मला काहीतरी कल्पना द्यायचीस न. बर आपण नीतावाहिनीना भेटायला गेल पाहिजे रे. मी आज थोडा गड़बड़ित आहे. आपण उद्या संध्याकाळी जाऊ या. चालेल का तुला?" त्यावर नितिन शांतपणे म्हणाला,"सुधीर मी जातोच वाहिनी आणि अरुणला भेटायला सध्या रोज. तुला किती वाजता जमेल ते सांग."आणि त्याने फोन ठेवला.


दुस-या दिवशी संध्याकाळी नितिन आणि सुधीर दोघे विकासकडे गेले. अरुणने दार उघडले आणि नितिनकड़े बघुन हसला. ते दोघे आत आले. अरुण आतल्या खोलीत निघून गेला. नीता तिथेच बसली होती विकासच्या फोटोकडे बघत. नितिन आणि सुधीर बसले. काय बोलाव कुणालाच सुचत नव्हतं. शेवटी सुधीर म्हणाला,"वाहिनी मला काहीच कल्पना नव्हती हो. नाहीतर मी नक्की वेळ काढला असता आणि येऊन गेलो असतो. निदान माझ्या ओळखीतले स्पेशालीस्ट डॉक्टर्स पाठवले असते. खूप वाईट झाल. विकास मी आणि नितिन बेस्ट फ्रेंड्स होतो. काल पेपरमध्ये बातमी वाचली तेव्हापासून खूप अस्वस्थ आहे मी. शेवटच भेटू पण नाही शकलो मी माझ्या मित्राला. त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही मी." अस महणून सुधीर क्षणभर थांबला आणि मग म्हणाला," वहिनी तुम्हाला जर काही मदत लागली तर नक्की सांगा ह."


नीताने सुधीरकडे बघितल. ती काही बोलणार इतक्यात आतून सर्व संभाषण ऐकणारा अरुण बाहेर आला.


 "सुधीर काका. माझ्या वडिलांना योग्य ट्रीटमेंट चालु होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे उपाय करत होतो. माझे मामाच डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टर्सची पण कमी नव्हती. पण माझ्या बाबांना फ़क्त मैत्रीचा ओलावा हवा होता. नितिनकाका गेले अनेक दिवस एक दिवसा आड़ येऊन बाबांबरोबर बसायचे. गप्पा मारायचे. काकांची यायची वेळ झाली की बाबा नितीनकाकांची वाट बघत असायचे. आम्हाला त्यांनी तस कधीच म्हंटल नाही. पण आम्हाला दिसत होत की त्यांच्या मनात तुम्हाला भेटायची खूप ओढ होती. पण आपल्यामुळे कोणाच काहीही अडू नये; हा त्यांचा स्वभाव होता. आजही आम्हाला काहीच मदत नको आहे. कारण  त्यांना त्यांचा आजार कळल्यानंतर त्यांनी आमची योग्य ती सोय करून ठेवली आहे. मी अजुन लहान आहे मान्य आहे. पण माझा क्लेम माझ्या बाबांच्या जागी त्यांच्या नोकरीत रहाणार आहे; तसा पत्रव्यवहार त्यांनी करून ठेवला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये.  माझी आई प्रायवेट फर्ममध्ये नोकरी करते आहे. त्यामुळे आम्हाला पैशाची चणचण नाही जाणवणार. बाबांनी चांगल्या इन्वेस्टमेंट्स केल्या होत्या. त्यामुळे भविष्याची चिंता देखील नाही काका. त्यांनी मलाही सांगून ठेवल आहे की जर मला वेगळ काही करियर करायचं असेल तर मी ते जरूर केल पाहिजे. त्याना ते जमल नाही, कारण त्यांच्यावर वडीलांनतर घराची जवाबदारी होती. पण माझ्या सुदैवाने मला ती काळजी नाही आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही.


 काका, फक्त एकच सांगतो.... मला माहित आहे लहान तोंडी मोठा घास वाटेल तुम्हाला; पण तुम्ही आत्ता येऊन जे बोलता आहात त्यापेक्षा तुम्ही जर बाबा असताना एकदा तरी आला असतात न तर त्यांना खूप बर वाटल असत. तुम्ही तुमची एखादी खूप महत्वाची मीटिंग केली नसतीत तर अजुन 15 वर्षानी ते कोणालाही लक्षात राहणार नव्हतं. पण मी आयुष्यभर हे लक्षात ठेविन की माझ्या बाबांनी ज्यांच्यावर मित्र म्हणून मनापासून प्रेम केल ते सुधीरकाका माझ्या वडिलांना एकही संध्याकाळ देऊ शकले नाहीत त्यांच्या शेवटच्या दिवसात. अर्थात हे माझ मत झाल. माझ्या बाबांनी नक्कीच तुम्हाला कधीच माफ केल असेल."


त्याच बोलण ऐकून सुधीरचा चेहेरा उतरला. त्याक्षणी त्याला भावना... प्रेमाचा ओलावा... याचा अर्थ जाणवत होता. कालपासून त्याच्या मनात विकासच्या खूप आठवणी दाटून आल्या होत्या. त्याला ते सगळ अरुणला सांगाव अस मनातून वाटत होत. पण त्याच्या लक्षात आल की आता खरच खूप खूप उशीर झाला होता. त्याचा विकास त्याला सोडून गेला होता.... त्याची वाट बघत गेला होता.... आज सुधीरला जाणवत होत की एक्स्पर्ट डॉक्टर्सचा ताफा उभा करण अवघड नसत. पण हृदयाच्या जवळ जी असतात त्यांच्या भावना समजून घेण आणि सांभाळण जास्त महत्वाच असत. त्याला नीता वाहिनीची माफी मागायची होती. त्याला अरुणला जवळ घ्यायचं होत. त्याच्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायची होती. पण सुधीरने काहीच केल नाही.... आज अरुण जे बोलला त्या सत्याचा विचार त्याच्या मनात आला.  तो काहीही न बोलता तिथून बाहेर पडला.


-----------------------------------------------------------------------------------------.